तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?

योगी९००'s picture
योगी९०० in जनातलं, मनातलं
21 Oct 2014 - 3:04 pm

तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?
हाच प्रश्न मला एकदा एका मॉलमध्ये कोणीतरी विचारला होता. अर्थात लगेच होकार दिला नाही. विचार करून सांगतो असे सांगितले.

साधारण वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. त्याचे असे झाले, एका घराजवळच्या मॉलमध्ये आमचे नेहमी जाणे व्ह्यायचे. बाहेर वेगवेगळ्या वस्तूंचे प्रमोशन चालायचे. त्यातल्या त्यात क्रेडीट कार्ड, क्लब हॉलिडेस यांनी तर फारच छळले होते. एकदा विकांताला सहकुटूंब तेथे हिंडत असताना अशीच एक गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची) आमच्या जवळ आली. उगाचच माझ्या मुलांचे कौतूक केले आणि मला म्हणाली. " फार छान फिचर्स आहेत हो तुमच्या मुलांचे, तुम्ही ह्यांना मॉडेलींग क्षेत्रात का आणत नाही?".

मी तिला तिथल्या तिथेच उडवून लावले. पण तिने मात्र नेटाने सांगितले " मी एका मोठ्या प्रॉडक्शन हॉऊस मध्ये कास्टींग मॅनेजर आहे. मॉलमध्ये हिंडत असताना सहज तुमच्या मुलांकडे लक्ष गेले आणि मला वाटले की हे दोघे फार छान मॉडेल्स होतील. आमचे बर्‍याच कंपन्यांबरोबर tie-ups आहेत. कपडे, बेबी प्रॉड्कट्स यांच्या साठी दुकानात वा टिव्हीवरील अ‍ॅड्स यासाठी आम्हाला मुलांची गरज भासते. तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?"

मी सुद्धा क्षणभर विचारात पडलो. अर्थात लगेच होकार दिला नाही. विचार करून सांगतो असे सांगितले. त्यावर तिने लगेच " आहो विचार काय करताय, येत्या गुरूवारी अंधेरीला ऑडीशन आहे." असे सांगून लगेच आपले व्हिजीटीग कार्ड आणि अंधेरीचा पत्ता दिला. नक्की या हं ...काही पैसे भरायला लागणार नाहीत हे ही सांगितले. जाता-जाता तिने हळूच माझ्या बायकोच्या कानात "तिथे जाऊन माझे कार्ड दाखवा म्हणजे तुम्हाला priority मिळेल" अशी टिप दिली. (यासाठी बरा माझ्या बायकोचा कान मिळाला....माझ्या कानाला काय भोकं पडली होती काय ...!!)

कोठ्ल्यातरी रॉयल प्रॉडक्शन हाऊसचे कार्ड होते. त्या कार्डावर त्या मुलीचे नाव, तिचे दोन-तीन मोबाईल नंबर, मागे काही कंपन्यांचा लोगो असे बरेच काही होते.

त्यानंतर दोन-तीन दिवस आमच्या घरी हीच चर्चा, काही नात्यातली/ओळखीतली उदाहरणे की जेथे पालक मुलांवर फार मेहनत घेतात, ते बघा आठवड्यातून तीन दिवस मुलांना डान्स क्लास, दोन वेळा स्विमिंग आणि दर शनीवार/रवीवारी न चुकता गाण्याच्या क्लासला नेतात असे डायरेक्ट रेफरन्सेस.... या मुळे माझी आणि माझ्या मिसेसची खात्रीच झाली की आपण आपल्या मुलांसाठी काहीच कष्ट घेत नाही. अनायसे संधी मिळाली आहे, कोणी स्वतः आपणहून आमंत्रण देत आहे, आपल्यालाही कोणासमोर तोंड वेंगाडायला लागत नाहीये व शिवाय फुकटही आहे, याशिवाय आणखी काय हवेय? असा विचार केला आणि गुरूवारी अंधेरीला जायचे पक्के केले. लगेचच त्या मुलीला समस पाठवून आमची जागा पक्की केली.

