पुण्यनगरी !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
12 Mar 2015 - 12:39 pm

पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते.
एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा."
समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?"
ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने"
आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ?
काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा."
हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?"
मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?”
बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!"
मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे?
प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!"
त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही !
ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे.
"आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं.
मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या"
यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते."
उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो, " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !"
थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल"
पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. दुसरी म्हणजे , स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल.
काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!

राहती जागालेख

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

13 Mar 2015 - 2:56 pm | मृत्युन्जय

बाहेरच्या लोकांना घरवापसी करायला सांगताहेत ते. :)

चिनार's picture

13 Mar 2015 - 2:59 pm | चिनार

अहो तुमचे IT पार्क रिते होतील घरवापसी झाली तर.
बरं ते जाऊ द्या ..तुमचे सदाशिवपेठी घर भाड्याने घ्यायला कोणी उरणार नाही त्याचं काय ?

ते आम्ही पाहू … तुम्ही तूर्तास स्वताचा नि विदर्भाचा विचार करून निर्णय घ्या

मृत्युन्जय's picture

13 Mar 2015 - 3:36 pm | मृत्युन्जय

पहिली गोष्ट ते सिरुसेरींना सांङा

दुसरी गोष्ट आम्ही घरे भाड्याने द्यायचे उद्योग करत नाही. एखादा गरजु असेलच तर आम्ही उदार मनाने त्याला हो म्हणतो.

तिसरी गोष्ट बाहेरच्यांनी पुणेकरांच्या घरापेक्षा स्वतःच्या पोटाची काळजी घ्यावी.

चौथी गोष्ट गरज पडल्यास पुणेकर आयटीची गरज शमवण्यास समर्थ आहेत.

पाचवी गोष्ट ती बदनाम झालेली सदाशिव पेठ बाहेरच्या लोकांमुळे आहे तर? बाहेरचे उद्दाम लोक आले, सदाशिव पेठेत भाडेकरु म्हणुन घुसले (इअत्के की ते नसतील तर घरे भाड्याने घ्यायला कोणी उरणारच नाही आणि घरे ओस पडतील) आणि पुणे बदनाम झाले.

अरे पाणी टाका...पाणी टाका ...आग लागलीये !
वर्मावर बसला की हो घाव !

त्या पाण्यासाठीच तर घर दार सोडलाय ना तुम्ही …

मृत्युन्जय's picture

13 Mar 2015 - 3:45 pm | मृत्युन्जय

ते पाणीही पुण्याचेच असेल. तुमच्याकडे नाही म्हणुन तर तुम्ही इकडे आलात ना? किती जळजळ झाली ना तुमची बाकी तुमचा पुण्याला उपयोग नाही हे ऐकुन.

चिनार's picture

13 Mar 2015 - 3:51 pm | चिनार

पाणी तुमच्यावर टाका असं म्हणायचं होता

जाउद्या टायपो झाली ..

बाकी आमच्यावर टाकणार असाल तर अजित दादांच्या धरणातला नका टाकू हो !

मृत्युन्जय's picture

13 Mar 2015 - 4:21 pm | मृत्युन्जय

अजित दादा बाहेरचे. आम्ही पाणी पुण्यातलेच वापरतो. आमच्याकडे रग्गड आहे.

बाहेरचे लोक घरी परत गेले तर पुणेकर कोणाच्या नावाने शिमगा करणार?

बरोबर … बाहेरचे लोक आल्याने पुणेकरांना शिमगा करावा लागतो … नाहीतर दिवाळी झाली असती

नाही ...शिमगा करायला त्यांना कारणांची कमी नाही ..तो होईलच ..
पण घर भाड्यानी द्यायचा पिढीजात धंदा बंद होईल त्याच काय ?

मागणी तसा पुरवठा हा नियम आहे अर्थशास्त्राचा … तुम्ही पुरवठ्यानुसार मागणी असा अर्थ लाउ नये … असेही मराठी माणूस आणि धंदा या गोष्टींबद्दल बरेच बोलले जाते … लोक नोकरी करायला येतात आणि पुण्यात लोक घराच्या भाड्यातून पैसे कमावतात … लोक आले नाहीत तर हि मिळकत बंद होऊन पुणेकर नवीन धंद्याविषयी विचार करेल … मराठी माणसाचाच फायदा

घर भाड्यानी द्यायचा पिढीजात धंदा बंद होईल त्याच काय ?

