अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी । आपुलिये संवसाठीं करुनि ठेला ॥४॥
पांडुरंगाच्या भक्ती मधे आकंठ बुडालेल्या वारकरी सांप्रदायाच्या भक्ती मार्गातला परमोच्च बिंदु असलेल्या माउलींच्या पालखी सोहळ्यात सामील व्हायची, पालखी बरोबर बरोबर चार पावले चालायची इच्छा बरेच दिवसांपासुन मनात होती पण कधी माउलींचे बोलावणे येत नव्हते. या वर्षी तो योग जुळून आला.
बरेच दिवस आणि बरीच फोना फोनी केल्या नंतर मी ठरल्या प्रमाणे दि २१-०६-२०१४ रोजी सकाळी आठ वाजता म न पा भवन बस स्थानकावर पोचलो आणि १२१ नंबरच्या ऐतिहासीक बशीत स्थानापन्न झालो. (या १२१ नंबरच्या बशीला मोठा इतिहास आहे. रोज पुण्यातुन भोसरीला जाणार्यांना तो ठाउक असतोच. पण त्या बद्दल पुन्हा केव्हातरी)
मुंबई पुणे महामार्गावरुन बस धावायला लागली आणि पुण्याच्या दिशेने येणारे वारकर्यांचे थवेच्या थवे दिसू लागले. काही जण चालत होते तर काही ट्रक, टेंपो किंवा इतर मिळेल त्या वहानाने पुण्याच्या दिशेने चाललेले होते. या मार्गावरुन जगत् गुरु तुकोबारायांची पालखी जाते. त्यांच्या स्वागता करता मांडव सजवण्या साठी चाललेली कार्यकर्त्यांची लगबग नजरेत भरत होती. बशीत गच्च भरले गेलो असल्या मुळे या सगळ्यांचे फोटु काढायला काही जमले नाही.
भोसरी पुलाखाली नेउन बसचालकाने आम्हाला आदळले आणि मग तसेच घरंगळत एका टमटम मधे स्थानापन्न होउन आळंदी रोड च्या दिशेने आम्ही कुच केली. ह्या रस्त्यावर सुध्दा प्रचंड गर्दी उसळली होती. सगळेजण एकाच दिशेने चालले होते. कोणी चालत तर कोणी आमच्या सारखे टमटमने. विरुध्द दिशेने येणार्या वहानांमधे कोणीही प्रवासी दिसत नव्हते. चालक रिकामीच गाडी पळवत होते कारण भोसरीला त्यांच्यासाठी बरीच गिर्हाइके खोळंबली आहेत हे त्यांना माहीत होते. साधारण दहा मिनीटात आम्ही आळंदी रोडला पोचलो.
फोटो क्र. १
माउलींची पालखी अजुन तिथे पोचायची होती. पालखीची वाट पहाणारे बरेच भाविक तिकडे थांबलेले होते.
फोटो क्र. २
पाण्याच्या टाकी जवळ डोंबार्यांचा खेळ चाललेला होता. पण त्या खेळात फारसे अडकुन न रहाता आम्ही आळंदी रस्त्याकडच्या गर्दीत घुसलो आणि आळंदीच्या दिशेने चालायला लागलो कारण आता माउलींच्या दर्शनाची आम्हाला घाई झाली होती.
फोटो क्र. ३
थोडेसेच पुढे गेल्यावर माउलींच्या नगार्याचे दर्शन झाले
फोटो क्र. ४
नगार्याच्या मागोमाग मानाच्या अश्वाचे दर्शन झाले.
फोटो क्र. ५
नामस्मरणात रममाण झालेले एक वीणेकरी बुवा
फोटो क्र. ६
वारजे गावातील एक दिंडी
फोटो क्र. ७
दिंडीत सामील झालेल्या एक अज्जी.
फोटो क्र. ८
अग्नीशामक दलाची गाडीही सतत पुढे मागे फिरत होती.
