खिडकीत टांगलेल्या पिंजऱ्यात तो पोपट सुखेनैव राहात होता. कधीपासून तो तिथे असा राहात होता ते त्यालाही सांगता आलं नसतं. पण तो निवांत, निश्चिंत होता, मजेत होता, सुखात होता एवढं नक्की!
पिंजऱ्यात बसून ओली डाळ खात असताना एकदा त्याने पाहिलं, रानातून आलेल्या राव्यांचा एक थवा मुक्त कंठाने चित्कार करत या झाडावरून त्या झाडावर, विजेच्या तारांवरून मंदिराच्या उंच घुमटावर सुरकांडया मारत होता. त्या रानपाखरांचे ते चित्कार, त्या मुक्त लकेरी ऐकून तो चकित झाला. त्याला तर फक्त 'मिठू मिठू' म्हणायचंच माहिती होतं. त्यांच्या त्या भराऱ्या आणि त्या भरारीचा वेग पाहूनही तो चक्रावला. तो मात्र त्या वितभर पिंजऱ्यातल्या चिमुकल्या नळीवर बसून डुगडुगल्यासारखे झोके घ्यायचा. किंवा भोवतालच्या पट्टयांना धरून उलटसुलट लोंबकळायचा. त्यातच मन रमवत राहायचा. तिथे तर त्याला पंखसुध्दा पुरेसे फुलवता येत नव्हते आणि या पिंजऱ्यातल्या कसरतीपलीकडे जाऊन आणखी काही आपल्याला करता येईल याची मुळी त्याला कल्पनाच नव्हती. त्यांची अंगंही किती तकतकीत हिरवीगार होती!
काही क्षण तो ती लुसलुशीत डाळ खायचंच विसरला. त्या राव्यांकडे डोळे विस्फारून पाहातच राहिला. त्याची इवलीशी छाती दडपली, पण त्याचवेळी त्याचे पंख फुरफुरले. नळी पकडलेल्या नख्यांची चाळवाचाळव झाली. त्याच्या मनाने उभारी घेतली. मुक्त विहरण्याचं एक रम्य स्वप्न त्याच्या मनात उमलू लागलं.
आता त्या पिंजऱ्याबाहेर कसं पडता येर्इग्ल याचा तो विचार करू लागला. मुक्त लकेरी मारत, उंच भरारत आपल्याला कधी उडता येईल, यासाठी तो आसुसत राहिला. धन्याने दिलेली ओली डाळ, मिरच्या अन् फ्रीजमधल्या शिळया पेरूच्या फोडी खात असताना तो मुक्त विहाराच्या स्वप्नात रमलेला असे.
एक दिवस मोठया धांदलीत असलेल्या त्याच्या धन्याने पिंजऱ्याचं दार काही नीट लावलं नाही अन् घाईघाईतच पत्नीसह तो निघून गेला. तिथल्या तिथेच धडधडणाऱ्या त्या पोपटाचा धक्का लागून ते छोटसं दार सताड उघडलं, अन् पोपट क्षणभर थरारला. हाच क्षण! हाच तो क्षण होता की ज्याची तो किती दिवसांपासून वाट पाहात होता.
'काय करावं?' घराशी येऊन तो हळूच बाहेर डोकावला. त्याने पाहिला, खिडकीच्या त्या चौकोनातून नेहमीच दिसणारा तो आकाशाचा तुकडा! मधल्या पट्टयांचा अडसर दूर होताच किती मोकळा अन् स्वागतशील वाटला तो! त्याला प्रश्न पडला, 'काय करू? सोन्याचा पिंजरा की मुक्त होण्याची ही सोन्यासारखी संधी? काय स्वीकारू?' त्याच्या मनात पुन्हा ते रावे झेपावले. क्षणात त्याने निर्णय घेतला आणि जरा दबकतच तो पिंजऱ्याबाहेर आला.
