मगिल भागः
पिंपळ (रहस्य कथा) - भाग १
पिंपळ (रहस्य कथा) - भाग २
पिंपळ (रहस्य कथा) - भाग ३
सुर्य मावळल्यावर नाथा आणि कुशा नदी शेजारच्या शेताच्या बांधावर बसले.
मागे गणपत ची चीता जळत होती. नाथा ने बिडी काढली आणि ती पेटवली.
विचार करत एक एक झुरका घेऊ लागला. कुशा चीतेकडे बघत होता तो नाथा शेजारी येउन बसला.
नाथा तुझ्या चुलत्यानं असं का केलं असलं रं. "का तू … ?" कुशाने शंका काढली.
"कुशा तुला वाटतं का मी असं काय … " बिडी तोंडाला लावली.
"नाही म्हणजे आपलं एक शंका म्हणून … तसं तू काय करणार न्हाय हे माहित हाये… "
२-३ झुरके मारून पहिली बिडी विझवली आणि दुसरी पेटवली.
पहिला झुरका मारत "आम्ही येवढा तरास दिला का रं … " नाथा भाऊक झाला. कुशाच्या हातात बिडी देत उठला.
डोकं धरून म्हणाला "च्यायला असं काही होईल वाटलं नव्हतं … काय बी झालं तरी काका होता रं तो माझा … "
"चल घरी चल… " खांद्यावर हात ठेवत कुशा म्हणाला …"
"काय रं येशा … नाथ्या न मारलं आसल का गणप्या ला … ?" चावडीवरच्या शेकोटीत लाकूड सरकवत जग्या म्हणाला
"काय सांगता येत न्हाय बा … तसं सर्किट च हाये त्ये …"
"तसं जर आसल ना तर लय अवघड होईल … रंगराव काय गप नाय बसणार " पाटील
"जो तो आपल्या कर्मानं मारतो " मास्तर लांबच्या दगडावर बिडी मारत बसले होते
"मास्तर … इकडं या कि … "
"नाही नको … इथवर येतीये उब … "
"एक सांगू का … ? त्या रात्री मी नवनाथ ला मधल्या रसत्याने पिंपळाकडे जाताना पहिले" मास्तर
सगळे चमकले
"म्हणजे… छ्या … नाथा असं करल ?" पाटील विचारमग्न झाले.
"आ … आणि तुम्ही काय करत होता इतक्या रात्री… ?"
"मी आपला बापुडा वाड्याच्या गच्चीत शतपाऊली करत होतो … "
"मास्तर तुम्ही दिवसा कुठं गायब असता आणि रातच्या टायमाला बरं फिरत असता … "
"अहो सरकारी नोकरी आहे … दिवसा झोपा काढणे हाच आमचा धंदा … " अस म्हणत "ह्या ह्या" करत हसले
"काय ओ मास्तर … शाळा कशी चाललीया… ?"
"अहो … मुलं वर्गात आली तर शाळा भरणार ना … "
"म्हंजी… कुणी बी नाय आलं… च्यामायला, येशा … उद्या एक एक प्वार पकडून शाळेत सोडायचं … काय "
"जी … "
शेकोटी विझून आता फक्त निघारे राहिले होते. त्या निखाऱ्यावर बराच वेळ शेक घेऊन मग एक एक करून पाय काढता घेत होते.
एव्हाना सगळे निघून गेले होते भटजी बुआ रात्री देवाच्या सोबतीला आले होते. ओसरी वर अंथरून टाकत त्यांनी बाहेरचा दिवा विझवला.
"ये रं दोस्ता … काय खबर … " बाहेरच्या झोपाळ्यात बसत पाटील म्हणाले
येशवंत आणि अन्ना पाटील तसं लहान पनीचे दोस्त. त्यांचे वडील अन आजे हे पण एकमेकांचे दोस्त. दोस्तीची हि तिसरी पिढी होती.
