ब्रह्मांड

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
5 Sep 2014 - 2:49 am

शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं.

आणि मग तू मला भेटलास.

"काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस.

"तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता?

"माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..."

"हो" मी म्हणालो.

"मी .. मी मेलोय ??"

"हो. वाईट वाटून घेऊ नकोस, सगळेच कधी ना कधी मरतात."

तू आजूबाजूला बघितलंस .. नुसतीच पोकळी. रंगहीन, गंधहीन, भकास. तिथे फक्त तू आणि मी, दोघंच. "मी कुठाय मग? हे मृत्युनंतरचं जग? स्वर्ग की नरक?"

"ते अजून ठरायचंय" मी म्हटलं.

"तू कोण आहेस? देव... परमेश्वर??" तू संभ्रमीत होऊन विचारलंस.

"हो" मी म्हणालो "तुम्ही ज्याला देव म्हणता तो मीच आहे"

"माझी मुलं.. माझी बायको .."

"त्यांचं काय? " मी विचारलं.

"ते सर्व सुरक्षित आहेत ना? त्यांचं सगळं नीट होईल ना?" काळजीच्या सुरात तू विचारलंस.

"मला तुझं हेच वागणं आवडतं." मी म्हणालो "तू नुकताच मेला आहेस. पण तुला मुख्य काळजी तुझ्या कुटूंबियांची. चांगली गोष्ट आहे."

तू माझ्याकडे पाहिलंस, तुझी नजर मला जोखत होती. तुझ्या मनात जसं देवाचं चित्र असतं तसा मी अजिबातच नव्हतो. विराटरूप वगैरे सोडा, मी तर अगदीच साधा दिसत होतो. एखाद्या शाळामास्तरासारखा.

"काळजी करू नकोस, सगळं ठिक होईल त्यांचं" मी म्हणालो "तुझ्या मुलांना तुझी आठवण एक प्रेमळ बाप अशीच राहिल. ती अजून लहानच असल्यामुळे तुझ्याविषयी त्यांना प्रेमच वाटत होतं, आणि आता तुला त्यांचं प्रेम टिकवण्यासाठी काहीच करण्याची गरज नाही. त्यांच्या तुझ्याकडनं कुठल्याच अपेक्षा नसल्याने आता तू त्यांचा अपेक्षाभंगही करू शकणार नाहीस. तुझी बायको रडेल चार दिवस आणि मग तिच्या जगात रमून जाईल. खरं तर ती मनातून थोडी सुखीच होईल. तुमचं लग्न फार काळ टिकणार नव्हतंच. पण तरीही मनातून होत असलेल्या थोड्या समाधानाचीच तिला शरम वाटत राहिल."

तू गप्प होतास. तुलाही हे नवं नव्हतंच.

"मग पुढे काय? मी स्वर्गात जाणार की नरकात" तू विचारलंस.

"कुठेच नाही, किंवा आपण असं म्हणू की ते तूच ठरवायचं आहेस. तुला पुनर्जन्म मिळेल"

"काय? माझा पुनर्जन्म वगैरे थोतांडावर कधीच विश्वास नव्हता.. म्हणजे ते हिंदू धर्मात सांगीतलं आहे ते बरोबर आहे तर!" काहिश्या नाराजीनेच तू म्हणालास.

"माझा जेव्हा पुनर्जन्म होईल, मी पुन्हा कोर्‍या पाटीसारखाच असेन ना? छोटं बाळ? मी आजवर जे आयुष्य जगलो, पैसे कमावले, वेगवेगळे अनुभव घेतले, ते सर्व वायाच गेलं!" तू थोडा हताश होत म्हणालास.

"नाही, तुला आजवर आलेले सगळे अनुभव तुझ्या जवळ सुरक्षित आहेत. फक्त तुला ते आत्ता आठवत नाहीयेत."