खिडकीच्या कवाडावर तो जरासा विसावला. 'कुठे जावं?' तो विचार करू लागला, 'एकदम त्या समोरच्या इमारतीपलीकडच्या उंच सोनचाफ्यावर झेप घ्यावी की जरा जवळच?' पण मग तो त्याच इमारतीच्या गच्चीवर गेला. 'बापरे! काय तो आकाशाचा भव्य घुमट!' त्याने तर आजवर फक्त खिडकीतून दिसणारा त्याचा एक तुकडाच तेवढा पाहिला होता. आता मात्र त्याच्या भग्व्यतेने पोपटाचे डोळेच फिरले. चक्करल्यासारखं झालं. हे भव्य आकाश अन् आपले इवलेसे पंख! कसा बसेल यांना मेळ?' मनात शंका उमटली त्याच्या, पण त्याने पुन्हा उभारी धरली. गच्चीतच तो जरा भिरभिरला अन् तिथे डोकावणाऱ्या एका उंच वृक्षावर तो जाऊन बसला. मोकळया वाऱ्यावर डोलणाऱ्या त्याच्या फांदीवर, पानांच्या शीतल छायेत तो झोके घेऊ लागला. पिंजऱ्यातल्या डुगडुगणाऱ्या नळीपेक्षा या फांदीवर झोके घेण्यात किती स्वच्छंद आनंद होता! त्याला खूप मजा वाटली.
त्या अंगणातल्या अन् भोवतालच्या झाडांवरही त्याने झेपा घेतल्या. आपल्या पंखातलं बळ तो धीमेपणाने अजमावत होता. आता त्या रानपाखरांसारखं भराऱ्या घेत जायचं तर ते कुठे जावं? कसं जावं? कोणत्या दिशेला? किती लांब? ह मात्र त्याला उमगेना. अशा काहीशा विचारातच तो पंख पसरून झेपावला. भोवताली पाहू लागला. एक बहरलेलं उपवन पाहून तो तिथे उतरला, तो वाऱ्याच्या झुळुकीबरोबर पेरूचा घमघमाट आला. ते झाड त्याला पट्कनच सापडलं. नुसतं लगडलं होतं फळांनी! त्यातलं झाडावरच पिकू आलेलं एक फळ त्याने हेरलं. आपल्या लालबुंद, बाकदार चोचीने त्याचा एक चावा घेताच त्या मधूर रसाने त्याचं तोंड अगदी भरून गेलं. पिंजऱ्यात आयते मिळणाऱ्या फ्रिजमधल्या पेरूची चवच तेवढी आजपर्यंत त्याला माहीत होती. चवीचा असा अस्सलपणा त्याने कधी चाखलाच नव्हता. त्या अस्सल चवीचा आनंद घेत तो काही काळ तिथे रमला.
तेवढयात त्याला परिचयाच्या त्या लकेरी ऐकू आल्या. जवळच्याच रानातल्या राव्यांचा एक थवा त्या पेरूच्या झाडावरच कर्कश कलकल करत उतरला. त्यांना पाहताच पोपटाला आनंद झाला. त्याने विचारलं, 'कुठून आलात तुम्ही? घर कुठे आहे तुमचं?'
त्यांच्यातला एकजण म्हणाला, 'घरटी आहेत आमची त्या नदीपलीकडच्या रानात. पण आम्ही तिथे फक्त रात्रीपुरतेच जातो. आता तर आम्ही खूप लांब गेलो होतो.'
'मग मीपण येऊ तुमच्याबरोबर? तुमच्यासारखंच घरटं बांधून राहीन मी.' त्याचं बोलणं, त्याचे फिकुटलेले पंख अन् एकूणच खंगलेल्या अवतारावरून त्या राव्यांनी ओळखलं, 'स्वारी पिंजऱ्यातून सटकलेली दिसतेय् आणि अर्थातच मुक्त विहरण्याचा अनुभवच नाहीय्. तरी त्यांनी आपलं म्हटलं, 'यायचं तर ये आमच्याबरोबर, पण सोपं नाही हं ते! आमच्याबरोबरीने भरारी घेता आली पाहिजे. चपळपणा पाहिजे अन् सावधपणा तर खूपच! तू असा खुरडल्यासारखा उडू लागलास तर ससाणेच काय पण तो लबाड कावळासुध्दा फडशा पाडेल तुझा!
'छे: छे:! तसं नाही होणार. मी उडेन तुमच्याबरोबर. पण... पण थोडा सराव लागेल.' चाचरत पोपट म्हणाला.
'सराव?' एक खटयाळ रावा हसून म्हणाला, 'अन् करून कोण घेणार हा सराव तुझ्याकडून? कावळे? की चिमण्या?'
जरा वरमून पोपट म्हणाला, 'म्हणजे तसंच नाही. मी करीन जोर, पण जरा वेळ लागेल. कदाचित! आणि तुमच्यासारख्या मुक्त लकेरीपण घ्यायच्यात मला. खूप आवडेल...'
