सर्व प्रतिसाद दात्या मिपाकारांन कोटीकोटी धन्यवाद. माननीय संपादकांनी आरंभीच इशारा देऊन संभाव्य धोक्याची हवाच काढून टाकली. आपली दर्दभरी कहाणी सांगून लोकांना मानसिकरीत्या छळणे आणि काहीतरी आर्थिक मदत मिळवणे हा माझा उद्देश नव्हताच मुळात.
या लेख मालेत माझ्यावर हा प्रसंग का ओढवला, त्यात माझ्या चुका, नशिबाचा भाग ह्याची पूर्ण पार्श्वभूमी, सद्यस्थिती आणि भविष्यातली वाटचाल लिहिणार आहे. त्याचबरोबर सर्व मिपाकर मंडळींनी जो उस्फुर्त आणि भरभरून प्रतिसाद व सल्ले दिले, काही प्रश्न टाकले त्याबद्दल पण लिहिणार आहे.
असा अनुभव आहे कि ज्या गोष्टी डोक्याचा भुगा करतात त्यांचा भुगा करून विचार केल्यास प्रश्न सुटतात किंवा निदान त्या प्रश्नाची खरी औकात कळते. म्हणून वेळ काढून हे लिहायचे. जेणेकरून सर्वांनाच सगळी उत्तरे मिळतील, मला, मिपाकरांना आणि भविष्यात सारख्याच परिस्थितीत अडकू शकणाऱ्या अभागी लोकांना.
आज ज्या स्थिती मध्ये मी आहे तसा अगदी पहिल्यांदाच सापडलो. खिश्यात एक रुपया नसताना सुद्धा दिवस काढले. पण कुणाची कर्जे डोक्यावर नव्हती. त्यामुळे देणेकरी काय असतात त्यांची काय मानसिकता असते, त्यांना कसे हाताळायचे याचे काहीच अनुभव नव्हते. मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे देणेकरी मागे लागणे म्हणजे स्वाभिमानास ठेच लागणे वैगेरे विचार येत होते.
कुठेसं वाचलेले आठवते, योगायोग हा भ्रम आहे. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कार्यकारण भाव असतोच. द्रष्टे भविष्याचा अदमास भूतकाळाचे निरीक्षण आणि वर्तमानाचे भान ठेऊन करतात. दोघांचेही तारतम्य सुटले कि माणूस तोंडावर आपटतो.
लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले. यशाचा वारू चौखूर उधळत होता. मनात तीव्र इच्छा धरली आणि ते झाले नाही असे कधीच घडले नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणजे संदीप डांगे असे समीकरण एके काळी होते.
असा स्वभाव असला कि काय होते याचा अनुभव आला. अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही. ती झाली नाहीतर काय करायचे याचा काही विचार केला नसल्याने प्रचंड गोंधळ आणि मानसिक त्रास. बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची. हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो. पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव". मी तिला म्हणायचो असे जर असेल तर जगण्याला काय अर्थ आहे. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार. शेवटच्या क्षणापर्यंत आपण आयुष्य प्लान नाही करू शकत. माझे आणि तिचे सगळेच बरोबर नसले तरी काही गोष्टी शाश्वत असतात.
साधारण गेल्या ४ वर्षापासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. पहिला मुलगा झाला तेव्हापासून मी फार हळवा आणि सेफगेम खेळणारा झालो. मुलाची जबाबदारी अंगावर पडल्यावर फारच घाबरट झालो असे म्हटल्यास हरकत नाही. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या तत्वांना कठोरपणे पाळणारा जर मवाळ झालो. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली. कुणास ठाऊक कसा पण स्वतावरचा विश्वास फारच कमी झाला.
त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने. तिथूनच आमच्या विचित्र मानसिकतेची सुरुवात झाली. सोन्यासारखा संसार कायम राहू शकत नाही. आपल्या हातात काहीच नाही. सगळे सुरळीत आणि छान छान असताना अचानक वाईट घडू शकत. आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव.
भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. तोच मुलाखतींमधून दिसू लागला. त्यामुळे लायकी मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या संधी असूनही आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता.
म्हणून एक कमी महत्वाची कमी पगाराची नोकरी दोन वर्ष केली. पण तिथेही सारखा पगार उशिरा म्हणजे २ महिने उशिरा व्हायला लागला. त्यादरम्यान बर्याच उलथापालथी झाल्या. नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण न्यूनगंड आडवा येत होता.
असाच मुलाला खेळताना बघत होतो. त्याच्या भाजण्याच्या अपघातातून फार लौकर त्याने बरे होण्याची किमया साधली. तो पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. दिवसभर त्याचे तेच पडणे, उठणे परत पडणे, उठणे सुरु असायचे. शंभरदा पडला तरी बेट्या स्वताच्या पायावर उभे राहायचेच हि जिद्द काही सोडत नव्हता. त्याला बघून अचानक पेटलो. म्हटले यार हा केवढासा आहे तरी अथक प्रयत्न करत आहे. आपल्याला काय धाड भरली आहे म्हणून ह्या कंपनीच्या तुकड्यांवर जगायचे तेही फडतूस पगाराची वाट बघत.
सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले. पुढच्या ९ महिन्याचा खर्च भागवाण्यासाठी ते पुरेसे होते. माझ्या कामाच्या दर्जावर खुश असणाऱ्या लोकांना भेटलो, त्यांना काम देण्यासाठी, ओळखी देण्यासाठी सांगितले. साधारण नोकरी सोडल्याच्या ३ महिन्याने पहिले काम मिळाले. नंतर कामाचा ओघ लागला आणि पगाराच्या दुप्पट कमाई सुरु झाली तेही नोकरीच्या अर्ध्या वेळेमध्ये.
पण त्या आधी तीन फटके बसलेच. नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले.
जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली. नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले. परत दिवस फिरले. मे, जून जुलै ऑगस्ट अक्षरश: कोरडे गेले. घरखर्च निघत नव्हता. नाशिक त्यामनाने फार स्वस्त होते. म्हणून नाशिक ला शिफ्ट झालो. माझे सर्व ग्राहक मुंबईत असल्याने व सगळा कारभार इंटरनेट वरून चालत असल्याने त्यांना मी कुठे राहतो याने काही फरक पडत नव्हता. नाशिक मध्ये व्यवसाय वाढवणे हा उद्देश नव्हता कारण नाशिककराना माझे चार्जेस डोक्यावरून जातात. अश्या रीतीने खर्च कमी करून कमाई वाढवण्याचा निर्णय घेतला.
तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता. नाशिकची होतकरू आणि हुशार मुले ठेऊन मुंबईची कामे करायची असा एक विचार यामागे होता. सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती. सर्व तयारी चालू होती. एक चांगले ऑफिस बघून मुलाखती सुरु केल्या. पार्टनर एक मोठा बिल्डर होता. त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला. हि माणसे मला नोकरासारखी वागवण्याचा प्रयत्न करत होती. माझा आणि पार्टनर चा संपर्क होऊ दिला जात नव्हता. मी पण मालक असल्याने ह्या लोकांच्या फाट्यावर मारत होतो. त्या लोकांनी माझ्याविरुध्द भडकावणे सुरु केले. ऑफिस सुरु करण्यासाठीचा पैसा त्यांच्याकडून आलाच नाही. त्यांच्या भरवश्यावर मी इकडे नेमणूक प्रमाणपत्र दिलेली. सर्वोच्च मूर्खपणा म्हणजे ह्या पार्टनरशिप ची कुठेही लेखी नोंद नव्हती. कुठलाही करार नव्हता. ऑफिस सुरु करण्याचा घाई मध्ये हे काय नंतर होतच राहील असा विचार नडला. ऑफिस रेंट साठी मालकाचा तगादा सुरु झाला. त्याला माझा भरवसा येत नव्हता. कारण आम्ही फक्त टोकन देऊन ताबा घेतला होता.
मी आणि बायकोने ऑफिस सोडायचा निर्णय जवळ जवळ घेतला होता. माझ्या स्वताच्या कामात आमचे नीट चालले होते. पार्टनरशिप सुरु व्हायच्या आत संपली.
एकेदिवशी वडील ऑफिस बघायला आले. तोपर्यंत मी त्यांना कहीही सांगितले नवते. कारण मी करतो त्या प्रत्येक त्यांचा मनोमन विरोध असतो. तो एक वेगळाच विषय आहे. पण ऑफिस बघून त्यांना आनंद झाला. ते पार्टनरशिप करण्याबद्दल रागावले. म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद) त्यांची तयारी ६ लाख देण्याची होती. मी म्हटले सुरुवात करायला मला एवढेच लागणार आहेत. स्वताची काहीही बचत नव्हती. माझ्या प्लानिंग नुसार मला सुरुवात करायला फक्त रक्कम लागणार होती. उपलब्ध काम आणि ग्राहक यानुसार योग्य तो परतावा मिळायला काहीच त्रास नव्हता.
वडिलांनी २ लाख दिले. त्याचे कॉम्पुटर घेतले आणि पहिले भाडे दिले. महिन्याचा खर्च (त्यात घरखर्च) सगळे धरून १ लाख होता. उपलब्ध स्र्तोतानुसार हा खर्च व्यवस्थित निघत होता.
आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले. तू मला न विचारता ऑफिस का सुरु केले. ऐपत नव्हती तर कशाला एवढा डोलारा उभा करायचा. या वयात तू आम्हाला पैसे द्यायचे तर आम्हालाच अजून मागतो आहेस, तू घरीच बैस मी तुला पोसतो, वगेरे वैगेरे. हा माझ्यासाठी परत एक मोठा धक्का होता. कबूल केलेला पैसा तर नाहीच वरून अनपेक्षित टोमणे. पुढच्या ६ महिन्याचा खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न यामुळे उभा राहिला.
नशिबाने परत एकदा चांगली साथ दिली. नोव्हेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत खर्च भागेल एवढी कमाई होत होती.
ज्यामुळे आजचा दिवस आला त्या घटना मार्च ते जुलै या ५ महिन्यात घडल्या.
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते. १० लेबल चे ग्राफिक आणि प्रिंटींग चे काम होते प्रिंटींग चे काम मोठ्या प्रमाणात होते. त्यातून येणार फायदा भरपूर होता. म्हणजे ग्राफिक चे काम एकदा झाले कि दर महिन्याला प्रिंटींग वर कमिशन मिळणार होते. पण ते लोक फारच विचित्र निघाले. १० लेबल साठी २ महिने पूर्ण गेले. या काळात दुसरे काही काम करू शकलो नाही कारण ते लोक सकाळ पासून रात्री पर्यंत बसून राहायचे. माझ्या नेहमीच्या कार्यपद्धती पेक्षा वेगळाच घडत होते. आणि भविष्यात मिळणाऱ्या रग्गड कमाई साठी हि गुंतवणूकच आहे असे समजत गेलो. पण त्यांचे अंतर्गत काहीतरी बिनसले आणि सुमारे १० लाख अपेक्षित असलेला हा ग्राहक स्वताच कोलमडला. त्यांची कंपनी बंद पडली. केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या वेळेत तुमचे इम्प्लोयी काय करत होते तर ती हि एक गम्मत आहे.
खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे.
मी ६ महिन्यात ६ डिझायनर बदलले. अपेक्षेप्रमाणे कुणीच भेटले नाही. पण पगार सगळ्यांनी मात्र वाजवून घेतला. नोकरदारांच्या बाबतीत असे म्हणावसे वाटते कि हे लोक फक्त पगाराच्या तारखे कडे बघून दिवस ढकलायचे. उत्पादकता, कामाविषयी निष्ठा, बहुतेकवेळा त्यांनी दिवसभर केलेली कामे बघून मला चीड यायची, तीच कामे मला रात्री बसून पूर्ण करावी लागत. माझ्या ग्राहकांना माझ्या दर्जाची सवय झालेली. यांना कितीही समजावले तरी काही फरक पडत नव्हता.