काही न कळल्याने तू नुसतंच माझ्याकडे पाहीलंस,

मी आपुलकीने तुझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, "तुझा आत्मा ही अजब गोष्ट आहे. सर्वात सुंदर आणि तितकीच क्लिष्ट. तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी. तुझं मन हे तुझ्या आत्माच्या एक सहत्रांशा इतकाही भाग साठवू शकत नाही. म्हणजे बघ, आंघोळ करण्या आधी बादलीतलं पाणी गार आहे की गरम हे समजण्यासाठी बादली अंगावर ओतण्याची गरज नसते, एक बोट जरी पाण्यात बुडवलंस तरी त्या पाण्याची अनुभूती तुला होते. तुझ्या बुद्धीचा वापर करून तू त्या पाण्याच्या उष्णतेचा अनुभव घेऊ शकतोस. तशीच मनाचा वापर करून तू आत्म्याची अनुभूती घेऊ शकतोस."

"तू गेले चौतीस वर्ष मानव रूपात पृथ्वीवर होतास, म्हणून तूला आधीचे आठवायला पुरेसा वेळ मिळाला नाही. जर आजून काही वर्षं जगला असतास तर कदाचीत तुला तुझीच ओळख पटली असती."

"म्हणजे...आजवर मी कितीवेळा असा पुनर्जन्म घेतलाय?"

"कित्येक वेळा, आणि प्रत्येक वेळा मानवाचाच नव्हे तर पशु, पक्षी आणि झाडांचा सुद्धा" मी शांतपणे म्हणालो, " ह्या वेळी तू हजार वर्षापूर्वीच्या एका गरीब चिनी शेतकर्‍याची मुलगी म्हणून जन्म घेशील"

"का.. काय? तू मला पुन्हा भूतकाळात पाठवतो आहेस? मी भूतकाळात जन्माला कसा.." चक्राउन तू विचारलंस.

"हो. एका अर्थी तुझं बरोबरच आहे. तुझ्या दृष्टीने काळ हा फक्त पुढेच जातो. एखाद्या नदीत पडलेल्या पानाप्रमाणे तू उलटा प्रवास करू शकत नाहीस. माझं तसं नाही. मी काठावर उभा आहे. माझ्यासाठी काळ स्थिर आहे. म्हणून मी मागे किंवा पुढेही जाऊ शकतो."

"पण जर मी भूतकाळातही असेन तर मीच मला कधीतरी भेटू शकतो.. हे कसं शक्य आहे?" अजूनही तुझा विश्वास बसत नव्हता.

"भेटू शकतो नव्हे, भेटतोच. अगदी नेहमी. पण तुला ते कळतही नाही कारण तुझा प्रत्येक जीवन काल दुसर्‍यापासून वेगळा आहे"

"मग ह्या सगळ्यला काय अर्थ आहे?" तू त्रासून विचारलंस

"तोच तुला शोधायचा आहे. त्यासाठीच तुझा हा आटापिटा चालला आहे. किंबहुना जन्ममृत्यूचा उलगडा व्हावा म्हणूनच हे विश्व निर्माण केलं आहे मी. तूझी प्रगती व्हावी, तुला आत्मज्ञान मिळावं म्हणून."

"माझी म्हणजे .. मानवजातीची? तू मानवजातीच्या प्रगतीसाठी हे विश्व निर्माण केलं आहेस?" गोंधळून तू विचारलंस.

"नाही, फक्त तुझ्यासाठी. प्रत्येक जन्ममृत्युच्या फेर्‍या नंतर तू अजून मोठा होतो आहेस, ज्ञानी होतो आहेस."

"फक्त माझ्यासाठी? का? मग बाकीच्यांचं काय?" पुन्हा गोंधळून तू विचारलंस.

"बाकी कोणीच नाही." मी म्हणालो. "ह्या विश्वात फक्त आपण दोघेच आहोत. तू आणि मी."

या शब्दांचा अर्थ शोधत असल्याप्रमाणे तू थोडावेळ गप्प राहिलास. मग माझ्याकडे बघून पुन्हा विचारलंस "पण मग पृथ्वीवरचे सगळे लोक..."

"तूच आहेस." तुला मधेच थांबवत मी म्हटलं. "तुझेच वेगवेगळे जन्म. तुझीच वेगवेगळी रुपं"

"म्हणजे.. मीच आहे सगळीकडे ?" स्वतःशीच विचार करत तू म्हणालास.

"बरोबर!" खांद्यावर थाप मारत मी आनंदाने म्हणालो, "आता कळतंय तुला!"

"पृथ्वीवरचा प्रत्येक जीव म्हणजे मीच?"

"वर्तमानातला, भूतकाळातला आणि भविष्यातला सुद्धा"

"म्हणजे मी गांधी, मी शिवाजी? मी करोडपती, मीच भिकारी?" अविश्वासाने तू विचारलंस

"हो"

"मी हिटलर सुद्धा?" पुन्हा तू विचारलंस.

"आणि ज्या लोकांचा त्याने छळ केला तेसुद्धा तूच."

"मी राम, कृष्ण आणि बुध्द ?"

"आणि त्याचे शेकडो हजारो अनुयायी."

तू शांत झालास.

"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास."

"का" तू मला विचारलंस "कशासाठी हे सगळं मायाजाल?"

"कारण एके दिवशी तू माझ्यासारखा होशील. कारण मूळात तूही माझ्यासारखाच आहेस. एकमेवाद्वितीय."

"थांब थांब.. मी तुझ्यासारखा होईन? मी ईश्वर होईन ?" पुन्हा अविश्वास.

"अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे तुला. तुझी वाढ अजून पूर्ण व्हायची आहे. एकदा का तू सर्व आयुष्य जगून काढलीस की तुझा खर्‍या अर्थाने जन्म होईल."

"म्हणजे एक विश्व म्हणजे .. " तू म्हणालास "विश्व म्हणजे एक .. "

"अण्ड एक प्रकारचं... ब्रह्माण्ड" मी उत्तरलो "चल आता तुला जायला हवं"

आणि तू तुझ्या मार्गावर पुन्हा चालू लागलास.

(समाप्त)

(अँडी वेर यांच्या "अ‍ॅन एग" ह्या कथेचा स्वैर अनुवाद)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

5 Sep 2014 - 3:50 am | स्पंदना

अनुवाद आवडला.
कधी वाचला नव्हता मुळ लेख आजवर.
मुख्यतः या लेखाला कोणत्याही धर्माचा पेहराव नाही हे विशेष आवडल.

स्पा's picture

5 Sep 2014 - 4:03 am | स्पा

अप्रतीम

मूकवाचक's picture

5 Sep 2014 - 5:36 pm | मूकवाचक

+१

खटपट्या's picture

5 Sep 2014 - 5:13 am | खटपट्या

खूपच छान !!!

आयुर्हित's picture

5 Sep 2014 - 1:12 pm | आयुर्हित

"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास."

अँडी वेर यांच्या "अ‍ॅन एग" या लेखाचा सुंदर अनुवाद.
मनापासुन धन्यवाद.

स्वप्नांची राणी's picture

5 Sep 2014 - 1:32 pm | स्वप्नांची राणी

अनुवाद म्हणून मस्स्त्तच झालाय!! पण मला काही कळलं नाही..

सुरेख अनुवाद. मूळ लेखाचाच आशय सुंदर आहे, आणि अनुवादही सरस.

भिंगरी's picture

5 Sep 2014 - 2:49 pm | भिंगरी

"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास."
या एका वाक्यातूनच बोध घेण्यासारखे खुप काही आहे.

प्यारे१'s picture

5 Sep 2014 - 5:42 pm | प्यारे१

खूपच छान.

कवितानागेश's picture

5 Sep 2014 - 6:03 pm | कवितानागेश

सुंदर. :)

आदूबाळ's picture

5 Sep 2014 - 6:20 pm | आदूबाळ

जबरीच आवडलं.

"मग ह्या सगळ्यला काय अर्थ आहे?" तू त्रासून विचारलंस

इथून पुढे कथा फिलॉसॉफिकल न करता नारायण धारप / रत्नाकर मतकरीही करता आली असती.

सखी's picture

5 Sep 2014 - 9:25 pm | सखी

आवडला अनुवाद.
अण्ड एक प्रकारचं... ब्रह्माण्ड! हे भारीच :)