त्याला अडवत तो रावा म्हणाला, 'मुक्त लकेरी? तुला कोणी सांगितलं त्या 'लकेरी' असतात म्हणून? बाबा रे, या विशाल आकाशाखाली राहायचं, या रानातून त्या रानात अन्न शोधत भटकायचं आणि पुन्हा त्या ससाण्यांसारखे वाटमारे! या सगळयांना तोंड द्यायचं म्हणजे असं शक्तीप्रदर्शन करणारे चित्कार करत राहावं लागतं बरं! उच्च स्वरात असे तीव्र चित्कार करत आम्ही झुंडीने जेव्हा सुरकांडया मारत हिंडतो, तेव्हा आमची ती आक्रमकता पाहूनच कितीतरी वाटमारे दूर राहतात. जमेल तुला हे? पाहू बरं!'
पोपटाने मान डोलावली आणि उंच स्वरात तो प्रयत्नपूर्वक चित्कारला. पण त्याला आपली 'मिठू मिठू' करण्याची सवय झालेली! त्याचा आवाज फाटला, कापरा झाला. त्या राव्यांमध्ये एकच हशा पिकला. पण त्यांच्यातलाच एक प्रौढ रावा पोपटाला म्हणाला, 'असू दे, जाऊ दे. निराश होऊ नको. आम्ही आता पुढे निघालोय्. वाटलं तर चल तू आमच्याबरोबर.' अन् त्या साऱ्यांनी एकदमच भरारी घेतली. पोपटानेही उसळी मारली. सारा जोर एकवटून तो त्यांच्यासह विहरू लागला. कर्कश चित्कार करणाऱ्या त्या राव्यांच्या स्वरात स्वर मिळवून तोही चित्कारला. आवाज जरा फाडला, पण मुक्तकंठाने चित्कारताना खूप मजाही वाटली. त्यांचा वेग मात्र अफाट होता. तो पेलवताना त्याची दमछाक झाली. फारच दमला तसा तो राव्यांना म्हणाला, जरा थांबू या का? त्या तिथल्या झाडावर?'
पण त्या रानपाखरांना असं सारखं सारखं इथे-तिथे थांबत जाणं मानवणारं नव्हतं. समोरच्या डोंगराकडे निर्देश करून त्यांच्यातला एकजण म्हणला, 'आम्ही चाललो त्या डोंगरावर. तू ये वाटल्यास मागून.' आणि ते सारेजण तसेच वेगाने निघून गेले.
दमलेला पोपट दूरदूर जाणाऱ्या त्या पाचूंच्या माळेकडे पाहात होता. हदाश, खिन्न होऊन तो विचार करू लागला, 'आता पुढे काय? काहीच सुचेनासं झालं त्याला. विचार तरी काय करायचा? कशाचा करायचा? किती करणार? अन् किती वेळ करणार? इकडे सूर्य तर मावळण्याच्या बेतात होता. त्याचा जीव धपापू लागला. त्यातच त्या झाडावर रोजचा वहिवाटीचा हक्क असणारे इतर पक्षी जमू लागले. त्याला हुसकू लागले. तसा तो माघार घेऊ लागला. मजल दर मजल करत अखेर तो आपल्या परिचयाच्या परिसरात पोचला तेव्हा त्याला जरा हायसं झालं.
आता तो पूर्वी होता, त्याच इमारतीच्या अंगणातल्या एका झाडावर होता. अंधारून आलं होतं. आकाशाच्या प्रांगणात चंद्रतारका दिमाखात प्रवेशत होते. ती शोभा तो प्रथमच पाहात होता. पण त्यातच रमून चालणार नव्हतं. आजूबाजूला आणखी काही पाखरं विसाव्याला आलेली होती. या नवख्या पाहुण्याकडे ती नवलाईने अन् अविश्वासाने पाहात होती. तो बावरला. आणि पुन्हा वाकडी मान करून दुसरीकडेच कुठे पाहात आहोत असं दर्शवणाऱ्या त्या कावळयाच्या मनात तर भलताच काही डाव असावा अशी शंका त्याला आली. त्यातच आता पोटात भुकेची जाणीव जागी होत होती.
त्याचा जीव व्याकुळला; भुकेने, सुरक्षिततेच्या चिंतेने अन् तेवढेच काय करावं हे कळत नसल्याने! असा व्याकुळलेला, चिंताग्रस्त झालेला तो पोपट, त्याच्याही नकळत एका ओढीने ओढल्यासारखा घराच्या त्या खिडकीपाशी आला. खिडकीच्या कवाडावर बसून तो घरातली चाहूल घेऊ लागला.
त्याचा धनी आपल्या पत्नीला म्हणत होता, 'अग पण असं झालंच कसं? दार तर लावलं होतं मी पिंजऱ्याचं.'