मार्च मध्ये आलेले ब्रेक इवन परत लयाला गेले. शेवटी मी ऑफिस बंद करायचे ठरवले. जून मध्ये ऑफिस बंद केले.
बायको गर्भवती होती. तिला ६ व्या महिन्यात placenta previa हा प्रोब्लेम झाला. डॉक्टर ने कधीही काहीही होऊ शकते असे सांगितले. म्हणजे रक्तस्त्राव सुरु झाल्यास दवाखान्यात जायला पण मिळणार नाही अशी परिस्थिती होती. टायमबॉम्ब ची टिकटिक सुरु झाली. आठवा संपे पर्यंत कसे तरी वेळ काढा, बेडरेस्ट घ्या असे सांगितले. बाळाचे वजन २ किलो झाल्याशिवाय काढता येणार नाही असे सांगितले. तश्यातच नाळ त्याच्या गळ्याभोवती लपेटलेली. पण वजनामुळे काढू शकत नव्हते.
आठवा महिना लागला आणि नियोजित सोनोग्राफी मध्ये असे लक्षात आले कि वार फाटली आहे. जेव्हा reports डॉक्टरांना दाखवले त्यांनी ताबडतोब superspeciality हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला सांगितले. कारण परिस्थिती हातघाईची होती. काहीही होण्याची शक्यता होती. बाळाचे योग्य वजन हीच एक जमेची बाजू होती. डॉक्टर फक्त बाळाच्या जन्माकडेच लक्ष देतात असे माझे निरीक्षण आहे. खरेखोटे काही वेगळे असू शकते.
हॉस्पिटल आणि इतर घरखर्च अडीच लाख पर्यंत गेला. हातात फक्त एका नातेवाईकाचे अडीच लाख होते, तेही नशिबाने त्या वेळेस होते. जे मला त्यांना जून मधेच परत करायचे होते. पण त्यातून हॉस्पिटल बिल दिले.
बाळाचा जन्म सुखरूप झाला आणि या सर्व काळात मी काम करू शकलो नव्हतो. त्याकाळात ज्या ग्राहकाचे काम अश्या कठीण प्रसंगी रात्र दिवस एक करून केले त्याने पद्धतशीर टांग दिली. इतरही छोट्या मोठ्या ग्राहकांचे पैसे अडकले, नियोजित कामे पुढे गेली, अश्या पद्धतीने सगळे गळ्याशी आले. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यात खात्रीने यायचे ५ लाख आलेच नाहीत. हेच पाच लाख फार महागात पडत आहेत.
ज्या दोघांचे मिळून साडेचार लाख द्यायचे आहेत, त्यांची हालत खरच खराब झाली आहे, म्हणून ते प्रचंड मागे लागले माझ्यावर विश्वास वैगेरे ह्या गोष्टींसाठी त्यांना खरोखरच वेळ नाही हे मला स्वताला माहिती आहे. मी जर हे पैसे दिले नाहीत तर त्यांच्यावर जीव द्यायची पाळी येईल हे मला त्यांनी न सांगता माहिती आहे. त्यामुळेच ते जीव खाउन मागे लागले आहेत.
एकूणच चक्र असे फसले आहे. हि परिस्थिती भयानक आहे. दोघांपैकी एकानेही मला आयुष्यभर विचारले नसते हेही मला माहिती आहे. कारण मी बुडवणार नाही याची त्यांना हि खात्री आहे. पण त्यांना जेंव्हा गरज आहे तेंव्हा त्यांनी कुठे जावे हा प्रश्न माझा जीव खातो आहे आणि त्यांचाही.
माझ्या अक्षम्य चुका. (स्वताचे दोष शोधणे आणि मान्य करणे आवश्यक आहे.)
१. कागदपत्रे बनवण्याचा प्रचंड कंटाळा.
२. लग्न होऊन ५ वर्षे झाली तरी अजून लग्नाचे प्रमाणपत्र बनवले नाही
३. ल. प्र. नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही
४. माझा विमा आहे पण मला काही धाड भरली नाही
५. मागील ३ वर्षात घरात ४ मोठी operations झाली
६. शुन्य आर्थिक नियोजन
७. सगळ्यांवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणे
एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना माझा बॉस मला बोलला होता "तुझा पगार १ हजार जरी असेल तरी ITR बनवणे आवश्यक आहे" तू असा बेफिकीर राहू नको.
आज त्याची किमत कळली. कारण ITR असते तर २५ लाखांचे बिझनेस लोन विनातारण ७ वर्षासाठी मिळाले असते. हे सगळे त्रास नसते झाले. असो. जर तर ला काही अर्थ नसतो.
सद्यस्थिती काय आहे आणि मी काय ठरवले आहे हे पुढील भागात सांगतो.
प्रतिक्रिया
21 Sep 2014 - 3:10 pm | भिंगरी
निदान स्वत:च्या चुका कळल्या हेही नसे थोडके.
यातुनच चांगला मार्ग मिळेल.
21 Sep 2014 - 3:11 pm | गुळाचा गणपती
संदीप, आपण अगदी मनमोकळ्या शब्दात तुमची परिस्थिती जशीच्या तशी मांडल्याने अक्षरशः अंगावर काटा आला. आपल्या झालेल्या चुका मोठ्या मनाने मान्य करणे, इतरांसमोर मांडणे ह्याला खूप धैर्य लागते. पुढील भाग लवकर वाचायला मिळावा.
21 Sep 2014 - 3:44 pm | धन्या
तुमच्या त्या धाग्यावर मी काही लिहिले नाही. कारण अशा प्रसंगात काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचे हे मलाही कळत नाही. बाकी मिपाकरांनी तुम्हाला चांगले सल्ले दिले. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्हाला याक्षणी आवश्यक असणारा भावनिक आधार दिला. मनात असाही प्रश्न उभा राहीला होता की संदीपनी हे सारे मिपावर सांगणे म्हणजे चौकात उभे राहून बोलण्यासारखे नाही का. मात्र असा आधार मिळवणे ही तुमची आताची गरज आहे.
त्या धाग्यावर काहींनी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही तुम्ही विचार करावा. ते लोक अशा प्रसंगांमध्ये काय बोलावं याविषयी प्रशिक्षित असतात. अशाच नसल्या तरी अंतिम निष्कर्ष असाच निघणार्या अशा दहा प्रकारच्या परिस्थीतीतून जाणार्या लोकांना त्यांना धीर दिलेला असतो. असो.
तुमचा हा लेख वाचणार्या प्रत्येकाला काही ना काही या लेखातून शिकण्यासारखं आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात. तसा हा तुमचा लेख अनेकांना मार्गदर्शक ठरेल.
21 Sep 2014 - 3:59 pm | संजय क्षीरसागर
फक्त एकच गोष्ट माणसाला सार्या आयुष्यात आणि कोणत्याही प्रसंगात तारु शकते ती म्हणजे प्रामाणिकपणा! जर तुम्ही कुणाला फसवलं नसेल तर दैवाचे फासे कसेही पडोत, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. मग आत्महत्त्येचा विचारच मनला शिवत नाही कारण आपण स्वतःशी एकनिष्ठ असतो. असा एकसंध माणूस स्वतःला कशाला संपवेल?
फक्त एकच गोष्ट सांगतो, पैसा माझा व्यावसाय आहे आणि जितके कफल्लक मी पाहिलेत त्यांची एकच कहाणी आहे, त्यांना मोह नडलायं. कुणावर कधी काय प्रसंग येईल (जसा तुझ्या पत्नीचा placenta previa, किंवा अपघात), आणि काय आपत्ती ओढवेल ते सांगता येत नाही. पण जबरदस्त आर्थिक फटका बसण्याचं नेमकं कारण मोह हेच आहे.
असो, तुझा बायोडेटा माझ्या पर्सनल मेल आयडीवर पाठव, नाशिकला माझा एक प्रथितयश मित्र आहे त्याच्याशी बोलतो. त्यानं जर मनावर घेतलं तर तो तुझं आयुष्य बदलून टाकेल.
21 Sep 2014 - 4:13 pm | पाषाणभेद
३. लग्नाचे प्रमाणपत्र नाही म्हणून कुटुंबाचा वैद्यकीय विमा नाही
हे कळाले नाही. माझ्या मते जॉईंट विमा पॉलीसी किंवा मेडीक्लेमलाही असला प्रश्न उपस्थीत होत नाही.
बाकी आपल्या पुढील आयुष्याला शुभेच्छा.
21 Sep 2014 - 5:04 pm | संदीप डांगे
खरच ह्या गोष्टींबद्दल फार गैरसमज आणि शंका आहेत. ह्यात काही सांगू शकाल का?
21 Sep 2014 - 5:44 pm | पाषाणभेद
भाऊ जॉईंट विमा पॉलीसी (हजबंड अँन्ड वाईफ) किंवा मेडीक्लेमलाही (पुर्ण कुटूंब) यासाठी मॅरीज सर्टीफीकीट लागत नाही. पॅन कार्ड चालते. फक्त जॉईंट विमा पॉलीसी काढतांना सौ.चे माहेरचे डिटेल्स द्यावे लागतात.
(म्या पन नाशकात र्हातो. आयटी आन बाकीच्या सगळ्याच क्षेत्रात नाशकात चांगला नोकरवर्ग मिळू शकतो. आपल्याला चांगला नोकर मिळू शकले नाहीत हा दुर्दैवाचा भाग असावा. आपल्या लिखाणात तसा उल्लेख आल्याने इतरांचा नाशिकमधील नोकरवर्गाबाबात गैरसमज होवू नये म्हणून असे लिहीत आहे.
नाशिकमधील नोकरवर्गाबाबत इतर शहरवासीयांनी गैरसमज करू नये. उडदामाजी काळेगोरे सगळीकडेच असतात. नाशिकबाबात दुराग्रह बाळगू नये.
जय नाशिक.)
21 Sep 2014 - 6:39 pm | संदीप डांगे
मला वाटतं नाशिककर नोकरदारांना मी कुठेही जनरलाइज केलेलं नाही. संपूर्ण परिच्छेद पुन्हा वाचावा. माझ्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत एवढेच म्हटले आहे. आता यात किती तरी अर्थ निघू शकतात जसे कि माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. घाई घाई मध्ये मुलाखती नीट झाल्या नसतील, त्यांना मला नक्की काय हवे हे समजले नसेल, मुंबई नाशिक च्या संस्कृतीत मुलभूत फरक तो आहेच, निदान मला तरी जाणवला. नाशिककर नोकरदारांना सरसकट दोषी अजिबात धरलेले नाही. मुळात नाशिक ला शिफ्ट होण्याचा व ऑफिस सुरु करण्याचा निर्णय घेण्यामागे हि तुम्ही सांगितलेली आणि ऐकून असलेली कीर्ती होती. नशिबाचे फासे उलटे पडले त्यात कोण काय करणार?
21 Sep 2014 - 4:37 pm | कानडाऊ योगेशु
संदीपभाऊ तुम्हाला तुमच्या प्रामाणिक पणाबद्दल अनेक सलाम.!
हे सर्व वाचल्यावर एक गोष्ट मात्र कळुन आली. तुम्हाला काम मिळते आहे आणि तुमची कामे करण्याची क्षमता अजुनही अबाधित आहे + मार्केटमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाला मागणी आहे आणि हीच फार महत्वाची गोष्ट आहे. विचार करा जे स्किलसेट तुमच्याकडे आहेत त्यांचीच जर मार्केटमध्ये आवश्यकता उरली नसती तर आलेला प्रसंग हा फार भयानक असला असता.थोडक्यात एका दिवसातच तुम्ही Obsolete होऊ शकला असता.एकुण परिस्थितीला असलेली ही एक चंदेरी किनारच आहे. ह्या गोष्टीवर विचार अवश्य करावा.
21 Sep 2014 - 5:45 pm | पैसा
प्रांजळपणे तुमची आत्मकथा इथे शेअर केल्याबद्दल अभिनंदन तसेच धन्यवाद! संपादक मंदळाने इशारा दिला त्याला पूर्वीचे काही अनुभव कारण आहेत. तुमची हकीकत खरी असली तरी मिपाच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत हीच अधिकृत भूमिका आहे त्यामुळे असा इशारा देणे भाग होते.
