गुजरात....... १ डभोई.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
12 Apr 2015 - 9:21 pm

गुजरात २०१५
श्री. इस्पिकएक्का व श्री. मोदक यांची प्रवासवर्णने वाचून इच्छा झाली की आपणही प्रवास वर्णन लिहून बघावे. मधे गुजरातला माझ्या रिट्झने गेलो होतो त्या प्रवासाचे हे प्रवास वर्णन......

काहीच दिवसापूर्वी कोकणात मालवणला गेलेलो असताना कणकवलीच्या अगोदर गाडीतून पुढच्या चाकातून चक्चक् असा हलकासा आवाज येत होता. मी बायकोला विचारलेसुद्धा की तुला येतोय का तो आवाज ? येतो आहे असे सांगण्यात आले परंतू तो कसला होता हे काही कळले नव्हते. थोड्याच वेळात जेव्हा एका ठिकाणी चहा पिण्यास थांबलो व परत गाडीला स्टार्टर मारला तेव्हा डॅशबोर्डवरचा ए बी एसचा लाईट लागून राहिलेला दिसला. पुण्याला चौघुलेंकडे फोन करुन त्यांचा सल्ला मागितला तेव्हा त्याने ‘तुम्ही बाहेर आहात कशाला धोका पत्करताय ? कणकवलीच्या मारुतीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमधे जा व दाखवून घ्या’ जवळच असल्यामुळे लगेचच तेथे गेलो. तेथे तपासणीनंतर उजव्या पुढच्या चाकातील एबीएस् सेन्सर ची केबल तुटलेली आढळली. केबल क्लँपमधून सुटून टायरला आतून घासत घासत तुटली होती व शॉर्ट झाल्यामुळे सेन्सर उडाला होता. यामुळे प्रत्यक्ष गाडी चालविताना जाणविणारा फरक म्हणजे ब्रेक लावताना गेलेला आत्मविश्वास. ब्रेक लावल्यावर गाडी पाहिजे तेथे थांबेल की नाही ही सतत वाटणारी शंका. अर्थात कणकवलीच्या सेंटरमधे तो सेन्सर नव्हताच. त्या मेकॅनिकने बाकी काही बिघाड नसल्यामुळे गाडी चालविण्यास हरकत नाही अशी ग्वाही दिली. त्या सहलीवरुन परत आल्यावर मारुतीमधे गाडी पाठवली. तेथेही सेन्सर लगेचच उपलब्ध नसल्यामुळे तो मिळाल्यावरच गुजरातच्या सहलीला निघायचे निश्चित केले.

गाडी दुरुस्त करुन आली ३० डिसेंबरला आली त्यामुळे आधीच आयोजन केल्याप्रमाणे २ जानेवारीला निघायचे निश्चित केले. लांबच्या सहलीसाठी आपण सगळे बहुतेक गाडी सर्व्हिसींग करुन आणतो, पण गाडी रँपवर चढवून गाडीखाली बघत नाही. आता कानाला खडा ! निघण्याआधी गाडी खालूनही नजरेखालून घालयचा पण केला आहे. खाली केबल्स क्लँपमधून सुटल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजून एक महत्वाची खरेदी केली आणि ती म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या हवा भरायच्या कॉंप्रेसरची. त्याचा एकदा उपयोग झाला पण अत्यंत ओसाड अशा जागी. या प्रकरणात एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा शोधही लागला. चौगुलेमधे सिनियर सिटिझन्ससाठी गाडी घेऊन जाण्याची व परत आणून देण्याची सुविधा फुकट देण्यात आली आहे. हे मला आवडले....

सहलीचा मार्ग असा ठरवला होता...

पुणे-बडोदा-जामनगर-भूज-जामनगर-द्वारका-पोरबंदर-सोमनाथ-जूनागढ-राजकोट-जामनगर- अहमदाबाद-पाटण-मोधेरा-अहमदाबाद-बडोदा-पुणे..... अंदाजे ३५०० किमी प्रवास होईल असा अंदाज होता तो बऱ्यापैकी बरोबर आला. सहलीचे मुख्य उद्दीष्ट ठेवले होते –
१ प्राचीन देवळे
२ गुजरातची प्रगती खरी की खोटी ते जेवढे शक्य होईल तेवढे बघणे.
३ पक्षी निरिक्षण व छायाचित्रण
४ गुजराती जेवणांचा व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे शिवाय मजा करणे हाही मुख्य हेतू मनात होताच.