फणकारून पत्नी म्हणाली, 'काही सांगू नका! धांदरटपणा तुमचा, दुसरं काय?'
धनी सुस्कारत पुन्हा म्हणाला, 'असेलही तसं. कदाचित नीट, घट्ट लावलं नसेल, दार! त्याच्या मस्तीत उघडलं असणार. गेला बिचारा उडून, आता काय?'
आपली वाट पाहाणारा, उदास झालेला धनी पाहून पोपटाला धीर वाटला. मुक्त भरारी घेण्याचं त्याचं स्वप्न भंगलं होतं खरं, पण एका मोठया जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखी एक सुटकेची भावनाही त्यात होती! आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. खिडकीतून तो हळूच आत शिरला. पिंजऱ्यावर बसून म्हणाला,
'मिठू मिठू, मी आऽऽलो!'
धन्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या मुखावर आनंद झळकला. विजयानंदाने तो पत्नीला म्हणाला,
'पाहिलंस? किती माया लावलीय् मी त्याला! आला पहा कसा परत!'
आणि मग पिंजऱ्याचं दार उघडून त्याने पोपटाला आत जाऊ दिलं. दार काळजीपूर्वक नीट, घट्ट लावत तो पत्नीला म्हणाला, 'अग, याला दे नं काहीतरी खायला. आहे का नाही?'
मान वेळावत कौतुकाने अन् लटक्या उपरोधाने पतीकडे पाहात ती म्हणाली, 'आहे तर काय? चांगले स्वस्त मिळाले म्हणून गेल्याच आठवडयात आणून ठेवलेत पेरू. आहेत पहा फ्रिजमध्ये. द्या त्याला कापून.'
त्याचं मुक्ततेचं स्वप्न स्वप्नच राहणार होतं. मात्र त्या राव्यांची, मुक्त, भव्य आकाशाची अन् मधुर रानमेव्याची आठवण त्याचं काळीज कुरतडत होती. त्या आठवणीने त्याच्या डोळयातून अश्रू ओघळले अन् धन्याने नुकत्याच आणून ठेवलेल्या पेरूच्या गारढोण फोडींवरून ते कढत अश्रू वाहात राहिले.............
प्रतिक्रिया
8 May 2014 - 5:51 pm | त्रिवेणी
खर सांगु शेवट नाही आवडला*unknw*
8 May 2014 - 5:57 pm | जेपी
+1
बाकी नावावरुन बिकाचा "परवशता पाश दैवे" हा लेख आठवला.
(मोबल्या वरुन प्रतिसाद देत असल्याने बिकांच्या धाग्याची लिंक देता येत नाय)
8 May 2014 - 6:15 pm | स्पंदना
वास्तव म्हणता येइल याला.
आवडली कथा. उगा मुक्त होउन तो भरार्या घेउ लागला वगैरे कथेतच ठिकाय. चारा पाणी आयत मिळणार्याला काय जमणार मुक्त आयुष्य! अन सगळे तर्क शेवटी भुकेपुढे, अन जीवाच्या संरक्षणापुढे मान टाकतात.
8 May 2014 - 6:36 pm | अनुप ढेरे
कथा आवडली. अगदी असलेली नोकरी बदलण्यालापण लागू होईल ही गोष्ट...
8 May 2014 - 7:28 pm | बाबा पाटील
असच काहीतरी झालय राव.....!
8 May 2014 - 11:26 pm | बॅटमॅन
आयला, इलेक्शन फीव्हर चढलाय सर्वांना. कुंचाबी लेख असू, पोलिटिक्सच पहायलेत मिपाकर =))
9 May 2014 - 4:25 pm | हाडक्या
अगदी अगदी ... :)
8 May 2014 - 7:38 pm | आत्मशून्य
अल्केमिस्ट मधील शॉप किपर पात्राची आठवण आली.
8 May 2014 - 11:53 pm | तुमचा अभिषेक
सुरेख रंगवलीय
वाचताना पोपटाच्या भावविश्वातूनच विचार होत होता. जसे स्टुअर्ट लिटिल सिनेमा बघताना आपण त्या उंदराच्या भावविश्वाशी एकरूप होतो तसे झाले.
शक्य असल्यास पोपटाला परत न आणता याच हळूवार शैलीत हि कथा पुढे घेऊन जा, कथानक सुचत गेले तर छान जमेल..
8 May 2014 - 7:54 pm | रेवती
शेवट अपेक्षित असा आहे पण कथा आवडली.