अहो ते म्हणालेत ना की त्यांचं ते बघून घेतील.... ? तुम्ही नका काळजी करू ...

अहो तसेही तुम्ही उपनगरातच घरं भाड्यानं घेता, मग पिढीजात धंदा कसा? उपनगरं आत्ता आत्ता वसली आहेत ना.
बाकी तुमच्या भागातला पिढीजात धंदा कोणता हो?

बाकी तुमच्या भागातला पिढीजात धंदा कोणता हो?

हे म्हणजे आचार्य बाबा बर्वेंना 'तू काय करतो रे बर्वे?' असं विचारण्यापैकी झालं.

चिनार's picture

13 Mar 2015 - 3:45 pm | चिनार

पाणी शोधणे !!

मार्मिक उत्तर … ( कुठे नेउन ठेवल्या smileys माझ्या )

रवीराज's picture

13 Mar 2015 - 6:51 pm | रवीराज

कशाला उखाळ्या-पाखाळ्या शोधता (काढता) !

कपिलमुनी's picture

13 Mar 2015 - 3:49 pm | कपिलमुनी

पुणेकर आणि शिमगा तोही बाहेरच्यांच्या नावाने ?

किती धागे आहेत हो जालावर असे ज्यामध्ये पुणेकरांनी दुसर्‍यांच्या नावाने शिमगा केलाय ?
पुणेकरांच्या नावे शिमगा करणारे १०-१५ सहज सापडतील शिवाय प्रतिसादामधून होतो तो वेगळाच !

पुणेकर नवीन धंद्याविषयी विचार करेल

या आशावाद बद्दल सलाम !

चालू दे चालू दे … + १००

मृत्युन्जय's picture

13 Mar 2015 - 3:47 pm | मृत्युन्जय

माझी कमिटमेंट २०० पर्यंतच आहे बरे. त्यानंतर इतर कोणालातरी शोधायला लागेल . आत्तापासुनच शोधुन ठेवा,

पुण्यातले शेतकरी हे "शहरी असंवेदनशील" प्रकारात मोडतात की कसे..?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 5:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मुटेसाहेबांकडे चौकशी करुन सांगतो. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात असल्यानी असंवेदनशील असावा असा अंदाज आहे.

आनंदराव's picture

13 Mar 2015 - 4:06 pm | आनंदराव

छान!

आदिजोशी's picture

13 Mar 2015 - 9:15 pm | आदिजोशी

पुण्यात राहणार्‍या ज्या लोकांना कोणत्याही कारणासाठी पुणे आवडत नाही त्यांनी तडक बॅगा भराव्या, चपला घालाव्या आणि आपल्या स्वर्गासमान गावी परत जावे. आयटी कंपन्या बंद पडतील, भाडेकरू मिळणार नाहीत, फॅक्टर्‍या बंद होतील, मेसना टाळे लागेल इत्यादि समाजसेवी कारणांसाठी पुण्यात राहण्याचे उपकार पुणे आणि पुणेकरांवर करू नये.
गावी जायचे नसेल तर महाराष्ट्राचा नकाशा काढा, तुम्हाला शेकडो जिल्हे माहिती आहेतच, त्यातला एखादा निवडा आणि बसा एस.टी. मधे.

लेख विनोदी म्हणून लिहिला असेल तर प्रयत्न अगदीच फसलाय. असले विनोद वाचून तर शाळेतले पोट्टेही हसणार नाहीत.

