दोघी … ( भाग २ )

फिझा's picture
फिझा in जनातलं, मनातलं
3 Feb 2015 - 3:08 am

दोघी … !

भाग २

हळू हळू दोघींची नितळ मैत्री घट्ट होत गेली ऱोजच्या रोज त्यांच्या गप्पा होऊ लागल्या , भेटल्या तर ठीकच नाहीतर फोनवर . आता किरण, काकूंना चक्क
' ए सुलभा' अशी हाक मारत असे . मैत्रीण झाली होती ना !

एके दिवशी अशाच एका संध्याकाळी सुलभा, किरण ची वाट बघत होती नेहमीच्याच टपरी वर . किरण आली तशी जरा नाराज वाटत होती .

" चाल पटकन निघू आपण आज घरी लवकर जायचे आहे " किरण म्हणाली नाराजीने .

" अग हो हो , माहितीये मुलगा येणारे पाहायला तुला . पण इतकी घाई ! आम्हाला नव्हता बुवा माहित एक माणूस इतकं उत्सुक आहे ते कुणालातरी भेटायला !! " सुलभा मिश्किल पणे हसत म्हणाली . किरण ची नाराजी जावी म्हणून .

" गप गं . काहीतरी बोलू नको हं तू आता . मला इथे टेन्शन आलंय . आणि तुझं काहीतरीच चालू आहे ! "

" अग ठीके . आता तू मुलगा शोधला नाहीस म्हणून हे arrange marriage . शोधला असतास तर तूच आई बाबांना सांगितले असतेस न कि मला अमुक या मुलाशी लग्न करायचे आहे म्हणून . हे बघ , कधी न कधी तरी लग्न करायचे आहेच न . मग ! आमच्या वेळी तर डायरेक्ट आई बाबा सांगतील तिथे लग्न करायचे . बघण्याचा कार्यक्रम फक्त नाममात्र . पण आमचे कुठे काय वाईट झाले . सगळं झालंच चांगलं . अर्थात माझ्या अर्चनाचं सुद्धा चांगलंच झालं . "

" तसं नाही ग , मला लग्न करायचे नाही असं काही नाही , पण तो कसा असावा , नोकरी करणारा कि बिसिनेस , काळा कि गोरा , उंच कि बुटका , असा काही मी ठरवलं नाहीये . आणि ते प्रेम बीम कसे करतात रादर ते कसे होते , प्रेमात कसे पडतात ते अजून मला कळलेलं नाहीये . अजून कधी कुणी असं भेटलंच नाही "

" भेटायला , कधी तू कुठे बाहेर पडली आहेस जगात ! स्वत: मधेच गुरफटून ठेवलं आहेस मनाला . त्याला मुक्त आकाशात विहार करू दिलं आहेस कधी ?
आपण दोघीच असतांना जसं मोकळं बोलतेस, हसतेस ,तसं आई बाबांसमोर मी नाही पाहिलं तुला कधी . त्यांच्यासमोर तुझं वागणं वेगळं असतं हे खूप वेळा जाणवलं आहे मला . मी फक्त बोलले नाही तुला याबद्दल इतकंच .
आयुष्याचा जोडीदार निवडताना मात्र तू खंबीर असावीस मनावर कसलाही ताण नसतांना अगदी मुक्त मनाने तू त्याला पहावं ,स्वीकारावं असं वाटतं मला . म्हणजे exactly तुला कसं समजावून सांगू ते मला कळत नाहीये . असो , आत्ता मी काही बोलत नाही . नाहीतर तुला वाटेल मी लेक्चर देत आहे तुला . चल निघूया .बेस्ट लक आजच्या प्रोग्राम साठी .बाकी सगळी तयारी झाली का ? "

" हो झाली .तशी . कांदापोहे करणारे . मग चहा . बाकी काय साडी नेसेन आज. आई ने सांगितलंय तसं . टेन्शन आलंय गं ! एखाद्यासमोर जायचे आणि त्याने ठरवायचे आपण त्याला पसंत आहोत कि नाही . कोण कुठला माणूस येणार आणि आपल्याला जज करणार , याला काय अर्थ आहे ? " किरण बोलत होती . हातातल्या ओढणीच्या टोक आता घट्ट घट्ट बोटाला गुंडाळले होते तिने .

