दोघी … (भाग ३)

फिझा's picture
फिझा in जनातलं, मनातलं
4 Feb 2015 - 6:11 am

दोघी … (भाग ३)

भाग ३

पुढे काही दिवस लोटले . सुलभा आणि किरण भेटल्या नव्हत्या बऱ्याच दिवसात . फोनवरच एकदोनदा बोलणे झाले तेवढंच . एके दिवशी संध्याकाळी सुलभाने घरात आदित्य च्या लग्नाचा विषय काढला . तिने आदित्य ला आधीच किरण बद्दल विचारले होते . तेव्हा त्याने जरा लाजूनच 'पुढे जायला काही हरकत नाही' असे सांगितले होते . आई ने स्वतःच त्याला किरण बद्दल विचारल्यामुळे त्याला तर जणू मनातले ओठावर आले होते आपसूकच . अर्थात तो आई पुढे तसं दर्शवत नव्हता पण सुलभा ला ते कळल्यावाचून राहिला नाही . मग काय , किरण ला तर ती ओळखत होतीच आणि किरण ने आपली सून व्हावं असं तिला मनापासून वाटत होतं . आता फक्त आदित्य चे बाबा आणि किरण चे आई बाबा यांच्या कानावर घातले कि पुढची बोलणी करता येतील असा विचार करून तिने त्या संध्याकाळी आदित्य च्या बाबांना विचारले , " अहो , मी काय म्हणते , आता आदित्य च्या लग्नाचं पाहायला हवं . एक मुलगी पण आहे माझ्या डोळ्यासमोर .बोलुय का तिच्या घरच्यांशी . " आपल्या नवऱ्याचा चिडका स्वभाव आणि अर्चना च्या लग्नामुळे घरात झालेला तणाव हे सगळं लक्षात ठेऊन
सुलभा ला हे सगळं बोलणं करायचं होतं आणि तिने तशी कसबीने परवानगी मिळवली ही .

नाना (आदित्य चे बाबा )म्हणाले , " हो हो काही हरकत नाही . मुलगी आपल्या जातीची आहे ना . मग झालं तर . पत्रिका मागवून घे मुलीची . मग बघू पुढे काय ते . पण हो , सगळं रितीरिवाजा प्रमाणेच व्हायला हवं . एकुलता एक मुलगा आहे आपला उगीच आतताई पणा नको कोणत्याच बाबतीत . शिवाय आदित्य चं काय मत आहे तेही विचार ! "

" हो हो बाबा , मला चालेल ! " इतक्या तत्परतेने आदित्य ने उत्तर दिले , कि तिघाना एकदम हसू आले . मग काय , दुधात साखर ! आदित्य आणि किरण च्या लग्नाचे मनोरे उभे राहू लागले सुलभा च्या मनात .

दुसऱ्याच दिवशी सकाळी सुलभा किरण च्या घरी गेली . किरण ने च दार उघडले . " अरे वा ! सुलभा तू ??? " किरण ने जीभ चावली आणि
म्हणाली ," या या कुलकर्णी काकू ! " दोघींनाही बर्याच दिवसांनी एकमेकींना पाहून खूप छान वाटलं . हसत हसत तिने सुलभा चे स्वागत केले . बसायला सांगितले आणि आई ला हाक मारली . " आई , कुलकर्णी काकू आल्या आहेत गं ! आज आम्ही घरीच गप्पा मारणार आहोत !" दोघींनाही हसू आलं .

किरण च्या त्या हसऱ्या निरागस चेहऱ्याकडे सुलभा पहातच राहिली . तिची दृष्ट काढून टाकावी असा विचार सुलभा च्या मनात आला . तेवढ्यात आई बाहेर आली . हसून आई म्हणाली , " अरे वा आज किरण ची मैत्रीण घरी आली . आज वेळ मिळाला न तुम्हाला आमच्याशी बोलायला . कशा आहात खूप दिवसांनी येणं केलंत ." तेवढ्यात किरण म्हणाली , " सुलभा …… काकू , चहा टाकते हं मस्त आल्याचा ! "

" अग़ नको ,झालाय माझा " सुलभा आई कडे पाहत म्हणाली .

" आपण भेटणार आणि चहा नाही ? असं कसं होईल . आणते चहा ! " हसून किरण आत गेली चहा करायला .