_मनश्री_'s picture

13 Mar 2015 - 9:54 pm | _मनश्री_

१+
मस्त प्रतिक्रिया
पुण्यात येऊन नोकऱ्या करायच्या आणि वरुन पुण्यालाच नाव ठेवायची सध्या फॅशन आहे
ह्या लोकांच्या मते सगळे पुणेकर शिष्ट
आणि पुण्या बाहेरचे सगळे फारच प्रेमळ ,अगत्यशील
अरे मग कशाला राहता पुण्यात ?
जा तुमच्या गावाला
कशाला रहाता अशा शहरात जिथं इतके शिष्ट लोकं आहेत

मराठी_माणूस's picture

14 Mar 2015 - 4:08 pm | मराठी_माणूस

पुण्यात येऊन नोकऱ्या करायच्या आणि वरुन पुण्यालाच नाव ठेवायची सध्या फॅशन आहे

ह्याच्या विरुध्द आपले दुसरे बांधव बघा , उसगावला एकदा गेले की कशी तिकडचीच बाजु घेत असतात. कोणी ब्र जरी काढला की फुकटची वकीली करायला सरसावतात. त्यांचा आदर्श पुण्यात रहाणार्‍या बाहेरच्या लोकांनी ठेवायला हवा.

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 10:00 pm | पॉइंट ब्लँक

हि प्रतिक्रिया रागच्या भरात किंवा वैतागून लिहिली असेल तर ठीक आहे. पण तुमचं कायमस्वरूपी मत जर असे असेल तर मात्र थोडा चिंतेचा विषय आहे. त्याने हा वाद दुष्चक्रात सापडून चिघळत जाईल. बाहेर गावून( विशेषतः छोट्या) आलेल्या व्यक्तीला मोठ्या शहारत आल्यावर थोड्या अडचणी येतात. कधी कधी ते वैतागतात आणि प्रकट करतात. तर कधी कधी ह्या अडचणी चेष्टेचा विषय होतात.. त्याला प्रत्युत्तर ही त्याच प्रकारे देता येते. जसे वर काही प्रतिसादात झाले आहे. पण इतकी जहाल भूमिका पत्करली तर मात्र ती एक प्रकारे लेखाचे समर्थन करणारी ठरेल. प्रत्येक घरण्याने कधी ना कधी स्थलांतर केलेले असते. त्यामुळे मूळ निवासी आणि बाहेरचा हे वर्गीकरण फारसे महत्वाचे नाही. शिवाय, आपण सर्व महाराष्ट्रीय आणि भारतीय आहोत. इथे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी विरुद्ध भारतीय अशी लढाई नाही.

ह्यांनी मग स्विकार करावाना पुण्याचा (प्रेमाने).
आमच्याकडे यायचे वर आम्हाला नावे ठेवायची (मत्सराने)?
जसं पुण्याने तुम्हाला सामावुन घेतले,
तसं तुम्हीपण सामावुन जाना पुण्यात ( आनंदाने)

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 11:00 pm | पॉइंट ब्लँक

ह्या आधीच्या प्रति़क्रियांमध्ये चाललेली चेष्टा मस्करी पाहून आनंद आणि प्रेमच दिसले. मत्सर तुम्हास कुठून दिसला ते समजले नाही.

रवीराज's picture

13 Mar 2015 - 11:26 pm | रवीराज

@ "शिमगा करायला त्यांना कारणांची कमी नाही ..तो होईलच ..
पण घर भाड्यानी द्यायचा पिढीजात धंदा बंद होईल त्याच काय ?"

आम्ही कोणत्याही कारणाने शिमगा करतो,पिढीजात धंदा करतो हे ह्यांना बघवत नाही, करणार ना मग मत्सर आमचा,
(मी पण मस्करीच करतोय राव शिरेसली नका घेउ)

असंका's picture

14 Mar 2015 - 12:21 am | असंका

+1
अगदी नैसर्गिक अन् स्वाभाविक प्रतिक्रिया!

सांरा's picture

14 Mar 2015 - 4:14 am | सांरा

हप्त्यापासून रोज कुठं ना कुठ पाऊस पडून राहाला न गहु झोपून राहाला झोपलेला गहु उठतही नै न हार्वेस्टरमधे येतै नै....
बाकी पुण्याचं रौ द्या अजून मोठे प्रश्न आहे आपल्याले.....

काळा पहाड's picture

14 Mar 2015 - 9:52 am | काळा पहाड

हा जागतिक वातावरणीय बदलांचा परिणाम आहे हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. याबाबत एक सार्वंकष धोरण सरकारनं बनवलं पाहिजे आणि सरकारच्या सर्व धोरणांना चुना लावणार्‍या जनतेनं याबाबतीत सरकारवर दबाव टाकला पाहिजे.