छायाचित्रणासाठी मी एक चेकलिस्टच तयार केली आहे ती खालीलप्रमाणे –
कॅमेरा, दोन बॅटऱ्या, दोन कार्ड, ट्रायपॉड, दोन लेन्सेस, छोटा ट्रायपॉड (सहा इंची) मॅक्रोच्या रिंग्ज, व्हाईट बॅलन्सचा क्युब, लेन्स साफ करायचे किट, निरनिराळे फिल्टर्स, लॅपटॉप, एक एक्स्टर्नल हार्डडिस्क, सगळ्या केबल्स (यादी) कॅमेऱ्याची छोटी बॅग, एक चष्मा ( कॅमेऱ्याच्या बागेत) एक छत्री - वेळ पडल्यास कॅमेऱ्यावर धरण्यास. या सगळ्यावर टिकमार्क करुन ती यादी कॅमेऱ्याच्या बॅगेत ठेवली व लवकर उठायचे म्हणून लवकर झोपी गेलो. लवकर झोपे लवकर उठे .....इ.इ.इ.

पहाटे ५-४५ला बहीण व मेहुण्याला त्यांच्या घरी सुस रोडला घेण्यास पोहोचलो. रिट्झ गाडी चांगली आहे पण मोठ्या सहलीला चौघांसाठी जागा फारच कमी आहे. ड्रायव्हर सीटवर एवढी काही अडचण येत नाही पण बाकींच्यांचा पायात सामान, मधे सामान त्यामुळे हलण्यास बिलकूल जागा नाही. मागे बायकोच्या व बहिणीच्या मधल्या जागेत इतके सामान कोंबले होते की दोघींना एकमेकींकडे बघण्यासाठी माना वर कराव्या लागत होत्या. बूटकडे तर बघावेसे वाटत नव्हते. पुढच्या सहलीआधी टपावर एक चांगल्या प्रतीचे कॅरियर लावण्याचे निश्चित केले आहे. अर्थात बायकोने खायचे सामान कमी झाल्यावर बरीच जागा कमी होईल अशी समजूत काढली परंतू त्याचबरोबर नवीन सामान येणार नाही हे आश्र्वासन देण्यास बहुदा ती सोयिस्कररित्या विसरली असावी कारण येताना सामान कमी झाल्याचे मला तरी काही जाणवले नाही. खाण्याचे सामान इतके घेतले की हॉटेल काढू शकू या प्रकारची स्टँडर्ड चेष्टा करुन झाली पण एक कबूल करायलाच लागेल की खाण्याच्या पदार्थांचा शेवटचा कणही आम्हाला खावा लागला. व शेवटी आम्ही बायकांची माफी मागितली. त्यांनीही गत्यंतर नसल्यामुळे आम्हाला उदार अंत:करणाने माफ केले असावे.

बोईसर टोल नाक्याआधी एक सूर्यनदीची पाटी वाचल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे नद्यांची कमी असलेले ज्ञान. आपण कुठला रस्ता कुठे जातो, त्याला कुठला रस्ता येऊन मिळतो, पर्वत रांगांची नावे, हे सर्व सांगू शकतो पण हाच प्रश्न नद्यांच्या बाबतीत स्वत:ला विचारुन बघा... अंऽऽऽहंऽऽऽऽ याचा जरा अभ्यास वाढवायलाच पाहिजे मी मनात म्हटले. हे वाक्य मनात येताच मिपा आठवले व हसू आले....

