बंगलोरहून जवळच असलेलं शिवानीपल्ली हे गाव माझं विरंगुळ्याचं एक आवडतं ठिकाण. एखाद्या शनिवार-रविवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री जंगलात फेरफटका मारण्याच्या दृष्टीने हे गाव एकदम सोईस्कर. बंगलोरहून कारने ४१ मैलांवरचं देकनीकोट्टा गाठावं, आणखीन चार मैल पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला कार पार्क करावी आणि पायवाटेने रमतगमत पाच मैल चालून शिवानीपल्ली गाठावं.
शिवानीपल्ली गाव वनखात्याच्या राखीव जंगलाला लागूनच आहे. गावाच्या पश्चिमेला सुमारे तीन मैलावर सुमारे तीनशे फूटांचा उतार आहे. या उताराच्या पायथ्याशीच एक मोठ ओढा पायथ्याच्या कडेकडेने वाहत जातो. गावाच्या दक्षिणेला दुसरा ओढा पूर्व-पश्चिम दिशेने नागमोडी वळणे घेत पहिल्या ओढ्याला मिळतो. शिवानीपल्लीच्या पूर्वेला पाच मैलावर घनदाट अरण्यात एका टेकडीवर पाचशे फूट उंचीवर वनखात्याचं गुलहट्टीचं विश्रामगृह आहे. गुलहट्टीच्या पूर्वेला साडेचार मैलांवर ऐयूरचं विश्रामगृह आहे. ऐयूरच्या आग्नेय दिशेला चार मैलांवर कुचुवाडी टेकडीच्या जवळ वनखात्याची मोठी शेड आहे. या शेडमध्ये जुनेपुराणे लाकडाचं वजन करण्याचे दोन काटे आहेत. आजुबाजूच्या जंगलातून तोडलेल्या चंदनाच्या झाडाच्या ओंडक्यांचं इथे वजन करून ते देकनीकोट्टाच्या वनखात्याच्या गोडाऊनमधे पाठवलं जातं. शिवानीपल्लीच्या उत्तरेला पाच मैल मोटार रस्त्यापर्यंत आणि त्याच्या पलीकडेही घनदाट अरण्यं पसरलेलं आहे,
शिवानीपल्ली ही जेमतेम आठ-दहा झोपड्यांची लहानशी वस्ती आहे. शिवानीपल्लीच्या उत्तरेच्या दिशेला सुमारे तीन मैलांवर सातीवरम हे तसं बर्यापैकी मोठं खेडं आहे. शिवानीपल्लीच्या चारही बाजूने मैलभर अंतरावर वनखात्याची हद्द लागते. गावाच्या ईशान्येला काही अंतरावर एक लहानसा पाणवठा आहे. गावाच्या दक्षिणेकडच्या उताराखाली मिळणारे ओढे घनदाट जंगलातून आठ मैलांवरच्या अनशेट्टी गावाकडे वाहत जातात.
हा सगळा परिसर एकूणच चित्त्याच्या हालचालींच्या दृष्टीने एकदम योग्य होता. चारही दिशेला असलेल्या खडकाळ टेकड्या, झुडूपांचं रान आणि घनदाट जंगल, पाण्यासाठी दोन ओढे आणि शिवानीपल्लीत मुबलक असलेली गुरं-ढोरं! या भागात चित्त्यांचा नियमीत वावर होता यात काहीच आश्चर्य नव्हतं ! शिवानीपल्लीला मी १९२९ साली प्रथम आलो त्याचं हेच कारण होतं.
शिवानीपल्ली भोवतालच्या जंगलात पाणवठ्याजवळ असलेल्या बांबूपासून ते घनदाट अरण्यात वाढणार्या चंदनापर्यंत विपुल वृक्षसंपत्ती आहे. कित्येक प्रकारचे वृक्ष आणि झुडूपं इथे आढळतात. पूर्व आणि उत्तरेला चंदनाची भरपूर दाटी आहे. निसर्गाने या परिसरावर सौंदर्याची मुक्तह्स्ते उधळण केली आहे. कधी दाट धुक्यात हरवलेली दरी तर कधी ढगांत चेहरा मोहरा लपवून बसलेले डोंगर हे दृष्यं इथे नेहमीचंच!
चांदण्या रात्री मी शिवानीपल्लीच्या आजूबाजूच्या जंगलात कितीतरी वेळा भटकलो आहे. मधेच वाघाची डरकाळी ऐकावी, कधी चित्त्याचा आह् आह् असा आवाज ऐकावा, कधी एकांड्या हत्तीचं अवचीत दर्शन व्हावं तर कधी आपल्याल पाहून धूम पळत सुटणार्या सांबराची फजिती पाहवी. अर्थात हत्तीचा अपवाद वगळता इतर कोणी नजरेला पडण्याची शक्यता खूपच कमी. आपल्या चाहूलीनेच वाघ, चित्ते, सांबरं गुल होतात. कधी एखादं अस्वल मुंग्यांच्या वारुळात तोंड खुपसून बसलेलं दिसेल. अस्वल हा जंगलातला सगळ्यात बेभरवशाचा प्राणी. कधीही कुठेही प्रगट होण्याची सवय असल्याने अस्वल अवचितपणे कुठे भुतासारखं भेटेल याचा नेम नसतो.
१९३४ च्या सुमारास शिवानीपल्लीच्या परिसरात एक आश्चर्यकारक घटना घडली.
सकाळी जंगलात चरायला सोडलेली गुरं घेऊन एक गुराखी गावाकडे परतत होता. या भागात सकाळी नऊच्या सुमाराला गुरांना जंगलात नेणं आणि पाच-साडेपाचच्या सुमाराला परत आणणं हे नित्याचंच आहे. दुभत्या जनावरांच्या सकाळी-संध्याकाळी दोन वेळा धारा काढता याव्यात यासाठी हे वेळापत्रक कसोशीने पाळलं जातं.
पाच सव्वापाचच्या सुमाराला तो गुराखी आपल्या कळपासह गावात परत येत असताना झर्याच्या काठावर त्याला एक आक्रीत दिसलं. एक नखशिखांत काळ्या रंगाचा चित्ता झर्याच्या काठी पाणी पीत होता ! कळप जवळ आला तसं चित्त्याने मान वर करुन गुरांकडे रोखून पाहिलं. कळपाबरोबर गुराखी दिसताच चित्ता शांतपणे वळला आणि जंगलात निघून गेला. तो चित्ता पूर्णपणे काळाभोर होता असं त्या गुराख्याने शपथेवर सांगितलं. अर्थात त्याच्यावर अविश्वास दाखवण्याचं मला काहीच कारण नव्हतं.
काळा चित्ता ही चित्त्याची वेगळी जात वगैरे काहीही नाही. एखाद्या चित्तीणीला अनेक पिल्लं होतात त्यातलं एखादं काळं निपजतं. रंग वगळता इतर कोणत्याही बाबतीत तो सामान्य चित्त्याहून वेगळा नसतो. माझ्या माहीतीप्रमाणे मलाया, ब्रम्हदेश, आसाम इथल्या घनदाट अरण्यांत काळे चित्ते आढळतात. सह्याद्रीच्या पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलातही त्यांचं वास्तव्यं आहे. भरगच्चं घनदाट अरण्यामुळे काळ्या चित्त्याला छपून राहणं सहज साध्य होत असावं. प्राणीसंग्रहालयात जर तुम्ही काळ्या चित्त्याकडे निरखून पाहिलंत तर त्याच्या कातडीवर असलेले मूळचे पिवळसर काळे ठिपके अंधुकसे दिसतात. परंतु एकंदरीतच काळा चित्ता निसर्गाचं पूर्ण न उलगडलेलं रहस्यं आहे हे निश्चित.
माझ्या संपूर्ण शिकार कारकिर्दीत मी फक्त दोन वेळा जंगलात नैसर्गीक अवस्थेतला काळा चित्ता पाहिला. एक म्हणजे पेन्नाग्राम - मुत्तूर घाटात संध्याकाळी सहाच्या सुमाराला झेप घेऊन रस्ता ओलांडून गेलेला आणि हा शिवानीपल्लीचा दुसरा !
ज्या गुराख्याच्या नजरेस हा काळा चित्ता पडला होता त्याने गावात परतताच सर्वांना त्याची हकीकत सांगीतली. त्या गावात वा आ़जुबाजूच्या परिसरात पूर्वी कधीही काळ्या चित्त्याबद्द्ल कोणी ऐकलंही नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. अर्थात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याने त्या गुराख्याला कोणतीच शंका नव्हती, पण तो खराखुरा चित्ता नसून चित्त्याच्या रुपात प्रगटलेला सैतान होता असं त्याचं प्रामाणिक मत होतं ! काही दिवसांतच गावकरी ती घटना विसरूनही गेले.
काही महिन्यांनी गुरांचा एक कळप घेऊन दोन गुराखी जंगलात आले होते. सूर्य प्रखर तेजाने तळपत होता. गुरं दोन - तीनच्या कळपाने सावलीला विसावली होती. गुराख्यांनी बरोबर आणलेली भाजी - भाकरी खाऊन घेतली आणि एका झाडाच्या सावलीत ते वामकुक्षीसाठी आडवे झाले. एकूणच सगळं शांत वातवरण होतं.