"ते … "
बस बस . "चा पाठवा बाहेर … "
"ते … रंगराव इकडच येतोय … "
"पाटील … हे बरं नाही केलं … आमचा माणूस मारून लय मोठी चूक केली हाये तुम्ही " गुर्मीत सरपंच पाटलाच्या वाड्यात घुसला.
बरोबर ३-४ पैलवान काठ्या घेऊन.
"बसा सरपंच … वाईच चा घ्या … अजून एक पेशल पाठवा बाहेर "
"बसायला टाईम न्हाय … हे लय लय लय महागात पडल…"
"अहो तरुण तडफदार सरपंच, देवपिंपळे … शांत घ्या … "
"गणपत ला नाथ्या नं न्हाय मारल … आर नाथ्या फकस्त तोंडाची हवा हाये हे सांगायला पायजे काय … आमच्यातल्या कुणी बी काय सुदिक केलं न्हाय"
"गणपत काय आमचा दुश्मन न्हवता आन अशा गोष्टी करून राजकारण करायची ह्या पाटील घराण्याची सवय न्हाय… ती खोड तुम्हाला हाये … सगळ्या गावाला माहित आहे … "
"तोंड सांभाळून … " सरपंच
"मी म्हणतो आमच्या लोकांवर आळ घेण्या साठी तुम्हीच कशावरून हे कारस्थान नाय केलं … "
सरपंच चे पैलवान पुढ झाले … सरपंचानी त्यांना हात करून अडवलं …
"तुम्ही म्हणता तसं जर नाथा बेकसूर आसल तर ठीक … "
"आरे हायेच …. गणपत नि स्वतः फास न्हाय घेतला कशा वरून ?"
"नाथाचा गुन्हा जर साबीत झाला तर त्याचे तुकडे तुकडे करून पिंपळाला टांगू … चला रं … "
पाटील जरा चिंतामग्न झाले.
रात्री परत शेकोटी पेटली. चावडीच्या पारा खाली.
"काय रं नाथा … तू रात्री म्हणे पिंपळाकड गेला होता …?" जग्या हात शेकत म्हणाला
"आं …. " नाथा चमकला
सगळ्यांची नजर चुकवून अंधारात मांजराच्या पावलांनी चव्हाण वाड्याच्या दिशेने निघाला. चव्हाण वाड्या जवळ पोचताच त्याने दिशा बदलली आणि मधल्या रसत्याने पिंपळाकड निघाला. खरं तर तो पार्वती ला भेटायला म्हणून गेला होता पण रम्भेच्या वाड्याच्या परसात जाताच पार्वती ऐवजी दुसरीच कुणी व्यक्ती तिथे होती.
"पार्वती … पिंपळाकडे गेली आहे."
जवळ जाऊन पहिल तर आप्पा मास्तर
"मी … मी … पार्वती ला भेटायला नाही आलो … " अडखळत नाथा म्हणाला
"हा हा … मला सगळं ठाऊक आहे… तिला मीच सुचवल कि इथे नका भेटत जाऊ… पिंपळाकडे जा … तिथे कुणीही व्यत्यय आणणार नाही … "
१-२ तासांनी तो घामाघूम होऊन परत आला आणि गुपचूप दाराला कडी लावत घरात गेला.
"काय विचारतोय मी … ?" जग्या
"आं … ते … जरा … पोट खराब होत" भानावर येत नाथा म्हणाला
"आता हा योगायोग म्हणायचा कि … हे बघ गड्या जर तसं काय आसल तर घडाघडा बोलून टाक मी हाये ना तुला वाचवायला " पाटील
"मी गणपत काकाला मारला न्हाय … " हातातली काठी जोरात आपटत नाथा पाय आपटत तरा तरा निघून गेला.
"जरा तंबाखू दे … " यशवंत जग्याला म्हणाला.
जग्यानी तंबाखू आणि चुन्याची डबी दिली.
"आयला जग्या चुन्याची डबी तर लय झाक हाय गड्या … " पितळीची चपटी डबी होती. तिच्या झाकणावर सुरेख नक्षीकाम होतं.
यशवंत तंबाकू मळू लागला.