" अग असं नाही , तोच तुला जज करेल असं नाही काही . तुही त्याला पाहायचे, तुही तुझे मत मांडायचे . आई बाबांशी काय ते स्पष्ट बोल आणि .
आवडला तर मनापासून हो म्हण , आणि नाही आवडला तर स्पष्टपणे नाही म्हण . उगीच काही पूर्वग्रह डोक्यात ठेऊन , काही चुकीचे निर्णय घेऊ नको .
आई बाबा सगळ्यात जास्त आपल्या मुलांचीच काळजी करत असतात . आणि हा आयुष्याचा प्रश्न आहे आई बाबा नक्कीच तुझ्या मताला मान देतील . तू नको काळजी करू . ….तुझ्या चेहऱ्यावर मला त्या बघायला येणाऱ्या मुलापेक्षा आई बाबांचेच टेन्शन जास्त दिसतंय . असो . पाहू काय होते ते . चल "

असे म्हणत दोघीजणी कोणतातरी विचार करत निघाल्या . सुलभा ला अर्चना चे पाहण्याचे प्रोग्राम आठवत होते . ती घरातून बाहेर पडली तो दिवस आठवला कि डोळे पाणावल्याशिवाय राहायचे नाहीत . किरण आता भविष्यात काय वाढून ठेवलंय या विचाराने गांगरून गेली होती .

ठरल्याप्रमाणे किरण चा पाहण्याचा प्रोग्राम नीट पार पडला . चहा पोहे झाल्यावर तो मुलगा व किरण टेरेस वर जाऊन गप्पा मारून आले . पण किरण ला फार काही तो आवडला नाही . अर्थात लगेच ते लोक गेल्या गेल्या तिने आपला मत आई बाबांना सांगितलं . आई ने जरा कुरकुर केली पण बाबांनी ठामपणे समर्थन केल. कारण तिच्या बाबांनाही ते लोक फार काही पटले नाहीत . बाबांनी आपली बाजू घेतली या भावनेनेच किरणला फार बरे वाटले .

पण त्या रात्री किरण विचार करत राहिली , कि खरंच आपल्याला कसा मुलगा आवडेल . मुव्ही मधले वेगळे वेगळे हिरो तिच्या डोळ्यासमोर फिरू लागले . मग मनाशीच हसून " छे छे " असं म्हणाली . मग कॉलेज मध्ये एकदा मिलिटरी मधले जवान आले होते तेव्हा सगळ्या मुली त्यांच्याबद्दल बोलत होत्या हे तिला आठवले . उगीचच एखाद्या जवानाचे चित्र तिच्या मनात उमटून गेले . ५'११'' ते ६ फुट उंची असणारी रुबाबदार शरीरयष्टी, छातीवर लावलेली ती वेगवेगळी पदके , ती मिलिटरी ची टोपी , तो पोशाख , चालताना टक टक वाजणारे ते बूट, आणि मिलिटरी पोशाखामुळे सरळ रेषेत दिसणारे ते खांदे ! एकंदरीत स्मार्ट व्यक्तीमत्व ! ह्म्म्म अगदी असाच हवा दिसायला . The real hero ! मग हळूच लाजून स्वताशीच हसली आणि ते चित्र मनात ठेऊन झोपी गेली .

मग पुढे काही दिवस असेच गेले . सुलभा बरोबर भेटीगाठी अधून मधून चालूच होत्या . एक दिवस अचानक सुलभा चा फोन आला किरण ला
येताना तिने लायब्ररी तून एक पुस्तक आणायला सांगितले होते . त्या दिवशी किरण सुलभा च्या घरी गेली. बेल वाजवली तेव्हा आदित्य ने दार उघडले . अनपेक्षित पणे आदित्य समोर आल्यावर किरण एकदम थबकली .कारण एरवी ती सुलभा कडे जायची तेव्हा आदित्य आणि त्याचे बाबा आपापल्या ऑफिस ला गेलेले असायचे .

मग दारातूनच तिने आदित्य ला पुस्तक दिले . " काकूंनी हे पुस्तक द्यायला सांगितले होते . त्यांना द्याल का प्लीज ?"