कोणाच्या ध्यानीमनी नसताना अकस्मातपणे झडप घालून चित्त्याने ऐका अर्धवट वाढ झालेल्या गाईचं नरडं पकडलं. गाय धडपडत उठल्याने चित्ता जमिनीवरुन उचलला गेला होता, पण आपली पकड मात्र त्याने क्षणभराकरताही सोडली नव्हती. काही क्षणांतच गाय खाली कोसळली.
गाईने वेदनेने फोडलेल्या हंबरड्याने एका गुराख्याला जाग आली. आ SS वासून तो समोरचं दृष्य पाहत होता. त्याचा जोडीदारही एव्हाना जागा झाला होता. अचानकपणे संपूर्णपणे काळ्या रंगात समोर प्रगटलेल्या सैतानाकडे ते हादरून पाहत होते. यापूर्वी जेव्हा चित्त्याने त्यांच्या जनावरांवर हल्ला केला होता त्या वेळी दगड-धोंड्यांचा वर्षाव करून आणि आरडाओरडा करुन त्यांनी चित्त्याला पळवून लावलं होतं. जनावराचा जीव वाचवणं आणि ते शक्यं न झाल्यास किमान चित्त्याला हुसकावून लावणं हा त्यामागचा हेतू होता.
या वेळी मात्र चित्त्याच्या काळ्या रंगामुळे एखादं भूत पाहवं तसे जमिनीला खिळून राहीले होते. गाईच्या गळ्यावरची पकड सोडून चित्त्याने त्यांच्या दिशेने रोखून पाहीलं. पन्नास फूट अंतरावरुनही त्याचे हिंस्त्र डोळे आणि गाईच्या लालभडक रक्ताने रंगलेलं त्याचं तोंड पाहून गुराख्यांची हबेलांडी उडाली आणि ढुंगणाला पाय लावून ते गावकडे पळत सुटले.
गावकर्यांना गुराख्यांकडून सगळी हकीकत कळल्यावर ते चांगलेच विचारात पडले. खरंच काळा चित्ता आला असावा का ? सर्वात प्रथम चित्त्याची खबर देणार्याची त्यांनी चांगलीच टर उडवली होती, पण आ़ज तो आणखिन दोन गुराख्यांना दिसला होता. यापूर्वी चित्त्याने बळी घेतलेल्या जनावरांच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी जंगलात जाण्यास ते कचरत नसत, परंतु चित्त्याचा काळा सैतानी प्रकार त्यांना चांगलाच हादरवून गेला होता.
त्या दिवसानंतर या काळ्या चित्त्याने शिवानीपल्लीतून नियमीतपणे गुरं उचलण्यास सुरवात केली. कित्येक वेळा तो गावकर्यांच्या नजरेस पडला होता. त्याचा काळा रंग ही अफवा नसून वस्तुस्थीती असल्याचं गावकर्यांच्या ध्यानात आलं. त्याची दहशत अशी पसरली की गावापासून अर्ध्या मैल अंतरापलीकडे गावकरी गुरांना चरायला नेईनासे झाले.
चित्त्याल अन्नाचा तुटवडा भासू लागल्यावर त्याने आपलं संचारक्षेत्र वाढवलं. पश्चिमेकडे अनशेट्टी पासून ते पूर्वेकडे गुलह्ट्टी आणि ऐयूर पर्यंत त्याचा धुमाकूळ सुरु राहीला. शिवानीपल्लीच्या उत्तरेला असलेल्या सालीवरम मधूनही त्याने एक गाढव उचललं होतं
माझ्या एका मित्राबरोबर मी याच वेळेला शिवानीपल्लीला आलो होतो. जंगलात एखादा फेरफटका मारावा, जमल्यास लहानशी सागुती मिळवावी असा आमचा विचार होता. शिवानीपल्लीला पोहोचल्यावर या चित्त्याच्या हालचाली आमच्या कानावर आल्या. आतापर्यंत मी एकदाच काळा चित्ता जंगलात पाहिला होता, त्यामुळे जमल्यास या चित्त्यला गाठण्याचा मी मनाशी निश्चय केला.
मी गावकर्यांना पुढच्या बळीची बातमी मला देण्यास बजावून सांगीतलं. मला तार करण्यासाठी त्यांना बसने होसूरपर्यंत यावं लागणार होतं, त्यासाठी लागणारे पैसे मी त्यांच्या हवाली केले. चित्त्याने बळी घेतलेल्या जनावराची किंमत देण्याचं आणि मला योग्य खबर देणार्यास रो़ख बक्षीस देण्याचंही मी कबूल केलं. चित्त्याचा वावर असलेल्या सर्व गावांत माझा निरोप पोहोचवण्याची मी व्यवस्था केली.
कोणत्याही क्षणी निघायच्या तयारीने मी माझं सर्व सामान जय्यत तयार करुन ठेवलं होतं. तब्बल पंधरा दिवसांनी मला चित्त्याची खबर देणारी तार आली. दुपारी चार वाजता माझ्या हाती तार पडल्यावर शिवानीपल्लीला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते. तारखात्याच्या गोंधळामुळे माझ्या हाती तार पडेपर्यंत तब्ब्ल तीन तास वाया गेले होते.
शिवानीपल्लीला राहणारा रंगास्वामी नावाचा गावकरी माझा मित्र होता. माझ्या पूर्वीच्या एक-दोन शिकारमोहिमांमध्ये मला त्याची मदत झाली होती. चित्त्याने सकाळी दहाच्या सुमाराला गाईचा बळी घेतला होता. गुराख्याकडून ही बातमी कळताच रंगाने धावपळ करून देकनीकोट्टा गाठलं होतं आणि सव्वाबाराची बस पकडून होसूरहून मला तार केली होती. गुराखी आणि रंगा यांना योग्य ती बक्षिसी देऊन मी पुढे काय करायचं याचा विचार करु लागलो.
माझ्यापुढे दोन पर्याय होते. रात्रीच्या अंधारात टॉर्चचा वापर करुन चित्त्याला तो भोजनात मग्न असताना गाठणं किंवा दुसर्या दिवशी सकाळी माचाण बांधून त्यावर टपून बसणं. अर्थात त्या रात्री चित्ता शिकारीवर असेलच याची याची काहीच खात्री नव्हती, पण काहीही न करता शिवानीपल्लीत चोवीस तास बसून राहण्यापेक्षा हा पर्याय योग्य होता.
बळीच्या जागेची मी गावकर्यांकडे चौकशी केली. गावापासून जेमतेम अर्ध्या मैलावर जिथे तो तीनशे फूट उतार सुरु होतो त्याच्या जवळच ती जागा होती. हे ऐकताच मी तत्क्षणी निघण्याची तयारी केली. सव्वा आठ वाजत आले होते. या क्षणीदेखील चित्ता आपल्या शिकारीवर ताव मारत असण्याची शक्यता होती. टॉर्च मी आधीच रायफलला लावला होता. जास्तीचे सेल आणि पाच काडतूसं माझ्या खिशात होती. माझ्या .४०५ विंचेस्टर रायफल मध्ये आधीच मी चार काडतूसं भरली होती. रायफलमध्ये पाच काडतूसं मावत असली तरीही मी नेहमी चारच भरतो. एकापाठोपाठ एक गोळ्या माराव्या लागल्या तर जाम होण्याची शक्यता त्यामुळे कमी होते. अंगातला खाकी शर्ट काढून मी काळा शर्ट घातला. पायात पातळ तळव्याचे बूट घातले. जंगलातून वावरताना माझ्या पावलांचा आवाज येऊन देणं खचितच परवडणारं नव्हतं.
रंगा आणि तो गुराखी माझ्याबरोबर कोरड्याठाक पडलेल्या ओढ्यापर्यंत आले. गुराख्याच्या सांगण्यानुसार ओढा पश्चिमेकडे वाहत होता आणि फक्तं दोन वळणांवरच चित्त्याने गाईचा बळी घेतल्याची जागा होती. गाईला मारल्यावर चित्त्याने दुसर्या वळणाच्या उत्तरेला सुमारे २०० यार्ड जंगलात तिला ओढून नेलं होतं. त्यांना गावात परतायला सांगून मी चित्त्याच्या मागावर निघालो.
ओढ्याच्या काठावरुन चालत जाण्यापेक्षा त्याच्या कोरड्या पात्रातून पुढे जाणं जास्तं श्रेयस्कर होतं. पात्रातून चालताना माझ्याकडून बारीकसा आवाज झालाच तर तो चित्त्याच्या कानावर जाणार नाही अशी मी आशा केली. काठावरच्या झुडूपांचा अडथळा मला येणार नव्हता, त्यामुळे टॉर्चचा उपयोग करण्याची तशी गरज पडणार नव्हती. रात्र अंधारी होती.आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती.
संपूर्ण सावधानता बाळगत मी पात्रातून पुढे निघालो आणि लवकरच पहिल्या वळणावर पोहोचलो. ओढ्याचं पात्रं हळूहळू उजव्या दिशेला वळत होतं. काही अंतरावर पात्र पुन्हा डावीकडे वरुन सरळ मार्गावर आलं होतं. गुराख्याने सांगीतलेल्या दोनपैकी पहिलं वळण ओलांडून मी पुढे आलो होतो. लवकरच मला पुढे दुसरं वळण लागलं. यावेळी पात्र डाव्या हाताला वळत होतं. ओढ्यातून मार्गक्रमणा करताना एखादा सुटा दगड पायाखाली येऊन आवाज होणार नाही याची मी काळजी घेत होतो. माझ्या माहीतीप्रमाणे गाय तिथून ३०० यार्डांवर होती. चित्त्याचे कान अतिशय तिखट असतात, माझ्याकडून किंचीतसा आवाज झाला तरीही तो जवळपास असलाच तर पसार होण्याची शक्यता होती. माझ्या सुदैवाने ओढ्यात फारसे सुटे दगड असे नव्हतेच. काठावर फारशी झाडीही नव्हतीच. काही मिनीटांतच ओढ्याचं पात्रं उजव्या दिशेला वळलं आणि मग पुन्हा पश्चिमेच्या दिशेने सरळ झालं.