जायच्या आदल्या दिवशी मुलांसाठी छान छान ड्रेस खरेदी झाले. थोडेफार मेकपचे सामानही घेतले गेले. ऑडीशनला जायच्या दिवशी तर मी चक्क रजा टाकली आणि मुंबईच्या उकाड्याचा मुलांना त्रास होऊन मुलांचा मुड जायला नको म्हणून कार भाड्याने घेतली. मी स्वतः ठेवणीतला छान ड्रेस घातला...(उगाचच वाटले की माझ्याकडे पाहून ऑडीशनवाले एखादा छोटा-मोठा रोल मलाही देतील..). बरोबर संध्याकाळी ६ वाजता ऑडीशनच्या ठिकाणी पोचलो....

ऑडीशन अंधेरीतील एका मॉलमधील हॉलमध्ये होते. मॉलच्या बाहेर चौकशी केली असता "रॉयल प्रॉड्क्शन हाऊस (रॉप्रॉहा)" कोणालाच माहित नाही हे कळलं. थोडा संशय आला पण आता इतकी तयारी केलीय, आधीच का माघार घ्या हा विचार करून हॉलमध्ये घुसलो. आत आमच्या सारख्याच जवळ-जवळ ७०-८० पालकांची गर्दी होती. काहीजण तर कल्याण-डोंबीवली वरून आले होते. सुरुवातीला वाटले होते कि जास्तीत जास्त ५-१० पालक असतील पण तेथे तर सामुदायीक मेळावा भरला होता. प्रत्येक जण दुसर्‍यांच्या मुलांकडे पहात होते. काही पालक स्वत: मॉडेल असल्यासारखे आपल्या बेबी-बाबा ला कसे वागायचे, कविता कशी म्हणायची, कसे चालायचे अश्या सुचनांचा भडीमार करत होते. तसेच काही पालक आपण कोठल्या कोठल्या ऑडीशनन्सला आपल्या मुलांना घेऊन गेलो होतो, याला किंवा हीला कोठे कोठे चान्स मिळाला होता या पुड्या सोडत होते. हॉलमध्ये रॉप्रॉहा चा एक पडदा लावला होता. त्यावर काही चित्रपट्/जाहीरात्/सिरीयल्स यामध्ये काम करणार्‍या मुलांचे त्यांच्या पालकांबरोबर किंवा सलमान/आमिर यांच्या बरोबर फोटो होते. रॉप्रॉहा कडून चार-पाच तरूण/तरूणी पालकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. त्यांच्या उत्तरात त्या सिरियलमधील करण च्या रोल केलेला मुलगा आम्हीच सुचवला होता अशा प्रकारची वाक्ये होती. त्यामुळे योग्य ठिकाणी आलो आहोत असे वाटत होते. हॉलच्या कॉर्नरला चित्रपट शुट करतात तसा मोठा कॅमेरा टांगला होता. तेथे एक हिप्पींसारखे केस असणारा माणूस आणि त्याचा असिस्टंट उगाचच इकडे अँगल लाव, तिकडे लाईट मार असे काहीतरी करत होते. काही पालक मुद्दाम आपल्या मुलांना त्या कॅमेर्‍यासमोर नेत होते. (आम्ही सुद्धा नंतर तेच केले). एकंदरीत छान टाईमपास चालला होता. पण असाच एखादा तास गेल्यावर मात्र कंटाळा येऊ लागला.