फोटो क्र. ९
माउलींच्या रथाचे पहिले दर्शन.
फोटो क्र. १०
आणि ही माउलींच्या पादुकांच्या दर्शना साठी उडालेली झुंबड.
रथा जवळ इतकी गर्दी होती की पादुकांचे दर्शन घेता आले पण तिकडला फोटो काढायची काही सवड मिळाली नाही.
फोटो क्र. ११
रथा मागच्या एका दिंडी मधे आजुबाजुच्या गर्दीची, कोलाहलाची अजिबात फिकीर न करता चाललेले एक बुवा
माउलींच्या पालखीच्या मागे पुढे इतके लोक होते पण कोणी शिस्त मोडत नव्हते. सगळे कसे शांतपणे आणि रांगेत चालत होते. माउलींच्या रथा भोवती सुध्दा कडे करुन उभे असणारे तरुण भावीकांवर उगाच खेकसत रुबाब झाडत नव्हते. कोणी जरा जास्तच रेटारेटी करायला लागल तर "माउली जरा शिस्तीत घ्या." इतकेच म्हणत होते. नेहमीच्या गर्दीत येणारा ओरडाआरड भांडणे शिव्यागाळीचा इथे लवलेशही नव्हता. एकमेकाला धक्का लागला तरी "माउली माउली" म्हणत जो तो बाजुला सरकत होता. एखादा तरुण उत्साहाच्या भरात जरा जास्त वहावायला लागला तरी "देवा, जरा सांभाळुन रहा, माउली बघत आहेत" इतकच त्याला सांगीतलं जात होत आणि मग तो तरुणही ही उलट उत्तरे वगेरे न करता निमुट पणे पालखी बरोबर चालु लागत असे. बस हे असच किंबहुना या पेक्षाही जास्त हळुवार पणे, प्रेमाने चालले होते. इतर वेळा सगळे जण नामस्मरणात नाहीतर भजनात रममाण झालेले दिसत होते. जणु काही त्या पांडुरंगा शिवाय दुसरे तिसरे कोणी त्यांना दिसतच नव्हते. दोन वारकरी एकमेकांना भेटतांना सुध्दा पहिल्यांदा एकमेकांच्या पाया पडुन मग गळाभेट घेउन मगच ख्याली खुशाली विचारत होते. हा सगळा अनुभव माझ्यासाठी तरी खुपच नवा आणि विस्मयकारक होता.
ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करुनि ठाके उभा । तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ॥
याचा जणु प्रत्ययच या वारकर्यांनी घेतलेला होता.
फोटो क्र. १२
एका दिंडी सोबत पंढरपुरला चाललेला ट्रक.
प्रत्येक दिंडीबरोबर असा एखादा तरी ट्रक असतोच. यात दिंडीतील वारकर्यांची सोय बघण्यासाठी आवष्यक असलेले सगळे सामान ठेवलेले असते. दिंड्या चालु लागल्या की हे ट्रक पुढच्या विसाव्याच्या जागेवर जाउन थांबतात आणि मागुन येणार्या दिंडीकर्यांची सोय बघतात. या ट्रक मधे स्वयंपाकाचे सगळे सामान गॅस, मुक्कामाच्या ठिकाणी उभारायचे तंबु व इतर अत्यावश्यक जीन्नस ठेवलेले असतात. या शिवाय एखादा वृध्द अपंग किंवा आजारी वारकरी सुद्धा या ट्रक मधुन प्रवास करु शकतो. चालुन चालुन दमलेले वारकरी सुध्दा अधुन मधुन आपल्या ट्रक मधुन पुढे जाउन थांबतात. वारीच्या बाजूबाजूने चालणार्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेत हे ट्रक पुढच्या विसाव्याच्या ठिकाणी जात असतात. प्रत्येक दिंडीची विसाव्याची ठिकाणे ठरलेली असतात. वर्षानुवर्षे ह्या दिंड्या अशा ठरलेल्या ठिकाणांवरच विसाव्यासाठी, भोजना साठी किंवा रात्रीच्या विश्रांती साठी थांबत असतात.
