दोघी ……( भाग ४ )

फिझा's picture
फिझा in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 4:57 am

दोघी ……( भाग ४ )

भाग ४

दुसऱ्या दिवशी बी एड कॉलेज चा पहिला दिवस छान पडला . आई आणि किरण रात्री जेवत असतानाच फोन वाजला . आता फोन वाजला कि आपसूकच किरण च्या अंगावर काटा यायचा . आता आदित्य चा आणि तिचा रीतसर बघण्याचा प्रोग्राम होईल त्याच संदर्भात फोन असेल असा उगीचच पटकन वाटून जायचं मनात . फोन वाजला तसं आई ने तिला घ्यायला सांगितला .

" हेल्लो …."

" हेल्लो , कोण किरण , मी बाबा बोलत आहे . "

" ओह , बाबा ! कसे आहात ,आणि कधी येणार आहात . कधी संपणारे तुमची अष्टविनायकाची ट्रीप . या लवकर आता . " किरण वेगळ्याच उत्साहात बोलत होती .

" किरण , ……ऽअ ……" बाबा पलीकडून बोलताना काहीसे अवघडले . " मी नाही येणार आता !. "

" काय ??? म्हणजे ?? कुठे आहात तुम्ही आत्ता ? गाडी मिळत नाहीये का ? डीले झाली आहे का ? " किरण ला काय बोलावे ते कळेना . बाबा काय बोलत आहेत त्याचा अर्थ तिला समजेना . ती कासावीस झाली .

" नाही , तसं नाही . हे बघ , तू मोठी आहेस आता , मी काय बोलतोय हे तू समजू शकतेस . म्हणून तुलाच सांगतो , मी आता इथेच राहीन गणपती पुळ्याला .
आता इथेच गणपती च्या चरणी वाहून घेणारे मी . नको झालंय सगळं बाकीचं .इथे शांती मिळतिये मनाला . " बाबा पलीकडून बोलत होते .

" अहो बाबा , काय बोलताय तुम्ही . असे का बोलत आहात . हवा तर अजून १-२ दिवस राहा तुम्हाला तिकडे बरे वाटत असेल तर , पण असे घर सोडून जाण्याची, तिकडेच राहण्याची भाषा करू नका . आम्ही कुणाकडे पाहायचे . तुमच्याशिवाय कोण आहे आमचं . " किरण ला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, काय बोलावे ,काय सांत्वन करावे , कसे आणि काय तिला काहीच सुधरेना . धक्का बसला तिला हे बाबांचे बोलणे ऐकून . आई जेवताना उठली एकदम
किरण चे बोलणे तिने ऐकले ,तिला पलीकडून बाबा काय बोलले असतील याचा अंदाज आला . डोळ्यातून घळा घळा आसवे वाहू लागली दोघींच्या .

" बाबा ,असे करू नका . अहो ,तुम्हाला समजत नाहीये का ? . इथे या तुम्ही आधी ,मग आपण बोलू तुम्ही आधी इथे या , बाबा तुम्ही आधी इकडे या , मला तुमच्याशी बोलायचंय. हवं तर मी आई ला सांगते तुमची माफी मागायला , ती मागेल ,नाही भांडणार ती परत ,तुम्ही आधी इकडे या , बाबा …। " किरण मोठमोठ्याने फोन वर बोलत होती ,पण पलीकडून फोन कधीच कट झाला होता .

आई तर स्वताला बाबांना शिव्या शाप देत होती ,रडत होती . तिलाही काय करायचे कुणाला फोन करायचे, काय सांगायचे काही काळात नव्हते . तरणीताठी लग्नाची मुलगी घरात आणि तिचं पाहायचं सोडून हा माणूस संन्यास घेऊन गेला तिकडे असे म्हणत अजूनच ती चिडत होती . अख्खी रात्र दोघींनी रडून काढली .

बाबा आता संन्यास घ्यायला गेले, परत येणार नाहीत , हि बातमी आजूबाजूला , नातेवाईक मंडळी मध्ये पसरली . आता मात्र किरण पुरती कोलमडून गेली होती . लोकांच्या नजरा झेलणे तिला अशक्य झाले होते .