ज्योति अळवणी's picture

14 Mar 2015 - 7:34 am | ज्योति अळवणी

उत्तम लेख. मला पुणेरी नमूने आणि पुणेरी अपमान इथेच या साईट वर अनुभवायला मिळाला.

तिमा's picture

14 Mar 2015 - 10:48 am | तिमा

खरा पुणेरी अपमान तुम्ही अजून बघितलेलाच नाही. पण तो आम्ही चिल्लर गोष्टींसाठी वापरत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 5:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयला. तुम्हाला व्यनिवरुन एका पुणेकरानीच धीर दिला होता ना ओ? तरी परत पुण्यावर घसरताय. आता पुणेरी मिपाकर पिसाळले तर कोण जबाबदार? *diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*

पुणेकरांनी फक्त "विचारपुस" केलेली. अपमान तो आपने देखाचं नै!!!

गप रंव रे!! त्या पुणेकरांना बोलतायेत, तुझा आणि पुण्याचा अर्थाअर्थी काय संबंध?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 5:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुणेकर शेजारी आहेत. शेजार्‍यावर प्रेम करा. शिवाय पुणेकर म्हणजे आजोळ...शिक्षण पुण्यामधे....लै टैट बाँड आहेत पुण्याबरोबर =))

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2015 - 3:07 pm | श्रीगुरुजी

>>> एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!"

श्री.ज.जोशींचं "पुणेरी" वाचा. लकडी पुलापलिकडे मूळ पुण्याच्या संस्कृतीशी न जुळणारी एक वेगळीच संस्कृती आहे असे त्यांचे मत होते. तसं पाहिलं तर महापालिका भवन मूळ पुण्याच्या हद्दीत न येता भांबुर्डा गावात येतं आणि ते नदीपल्याड असल्याने अर्थातच "पुणेरी" संस्कृतीशी फारसे साम्य ठेवून नाही.

ब़जरबट्टू's picture

14 Mar 2015 - 4:59 pm | ब़जरबट्टू

मला तर बुवा पुण्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. मुळ विर्दभाचाच, पण पुण्याने जे दिले, त्याला तोड नाही. १० वर्षापहिले आलो पुण्याला, पहिल्याच नजरेत आवडले. शिवाय शिवाजी रोमा रोमात आहेच, त्यामुळे पुणे अप्रुपच वाटे. निसर्गाच्या तर प्रेमात पडलो राव. चांदणी चौक ते कात्रज भरधाव गाडीवर वारा पितांना मन प्रसन्न होऊन जाई. कोथरुडच्या दुर्गा मध्ये कित्ती कोल्ड काफी रिचवली असेल देवच जाणे, तेच कस्तुरीच्या बारमधल्या दारुबाबत, कसल्याही खडतर प्रसंगाला तोंड न देता पहिला चकाचक जाब दिला पुण्यानेच, मस्त मित्र दिले पुण्यानेच,पहिली फटाकडी गर्लफ्रेंड पुण्याचीच..पुण्याला आपला त्रिवार मुजरा आहे, अपमान करुन उद्धट बोललेला पुणेकर मला तरी भेटला नाहीये, ज्यांना भेटलाय त्यांनी कदाचित दिल्लीवारी केली नाहीये..

पुणेरी घरमालक कंजुष ... आम्हाला रहायला देत नाहीत.
पुण्याच्या खानावळी बेक्कार .. अगदी बेचव जेवण (वरणफळं, वडाभात, शेवभाजी असलं काही देत नाही)
पुण्यात मिळणारा चहा पांचट, पुण्याचे लोक उद्धट, भामटे ... इ. इ.
न संपणारी यादी आहे.

पण तरीही पहिली संधी मिळताच आपले स्वर्गीय गाव सोडून पुण्यात हजर.
तेही फक्तं पुण्यातले उद्योग - व्यवसाय ओस पडू नये या उदात्तं हेतूने.

तुका म्हणे आता - उरलो उपकारा पुरता ...