नंतर लागलेल्या पार्डी टोलवर चिक्कू घेतले व त्यावरुन अजून एक धडा शिकलो. पिकणारी फळे गाडीत ठेऊ नयेत हा. त्या पिकलेल्या चिक्कोच्या वासाने आमचे डोके भणाणून गेले. मधे रस्त्यात एके ठिकाणी आपल्या ज्वारीच्या हुरड्यासारख्या धान्याचा हुरडा विकायला बसले होते. ताजा हुरडा खायला मिळणार म्हटल्यावर गाडी थांबवून नीट पाहिले तर ती ज्वारी नव्हती. दाणे मोठे होते व त्याला ते क्वोंड असे काहीतरी म्हणत होते. ते भाजून हुरड्यासारखे मळून देत होते पण त्यावर तिखट शेव टाकून खायला देत होते. ३० रुपये पाव किलो. मला तरी तो प्रकार आवडला. रस्त्यात ठिकठिकाणी निर्जन जागी थांबू नये अशा पाट्या ठिकठिकाणी लावलेल्या आढळल्या त्यावरुन दिवसा ढवळ्याही वाटमारी होते की काय अशी शंका आली. शेवटी ५५४ किमी प्रवास करुन बडोद्याला संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. दुसऱ्या दिवशी दभोईला जायचे होते. ड्रायव्हिंग करणारा मी एकटाच होतो. आराम करण्याची आवश्यकता असल्यामुळे सकाळी निवांत ८ वाजता निघायचे असे ठरल्यावर सकाळी ८ वाजता निघालो.

डभोईचे प्रचिन नाव आहे दर्भावती. डभोई बडोद्यापासून ३२ एक किमि आहे. गावापर्यंतचा रस्ता मस्त, आजुबाजूला कोथींबिरेची शेती. कोथिंबीर फुलाला आली असल्यामुळे खाली हिरवी रोपे व वर पांढऱ्या फुलांचे तुरे असा मोठा बहारदार देखावा दिसत होता. मधेच वाऱ्याची झुळूक आली की रोपांची ती पागोटी मस्तपैकी डुलत होती.

डभोईमधे शिरताना मात्र हे सगळे दृष्य बदलू लागले व इतिहासात वाखाणलेल्या सिद्धराजा जयसिंगाने बांधलेले हेच का ते डभोई ही शंका येऊ लागली. खरोखरच उकिरडा बरा अशी पहिली वेस लागली.

सिद्धराजा जयसिंग हा एक कलासक्त राजा होता व त्याने जी बांधकामे केली आहेत त्यावरुन दिसून येते. त्याने डभोईचा किल्ला बांधला व त्याने बांधलेल्या अजून दोन वास्तूंनी याची प्रचिती येते. पहिली वास्तू आहे रुद्रमहालय व दिसरी सहस्रार्जून तलाव. प्रबंधचिंतामणीमधे या राजाबद्दल एक श्र्लोक आहे तो असा :
महालयो महायात्रा महास्थानं महासर: |
यत्कृतं सिद्धराजेन कियते तन्न कियेचित. ||
याचा अर्थ साधारणत: असा होतो...भव्य महाल,(रुद्रमहालय), धार्मिक यात्रा (सोमनाथ), स्थान (दरबार) व सागराप्रमाणे भव्य तलाव (सहस्रलिंग तलाव) यात सिद्धराजाचा हात धरणारा या भूतलावर कोणी नाही.....

डभोईला चार वेशी आहेत व त्या उत्कृष्ट कलाकृतींनी नटलेल्या आहेत. पण मला हे उमजले नाही की या वेशींचा गावाच्या संरक्षणासाठी काय उपयोग होता. कदाचित त्यावेळी हा राजा एवढा बलाढ्य होता की त्याला त्याची गरज भासली नसावी. माझ्या मते हा दुरदृष्टीचा पूर्णपणे अभाव असल्याचे द्योतक आहे. मी तरी असली नाजूक वेस व तटबंदी संरक्षणासाठी बांधली नसती. परकीय आक्रमकांना दोष देण्यात काय हशील आहे ? एक वेस आहे पूर्वेला तिचे नाव आहे हिराभागोल, हे नाव ज्याने ती बांधली त्या हिराधर नावाच्या वास्तूविशारदाच्या नावावरुन ठेवले आहे. पश्चिमेला आहे वडोदरा वेस, उत्तरेला चंपानेर वेस व दक्षिणेला आहे माहुडी किंवा नांदेड वेस. यातील पहिल्या व शेवटची वेस अप्रतीम शिल्पांनी सजलेली आहे. अर्थात उकिरडा तुडविल्यानंतर ही रत्ने आपल्या दृष्टीस पडतात....