"चला … शेकोटी विझवा … उद्या शेतावर जायचंय लौकर … "
सगळे उठले. रामराम करून आप आपल्या वाटेला निघून गेले.
"नाथा … हि जागा काय मला चांगली वाटत नाही … " पार्वती आणि नाथा रात्री पिंपळामागच्या शेतात बसले होते.
"मग अजून कुठ जाणार… तुझा बाप कधी पण चक्कर मारतो … आणि त्यो मास्तर … मला तर गडी लय हरामी वाटला … कधी माणसात मिसळत नाय…दिवसा कधी दिसत नाही आणि रात्री बरा टपकतो आणि त्या वाड्यात काय करत असतो काय माहित"
"नाथा … तु जरा जपूनच रहा … ते रंगराव आणि त्यांची माणसं चीढून हायेत तुझ्या वर … "
"हम्म … " नाथा विचारबद्ध झाला.
"काय विचार करतोयस … "
"तुला काय वाटतं पार्वते … काका नि खरंच फास लाऊन घेतला आसल कि कुणी घात पात … "
"आता मी काय सांगू … मला एवढंच कळतं कि तुझ्या जीवाला धोका आहे … "
काही तरी लक्षात येउन नाथा चमकला आणि ताडकन उठला
"मी घरी जातो … " तू पण निघ
"आर … काय झालं … नाथ्या … " नाथा तडक निघाला.
घरी आला. मारुती कुदळे परसात बाजावर पडला होता.
"बा … बा … " नाथा हलवून जागवु लागला …
"आं … नाथा … काय रे बाबा … असा घामाघूम का झालाय … "
"बा … तू आज पासून आत झोपत जा … बाहेर कुणी बी झोपायचं न्हाय … "
"आरे पण का … "
"तू ऐक माझ … "
"बर बर … " असं म्हणत पांघरून घेऊन दोघ आत गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जाग्यानं दुकान उघडला.
चौकडी तिथे जमा झाली. बबन वर्तमान पत्र वाचत होता.
"गड्या हो … गडया हो …
कृष्ण गडी आपुला
यमुना डोही बुडाला … " जग्या गुणगुणत होता
"काय जगन्नाथ शेठ आज एकदम रंगात आलाय … "
"आज बुधवार हाय गडया … विसरला का … देवा म्होरं भजान हाये"
"ते गोटेवाडी चं भजनी मंडळ बोलावलंय… आपली आवडती गवळण ऐकायला मिळणार गड्या … "
"त्या बुवाचा आवाज लय जबरदस्त आहे … "
"पेटीवर त्यो खालच्या आळीतला प्रकाश आसल … " बबन म्हणाला
"आणि तबल्यावर बबनशेठ … " जग्या म्हणाला
"कालिया डसेल कृष्णाला …
होईल विषबाधा हरीला …
गड्याहो गड्याहो … " जग्या परत गाऊ लागला
"ए मारत्या … इकडं ये … आरं ये कि … " चावडीवर बसलेला यशवंत म्हणाला
"आज रातच्याला भजान हाये गावात "
"मग … तू कवापासून भजनाला जायला लागला … "
"ऐक तर गड्या … लय दिवस झालं कार्यक्रम झाला नाही … म्हणून अण्णा पाटलान आपली सोय केली हाये "
"म्हणजे आज गंमत हाये म्हणायचं … " खुशीत येउन मारत्या म्हणाला
"ऐक … सगळी लोक जेऊन भजनाला आली … कि आपण आपलं भजान सुरु करायचं … "
"चंद्राबाई अक्कोलकर आणली हाये … बाई काय फटाका हाये म्हणून सांगू … "
पण एक अडचण हाये … जागा ठरवायचं काम माझ्या कड दिलंय… काम एकदम बिनबोभाट झालं पाहिजे …
माझं तर काय डोकं चालणा … तू सुचव कि …
"उम्म्म … रंभीच्या वाड्यात …. "
"येडा झाला का तू … तिकडं फिरकत बी न्हाय मी … माहित हाय ना … "
"आर … उगीच येड्या वाणी नको करू … त्याला काय होतंय … इतकी वर्ष झाली काही झालं का … "
"लोकांनी उगीच घाबरवून सोडलंय … बाकी काय न्हाय … "
"असं म्हणतोस … चल … चंद्रा बाई साठी हे बी करायला तयार हाये आपण … "
"बरं कोण कोण येणार हाये … "
"तू मी आणि पाटील … "
"ठरलं मग … "
दिवस कामं करण्यात कुठ निघून गेला कळलं देखील नाही.