_मनश्री_'s picture

15 Mar 2015 - 7:48 pm | _मनश्री_

१+

यशोधरा's picture

15 Mar 2015 - 6:18 am | यशोधरा

अर्र, धागा गारठला का?

आदिजोशी's picture

16 Mar 2015 - 2:30 pm | आदिजोशी

पुर्वीचं मिपा राहिलं नाही. इतक्यात शांतता?

नितिन५८८'s picture

17 Mar 2015 - 12:15 pm | नितिन५८८

टीका किंवा विरोध कोणालाच आवडत नसतो. आपल्यावर शक्‍यतो टीका होऊ नये किंवा विरोध होऊ नये, असे प्रत्येकालाच वाटत असते. अनेकांना टीका किंवा विरोध सहन होत नाही, तर अनेकांना टीका पचविणे जड जात असते; पण "निंदकाचे घर असावे शेजारी' असे तुकोबारायांनी म्हटले आहे. संत तुकारामांचे हे म्हणणे अगदी खरे आहे. आपल्या प्रगतीसाठी "सकारात्मक टीकाकार' आपल्याजवळ असायला हवा.

"सोनी' या जगप्रसिद्ध कंपनीचे एक संस्थापक अकिओ मोरिता यांनी त्यांच्या "मेड इन जपान' या पुस्तकात सांगितलेला हा किस्सा आहे.

ज्या वेळी सोनी कंपनीने छोटे टेपरेकॉर्डर बनवायला सुरवात केली, त्या वेळी त्यांनी असा एक टेपरेकॉर्डर जपानमधील एका प्रसिद्ध गायकाला चाचणीसाठी म्हणून दिला व त्याला त्याचा अभिप्राय देण्याची विनंती केली. पण, बरेच दिवस झाले तो गायक आपला अभिप्राय देत नव्हता. विचारल्यास "ठीक आहे' असे मोघम उत्तर तो द्यायचा. पण, तो फारसा समाधानी नसावा असे वाटायचे. शेवटी जेव्हा त्याला खोदून विचारले, तेव्हा त्याने सांगितले, की ही यंत्रे बाजारात विकू नका. त्याला कारण विचारले, तेव्हा त्याने सांगितले, ""मी जेव्हा माझा आवाज टेप करतो व रिप्ले करतो तेव्हा टेपरेकॉर्डरमधून येणारा आवाज हा माझा न वाटता दुसऱ्या माणसाचा वाटतो. टेपरेकॉर्डर हा आरशासारखा आहे. ज्या वेळी एखादा माणूस आरशासमोर उभा राहतो, तेव्हा आरशात आपली खरी- खरी, नैसर्गिक प्रतिमा दिसावी, अशी त्याची अपेक्षा असते. टेपरेकॉर्डर हा आवाजाचा आरसा आहे. त्यामुळे एखाद्या माणसाने आवाज टेप करून तो रिप्ले केल्यावर त्या माणसाचा मुळातला नैसर्गिक आवाज ऐकू यावा, अशी त्याची अपेक्षा असते. जोपर्यंत तुम्हाला हे तंत्र जमत नाही, तोपर्यंत तुम्ही हे टेपरेकॉर्डर बाजारात विकू नयेत.''