" हो . " असे म्हणत आदित्य ने पुस्तक घेतले . तेवढ्यात आतून सुलभा चा आवाज आला , " कोण आहे रे आदित्य ? किरण असेल तर तिला बसायला संग आलेच मी !"

"ये बस ." तो एवढंच बोलला . " ओके " म्हणत किरण आत आली .

" अग ये ये . बस . अग सकाळी पाय घसरला बाथरूम मध्ये . मुरगाळला आहे जरा . म्हणून आज येता नाही आलं . मग आज आदित्य ने पण रजा घेतली , आई ची सेवा करायला हवी ना म्हणून . " हसत हसत सुलभा म्हणाली .

" आई , तू पण ना , असो , लाईट बील भरून येतो आणि तुझी औषधं पण आणतो . bye " पाठीला sack लावत लावत आदित्य म्हणाला आणि हेल्मेट घेऊन जाऊ लागला .

" अच्छा , bye " आदित्य पहिल्यांदाच किरण शी बोलत होता . तिला आधी कळलेच नाही ती सुलभा कडे पाहत होती , तिला वाटले त्याने आई लाच अच्छा केले . मग लक्षात आले कि तो आपल्याला म्हणाला तेव्हा त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत तिने " bye " एवढेच म्हटले . तो १-२ सेकंद त्या स्मित हास्याकडे पाहत राहिला आणि बूट घालून निघून गेला . जिन्यावरून खाली जाताना बुटाच्या येणाऱ्या टक टक आवाजाकडे किरण चे लक्ष गेलं आणि तो आवाज दूर दूर जाईपर्यंत ती नकळत पणे ऐकत राहिली .

तेवढ्यात सुलभा म्हणाली , " thanks . पुस्तकामुळे माझा वेळ तरी जाईल चांगला . कारण आता आराम करावा लागणारे . बाकी सांग काय चाललंय अजून . यांची पण तब्बेत अधून मधून खालावत असते तुला तर माहित आहेच . "

" ह्म्म्म्म . परत काही त्रास झाला का त्यांना ? औषधं चालू आहेत ना परवा डॉक्टर काय म्हणाले . " किरण ने काळजीने काकांबद्दल विचारले .

" काही नाही गं . ठीक आहे सगळं . चिडचिडा स्वभाव असल्याने बिपी वाढतं ना . आता या वयात शांत राहायला हवं . तर सारखं एखाद्या कारणावरून चिडचिड करतात . आजकाल तर कारणही लागत नाही त्यांना . मग मी नाहीतर आदित्य कुणाच्या तरी वर ओरडतात ,चिडतात ,रुसून काय बसतात , विचारू नको . अर्चना निघून गेल्यावर त्यांना मैल्ड heart autack येउन गेला ना . आम्ही खूप घाबरलो होतो . पण आदित्य ने सगळे प्रसंगावधान साधून नेले डॉक्टर कडे आणि सगळे सुरळीत झाले . मी तर पुरती गांगरून गेले होते बघ . काय करणार …………… बघ मी बोलतच बसले, तुला पाणी सुद्धा विचारले नाहीये अजून " सुलभा म्हणाली .

" नाही ग नकोय मला . चालायचंच ! जगी सर्व सुखी असा कोण आहे , विचारे मना तूच शोधून पाहे !
तूच समजवतेस ना मला ……. आणि आपण आहोत न एकमेकींना सगळ्या प्रश्नांना सामोरे जाऊ असं ठरलंय कि नाही आपलं . मग ! " किरण हसत म्हणाली .

" काय मग पुढे काय ! मिलिटरी मधला राजकुमार कधी मिळणार . जाऊया का लेह लडाख ला . एखादा तरी मिळेल तिकडे नक्की . मग तुझे तरी सगळे प्रश्न संपतील " ……. हसत हसत सुलभा म्हणाली .

किरण ने तिची राजकुमाराबद्दल ची स्वप्ने सुलभा ला सांगितली होती . एका निखळ मैत्री मध्ये जे जे काही आपण एकमेकांशी बोलू शकतो ते सगळं सगळं त्या बोलायच्या दोघी .