राजा होता हिंदू, पण जैनधर्माला त्याने उदार राजाश्रय दिला असल्यामुळे दभोईमधे अनेक जैन देवळेही दिसतात. मराठ्यांसाठी डभोईचे अजून एक महत्व आहे. डभोईला एक महत्वाची लढाई झाली ज्याने शाहूमहाराजांचा दरारा महाराष्ट्रात सिद्ध झाला. ही लढाई झाली बाजीराव पेशवे पहिले व सरसेनापती त्रंबकराव दाभाडे यांच्यात. राजाराममहाराजांनी खंडेराव घाटग्यांची योग्यता पाहून त्यांना भली मोठी जहागिरी दिली व त्यांनीही त्याचे चिज केले. १७१७ साली जानेवारीत शाहूमहाराजांनी दाभाड्यांस गुजरातला पाठवून तिथे वसूली करण्याचा अधिकार दिल्यावर खंडेराव व बाळाजी विश्र्वनाथ यांच्यात चांगली मैत्री हो़ऊन त्यांनी बरीच फायदेशीर कामे पूर्णत्वास नेली. परंतू त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा त्रंबकराव व त्याचा सरदार पिलाजी गायकवाड हे मोहिमांच्या खर्चाचा हिशेब देईनासे झाल्यावर शाहूमहाराजांनी बाजीरावास या दोघांची समजूत काढण्यास गुजरातेत पाठविले. बाजीराव शेवटपर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला अपयश आले. याच्यातच निजामाने दाभाडे व पिलाजीचे कान भरले व गुजरातमधे त्यांचे आता काम राहणार नाही असे पटविले. अर्थात बाकी अनेक कारणेही होती त्यात आता आपण जायला नको. त्यावर एक भला मोठ्ठा लेख होईल. बाजीराव डभोईस मुक्कामास असता १ एप्रिल १७३१ रोजी दाभाड्यांनी त्यांच्या तळावर अचानक हल्ला चड्गविला. बाजीरावाची फौज होती अंदाजे २५००० व दाभाडे व गायकवाडांची मिळून होती ५०,०००. त्रंबकराव स्वत: हत्तीवर बसून लढाईत सहभागी झाले होते. तेही शूर होतेच. असे म्हणतात त्या हत्तीचा माहूत जखमी झाल्यावर ते पायाने हत्तीला पराणे टोचत लढाई करत होते तेवढ्यात कपाळात गोळी लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पुढे शाहू महाराजांनी पेशवे व दाभाड्यांमधे दिलजमाई करुन दिली पण दाभाड्यांना मोहिमांचा हिशेब द्यायला लावलाच. शाहू महाराजांनी स्वत:च्या सरसेनापतीस वठणीवर आणले हे बघून इतर सरदारांचीही टाळकी ठिकाणावर आली असे म्हणतात. मी या लढाईबद्दल डभोई येथे चौकशी केली पण कोणालाच काही माहिती नव्हते.

माहुडीची वेस:
या वेशीशेजारीच अलिकडेच बांधलेले एक कालिमातेचे छोटे मंदीर आहे. वेशीच्या भिंतीवर नाथ पंथीय साधूंची शिल्पे आहेत. (असे काही जणांचे म्हणणे आहे) त्याबद्दल प्रत्येक छायाचित्रांखाली जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेशीला आतून अशा पाच कमानी आहेत. व प्रत्येक कमानीच्या मधे जी जागा आहे त्यात शिल्पे कोरलेली दिसतात....कमानी वर पूर्वी बांधकाम होते असे म्हणतात पण आता तसे काही दिसत नाही. दिसते ते तारांचे जंजाळ ज्याचे छायाचित्र घेववत नाही.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

समोरून काढलेले छायाचित्र.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या कमानींवर गजव्यालावर बसलेल्या स्त्रिचे शिल्प प्रत्येक ठिकाणी आढळते. बहुदा ते सजावटीसाठी असावे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कमानीवर थोडे वर पाहिल्यास दोन योगाचार्यांच्या प्रतिमा दिसतात. त्यातील डाव्याबाजूच्या योग्याने गुडघ्याभोवती योगपट्टा लावलेला दिसतो. असे म्हणतात हा एकदा चढविला की त्याच स्थितीत साधक १०-१२ तास सहज बसू शकतो.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हे पाहिल्यावर मला एलोरामधे एका भिंतीवर असलेल्या एका योग्याच्या चित्राची आठवण झाली. सध्या हा योगपट्टा साधक वापरतात का ते माहीत नाही.....बघायला पाहिजे एकदा.........