सोनी कंपनीने या गायकाचा वरील अभिप्राय अत्यंत गंभीरपणे घेतला. टेपरेकॉर्डरमध्ये अनेक सुधारणा केल्या. जेव्हा त्या गायकाचे पूर्ण समाधान झाले, त्याच वेळी हे टेपरेकॉर्डर बाजारात आणले. सोनी कंपनी एवढे करून थांबली नाही. त्यांनी त्या गायकाला कंपनीच्या संचालक मंडळावर घेतले व त्याला "मुख्य टीकाकार' हे पद बहाल केले. त्याचे मुख्य काम एकच होते ते म्हणजे कंपनीवर टीका करायची. पण, टीकेसाठी टीका न करता त्याने "सकारात्मक टीका' करावी एवढीच माफक अपेक्षा त्याच्याकडून ठेवली. त्याने पण दहा वर्षे या पदावर उत्तम काम केले. त्याने केलेल्या "सकारात्मक टीके'मुळे कंपनीला त्यांच्या उत्पादनांच्या दर्जामध्ये; तसेच ग्राहकाला देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा करता आल्या. दहा वर्षांनंतर "आता टीका करण्यासारखे काही राहिले नाही' असे सांगत त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला व उर्वरित आयुष्य संगीत सेवेला वाहून घेतले.
सदाशिव रामा बोराटे हे पुण्यातील एक यशस्वी मराठी उद्योजक आहेत. वर्षाला ३० कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या उद्योगाचे ते मालक आहेत. गरीब शेतकरी ते यशस्वी उद्योजक अशी त्यांची यशोगाथा स्फूर्तिदायक आहे. त्यांना आतापर्यंत जे काही यश मिळाले, त्याचे श्रेय ते सर्वप्रथम आपल्या विरोधकांना व टीकाकारांना देतात. त्यांच्या मते त्यांना पावलोपावली असे विरोधक किंवा टीकाकार भेटले नसते, तर त्यांच्यातील ईर्षा किंवा जिद्द जागी झाली नसती व त्यांनी एवढी प्रगती केली नसती. आपल्या विरोधकांचे व टीकाकारांचे ऋण खुलेपणाने मान्य करणारे असे हे पहिलेच मराठी उद्योजक मला भेटले.

"निंदकाचे घर असावे शेजारी' असे तुकोबारायांनी म्हटले आहे. संत तुकारामांचे हे म्हणणे अगदी खरे आहे, असे सदाशिव बोराटे यांचे म्हणणे आहे. सोनी कंपनीने तर असा एक "निंदक' चक्क घरातच आणून बसवला होता.

मनीषा's picture

17 Mar 2015 - 12:44 pm | मनीषा

बरोबर आहे नितीनजी तुमचं
पण या निंदकांचं उणं दुणं काढायला त्यांच्या पण शेजारी किंवा घरी कुणी निंदक आणायला हवा नाही का?
अनुभव असा आहे , की या निंदक लोकांचं म्हणणं असतं की आमची ती सकारात्मक टीका , आणि ती शत-प्रतिशत योग्यं , पण तेच दुसर्‍याची ती प्रत्येक गोष्टीत वाईट तेच बघण्याची मानसिकता .
आता तुम्ही संतवचन सांगताहात ...
मग तुम्हाला हे महितीच असेल .. " पुण्यं पर उपकार - पाप ते परपीडा "

कपिलमुनी's picture

17 Mar 2015 - 4:15 pm | कपिलमुनी

वरील उतारा इ सकाळ मधून कॉपी केलेला आहे

http://www.esakal.com/esakal/20100713/5231324435484315241.htm

आवरा !! पूर्वी लेख कॉपी व्ह्यायचे आता प्रतिसाद पण ??

असंका's picture

17 Mar 2015 - 4:18 pm | असंका

काय खणून काढलंय!!

_/\_

मनीषा's picture

17 Mar 2015 - 5:12 pm | मनीषा

कठीण आहे

२०१० मधील लेख दिसतो आहे.

आदूबाळ's picture

17 Mar 2015 - 6:02 pm | आदूबाळ

__/\__

या निमित्ताने "चोरीचा मामला मामाही थांबला" अशी एक वेगळी लेखन क्याटेगरी करावी अशी संमंला विनंती.

मनीषा's picture

17 Mar 2015 - 7:45 pm | मनीषा

"चोरीचा मामला" , इतकच ठीक आहे .
मामाला कशाला ड्यूटी , सारखं सारखं भाचरांच्या मागावर रहाण्याची?

नितिन५८८'s picture

23 Mar 2015 - 11:23 am | नितिन५८८

कपिलमुनी उतारा कुठून कॉपी केला हे शोधण्यापेक्षा त्या उताऱ्यातील मजकूर समजून घ्यावा, प्रत्येकाला आपल्या भावी आयष्यात उपयोगी पडेल. कॉपी बद्दल कॉपी बद्दल बोलायचे झाले तर तर मनुष्य जातीचा तो स्वभाव आहे तुम्ही कधी काही कॉपी केले नसेल तर सांगा १०० ओळींचा निबंध पाठवून देतो.
बाकी काही चुकले असेल कॉपी करताना तर जाहीर माफी असावी

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2015 - 8:42 pm | श्रीगुरुजी

>>> निंदकाचे घर असावे शेजारी!

एवढा भलामोठा प्रतिसाद लिहिण्यापेक्षा "अस्सल पुणेकराचे घर असावे शेजारी!" एवढी ओळ पुरेशी होती.

हे दळण इतक्यात थांबलं?

पैसा's picture

19 Mar 2015 - 10:10 pm | पैसा

पुण्याचं म्हैत नै. पुणेकर पूर्वीचे राहिले नाहीत हे खरें हो बाकी! नैतर या धाग्याने मुविंच्या धाग्याला टक्कर द्यायला हवी होती आतापर्यंत!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Mar 2015 - 8:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुज्ञ पुणेकरांनी पौड फाट्यावर ह्या धाग्याला मारलेले आहे असं एक णिरिक्षण णोंदवु इच्छितो. चायला ह्या धाग्यावर मारामारी होणार म्हणुन ब्राउजर बुकमार्क करुन ठेवलेला पण कसलं काय...बाहेरगाववाल्यांना पुणेकरांना उचकवायचं तंत्र अजिबात झेपलेलं नाही.

डॉ. ब्रुस बॅनर अर्थात हल्कच्या चालीवर म्हणतो "दॅट इज माय सिक्रेट, आय एम ऑलवेज माजुरडा" =))

पैसा's picture

21 Mar 2015 - 10:09 am | पैसा

तू पिंचिं कर असून स्वतःला पुणेकर समजतोस का काय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Mar 2015 - 10:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दोन्ही शहरांशी जवळचं नातं असल्यानी दोन्ही शहरांची बाजु घ्यावी लागते. =))

काळा पहाड's picture

21 Mar 2015 - 12:57 pm | काळा पहाड

चुकून 'बाजु' वाचलंच नाही
:ड

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Mar 2015 - 2:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

नाही वाचलं तरी चालेल. वेळप्रसंगी घ्यावीही लागते =))

जयन्त बा शिम्पि's picture

24 Mar 2015 - 3:06 am | जयन्त बा शिम्पि

मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो कि पुण्यात काय चांगले आहे ? हवामान ? ( आता प्रदूषण आणि काँक्रिटचे जंगल ) , भंगार बसेस , मुजोर चालक व वाहक आणि भंगार वाह्तूक व्यवस्था , ज्यांचा अजिबात धाक नाही असे पोलिस मामा , सिग्नल ला अजिबात न जुमाणता " हाण तिच्यायला ! " अशा गुर्मित चालणारे बाइक वीर , यादी केली तर पानेच्या पाने भरतील! !
लेख चांगला आहे. पुलं च्या " तुम्हाला कोण व्हायचे आहे ? मुंबैकर, पुणेकर कि नागपुरकर ? " या लेखाची आठवण झाली
रसिकांनी जरूर वाचावा , पुलं ची एक चारोळी आहे " मी रहातो पुण्यात , म्हणजे विद्वत्तेच्या ' ठाण्यात ', यातच सर्व काही आले!

असा प्रश्न कोणत्याही शहराबाबतीत पडू शकतोच कि … मुंबईत काय चांगले ? प्रदूषण आणि काँक्रिटचे जंगल, झोपडपट्टी, दहशतीचे जगणे, UP आणि MP ची घुसखोरी… नागपुरात 'गरमी', अमेरिकेत उदात्त स्वातंत्र्याच्या नादात बिघडलेली पिढी … बघण्याचा दृष्टीकोन असा असेल तर जगात काहीच चांगले दिसणार / मिळणार नाही राव तुम्हाला *diablo*

प्रस्तुत लेख , लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाला आहे.
खालील दुवा बघावा !
http://epaper.lokprabha.com/488897/Lokprabha/08-05-2015#dual/54/2

मृत्युन्जय's picture

4 May 2015 - 12:31 pm | मृत्युन्जय

अभिनंदन. एका मिपाकराचा लेख लोकप्रभात छापुन आला याचा आनंद आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.