आणखी काही वेळ असाच गेल्यावर एका रॉप्रॉहा तरूणीने माईक आपल्या ताब्यात घेतला. थोड्याच वेळात ऑडीशन सुरू होईल. आमचे कॅमेरामन सर्वांमधून हिंडतील आणि तुमच्या मुलांचे फोटो काढतील हे एकदम स्टाईलमध्ये ऐकवले. सर्व पालकांनी लगेच लगबगीने आपापल्या मुलांचा मेकप नीट केला. परत परत त्याच त्याच सुचना मुलांना दिल्या गेल्या. आमच्या हिने व बर्‍याच पालकांनी मुलांना खाणे भरवले. त्यांचा मुड भुकेने कळवळून बिघडू नये यासाठी थोडाफार चारा दिला गेला. अचानक त्या हॉलमध्ये दोन कॅमेरामन आणि त्यांच्या बरोबर दोन असिस्टंट प्रकटले. लगेच सगळ्या पालकांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. आम्हीपण त्या मुलीने दिलेले व्हिजीटींग कार्ड दाखवून नंबर लावायचा प्रयत्न केला पण अशाच प्रकारचे कार्डस सर्वच पालकांकडे होते हे लक्षात आले. एव्हाना काहीतरी 'उल्लू बनाविंग" असणार हे कळायला लागले होते. त्यामुळे आमचा उत्साह कमी कमी होत होता.

एक गोष्ट लक्षात आली की आत्ताप्रर्यंत आम्हाला कोणीच नाव किंवा नंबर विचारला नव्हता. त्यामुळे हा काय प्रकार आहे तेच कळत नव्हते. थोड्यावेळाने हीने एका कॅमेरामन ला पटवून मुलांचे चार-पाच फोटो काढून घेतले. त्या कॅमेरामनच्या असिस्टंटने मात्र आमची व्यवस्थित माहिती घेतली आणि वर तुम्ही ह्या मुलीच्या रेफरन्सने आलात काय? वा वा तिची नजर एकदम चांगली आहे असे म्हणून आमच्या मुलांना प्रशस्तीपत्रक दिले. त्यांना रिझल्ट केव्हा सांगणार असे विचारल्यावर तिने एकदम घाबरल्यासारखे करत "नाही..मला माहीत नाही...आत्ता आमचे विक्रमसर येणार आहेत ते रिझल्ट अनाउन्स करतील असे सांगितले". विक्रमसरांचे नाव घेताना त्या मुलीने जसे शिष्य गुरूचे नाव घेताना कानाला हात लावतात तसा काहीतरी प्रकार केला. त्यामुळे विक्रम नावाचा कोणीतरी या क्षेत्रातला जाणकार येथे येणार आहे अशी नवीन माहिती मिळाली आणि परत पुर्वीचा उत्साह आला.

यानंतर जवळ जवळ दीड तास विक्रम सर कधी येणार याकडे आमचे डोळे लागले होते. एव्हाना सर्वच पालकांना विक्रम सरांविषयी कळले होते. एका पालकाने तर विक्रमसर आत्ता यशराज बॅनर बरोबर मिटींगमध्ये आहेत आणि आदित्य चोप्राला काही कास्टींग मध्ये मदत हवी असल्याने त्यांनी विक्रमसरांना तेथे थांबवून घेतले आहे म्हणून उशीर होतोय अशी माहीती रॉप्रॉहा च्या स्टाफकडून काढली. दुसर्‍या कोणाला तर विक्रमसरांची जग्वार गाडी कोठल्यातरी टेम्पोला घासली गेल्याने त्यांना उशीर होतोय अशीही माहिती मिळाली. अशा विविध गोष्टी विक्रमसरांविषयी कळायला लागल्याने परत आमचा उत्साह मावळू लागला होता. एव्हाना रात्रीचे ९.३० वाजले होते आणि आम्हाला ही भुका लागल्या होत्या.