अजून शिल्पे पुढच्या भागात बघू....व त्यानंतर हिराभागोलला जाऊ.
क्रमशः
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

...आता आम्हाला एका सुंदर अशी 'सफर-मेजवानी' मिळणार याची खात्री झाली.

पु.ले.शु.

आदूबाळ's picture

12 Apr 2015 - 10:30 pm | आदूबाळ

वाचतोय...

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Apr 2015 - 1:13 am | लॉरी टांगटूंगकर

अर्थात बाकी अनेक कारणेही होती त्यात आता आपण जायला नको. त्यावर एक भला मोठ्ठा लेख होईल

याची स्वतंत्रपणे फर्माईश करण्यात येत आहे. बाकी व्रुत्तांत भारीच!

सुरुवात झकास आणि उत्सुकता वाढवणारी झाली आहे.नमुना(teaser?)चित्रे आवडली।. प्रवासाची तयारी दिल्याने आम्हीही तुमच्याबरोबर निघालो.ड्राइविंग एकट्याचेच आणि दुसरा कोणी त्यची गाड़ी घेउन येत नसल्याने काळजी समजू शकतो.बाकी दिेलेला मार्ग>>पुणे-बडोदा-जामनगर-भूज-जामनगर-द्वारका-पोरबंदर-सोमनाथ-जूनागढ-राजकोट-जामनगर- अहमदाबाद-पाटण-मोधेरा-अहमदाबाद-बडोदा-पुणे..... अंदाजे ३५००>>> थोडा उलटसुसट वाटला.पुढे येइलच.जामनगर-भूज-जामनगर अशी कार नेता येणारी फेरी सर्विस झालेली आहेका? एकंदर मजा येणार श्रे नक्की.

जयंत कुलकर्णी's picture

13 Apr 2015 - 7:39 am | जयंत कुलकर्णी

कंजुसराव बरोबर आहे. काही कारणाने तो जरा उलट सुलट करावा लागला खरा. फेरी नाही वापरली....पुढे भुज रद्द करावे लागले ते पुढे येइलच.

स्पंदना's picture

13 Apr 2015 - 6:44 am | स्पंदना

सुंदर, देखणी शिल्पकला.
वेस ही काही फक्त संरक्षणासाठीच नसते, तर ती हद्द दाखविण्यासाठी सुद्धा असते. येथुन पुढे सुरु होत आहे, हे हे शहर अशी.
पुर्वी वेशीवर अनेक रिच्युअल्स होत असत. जसे की वेशीपासून लग्न वरात. वेशीपासून पुढे जन्वस्ती नसल्याने रथ अथवा अश्वांचा वाढणारा वेग. वेस गाठली की मिळणारे संरक्षण अश्या हजार गोष्टी होत्या.

जयंत कुलकर्णी's picture

13 Apr 2015 - 7:34 am | जयंत कुलकर्णी

त्या गावाला आत जायला या चार वेशी आहेत. पूर्वी तटबंदी असावी. जशी पुण्याला होती. पण पुण्याची तटबंदी मी पर्वती गावात पाहिली होती. चांगलीच रुंद होती. दभोईच्या दरवाजांचे साल अंदाजे १०००. हे दरवाजे व तटबंदी संरक्षणासाठी असण्याची शक्यता जास्त असावी. बाकी उपयोग हे नंतर.... त्या दृष्टीने मला जे वाटले ते लिहिले....