" तू पण ना …… कोणत्या विषया नन्तर तुला कोणता विषय सुचेल गप्पांना ,खरंच सांगता येत नाही . चल निघते मी आता . आई वाट पाहत असेल "

" थांब ग , जाशील ! आपण भेटलो आणि चहा नाही झाला हे काही चालायचे नाही ! चल चहा टाकू ." असे म्हणत सुलभा आणि तिच्या पाठोपाठ किरण किचन मध्ये आल्या . किरण ला आज वेगळेच वाटत होते सुलभा च्या घरात वावरताना . तसे पाहायला गेले तर ती बऱ्याचदा येउन गेली होती सुलभाकडे , पण आज काहीतरी वेगळेच ऑकवर्ड वाटत होते . आज आदित्य भेटला म्हणून असेल कदाचित .
खरे तर आदित्य बद्दल सुलभा कडून बरंच काही ऐकलं होतं ,त्याच्या बालपणा बद्दल ,त्याच्या शाळा कॉलेज बद्दल , त्याच्या नोकरीविषयी सगळं सगळं . पण आज सगळं काही नव्याने ऐकावसं वाटत होतं . उगीचंच .

चहा चा कप संपवत किरण जाण्यासाठी निघाली . " चल गं . आराम कर मी निघते . " असे म्हणेपर्यंत बेल च्या आवाजाने परत एकदा छातीतले ठोके वाढले किरणच्या . सुलभा ला पायामुळे पटकन उठता येत नव्हते म्हणून किरण ने दार उघडले ,आणि......................

समोर ६ फुट उंची असलेला रुबाबदार तरुण , टी शर्ट अन जीन्स असा पोशाख , खिशाला लावलेला पेन , डोक्यावरून नुकतेच हेल्मेट काढल्यामुळे विस्कटलेले केस , पायात बूट , आणि पाठीला sack लावल्यामुळे वाकलेले खांदे …………… असं सगळं पण तरीही स्मार्ट व्यक्तिमत्व ! The real hero कदाचित !

किरण २ मिनिट स्तब्ध होऊन पाहत राहिली आणि अर्थातच तो तरुणही तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघत राहिला …….दोघहि क्षणभर या जगात नव्हते जणू ……… त्यांना आजू बाजूचा विसर पडला होता . दोघांच्या डोळ्यात एक चमक आली आणि एकदम दोघं भानावर आले ते सुलभाच्या वाक्याने , " अरे आदित्य, इतक्यात आलास तू ! लवकर झाली कि तुझी कामे सगळी ! "

दोघांनी एकदम नजर चोरली आणि किरण तिची bag घेऊन जायला निघाली , " मी निघते . भेटू नंतर , काळजी घे " सुलभा ला उद्देशून पण तिच्याशीही नजर चोरून किरण म्हणाली .

" हो हो ये ग परत . "सुलभा म्हणाली . सुलभा तशी हुशार होती . दोघांच्या डोळ्यात उमटलेले भाव कळायला तिला विलंबही लागला नाही .

झपाझप पावले टाकत किरण घराकडे निघाली . मनात कसलेसे विचार येऊ लागले . तिला असे यापूर्वी कधीच झाले नव्हते . कुणा मुलाशी बोलताना त्याच्या समोर जाताना असे भाव कधी डोळ्यात मनात उमटले नव्हते . पण आदित्य ? त्याला पाहून असे कसे काय आज झाले याचा विचार करत करत , सारखा तोच तोच प्रसंग आठवत राहिली . घरी जाताच आरशाकडे वळली . " शी ! काय हा ड्रेस घातला आहे मी आज ! जरा बरा ड्रेस आज घालायला हवा होता “ उगीचच असा विचार मनात चमकून गेला . असे एक न अनेक विचार मनात घेऊन ती झोपायला गेली . कसलीतरी हूर हूर लागली मनाला कायमचीच !!!

इकडे आदित्य ची अवस्था फार काही वेगळी नव्हती . त्याच्याही मनात कुठेतरी किरण बद्दल विचार चालू होते . एका भेटीत , भेट कसली नुसतं दिसणं पण ओढ लागली होती , तिला परत पाहण्याची .