फोटो क्र. १३
दिंडीचा क्रमांक दाखवणारा फलक. दिंडीतला एक माणुस सतत असा फलक घेउन दिंडी बरोबर चालत असतो. दिंडीत चालणारे सगळे वारकरी ह्या नंबरवर चालत असतात. एखादा वारकरी जर मागेपुढे झाला तर तो आपला नंबर शोधत आपल्या वारी मधे सामिल होतो. या नंबरची शिस्त वारीमधे कसोशीने पाळली जाते. एखादा दुसरा नंबर पुढेमागे होउ शकतो पण दुसर्याच्या नंबरामधे घुसायचा प्रयत्न कोणीही करत नाही.
सर्वांच्या सोयी साठी आणि वारीच्या कार्यक्रमात सुसुत्रता आणण्या करता आळंदी ज्ञानेश्वर संस्थान तर्फे एक श्रीज्ञानेश्वर पालखी सोहळा समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारी चालू असते. पालखी सोहळ्याच्या समितीकडे सर्व अधिकृत दिंड्यांची नोदणी केलेली असते. काही दिंड्या पालखी सोहळ्याच्या सुरुवातीपासून आजतागायत सतत चालू आहेत. नोंदणी केलेल्या सर्व दिंड्यांना समितीतर्फे माउलींच्या रथाचा आधार घेऊन एक नंबर दिला जातो (उदाहरणार्थ ‘रथासमोर ३ किंवा रथामागे १९५) आणि त्यांना आपापल्या क्रमांकानुसार वारीमध्ये चालावे लागते. त्यामुळे एक दिंडी दुसऱ्या दिंडीच्या पुढे जाऊ शकत नाही. जर समोरील दिंडी थांबली असेल तर मागच्या सर्व दिंड्या आपले स्थान सांभाळून उभ्या राहतात. याशिवाय अनेक माणसे कुठल्याही दिंडीत सामील न होता स्वतः चालत असतात. त्यांना क्रमाने चालण्याचे बंधन नसते. ते बाजूबाजूने चालत सर्वांच्या पुढे जाऊ शकतात. याशिवाय अधिकृत मान्यताप्राप्त दिंड्या व्यतिरीक्त काही दिंड्या पालखी सोहळ्यात भाग घेतात. अधिकृत दिंडी नसलेल्यांना सर्व नंबर असलेल्या दिंड्यांच्या मागे रहावे लागते. आम्ही असेच दिंड्यांच्या बाजुबाजुने पालखीच्या पुढे मागे चालत होतो.
सगळे जण कसे शिस्तीत आदबशीर पणे दुसर्याचा पूर्ण आदर ठेवत चालत होते.
फोटो क्र. १४
असेच शिस्तीने चाललेले काही वारकरी
फोटो क्र. १५
दिघीच्या जवळ आल्यावर काहिंनी असा डोंगराच्या बाजुने शॉर्टकट मारुन पुढे जाउन थांबणे पसंत केले.
फोटो क्र. १६
फोटो क्र. १७
फोटो क्र. १८
पोलीसांना खरेतर इथे काहीच काम नव्हते. सगळे पोलीस कपाळावर नाम लावुन बंदोबस्ताला तैनात होते.
फोटो क्र. १९
मोबाईल चहाची टपरी
फोटो क्र. २०
आणि किरकोळ वस्तुंचे मोबाईल दुकान
अशी बरीच दुकाने वारी बरोबरच चालत असतात. वारी पुढे गेली की दुकान बंद गाडी सुरु आणि पुढे जाउन थांबायचे. या दुकानांवर अनेक सुविधा सुध्दा उपलब्ध होत्या. जसे मोबाईल चार्जींग व दुरुस्ती, थंड पाण्याची बाटली, एस. टी. डी. इत्यादी. या शिवाय रस्त्यावरच चादर पसरुन गोळ्या बिस्कीट, खेळणी विकणारे किरकोंळ दुकानदार बरेच होते. कोणी पाण्याच्या बाटल्या स्वस्त दरात विकत होते. तर कोणी मोबाईलची कव्हर, तर कोणी लायसन्स ठेवण्यासाठी लागणारी प्लॅस्टीकची कव्हर्स.