8 May 2014 - 10:40 pm | अमित खोजे
सुरुवातीपासून नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार करणारा पोपट, त्याला आलेल्या पुढच्या अडचणी आणि शेवटी त्याने घेतलेली माघार असेच जाणवत राहिले. शक्य आहे! आणि हा असा विचार करणे सुद्धा चुकीचे नाही. शेवटी बायको पोरांची पोटं तर भरायची जबाबदारी आपल्यावर आहेच. अगदीच पोपटाचे चुकले असेही मी म्हणणार नाही. पण अजून एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नव्हती. म्हणजे दार उघडायची नाही तर अजून एखादा दिवस बाहेर राहून बघायला हरकत नव्हती. दार काही आता परत लवकर उघडले जाइल याची शाश्वती नाही. त्यामुळे थोडी अजून मजा करता आली असती म्हणतो :)
8 May 2014 - 10:46 pm | शुचि
कथा सुरेख रंगवली आहे.
8 May 2014 - 11:16 pm | पैसा
कायम पिंजर्यात रहायची सवय झाली की तेच नशीब बनून जातं आणि सुरक्षित रहाणं हेच खरं आयुष्य वाटायला लागतं. त्या बिचार्याला मुक्त कसं रहायचं हे कुणी शिकवलं नाही तर तो तरी काय करणार? मात्र एकदा स्वातंत्र्य जरासं अनुभवलं तरी आता त्याचं राहिलेलं पिंजर्यातलं आयुष्य आणखी दु:खी होणार हे नक्की.
8 May 2014 - 11:46 pm | आयुर्हित
खूप चांगले निरीक्षण करून लिहिलेली उत्तम कथा....!
यावरून एक गदिमांचे भजन आठवले आकाशी झेप घे रे पाखरा.....
9 May 2014 - 12:56 am | पिवळा डांबिस
कथा चांगली उतरली आहे...
पण त्या पोपटाविषयी सहानुभूती वाटण्यापेक्षा त्याच्या अगतिकतेची दया आली....
9 May 2014 - 1:48 am | बॅटमॅन
यग्जाक्टलि हेच & असेच म्हंटो.
9 May 2014 - 4:44 am | नगरीनिरंजन
अगतिकतेची दया आली.
बिचार्याला सगळ्यांसारखं पिंजरा हेच जग आणि पिंजर्याबाहेर आयुष्य शक्य नाही हे आधीच पटवून दिलं असतं तर ही वेळ आली नसती असे वाटते.
आता सुखासीन आयुष्यात जन्मभराचे दु:ख वागवणे आले.
9 May 2014 - 12:14 pm | कवितानागेश
प्रत्येकाचा वेगळा पिंजरा...
9 May 2014 - 4:36 pm | arunjoshi123
बंधनकारकाचे कोरडे प्रेम नि बद्धांची जोखीम न उचलण्याची प्रवृत्ती फार उत्तम रंगवली आहे.
9 May 2014 - 9:49 pm | आत्मशून्य
म्हणनारे उण्टा वरील शहाणे असावेत अथवा प्रतिसादाची घाई घडली असावी.
पोपट बंदिवान होता. असे असुनही संधी मिळ्ता त्याने जोखीम पत्करली& ही गेव हिज बेस्ट शॉट. प्रयत्न न करता तो परतलेला नाही. खरे तर प्रतिसादाकांनी स्वताला पोपटात बघू नये.
मलाही सुरुवातीला पोपट जोखीम टाळणारा वाटला पण सूक्ष्म निरिक्षण करता पॉप्टाणे जोखीम पत्करली आहे असेच दिसते. तो परतला पण यात दोन सुरेख शक्यता त्याने निर्माण केल्या 1 पुन्हा मुक्त विहाराची 2 दूसरी परत येतो म्हटल्यावर मालकहि त्याला कायम बंदिस्त ठेवणार नाही याची.
10 May 2014 - 2:24 am | तुमचा अभिषेक
दूसरी परत येतो म्हटल्यावर मालकहि त्याला कायम बंदिस्त ठेवणार नाही याची.
>>>>>
क्या बात है, अगदी
10 May 2014 - 2:59 pm | मुक्त विहारि
जीवन भाऊंची "आमचा खंड्या" एका नविन रुपात.....
http://agakke.blogspot.com/2013/06/blog-post.html
12 May 2014 - 3:32 pm | सस्नेह
बोध काही असो, लेखन झळझळीत आहे !
'जीए.' टच जाणवतो.
21 May 2014 - 2:48 pm | मीराताई
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.