गाईचा बळी पडला होता त्या जागी मी पोहोचलो होतो. इथूनच उत्तरेला सुमारे २०० यार्डांवर चित्त्याने गाईला ओढून नेलं होतं. आता ओढ्याच्या पात्रातून बाहेर पडून घनदाट झाडीत शिरावं लागणार होतं. पावलांचा अजिबात आवाज न करता मी उत्तरेच्या किनार्याजवळ आलो. माझ्या समोर छातीपर्यंत उंच ओढ्याचा काठ होता. रायफल खाली ठेऊन मी गाईच्या दिशेने येणार्या आवाजांचा अदमास घेऊ लागलो. रात्र अंधारी असल्याने मला माझ्या कानांवरच विसंबून मार्ग काढावा लागणार होता.
पाच मिनिटं शांततेत गेली. कसलाही आवाज न करता मी ओढ्यातून बाहेर आलो आणि सावधचित्ताने जंगलात शिरलो. मिट्ट काळोख पसरला होता. चित्त्याकडून मला तसा धोका होण्याची शक्यता नव्हती. आजवर त्याने कोणत्याही मनुष्यप्राण्यावर हल्ला केला नव्हता. त्याच्याविषयीच्या ज्या कथा मी ऐकल्या होत्या, त्यावरुन तो अत्यंत धोकादायक आणि आक्रमक असल्याचं गावकर्यांनी ठामपणे सांगितलं होतं. मला काळ्या चित्त्याच्या मागावर जाण्याचा काहीच अनुभव नव्हता त्यामुळे धडधडत्या अंतःकरणानेच मी पुढे जात होतो.
काही यार्ड अंतर पुढे सरकावं, आवाजाचा मागोवा घ्यावा आणि मग पुन्हा पुढे सरकावं असं मी सुमारे ७५ यार्ड अंतर कापलं. अंधारात काहीही दिसण्याची शक्यता नव्हती. चित्त्याला गोळी घालतानाच टॉर्चचा वापर करायचा हे मी ठरवून टाकलं होतं. इतक्या जवळून टॉर्चचा प्रकाश पाहून तो निश्चितच पसार झाला असता.
माझ्या भोवतालची झाडी आता दाट होत चालली होती. माझ्या शरिराचा पानांना घासल्याचा किंचीत आवाज येत होता, माझ्या पावलांचाही अगदी अस्पष्ट का होईना पण आवाज येत होताच. पावलं उचलून टाकण्याऐवजी मी ती जमिनीवरुन घासायला सुरवात केली होती. माझ्या पावलांच्या आवाजाने चित्त्याचं लक्षं वेधलं जाऊ नये असा माझा प्रयत्न सुरु होता. कोणताही मनुष्यप्राणी पाय घासत - ओढत चालू शकेल हा विचार चित्त्याच्या डोक्यात आला नसता. जंगलातल्या प्राण्याचा आवाज म्हणून त्याने तिकडे दुर्लक्षं केलं असतं. मी माझ्या नेहमीच्या चालीने चालत गेलो असतो, तर मात्र तो नक्कीच सावध झाला असता. पुढे सरकतानाच एक विचार माझ्या मनात आला, तो म्हणजे या काळोखात एखाद्या विषारी सापावर माझा पाय पडला तर माझी शंभरीच भरली म्हणायची ! मी घातलेले रबरी तळव्याचे बूट माझ्या पायांचं रक्षण करण्यास समर्थ नव्हते. मनातला हा विचार झटकून वाटेत येणार्या छोट्या-मोठ्या झुडूपांना वळसा घालत मी पुढे जातच राहीलो. झुडूपांना चुकवण्याच्या नादात मला दिशेचं भान राहीलं नाही. मी नक्कीच २०० यार्डांपेक्षा जास्त अंतर काटलं होतं. मी वाट साफ चुकल्याचं माझ्या ध्यानात आलं. माझ्या चहूबाजूला घनदाट अरण्यं होतं, झुडूपांची दाटी झाली होती आणि डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार पसरला होता.
आणि अचानक इतका वेळ मी ज्या आवाजाची अपेक्षा करत होतो तो आवाज माझ्या कानांवर आला. मांस फाडल्याचा आणि हाडं फोडल्याचा आवाज !
मी खरोखरच भाग्यवान होतो. आता या क्षणी चित्ता शिकारीवर ताव मारण्यात मग्न होता. आता फक्त सावधपणे पुढे जाऊन टॉर्चच्या प्रकाशात चित्त्यावर गोळी झाडायची इतकंच बाकी होतं आणि इथेच घोळ झाला होता !
चित्त्याच्या खाण्याचे आवाज मी चाललो होतो त्या दिशेने समोरुन न येता माझ्या डाव्या बाजूने आणि पाठीमागून येत होते ! गाईला डाव्या हाताला ठेऊन मी पुढे आलो होतो. मी गाईजवळून पुढे सरकलो तेव्हा चित्ता तिथे नसावा आणि नुकताच तिथे आला असावा. काळजी करण्यासारखा दुसरा विचार मनात आला तो म्हणजे मी तिथून पुढे जाईपर्यंत चित्ता गप्प बसून राहीला होता !
कानोसा घेत मी काही क्षण थांबलो. आवाजावरुन मला दिशा नक्की करणं अत्यावश्यक होतं. अंधारात माझ्यापासून सुमारे ५० ते १०० यार्डांवर चित्ता असावा असा मी अंदाज केला. आवाजाच्या रोखाने मार्ग काढत मी सरकू लागलो.
चित्त्याने आपलं भक्ष्यं एखाद्या झुडूपात नेलं असलं तर त्याच्यावर गोळी झाडण्याचा मोका मिळण्याची शक्यता फारच थोडी होती. समजा मी गोळी झाडली आणि तो नुसताच जखमी झाला तर ? त्याही पेक्षा त्याने चवताळून माझ्यावर हल्ला चढवला तर ? या विचारानेच माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. आजवर या चित्त्याने कोणत्याही माणसावर हल्ला केलेला नव्हता, माझ्या टॉर्चच्या प्रखर प्रकाशामुळे तो गोंधळून जाण्याची शक्यताच जास्तं होती. स्वतःलाच धीर देत मी आवाजच्या दिशेने पुढे-पुढे सरकत राहिलो.
माझी पंचेंद्रीये आता तल्लख झाली होती. वाटेत येणारा प्रत्येक अडथळा सावधपणे ओलांडत मी आवाजाच्या दिशेने सावकाशपणे सरकत होतो. एकेक पाऊल जपून टाकत आणि कोणताही आवाज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत मी पुढे जात होतो. जोपर्यंत चित्त्याच्या खाण्याचा आवाज येत होता तो पर्यंत मला काळजी नव्हती.
.....आणि अचानकपणे समोरुन येणारा खाण्याचा आवज बंद झाला !
चित्त्याचं भोजन आटोपलं होतं का ? शिकारीवर ताव मारुन तो निघून गेला होता का ? का त्याला माझी चाहूल लागली होती ? माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत असावा का तो ?
एकापाठोपाठ एक असे हे प्रश्न माझ्या मनात येऊन गेले. मी जागच्या जागीच निश्चल उभा होतो. मी पाऊल पुढे टाकलं असतं आणि अद्याप त्याला माझा पत्ता लागला नसला तर आता माझं अस्तित्व निश्चितच जाणवलं असतं. मी कितीही काळजीपूर्वक हालचाल केली असती तरीही चित्त्यासारख्या तीक्ष्ण कानाच्या प्राण्याला त्याचा नक्कीच आवाज गेला असता. मी काहीही न करता एकाच ठिकाणी निश्चल उभा राहिलो तर चित्त्याच्या हालचालीचा सुगावा लागण्याची शक्यता होती.
कोणतीही हालचाल न करता मी शांत उभा राहिलो. माझा हा निर्णय अतिशय शहाणपणाचा ठरणार होता !
काही क्षण शांततेत गेले आणि माझ्या समोरुन पाचोळ्यावरुन काहीतरी सरपटल्याचा आवाज आला. काही क्षण तो आवाज थांबला आणि पुन्हा येऊ लागला. माझ्या समोरच्या अंधारात नक्कीच कोणीतरी हालचाल करत होतं, पण नक्की कोण ? तो आवाज सतत येत होता. एखादा साप जमिनीवरून सरपटत जावा तसा तो आवाज होता, पण कोणी सांगावं कदाचित जमिनीला लगटून पुढे सरकणार्या चित्त्याचाही असू शकेल ! एक मात्र निश्चित, सतत येणारा तो आवाज उंदीर, बेडूक किंवा जंगलातल्या इतर प्राण्यांमुळे येत नव्हता. एक तर साप असावा किंवा चित्ता ! त्या आवाजाने माझी पार गाळण उडाली होती.