याशिवाय मोठे मोठे प्लॅस्टीकचे कागद विकणारीही बरीच मंडळी होती. साधारण २ X १ मिटरचा प्लॅस्टीकचे कापड २५ रुपयात मिळत होते. या कापडाचे अनेक उपयोग असतात. पाउस आला तर सामानाचे आणि स्वतःचे पावसापासुन संरक्षण करण्या साठी, जेवायला बसताना अंथरायला, कधी तात्पुरता अडोसा उभा करायला आणि झोपताना अंथरुणाखाली घालायला.
फोटो क्र. २१
वारी बरोबर सतत फिरणारा महाराष्ट्र शासनाचा पाण्याचा टँकर. याच टॅकरला मागच्या बाजुला पाईप लावुन बरेच नळ जोडलेले होते. बरेच वारकरी पिण्याचे पाणी याच टँकर मधुन भरुन घेताना दिसत होते. अशाच पाण्याच्या टँकरची सोय पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने सुध्दा केलेली होती.
फोटो क्र. २२
पिंपरी चिंचवड मनपा ने उभारलेला स्वागत कक्ष. येणार्या प्रत्येक दिंडीला मनपा तर्फे श्रीफल देउन सत्कार करण्यात येत होता व प्रत्येक दिंडीला एक भेटवस्तु देण्यात येत होती.
फोटो क्र. २३
पिंचि मनपा तर्फे मिळालेल्या भेटवस्तु सह एक दिंडी प्रमुख.
फोटो क्र. २४
स्वागत कक्षाच्या थोडेच पुढे माउलींची पालखी विश्रांती साठी थांबलेली होती.
फोटो क्र. २५
आणि त्या बरोबरच वारकरी सुध्दा. आम्ही पण थोडेसे पुढे जाउन एका झाडाची सावली पाहुन जरासे विसावलो.
फोटो क्र. २६
तेवढ्यात पालखी बरोबर चालणार्या अश्वाचे तेथे आगमन झाले.
फोटो क्र. २७
आम्ही विसावलो होतो तिकडे आजुबाजुला असे वातावरण होते.
पालखी भोवती कडे करुन चालणारे तरुण दिसले. त्यांच्या मागे पालखी असणार हे समजल्यामुळे सगळे जण सरसावून बसले.
फोटो क्र. २९
आणि मागोमाग पालखी आलीच.
फोटो क्र. ३०
प्रदुषण नियंत्रण मंडळाची गाडी सुध्दा प्रबोधन करत वारी बरोबर फिरत होती.
पांडुरंग पांडुरंग.
क्रमशः
प्रतिक्रिया
1 Jul 2014 - 5:20 pm | सूड
वा वा!! पुभाप्र!!
1 Jul 2014 - 5:27 pm | बिपिन६८
मस्त
1 Jul 2014 - 6:04 pm | एसमाळी
माऊली, दंडवत स्विकारा.
1 Jul 2014 - 7:06 pm | कवितानागेश
सोबत चालल्यासारखं वाटलं... :)
1 Jul 2014 - 7:10 pm | स्पा
वा बुवा
1 Jul 2014 - 7:24 pm | प्रचेतस
मस्तच ओ पैजारबुवा.
1 Jul 2014 - 8:07 pm | बाबा पाटील
नमस्कार स्विकारा.