संध्या काळी भजनाची तयारी सुरु झाली … भजनी मंडळी एव्हाना आली होती .
हळू हळू एक एक करून मंडळी जमा होऊ लागली.
एक बुवा मृदुंगाला लेप लावण्यात मग्न होते …
मधेच कुणी टाळ कुटत होतं …
"हरी जयजय राम … हरी जयजय राम …
हरी जयजय राम कृष्ण ह …. री " गजर झाला
पंचपदीला सुरुवात होताच इकडे रंभीच्या वाड्यात नर्तनाचा कार्यक्रम सुरु झाला.
दोन्ही कार्यक्रम इतके रंगले होते.
मंडळी तल्लीन होऊन भजन ऐकत होती तर इकडे मंडळी दारू पिउन चंद्रा च्या अदा पाहण्यात तल्लीन झाले होते.
खालच्या आळीतल्या प्रकाशने भैरवी गायला सुरुवात केली…
भैरवी अशी रंगली होती कि कुणाला कशाचेही भान राहिले नव्हते… सगळ्या गावात टाळ मृदंग घुमत होता …
दोन्ही कार्यक्रम संपले …
यशवंत वाड्याच्या परसात थांबला …
"चल कि रं … चढली काय तुला … "
"तुम्ही निघा म्होरं … मी जरा बिडी मारून येतो … " म्हणून तो थांबला
पाटील आणि मारुतीला जरा जास्तच झाली होती . एकमेकांचा आधार घेत दोघे घराकडे निघाले.
यशवंत ने बिडी पेटवली.
तोल जाऊ लागला म्हणून तो जवळच्या एका दगडावर बसला.
तेवढ्यात त्याला घुंगरांचा आवाज ऐकू आला …
"मागे वळून पाहिलं तर कुणी नव्हतं … "
चंद्रा आसल कि माझे कान अजून वाजतायेत असा भास त्याला झाला.
आता त्याला सगळ जग फिरायला लागलं होतं.
बिडी टाकून तो तसाच उठला. वाड्याच्या दरवाजा पर्यंत हेलकावे खात गेला.
"माझी काठी … काठी कुठंय … " हाताने दरवाजा चाचपडत पुटपुटला
काठी आणायला म्हणून तसाच माघारी फिरला आणि वाड्यात गेला.
जिथे कार्यक्रम रंगला होता त्या दिवानखाण्यात गेला"
संपूर्ण दिवाणखाना गोल गोल फिरत होता. तो एका जागी स्तब्ध उभा राहिला.
आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळला.
"बाबा … ओ बाबा … "
"काय आहे " बामण पार्वतीवर खेकसला
"ऐका ना … काल रात्री म्हणजे पहाटे पहाटे त्या वाड्यात ना … "
"कोणत्या वाड्यात … ?"
"अहो त्या … रंभी च्या वाड्यात … तिथ मला एक पुरुष आणि एक स्त्री दिसली … "
"उगीच काहीतरी बडबडू नकोस… भास झाला असेल तुला … "
"खरंच दिसले … ती स्त्री नर्तकी असावी … "
"कशावरून … "
"तिने पेहराव केला होता तसा … "
"आणि काय करत होते ते… "
"काही नाही बसले होते फक्त … मी लगेच दार लाऊन घेतला … "
"तुला किती वेळा सांगितला असं वेळी अवेळी कुठेही डोकावत जाऊ नकोस म्हणून … "
"जा चहा टाक मला … "
दिवस आता चांगलाच वर आला होता …
पाटील चावडीवर आले.