हे सर्व लिहायला जितका वेळ लागला त्याच्या एक शतांश सेकंदात हे विचार झर्रकन माझ्या मनात चमकून गेले होते. काही क्षण त्या आवाजाचा मागोवा घेतल्यावर तो साप नसून दस्तुरखुद्द चित्ताच माझ्या समाचाराला येतो आहे याची मला कल्पना आली.
माझ्या दिशेने सरकणार्या चित्त्याचा आवाज एकाएकी थांबला. दुसर्याच क्षणी नागाच्या फूत्कारासारखा हिस्स्स असा आवाज आला.. आता काही क्षणांतच तो गुरगुरणार आणि घशातून घुसमटल्यासारखा खोकल्यासारखा आवाज काढत माझ्यावर झेप टाकणार याबद्द्ल मला शंकाच उरली नाही. तत्क्षणी रायफल खांद्याला लावून मी टॉर्चचं बटण दाबलं.
माझ्याकडे रोखून पाहणारे दोन लालबुंद डो़ळेच फक्त माझ्या दृष्टीस पडले ! पण अंधारात त्याच्या शरीराचा बाकी कोणताच भाग दिसेना. क्षणभर मी गोंधळून गेलो. पण दुसर्याच क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! त्याच्या काळ्या रंगामुळे तो अंधारात दिसणं ही अशक्यं कोटीतली गोष्टं होती. आपल्या जेवणात व्यत्यय आणणारा प्राणी कोण आहे याचा तपास करायला तो आधी पुढे आला असावा. पण तो तिरस्कारणीय मनुष्यप्राणी आहे हे दिसून येताच त्याने आक्रमक पवित्रा घेतला होता. माझ्या टॉर्चच्या दिशेने तो बेधडकपणे रोखून पाहत होता.
काळजीपूर्वक नेम धरुन मी गोळी झाडली.
माझ्या अपेक्षेप्रमाणे तो कोसळून पडला नाहीच उलट शेजारच्या झुडूपात झेप टाकून तो दिसेनासा झाला ! माझी गोळी त्याला लागली होती की इतक्या जवळून काळजीपूर्वक मारलेला माझा नेम साफ चुकला होता ?
माझा नेम चुकला नसावा याची मला खात्री वाटत होती, पण त्याचा तपास दिवसाउजेडीच करणं शक्यं होतं.
मी परत फिरलो आणि टॉर्चच्या प्रकाशान गावाकडे निघालो. अंधारात रस्ता चुकून मी भरकटलो आणि शिवानीपल्लीला पुर्ण वळसा घालून मी सालीवरमच्या अलीकडे दीड मैल पाउलवाटेवर पोहोचलो. एकदा रस्ता सापडल्यावर मी बारानंतर शिवानीपल्लीला पोहोचलो. रंगाला गाठून सगळी कथा त्याला सांगीतली. आता सकाळ होण्याची वाट पाहण्यापलीकडे काहीच हातात नव्हतं. रंगाच्या घरात बरीच माणसं होती, त्यामुळे मी बाहेर पडलो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताच्या गंजीवर ताणून दिली.
तुम्हाला कधी लहान-सहान किड्यांकडून जीवंतपणे खाल्लं जाण्याचा अनुभव घ्यायची ईच्छा असेल तर शिवानीपल्लीच्या कोणत्याही गवताच्या राशीवर एक रात्र झोपून बघा ! जन्मभर लक्षात राहील असा अनुभव मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो ! जेमतेम सुईच्या डोक्याइतके लांबीचे ते गवती किडे आपलं रक्त पिऊन चांगले टम्म फुगतात. त्यांनी दंश केलेल्या जागी लालसर गांधी उमटतात आणि त्यांमध्ये सेप्टीक होऊन जखम चिघळण्याची शक्यता असते. बर्याचदा तापही येऊ शकतो. रात्रभर त्या क्षुद्र कीटकांनी मला हैराण करुन सोडलं होतं. सकाळी मी गंजीतून बाहेर आलो तो अंगभर गांधी घेऊनच !
रात्रभर त्या कीटकांशी झटापटीत घालवल्याने मला गरमा-गरम चहाची नितांत गरज होती. रंगास्वामीला मी हाका मारुन उठवलं आणि चहासाठी आधण ठेवण्याची सूचना दिली. घरातून एक कळकट भांडं आणून त्याने चुलीवर ठेवलं. मग त्या आधणात चहाची पत्ती, दूध आणि गूळ घालून चांगली उकळी आणली. चहा नसला तरी हे पेयं साधारण चहाच्या चवीचंच लागत होतं. पाठोपाठ उकडलेल्या अंड्यांचा नाष्टा झाल्यावर माझ्या चित्तवृत्ती ऊल्हासित झाल्या आणि पुनश्च माझा मोहरा मी चित्त्याकडे वळवला.
रंगाकडे मी काल आमच्याबरोबर आलेल्या गुराख्याची चौकशी केली. सकाळपासून तो दिसला नव्हता. तो किंवा दुसर्या कोणी गुराख्याने माझ्याबरोबर म्हशींचा कळप घेऊन काल मी चित्त्यावर गोळी झाडली तिथे यावं आणि चित्त्याला उठवण्याचा प्रयत्न करावा अशी माझी योजना होती. माझी गोळी चित्त्याला लागली होती याबद्द्ल मला पक्की खात्री होती. पण माझी ही योजना गावकर्यांनी धुडकावून लावली. एक तर गावात म्हशी नव्हत्या आणि आपल्या गाई-गुरांचा जीव धोक्यात घालण्याची कोणाची ईच्छा नव्हती.
नेमक्या त्याच वेळेला सकाळपासून गायब असलेला तो गुराखी तिथे येऊन पोहोचला. सकाळी-सकाळी तो सालीवरमला आपल्या मित्राकडे गेला होता. त्याच्या मित्राकडे एक ठासणीची बंदूक होती. ती बंदूक घेऊन माझ्याबरोबर जंगलात येण्याची त्याची मनीषा होती. पण त्याचा मित्र बंदूकीसह परगावी गेल्याने तो हात हलवित परतला होता. त्याचा हेतू कितीही चांगला असला, तरी त्याला बंदूक न मिळाल्याबद्दल मनातल्या मनात मी देवाचे आभारच मानले ! ठासणीची बंदूक घेऊन पाठून येणार्या अननुभवी माणसाच्या पुढून चालण्याइतकी भयंकर गोष्ट दुसरी कोणतीही असेल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा नरभक्षकाचा हल्ला परवडला !
म्हशींच्या सहाय्याने चित्त्याचा शोध घेण्याची योजना बारगळल्यावर मी गावात कुत्र्याची चौकशी केली. उत्तरादाखल गावकर्यांनी परिया जातीची एकमेव तपकीरी रंगाची कुत्री आणून हजर केली. सर्व गावठी कुत्र्यांप्रमाणे तिचे कान कातरलेले होते. या कुत्र्यांच्या कानात किडे होतात आणि ते किडे साफ करायची कटकट नको म्हणून गावकरी कुत्र्यांच्या पिल्लांचे कान लहानपणीच कातरुन टाकतात !
या कुत्रीचं नाव ' कुश ' असं होतं. योगायोगाची गोष्ट अशी की माझा पुजारी आदीवासी जंगल मित्र बैरा याच्या कुत्रीचं नावही ' कुश कुश करैया ' असं होतं. सालेम जिल्ह्यातल्या गावकर्यांमध्ये हे कुत्र्याचं नाव बरंच लोकप्रिय असावं. या कुशच्या अंगीही बैराच्या कुश सारखेच अलौकीक गुण होते याची मात्र त्यावेळेला मला कल्पना नव्हती. रंगा, कुश, तिचा मालक, गुराखी आणि मी अशी आमची वरात मी आदल्या रात्री चित्त्यावर जिथे गोळी झाडली होती तिकडे निघाली.
आदल्या रात्रीप्रमाणेच झर्यातून दोन वळणं पार करून ज्या जागी मी काठावर आलो होतो त्याच ठिकाणी आम्ही जंगलात शिरलो. कधीही गोळी घालण्याच्या तयारीने लोड केलेली रायफल घेऊन मी सगळ्यात पुढे, माझ्या मागे रंगा, गुराखी आणि शेवटी कुशचा मालक अशा क्रमाने आम्ही चाललो होतो. कुशची माझ्यापासून ते आपल्या मालकापर्यंत सारखी धावपळ सुरु होती.
मी आधीच वर्णन केल्याप्रमाणे त्या जागी झुडूपांची प्रचंड दाटी झालेली होती. रात्रीच्या अंधारात मी कोणत्या वाटेने आलो होतो ते मलाच कळेना. दिवसा लहानखुर्या दिसणार्या झाडांच्या सावल्या रात्री किती अवाढव्य आणि अक्राळविक्राळ दिसतात याची जंगलात वावरलेल्या कोणालाही कल्पना येऊ शकेल. अवघ्या बारा तासांपूर्वी ज्या वाटेने मी गेलो होतो ती वाट मला सापडेना ! चित्त्याने आपलं भक्ष्यं टाकलेली जागा गुराख्यांना पक्की माहीत होती, पण तिथे जाण्यापूर्वी मी चित्त्यावर जिथे गोळी झाडली ती जागा गाठण्याचा माझा इरादा होता. पण आता माझा निरुपाय झाला होता.