1 Jul 2014 - 9:23 pm | किसन शिंदे
घरातल्या कामाची थोडी अॅडजस्टमेन्ट झाली असती तर त्यादिवशी मी ही माऊलींच्या पालखीबरोबर पुण्याला चालत गेलो असतो. अवघ्या २० किमीवरून माझी ही वारी हुकली. :(
तसा वारीचा अनूभव नवा नाही. ९ वर्षांपुर्वी पुणे ते सासवड पायी चाललो होतो वारीत त्यावेळी आणि या सगळ्या गोष्टी अनूभवल्या होत्या.
1 Jul 2014 - 10:59 pm | पैसा
जय जय विठोब्बा रखुमाई! छान लिहिलंय ओ पैजारबुवा. भारी अनुभव! त्या सगळ्याचीही वेगळी मजा!
2 Jul 2014 - 6:54 am | मदनबाण
मंदिराचा कळस हलतो... हा नक्की काय प्रकार आहे हे कोणाला माहित आहे का ? नक्की किती मंदिरांचे कळस हलतात ? आणि ते याच काळात हलतात का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल
2 Jul 2014 - 8:38 am | किसन शिंदे
पालखी प्रस्थानाच्या वेळी जेव्हा माऊलींची पालखी समाधी मंदिराबाहेर काढली जाते तेव्हा एकच गजर होतो आणि मंदिराबाहेर असलेल्या सर्वांच्या नजरा कळसाकडे लागतात तो हलतोय कि नाही हे पाहण्यासाठी. प्रस्थानाच्या वेळी कळस किंचितसा हलला म्हणजे माऊली समाधी मंदीरातून बाहेर पडले आहेत अशी तमाम वारकर्यांची समजूत आहे. तसा कळस हलताना काहींना दिसतो, काहींना नाही दिसत. तीन-चार वर्षांपूर्वी माझ्या आईने प्रत्यक्षात कळस हलताना पाह्यला होता.
2 Jul 2014 - 7:34 am | इशा१२३
मस्त वारीतल वातावरण छान टिपलय.फोटोही छान.पण मला पहिले सहा फोटो दिसत नाहियेत.
पु.भा.प्र.
2 Jul 2014 - 10:18 am | मैत्र
पालखीबरोबर असल्याचा आनंद मिळाला.
छान माहिती.
2 Jul 2014 - 11:33 am | ज्ञानोबाचे पैजार
पालखी बरोबर चालताना काढलेला एक व्हिडीओ
पालखी बरोबर वारकरी नुसते चालत नाहीत तर चालतभजनाचीअसा अनंद लुटत जात असतात.
व्हिडीओ दिसला नाही तर ही लिंक
https://www.youtube.com/watch?v=QqS54xFgk4s&feature=youtu.be
पैजारबुवा,
2 Jul 2014 - 4:11 pm | आतिवास
वर्णन आवडलं, त्यात सहभागी झाल्याचा अनुभव देणारं वर्णन आहे.
अवांतरः फोटोतल्या तारखेच्या शिक्क्यांनी रसभंग झाला काहीसा!
2 Jul 2014 - 4:37 pm | दिपक.कुवेत
फारच छान लिहिलं आहे आणि त्याला समर्पक फोटो देखील. माउलीच्या प्रेमापायी/मोहिनी पायी ईतकि लोकं उन, वारा, पाउस याची तमा न बाळगता कुठल्या प्रेरणेने/शक्तीने चालत असतात हे ती माउलीच जाणे. मला सुद्धा निदान एकदा तरी वारी करायची फार ईच्छा आहे. बघुया माउली तो योग कधी घडवुन आणतोय ते.
2 Jul 2014 - 6:16 pm | प्यारे१
+११११
असेच म्हणतो.
2 Jul 2014 - 9:10 pm | यशोधरा
वा, वा! सुरेख सुरुवात. पुढचा भाग कधी?
17 Jul 2015 - 4:54 pm | पद्मावति
आहा..खूप छान लिहिलय. नुसते वर्णन वाचुनही मस्तं वाटलं.