मनातल्या मनात प्रेमाची सुरुवात होते ……… ती अशीच असेल बहुधा ……………. असे विचार दोघांच्या मनात होते . हि आजची भेट , ते नुसते पाहणे एकमेकांना इतके काही देऊन जाईल ,अगदी आयुष्याला कलाटणी देऊन जाईल अशी कदाचित त्या दोघांनीही कल्पनाही केली नसेल .
इकडे सुलभा पण विचारात गर्क होती . हा विचार नक्कीच चांगला आहे आणि या बद्दल या दोघांशीही बोलायचे तिने ठरवले . अर्थात लगेच नाहीच पण कालांतराने . त्यामुळे आत्ता आपण घाई करायची नाही या दोघांपैकी कुणीतरी कधीतरी आपल्याला हे सांगेल आणि त्यावेळी आपल्याला स्वर्ग २ बोटे शिल्लक राहिला असेल .तेव्हा ती काय करेल अन काय नाही , आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल तो, आपला मुलगा आणि आपली मैत्रीण . नुसत्या विचारांनीच सुलभा भारावून गेली . खरच असे झाले तर … आणि इतके दिवस हा विचार आपल्या का मनात आला नाही ……असे वाटून स्वताचेच तिला आश्चर्य वाटले . कदाचित त्या दोघांपेक्षा आता तिलाच जास्त घाई झाली होती .

दरम्यान किरण ची परीक्षा हि संपली होती . आता हिचे लग्न करायला हवे या विचाराने तिच्या आई बाबांनी आता वेगाने तिच्यासाठी स्थळे पाहणे चालू केले . किरण नेहमीप्रमाणेच बघण्याच्या प्रोग्राम ना सामोरी जाऊ लागली . ती बिचारी बोलणार तरी काय आणि कुणाशी . आणि अर्थात कशाबद्दल . आदित्य बद्दल ? ज्याला ती नीटशी ओळखतही नाही . ज्याच्याशी कधी ४ शब्द बोलली पण नाही . सुलभा शी बोलणे तर शक्यच नव्हते . अशी कशी काय ती सुलभा शी आदित्य विषयी बोलेल . आणि ते सुद्धा आदित्य च्या मनात तिच्याबद्दल काय आहे हे न जाणताच . लग्न बिग्न तर लांबच राहिलं , साधं कधी बोललाही नव्हता तो तिच्याबरोबर .

सुलभा ला भेटायची तेव्हा आता ऑकवर्ड वाटायचं तिला . उगीचच ! कालपर्यंतची आपली पट्ट मैत्रीण पण आज तिच्याशी मोकळेपणाने बोलणे अशक्य झाले होते . परिस्थिती किंवा नातेच तसे होते . इतर कुणी असता तिच्या मनात तर कदाचित तिने केव्हाच सुलभा ला सांगितले असते . पण …………

एकदा भेटल्यावर सुलभा ने विषय काढला . " काय मग कसे चालले आहे प्रोग्राम. कुणीही तुला आवाडला नाही कि काय आत्तापर्यंत ? , आजकाल तू काही सांगत नाही मला डिटेल मध्ये ? "

" तसं नाही गं , घरी आई बाबा सुद्धा जर वैतागले आहेत . मी सगळ्यांनाच नाही म्हणते म्हणून . पण नाही ग कुणी पसंत .! म्हणजे ज्यांना मी आवडते ते मला आवडत नाहीत , आणि मला ……. मला तर कुणी नाही आवडले अजुन………… खरं तर इतकी घाई काय आहे लग्नाची ? पण हा प्रश्न मी घरी विचारला तर …तर त्यावरून अजून एखादं महाभारत होईल , ……. आधीच काही कमी नाहीये ……. " किरण ची नजर नाईलाजाने खाली गेली आणि पुढे तिला बोलवेना . आता आपल्या घरातल्या भांडणा बद्दल सुलभा ला सांगणे तिला नको वाटत होते .

" मी एक स्थळ सुचवू ? " आज सुलभाने विचारायचा निर्धार केला होता जणू . किरण काही बोलणार नाही आणि आदित्य तर कायम बिझी असल्याचे दाखवत होता . त्यामुळे त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला तर तो सराईत पणे टाळून न्यायचा . मग आता सुलभालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे हे तिच्या लक्षात आले .