थोड्याच वेळात परत गलका झाला आणि विक्रमसर आले हो अशी माहिती मिळाली. परत पालकांनी आपापल्या मुलांचे मेकप नीट केले. काहींनी तर मुलांचे कपडे पण बदलले. विक्रमसर आल्यावर तर काही पालकांनी लगेच त्यांच्या भोवती गराडा घातला. मी पण हळूच विक्रमसरांचा चेहरा पाहून घेतला. पस्तीशीचा उंच असा माणूस होता पण एकदम छपर्‍या वाटत होता. साधारण नदीम-श्रवण मधील नदीम सारखा चेहरा होता त्यामुळे थोडाफार रागीट वाटत होता. दाढी आणि केस पुर्णपणे रंगवून घेतले होते. डोळ्यात सुरमा घातला होता आणि एकदम स्टाईल मारत होता. विक्रमसर( सर?) चा छपरेपणा पाहून माझा होता नव्हता तो मुड पण गेला. लगेच रॉप्रॉहाच्या लोकांनी आम्हाला बाजुला केले आणि एक अनाउनन्स्मेंट केली की आता सर्व मुलांनी लावलेल्या गाण्यावर नाच करावा. विक्रमसर स्वत: मुलांना निवडणार आहेत. त्याबरोबर एक मोठा गोंधळ उडाला आणि बर्‍याच पालकांनी आपापल्या मुलांना तेथील स्टेजवर नाचायला लावले. आम्ही व आमच्या सारखे उत्साह संपलेले काही पालक शांतपणे मुलांना कडेवर घेऊन तो गोंधळ पहात होते. विक्रमसर पण एकदम स्टाईलमध्ये मधेच स्टेजवर जाऊन एखादी गिरकी घेऊन यायचे. मध्येच कोणा नाच करणार्‍या मुलाबरोबर काहीतरी बोलून आपल्या असिस्टंटच्या कानात काहीतरी मोठे सिक्रेट सांगायचा आव आणायचे. काही पालक आपल्या मुलांचे कौतूक आणि त्यांचे स्किल्स विक्रमसरांना सांगायचे. विक्रमसर पण लगेच परत आपल्या असिस्टंटला काहीतरी नोंद करायला लावायचे. असा गोंधळ आणखी अर्धा पावूण तास चालू होता. जवळ जवळ सव्वा-दहा वाजले होते आणि पोटातले कावळे काव काव करून कावले होते.

अजूनही ह्या लोकांचा गेम प्लॅन काय आहे हेच समजत नव्हते. इतका हॉल व त्याचे भाडे, सजावट हा खर्च करण्यामागे नक्की उद्देश समजत नव्हता. हळूहळू नाचणार्‍या मुलांच्या पालकांचा उत्साह कमी झाला आणि एक-एक मुल स्टेजवरून उतरायला लागले. सर्वजण आता रिझल्ट सांगा, कोणाला सिलेक्ट केले ते सांगा. मग रॉप्रॉहाच्या एका तरूणीने माईकवरुन अनाउन्स केले की विक्रमसरांनी काही मुले निवडली आहेत आणि त्यांच्या पालकांना फोन/समस करून कळवू. आता आमच्या लक्षात येत नव्हते की फक्त चार-पाच फोटो आणि थोडाफार नाच या जोरावर कसे काय सिलेक्ट केले. यावर आम्ही काही पालकांबरोबर चर्चा केली आणि त्यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते. जास्त डोके न लावता सरळ आम्ही तेथून निघालो आणि वाटेत जेवण करून घरी पोहोचलो. निघता निघता मात्र तीन-चार पालकांचे नंबर आम्ही घेऊन ठेवले होते.

दोन दिवसांनी आमच्या मोबाईलवर मेसेज धडकला. आमच्या मुलांचे ऑडीशन मध्ये सिलेक्शन झाले म्हणून...काहीतरी काळंबेरं आहे याची खात्रीच होती. लगेच ज्या पालकांचे नंबर घेतले त्यांना फोन करून विचारले असता त्यांनाही तसाच मेसेज आल्याचे समजले. नंतर ज्यांनी आम्हाला सिलेक्शनचा मेसेज पाठवला त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की तुमच्या मुलांचे सिलेक्शन झाले आहे. आम्हाला त्यांचा आता पोर्टफोलियो बनवायचा आहे. तो पोर्टफोलियो आम्ही विविध कंपन्यामध्ये पाठवू आणि तुमच्यासाठी मॉडेलींग असाईनमेंटन्स मिळवण्याचा प्रयत्न करू. पोर्टफोलियो तुम्हाला आमच्या कडूनच बनवून घ्यावा लागेल आणि साधारण खर्च ५० ते ६० हजार येईल.