गाईच्या शरिराचा अर्धा भाग चित्त्याने खाल्ला होता हे उघड होतं. माझ्यापुढचा प्रश्न होता तो म्हणजे चित्त्याने गाईवर ताव कधी मारला असावा ? मी त्याच्यावर गोळी झाडण्यापूर्वी का मी गावात परतल्यावर रात्रीतून तो भक्ष्यावर परतला होता ? तसं होण्याची शक्यता फारच कमी होती, पण तसं गृहीतच धरलं तर माझी गोळी साफ चुकली होती !
शिकारीजवळ पोहोचल्यावर माग काढत मी निघालो आणि ज्या ठिकाणी मी चित्त्यावर गोळी झाडली त्या नेमक्या जागेवर पोहोचलो. पण मी गोळी झाडण्यापूर्वी चित्त माझ्या किती जवळ आला होता याचा मला अंदाज बांधता येईना. रात्रीच्या वेळेस जंगलात आवाजावरुन अंतराचा अंदाज बांधणं हे महकर्मकठीण, तरीही माझ्या अंदाजाप्रमाणे मी भक्ष्यापासून सुमारे १५ ते ५० यार्डांवर असताना गोळी झाडली होती.
गाईपासून पंधरा यार्ड अंतरावर मी झाडाच्या फांदीने विशिष्ट प्रकारची खूण केली. आणखीन पस्तीस यार्ड चालून गेल्यावर मी दुसरी खूण केली. या दोन खुणांच्या मध्ये माझी गोळी चित्त्याला लागल्याची काहीतरी निशाणी सापडेल अशी मी आशा केली. अर्थात अशी काही निशाणी न सापडल्यास माझा नेम साफ चुकला होता हे मानण्यापलीकडे गत्यंतरच नव्हतं.
आमची ही शोधमोहीम सुरु असताना चित्ता जवळपास नव्हता याची मला पक्की खात्री होती. तो जवळपास असता, तर त्याच्या अस्तित्वाची त्याने आम्हांला निश्चितच जाणीव करून दिली असती. कदाचित त्याचं गुरगुरणं ऐकू आलं असतं, कदाचित त्याने अनपेक्षीतपणे आमच्यावर हल्लाही केला असता. पण तो तिथून पसार झाला होता याचा अर्थ इतकाच की माझ्या गोळीने तो जखमी झाला असला तरी ती जखम प्राणघातक नसावी.
आम्ही आजुबाजूच्या झाडीत शोधाशोध करायला सुरवात केली आणि काही क्षणांतच कुशला रक्ताचा माग लागला ! गवताच्या पात्याला लागलेलं वाळलेलं रक्तं स्पष्ट दिसत होतं. माझी गोळी चित्त्याला लागली होती तर ! माझ्या अंगात आता नवाच उत्साह संचारला. गवतावर सांडलेल्या रक्तावरुन चित्त्याच्या शरिराच्या वरच्या भागात जखम झाली असावी असा मी अंदाज बांधल. मी गोळी झाडण्यापूर्वी जर तो पाठीची कमान करून आणि मागचे पाय उंचावून उभा असला तर गोळी पाठीवरही लागू शकत होती. अशी शक्यता मात्र खूपच कमी होती.
आता कुश पुढे सरसावली. कोणतंही प्रशिक्षण नसलेली साधी गावठी कुत्री होती ती, पण आपल्या अंगी असलेल्या उपजत ज्ञानाने तिने काही क्षण रक्त हुंगलं आणि ती माग काढत निघाली.
रक्ताचा माग घेत कुश झपाट्याने पुढे जात होती. गवतावर आणि पानांवर ठिकठिकाणी चित्त्याच्या रक्ताचे डाग दिसत होते. गोळीची जखम चांगलीच खोल असावी. रक्ताचे डाग वाळून गेले होते परंतु एके ठिकाणी अद्यापही ओलसर असलेलं रक्तं आम्हांला आढळून आलं त्यावरुन फुफ्फुसासारख्या महत्वाच्या अवयवाला जखम झाली असावी असा मी अंदाज बांधला.
कुशने आता पश्चिम दिशा पकडली. लवकरच आम्ही त्या उतारावरुन खाली उतरणार्या वाटेकडे पोहोचलो असतो. इथून उत्तर-द्क्षिण वाहणारा ' अनेकल वांका ' या नावे ओळखला जाणारा ओढा उताराच्या पायथ्याच्या दुसर्या ओढ्याला मिळून एकदम पश्चिमेकडे वळला होता. ' दोडा हल्ला ' या नावाने ओळखला जाणारा या दोन ओढ्यांचा प्रवाह अनेक दर्या-खोर्यांतून अनशेट्टीच्या पलीकडे जाईपर्यंत त्याचं नदीत रुपांतर झालं होतं. अनशेट्टीच्या पुढे या नदीने एकदम दक्षिण दिशेने वळण घेतलं होतं आणि गुंडलमच्या पुढे ती कावेरीला मिळत होती. या प्रदेशाचा इंच न इंच मला ठाऊक होता. जोवळागीरीच्या नरभक्षकाच्या शिकारीच्या निमित्ताने मी या प्रदेशात भरपूर भटकंती केली होती. पार कावेरीला ती नदी मिळते त्या संगमापर्यंतचा प्रदेश मी पायखालून घातला होता. या प्रदेशात फारच क्वचितपणे दुसर्या माणसाची गाठ पडते. कदाचित म्हणूनच सालेम जिल्ह्यातील हा अनवट निसर्ग अद्यापही टिकून होता.
पुन्हा आपल्या चित्त्याच्या मागावर जावू. त्या भागात झुडूपांची प्रचंड दाटी झालेली होती, पण कुशला त्याचं काहीच नव्हतं. कित्येक वेळा ती झाडीत गायब होत असे आणि तिच्या मालकाला तिला शिट्टी वाजवून परत बोलवावं लागत असे. तिच्यापाठी धावताना आमच्या सर्वांगावर काट्यांचे असंख्य ओरखडे उठले होते आणि चित्त्याने हल्ला केला असता तर आम्हांला त्याने पूर्णपणे बेसावध अवस्थेत गाठलं असतं !
लवकरच आम्ही पठाराच्या टो़काला पोहोचलो आणि तीव्र उताराला लागलो. खाली लांबवर अंतरावर असलेला अनेकल वांका ओढा आम्हाला मधून् मधून दिसत होता. ३/४ कोरड्या पडलेल्या त्या ओढ्यातलं उरलेलं पाणी
सूर्यप्रकाशात चमकत होतं.
काही वेळातच आम्ही एका मोठ्या बाभळीच्या झाडापाशी येऊन पोहोचलो. चित्त्याला आपल्याला झालेल्या जखमेची तीव्रता इथे जाणवली असावी. इथल्या गवतात तो लोळला होता. त्याच्या रक्ताची थारोळी सर्वत्र पसरलेली दिसत होती. कुशने काही वेळ ते रक्तं हुंगलं आणि बेधडकपणे चाटायला सुरवात केली. वास्तवीक चित्ता हा गावठी कुत्र्यांचा सर्वात मोठा शत्रू. कुत्र्यांना सर्वात जास्त भीती वाटते ती चित्त्याची, पण ही कुत्री काही औरच होती ! कुत्र्याच्या लहान पिल्लांचे कान कातरणारे गावकरी कुत्र्याच्या सहाय्याने वाघ किंवा चित्त्याचा माग काढायल सहसा राजी होत नाहीत. त्यांना ती कल्पना क्रूरपणाची वाटते. कुशच्या मालकाचे आमच्यावर हे उपकारच होते ! तिच्या मदतीशिवाय चित्त्याचा माग शोधण्यास आम्हांला बरेच कष्ट पडले असते.
उतारावरुन आम्ही जसजसे खाली जात होतो तशी झाडी विरळ होत गेली आणि खडकांचं साम्राज्यं सुरु झालं. खडाकांवर मध्येच उंच पात्याचं गवत उगवलेलं दिसत होतं. पुढे लवकरच आम्ही संपूर्णपणे खडकाळ प्रदेशात आलो. इथे गवताचं नामोनिशाण नव्हतं. पावसाळ्यात ओढ्याला पूर आला की पाणी इथपर्यंत वर चढत होतं.
आता रक्ताचा माग स्पष्ट दिसत होता. आतपर्यंत आम्ही आलेलं अंतर आणि चित्त्याला झालेला रक्तस्त्राव पाहता त्याची जखम सुरवातीला वाटलं त्यापेक्षाही बरीच खोल असावी. त्याच्या शरीरातली एखादी महत्वाची धमनी फुटली असावी. इतर कुठेही जखम झाली असती तर शरिरावरल्या चरबीमुळे नैसर्गिकरित्या ती बुजली असती.
आम्ही ओढ्याच्या काठावर पोहोचलो. इथे चित्ता पाणी पिण्यासाठी बसला होता. आश्चर्याची गोष्ट अशी की इथे रक्ताची दोन थारोळी दिसत होती ! विशेष म्हणजे झर्याच्या पात्राजवळच्या थारोळ्यापेक्षा पात्रापासून लांब असलेल्या थारोळ्यात रक्तं बर्याच जास्त प्रमाणात वाहीलं होतं ! रक्ताचे दोन माग पाहून मी पार चक्रावलो होतो. मी चित्त्यावर एकच गोळी झाडली होती, मग चित्त्याला दोन जखमा कशा झाल्या ? नंतर जेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला तो आणखीनच विस्मयकारक होता.