इकडे ३ दिवसांनी गुरुजींकडून आदित्य आणि किरण ची 'पत्रिका अगदी योग्य जुळत आहे' असा निरोप आला . सुलभाला प्रचंड आनंद झाला , पण तो क्षणभंगुर ठरला कारण त्याच दिवशी तिच्या घरात किरण च्या बाबांबद्दल बातमी येउन थबकली. सगळेच जण २ मिनिट स्तब्ध झाले , आदित्य , सुलभा आणि नाना .

" मला वाटतंय ,आता आपण या स्थळाचा विचार करायला नको . पत्रिका जुळत असली तरी समाजात नामुष्की आणि ………असो ………
नकोच ते काही …………………… " नाना जरा वरच्या स्वरात म्हणाले .

किरण चा विचार मनात येउन येउन सुलभा अगदी दुख्खी झाली होती . काय वाटले असेल पोरीला वडीलच असे वागत आहेत बघून . पुरती कोसळून गेली असेल लेकरू . यात तिचा काय दोष . तिने काय केले . तिला का नामुष्की झेलावी लागेल . आधीच नाजूक फुलासारखी पोर आहे ,हसली की आनंद उधळून देते सगळीकडे ,तिलाच का देवाने ……………सुलभा च्या डोळ्यात पाणी तरळले . पण नानांशी बोलणे गरजेचे होते . हे असे चालायचे नाही .

" अहो , असे काय बोलत आहात . यात तिचा काय दोष किरण चा . आपल्याला किरण ला घरात आणायची आहे ,बाकीच्यांशी काय करायचंय . ती खूप चांगली मुलगी आहे , मी तिला खूप जवळून ओळखते , आणि आदित्य ला ही ती पसंत आहे . काय रे आदित्य ? " सुलभा ने आवाजात थोडी जरब आणलीच .

" हो , मलाही आई चे म्हणणं पटतंय नाना . यात किरण चा काय दोष . आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे पत्रिका पण आपण पहिली , ती पण जुळत आहे . !"
आदित्य ने आई च्या हो मध्ये हो मिळवत स्वतःचे म्हणणे मांडले .

आता नाना संतापलेच . खरं तर एवढं चिडण्याच काही कारण नव्हतं , पण आज त्यांचा राग अनावर झाला , " अरे काय चाललंय तुम्हा माय लेकाचं ?
काय सद्सद विवेक बुद्धी गहाण टाकून आलात काय दोघे . हा तर काय गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे , पण तुला तरी काही कळायला हवं सुलभा ??

अर्चना ने त्या मुलाशी लग्न करून आधीच चार चौघात नामुष्की आणली आहे . ब्राम्हणाची घरं , मुलं हिला मिळाली नाहीत का , जातीबाहेर लग्न केल.
परत परत तेच आठवायला लाऊ नका . ती तर मेलीच आहे माझ्यासाठी . " नाना रागारागाने बोलत होते .

" अहो काय बोलता पोटाच्या पोरीबद्दल . काय वाईट झाले तिचे . उगीच समाजासाठी ,समाज काय म्हणेल म्हणून काय आपण आपलं आयुष्य लोकांच्या म्हणण्यानुसार ठरवायचे ? . खूप सुखात आहे ती .आणि ………… " सुलभा चे वाक्य संपायच्या आतंच नाना म्हणाले ,

" नाही ,म्हणजे नाही . मुलाचं लग्न तरी मला नीट आणि रीतीभाती सांभाळून , सगळं व्यवस्थित असलेल्याच ठिकाणी करायचे आहे . आता या मुलीचा बाप चं नाहीये तर कन्यादान तरी कोण करणार ……… घरादारा वर पाणी सोडून तो काय देवाच्या दारात गेला असेल काय ……… ह्या सांगायच्या गोष्टी झाल्या , तो गेला असेल …………………… भलतीकडेच ! " शेवटचं वाक्य नाना मिश्कीलीने म्हणाले .