हे सगळे ऐकल्यावर त्यांचा प्लान लक्षात आला. पोर्टफोलीयो बनवायच्या धंदा करण्यासाठी हा सगळा खटाटोप होता. त्यानंतर त्यांनी निदान १०-१२ वेळा फोन केला पण आम्हीच काही पुढे लक्ष घातले नाही. जवळ-जवळ दोन महिन्यांनी दुसर्‍या एका मॉल मध्ये असाच एक माणूस आम्हाला भेटला आणि आमच्या मुलांचा कौतूक सोहळा संपवून मला त्याने विचारले..
"तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?"
.
.
.
.
.
.
मी काय उत्तर दिले असेल ते सांगायची गरज आहे ????

कलाअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Oct 2014 - 3:13 pm | मदनबाण

बापरे !
बाकी मॉल मधे गेल्यावर चुकुन सुद्धा कोणत्याही व्यक्तीला आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळवु नये ! तुमच्या नंबरची निवड होउन तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे फोन यायला सुरुवात होइल,असा एकदा अनुभव मी घेतला आहे, फोन करणार्‍या स्त्रीला फ्री गिफ्ट आहे ना ? असे ३दा विचारुन घेतले. मग फ्री आहे तर घरी पाठवुन द्या, पत्ता देतो असं म्हंटल्या नंतर फोन यायचे बंद झाले. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

+१...मला असा अनुभव अंधेरीच्या शॉपर स्टॉप मध्ये आला होता.

बाई ऐकालाच तयार नाही म्हणे अमूकअमूक ठिकाणी गिफ्ट घ्यायला या. मी म्हटलं की मला वेळ नाही आणि जमत असेल तर ते गिफ्ट मला शॉपर स्टॉप मध्येच द्या तर म्हणे शॉपर स्टॉप चा व आमचा काही सबंध नाही. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की हे प्रकरण काही वेगळंच आहे व बाईचे फोन घ्यायचं बंद करून टाकलं.

भिंगरी's picture

21 Oct 2014 - 11:07 pm | भिंगरी

असेच केले होते.

सौंदाळा's picture

21 Oct 2014 - 3:22 pm | सौंदाळा

जबर्‍या
लिहिण्याची शैली खुप आवडली. प्रसंग आणि पात्रे डोळ्यासमोर उभी राहिली.

एस's picture

21 Oct 2014 - 3:25 pm | एस

काय अनुभव आहे!

जेपी's picture

21 Oct 2014 - 3:34 pm | जेपी

+1

ह्यांचे एकच काम असते... समोरच्याचे फाजील कौतुक करून आपली तुंबडी भरणे.... बरेच पालक सुद्धा आपल्या बाब्याचं/ बाबीचं कोणीतरी कौतुक करतय म्हणून पाघळतात आणि ह्यात अडकतात.

तुमचे सुटल्याबद्दल अभिनंदन !

योगी९००'s picture

21 Oct 2014 - 5:23 pm | योगी९००

बरेच पालक सुद्धा आपल्या बाब्याचं/ बाबीचं कोणीतरी कौतुक करतय म्हणून पाघळतात आणि ह्यात अडकतात.

बरोबर आहे. आम्ही पण अडकतच होतो. वेळीच सावरलं..

च्यायला डेंजर प्रकरण आहे. पब्लिक पैसा कमवायला काय काय आयडीया शोधून काढतील काही नेम नाही.