" आज छान वाटतंय मला पण तुम्हाला भेटून . आम्ही तर भेटत राहतो अधून मधुन. खूप गोड मुलगी आहे किरण . खरंच दृष्ट काढून टाकत जा तिची !" सुलभा किरण च्या आई शी बोलत होती . मग दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . किरण ने चहा आणला . आता किरण च्या समोरच बोलावे या हेतूने सुलभा म्हणाली , " खंर तर, आज एका वेगळ्या कामासाठी आले आहे मी . डायरेक्ट विषयालाच हात घालते . तुमच्या किरण ची पत्रिका हवी होती , आमच्या आदित्य साठी . “

किरण ने आश्चर्याने सुलभा कडे पहिले , तिचा तिच्या कानांवर विश्वास बसेना .सुलभा काय बोलत आहे , हि माझी मैत्रीण आज माझी पत्रिका तिच्या मुलासाठी मागत आहे . आश्चर्याचा धक्का होता तो पण सुखद धक्का होता. कधी काळी आदित्य बद्दलचे विचार तिच्या मनात डोकावले होते . म्हणजे फक्त विचार नाहीत अजून बराच काही . आणि तिला त्याच्याबद्दल जे वाटले होते ते कधी कुणासाठी वाटले नव्हते . आणि आता चक्क त्याच्यासाठी आपला नाव स्वतः सुलभा घेत आहे हे ऐकून तिला आश्चर्याबरोबर मनातून आनंद हि झाला . हि मनकवडी आहे अगदी माझी मैत्रीण .

पण कसे काय हिला असे वाटले कि कधी माझ्याकडून तसे काही दर्शवले गेले असेल. नाही नाही तसे तर नसेल कधी आदित्य विषयी आमचं बोलणं पण नाही झाला . कि कदाचित आदित्य ने आई ला काही सांगितले असेल . असे एक न अनेक हजारो विचारांनी एका वेळी जणू उसळी घेतली होती मनात . आणि हे सगळं अगदी इतक्या अचानक . मला कधी काही बोलली नाही सुलभा आणि आज अगदी आई समोर पत्रिका वगैरे मागत आहे . तेवढ्यात आदित्य चा चेहरा तिच्या मनात उमटला , एक क्षण तिने सुलभा कडे पहिले आणि हसून किंचित लाजून किरण आत निघून गेली .

आई ला हि जरा आश्चर्य च वाटले . पण आई ला हि पटकन काय बोलावे ते सुचेना . " हो हो , काही हरकत नाही . आमचा तर भाग्यच ! स्थळ स्वतः चालत आलं आमच्या किरणला . तिचे बाबा कालच अष्टविनायकाच्या यात्रेला गेलेत . गणपती बाप्पा च पावला म्हणायचा . बसा हं एक मिनिट मी आणते तिची पत्रिका . "

" हो हो " . सुलभा ला खूप आनंद झाला होता . आता फक्त अक्षदा टाकायच्या आणि किरण ला आपली सून म्हणून घरात आणायचे हेच तिच्या डोळ्यासमोर दिसत होते . " किरण , ए किरण " सुलभा ने हक मारली . तशी किरण बाहेर आली . दोघींना खूप खूप बोलायचं होतं एकमेकीशी . खूप काही . पण आता नेमकी सुरुवात कशी आणि कुठून करावी हेच दोघीनाही समजेना .

" उद्या नेहमीच्या ठिकाणी भेटशील ? " दोघींनी एका वेळी प्रश्न केला . आणि गालावर हसू उमटले . खूप काही स्वप्न ,इच्छा ,आकांक्षा ,आनंद घेऊन आलेलं ते हसू . तो आनंद दोघींनाही एकमेकीच्या डोळ्यात दिसला . आता न बोलताही सगळं काही बोलून गेले होते डोळे ,ते हसू . दोघींचं नातं होतं मनापासून मनापर्यंत . त्यात आता शब्दांचीही गरज राहिली नव्हती .
तेवढ्यात आई पत्रिका घेऊन बाहेर आली. पत्रिका घेऊन सुलभा निघाली . मागे वळून तिने दोघींना अच्छा केलं . आणि ती घरी गेली .
आई ने किरण कडे पाहिलं तेव्हा ती गालातल्या गालात किंचित हसत होती . " ह्म्म्म्म . काय मग " किरण एकदम भानावर आली , " काय , कुठे काय ? . "
" अशा अचानक कशा काय आल्या त्या पत्रिका मागायला ." आई ने जरा रागात विचारले . आई ला कसला नेमका राग आला होता ते किरण ला उमगेना .
" अं ? मला नाही माहित . कशा काय ते . " किरण ने दोन्ही खांदे उडवत म्हटले .

" माहित कसं नाही . हीच डाळ शिजत होती का इतके दिवस , तुमच्या मध्ये ? काही व्यंग वगैरे नाहीये न मुलामध्ये . उगीच नाहीत लोक मुलासाठी पत्रिका मागायला येत . " आई तिच्या नेहमीच्या स्वरात बोलली .

किरण ला आई च्या या बोलण्याचा मात्र प्रचंड राग आला होता . एक क्षणापूर्वी एक मनात सुखाची कळी उमलली होती ,ती , आईच्या या वाक्याने पुरती कोमेजून गेली . किरण ला काय उत्तर द्यावे ते कळेना .

" अगं आई , काय बोलतेस तू . तुला काय सगळं जगच वाईट दिसतं का आता . आणि सुलभा काकूंचं म्हणशील तर यापूर्वी आमच्यात असं काहीही बोलणं झालं नाहीये . मलाही आश्चर्य वाटलं त्यांनी पत्रिका मागितल्यावर . " आई ने आपल्या भावना यापूर्वी कधी समजून घेतल्या नव्हत्या तर आता काय घेणार,. तिला तर आईकडून ती कसली अपेक्षाच नव्हती . पण बाबा घरी आले कि सगळं सुरळीत होईल हि एक आशा होती .

"बाबा कधी येणारेत ?" किरण ने विचारले .
" मला नाही माहित , तूच विचार फोन करून . मला तर त्या माणसाशी बोलायचीही इच्छा नाहीये . तुझा लग्न एकदा कसंतरी पार पडलं कि मी मरायला मोकळी ." असं म्हणत आई आत निघून गेली .
किरण हताश होऊन खुर्चीत बसून राहिली . तिला आत्ता कसलाच विचार करायचा नव्हता . डोळे भरून एकदा तिने देवाचा फोटो पहिला आणि मनाशीच पुटपुटली ," किती परीक्षा पाहणार आहेस ……… कधी संपणारे हे सगळं . कधी काही सुख नाही मागितले तुझ्याकडे ,पण निदान दुख्ख तरी नको, चार लोकांमध्ये मान वर करून सुद्धा कधी चालता नाही आलं , सगळं सगळं दुख्ख अपमान गिळत राहिले . अजूनही तेच करतीये . पण कधी संपणारे हे सगळं .
का हे जीवन दिलंस . नकोय मला काही. काही नकोय मला . पण हो , आदित्य , हो आवडतो तो मला . आज मी माझ्या मनाला आणि तुला पण सांगू शकते कि हो आवडतो तो मला . मनातल्या मनात तरी मी ठाम पणे हे बोलू शकते .मला आता कशाची चिंता वा फिकीर नाही . या मनाला आता एक साथ आहे . जगण्याला तो एक आधार पुरेसा आहे आता . " डोळ्यातला थेंब पुसून किरणने आत जाऊन नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला सुरुवात केली .

दुसऱ्या दिवशी सकाळी किरण ने सुलभा ला फोन केला आणि आज भेटता येणार नाही असं कळवलं . मग सुलभा ने ही पुढच्या आठवड्यात भेटू असं सांगितलं . ५ दिवसातच दोघी भेटल्या . त्या दोघी आज खूप खुशीत होत्या . किती बोलू आणि किती नको असं झालं होतं त्यांना अगदी .

" ऐक ना , अग मला बी एड ला अडमिशन मिळाली . मी आज खूप खुश आहे . " किरण ने चहा घेत घेत सुलभा ला सांगितले .

"अरे वा . मस्तंच . मग आता तुम्ही मास्तर होणार तर ??" सुलभा हसत हसत चेष्टेने म्हणाली . " माझेही प्रमोशन होणारे !!!!"

" म्हणजे ??" किरण ने अशाचार्याने विचारले .
" अगं , मी आता मैत्रीण आहे काही दिवसांनी सासू होईल ना ?? मग …… " सुलभा ने मुद्दाम विषय काढला . आनंदात होती ती . " आज मी पण पत्रिका दोघांच्या गुरुजींकडे पाठवल्यात . एक दोन दिवसांत येइलच त्यांचा निरोप . मग काय तद डड्या ड्या ड ड्या .………। "
" अ काय ग ,,तू पण ना ! " किरण लाजून लाजून आता गुलाबी झाली होती . एका बाजूला आपलं घर परक्यासारखं ,आणि एका बाजूला हि आपली मैत्रीण एका वर्षापूर्वीची ओळख ,पण जणू जन्म जन्म आपली सखी असावी अशी . माझी सखी . आता जे काही वेगळं सासू सुनेचं नातं दोघींमध्ये निर्माण होईल असं दोघीनाही वाटत होतं . पण सध्या तरी त्या मैत्रिणी होत्या मुक्त विचारांच्या . सुलभा तिला चिडवत होती अगदी तिच्या वयाची होउन आणि किरण हि तो अनुभव घेत होती लाजण्या मुरडण्याचा . अगदी बेभान झाल्या होत्या दोघी त्या दिवशी गप्पांमध्ये . अधून मधून गाणही गुणगुणत होत्या . खूप धमाल केली त्यांनी त्या संध्याकाळी .

अचानक सुलभा गंभीर झाली आणि म्हणाली , " तुला एक सांगायचे होते किरण . " सुलभा कडे पाहून किरण पण एकदम गंभीर झाली ."काय झाले" काळजीने तिने सुलभा ला विचारले .
तशी एकदम हसत हसत सुलभा म्हणाली ," अग आदित्य चे बाकी मला माहित नाही , पण खांदे सरळ आहेत बर का , मिलिटरीवाल्यान्सारखे . ! " तिला हसू आवरेना , आणि किरण ला हि एकदम हसू फुटले ,

" तू पण न , एकदम गंभीर काय होतेस , पुढे काय बोलतेस , काहीही चाललंय तुझं . पण तरीही ह्म्म्म , अजून एक निरोप दे त्याला भेटायला येशील कधी तेव्हा मिलिटरी ची टोपी घालून ये म्हणावं ! " आणि दोघीही परत एकदा हसू लागल्या .

" ह्म्म्म्म ,चला . बस आता . निघूया . सुलभा आज खूप छान वाटलं भेटून . गप्पा मारून . खूप दिवसांनी भेटलो ना गं . आता बी एड चे अभ्यास, काम चालू होईल . कुठे परगावी पण जावे लागेल कदाचित . बघू काय काय होते ते . भविष्याचा विचार करायचा नाही . आत्ताचा क्षण आनंदाने जगायचा ,हेच ठरवलंय मी पण . तू सांगितलं ना अगदी तसं !! " किरण म्हणाली .

" thats like a good girl ! . ठीके चल भेटू लवकरच . मी ३-४ दिवसांत तुझ्या घरी फोने करेन . चल bye , तू हो पुढे मी भाजी आणायला जाणारे मग उशीर होईल मला घरी जायला . " सुलभा हात वर करत बाय म्हणाली आणि निघाली .
"ओके , बाय " म्हणत किरण नेही हात उंचावून बाय केले .

दोघीही परत नवी आशा घेऊन निघाल्या आपापल्या दिशेने …………………त्यांना काय माहित हि त्यांची शेवटची भेट होती ते !

क्रमश :

................फिझा.

कथा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

4 Feb 2015 - 6:18 am | स्पंदना

आज तीनही भाग वाचले.
सुंदर चालली आहे कथा.

पत्रिका जमणार नाही आणि लग्न मोडेन अशी शंका येतेय...

पदम's picture

4 Feb 2015 - 12:01 pm | पदम

मस्तच. पु.भा.प्र.

सुचेता's picture

4 Feb 2015 - 1:00 pm | सुचेता

उत्सुकता दाटले ली आहे, पु.भा.प्र.

पत्रिका जमणार नाही आणि लग्न मोडेन अशी शंका येतेय... +१
मलाही तसच वाटत आहे. पण ही शेवटची भेट अस का लिहिल असेल असही वाटल..

रेवती's picture

5 Feb 2015 - 4:49 am | रेवती

:)