" आणि अशा बापाची मुलगी तरी काय …………………" नाना काही बोलायच्या आत आदित्य जवळ जवळ ओरडलाच

" बास्स . तिच्याबद्दल एक शब्द बोलू नका . नाही करायचे न तिच्याशी लग्न ? ठीके . पण एक लक्षात ठेवा मी इतर कुणाशीही लग्न करणार नाही . आणि आत्ता मला वेळही नाही . US चा प्रोजेक्ट येतोय मी तिकडेच जाणारे . ३-४ महिन्यात जाईन . तुम्ही कवटाळून बसा तुमचा अहंभाव , तुमची सामाजिक प्रतिष्ठा , तुमचा पैसा ,तुमचं सगळं . मला काहीही नको .तुमच्यामुळे २ वर्ष झाली माझ्या सख्ख्या बहिणी शी बोललो नाहीये , पण आता तसं जमणार नाही . मी दीदी ला आजच फोन करणारे . तिची खुशाली विचारणारे ! " आज प्रथमच आदित्य ने वडिलांना उलट उत्तर दिले असेल . सुलभाहि त्याच्याकडे पाहत राहिली आणि आपल्या मुलाचा तिला अभिमान हि वाटला .

आता पुढे काही वाद घालण्यात वेळ घालवून उपयोग नव्हता . मग कुणीच कुणाशी काही बोलले नाही . उद्विघ्न मनाने त्या दिवशी सगळेच झोपी गेले .

पुढे काही दिवस सुलभाने किरण च्या घरी फोन करायचा प्रयत्न केला पण एंगेज लागत होता .अर्थात आता हे लग्न होणार नाही नानांचा विरोध आहे , पुढे काय करावे असे किरण शी कसे बोलायचे हे सुद्धा अजून तिने ठरवले नव्हते , पण मैत्रीण तर होती ना ! किरण ला आज माझी गरज आहे हे सुलभा ला नक्की माहित होते , आणि वाईट बातमी घेऊन किरण च्या दाराशी जाणे तिला उचित वाटत नव्हते म्हणून ती किरण च्या घरी गेली नव्हती . कुणाशी काही बोलायचे नव्हते म्हणून किरण आणि आई ने फोन बाजूला काढून ठेवला होता .

८-१० दिवसांनंतर किरण ने स्वतःहूनच सुलभा ला फोन केला . सुलभाचे बरेचसे फोन येउन गेले हे तिला दिसले होते .

" हेल्लो …………… किरण बोलतीये !" एक उसासा टाकून किरण म्हणाली .

" किरण …………………अग किती फोन केले तुला , तुझ्याशी बोलायचं आहे ग खूप . आग काय झालं ते मला सांग सगळं सविस्तर . मला पण तुला खूप काही सांगायचं आहे . आणि आपण यातून नक्की काहीतरी वाट काढू … खात्री आहे अग कि ……………………. " सुलभाचे वाक्य किरण ने पूर्ण होऊ दिले नाही ,

" सुलभा , संपलंय सगळं . आता माझी कसलीच अपेक्षा नाहीये कोणाकडून . अगदी देवाकडून सुद्धा . तुझ्याकडे काय बातमी असेल याचा मला अंदाज आहे . पण मला त्या विषयी काही बोलायचे नाहीये . माझ्या अभागी मुळे तुमच्या घरात वाद झाला असेल . माझ्या दुर्दैवाचं सावट मला तुमच्यावर पडू द्यायचं नाहीये . मी उद्या निघातीये . परत इथे नाही येणार . मला contact करायचा प्रयत्न करू नको . " किरण निर्विकार पणे बोलत होती .

" नाही . मी तुला कुठंही जाऊ देणार नाहीये . तुला आपल्या मैत्रीची शपथ . " सुलभा आता दाटून आले होते ,तिला बोलवेना .

" मैत्री आहे गं . तेच तर आहे माझ्याकडे बाकी काही नाही. आयुष्याची कमाई आहे ती माझ्या . जपून ठेवेन ती मी उरात आयुष्यभर . माझ्यामुळे तुला आणि घरातल्यांना जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल क्षमस्व . तू खूप काही दिले आहेस मला .आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांसाठी मी तुझी ऋणी राहील . आणि स्वप्ने पण आहेत फुलपाखरी . सगळं काही आहे माझ्याकडे . त्याच्याच बळावर आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगेन मी . बाय ,,ठेवते आता सामानाची बांधाबांध करायची आहे अजून . " खरं तरतिला डोळ्यातल्या आसवांना बांध घालायचा होता .