सूड's picture

21 Oct 2014 - 3:53 pm | सूड

छान लिहीलंय !!

बापरे.. भलतंच स्कॅम दिसतंय हे.. सर्वांपुढे आणल्याबद्दल थॅंक्स..

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2014 - 4:09 pm | टवाळ कार्टा

गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची) आमच्या जवळ आली.

मग तीच्याशीच बोलत बसायचे ना ;)

योगी९००'s picture

21 Oct 2014 - 5:24 pm | योगी९००

मी तिच्याशीच बोलत होतो. पण तिने कानगोष्टी माझ्या बायकोबरोबर केल्या....

कपिलमुनी's picture

21 Oct 2014 - 4:29 pm | कपिलमुनी

गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची)

कुठला ..कुठला हो मॉल ( टायपो होउन 'माल' झाला होता .. वेळेवर सुधारला )

काळा पहाड's picture

21 Oct 2014 - 4:57 pm | काळा पहाड

हो ना एवितेवी कुठून तरी खरेदी करायचीच.. तिथून करू..

वेल्लाभट's picture

21 Oct 2014 - 5:12 pm | वेल्लाभट

गिफ्ट लागणे = चेन मार्केटिंग चा बकरा म्हणून तुम्हाला नामांकन मिळणे

फाट्ट्यावर मारायचं अशांना.

सगळ्याच पालकांसाठी खूप उपयोगी लेख आहे हा..असा प्रकारही चालतो हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद..

बोका-ए-आझम's picture

21 Oct 2014 - 6:03 pm | बोका-ए-आझम

नायजेरियन मेल स्कॅम आणि तुम्ही वर्णन केलेला प्रसंग यात भरपूर साम्य आहे. ते अॅक्टिंग स्कूलवालेही अशीच गाजरं दाखवतात. रिअॅलिटी शो तर फिक्स्ड असतातच आणि तरीही लोक फसतात.खरोखर, ' झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! '

ज्ञानव's picture

21 Oct 2014 - 6:32 pm | ज्ञानव

उपयुक्त लेख पण काही "माठ " असतात पालक नसतात त्यांचे काय?
आम्ही तुमच्यासाठी किती करतो आणि किती केले हा व्यवहार शिकवणारे पालक म्हणावेत का?
की तुम्हाला काय हवय ? हा प्रश्न विचारणारे पालक असतात ?

जाऊ देत च्यामारी अंधेरीला कुठे पूर्व / पश्चिम?

योगी९००'s picture

22 Oct 2014 - 10:08 am | योगी९००

मॉल अंधेरी पश्चिमेला होता...

अविनाशकुलकर्णी's picture

21 Oct 2014 - 6:37 pm | अविनाशकुलकर्णी

नाहि

चाणक्य's picture

29 Oct 2014 - 12:43 pm | चाणक्य

प्रतिसाद

काय आगाऊपणा आहे या लोकांचा! आजकाल पालकांनाही मुलांना कुठे ना कुठे झळकवायला आवडतं याचा गैरफायदा घेतात मेले! बरं झालं सांगितलत! उग्गीच तुम्हाला मनस्ताप आणि नव्या कपड्यांचा खर्च! आजकाल भारतात कपड्यांच्या किमती दर्जाच्या मानाने कै च्या कै आहेत असे वाटते. बरेच कपडे अंग झाकण्ञाऐवजी दाखावणारेच असतात! दर थोडे दिवसांनी उंची वाढत असताना काय करायचेत तीन तीन हजाराचे कपडे?

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2014 - 9:34 pm | श्रीगुरुजी

मस्त लेख!

मला साधारणपणे अशाच स्वरूपाचा पण एका वेगळ्या संदर्भात वाईट अनुभव आला होता. मी त्या अनुभवावर एक सविस्तर लेख लिहिला होता. तुमचा अनुभव माझ्या अनुभवाचीच आठवण झाली.

श्रीगुरूजी..
तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत...!! बर्‍याच दिवसांत लोकांच्या अनुभवांवर काही वाचले नाही.

जानु's picture

21 Oct 2014 - 10:51 pm | जानु

मला सुध्दा असा फोन आला की माझ्या मुलीला शाळेत झालेल्या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस मिळणार आहे. व कार्यक्रम रवीवारी आहे. करलो दुनिया वाल्या कडुन. मी म्हटले बक्षीस द्यायचे तर शाळेत द्या ना. वेगळा कार्यक्रम कशाला? आणि त्यांची अट होती की पती व पत्नी यांनी एकत्रच यावे. बयेला कोपरापासुन .........

दशानन's picture

21 Oct 2014 - 10:59 pm | दशानन

हर गल्ली कोई खड़ा है..
शायद चोर हो.. शायद हमसफर हो..

उत्तर दर वेळी वेगळे असेल.

योगी९००'s picture

22 Oct 2014 - 8:53 am | योगी९००

सर्वांचे आभार...

आता हे सर्व स्कॅम होते की नाही ते माहित नाही पण पोर्टफोलियो बनवण्यासाठी रचलेला बनाव होता हे खरे. काय माहित कदाचित यातून कोणाला मॉडेलिंग क्षेत्रात संधी सुद्धा मिळत असतील.

वाईट या गोष्टीचे वाटले की आम्ही सुद्दा तेथे असलेल्या इतर पालकांप्रमाणे बर्‍यापैकी वाहवत गेलो आणि आमच्या अपेक्षा मुलांवर लादायचा प्रयत्न केला. कदाचित मुले मोठी झाल्यावर आम्ही तुमच्या साठी हे केले असे दाखवावे हे कदाचित आमच्या मनात आले असावे. पण वेळीच सावरलो ते बरे. कधी कधी मॉब मेन्टालिटी मध्ये असे घडते.

बाकी विक्रमसर आणि रॉप्रॉहा यांनी किती कमावले ते माहित नाही. पण आठवड्याला सरासरी ५० असे महिन्याला २०० पालकांमधून निदान १० जरी तयार झाले तरी त्यांचा ५-६ लाखाचा धंदा होत असावा.

सुचिता१'s picture

19 Oct 2019 - 8:46 am | सुचिता१

प्रत्येक पालकाला आपले मुल जगातले सर्वात सुंदर मुल वाटते. या साध्या गोष्टी चा असा वापर करतात लोकं. पण तुम्ही तुमचा अनुभव मांडुन, मागच्या पालकांना शाहीर केले. धन्यवाद!!

बॅटमॅन's picture

22 Oct 2014 - 1:15 pm | बॅटमॅन

काय फालतूपणा आहे च्यायला. अलीकडे खुळ्या पालकांची कमतरता नाही (अगोदर होती की नाही ते माहिती नाही) म्हणून चु* बनवतात झालं. फटके दिले पाहिजेत.

..तस्मात कुंभार हो.. काय समजलास बेंबट्या ???

;)

बॅटमॅन's picture

22 Oct 2014 - 1:55 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 1:53 pm | टवाळ कार्टा

खूळे पालक सगळ्या काळांत सारख्याच प्रमाणात असतील...खुळेपणाची कारणे वेगळी असतील

बॅटमॅन's picture

22 Oct 2014 - 1:55 pm | बॅटमॅन

सहमत. तूर्तास मात्र होमोजिनायझेशनमुळे ही संख्या वाढलीये असे वाट्टे. असो.

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 2:10 pm | टवाळ कार्टा

होमोजिनायझेशनमुळे

म्हन्जे काय ता कायच कल्ला नय

बॅटमॅन's picture

22 Oct 2014 - 2:20 pm | बॅटमॅन

म्ह. एकाच प्रकारच्या मानसिकतेमुळे असे अभिप्रेत होते. सर्वजण एकाच पद्धतीने विचार करू पाहताहेत अलीकडे. तीच ती स्पर्धा, अन तोच तो प्रसिद्धीचा हव्यास.

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 2:30 pm | टवाळ कार्टा

ओह्ह...त्या होमो मुळे काय झमजलेच नाही ना :(

साती's picture

22 Oct 2014 - 3:32 pm | साती

हा एक नवाच स्कॅम दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

अत्रन्गि पाउस's picture

23 Oct 2014 - 8:47 am | अत्रन्गि पाउस

हे असे कुणालाही सर वगैरे म्हणायला लावणारे असतात ...च्या मारी ती व्यक्ती तुमची सर असेल आमच्यासाठी 'श्री विक्रम'आहेत ...
बाकी हे चालू देत ..
There is no free meal in this world हे एकदा लक्षात ठेवले कि असे अनुभव टाळता येतात

योगी९००'s picture

27 Oct 2014 - 5:17 pm | योगी९००

There is no free meal in this world हे एकदम पटेश...पण यासाठी हे सर्व भोगावे लागले. ज्या पालकांनी पोर्टफोलीयो बनवला आणि त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त भोगावे लागले...

बाकी विक्रमसर एकदम डोक्यात गेला होता. तो येण्याआधी त्याची खूप हवा झाली होती. आदित्य चोप्रा बरोबर याची मिटींग काय? जग्वार गाडी काय? तो आल्यावर मात्र एकदम कोणी मोठा माणूस किंवा celebrity यावा तसा दबदबा निर्माण झाला होता. सर्व पालकांना याच्यासमोर आपल्या मुलांना present करण्याची घाई झाली होती. या माणसाच्या जॅग्वार गाडीला minor accident झाला म्हणून लेट होतोय असे कोणीतरी सांगितले होते. त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे साधी दुचाकी असेल असे सुद्धा वाटत नव्हते.

माझीही शॅम्पेन's picture

23 Oct 2014 - 2:03 pm | माझीही शॅम्पेन

एकदम छान डिटिलवार लेख ......

अशीही शो-ऑफ करणारी लोक डोक्यात जातात

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 1:53 am | तुमचा अभिषेक

मस्त खुसखुशीत लिहीलेय :)
आणि हो, धन्यवाद, अश्या प्रकारचा फ्रॉड दाखवून दिल्याबद्दल.

मलाही सध्या वाशीच्या एका मॉलमधून सतत फोन येत राहतो. लकी नंबर वगैरे. गिफ्ट घ्यायला या. गिफ्ट काय तर म्हणे कुठल्याश्या रिसॉर्टला हॉलिडे पॅकेज. अर्थातच कन्सेशन दिल्याचे दाखवत चुना लावायचे धंदे असणार. नाही वेळ, नाही जमणार स्पष्ट पण विनम्रपणे सांगितले तरी येऊन तर जा येऊन तर जा ची रट दर शुक्रवारी लावत असतात. दुर्दैवाने मला विनम्रता सोडता येत नाही, खडसावून सांगितले तर काम बनावे..

ऋषिकेश's picture

27 Oct 2014 - 11:17 am | ऋषिकेश

आधी शीर्षकावरून "पार्टनर" आठवले. :)
बाकी आमच्या पाल्याला आम्हाला काहीच "बनवायचे" नसल्याने - ते पाल्यच काय बनायचे आहे ते बनेल - अशांचे आमच्यावर काही चालु शकणार नाही या विचारांनी सुखावलो.

प्रसाद१९७१'s picture

29 Oct 2014 - 1:53 pm | प्रसाद१९७१

मला तर ह्या गंडा घालणार्‍या लोकांचे कौतुक वाटते. अशक्य वाटणार्‍या स्कीम लोकांच्या गळी उतरवणे सोप्पे नाही.

आणि ते कोणावर जबरदस्ती पण करत नाहीत.