नाथा वाईच स्पेशल चाय टाक राव … डोकं लय जड झालाय … "
"होणारच … आमचा बा बी पडलाय कवाचा … "
"कोण पाटील … लौकर आलासा … "
"लौकर … लेका ११ वाजलेत … "
"आं … खरंच कि … "
"लय मजा आली पण काल … बाई लयच कडक होती राव … " मारुती हळू आवाजात बोलला
"आपले यशवंतराव नाही आले आजून … का चंद्रा बाईची स्वप्न बघतोय आजून … "
"ए बबन्या … इकड ये … तेवढं येशाला धाडून दे … नाही तर एक काम कर घेऊनच ये त्याला " पाटलांनी हुकुम सोडला
"राजसा … जवळी जरा बसा … " मारुती गुणगुणू लागला
थोड्या वेळानी बबन परत आला. पण तो एकटाच परत आला.
त्याला बघून पाटील म्हणाले "का रे … येश्या ला न्हाई आणला … "
"गेलो होतो … घरी न्हवतं … काल पासून आलंच न्हाय म्हणाले … "
"आं … हे बेणं तिथच झोपलं असणार … तरी म्हटला होतं एवढी घेऊ नको … चल उचलून आणू " दोघेही उठून रंभी च्या वाड्याकड गेले.
रसत्यात भटजी भेटले
"पाटील … एक कानावर घालायचं होतं … काल म्हणे रंभी
च्या वाड्यात एक बाई आणि एक पुरुष दिसले पार्वती ला … "
पाटील जरा चपापले
"भास झाला आसल तुझ्या पोरीला … भटजी बुआ तुमच्या पोरीला सांभाळा जरा … नाही तिथ लक्ष नको घालत जाऊ म्हनाव … "
दोघे वाड्यात घुसले
"येशा … ए येशा … "
दिवानखाण्यात गेले
दिवाणखान्यात पाहील तर तिथ पण नाही
"च्यायला हा गेला कुठ म्हणायचा … "
"पाटील … "बब्या न हाक मारली
"काय र बबन ? "
… पाटील … पिंपळ … " दम खात बब्या म्हणाला
"हं … बोल कि आता पुढ … येशा घावला का ? "
"पिंपळाच्या मागच्या शेतात … यशवंत पडलेला गावलाय … "
"काय ? " चकित होऊन पाटील, बबन आणि मारुती लगबगीने पिंपळाकडे गेले …
क्रमशः .................................................................................................... सु. वि. कामथे
प्रतिक्रिया
2 Nov 2014 - 9:52 am | बोका-ए-आझम
उत्कंठा चांगली वाढवली आहे. पुभाप्र!
2 Nov 2014 - 2:09 pm | सस्नेह
हापण भाग सह्हीच
2 Nov 2014 - 3:10 pm | पैसा
मस्त रंगवलाय प्लॉट!
3 Nov 2014 - 4:06 am | स्पंदना
भारीच हो!!
काय सुदिक सुदरना बघा!!
4 Nov 2014 - 9:57 am | असंका
अप्रतिम!
5 Nov 2014 - 7:16 pm | एस
त्येवडं वाईच सुद्धलेकनाचं आन् परिच्छेदाचं बगिटलं की वाचायजोगी व्हतीयं कथा. म्हंजी कुटं काय सुरू व्हायलंय आन् कुटं संपायलंय त्ये सोधन्यात इन्ट्रेष्टच संपून जात्योय बगा!
आन् पुभाप्र ह्येयेसांन. (हेवेसांनल चा अवतार.)
21 Nov 2014 - 9:21 pm | प्रणित
कधी येणार पुढिल भाग ?
23 Nov 2014 - 12:22 pm | असंका
दादा जरा मनावर घ्या की पुढच्या भागाचं...?
26 Nov 2014 - 4:52 pm | चेतन677
लवकरात लवकर पुढील भाग प्रकाशित करा....
27 Nov 2014 - 12:24 pm | कविता१९७८
चौथा भाग लवकर येउ द्या.