" उद्या निघाली आहेस न तू . मी येते सकाळी मला न भेटता कशी जाशील . " ढसा ढसा रडतच सुलभा बोलली .

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून सुलभा आणि आदित्य ही किरण च्या दारावर जाऊन थबकले . समोर फक्त कुलूप लावलेलं बंद दार होतं . किरण आई बरोबर आदल्या रात्रीच निघून गेली होती . कायमचीच . कुणालाही नवीन जागेचा घराचा पत्ता न देता . हताश होऊन दोघं जण घरी परतले . आपल्या प्रिय व्यक्तीला आपण तिच्या अवघड दिवसांत आधार देऊ शकलो नाही , तिला मदत करू शकलो नाही ,का कशामुळे ……हा च विचार करत सुलभा आणि आदित्य दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळले .

आज ८ वर्षां नंतर परत एकदा सगळं मनात दाटून आलं होतं. किरण ची गाडी सिग्नल ला उभी होती आणि किरण विचारांमध्ये गर्क . सिग्नल ग्रीन झाला तसा मागच्या गाड्यांचे हॉर्न्स वाजू लागले आणि किरण एकदम भानावर आली आणि गाडी चालवू लागली . काही सुखद काही दुखद आठवणी उरत घेऊन ती पोचली खडकवासला येथे . बरोबर चार वाजून पाच मिनिटे झाली होती .

सुलभा एका टपरी पाशी आधीच येउन थांबली होती . किरण ने तिला पहिले पण का कुणास ठाऊक जरा परकेपणा दाखवला , नुसतं स्मितहास्य ओठावर आलं . सुलभा तशी बरीच वेगळी दिसत होति. निम्म्याहून अर्धे केस पिकले होते . चेहऱ्यावर सुरकुत्या पण होत्या . पांढऱ्या रंगाचा चुडीदार घातला होता . मैत्रिणीला पाहून एकमेकींना कडकडून मिठी मारावी अशी दोघींची पण इच्छा होती , पण पुढाकार कुणीच घेतला नाही . साहजिकच होते म्हणा तब्बल ८ वर्षांनी त्या भेटत होत्या , आणि ज्या परिस्थितीत त्या दुरावल्या होत्या ते आठवलं तर अंगावर काटा येत होता .

" hi , कशी आहेस …. " सुलभा ने बोलायला सुरुवात केली .

" मजेत ! "

"आई कशी आहे ? "

" बरीये ! "

" काम कसं चालू आहे तुझं ? "

" ठीक !" किरण खूपच तुटक पणे उत्तरे देत होती . आता अचानक सुलभा कशी काय इथे आलीये . आपल्याला का भेटायला बोलावले आहे . असे एक न अनेक प्रश्न किरण ला सतावत होते . गेल्या ८ वर्षात ती हसायला बोलायला विसरलीच होती जणू . घर आणि ऑफिस सोडून दुसऱ्या कोणत्या रस्त्यावरही फिरकली नव्हती . जखडून ठेवले होते तिने स्वताला , मनाला .

" इतक्या तुटक पणे बोलायचे असेल तर मी निघते , मी माझी हरवलेली मैत्रीण शोधायला इतक्या लांब आले , तीच नसेल इथे तर मग तुझा वेळ तरी मी कशाला वाया घालवू ? " सुलभा किरण कडे रोखून म्हणाली .

किरण ला आपण काहीतरी अगदीच चुकीचे वागलो याची पटकन जाणीव झाली . ती म्हणाली . , " नाही तसं नाही ,जरा
कामाचे विचार डोक्यात चालू होते , सॉरी . बोल ना . ! " सगळं काही नॉर्मल आहे असं दाखवत किरण म्हणाली .