स्पंदना's picture

13 Apr 2015 - 7:42 am | स्पंदना

तुमच्या इतिहासाच्या अभ्यासाबद्दल अतिशय आदर आहे. चार वेशी या चार बाकिच्या महत्वाच्या शहरांकडे जाण्याचे मार्ग दाखवतात. अन गुजरात, राजस्थान या भागात अशी कलाकुसत दिसतेच दिसते. नुकतेच राजस्थानचे फोटोज पहात होते. तेथे सुद्धा जयपुर शहरात (आता मध्येच येते ती) पण अश्या कमानी आहेत ज्या पुर्वी वेशी असाव्यात. त्या कमानी पलिकडील सगळी घरे गुलाबी रंगाने रंगवलेली.

एस's picture

13 Apr 2015 - 7:57 am | एस

मस्त मेजवानी सुरू.

प्रीत-मोहर's picture

13 Apr 2015 - 8:10 am | प्रीत-मोहर

मस्त सुरवात काका.
पुभाप्र.

प्रचेतस's picture

13 Apr 2015 - 10:24 am | प्रचेतस

मस्त सुरुवात.
हा सिद्धराजा जयसिंग कुठल्या घराण्यातला? सोळंकी/परमार?

उमा @ मिपा's picture

13 Apr 2015 - 12:51 pm | उमा @ मिपा

छान वर्णन!
पुढील भाग पटकन येऊ द्या.

उदय के'सागर's picture

13 Apr 2015 - 1:41 pm | उदय के'सागर

सुंदर सुरवात. एवढ्यातच बडोद्याला नवीन नातेसंबंध निर्माण झाल्याने इथून पुढे बडोद्यास जाणे-येणे होत राहील त्या पार्श्वभुमीवर ही लेखमाला आमच्या भविष्याच्या सहलींची पर्वणीच म्हणावी. धन्यवाद :)

अरे व्वा.. अभिनंदन आणि पुढील प्रवासाला शुभेच्छा..!!

ज्या गाडीसोबत हा प्रवास केला तिचेही फोटो येवूद्यात.

सविता००१'s picture

13 Apr 2015 - 5:16 pm | सविता००१

काका, छान सुरुवात

सौंदाळा's picture

13 Apr 2015 - 5:26 pm | सौंदाळा

पुभाप्र
मुद्दा क्र २ आणि ४ चे सविस्तर वर्णन वाचण्यास उत्सुक

२ गुजरातची प्रगती खरी की खोटी ते जेवढे शक्य होईल तेवढे बघणे.
४ गुजराती जेवणांचा व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे शिवाय मजा करणे हाही मुख्य हेतू मनात होताच.

खेडूत's picture

13 Apr 2015 - 7:25 pm | खेडूत

वा खू साठवली आहे.
पुढे माहिती कामाला येईल. धन्यवाद !

संतोषएकांडे's picture

14 Apr 2015 - 9:10 am | संतोषएकांडे

वाचतोय
डभोइबद्दल पूर्ण माहिती येउ द्या
आणी ती पूर्ण नसल्यास उरलेली माहिती आम्हा कडून, नक्कीच....

जयंत कुलकर्णी's picture

14 Apr 2015 - 9:23 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !
मला पूर्ण माहिती नाही त्यामुळे तुम्ही ती टाकली तरी चालेल. सध्या मी जे दोन साधकांची चित्रे टाकली आहेत ती नाथपंथीय साधूंची आहेत का ? याचा शोध मी घेतोय. त्यावर काही प्रकाश टाकता येइल का ?

रमेश आठवले's picture

14 Apr 2015 - 7:23 pm | रमेश आठवले

बडोदयात सर्व लोक या गावाच्या नावाचा उच्चार डभोई असा करतात. तेथील भूगोलाच्या पुस्तकामध्ये ही डभोई असे लिहितात .

मॅक's picture

15 Apr 2015 - 12:35 pm | मॅक

वर्णन तरी छान आहे....... आवडले

पैसा's picture

20 Apr 2015 - 4:53 pm | पैसा

आता पुढचे भाग वाचते!

गणेशा's picture

27 Apr 2015 - 5:08 pm | गणेशा

सुरुवात मस्तच ..

मोहनराव's picture

27 Apr 2015 - 6:38 pm | मोहनराव

वाचतोय!