आता सुलभा काय विचारणार आहे असे वाटून किरण तिच्याकडे रोखून पाहत होती . पण इतक्यात पटकन बोलली " नको . नको सुचवू . जाऊदे मला लग्न च करायचे नाहीये . खर तर मला जगायचंच नाहीये . का आले मी या जगात …. ! " उसासा टाकून किरण बोलली .

सुलभा ला काय बोलावे ते कळेना . पण आज किरण खूप नाराज आहे हे तिच्या लक्षात आले , " काय ग ! काय बोलत आहेस . अग का असं बोलत आहेस . आणि हे २२-२३ वय तुझं . आयुष्य तर अजून पाहिलं पण नाहीयेस आणि हे काय हे असले निराशाजनक विचार ? परत असं बोलूही नको हं माझ्यासमोर .
अग़ हिंडायचे बागडायचे दिवस ! फुलासारखे फुलायचे ,आयुष्यात सप्तरंग भरून घ्यायचे , नवी दिशा नवी उमेद . कसं आनंद उधळून द्यायचा चौफेर .
अग आणि किती वेळा समजावले आहे तुला कि फार फिलोसोफर सारखे विचार करत बसू नको .
फक्त आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा thats it ! "

" तू म्हणतेस ते खरं आहे . पण जे आयुष्य एन्जॉय करायला सांगत आहेस ,त्याच्या अस्तित्वाबद्दल च आता मला खात्री वाटत नाहीये . … " आता किरण नेहमीपेक्षा अधिक मोकळेपणाने बोलू लागली . तिचे डोळे भरून आले होते . आत्ता या क्षणी सुलभा शिवाय आपले कुणी नाही जगात असे तिला
वाटत होते . होरपळलेली होती ती . सगळं काही नकोसं वाटत होतं तिला . न राहवून तिने सुलभा ला सुरुवात केली ,

" काल रात्री परत एकदा कोणत्या तरी कारणावरून बिनसले आई बाबांचे आणि चालू झाले नेहमीचेच . मी रूम मध्ये जाऊन दर बंद करून घेतले पण तरीही सगळे बोलणे त्यांचे मला ऐकू येतच होते . विषयाने विषय वाढत गेला आणि त्यांची एकमेकांवराची टोलेबाजी पण .

त्यातच आई ओरडली ' तुझी पण आहे न मुलगी , मग बघ काय करायचे ते . कर लग्न नाहीतर बसू दे तिला घरी आयुष्यभर . कार्टी जन्मालाच आली नसती तर कधीच सोडून गेले असते तुला . हे लोढणं बांधलं गेलं न गळ्यात . म्हणून केला संसार तुझ्याबरोबर आयुष्यभर . लेकरू उघड्यावर पडलं असतं माझं . '

तसे बाबा पण ओरडून बोलू लागले , ' मग आता आली का अक्कल ??? तेव्हाच म्हणल होतं तुला , मुलगी आहे तर अबोर्शन कर . मला आणि माझ्या आई ला तर पहिला मुलगाच हवा होता . तेव्हाच ऐकायचं न मग ! '

बस्स ! याच्यापुढे मला ऐकवलं पण नाही ग सुलभा . अभागी म्हणूनच जन्माला आले न मी . न आई ला हवी होते न बाबांना . माझ्या जन्मावर माझे सक्खे आई बाबा सुद्धा खुश नव्हते तर या जगाचं काय घेऊन बसलीस . आता जन्माला आलीच आहे म्हणून त्यांनी वाढवलं मला इतकंच . बालपणीच्या सुद्धा काही फार चांगल्या आठवणी नाहीयेत . ज्या आहेत त्याही पुसून टाकाव्या अशाच . कधीतरी मोठी होईल , कुणीतरी कधीतरी आयुष्यात मला असे भेटेल जे माझ्यावर प्रेम करेल , माझ्यासाठी ज्याच्या डोळ्यात प्रेम असेल , मला ज्याचा आधार वाटेल असं कुणीतरी मला भेटेल असं वाटत राहायचं .
छत्र असलं तरी मी निराधारच होते कायम . ! " डोळे पुसत उसासे टाकत किरण बोलत होती .

सुलभालाही भरून आलं . ती म्हणाली , " अगं वेडाबाई , तू काहीतरीच खूळ घेऊन बसली आहेस ……. इतकी छान आहेस दिसायला ,वागायला, बोलायला , कधी मान वर करून कुणाकडे पहिला नाहीस . कधी कुणाचं वाईट चिंतलं नाहीस , तुझंही काही वाईट होणार नाही . तो स्वप्नातला राजकुमार लवकरच भेटेल बघ तुला . आणि मग …… " सुलभाचे वाक्य संपायच्या आतंच किरण म्हणाली , " नाही सुलभा . माझ्याकडे दुख्खाशिवाय काही नाहीये कुणाला द्यायला . मी नाही लग्न करणार कुणाशीच . न जाणो माझ्या या दुर्दैवी आयुष्याचा त्याच्या आयुष्यावर परिणाम व्हायचा . माझ्यामुळे त्याच्या नशिबातही दुख्ख यायचे . नकोच , आता अजून सहन होत नाही ग !
माझी सावली सुद्धा नको कुणावर . तू पण नको भेटत जाऊ मला ! माझ्यामुळे तुलापण ……" एवढे बोलेपर्यंत किरण ढसाढसा रडू लागली .

सुलभा ने तिला सावरले , " अग काय वेड्यासारखी बडबडत सुटली आहेस तू . कोण कमनशिबी आणि कसलं काय . असं काही नसतं . हे वेड्यासारखे काहीतरी खूळ घेऊ नको तू डोक्यात आता . हे बघ , आयुष्यात दुख्ख असतात पण आपण त्याला किती धीराने तोंड देतो त्यावर सगळे अवलंबून असते . हे असं स्वताला दोष दिला कि झालं . तुम्ही आजकालची मुलं तुम्हाला जरा कुठे बिनसलं कि दुख्खाचा डोंगर कोसळल्या सारखे वागता .

हे बघ , इकडे बघ माझ्याकडे, काहीही झालेले नाहीये , आणि काही वाईट होणार पण नाहीये . उगीच लग्न करणार नाही वगैरे वगैरे असा काही बोलू नको . एकदा जोडीदार मिळाला न कि बघ सगळं कसं सुंदर आयुष्य आहे ते . आणि ते आई बाबांचे टेन्शन घेऊ नको . आता त्यावर मी काही बोलू शकत नाही पण हो, तू माझी मैत्रीण आहेस न मग माझं नाही ऐकणार ? " सुलभाच्या वाक्याने किरण ने रडतच तिच्या खांद्यावर डोके ठेवले . कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच कुणाच्या तरी खांद्यावर डोके ठेऊन ती रडत होती . तिच्या पाठीवरून हात फिरवत असताना सुलभालाही दाटून आले होते , मुलगी जन्माला येणे म्हणजे ओझे आहे असे समाजातल्या इतर थरांमधून बातम्या ऐकल्या होत्या पण आपल्या आजूबाजूला सुद्धा वावरणाऱ्या लोकांमध्ये असे लोक असतात यावरून तिला वाईट वाटत होते . काय हि कसली मानसिकता . असा विचार करत असतानाच एक वेगळा विचार तिच्या मनात पक्का होत होता . तो म्हणजे
आदित्य आणि किरण यांना लग्नाबद्दल विचारायचे .

क्रमश :

..............फिझा .

दोघी … ( भाग १ )

कथा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

3 Feb 2015 - 3:16 am | बहुगुणी

येऊ द्या पुढील भाग

वाचतिये. हिरो आणि हिरविनीला धपाधप प्रेमात न पाडल्याने बरे वाटले.

सुचेता's picture

3 Feb 2015 - 1:18 pm | सुचेता

वाचताना छान वाटल, खरच प्रत्येकाच्या जिवनात असं जिवाभावाच कुणी तरी हवच

इशा१२३'s picture

3 Feb 2015 - 3:51 pm | इशा१२३

पु.भा.प्र.

स्वाती२'s picture

3 Feb 2015 - 6:39 pm | स्वाती२

वाचतेय.

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 1:17 pm | एक एकटा एकटाच

हां ही भाग मस्त!!!