खरं तर दोघींनाही खूप खूप बोलायचे होते पण सुरुवात कशी करावी हे सुचत नव्हते . मग थोडा वेळ शांततेत गेला .दोघिही गप्प होऊन पाण्यावर उठणाऱ्या संथ लहरींकडे पाहत राहिल्या . मग दोघींना शांतता नकोशी वाटली ,एकदम दोघींनी एकमेकीकडे पहिले आणि " चहा ? " असे विचारले आणि आपसूकच मनात आणि ओठावर एक स्मितहास्य उमटून गेले .

आणि त्या हस्यानिशी दोघींचा अबोला काहीसा कमी झाला . एकदाच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या , एकडच्या तिकडच्या म्हणजे अगदी पुण्यातल्या पाण्याच्या प्रश्नापासून ते आंतर राष्ट्रीय पातळी वरच्या प्रश्नांवर चर्चा झाली . दोघींनाही समजत होते कि आपण हे बोलण्यासाठी इथे आलो नाहीये पण कुणीही स्वताबद्दल कुटुंबा बद्दल काही बोलायचा प्रयत्न पण केला नाही . तिनेही विषय काढला नाही आणि हिनेही . १ तास गेला .

तशी किरण म्हणाली , " निघूया . उशीर झालाय . आई घरी वाट पाहत असेल . "

" फक्त आईच ??" सुलभा ला या प्रश्नातून खूप काही विचारायचे होते आणि स्वताबद्दल, आदित्य बद्दल सांगायचे होते . पण किरण ने तशी संधीच दिली नाही.

" हम्म . निघते मी . बाय . " परत भेटण्याचं कोणतंही वाक्य न काढता किरण म्हणाली .

" परत भेटूया का ? " सुलभा ने न राहवून शेवटी विचारलेच .

" कशासाठी ? " परत एकदा परकेपणाने किरण ने विचारले .

" आदित्य तुझी वाट पाहतोय अजून . " सुलभा चे डोळे भरून आले .

किरण ला तिच्या कानावर विश्वास बसेना . आदित्य ? म्हणजे त्याने लग्न नाही केले अजून? इतके वर्ष? तो आपल्यासाठी ? हे कसे शक्य आहे . किरण पुरती गोंधळून गेली . आश्चर्याने भरल्या डोळ्यांनी सुलभाकडे पाहत राहिली , " हे बघ सुलभा , अं , म्हणजे सुलभा काकू , आता कसलीच चेष्टा सहन नाही होणार . आयुष्याने जी चेष्टा केली आहे आजवर ती अजून उरात आहे माझ्या . " किरण आता सुलभा च्या नजरेला नजर देऊनही बोलू शकत नव्हती .

" या सगळ्याला कुठेतरी मीच कारणीभूत आहे का ग ? तू का नाही केला लग्न अजून सांग ना . आदित्य आहे न मनात अजून . त्याचंही तेच ! आणि तुम्हा दोघांच्या मनात मीच हे बीज पेरलं कदाचित . मीच कारणीभूत आहे या सगळ्याला ! " सुलभा किरणकडे पाहून बोलत होती .

" एका क्षणात इतकी परकी झाली होते का ग मी ? कि न भेटता निघून गेलीस मला ? म्हणजे माझंच चुकलं होतं सगळं "

" नाही ग सुलभा नाही , असा कुणाच्या सांगण्यावरून होतं का प्रेम बीम . तसं काही नाही . लग्न न करण्याची कारणं वेगळी आहेत ,त्यात काय परिस्थितीत मी आणि आई तिथून निघाले ,तुला कसे सांगू , जगणं नकोसं झालं होतं गं . आणि त्याचे कसलेही पडसाद तुमच्यावर उठू द्यायचे नव्हते म्हणून . आणि आदित्य ,त्याला तर कधी मी भेटले पण नाहीये . माझ्याबद्दल त्याला काय वाटते हे तर मला माहितही नव्हते . "

" पण ते ऐकूनही घ्यायला तू थांबली नाहीस . स्वताचे सगळे विचार मनात दाबून ठेऊन तू निघून गेलीस . तुझ्या आठवणीत रात्र रात्र डोळे ओले करताना पहिला मी त्याला . तू गेल्यावर ३-४ महिन्यात तोही निघून गेला परदेशात , सगळं तसंच उरात ठेऊन , त्याच्या डोळ्यात सगळं दिसत होतं मला , फक्त नानांच्या समोर आम्ही काही बोलू शकत नव्हतो. आणि नानांशी वाद घालायचा ठरवले असते ; तरी जिच्यासाठी ते करायचे ती काहीही मागमूस न ठेवता निघून गेली होती कायमचीच .