इथे अनेकांनी तुम्हाला नोकरीसाठी हात देऊ केला आहे. त्याबद्दलही लवकर निर्णय घ्या. स्वतःच्या चुका तुम्हाला कळत आहेत, याचाच अर्थ त्यांचे पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी दिसते. २/३ वेळा तुम्ही थोडीफार माघार घेऊन परत जम बसवला आहे असं दिसतं. जरी धंदाच नेटाने करायचा असेल तरी सध्या घर, सोनेनाणे, धंद्यासाठी आवश्यक मशिनरी फर्निचर जे काही असेल ते, यावर तारण कर्ज कोणत्याही बँकेकडून मिळू शकेल.
धंद्यासाठी भांडवली आणि चालू असे दोन प्रकारचे खर्च असतात, त्यासाठी दीर्घ मुदतीची कर्ज आणि कॅश क्रेडिट असे २ प्रकारची कर्ज आवश्यक असतात. पैकी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दर महिना थोडे थोडे करून भराय्चे असाते. तर कॅश क्रेडिट रोजच्या खर्चासाठी लागते. मात्र तुम्ही ओणत्याही बँकेचे कर्ज न घेता सगळी खाजगी कर्जं घेतलीत, (अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न भरले नव्हते हे कारण आहे) त्यामुळेच आजची परिस्थिती आली आहे. आता आधीची रिटर्न्स भरायला गेलात तर बहुधा टॅक्स्+दंड भरावा लागेल. पण रिटर्न्स भरत नाही तोपर्यंत बँक कर्ज मिळणे अशक्य आहे.
महिना एक लाख उत्पन्न असताना रिटर्न्स भरणे आवश्यक होते असे वाटते. निदान यापुढे तरी हिशेब व्यवस्थित ठेवत जा ही विनंती. आणि हे कर्ज आज ना उद्या फिटेलच, पण यापुढे अशी खाजगी कर्जे अगदी जवळच्या नातेवाईकांचीही घेऊ नका. आत्ता या क्षणी पत्नीचे दागिने, गाडी जे असेल ते डिस्पोज ऑफ करून बर्याच कर्जातून मोकळे होता येईल असे वाटते. तुम्ही एवढे प्रांजलपणे लिहिले आहे म्हणूनच हे सर्व लिहीत आहे. तुम्हाला दुखवायचा हेतू नाही. तुमच्या हातात कला आहे, तर या परिस्थितीतून नक्की बाहेर पडाल.
21 Sep 2014 - 7:17 pm | संदीप डांगे
पुढची वाटचाल लिहितोच आहे. दरम्यान दोन दिवसात बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. सविस्तर कळवतोच
21 Sep 2014 - 6:23 pm | प्रभाकर पेठकर
तुमचे अनुभव वाचून एव्हढे लक्षात आले की खुपशा गोष्टी, तुम्ही सुद्धा, परिस्थितीचे विश्लेषण करून, स्विकारल्या आहेतच.
मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः
लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा स्वभाव आधीपासूनच होता. जे जे पाहिजे ते ते हट्टाने कष्ट करून मिळवले.
हा स्वभाव वाईट नाही. मात्र स्वतःचे मुल्यमापन स्वतःच सतत करत राहावे लागते. इतरांच्या सांगण्यावर लगेच अम्मल नाही केला तरी इतरांचे नक्कीच ऐकून घ्यावे. मनातल्या मनात त्यावर स्वतःशीच प्रामाणिक चर्चा करावी आणि आपला बंदा रुपया खणखणीत आहे की नाही हे सतत तपासत राहावे.
अमुक एक गोष्ट होणारच असे मनात धरले कि ती झाली नाहीतर काय हा विचार केलाच नाही.
नकारात्मक घटनेचा आधी विचार करून ठेवावा. 'प्लॅन बी' नेहमी तयार ठेवावा. धाडसीपणे पुढे टाकलेले पाऊल गरज भासल्यास मागे घेण्यात कसालाच कमीपणा नसतो. तो व्यवहार आहे. धंद्यात भावनेपेक्षा व्यवहार अधिक महत्वाचा असतो.
बायको नेहमी सांगायची जे हातात आहे त्याचा विचार करूनच नियोजन करायचे आश्वासन द्यायची.
बायकोचे (किंवा कुणाचेही) ऐकायचे की नाही हे ती (बायको किंवा दूसरी व्यक्ती) किती व्यवहारी आहे आणि मनाने विचार करणारी आहे की बुद्धीने ह्यावर अवलंबून असते. बायकोचे सर्वच ऐकणारे आणि कांहीच न ऐकणारे दोघेही खड्ड्यात जाऊ शकतात. त्यामुळे काय ऐकायचे काय नाही हे अनुभवावरून ठरवावे.
हे पैसे येतील. तिथून काम येईल ह्या बेभरवश्यच्या नियोजनाला काही अर्थ नसतो.
हे बाकी खरं आहे. तुमच्या सौंनी योग्य तोच सल्ला दिला आहे.
पण तिचे कधी ऐकले नाही. कारण मागचे "अनुभव".
मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता आणि हा इगोच दुसर्यांच्या सल्यांवर विचारही करायला परवानगी देत नाही.
हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार.
सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. असे वागणे धंद्यातच काय पण रोजच्या जीवनातही टाळलेच पाहिजे.
त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली.
रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही. आंधळी रिस्क घेण्याने माणूस खड्ड्यात जातो किंवा भिंतीवर आपटतो. धंद्यात जोखिम उचलताना नुसते डोळेच नाही तर कान आणि मन सुद्धा उघडे ठेवावे. तसेच जोखीमीची तीव्रता (इंटेन्सिटी) तपासून बाजी उलटल्यास होणार्या नुकसानाबरोबर तोलून पाहावे. ते नुकसान क्षुल्लक किंवा कमी पातळीचे असेल तरच जोखिम उचलावी, मध्यम किंवा उच्च पातळीचे असेल तर उचलू नये. (जोरदार सेटबॅक बसू शकतो).
त्यातच मुलगा ५ महिन्याचा असताना अंगावर गरम दुध सांडून ५०% भाजला. त्याचे शरीर भाजले आणि आमच्या दोघांची मने.
फार दुर्दैवी घटना. अशा घटनांवर आपलं कांही नियंत्रण नसतं. विमा असता तर फारात फार आर्थिक बाजूची काळजी घेतली गेली असती पण आपल्या पोटच्या मुलाला होणार्या यातना आपल्या मनाचे, आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतो. त्यात तुमचा कांही दोष नाही. हा नशिबाचा/दुर्दैवाचा भाग आहे.
आमचा संसार दृष्ट लागण्यासार्खाच आहे. त्यामुळे आपल्या सोबत काही चांगले होईल तर त्याचीच भीती वाटू लागली. कारण त्या चांगल्याला कुणाची तरी नजर हमखास लागतेच लागते असा वाईट अनुभव.
स्वतःचा व्यवसाय करा किंवा नका करू पण ह्या मानसिकतेतुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडा.
भन्नाट आत्मविश्वास ते शुन्य आत्मविश्वास असा प्रवास फार झपाट्याने झाला. ..... आपण हे करू शकणार नाही असा न्यूनगंड आला. तो बराच काळ होता.
'भन्नाट आत्मविश्वास' ह्यात स्वकर्तृत्त्वाचा भाग किती आणि नशिबाचा भाग किती हे तपासून पाहावे. खुप वेळा आपल्या नशिबाने (यशासाठी लागणार्या इतर सर्व बाबी आयत्याच जुळून येणे) मिळालेल्या यशालाच आपण आपलं कर्तृत्व समजतो. कित्येकदा ज्याला आपण आत्मविश्वास समजतो तो आपल्या मनावरचा सोनेरी मुलामा असतो. कांही कारणाने तो मुलामा खरवडला गेला तर आपल्याला समजतं आपण सुद्धा आतून, मुळात, इतरांसारखेच आहोत. किंचिंत घाबरट आणि mediocreच आहोत. ह्याचा स्विकार करणं बरंच कठीण जातं. पण लवकरात लवकर हे सत्य स्विकारल्याने पुढील वाटचाल सुरक्षित होते.
सरळ राजीनामा दिला. त्या आधी एक २ लाखाचे लोन घेतले.
दूसरा मार्ग स्पष्ट दिसण्याआधीच, लांबचा असला तरी सुरक्षित असा मुख्य रस्ता सोडून, काट्याकुट्यांच्या जंगलात (दोन लाखांचे कर्ज) शॉर्ट्कट सापडेल ह्या आशेने नविन वाट शोधण्यात शहाणपणा नाही.
नोकरी सोडल्यावर दुसर्याच महिन्यात बायकोची एक आणि मुलाची एक अश्या दोन शस्त्रक्रिया यात बराच खर्च झाला. त्याच्या दुसर्या महिन्यात गाडीचा एक क्षुल्लक अपघात होऊन त्यात ४० हजार खर्च झाले.
विम्याचे महत्व लक्षात आले असेलच.
जी गंगाजळी ९ महिन्यासाठी प्लान केली होती ती ३ महिन्यात साफ झाली.
आजारपणं, अपघात ह्यांचा विचारच न केल्याने ९ महिन्यांचे प्लानिंग केले. ९ महिन्यांना पुरेल इतकेच पैसे जवळ असताना ३ महिन्यांचेच प्लानिंग करायला पाहिजे. अर्थात, असे सल्ले नंतर देणं सोपं असतं. तरीपण ह्या अनुभवाचा भविष्यात उपयोग करून घ्यायला पाहिजे होता.
नशिबाने पुढे साथ दिली आणि कामाचा ओघ सुरु झाला. एप्रिल २०१२ ते एप्रिल २०१३ फारच मजेत गेले.
एव्हढे नकारात्मक अनुभव आल्यानंतर जे कांही पैसे हाती आले त्यात 'फार मजा' न करता भविष्यासाठी विमा किंवा इतर काय तजविज केली?
तेंव्हा एका ग्राहकाने पार्टनरशिप चा प्रस्ताव ठेवला. त्याचे पैसे आणि माझी मेहनत व ज्ञान असा तो एकंदर मामला होता.
मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेंव्हा मला एका गुजराथी व्यावसायिकाने सल्ला दिला होता. लहानात लहान धंद्याने सुरुवात कर पण स्वतःचा कर. पार्टनर घेऊ नकोस. सख्ख्या भावालाही, मार्केट दरापेक्षा जास्त दराने पगार देऊन मॅनेजर म्हणून ठेव, पण पार्टनर करून घेऊ नकोस. पार्टनरशिप वाईटच असते असे नाही पण ती सांभाळायला अंगात जास्त हुशारी आणि व्यवसायाचा अनुभव असावा लागतो. पार्टनरशिप यशस्वी झाल्यास 'माझ्यामुळे' आणि नुकसान झाल्यास 'त्याच्यामुळे' अशी दोन्ही भागिदारांची भूमिका असते. दोन्ही परिस्थितीत संवेदनशील व्यक्तीच्या वाट्यास मनःस्तापाव्यतिरिक्त कांही येत नाही.
सुमारे १० ते १५ लाख गुंतवणूक होती.
ह्या भांडवलात तुमची जमा पुंजी किती होती आणि कर्ज किती होते? जर सर्व गुंतवणूक भागिदार करणार असेल तर तो सतत तुमच्यावर दबाब ठेवणार ह्याची कल्पना असायला हवी होती. एव्हढी रक्कम गुंतविणारा भागिदार स्वस्थ बसून आपल्याला आपल्या मर्जी नुसार धंदा करू देईल असं समजणं हा भाबडेपणा आहे.
पार्टनर एक मोठा बिल्डर होता.
भागिदार कितीही पैसे गुंतवित असला तरी तो आपल्या तोलामोलाचा असावा. आपल्याला डोईजड होईल असा नसावा. आर्थिकदृष्ट्याही नाही, सामाजिकदृष्ट्याही नाही आणि मसलपॉवरच्या दृष्टीनेही नाही.
त्याने त्याची काही माणसे ह्या सगळ्यावर देखरेख व संयोजना साठी दिली. ईथेच घात झाला.
वर म्हंटल्याप्रमाणेच, जो १५ लाख गुंतवितो तो स्वस्थ बसणार नाही. तुमच्या प्रत्येक हालचालीवर 'लक्ष' ठेवेल आणि तुम्ही किती वेळा श्वास घेतला आणि सोडला ह्यावरही 'लक्ष' ठेवेल. तुमचे स्वातंत्र्य संपुष्टात येते.
म्हणाले मी तुला पैसे देतो. बुडाले तरी हरकत नाही. (हा आशीर्वाद असल्यावर धंदा चालेल तर काय बिशाद)
देणार्याने असे म्हंटले तरी 'घेणार्याने' हे कर्ज आहे आणि आपल्याला हे लवकरात लवकर फेडून आपला हात दगडाखालून मोकळा करून घ्यायचा आहे हे कधीच विसरता कामा नये. तुमचा ह्या मदतीकडे बघायचा दृष्टीकोनच चुकीचा आहे.
आता शब्द बदलायची बाबांची वेळ होती. त्यांनी पुढचे पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. वरून माझीच खरडपट्टी काढायला लागले.
बाबांनीही पैसे दिले होते तेंव्हा त्यांचेही लक्ष असणारच तुमच्या व्यवसायावर. तुमचं व्यवसाय करणं (किंवा वागणं) जर बेदरकार असेल तर त्यांनाही व्यवसायाच्या यशाबद्दल साशंकता वाटणारच. त्यामुळे २ लाखांवर पाणी सोडून बाकीचे पैसे वाचविण्याचा त्यांनी पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. शिवाय तुमची तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी, त्यातील खाचाखोचा माहित असल्याने आणि व्यावसायिकतेची ओढ असल्याने त्या दोन लाखाच्या सुरक्षिततेकडे किंवा परताव्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोण आणि तुमच्या वडिलांचा (वरील सर्व गुणांच्या अभावामुळे) दृष्टीकोण ह्यात फरक हा असणारच. त्यातून हे घडले असावे. शिवाय पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे.
एक ग्राहक खूप काम घेऊन आला. नवीन होता त्यामुळे मला काही अंदाज येत नव्हता. नाशिकचा होता आणि नाशिकच्या घ्रहाकांचा मला काहीच अनुभव नव्हता. भविष्यात भरपूर काम येईल या आशेने( हि आशा त्यानेच लावली) आणि प्रथमदर्शनी त्यात काही चूकही नव्हते.
पुन्हा तुमच्या सौंचा सल्ला स्विकारला असतात तर अशा बेभरवशाच्या अनोळखी ग्राहकाकडून येणार्या पैशावर विसंबून राहिला नसतात. आपण ग्राहक असताना विक्रेत्याच्या आणि विक्रेता असताना ग्राहकांच्या 'गोडगोड' बोलण्याला फसायचं नसतं. माझ्याकडेही गिर्हाईके येतात. ५-६ माणसांचे जेवण हवे असते. किती खर्च येईल सांगितल्यावर घासघिस सुरु होते. मी शांत राहतो. मग ते हुकमी एक्का बाहेर काढतात अमुक अमुक फंक्शन ३०० माणसं जेवायला येणार आहे. तुम्हालाच ऑर्डर देऊ वगैरे वगैरे आश्वासनं देतात. मी सांगतो 'ह्या ऑर्डरचा हा रेट आहे. ती ऑर्डर येईल तेंव्हा 'त्या' ऑर्डरवर नक्कीच डिस्काउंट देईन.' असो.
केलेल्या कामाचे पैसे मिळाले, पण ते दिलेल्या वेळेच्या प्रमाणात नव्हते.
चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून किंवा 'अमुल्य' अनुभवाची फी असे समजून सोडून द्यायचे. पुढे चलायचे.
खेदाने असे म्हणावे लागेल, धंदा बुडायला चांगले डिझायनर न मिळणे हे एक मोठे कारण आहे.
डिझायनरला निवडताना नीट पारखून 'ट्रेड टेस्ट' घेऊन निवडायचे. त्यांच्या बोलण्यावर जायचे नाही. त्यांना नोकरी हवी असते त्यामुळे ते 'हां सर्व कांही करतो. मला सर्व येतं. मागे हे हे काम केलेले आहे.' अशा थापा ठोकतातच. शक्य असेल तर सॅलरी + कमिशन (ह्यात सॅलरी कमी पण दोन्ही मिळून साईजेबल रक्कम होईल) असे आमिष दाखवायचे. त्याचे डिझाईन गिर्हाईकाकडून पास झाले तरच पूर्ण रक्कम त्याला मिळेल. अर्थात माझा कुंपणावरून दिलेला सल्ला आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जास्त चांगली कल्पना आहेच.
हिम्मत हरु नका. पण अनुभवांच्या जखमा कुरुवाळत बसण्याऐवजी त्यातून धंद्याच्या क्लुप्त्या शिकून घ्या आणि संयमाने यशाच्या मार्गावर पोहोचा. अनुभवासारखा गुरु नाही. फक्त तो आधी शिक्षा करतो आणि नंतर ज्ञान देतो.
21 Sep 2014 - 6:56 pm | धन्या
प्रतिसाद प्रचंड आवडला.
21 Sep 2014 - 7:08 pm | एस
+१
21 Sep 2014 - 7:36 pm | प्यारे१
+२
काय चुका झाल्या हे आत कुठंतरी पक्कं नोट डाऊन करुन त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा (प्राधान्यानं) सध्या त्या निस्तरण्याकडं जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्यातून बाहेर पडून नंतर काय ते ठरवता येईल. (ठरवावं लागेलच)
आणि हो, कमीअधिक प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. 'समस्या असणं' हे तत्त्व सारखंच आहे. त्या 'समस्यांचं रुप' हे तपशील आणि तपशीलाचे भाग वेगवेगळे आहेत/असतात.
त्यामुळं आपण सगळेच एकाच धारेचे प्रवासी आहोत. काहींच्या बोटी थोड्या कणखर, काहींची वल्हवण्याची क्षमता जास्त, वारं येईल तसं शिडाला दिशा देण्याचं कसब उत्तम, त्यानंतर टीम मेंबर्स नि ट्युनिंग आणि शेवटी अंशतः नशीबाचा हातभार असं सगळं गणित जुळून येणं भाग असतं.
बाकी त्रास होतोच. तो एकदाच काय तो करुन घेऊन नंतर मात्र अजिबात न उगाळता पुढं जाणं आवश्यक आहे.
शुभेच्छा आहेतच.
21 Sep 2014 - 7:06 pm | संदीप डांगे
छान विश्लेषण केले आहे. पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे. अर्थातच "भाग्य कि कर्म" हा सनातन लढा आहेच.
असो.
मी फक्त एवढेच म्हणेन कि माझे अनुभव घटनेनुसार मांडले आहेत. त्यात बरेच निर्णय हे त्या काळातली उपलब्ध तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले आहेत. त्या परिस्थिती चे सर्वच कंगोरे इथे मांडणे शक्य नाही.
उद. बिग पिच्चर दाखवणारे सगळ्याच धंद्यात भेटतात. त्यामुळे अशा लोकांना मी पूर्वीपासूनच ओळखून आहे. प्रस्तुत ग्राहक हा बिग पिच्चर दाखवत नव्हता. कारण आता हे दोन लेबल कर नंतर १०० लेबल ची कामे देतो अशी काही गोष्ट नव्हती. एकदमच १० लेबेल चे त्याने रोख पेमेंट केले होते व नंतरच्या ४ मोठ्या ऑर्डर चे हि रीतसर पेमेंट केले. त्यांचा खरोखरच मोठा झोल झाला. कारण ३ महिन्यात मी त्यांच्या मुळापर्यंत जाऊन खबरबात काढली होती. काहीतरी कारण झाले आणि त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या कंपनीशी त्यांचा काहीतरी वाद झाला. नंतर ती कच्चा मालवली कंपनी मला लेबलची ऑर्डर देत होती पण माझे रेट त्यांना परवडले नाही. ह्यात फार गुंतागुंत आहे. आणि ती सगळीच इथे सांगता येत नाही. असे प्रत्येक घटनेत झाले आहे.
तात्पर्य: आपण घटना रोखू शकत नाही. पण त्याच चुका परत करू नये एवढे शिकावे.
यशाने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये एवढा संदेश मी आपल्या प्रतिसादातून घेत आहे.
21 Sep 2014 - 8:01 pm | प्रभाकर पेठकर
>>>> पण यश हे नशिबाने मिळते आणि नुकसान हे आपल्या मुर्खपणामुळे होते असा काहीसा अर्थ आपल्या विश्लेषणावरून लागतो आहे.
असं मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे? माझे म्हणणे आहे यशाचे आणि अपयशाचे, दोन्हीचे, डोळे, कान आणि मन उघडे ठेवून विश्लेषण करा. नशिबाने मिळालेल्या यशाला आपल्या कर्तृत्त्वाने मिळविले असे समजू नका. ह्याचा अर्थ यश नशिबाने मिळते आणि अपयश आपल्या मूर्खपणामुळे होते असा चुकीचा अर्थ आपण काढलेला दिसतो आहे.
मूर्खपणाचे निर्णय केंव्हाही महागातच पडतात. आंधळी जोखिम उचलू नका. डोळे, कान आणि मन उघडे ठेवून परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करून काय तो निर्णय घ्या. अशा सवयीतून जेंव्हा यशाची चढती कमान सुरु होईल आणि अपयशाचे प्रसंग आले तरी ते सहजतेने हाताळण्याइतके सौम्य असतील अशा परिस्थितीतिल ते यश हे तुमच्या कर्तृत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिबिंब असेल. मूर्खपणा सोडून दिल्यामुळे, उध्वस्त होण्यासारखे, अपयश दृष्टीक्षेपातही नसेल.
21 Sep 2014 - 9:51 pm | संदीप डांगे
पेठकर काका,
>>>मागचे "अनुभव" नाही. मागच्या घटनांमधून जे 'नशिबाने' यश मिळालं होतं त्याने एक प्रकारचा 'इगो' मनांत निर्माण झाला होता
आपल्या ह्या वाक्यावरूनच मला असं वाटले.
बहुतेक आपण "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" ह्या माझ्या वाक्यावरून असा अंदाज बांधला असावा. तो माझा दुर्दम्य आशावाद होता. अहंकार नाही.
आपण खरच उत्कृष्ट विश्लेषण आणि मार्गदर्शन केले आहे यात काहीच वाद नाही. परंतु सदरहू लेख माझ्याच अनुभवांवर आधारित असल्याने वाचकांचे कुठलेच गैरसमज होऊ नये म्हणू हा प्रपंच.
मी स्वताला सर्वज्ञ मानत नाही. अजूनही शिकत आहे, समजून घेत आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी वेगवेगळे मत बनत जाते. परंतु कर्तुत्वानेच नशीब सिद्ध होते असे आत्तातरी मला वाटते. त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार? अतिशय विपरीत परिस्थितीत मराठा साम्राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असोत कि रिलायंस चे धीरूभाई असोत, यांच्या यशात नशिबाचा भाग किती? त्यांनी यश अपयशाचे कितीसे हिशोब कुठलेही काम हाती घेण्याआधी केले असतील. "मला अमुक एक काम करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि बुद्धीचा कस लावूया" असेच विचार त्यांनी कुठेलेही काम हाती घेतानी त्यांच्या मनात असतील. त्यांच्या इतिहासावरून तरी असेच दिसते कि त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी जगात त्यांनीच प्रथम केल्या असतील.
यशाचा कुठलाही फुलप्रूफ फोर्मुला नसतो.
माझ्या मते वांगी कापल्यावरच कळते किडलेले आहे कि नाही ते. मी कापीन ती वांगी चांगलीच निघतील हा वृथा "इगो". शक्यतो न किडलेली वांगी घेऊ नये म्हणजे कापल्यावर किडलेले निघण्याचा धोका टळतो असे कधी शक्य नसते. पण कुठली वांगी किडलेली असू शकतात वा चांगली असू शकतात हा अंदाज अनुभवानेच येतो. कुणीही जन्मताच एक्स्पर्ट नसतो. पण तेवढे हुशार होण्यासाठी त्याला वांगी कापण्याचे "कर्तृत्व" करावेच लागते. याठिकाणी उद. म्हणून नारळ, आंबा, ग्राहक, नोकर काहीही असू शकते.
परंतु कर्तुत्वाने मिळवलेल्या यशाचा कैफ चढून मनुष्य नादान चुका करू शकतो. मी कधीच चुकत नाही आणि चुकणारही नाही हा अहंकार भल्याभल्यांना बुडवतो. मला तरी तसा रोग कधी झाला नाही. तसे असते तर वरचा माझा लेख फक्त इतरांवर चिखलफेक करणारा असता.
दुसरे म्हणजे आपण माझ्या दोन वाक्यांचा परस्पर वेगळाच अर्थ घेतला आहे.
१. त्यामुळे रिस्क घेणे कमी झाले. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटली.
>>>रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटत नाही
>माझे समीकरण सरळ आहे: रिस्क कमी = आर्थिक मोबदला कमी , रिस्क जास्त आर्थिक मोबदला जास्त. रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही.
२. हे म्हणजे सगळे सिग्नल हिरवे असतील तरच मी गाडी चालवणार.
>>>सिग्नल लाल असताना गाडी दामटणं हे जितकं कायद्याला धरून गैर आहे तितकेच नितिमत्तेला धरून गैर आहे आणि अपघातांना आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे.
>तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. रेड सिग्नल असतानी गाडी चालवावी असा त्याचा अर्थ नाही. अपघात होणार नसेल तरच मी गाडी चालवणार अश्या अर्थाचे ते वाक्य आहे. माझाच त्या वाक्यावर प्रतिवाद आहे कि आयुष्य हे कधीच शेवटच्या क्षणापर्यंत प्लान करता येत नाही. कधी थांबावे लागेल, कधी पळावे लागेल हि कुणीही आधीच जाहीर करू शकत नाही. गाडी बाहेर काढल्यावर अमुक एका चौकात सिग्नल हिरवाच असेल असे कुणीही सांगू शकत नाही. म्हणजे मला कुठेही अडथळा असेल तर मी गाडी काढणारच नाही असे होत नाही. फारतर कुठे कुठे सिग्नल आहेत त्याचा विचार प्रवास चालू करायचा आधी करू शकतो. म्हणजेच व्यवहारात धोके असणारच म्हणून ते करायचेच नाही असे अजिबात नाही. पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे कान, डोळे, मेंदू उघडा ठेऊन सगळीकडे बघावे लागते. ते शंभर टक्के खरे आहे. सगळी काळजी घेऊन कुणीतरी येउन तुम्हाला ठोकतोच तेव्हा ते "नशीब". म्हणून गाडी घरातून काढली हाच माझा मूर्खपणा असे कुणी म्हणत नाही.
बाकी आपल्या अमुल्य मार्गदर्शनाबद्दल खरच आभारी आहे. कुठे गल्लत होत असेल तर जरूर सांगा. तुमचा हक्क आहे.
22 Sep 2014 - 2:07 am | प्रभाकर पेठकर
संदिप डांगे,
माझ्या प्रतिसादातील दुसर्याच वाक्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ते वाक्य म्हणजे,
मला माझ्या अनुभवावरून वाटते त्या नुसार तुमच्या अनुभवांच विश्लेषण मी खालील प्रमाणे करीनः
हा 'इगो'चा अनुभवही मी घेतला आहे. तोच माझ्या प्रतिसादात मी मांडला आहे. आपण अपयशाचं विश्लेषण करतो पण यशाचं कधी करीत नाही. ते आपल्या हुशारीनेच मिळाले असे आपण गृहीत धरतो. मीही सुरुवातीला हिच चुक केली होती पण स्वतःच्याच यशापयशाचं मुल्यमापन करताना माझी चुक माझ्या लक्षात आली की सुरुवातीच्या यशात माझे श्रेय विशेष नव्हते पण ते माझ्या हुशारीनेच मिळाले होते असा 'इगो' माझ्यात निर्माण होऊन पुढे जरा सेट बॅक बसला होता. (माझी ४ उपहारगृह नुकसान होऊन बसली.) यशाचं मुल्यमापनही करणं गरजेचं असतं. असो. तुमच्या बाबतीत तसे झाले नसेल तर आनंदच आहे.
>>>>त्यामुळेच मिळणाऱ्या यशात किंवा अपयशात नशीब किती आणि कर्तुत्व किती याचा तुलनात्मक अभ्यास कसा करणार?
मी १९९० साली मस्कत मध्ये पावभाजी, बटाटेवडे, वडापाव वगैरे पदार्थ विक्रीसाठी कॅफेटेरिया सुरु केला. सुरुवातीच्या ४ महिन्यात गिर्हाईकांचा ओघ वाढला. गुजराथी मुख्य गिर्हाईके. तेंव्हा माझ्या कॅफेटेरीयात इथल्या स्थानिकांसाठी चिकन, अंड्याचे सँडविच, बर्गर हे सुद्धा होते. स्थानिक आणि गुजराथी, मराठी सर्व गिर्हाईकांना संतुष्ट करून व्यवसाय भरभराटीस न्यायचा माझा विचार होता. व्यवसायाचा अनुभव शून्य होता. सुरुवातीला भरमसाठ गिर्हाईके आली. ह्याला मी माझी हुशारी समजत होतो. पण त्यात नशिबाचा भाग होता. इथे तेंव्हा पावभाजी, वडापाव इत्यादी विकणारी उपहारगृह नव्हती. मी मार्केटचा तसा अभ्यासही केला नव्हता. पण परिस्थिती अशी होती की कोणीही तेंव्हा असा कॅफेटेरीया सुरु केला असता तर यशस्वी झाला असता. कारण त्या काळी ती त्या मार्केटची गरज होती. माझी हुशारी नाही. हा झाला नशिबाचा भाग.
मला गुजराथी भाषा येते. त्यामुळे येण्यार्या गुजराथी गिर्हाईकांशी मी गुजराथीत बोलायचो, मराठी गिर्हाईकांशी मराठीत बोलायचो, अरबी गिर्हाईकांशी अरबी भाषेत बोलायचो, दक्षिण भारतियांशी हिन्दी आणि इंग्रजीत बोलायचो. बहुसंख्य गिर्हाईके ही गुजराथी आणि मद्रासी होती जी शुद्ध शाकाहारी होती. त्यांच्याशी संभाषणातून त्यांचा माझ्या कॅफेटेरियातील मांसाहारी पदार्थ विक्री बद्दल असलेला रोष माझ्या लक्षात आला. आणि मी तडकाफडकी मांसाहारी पदार्थ बंद करून टाकले. कारण एक तर मांसाहाराचा आग्रही समाज हा अरबी होता आणि टक्केवारीत फार कमी होता. कुठल्याही उपहारगृहात हिन्दी आणि अरबी गिर्हाईके एकत्र कमीच दिसतात. (त्या काळच्या गोष्टी आहेत ह्या, १९९०) मांसाहारी गिर्हाईकांसाठी मी माझा मोठा शाकाहारी वर्ग हातचा सोडू इच्छित नव्हतो. त्यामुळे तो निर्णय निरिक्षणातून, मार्केटचा अभ्यास करून आणि गिर्हाईकांशी संभाषण करून मिळविलेल्या माहितीवर होता. ती माझी हुशारी होती (असं मी मानतो) त्यात नशिबाचा भाग नव्हता. मांसाहारी पदार्थ बंद केल्यावर रोजच्या गिर्हाईकांने तो विषय काढला किंवा नाही काढला तरी मी आवर्जून 'मांसाहारी पदार्थ बंद केले आहेत आणि आता हा कॅफेटेरिया शुद्ध शाकाहारी आहे' असे सांगायचो. ती माझी जाहिरातबाजी होती ज्याचा गुजराथी आणि मद्रासी गिर्हाईके वाढण्यात मला फायदा झाला. मराठी लोकांना (शाकाहारी वर्ग सोडल्यास) विशेष आक्षेप नव्हता पण त्यांनाही कॅफेटेरियाचे बदललेले रुप आवडले आणि एक 'उत्कृष्ट शाकाहारी उपहारगृह' अशी माझ्या कॅफेटेरियाची ओळख वाढत गेली. सोबत धंदा. हा परिणाम मी माझ्या तथाकथित हुशारीने घडविला होता.
इथे हुशारीमुळे आपण कुठलेही उपहारगृह नफ्यात आणू शकतो असा माझ्या मनात अहंगड (इगो) निर्माण झाला आणि ह्या नंतरची ४ उपहारगृहे रांगेत खाली बसली.
आत्मपरिक्षण केले. मार्केटचा अभ्यास वाढविला. आणि एकुलत्या एक उपहारगृहावर (जे यशस्वी होते) लक्ष केंद्रित केले. इथे-तिथे उड्यामारण्यापेक्षा आहे तो धंदा सांभाळणे/वाढविणे ह्यावर भर दिला. कित्येक वर्षे नविन उपहारगृहात हात घातला नाही. ह्या देशाची खाली गेलेली इकॉनॉमी (अपयशाच्या अनेक कारणातील एक कारण) हळू हळू सावरली गेली पुन्हा भारतियांची ह्या देशात वर्दळ वाढली आणि दुसर्या कॅफेटेरियाची गरज निर्माण झाली. ती ओळखून मी दूसरे उपहारगृह सुरु केले तेही चांगले चालले आहे.
हा झाला नशिब आणि हुशारीतील फरक, अहंगंडाचा परिणाम आणि धंद्यात सावरण्यासाठी डोळे, कान आणि मन उघडे ठेवून टाकलेली पाऊले.
>>>>रिस्क न घेतल्याने आर्थिक प्रगती खुंटली असे मी म्हटले आहे. रिस्क घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली असे नाही.
ती माझी टंकनचुक होती. मलाही तेच म्हणायचे होते 'रिस्क न घेण्याने आर्थिक प्रगती खुंटली नाही' आंधळ्या जोखिमीने नुकसान होऊ शकतं.
तुम्ही दिलेलं सिग्नलचं उदाहरण चुकीचं आहे त्यामुळे पुढचा माझा प्रतिसाद गंडल्यासारखा तुम्हाला भासतो आहे. गाडीचा प्रवास फक्त सिग्नलाच खुंटतो असे नाही तर रहदारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कुठे अचानक कोणी मधे येतं (आपल्याला ब्रेक मारावा लागतो), कुठे सिग्नल लाल असतो (थांबावं लागतं), कुठे ट्रॅफिक जॅम असतो (रहदारी संथ गतीने जात असते) धंद्याचेही असेच असते कधी धंदा जोरात असतो (मोकळा रस्ता) कधी मधे कोणी कडमडतो (धंदा कमी होण्याची कांही तात्कालीक कारणं) तर कधी नुकसान नाही पण धंदा मंदीत असतो (जसा इथला रमझानचा महिना, शाळांच्या सुट्यांमुळे भारतियांचे स्वदेशी सुट्टीवर प्रयाण वगैरे) ह्या सर्व अडचणींमधून पार पडताना नितीमत्ता, कायदेशीर बाजू सोडायच्या नाहीत जास्त नफ्यासाठी चुकीची रिस्क घ्यायची नाही, नाहीतर मोठे नुकसान, आर्थिक सेट बॅक अशा 'अपघातांना' आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते.
माझे आणि तुमचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पण एकंदरीत धंद्यात वापरायची सावधगिती बहुतेक सर्व धंद्यात सारखीच असते. तुम्हाला मी धंदा 'शिकवत' नाहीये फक्त आंधळी जोखिम घेऊ नका, अपयशा प्रमाणेच यशाचेही विश्लेषण करा आणि स्वतःबद्दल चुकीच्या धारणा न बाळगता (म्हणजे तुम्ही बाळगता आहात असे मला म्हणायचे नाहिए.) प्रगती करा. यशस्वी व्हाल.
22 Sep 2014 - 2:39 am | संदीप डांगे
खरच पटले. बाकी काही खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आल्यावर जरा समज गैरसमज होणारच. (जसे आम्हा बाप-लेकाचे नाते व इतर अनेक गोष्टी.)
पण एकदा मिपा ला आपले मानल्यावर मन मोकळ करायचे ठरवल्यावर अस काही होईल याची अपेक्षा होतीच, त्यामुळे दुख: नाही.
प्रत्येकाचे आपले एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान असते. त्या त्या अनुभवातून तावून सुलाखून ते मिळालेले असते. त्याचा यथायोग्य आदर आहेच. तुमचे अनुभव ऐकून मस्त वाटले. त्यामुळे तुमचे म्हणणे अजूनच पटले.
21 Sep 2014 - 7:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरच्या इतका उत्तम व्यवहारी सल्ला मिळणे कठीण आहे. प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याजोगा आहे !
यात अजून फक्त थोडीशी भर :
१. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना (मग तो नोकरीसंबद्धी, व्यवसायासंबद्धी अथवा त्यातल्या एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टसंबंद्धी असो) सर्वप्रथम तो निर्णय फसला वाईटात वाईट काय होईल आणि यशस्वी झाला तर काय चांगले होईल याचे सद्यस्थितीवर अवलंबून (स्वप्नाळूपणे नाही) विश्लेषण करायला पाहिजे. याला "वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ" असे नाव आहे. यातला सर्वात महत्वाचा असतो "वाईटात वाईटाचा विचार करणारा वर्स्ट केस सिनॅरिओ"... त्याला पुढे जाण्याची तयारी असली आणि त्यासाठी आवश्यक (मॅन-मनी-मटेरिएल) बंदोबस्त केलेला असला तर एखादे अपयश तुमच्या मनाच्या उभारीवर आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन प्रगतीवर मोठा परिणाम करू शकणार नाही. वर्स्ट केस - बेस्ट केस सिनॅरिओ तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा अविभाज्य भाग असल्यास तुम्हाला अर्थसहाय्य पुरवणार्या संस्थेला/माणसाला तुमच्याबद्दल जास्त भरवसा वाटेल.
२. अर्थसहाय्य बँक अथवा नॉन-बँकींग फिनान्शियल इन्स्टिट्युशन्स मधूनच घ्यावे हे माझे स्वतःचे मत आहे. त्याची काही अगदी साधी कारणे आहेत...
अ) अर्थसहाय देण्याअगोदर वरील संस्था प्रोजेक्ट रिपोर्टचा आग्रह धरतील आणि तो संस्थेचे ठोकताळे वापरून संस्थेमधले विशेषज्ञ पडताळून पाहतील... त्यामुळे व्यवसायाच्या सफलतेसाठी अत्यंत आवश्यक असलेला एक पाया आपोआप तयार होईल.
(मात्र कर्जासाठी "सोईस्कर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे/बनवून घेणे" धोक्याचे आहे, तेव्हा ते टाळा.)
आ) तुम्ही कितीही फायदा कमावलात तरी वरील संस्था केवळ करारात अगोदर लिहीलेले आहे तेवढेच व्याज आकारतात. किंबहुना तुम्ही यशस्वी उद्योजक झालात आणि कर्जाचे हप्ते वेळेवर / वेळेअगोदर दिलेले असले तर पुढचे कर्ज अधिक सुलभतेने आणि अधिक चांगल्या दराने मिळू शकते. भागीदारांच्या अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यकाच्या परताव्याच्या अपेक्षा सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या सफलतेच्या अनेक पटींनी जास्त वाढतात.
इ) व्यवसायातला एखादा धक्का बँक जास्त समजूतीने घेईल, कारण व्यवसायातल्या अश्या चढउतारांची माहिती असणे हा बँकिंग व्यवसायाचा भाग असते. भागीदार अथवा व्यक्तीगत अर्थसहाय्यक अशी अपेक्षा ठेवणे सर्वसाधारणपणे महागात पडते... शिवाय ती व्यक्ती नातेवाईकांपैकी असली तर नातेसंबंधातही कडवटपणा येतो.
21 Sep 2014 - 10:20 pm | दशानन
अतिशय उत्तम, अनुभवातून आलेला व परखड असा प्रतिसाद! मनापासून आवडला.
याचा मला देखील उपयोग नक्कीच होईल.
21 Sep 2014 - 10:32 pm | संदीप डांगे
>>>पैसे दिल्यापासून 'ह्या पुढे मी पैसे देणार नाही' ह्या भूमिकेत शिरण्यापूर्वी होत गेलेला परिस्थिती बदल कळण्यास मार्ग नाही त्यामुळे ह्या परिस्थितीस जबाबदार कोण?, तुम्ही की तुमचे वडिल हे ठरविणे कठीण आहे.
मी आधीच म्हटल्या प्रमाणे प्रत्येक घटनेची विस्तृत कारणमीमांसा शक्य नाही, परंतु आपल्या विश्लेषणाचा रोख लक्षात घेता थोडे लिहितोच.
यात वडील चूक कि मी असे काहीही नाही. त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांनी निर्णय बदलला त्याचा फटका मला बसला एवढेच .
मीच त्यांना "हे मी कर्ज म्हणूनच घेत आहे" असे सांगितले. आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे व्याज हि देणार असे हि काबुल केले होते. त्यामुळे हे पैसे नाही दिले तर चालतील असा काही माझा विचार कधीच नव्हता. त्यामुळेच पैसे देण्यास ते तयार झाले. त्यांच्या मते पार्टनर आहे त्याला तू हिस्सा देशील त्यापेक्षा मला दे. आपला पैसा आपल्याच घरात राहील. मी म्हटले :ओके: माझ्या कर्तृत्वात मला कुणाचेच उपकार नकोत अगदी सख्या बापाचेही. कर्ज घेणे मी निषिद्ध मानत नाही. परत करायची प्रामाणिक इच्छा आणि मनगटात ताकत असेल तरच कर्ज घ्यावीत.
जोपर्यंत ते कमवू शकतात तोपर्यंत त्यांना माझा आधार नको आहे. परंतु पुढे त्यांच्या व्यवसायात मंदी आली आणि ते असुरक्षित फील करू लागले. म्हणून त्यांनी शब्द फिरवले.
(मी दोन लाख आणि बाबांनी एक लाख असे मिळून २००९ मध्ये आम्ही एक घर घेतले त्याची किंमत आज २५ लाख आहे. पण त्या घराचा मी अजिबात विचार करत नाही आणि करणार हि नाही कारण ते आई आणि बाबांसाठी घेतले आहे. आणि ते त्यांच्याच नावावर आहे.)
21 Sep 2014 - 11:06 pm | टवाळ कार्टा
अप्रतिम...तुम्हाला भेटायचा योग यावा ही विनंती
21 Sep 2014 - 11:09 pm | काळा पहाड
प्लान बी हा नॉर्मली वर्स्ट केस सिनारियो नसतो. प्लान फॉर द बेस्ट अॅन्ड प्रिपेयर फॉर द वर्स्ट या तत्वा नुसार प्लान सी, डी आणि ई सुद्धा हवेत.
21 Sep 2014 - 6:53 pm | विजय_आंग्रे
प्रभाकर पेठकर सर
तुमची संपुर्ण पोस्ट अप्रतिम आहे.
__/\__
21 Sep 2014 - 6:57 pm | आनन्दा
पेठकरकाकांशी सहमत. बाकी एव्हढेच सांगेन, एखाद्या मोठ्या सहकारी बॅंकेकडून कर्ज मिळवता येते का ते पहा. त्यांच्या मॅनेजरला या सार्या गोष्टींची कल्पना द्या, तुमच्या कामाचे रेफेरेन्सेस दाखवा, आणि कदाचित तुम्हाला काहीतरी कर्ज मिळेल. सहकारी बँकांचे नियम थोडे वाकवणेबल असतात असे ऐकून आहे, आणि व्याजदर पण थोडे चढे असतात. पण सध्याच्या स्थितीत तुम्हाला ते देखील परवडेल.
आणि बाकी इन जनरल, आम्हाला शाळेत एक श्लोक होता, पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनं, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनं.
आणि कोर्पोरेट भाषेत सांगायचे झाले तर, ही सारे लर्निंग आहे, फक्त अॅट कॉस्ट.
21 Sep 2014 - 10:11 pm | मुक्त विहारि
@ संदीप डांगे,
प्रथमतः तुमचे अभिनंदन, कारणे २
१. स्वतःची चूक कबूल करायला धाडस लागते.ते तुम्ही केलेत.
२. मिपाची खरी किंमत तुमच्या ह्या धाग्यांमुळे आम्हाला समजली.
आणि
प्रभाकर दादा, संक्षी, प्यारे१ आणि इ.ए. ह्यांच्या सल्ल्यांमुळे तुम्हाला नक्कीच धैर्य आले असेल.
21 Sep 2014 - 10:12 pm | विजुभाऊ
पेठकर काकांशी सहमत.
सन्दीप्भौ
तुमच्या सारख्या अनुभवातून मी देखील थोडाफार गेलो आहे. अशावेळेस सल्ले देणारे भेटतात तसेच विश्वास ठेवून पैसे देणारे सुद्धा भेटतात. हे लोक आपले भले व्हावे असेच इच्छतात. अशा वेळेस घाईघाईने निर्णय न घेता परिस्थीतीकडे थोड्या त्रयस्थ नजरेने बघावे.
काहीवेळेस थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले तर आपल्या चुका काय झाल्या ते कळते तसेच आपल्यात काय चांगले आहे ते देखील समजत.
मला वाटते की तुम्ही तुमच्यातील चाम्गल्या गुणांचे अॅनालिसीस केलेलेच नाहिय्ये. तुम्हाला सहानभुती दाखवणार्या लोकांपेक्षा सल्ले देणारांपेक्षा अगदी अनोळखी ज्याना तुमचे बॅग्राऊंड माहीत नाही अशा लोकांशी व्यवहार करून बघा.
नाशीक हे एक मोठे शहर आहे तेथे तुम्हाला ओळखणार्या लोकाम्पेक्षा न ओळखणारे लोक अनेक पटीने जास्त आहेत.
अवांतर : मराठीत "मसाला "नावाचा चित्रपट अशाच एका धडपड्या माणसाच्या कथेवर बेतलेला आहे तो बघा शक्य झाले तर.
21 Sep 2014 - 11:29 pm | कवितानागेश
खूपच महत्त्वाचे आणि अनुभवी सल्ले मिळत आहेत इथे.
कागदपत्रे नीट न ठेवल्यानी आणि धंद्यात स्वतःकडंचच किंवा जवळच्यांकडून घेउन बरंच भांडवल घातल्यानी झालेलं नुकसान अगदी जवळच्या नातेवाईंकाच पाहिलेलं आहे. तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येतेय. पण पुन्हा नोकरी बघण्याचं आणि नवीन कौशल्य शिकून घेण्याचं धाडस दाखवून ते पुन्हा सगळी फेडून उभे आहेत.
तुम्ही यापुढे सगळ्या प्रकारची काळजी घ्याल आणि यशस्वीही व्हाल याबद्दल खात्री आहे. :)
22 Sep 2014 - 1:10 am | माहितगार
संदिप, आपला धागा लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे. संस्थळाच्या अॅड्मिनिस्ट्रेटीव्ह जबाबदारीचा भाग म्हणून मिपा संपादकांनी त्यांची जबाबदारी योग्यच पार पाडली. प्रतिसाद बर्या पैकी जबाबदारीने येताहेत आणि प्रतिसादांना तुमचा प्रतिसाद सुद्धा चांगला येतो आहे तेव्हा त्या बद्दल अभिनंदनच. चर्चा वाचणार्या इतर व्यावसायिकांसाठी म्हणून अडचणींची चर्चा जेवढी लवकर केली तेवढे बरे गूंतागूंत तेवढीच कमी असते.
१) इंपल्स (मराठी शब्द ?) आणि विश्वास ठेऊन रिस्क घेण हा उद्योजकतेचा गूण आहे पण सोबतीला इंपल्स मध्ये न अडकणारी, पुन्हा एकदा विचार करून खात्री करून घेण्याचे सांगणारी रिस्क दाखवून देऊ शकणारी व्यक्ती चर्चेसाठी सोबत हवी.
२) अंतीम निर्णय आपलेच राहतील एवढ स्वातंत्र्य/अधिकार जतन केलाच पाहीजे पण त्याच वेळी कोणत्याही निगोशिएशन मध्ये आपण स्वतः अंतीम निर्णय घेणारे आहोत हे सांगू नये. इतरांना सांगण्यासाठी एक खरा किंवा इमॅजनरी बॉस नेहमी ठेवावा ( जसे माझ्या डायरेक्टरांना विचारून सांगतो भले डायरेक्टर तुम्ही स्वतःच असा) म्हणजे ऐन निगोशीएशन मध्ये विचारून सांगतो असे म्हणणे आणि अंतीम चर्चा करणे सोपे जाते. (अननुभवी इंपल्सीव लोकांकडून हि डिप्लोमॅटीक स्टेप राहून गेलेली असण्याची आणि नाही तेव्हा गोत्यात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते)
३) वर्कींग कॅपिटल बद्दल आधीच्या काही जणांनी प्रतिसादातून मार्गदर्शन केलच आहे पण हि जागा नेमकी खेळत भांडवल जपण्यासाठी लागणार्या शिस्तीची असते. किमान जेवढी देणी (जसे ऑफीसचे भाडे कर्मचार्यांचे पगार) कॅश मध्ये जायची तेवढा रोखीचा कस्टमरशी रोखीचा व्यवहार झालाच पाहीजे . उधारीच ग्राहक मोठ असल तरी तो मोह बाजूला ठेऊन रोखीचे ग्राहक आधी करावयास हवेत.
४) इन एनी केस तुमचा मॅनपॉवर टर्न ओव्हर व्यावसायिक यशासाठी स्विकार्य स्तराचा नव्हे. मॅन पॉवर टर्न ओव्हर कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहून माणस कशी जपायची हे माहित करून घेतलच पाहीजे, पण त्या पूर्वी माणूस निवडण्या पुर्वीच माणूस पारखण्यासाठी मुलाखतीं घेण्यासाठी अधिक वेळ मोजला पाहीजे. न आवडलेला माणूस पहिल्या ४८ तासात काढून टाकावा जास्तीत जास्त सात दिवस छोट्या व्यावसायिकांनी या पेक्षा अधिक कालापव्यय माणूस काढून टाकताना करू नये. माणूस केव्हाही सोडून जाऊ शकतो किंवा काढावा लागू शकतो या तयारीत आधीच राहून मुलाखती घेऊन काही जणांना पाईप लाईन मध्ये ठेवावयास हवे.
५) कस्टमरशी प्राईस निगोशीएशन आणि पैसे मागण्याची स्किल्स चांगली हवीत तुम्ही चांगल प्राईस निगोशीएट करू शकले नाही आणि पुरेसे पैसे रोखीत मिळवू शकले नाही तरीही तुम्हाला चांगल मॅनपॉवर मिळणार नाही आणि टिकणार नाही. पैसे मागण्याची स्किल किमान पाच वर्षे सेल्सचा अनुभव असलेल्या व्यक्ती कडून घ्यावीत आणि प्राईस निगोशिएशन स्कील हाय व्हॅल्यू प्रिमीयम प्रॉडक्ट सेलींग करणार्या व्यक्तींं कडून घ्यावीत.
६) तुम्हाला चांगला डिझायनर मिळाला नाही तरी दुसर्या फ्रिलान्स डिझायन्रर्सना शोधून वापरण्याचा पर्याय कितपत उपयूक्त होता माहित नाही पण तो तुमच्या धागा लेखात दिसला नाही.
अर्थात हे सर्व सल्ले सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, जी गोष्ट स्वतः पाहिली नाही त्याबद्दलचे सल्ले कितपत प्रॅक्टीकल आणि नेमके असतील हे सांगता येत नाही. पण मला प्रथम दर्शनी महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी टंकल्या एवढेच.
22 Sep 2014 - 2:13 am | प्रभाकर पेठकर
चांगली माहिती. प्रत्येक व्यावसायिकाने असे मार्ग चोखंदळले पाहिजेत. कुठल्याही धंद्यात सावधगिरी महत्त्वाची.
22 Sep 2014 - 2:27 am | संदीप डांगे
सर्वोत्तम प्रतिसादांपैकी एक.
अश्याच मुलभूत आणि नेमक्या सल्ल्याची अपेक्षा होती, ती आपण पूर्ण केलीत. तुम्ही सांगितलेल्या ह्या सर्व बाबी माझ्यासाठी खरच नवीन आणि उद्बोधक आहेत. विशेषत: इमजिनरि बॉस आणि निगोशिअशन स्किल्स कुणाकडून घ्यावीत. अजूनही अश्या मौलिक माहिती किंवा प्रशिक्षणाची काही खबर असल्यास जरूर कळवणे.
मी हुशार, मी धंदा करतो म्हणून मला फार कळते, दुसर्यांनी मला काय शिकवू नये असा माझा अजिबात पिंड नाही. स्वतंत्र व्यवसाय सुरु करून मला उणीपुरी ३ वर्षे झाली आहेत. या दरम्यान चांगल्या वाईट अनुभवांनी बरेच शिकवले. तुम्ही सांगितलेले पाचही मुद्दे मला भरपूर मार्गदर्शक आहेत. अजून शिकायची इच्छा आहे.
फ्रीलान्स डिझायनर सोबत काम करणे जरा महागात पडते. त्यांच्या अपेक्षा आणि उत्पादकता यात बरीच तफावत असते. म्हणजे कुणी मध्यस्थ असेल तर त्याची बरीच फरफट होते. या प्रकारात माझ्या अनुभवाप्रमाणे कुणीतरी एक म्हणजे ग्राहक किंवा डिझायनर मध्यस्थाच्या जवळचा अथवा खास पाहिजे. जेणेकरून कामाचा दर्जा व मोबदला यांच्यात अविश्वासाने काही गोंधळ होणार नाही.
माझे एक दोन जुने मित्र आणि समव्यवसायी ह्यांच्यासोबत व्यवहारात आहे. परंतु फ्रीलान्स आणि डेडीकेटेड स्टाफ यांच्यात आपापले सामर्थ्य व उणीवा असतात. वेळप्रसंग बघून आयुधे वापरावी लागतात.
सांप्रत मला असा अनुभव आहे कि माणूस बिझनेसमन असला कि लोकांचा (विशेषत: नोकरदारांचा) त्याच्याकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन काहीसा असा असतो.
१. चिक्कार पैसे कमावतात
२. नोकरांचे शोषण करतात
३. ग्राहकास लुबाडतात
४. पार पोचलेले असतात
५. प्रचंड हुशार आणि धूर्त असतात
६. माणसे ओळखण्यात पटाईत असतात
७. आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात
८. "तुम्ही बिझनेस करता म्हणजे तुम्हाला हे (…. )माहितीच पाहिजे… " अश्या अर्थाचे उद्गार.
९. हमखास कर बुडवतात
१०. बिझनेस भरपूर पैसा गाठीशी आहे किंवा अवाजवी नफा मिळतो म्हणूनच करतात
११. फक्त आणि फक्त पैश्याकडे बघतात.
म्हणजे एकंदर व्यापारी आणि लुटारू यांच्यात फक्त एक फरक तो म्हणजे एक गोड बोलतो दुसरा धारदार बोलतो. हे पण मी स्वत: बिझनेसमन झाल्यावर शिकलो. अर्थात बिझनेसमन होणे हे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासारखे नसते. मिळाली पदवी कि झाला बिझनेसमन. तोही चुकू शकतो.
धंदा करणाराने सदैव जागृत आणि तत्पर राहिले पाहिजे, त्याच्याकडून चूक होऊच नये. तसे होत असेल तर कशाला करतो धंदा? गुमान नोकरी कर आणि शांत बस असे सल्ले येतात. (हे वैयक्तिक अनुभवले आहे. मला नोकरीसाठी तळमळीने मदत देऊ केलेल्या मिपाकरांसाठी हे नाही. त्यांच्या प्रामाणिक तळमळीबद्दल मला कुठलाही पूर्वग्रह नाही.)
22 Sep 2014 - 9:14 am | माहितगार
उत्कृष्ट दर्जा देणार्या स्वतःच्या व्यावसायिक कौशल्या सोबत व्यवसाय मिळवणे (खास करून बर्याच महाराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी ओळखीच्या परिघा बाहेरचा व्यवसाय मिळवण्याकडे दुर्लक्ष होत अथवा किंमत पाडून मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतो- जे अॅप्लिकेबल नसेल ते सोडून द्यावे) आणि विवीध स्टेक होल्डर्सशी व्यावसायिक संबंध टिकवणे ओघाने येतेच. हे एवढ्या साठी नमुद करतो आहे की डिझायनींगची चांगली कला पण केवळ कला असलेल्या इतर व्यक्तीत आणि तुमच्यातला हा फरक समजून घेतला की कौशल्याधारित सुयोग्य मोबदला देऊन माणसे वापरून घेणे सोपे जाते. जो पर्यंत तुम्ही आणि मोबदला घेऊन काम करून देणारा यांचे संबंध चांगले आहेत तो पर्यंत बाकी जग काय म्हणते ते खूप महत्वाचे नाही.
प्रचंड हुशार आणि चतूर- हा योग्य शब्द (धूर्त) असतात; . माणसे ओळखण्यात पटाईत असतात, . आपले काम दुसर्यांकडून करून घेण्यात वाकबगार असतात (हाणून पाडण्यासाठी नकारात्मक टोन मधल्या नसतील तर) अशी इमेज पैसे उभे करताना उपयोगीच पडू शकेल असे वाटते. पण तुमचा व्यवसाय हाणून पाडण्यासाठी ग्राहक सोडून कुणी कॉमेंट मारत असेल तर त्याला तुमचा नकारात्मक स्वभाव असलेला स्पर्धक गृहीत धरा. तुमच्या स्टेक होल्डर समोर तुम्ही केलेल्या दहा सकारात्मक गोष्टी स्पर्धकाच्या वाक्यांचा उल्लेख न करता दाखवून द्या.
नोकरांचे शोषण करतात, ग्राहकास लुबाडतात, अशी इमेज मात्र निर्माण होणार नाही याची अधिकाधीक दक्षता घेतलेली व्यवसायाच्या यशाच्या दृष्टीने चांगली. बाकीच्या आणि बाकीच्यांच्या कमेंटांकडे दुर्लक्ष करणे चांगले, व्यवसाय यशस्वी झाल्या नंतर तिच मंडळी आपापली कामे करून घेण्यासाठी बदलतील.
चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव
(चुभूदेघे)
22 Sep 2014 - 10:16 am | प्रभाकर पेठकर
>>>>चांगल्या दर्जा, सेवेच सातत्य आणि ग्राहक समाधानाच्या आधारावर इतर स्पर्धकांपेक्षा ५ टक्के ते ३० टक्के प्रिमियमवर सेल करूनही ग्राहक टिकवणे वाढवणे जमले पाहीजे. आणि ह्यात बहुधा सेवा उद्योगाचं मर्म असाव
लाख मोलाचं विधान. ह्याच पायाभूत विचारांवर विश्वास ठेवून, २४ वर्षे सेवाउद्योगात टिकून आहे.
22 Sep 2014 - 6:45 am | इनिगोय
हे लिहून काढत आहात हे अतिशय उत्तम.
यातून तुम्ही (खरंतर कोणत्याही उद्योजकाने) काय टाळायला हवं आणि कोणती खबरदारी घ्यायला हवी या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होतं आहे. पेठकरकाका, इस्पिकचा एक्का आणि इतरही काही प्रतिसाद खूप मुद्देसूद आहेत.
माझ्याकडून एक लहानशी सुचवणी.. रश्मी बन्सल यांचं 'कनेक्ट द डॉटस्' हे पुस्तक मिळवून वाचा. कोणत्याही औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यातूनही तुमच्या उपयोगाचे बरेच काही मिळेल, हे नक्की. उदा. वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःच्या, नातेवाईकांच्या कमाईचे सारे पैसे व्यवसायात न गुंतवता बँकेकडून कर्ज घेतल्याने नेमके काय साध्य होते, त्यासाठीचे डॉक्युमेंटेशन कसे करावे, इ. आपल्याच सारख्या परिस्थितीतून वाटचाल केलेल्यांचे अनुभव वाचल्याने दृष्टीकोनात खूपच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो.
बाकी व्यक्तिगत निरोप धाडला आहे, तो पाहा.
22 Sep 2014 - 11:33 am | विलासराव
औपचारिक शिक्षणाविना स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे केलेल्या २० उद्योजकांबद्दल लिहिलेले लेख आहेत.
माझं नाव आहे का हो त्यात.
मी बीई ईलेक्ट्रॉनीक्स झालो १९९४ मधे. नंतर मुंबईला आलो. ९ वर्षे नोकरी केली सर्व्हीस ईंजीनीयर म्हनुन. २००३ ला नोकरी सोडली तेव्हा कर्जबाजारी झालो होतो. मग नोकरीत कर्ज फिटणे अशक्यप्राय झाल्याने व्यवसाय सुरु केला. घर भाडयाचे, डोक्यावर कर्ज आनी दारात देणेकरी अशात माझा व्यवसाय सुरु झाला. घरच्यांनी तर लांब रहाणेच पसंद केले कारण त्यांना वाटले याची सटकली. कारण आमच्या खाणदाणीत व्यवसायात पाउल टाकणारा मी बहुधा पहीलाच. आता नवीन व्यवसाय असल्याने लगेच रोज काम नसायचे. मग मी पुस्तक वाचत दिवस दिवस घरीच पडीक असायचो. घरातले सगळे यावर आपापसात चिंता व्यक्त करायचे.
लवकरच मला पहीली ऑर्डर मिळाली. त्याची माझी खरेदी होती ५००० रुपये. विकायचे होते ७००० रुपयांना. यात २००० मार्जीन होते खरे पण १ वर्ष सर्व्हीसही होती. घरातुनच अर्थात मदत मिळाली नाही. बरेच प्रयास करावे लागले त्या पाच हजारासाठी. पण त्याच पार्टीने काम वेळेत करुनही पेमेंट चार महीने लटकवले. मग त्या पाच हजार दिलेल्या लोकांनी आधीच पत नसलेल्या मला काळ्या यादीतच टाकले. मग सगळ्या मित्रमंडळात खबर गेली. सगळे रस्ते जवळपास बंद. मग मी नवीन ऑर्डर मिळवण्याचे प्रतत्न कमी करुन मेंटेनन्स कॉण्ट्रॅक्ट किंवा कॉलबेसीसवर ब्रेक्डाउन कॉल्सला जोर लावला.थोडेसे पैसे जमा झाल्यावर हळूहळू विक्री परत चालु केली. पण खास वाढ होत नव्ह्ती. प्रयत्न तर अथक चालु होते.मी सकाळी स्वैपाक करुन डबा बरोबर घेउन ६ वाजता अंबरनाथवरुन घर सोडायचा ते व्हीटीला माझ्या ऑफीसला यायचो. मग रात्री ११ ची शेवटची फास्ट लोकल पकडायची तेव्हा घरात पोहोचायला पाउन वाजायचा. असो.
एवढं करुन पोटपाणी चालत होते पण कर्जदारांचे काय? मला आधार(सहानुभुती) फक्त माझ्या व्यसनाची होती. फक्त बारमधे न जाता मी घरीच पण नियमीत घ्यायचो फक्त रात्री.
मग मला एक अभिनव उपाय सुचला. मागाल ते मीळेल वाला. मग मी रोज सकाली त्या अज्ञात शक्तीची तळमळीणे करुणा भाकायला लागलो की मला स्वतःसाठी काय नको पण मला ते देणेकरी दारात नकोत बाबा. आनी कुठल्याही परिस्थीतीत मला बेईमानी करण्याची वेळ येउ देउ नकोस म्हणुन. त्याआधी मी कधीही कोणाकडेही प्रार्थना केलेली नव्ह्ती. कारण हेच लाथ मारेण तिथे पानी काढेण,पण निघत नव्ह्तंना.
मग मी हळुच प्रार्थनेत एक ओळ वाढवली की जर मला देणेकरी मिटवुन माझ्याकडे १० लाख आले तर मी कायमची निव्रुत्ती घेईल म्हणौन. आनी साधारनपणे ८-९ महीन्यांनी माझी माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने एका आयटीआयच्या अधीकार्याशी ओळख झाली. त्यांनी माझी कहानी ऐकुन मला मदत केली. संपुर्ण महाराष्ट्राच्या आयटीआयचे काम मला मिळाले तेही स्वतःचा पैसा न लावता. पैसा कंपनीचा ओळख माझी आनी सर्व्हीसही कंपनीची. मग तीनच वर्षात मला १६ लाख त्यातुन मिळाले. चार लाख कर्जदारांचे दिले. १० लाख शेअरबाजारात लावले. दोन लाख पिणे -खाणे आनी भटकंती यात लावुन भारतभर फिरलो. बरेच आश्रमही पालथे घातले. मी ३५ व्या वर्षी रिटायर झालो. माझा मॅनेजर होता माझा चुलतभाउ जो आठवी पास आहे तीही गावची. त्याच्या गळ्यात व्यवसाय घातला, अट एकच संध्याकाळी प्यायला अन मटन-मच्छी खायला पाहीजे मला बस्स. बाकी तुझे. त्याने बेट्याने जोमाने धंदा वाढवला, आज तीनचार घरे आहेत, पैसा गाठीशी आहे, मार्केटला पत आहे, नातेवाई॑कात(दाखवण्याची का होईना) इज्ज्त आहे. नंतर मी विपश्यनेला गेलो. दारु आनी अभक्ष भक्षण ही बंद झाले. आनी आता वेगळ्याच मारगावर स्थिर झालो जो कधीही मी अनुसरेल असे मला कधीच वाटले नव्हते. यात मी लग्न केले नव्हते ही बर्याच जनांना जमेची बाजु वाटते पण त्यापेक्षा मला माझ्या घरच्यांची अनेकपटींनी जबाबदारी होती, आजही आहे. आमच्या घरात आजही मीच न कमावताही कमावता आहे, आईला पेंन्शन आहे. माझा भाउ आजही काहीच कमावत नाही त्यामुळे आईची पेंशन त्याला मिळते व आइला पेंशन मला द्यावी लागते. पण आजही मला असे वातत नाही की मी यांना पोसतो. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे.असो.
प्रयन्त न सोडता प्रार्थना करौन पहा कोणीही हा अनुभव घ्यावा. कुणाला वाटेल ही अंधश्रद्धा आहे पण नाही होते काय. खरोखर निर्मळ( हे मनाने हे आपले आपल्याला चांगले समजते. आनी अहंकार बराच कमी झाल्याशिवाय मन नर्मळ होत नाही हे ध्यानात च्या) मनाने प्रार्थना केल्यावर होते काय की. तुम्ही त्या वेवज जगामधे प्रक्षेपीत करता, आनी त्याच्याशी जुळणारे लोक हळुहलू तुमच्या संपर्कात येतात किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात येता.
मनुश्याला मनुश्य म्हणतात कारण वो अपने ही मानस(मनोव्यापार) का पुत्र/संतान है.
हा सगळा माझा अनुभव आहे. जे वाइट वागले त्यांच्याबद्दलही सद्भावना बाळगा. आपले मन कुठल्याही परिस्थीतीत दुषीत होउ देउ नका. जे पटेल ते घ्या ,न पटलेले अर्थातच माझ्याकडेच राहील.
22 Sep 2014 - 11:41 am | जयंत कुलकर्णी
डॉ. गोल्डरॅट म्हणतो की बर्याच वेळा आपण निर्णय घेतो व त्यानंतर तो चुकला की पश्चत्ताप करत बसतो. निर्णय घ्यायची प्रक्रिया ही आपण जी गृहितके जमेस धरतो त्यावर बरीच अवलंबून असते. निर्णय घेण्या अगोदर जर ही गृहितके (Assumptions) नीट तपासली तर आपले निर्णय चुकिची ठरण्याची शक्यता बरीच कमी होते. या थॉट प्रोसेसवर त्याची पुस्तकेही उपलब्ध आहेत. सगळ्याचे मूळ हे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचे ठरते. कधी कधी हे का ते असेही प्रसंग उदभवतात त्यावेळी तर त्याची थेअरी अत्यंत उपयोगी पडते....असो...आपल्याला पुढील वाटचालीसाठे शुभेच्छा...खात्री आहे आपण अजून एका वर्षात मी या परिस्थितीवर कशी मात केली यावर उद्भोदक लेख लिहाल.....
22 Sep 2014 - 4:41 pm | संदीप डांगे
सगळ्या घटनांचा सुसूत्र विचार करत होतो, तेंव्हा लिहावेसे वाटले, पहिल्या भागातच भूतकाळ संपला आहे. त्यावर काथ्याकुट करणे म्हणजे वेळेचा आणि बुद्धीचा अपव्यय आहे. त्याचबरोबर घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलणे हे अशक्य आणि अनावश्यकही आहे. इथून पुढे नेमके काय करत आहे आणि नेमक्या काय मदतीची अपेक्षा आहे ह्या बद्दल लिहिणार आहे.
पहिल्या भागावर प्रतिक्रिया थांबवता येतील असे काही करता येईल का? कारण त्या भागावर मला चर्चेची आवश्यकता वाटत नाही. घडून गेलेल्या घटनांचा उहापोह काहीच उपयोगाचा नाही. मी फार तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला पण चिरफाड होण्यामध्ये तो तटस्थपणा राहणार नाही.
चिरफाड होईल अशी अटकळ होतीच. घटनेचे गांभीर्य त्यातले बारीकसारीक तपशील कळले कि कमी होतेच. साधारणपणे परिस्थितीने गांजलेला माणूस आणि स्वताच्या चुकांनी गांजलेला माणूस ह्या दोहोंकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम वेगवेगळा होतोच.
त्यामुळेच पहिल्या भागावर काही प्रतिसाद दयायचे मी स्वत: थांबवले आहे. आता हातात असलेली कामे करत आहे. भविष्यात काय करेन ह्याचा पूर्ण विचार झाल्यावरच पुढचा भाग लिहिणार आहे. ३ भागात हि मालिका संपणार आहे. तसही माझी कर्मकहाणी चावडीवरची चर्चा व्हावी अशी इच्छा नाही. कुठेतरी जबाबदार ठिकाणी या माझ्या भावनांची नोंद व्हावी अशी अपेक्षा मिपावरच टाकण्यामागे होती
22 Sep 2014 - 5:45 pm | एस
तुमच्या भावनेशी सहमत आहे. संमंने पहिला आणि हाही धागा वाचनमात्र केल्यास पुढील भागांवरील फोकस कायम राहील आणि उगाच जास्त चर्वितचर्वण टळेल असे मलाही वाटते. आत्तापर्यंत झालेली चर्चा समर्पक असली तरी झाली तेवढी पुरेशी आहे.
22 Sep 2014 - 5:35 pm | सस्नेह
तटस्थ शब्दात उघड व्यक्त केल्याबद्दल संदीप भाऊंचे अभिनंदन !