एका ठिकाणी चित्त्याच्या पुढच्या पायाचा स्वतःच्याच रक्तात स्पष्ट ठसा उमटला होता. पायाच्या ठशावरुन तो मध्यम आकाराच नर असावा असा मी अंदाज बांधला. पाणी पिऊन चित्त्याने ओढा ओलांडला होता आणि दोनशे यार्ड प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डावीकडे वळून तो वरच्या जंगलात घुसला होता. एखाद्या शिकाऊ कुत्र्याप्रमाणे कुश माग काढत होती. पलीकडची चढण चढून आम्ही अखेर देकनीकोट्टा - अनशेट्टी रस्त्यावर बरोबर ९ व्या मैलाच्या दगडासमोर जंगलातून बाहेर आलो ! याच रस्त्यावर ५ व्या मैलाच्या दगडाजवळच मी माझी कार पार्क करुन ठेवली होती. रस्त्यावरुन रात्री उशीरा आणि सकाळीही बर्याच गाड्या गेल्या होत्या त्यामुळे रक्ताचा माग दिसेना, पण कुशच्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाला मात्र अचूक माग लागला होता. तिच्या पाठी रस्ता ओलांडून आम्ही पुन्हा जंगलात शिरलो.
हळूहळू गवत आणि बांबूंच्या जंगलाची जागा लँटना आणि काटेरी झुडूपांनी घेतली. त्या काट्यांनी आता आमच्या कपड्यांची लक्तरं होऊन लोंबू लागली होती. त्या झुडूपांनी अक्षरशः आम्हाला ओरबाडून काढलं होतं ! झुडूपांना टाळून जाण्याचा दुसरा मार्गही नव्हता. माझ्या सोबत्यांच्या अंगावर माझ्यापेक्षाही पातळ कपडे होते, पण कायम जंगलात वावरत असल्याने त्यांची कातडी काहीशी निबर झाली असावी. कुशला मात्र त्या काट्याकुट्यांची काहीच आडकाठी होत नसावी. झपाट्याने पुढे जाऊन ती आमच्या कासवछाप प्रगतीकडे पाहून कंटा़ळत होती.
चित्त्याच्या चालीवरुन त्याने कुंडूकोट्टी गावच्या पाठच्या टेकडीची वाट धरलेली होती हे माझ्या लक्षात आलं. हे खेडं देकनीकोट्टा - अनशेट्टी रस्त्याच्या ७ व्या आणि ८ व्या मैलाच्या मध्ये वसलेलं होतं. या टेकडीच्या माथ्यावर अनेक लहान मोठ्या गुहा होत्या. यातल्या काही गुहांच्या छतांना आग्यामाशांची भली मोठी पोळी लटकलेली होती. शिवानीपल्लीला जातान रस्त्यावरुन कित्येकदा ती पोळी माझ्या नजरेला पडलेली होती.
चित्त्याला गाठण्यची माझी मनीषा पूर्ण होणं एकंदरीत कठीण दिसत होतं. त्या टेकडीवरच्या खडकाळ गुहांमध्ये त्याचा शोध घेणं म्हणजे गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्याइतकं दुरापस्तं होतं. त्यातून आग्यामाशांची पोळी असलेल्या एखाद्या गुहेत त्याने आश्रय घेतला असला तर मग निकालच लागला ! आग्यामाशांच्या आक्रमणापुढे कोणीच उभा राहू शकत नाही !
झुडूपांमधून मार्ग काढत एकदाचे आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. इथे झुडूपं आणि गवत अगदी विरळ झालं होतं. चित्त्याचा माग टेकडीवरच्या खडकाळ गुहांच्या दिशेने गेला होता. आम्ही उभे होतो तिथून ती आग्यामाशांची पोळी थेट आमच्या डोक्यावर लटकवल्यासारखी दिसत होती.
माझ्या पायातल्या पातळ कॅन्व्हासच्या बुटांमुळे मला ती खडकाळ चढण चढून जाण्यास फारसा त्रास झाला नाही. माझे सोबती अनवाणी असल्यामुळे त्यांना काहीच अडचण आली नाही. कुशच्या नख्यांचा किंचीतसा आवाज त्या दगडांवर होत होता.
अखेर आम्ही त्या गुहेच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. वातावरणात सर्वत्र त्या आग्यामाशांच्या पंखांचा फडफडाट आणि पोळयावर बसतानाचा आणि उडतानाचा गूं गूं असा आवाज भरुन राहीला होता. हजारोंच्या संख्येने त्या जंगलातल्या फुलांमधला मध गोळा करून त्या पोळ्यात साठवून ठेवत होत्या. आम्ही गुहेत पोहोचलो तेव्हा त्यांनी आमची दखलही घेतली नाही, पण काही कारणाने जर त्या डिवचल्या गेल्या तर मात्र आमची खैर नव्हती ! एखाद्या ज्वालामूखीतून लाव्हा उसळावा तशा त्या माशा आमच्यावर झेपावल्या असत्या !
आम्ही गुहेच्या तोंडासमोर उभे होतो. रक्ताचे दोन थेंब चित्त गुहेत गेल्याचं दाखवून देत होते. गुहेचं तोंड सुमारे वीस फूट लांब-रूंद होतं. बाहेरचा प्रकाश काही अंतरापर्यंतच गुहेत येत होता. त्यापलीकडे संपूर्ण अंधाराचं साम्राज्यं होतं. मी गुहेच्या छताला असलेली भली मोठी नऊ पोळी मोजली. ही पोळी गुहेच्या तोंडाच्या बरोबर वर लटकत होती. गुहेची जमीन खडकाळ होती आणि सामान्यतः अशा गुहांत असलेला ओलसरपणा इथे नव्हता. अर्थात चित्त्याने ओलसर जागा राहण्यासाठी कधीच निवडली नसती.
माझ्या तीन सोबत्यांना मी कुजबुजत्या आवाजात गुहेच्या बाहेरच राहण्याची आणि गुहेच्या बाहेरच्या बाजूने तोंडाच्या बाजूच्या दगडांवर शिरून गुहेच्या वरच्या बाजूला आश्रय घेण्याची सूचना दिली. कोणत्याही परिस्थीतीत टेकडीच्या पायथ्याच्या दिशेने न जाण्याचं मी त्यांना बजावून सांगीतलं. माझ्या तावडीतून चित्ता सुटला तर तो टेकडीच्या पायथ्याच्या दिशेनेच जाण्याची शक्यता होती. ते गुहेच्या वरती सुरक्षीत ठिकाणी गेल्यावर मी कुशसह गुहेत प्रवेश केला.
आम्ही गुहेत प्रवेश करताच कुशला धोक्याची जाणीव झाली. तिचं आतपर्यंत टिकून असलेलं धैर्य गळून पडलं आणि त्याची जागा भीतीने घेतली.
मी गुहेत शक्य तितक्या पुढे जाऊन अंधुक प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न करु लागलो. मी जेमतेम तीस फूट अंतरापर्यंतच पाहू शकत होतो. चित्ता अशा एखाद्या गुहेत आश्रय घेईल ही कल्पना न आल्याने मी माझा टॉर्च आणला नव्हता.
माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे जखमी जनावराला उठवण्याचा प्रयत्न करणं. दुसरं म्हणजे माझ्या सोबत्यांना चित्त्याच्या पाळतीवर ठेवून शिवानीपल्लीला परतून टॉर्च घेउन परतणे. दुसरा पर्याय खरेतर सुरक्षीत होता, पण पुन्हा त्या काटेरी झुडूपांच्या जंगलातून जाण्याची माझी तयारी नव्हती. अर्थात त्याची किंमत मला चुकवावी लागलीच !
मी जोराने शिट्टी वाजवली, मोठ्याने ओरडलो, पण काहीच परिणाम झाला नाही. आतापर्यंत शांत असलेल्या कुशने आता भुंकायला सुरवात केली, तरीही काहीही झालं नाही.
गुहा आतमध्ये अरुंद होत गेली होती. समोरच्या दाट अंधारात काय दडलं होतं याचा पत्ता लागत नव्हता.
चित्ता गुहेत शिरल्यावर मेला तर नाही ? ही शक्यता फारच कमी होती कारण झर्यापाशी विश्रांती घेतल्यानंतर तो वाटेत कुठे थांबल्याचं आम्हाला आढलं नव्हतं. आम्ही पोहोचण्यापूर्वी तो गुहेतून निघून तर गेला नव्हता ? ही एक शक्यता होती, पण तसं दर्शवणारी कोणतीही खूण आम्हांला आढळली नव्हती.
मी गुहेत एक नजर टाकली. फेकण्यासारखा दगड दिसताच मी तो उचलला.
मी शिकारीसाठी - बंदूक झाडण्यासाठी उजवा हात वापरत असलो तरी इतर बाबतीत मी डावखोरा आहे. उजव्या हातात जय्यत तयारीत रायफल धरून मी डाव्या हाताने जास्तीत जास्त जोराने दगड गुहेच्या अंतर्भागात भिरकावला. दगड गुहेच्या जमिनीवर आदळत आत गेलेला आवाज येत होता आणि एका क्षणी कशाला तरी आदळून दगडाचा आवाज बंद झाला.
दुसर्याच क्षणी घशातून खोकल्यासारखा घुसमटता गुरगुराट करत चित्त्याने चाल केली. त्याच्या काळ्या रंगामुळे तो एखाद्या भुतासारखा माझ्या समोर दोन-तीन यार्ड येईपर्यंत मला दिसलाच नाही ! मी तत्काळ गोळी झाडली पण तरीही तो दोन पावलं पुढे आलाच. मी दुसरी गोळी झाडली. माझ्या दोन्ही गोळयांचा प्रतिध्वनी त्या छोट्याशा गुहेत दुमदुमला !
.....दुसर्या क्षणाला आभाळ फाटलं !
माझ्या रायफलच्या गोळ्यांच्या आवाजानी आणि त्याच्या प्रतिध्वनीमुळे आग्यामाशांची नऊच्या नऊ पोळी उठली होती !
इतका वेळ शांतपणे चालू असलेला त्यांचा धीरगंभीर गूं गूं आवाज आता रणगर्जनेत बदलल होता. गुहेच्या दारातून येणारा प्रकाश आग्यामाशांच्या समुद्रामुळे झाकला गेला होता. गुहेतलं वातावरण सळसळतं झालं होतं !
आपल्या हातून कोणता प्रमाद घडला याची कल्पना येताच मी पार हादरुन गेलो. माझ्या मनातले चित्त्याचे विचार कुठल्या कुठे पळाले. अंगातलं जॅकेट ओरबाडून काढत ते मी माझा चेहरा आणि उघड्या पाठीवर गुंडाळलं आणि बाहेरच्या दिशेने धूम ठोकली.
आग्यामाशांचा पाणलोट माझ्यावर कोसळला ! माझे हात, मान, चेहरा, डोकं इतकंच काय पण माझ्या जॅकेटमध्ये शिरून माझ्या पाठीवरही त्यांनी हल्ला चढवला. गरम तीक्ष्ण सुई खुपसावी तसा त्यांचा तो दंश भयानक वेदनादायी होता.
काही वेळापूर्वीच चढून आलेल्या खडकांवरुन मी खाली घसरलो. जवळूनच कुशच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. जितक्या वेगात मी पळत होतो, त्यापेक्षा दुप्पट वेगात त्या माशा माझ्यावर तुटून पडत होत्या. डाईव्ह बाँबर विमानां प्रमाणे त्या माझ्यावर अक्ष्ररशः कोसळत होत्या. त्यांची तुलना दुसर्या महायुध्दात दोस्त राष्ट्रांच्या सेनेवर तुटून पडणार्या जपानी कामिकाझे पायलट्सशीच होऊ शकेल. कामिकाझे पायलटप्रमाणेच मला दंश करणारी प्रत्येक माशी जीवाला मुकत होती.
टेकडीच्या पायथ्याशी मी पोहोचलो तेव्हाही माशा माझा पिच्छा पुरवतच होत्या ! शेवटचा उपाय म्हणून मी लँटनाच्या सग़ळ्यात भरगच्च झुडूपाखाली शिरलो आणि खोलवर शिरुन गप्प पडून राहीलो. आजवर जंगलं गिळून टाकणार्या या लँटनाला मी हजारो शिव्याशाप दिले होते, पण त्या क्षणी मी त्याला शतशः धन्यवाद दिले ! त्यांच्यामुळे माझा जीव वाचला होता ! आग्यामाशांना दंश करण्यासाठी उडताना सूर मारण्याची आवश्यकता असते, पण दाट झाडी मध्ये घुसून आक्रमण करण्याचा चिवटपणा त्यांच्यात नसतो ! लँटनाच्या भरगच्च आच्छादनाखाली माझा सगळा देह लपून राहील्याने माशा माझ्यापर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. अन्यथा मी कितीही वेगाने धावलो असतो तरी त्यापेक्षा वेगात त्या माझ्यावर आदळत राहिल्या असत्या !
नऊच्या नऊ पोळी पूर्णपणे उठली होती.! आसमंतात संतप्त माशांचा गूं गूं आवाज भरुन राहीला होता. माझा जीव वाचवणार्या लँटनाखाली मी निपचीत पडून होतो.
जवळपास दोन तासांनी माशा पुन्हा आपल्या पोळ्यांवर स्थिरावल्या.! मला प्रचंड ग्लानी आली होती आणि माशांचे अंगभर टोचलेले काटे वेदनांची जाणीव करुन देत नसते तर मी निश्चितच बेशुध्द झालो असतो ! प्रत्येक काट्याभोवतालच्या कातडीची आग होत होती आणि सूज वाढत चालली होती.
दुपारी तीनच्या सुमाराला मी लँटनाखालून बाहेर आलो आणि रस्ता गाठला. कुंडूकोट्टी गावात मी पोहोचलो आणि माझे तीन साथिदार भेटले. ते तिघंही संपूर्णपणे सुरक्षीत राहिले होते ! माशांनी त्यांच्यासमोरच्या मी आणि कुश या ' पळत्या ' लक्षांवर सर्व शक्तीनीशी हल्ला चढवला होता. त्या तिघांबरोबर असलेल्या कुशचीही अवस्था वाईट होती. तिलाही अनेक ठिकाणी दंश झाला होता. चित्त्यालाही त्यांचा ' प्रसाद ' मिळालाच असणार या बद्द्ल मला कोणतीच शंका नव्हती !
रस्त्यावर परतून आम्ही माझी गाडी गाठली आणि देकनीकोट्टाला असलेला दवाखाना गाठला. रात्री उशीरा डॉक्टरने ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन माझ्या शरिरातून ४१ आणि कुशच्या शरिरातून १९ काटे चिमट्याने उपसून काढले ! आमच्या जखमांवर त्याने अमोनिआचं सोल्यूशन लावलं.
ती रात्र आम्ही देकनीकोट्टाच्या वनविश्रामगृहात काढली. तिथल्या पलंगावर गादी नव्हती, त्यामुळे मी आरामखुर्चीचा आश्रय घेतला. माझे सोबती कुशसह व्हरांड्यात झोपले होते. रात्री मला सडकून ताप भरला. सगळ्या जखमा ठणकत होत्या. कुशचंही विव्हळणं रात्रंभर सुरू होतं. माझी मान, चेहरा आणि हात सुजून भप्प झाले होते. एका माशीने माझ्या डाव्या डोळ्याजवळंच दंश केला होता, त्यामुळे मला माझा डावा डोळा पूर्ण उघडता येत नव्हता !
सकाळी दहानंतर आम्ही निघालो आणि ९ व्या मैलाच्या दगडापाशी आलो. गुरांच्या पायवाटेने आम्ही पुन्हा टेकडीच्या पायथ्याशी आलो.
आग्यामाशा आपल्या कामात कामात मग्न होत्या. चोहीकडे शांतता होती.
गावकर्यांना खालीच सोडून कुशसह मी ती खडकाळ चढण चढून आलो आणि काळजीपूर्वक गुहेच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. जोपर्यंत मी त्या आग्यामाशांना पुन्हा उठवत नाही तो पर्यंत मला त्यांच्यापासून धोका नव्हता. माझ्या आदल्या दिवशीच्या दोन गोळ्यांनी चित्त्याचा अवतार संपवला असणार याबद्द्ल मला पक्की खात्री होती. माझ्या गोळ्यांपासून चित्ता वाचला असताच तर माशांनी नक्कीच त्याचा निकाल लावला असणार होता !
माझा अंदाज अचूक होता ! गुहेच्या तोंडापासून काही पावलांवरच अंगाचं मुटकुळं करुन चित्ता मरुन पडला होता. कुश त्याच्यापासून काही अंतरावर उभी राहीली. चित्त्याचा मॄतदेह हुंगल्यावर ती गुरगुरू लागली. तिच्या तोंडावर हात दाबून मी तिचा आवाज बंद केला. तिच्या गुरगुराटाने त्या भयानक माशा पुन्हा ऊठल्या असत्या तर भलतीच आफत ओढवली असती.
माझ्या माणसांना मी वर बोलावून घेतलं आणि आम्ही चित्त्याचा मॄतदेह गुहेतून खाली उतरवला आणि बांबूला बांधून त्याला माझ्या कारपाशी आणलं.
देकनीकोट्टाच्या विश्रामगृहात मी त्या चित्त्याचं कातडं सोडावलं. सुमारे साडेसहा फूट लांबीचा तो नर चित्ता होता. त्याच्या कातडीवरचे मोठे ठिपके त्याच्या काळ्या कातडीखालीही उठून दिसत होते. मी मारलेला तो एकमेव काळा चित्ता होता ! त्याच्या काळ्या कातडीत लपलेले आग्यामाशांचे काटे काढणं हे मोठं जिकीरीचं काम होतं, पण आम्ही एकूण २७३ काटे मोजून काढले ! अर्थात आमच्या नजरेतून कितीतरी काटे सुटले असतील याची मला खात्री होती.
माझ्या सर्व सहकार्यांना मी योग्य बक्षीसी दिली. कुशला मी तिच्या मालकाकडून ७/- रुपयांना खरेदी केलं. माझ्याबरोबर एक दुर्मिळ चीज - काळ्या चित्त्याचं कातडं - घेऊन मी बंगलोरच्या वाटेला लागलो.
एक सांगायचं राहीलंच. तुम्हांला आठवत असेलच मला अनेकल वांका ओढ्याच्या काठावर चित्त्याला दोन जखमा झाल्याचं आढळलेलं होतं. त्यापैकी एक जखम विशेष खोल होती. त्या रात्री मी केवळ एकच गोळी चित्त्यावर झाड़ली होती. आता सगळा उलगडा झाला होता. त्याच्या दोन डोळ्यांमध्ये नेम धरुन मारलेली गोळी नेम चुकून केवळ त्याचं डोकं आणि कानाला घासून गेली होती आणि त्याच्या जांघेत शिरली होती. ही दुसरी जखमच खोलवर गेलेली होती. तो माझ्यावर झेप टाकायच्या पवित्र्यात असतानांच मी अगदी वेळेवर गोळी झाडली होती !
माझ्या गुहेतल्या दोन गोळ्यांपैकी पहिली गोळी त्याच्या छातीत वर्मी बसली होती. दुसरी गोळी त्याच्या उघड्या तोंडातून घुसून मानेच्या मागून बाहेर पडली होती.
( मूळ कथा : केनेथ अँडरसन )
प्रतिक्रिया
29 Apr 2014 - 12:45 am | खटपट्या
वाचतोय !!!
29 Apr 2014 - 12:49 am | प्रसाद गोडबोले
चित्ता काळा असतो कि नाही ते माहीत नाहे पण मागे कोल्हापुर जवळील ( बहुतेक राधानगरीच्या) जंगलात काळा बिबट्या दिसला होता
29 Apr 2014 - 1:37 pm | एस
दै. सकाळच्या ह्या बातमीत ओणी (ता. राजापूर) येथील विहिरीत काळ्या रंगाचा बिबट्या पडल्याची माहिती आहे. सह्याद्रीतील चांदोली अभयारण्याच्या अंतर्भागातही काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. दांडेली-अनशी व्याघ्र प्रकल्पामध्येही क्वचित ते दिसतात. इथे थोडी सविस्तर माहिती आली आहे.
29 Apr 2014 - 1:04 am | स्पार्टाकस
काळा चित्ता हा अत्यंत घनदाट आणि सदाहरित अरण्यात आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीत काळे चित्ते आढळले आहेत. अनेकदा बिबट्याचा उल्लेख चित्ता असा केला जात असला, तरीही प्रत्यक्षातील काळा चित्ता मी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात पाहीला आहे.
29 Apr 2014 - 1:27 pm | घन निल
या संपूर्ण लेखमालेत तुम्ही जिथे जिथे चित्ता असा उल्लेख केलाय तिथे तिथे चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं. चित्त्या ऐवजी बिबळ्या योग्य असेल. बिबळ्या हा भारत भरात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे . बरेच जन चित्ता आणि बिबळ्या यात गफलत करतात.
काळ्या रंगाबद्दल सांगायचं तर काळा बिबट्या हि वेगळी जात नसून त्वचेतील घटकांच्या कमी अधिक प्रमाण मुळे झालेला प्रताप आहे ( माणसात जसे कोड वगेरे असेलेली कित्येक मंडळी अनेकदा पूर्ण भुरकट दिसतात तसेच )सध्या चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे . पूर्वी भारतात असंख्य चित्ते होते , राजे महाराजे कुत्र्यांसारखे चित्ते पाळण्यात अग्रेसर होते. त्यांचा वापर शिकारी साठी करत असत
29 Apr 2014 - 1:41 pm | एस
येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या यात तशी गल्लत झाली होती. बाकी काळ्या बिबट्याबद्दलची तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे.
29 Apr 2014 - 2:47 pm | थॉर माणूस
नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक पँथर ऑफ शिवानीपल्ली असेच येते (चित्त्याला शक्यतो पँथर म्हणणे टाळले जाते ना?). मला वाटतं हा सुद्धा काळा बिबट्याच होता. भारतात जंगली चित्ते फार कमी उरले होते आणि काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते.
29 Apr 2014 - 3:24 pm | एस
सॅन्क्च्युरी एशियाच्या ह्या लेखात रझा काझमी यांनी चित्ता की बिबट्या ह्याचा उहापोह करताना त्याकाळी या दोन प्राण्यांना ओळखण्यात शिकारी, प्रशासक आणि अगदी वन्यजीव अभ्यासकांमध्येही असणार्या मतभेदांबद्दल माहिती दिलेली आहे.
शिवानीपल्लीचा हा प्राणी अतिशय काळाकुट्ट होता आणि त्याच्या त्वचेवरील डाग दिसत असले तरी अस्पष्ट होते. अँडरसनच्या काळात भारतात जंगली चित्त्यांची संख्या कमी झाली होती हे नक्की. मात्र काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते हे काही पटले नाही.
29 Apr 2014 - 5:31 pm | थॉर माणूस
जसे अल्बिनिजम मुळे पांढर्या रंगाचे प्राणी जन्माला येतात तसे मेलॅनिजम मुळे काळ्या रंगाचे प्राणी जन्माला येतात. या कंडीशन्स तुलनेने दुर्मिळ असतात. म्हणजे मुळात मेलॅनिजमची शक्यता कमी, त्यात असे प्राणी किती वर्षे जगतील यामागे ते कुठे रहातात, त्यांचा आहार काय आणि शिकारी असतील तर शिकारीची पद्धत काय यावर अवलंबून असते. बहुतेक यामुळेच काळे बिबटे पुर्ण वाढू शकतात (रात्रीच्या शिकारीस आणि दबा धरण्यास फायदा) पण पांढर्या सिंहांचे मात्र हाल होतात.
इथे मी विचार केलाय की जंगलात किंवा झुडूपात दबा धरून बसणार्या आणि सावज अगदीच जवळ आल्यावर हल्ला करणार्या बिबट्याला शिकारीमधे काळ्या रंगाचा नक्की फायदा होईल. पण सावजाच्या काही मीटर अंतरावरून पळत येऊन हल्ला करणार्या माळरानातल्या या शिकारी चित्याला काळ्या रंगाचा कितपत फायदा मिळेल.
तसंच या काळातली चित्यांची संख्या कमी होती हे लिहीण्याचं कारण म्हणजे वर लिहील्याप्रमाणे या मेलॅनिजमची दुर्मिळता. मुळात कमी चित्यांमधे ही परीस्थीती आणखी दुर्मिळ होणार, पण त्यामानाने मुबलक असलेल्या बिबट्यांमधे ही परीस्थीती जास्त असेल. माझ्यामते आजही काळ्या बिबट्याच्या साइटींग त्यामानाने जास्तच आहेत (इतर प्राण्यातल्या अल्बिनीजम किंवा मेलॅनिजम पेक्षा). पण काळ्या चित्याला पाहिल्याचे प्रसंग अत्यल्प सापडतात.
अर्थात, पुन्हा एकदा हा फक्त तर्क आहे. माझ्याकडे या सगळ्याविषयी काही खास विदा उपलब्ध नाही.
त्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद (त्यातले शेवटचे दोन-तीन पॅराज इंटरेस्टींग आहेत). मस्त साईट दिसतेय, भरपूर नवं खाद्य मिळालंय वाचायला. :)
29 Apr 2014 - 5:33 pm | शुचि
वा! माहितीपूर्ण प्रतिसाद. विस्कॉन्सिन मध्ये काळ्या खारी बर्याच दिसतात अन अन्यत्र कोठेही त्या आढळत नाहीत असे म्हणतात.
29 Apr 2014 - 7:57 pm | एस
तुमचा तर्क बरोबर आहे. याच लेखात भारतीय चित्त्यांबद्दल एक नवी माहिती अशी मिळते की, हे चित्ते अगदी घनदाट जंगलातही राहू शकत असत. म्हणजे आफ्रिकन चित्त्यांपेक्षा ते अधिवासाच्या बाबतीत थोडे वेगळे होते. भारतात तसेही आफ्रिकन सॅव्हान्नाज् सारखा सलग मोठा आणि मनुष्यवस्ती तुरळक असलेला भाग आधीपासूनच फारसा नव्हता. ही एक बाब विचार करण्यासारखी आहे. दुसरे म्हणजे चित्त्याच्या (माणसांनी केलेल्या) नोंदीकृत शिकारींच्या कथा बिबट्यांच्या शिकारींच्या तुलनेत जास्त सापडतात. तरीही बिबट्या हा चित्त्याच्या तुलनेत कुठल्याही अधिवासाशी जुळवून घेण्यात जास्त यशस्वी ठरला आहे. चित्ते भारतातून नामशेष होण्यास अनिर्बंध शिकारींबरोबरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाढत्या लोकसंख्येचे अतिक्रमणही तितकेच जबाबदार आहे.
लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय.
29 Apr 2014 - 10:16 pm | स्पार्टाकस
लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय. >> अनुमोदन. अँडरसनने जास्तीत जास्त शिकारी या नरभक्षकांच्या केल्या असल्या आणि पुढे तो वन्यजीव संरक्षक झाला असला, तरीही या वेळी मात्रं त्याला काळ्या चित्त्याच्या कातडीचा मोह पडला हे निश्चीतच !
29 Apr 2014 - 1:05 am | सुहास झेले
थरारक... पुढे काय होणार ह्याची उत्सुकता प्रत्येक शब्दागणिक वाढत होती !!
29 Apr 2014 - 1:08 am | आत्मशून्य
शिकारकथा उपलब्ध आहेत काय हो ?
29 Apr 2014 - 1:27 am | राघवेंद्र
आवडली !!!
पुढील कथेच्या प्रतिक्षेत.
29 Apr 2014 - 1:28 pm | घन निल
बाकी लेख मला प्रचंड आवडल्या गेली आहे !!
30 Apr 2014 - 10:54 am | अजया
आवडली कथा.
30 Apr 2014 - 1:31 pm | कुसुमावती
आवडली. अजुन कथा येवु देत
30 Apr 2014 - 1:55 pm | स्पार्टाकस
सर्वांचे मनापासून आभार !
आगामी - ९० डिग्री साऊथ