त्यानंतर ३-४ वर्षांनी नानांना ग्रासले दुखण्याने . त्यांची चूक त्यांना समजून पण आली, पण वेळ निघून गेली होती . किरण चा शोध घे आणि लग्न कर असे आदित्य ला सांगून तेही देवाकडे गेले आम्हाला सोडून . तेव्हा तुझी खूप गरज होती ग मला , कसं सगळं दुख्ख पचवलं मलाच माहित .
तुझ्या दुख्खात मी नव्हते आणि माझ्या तू …………"

" नाना गेले ??? " .

" तुला कसे कळवणार , तुझा पत्ताही माहित नव्हता , कि नंबर सुद्धा .त्यानंतर 2 वर्ष तर मी US गेले , अर्चना ला मुलगा झाला .आता ३ वर्षाचा आहे तो .
आदित्य हि तिकडेच असतो ना म्हणून मुलांनी मला तिकडेच ठेवून घेतले . पण मन रमेना ग तिथल्या वातावरणात !

६ महिन्यांपूर्वी आले इथे पुण्यात . आणि योगायोग बघ ३ दिवसांपूर्वी तुझी कॉलेज ची मैत्रीण मला भेटली . तिच्याकडून तुझ्या बी एड कॉलेज ची माहिती मिळवली . तिथून तुझे आत्ताच्या शाळेचे डिटेल मिळवले . आणि शाळेत फोन करून तुझा मोबाईल नंबर मिळवला . "

" इतके सगळे झाले ,आणि मी तुझ्यासोबत नव्हते याची खंत वाटत आहे . पण …नियतीला जे मान्य होते तेच झाले …… कदाचित ।
मी माझं रुटीन माझ्यापुरतं ठरवून घेतलं , गेली ८ वर्ष तेच आहे .रोजचा दिवस ढकलत आहे पुढे इतकंच . आज आपण भेटलो हि नियती असेल .
पण असो , …………………………. पण निघूया आता ? " किरण परत त्याच निर्विकार भावनेने बोलत होती .

" तुला काहीच नाही म्हणायचं ? आदित्य बद्दल ? तुला काहीच नाही बोलायचं ? तो वाट पाहतोय तुझी " सुलभाने परत किरण ला विचारले .

" एक सांगू ? आता तुझ्यापासून काय लपलंय ग . बोललो नाही तरी डोळ्यांची भाषा समजू अशा आपण !
हो, प्रेम करते मी अजूनही त्याच्यावर ,म्हणूनच लांब राहायचंय मला त्याच्यापासून . माझी सावली पण नको त्याच्यावर . त्याला माझ्यापेक्षा हजार पटीने चांगल्या मुली मिळतील . माझ्यावर कुणी प्रेम करावे असे माझ्यात काही नाही गं . कुणी माझ्यावर प्रेम करावे इतकी माझी लायकी नाही ,असे म्हण हवं तर .

आणि खरंच कधी आम्ही तसं काही बोललो नाही , भेटलो पण नाही ,या सगळ्या गोष्टी आपल्या दोघींमध्ये होत्या मी कधीच …. किंवा त्यानेही कधीच ……. म्हणजे तुला कळत नाहीये का मला काय सांगायचे आहे ते ……… त्याने मला कधी प्रपोज पण केले नव्हते . मग तू कशी काय म्हणू शकते कि तो माझ्यासाठी थांबला आहे म्हणून ……… कळतंय का तुला सुलभा ? "

किरण जणू काही स्वताशीच बोलत होती पाण्याकडे पाहत . मागे वळून तिने पहिले तर सुलभा तिथे नव्हतीच !! समोर उभा होता तो एक सुंदर राजकुमार . एका हातात एक मोठी bag , एका हातात कोट , डोळ्यांवर गॉगल , डोक्यावर मिलिटरी ची टोपी , ओठांवर स्मितहास्य . किरण जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली . वाऱ्याची झुळूक तिच्या अंगावर शहारा आणून गेली . त्या तरुणाने डोळ्यांवरचा गॉगल काढला , हातातली bag आणि कोट बाजूला ठेवला . तिच्यासमोर येउन उभा राहिला . किरण फक्त पाहत होती .

मग तो गुडघ्यावर बसला , हातात कुठून तरी गुलाबाचे फुल आले त्याच्या , तिच्याकडे हात करून म्हणाला , " मी . मी आदित्य कुलकर्णी . software engineer आहे . बऱ्या कंपनी मध्ये बरा जॉब करतो . आणि मी तुझ्यावर खूप खूप मनापासून प्रेम करतो . तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही . पुढच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मला तुझ्याबरोबर घालवायचा आहे . माझ्याशी लग्न करशील ? माझी life partner होशील ? " .

किरण ला आता बोलवेना , डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या , तेवढ्यात तिच्या मागून सुलभाचा आवाज आला , " हो म्हण पटकन . बाकी काही का असेना , पण खांदे सरळ आहेत ना ! " ……………. आणि शेवटी किरण आदित्य ला जाऊन बिलगली !!!!
ते दोघे भान हरपून एकमेकांकडे पाहत होते . त्यांना आता जणू आजूबाजूच्या जगाची काही पडलीच नव्हती . खूप वाट पहावी लागली होती त्यांना . आणि त्या मिठीतून आता त्यांना अलग व्हायचे नव्हते .

सुलभानेही डोळे पुसले ." आता अश्रू गळायचे नाहीत . आता फक्त हसू . आपण लगेच तुझ्या आई ला जाऊन भेटू . मी सगळं करते . " पण सुलभाच्या बोलण्याकडे दोघांचंही लक्ष नव्हतं . किरण च्या आणि आदित्य च्या चेहऱ्यावरच्या हास्याने सुलभा ला सगळं काही मिळालं होतं .
" अं हं हं " असं घसा स्वच्छ केल्यासारखं सुलभाने केलं . तसं दोघं भानावर आले , आणि किरण म्हणाली , " बोला ,सासूबाई !! , नाही बाई ,सासूबाई नको मी तुला 'ए सुलभा' अशीच हाक मारणार ! मला ही मैत्रीण कधीच गमवायची नाहीये ! " आणि तिघांनीही हसत हसत ‘ चहा’ घेतला .

समाप्त .

.....फिझा

कथा

प्रतिक्रिया

चला, भेटले एकदाचे. नंतर नंतर तर हे भेटतात की नाही अशी शंका येत होती. कथा आवडली.

के.पी.'s picture

5 Feb 2015 - 5:38 am | के.पी.

ओह्हो!! :) छान होती कथा !

स्पंदना's picture

5 Feb 2015 - 6:36 am | स्पंदना

भेटले बाई एकदाचे.
पुलेशु फिझा.

हुश्श! भेटले एकदाचे आणि लग्न करुन सासूलाही नावाने हाक मारणार! ब्येष्ट! :)

अजया's picture

5 Feb 2015 - 7:27 am | अजया

अगदी हेच्च म्हणणार होते!

पदम's picture

5 Feb 2015 - 11:26 am | पदम

+१

vrushali n's picture

5 Feb 2015 - 11:37 am | vrushali n

happy ending आवडतात बुवा आपल्याला.....

स्नेहल महेश's picture

5 Feb 2015 - 11:41 am | स्नेहल महेश

छान कथा

रुपी's picture

6 Feb 2015 - 3:09 am | रुपी

सुखद शेवट आणि इतक्या लवकर सगळे भाग टाकले. उगीच खूप वाट नाही पाहायला लावली.

मला वाटतं मी याआधी वपुंच्या एका कथेत असंच नायिकेला अश्याच सरळ खांद्यांच्या आवडीबद्दल वाचलं आहे.

mayurpankhie's picture

8 Feb 2015 - 11:01 am | mayurpankhie

आवडली ....

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 1:30 pm | एक एकटा एकटाच

सुंदर कथा

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा