आयाळ असलेला वाघ - १ - http://www.misalpav.com/node/27684
कराडीबेट्टा व्याघ्र अभयारण्य हे रस्त्याला लागूनच उत्तर दिशेला पसरलेलं आहे. म्हैसूरच्या महाराजांच्या हुकुमावरुन या अभयारण्याची निर्मीती करण्यात आलेली आहे. या अभयारण्यात कोणत्याही जनावराच्या शिकारीची परवानगी देण्यात येत नाही. म्हैसूरच्या राजाच्या दूरदर्शीपणाचं हे एकच उदाहरण नसून म्हैसूर प्रांतात अशा अनेक अभयारण्यांची निर्मीती त्यांनी केली आहे.
या नरभक्षकाने माणसांचा संहार करून अभयारण्यात दडी मारण्याचा सुरक्षीत मार्ग पत्करला होता. सामान्य जंगली वाघांच्या शिकारीसाठी बंदी असली तरी जरूर पडल्यास या वाघाच्या मागावर मला अभयारण्यात शिरणं क्रमप्राप्तं होतं. वाघाने सर्वात जास्तं बळी कुमसी आणि आनंदपुरम या भागातच घेतलेले होते. हा भाग अभयारण्याला लागूनच होता.
दहा दिवसांची तयारी बरोबर घेऊन दुस-या दिवशी पहाटे लवकरच मी बंगलोरहून निघालो. रस्तादुरूस्तीची असंख्य कामं सुरू असल्यामुळे शिमोग्याला पोहोचेपर्यंतं मला दुपारचे दोन वाजून गेले. शिमोग्याला पोहोचल्यावर मी वनाधिका-याची भेट घेतली. छोर्डी आणि कुमसी इथल्या वनाधिका-यांसाठी त्याने दोन पत्रं माझ्या सुपुर्द केली. मला हवी ती जनावरं मिळवण्यासाठी मदत करावी आणि जरूर पडल्यास वाघाच्या मागावर अभयारण्यात जाण्याची मला परवानगी द्यावी असं त्यात नमूद केलेलं होतं.
त्याने दिलेल्या सहकार्याबद्द्ल मी त्याचे आभार मानले आणि कुमसी गाठून तिथल्या कनिष्ठ वनाधिका-याची गाठ घेतली. त्याने मला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यासह मी छोर्डी गाठलं आणि तिथल्या दुस-या वनाधिका-याला भेटलो. मी माझ्या येण्याचा हेतू सांगताच त्याने आपल्या हाताखालच्या वनरक्षकांना बोलावलं आणि त्या लाकूडतोड्या बरोबर असलेल्या इतर माणसांना बोलावणं पाठवलं. त्या माणसांक्डून कळलेली हकीकत अशी होती –
शिमोग्याच्या एका ठेकेदाराने तुप्पूर परिसरातल्या एका भागातील जंगलाच्या पट्ट्यात वृक्षतोडणीचा ठेका घेतला होता. बळी गेलेल्या बाप-मुलासह अनेकांची त्याने या कामासाठी भरती केली होती. ही सर्व मंडळी शिमोगा इथे राहणारी असली तरी सध्या त्यांनी छोर्डी इथे मुक्काम टाकला होता.
दोन दिवसांपूर्वी सकाळी लवकर उठून ते जंगलाच्या अंतर्भागात तीन मैलांवर असलेल्या तोडणीच्या जागेवर निघाले होते. कराडीबेट्टा अभयारण्याला उजव्या हाताला ठेवत त्यांची वाटचाल सुरू असतानाच त्या तरूण मुलाने आपल्या बापाकडे तोंडात टाकायला पान-सुपारीची मागणी केली. धोतराच्या गाठीला बांधलेली पानसुपारी मुलाला देण्यासाठी बाप वाटेत थांबला. त्यांच्याबरोबरची इतर दोन माणसं काही पावलं पुढे गेलेली होती.
पुढे गेलेल्या माणसांना अचानक मागून वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. मागे वळून पाहताच समोरचं दृष्यं पाहून ते हादरून गेले. तो तरूण मुलगा जमिनीवर आडवा पडला होता आणि त्याच्या देहावर वाघ उभा होता. वाघाचा हल्ला इतका अनपेक्षीत होता की त्याच्या बापाचा हात पान देण्याच्या अविर्भावात तसाच राहीला होता ! भानावर येताच दोन्ही हात पसरून ओरडतच तो वाघाच्या दिशेने धावला आणि वाघाला घाबरवून हाकलून देण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचं हे कृत्यं कितीही धाडसाचं असलं तरी आत्मघातकीच ठरणार होतं. वाघाने मुलाला सोडलं आणि एका झेपेतच बापाचा गळा पकडला. बापाच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तो तरूण मुलगा सुन्नपणे बसून आपल्या जन्मदात्याचा मृत्यू पाहत होता. उठूण पळून जाण्याचंही त्याला भान उरलं नव्हतं. बापाचा निकाल लावून वाघाने पुन्हा मोहरा वळवला आणि मुलावर झ्डप घातली.
पुढचं दृष्यं पाहण्यास ते दोघं थांबलेच नाहीत. पार्श्वभागाला पाय लावून त्यांनी धूम ठोकली. एकदाही न थांबता किंवा मागे वळून न पाहता त्यांनी तुप्पूर गाठलं. तुप्पूर गावात कोणाकडेही शस्त्र नसल्याने सुमारे दह-बाराजण पुढे पोलीसांना कळवण्यासाठी आनंदपुरमला जाण्यास निघाले.
आनंदपुरमच्या वाटेवर असतानाच त्यांना वाटेत एक ट्रक भेटला. ज्या नदीचं पाणी पिताना त्या सायकलस्वाराने वाघ पाहीला होता त्या नदीच्या पात्रातील वाळू उपसण्यासाठी तो ट्रक छोर्डीच्या दिशेने निघाला होता. ड्रायव्हरला त्यांनी मागे फिरून आनंदपुरमला चलण्याची विनंती केली या ड्रायव्हरचा त्यांच्या कथनावर अजीबात विश्वास बसला नाही !
" तुम्ही सर्वजण मागे ट्रॉलीत चढून बसा !" ड्रायव्हरसाहेबांनी फर्मान सोडलं, " आपण तिथे जाऊन तपास करु! "
" अरे पण या ट्रॉलीला छप्पर नाही. वाघ उडी मारून ट्रॉलीत आला तर ?"
" छट ! वाघ-बिघ काही येत नाही. आणि आलाच तर मी सरळ ट्रक त्याच्या अंगावर घालेन ! चला !"
ड्रायव्हरच्या या शब्दांनी त्या बाराजणांना धीर आला आणि ते ट्रकमध्ये चढले. काही वेळातच ते त्या जागी पोहोचले. रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं लाकूडतोड्याचं प्रेत पाहून इतका वेळ त्यांच्यावर विश्वास न ठेवणा-या ड्रायव्हरची बोलतीच बंद झाली. त्या तरूण मुलाचं नखही त्यांच्या दृष्टीस पडलं नाही.
एव्हाना ड्रायव्हरसाहेबांचं धैर्य आणि शूरपणाचा आणलेला आव गळून पडला होता. त्या तेराजणांनी लाकूडतोड्याचे अवशेष ट्रकमध्ये ठेवले आणि भरवेगात छोर्डी गाठलं. छोर्डीच्या वनाधिका-यासह ते कुमसीला पोहोचले आणि तिथला वनाधिकारी आणि पोलीस सब् इन्स्पेक्टर यांना घेऊन ट्रकमधूनच त्यांनी शिमोगा गाठलं. पोलीस आणि वनखात्याकडे सविस्तर तक्रार नोंदवल्यावर रात्री उशीरा लाकूडतोड्याचे अवशेष त्याच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.
दुस-या दिवशी पोलीसांचं एक पथक शस्त्रसज्ज होऊन मुलाच्या शोधार्थ त्या परिसरात आलं. रक्ताच्या आणि भक्ष्यं ओढून नेल्याच्या खुणेवरून नरभक्षकाने मुलाचा मृतदेह झाडा-झुडूपांतून अभयारण्याच्या अंतर्भागात ओढून नेल्याचं दिसत होतं. मात्र अभयारण्यात शिरून माग काढण्याची पोलीसांचीही छाती झाली नाही. शिमोग्याला परतून मुलाचं शव न सापडल्याचा रिपोर्ट त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिका-याला केला.
दोन्ही वनाधिकारी आणि लाकूडतोड्याची आणि त्याच्या तरूणाची हत्या झाल्याचं आपल्या डोळ्यांनी पाहणारे ते दोघं अन्य लाकूडतोडे यांच्यासह मी त्या जागी आलो. रस्त्याच्या समोरच कराडीबेट्टा अभयारण्य पसरलेलं होतं. या रस्त्यावरून मी यापूर्वीही अनेकदा गेलो होतो. मी मागावर असलेल्या वाघाने अभयारण्यात आसरा घेण्याची ही दुसरी वेळ होती. गौजा गावातून जखमी होऊन पसार झालेल्या वाघाला अभयारण्यात शिरण्यापूर्वीच टिपण्यात मी यशस्वी झालो होतो, पण हा नरभक्षक मात्र अभयारण्यात निसटला होता.
दोन्ही वनाधिका-यांनी पूर्वीही त्या जागेला भेट दिलेली होती. वाघाने लाकूडतोड्यावर हल्ला केलेली नेमकी जागा त्यांनी मला दाखवली. मात्र गेल्या तीन दिवसात अनेक वाहनं त्या मार्गाने गेल्याने रक्ताचे डाग दिसून येत नव्हते. रस्त्यापासून अवघ्या काही यार्डांवरच अभयारण्याची सुरवात होत होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी म्हैसूरच्या वनखात्याने सागाचे अनेक वृक्ष ओळीने लावलेले होते. सागाची झाडं आता वीस फुटांवर गेली होती. सुमारे दोन फर्लांग सागाच्या या पट्ट्याच्या अंतर्भागात नैसर्गीक जंगल पसरलेलं होतं.
सागाच्या जंगलात रक्ताची स्पष्ट खूण नसेल तर माग काढणं तसं दुष्कर असतं. सागाच्या जमिनीवर पडलेल्या पानांवर कसल्याही खुणा शोधणं तसं कठीणच. नरभक्षकाने उचलून नेलेल्या मुलाच्या शरिरातून फारसा रक्तस्त्राव झाला नव्हता. खूप बारकाईने शोध घेतल्यावर आम्हांला फक्तं तीन ठिकाणी रक्ताचे माग दिसले. जंगलात पुढे माग काढणं जवळपास अशक्यं होतं.
अभयारण्याच्या उत्तर सीमेवर एक ओढा होता. ओढ्याच्या बाजूनेच गौजा आणि अमलीगोला गावांना जोडणारी पूर्व-पश्चिम दिशेने जाणारी बैलगाडीची चाकोरी होती. या चाकोरीच्या मार्गापलीकडेही घनदाट जंगल पसरलेलं होतं. अभयारण्याच्या चारही कोप-यांत चार आणि पाचवं आमिष अभयारण्याच्या मधोमध बांधण्याची मी योजना आखली. अभयारण्यात नरभक्षकाला मारण्याची परवानगी माझ्यापाशी होतीच !
वाघासाठी आमिष म्हणून जनावरं मिळवण्यासाठी मला वनाधिका-यांची मदत लागणार होती. या भागातले लोक वाघाला आमिष म्हणून गाय-बैल अथवा म्हैस विकायला धार्मिक कारणामुळे सहसा नाखूश असतात. दुस-या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत जनावरांची व्यवस्था करण्याचं त्यांनी कबूल केलं.
कुमसी गावात वनखात्याचं विश्रामगृह होतं. इथेच रात्रीचा मुक्काम टाकण्याचं मी ठरवलं. याच बंगल्यात वाघाने हल्ला चढवल्यावर रेव्हरंड जार्वीसच्या हातावर शस्त्रक्रीया करून तो काढण्यात आला होता. कुमसीच्या वनाधिका-याला आमिष म्हणून घेतलेली जनावरं छोर्डीला पाठविण्यापूर्वी मला दाखवण्याची मी सूचना केली. ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. अनेकदा म्हातारी झालेली किंवा एखाद्या रोगाने ग्रासलेली जनावरं साहेबाच्या गळ्यात आमिष म्हणून मारली जातात. वाघ हा जातीवंत शिकारी असल्याने हाडांचा सापळा झालेल्या जनावरांक्डे तो ढुंकूनही पाहत नाही.
एव्हाना संध्याकाळचे सहा वाजत आले होते. जंगलाच्या झाडांच्या सावल्या लांबच लांब दिसत होत्या. आम्ही अद्यापही जंगलाच्या अंतर्भागात होतो आणि माझे साथीदार कमालीचे अस्वस्थं झाले होते. अर्थात जोपर्यंत आम्ही पाचजण एकत्र होतो, तो पर्यंत आम्हांला धोका नव्हता याची मला खात्री होती. जंगलातून मार्ग काढत आम्ही माझी कार गाठली तेव्हां माझ्या जोडीदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला ! त्या दोन्ही लाकूडतोड्यांना आणि वनाधिका-याला छोर्डीला सोडून मी कुमसीच्या विश्रामगृहात पोहोचलो तो साडेसहा वाजत आले होते.
रात्रभर निवांत झोप काढून मी सकाळी वनाधिका-याला गाठलं. आदल्या रात्री आमिष म्हणून जनावरं मिळवण्याचं त्याने कितीही आत्मविश्वासाने सांगीतलं असलं तरीही मला खात्री नव्हती. माझा अंदाज अगदी बरोबर निघाला होता. सगळी घासघीस होऊन सकाळी दहा वाजून गेल्यानंतर त्याला तीन जनावरं मिळाली. एक अर्धवट वयात आलेलं रेडकू आणि दोन म्हातारे बैल ! मला अर्थातच ते बैल पसंत पडले नाहीत, पण त्या परिस्थितीत त्याहून चांगली जनावरं मिळवणं शक्य नव्हतं असं मला वनाधिका-याने सांगीतलं.
वनखात्याच्या तीन कर्मचा-यांना ती जनावरं छोर्डीला पोहोचवण्याची सूचना देऊन वनाधिका-यासह मी कारने छोर्डीला आलो. छोर्डीच्या वनाधिका-याने एक अर्धवट वाढलेला तपकीरी रंगाचा बैल मिळवला होता. दुसरं जनावर घेऊन त्याचा माणूस लवकरच येऊन पोहोचेल अशी त्याने खात्री दिली. तो माणूस येईपर्यंत साडेबारा वाजून गेले होते.
जनावरं मिळवण्यात उशीर झाल्याने त्यादिवशी सर्व आमिषं बांधणं शक्य नव्हतं. तपकीरी रंगाचा तो बैल मी अभयारण्याच्या मध्यावर बांधला. लाकूडतोड्याचा आणि त्याच्या मुलाचा बळी गेलेल्या जागेपासून काही अंतरावर दक्षिणेला रेडकू बांधलं. छोर्डीच्या उत्तरेला पाच मैलांवर - अभयारण्याच्या पूर्व बाजूस दोनपैकी एक म्हातारा बैल बांधून ठेवला. तीनही जनावरं बांधून होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. उरलेली दोन्ही जनावरं बांधण्यास वेळ नव्हता. दोन्ही जनावरं मी छोर्डीला ठेवली आणि कुमसीच्या बंगल्यावर परतलो.
दुस-या दिवशी पहाटे वनाधिका-यासह मी छोर्डीच्या वाटेला लागलो. वाटेत एक मोठा नर सांबर छोर्डीच्या आधी अर्धा मैल रस्ता ओलांडून गेला. माझ्याबरोबरच्या वनाधिका-याला तो शुभशकून वाटला.
छोर्डीच्या वनाधिका-याने हाताखालच्या तीन वनरक्षकांना आणि आमच्याबरोबर आलेल्यांपैकी एका माणसाला आदल्या रात्री बांधलेल्या दोन आमिषांची देखभाला करण्यास पाठवून दिलं आणि उरलेली दोन जनावरं बांधण्यासाठी तो आमच्याबरोबर आला. अभयारण्याच्या मध्यावर तपकीरी बैल बांधलेली जागा आमच्या वाटेवरच असल्याने त्याची पाहणी करणं आम्हांला सोईचं पडणार होतं. सुमारे दीड तासात आम्ही त्या जागी पोहोचलो. बैल सुखरूप होता.
आमिष म्हणून जनावरं बांधताना त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करणं हे फार महत्वाचं असतं. चा-याचा तसा प्रश्न येत नाही कारण बांधलेल्या जनावरापुढे चा-याच्या पेंढ्या टाकून ठेवणं सोपं असतं. पाणी देताना मात्र काळजी घ्यावी लागते. पत्र्याच्या किंवा मातीच्या भांड्यात पाणी ठेवणं हा उपाय सोपा वाटत असला तरी फारसा व्यवहार्य नाही. जनावराच्या पायाचा धक्का लागून भांडं उलटण्याची आणि मातीचं असल्यास फुटण्याची शक्यता असते. पत्र्याच्या भांड्यातून पाणी ठेवणं म्हणजे वाघाच्या अथवा चित्त्याच्या संशयाला आमंत्रण ! सर्वात सोपा मार्ग म्हणजे एखाद्या झ-यावर किंवा डबक्यावर जनावराला नेणं आणि पोटभर पाणी पाजून परत बांधून ठेवणं. परंतु अनेकदा झरा अथवा तळं काही मैलांवर असू शकतं. जनावरावर लक्षं ठेवण्यास नेमण्यात आलेली माणसं भरवशाची नसल्यास एवढी पायपीट करण्यापेक्षा एवीतेवी जनावर मारण्यासाठीच बांधलेलं असल्याने स्वतःची तंगडतोड वाचवण्याचा मार्ग पत्करतात. शिका-याने आमिषांची व्यवस्था स्वतः पाहीली नाही किंवा खात्रीच्या माणसांवर सोपवली नाही तर वाघ-चित्त्याने बळी घेईपर्यंत अनेकदा जनावर तहानेने व्याकूळ होऊन जातं.
वाघासाठी आमिष बांधण्यासाठी नेहमी झ-याच्या किंवा तळ्याकाठच्या जागाच का निवडल्या जात नाहीत असा प्रश्नं तुम्हाला पडण्याची शक्यता आहे, पण आमिष म्हणून जनावरं बांधताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. झ-याच्या बरोबरीनेच गुरांच्या आणि इतर जनावरांच्या पायवाटा, बैलगाड्यांच्या चाको-या, जंगलातून जाणारे रस्ते, जंगलातून बाहेर पडणा-या आणि माणसांचा वावर असलेल्या पायवाट, विशेषतः वाघाचे ठसे आढळल्यास आमिष बांधण्यासाठी उत्तम असतात. अनेकदा दोन किंवा त्यापेक्षा जास्त पायवाटा एकमेकाला छेदून जातात त्या ठिकाणीही जनावर बांधणं सोईचं पडतं. वाघ सहसा झ-यांच्या किंवा ओढ्यांच्या काठाने मार्गक्रमणा करणं पसंत करत नाहीत. आम्ही जंगलाच्या मधोमध जिथे बैल बांधला होता ती जागा वाघाच्या नेहमीच्या वाटेवर असल्याची वनाधिका-याने खात्री दिली होती.
बैलाला बांधलेल्या जागेपासून अर्धा-पाऊण मैलावर एक झरा होता. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर बैलाला आम्ही पुन्हा बांधून ठेवलं. उरलेली दोन्ही जनावरं अभयारण्याच्या पश्चिम आणि उत्तर सीमेजवळ बांधून ठेवली. सर्व आटपेपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते.
अभयारण्याच्या चारही बाजूला आमिषं बांधून या नरभक्षकाला आम्ही आत बंदिस्तं केलं होतं अशी मात्रं कृपया तुम्ही कल्पना करून घेऊ नका. अभयारण्य चारही दिशांना अफाट पसरलेलं होतं आणि वाघ बाहेर पडला की मी बांधलेल्या जनावरालजवळून बाहेर पडेल आणि पडला तरी त्याला मारेलच याची काहीच खात्री नव्हती. त्या परिस्थितीत वाघासाठी आमिष म्हणून जनावरं बांधणं आणि त्याच्या हालचालींची वाट पाहणं इतकंच शक्य होतं आणि तेच मी केलं होतं. उरलेला सर्व नशिबाचा भाग होता.
दुपारी तीनच्या सुमाराला आम्ही छोर्डीजवळ पोहोचत असताना शेतात काम करणा-या मजुरांच्या एका गटाशी आमची गाठ पडली. सकाळी आमिषांची पाहणी करणा-या वनरक्षकांना लाकूडतोड्या आणि त्याच्या मुलाचा बळी गेला होता तिथून जवळ बांधलेलं रेडकू वाघाने मारून टाकल्याचं आढळलं होतं ! आम्ही जंगलाच्या नक्की कोणत्या भागात गेलो आहोत आणि कधी परत येऊ याची काहीच कल्पना नसल्याने वनरक्षकांना काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्या वाटेने जाणा-या - येणा-या प्रत्येकाला आमची गाठ पडल्यास ही बातमी सांगण्याचं त्यांनी बजावून पाठवलं होतं.
ही बातमी कळताच आम्ही छोर्डी गाठलं. दोन्ही वनाधिका-यांनी ताबडतोब आमचा शोध घेऊन बळीची बातमी आम्हांला न कळवल्याबद्दल वनरक्षकांवर चांगलीच आगपाखड केली. खरंतर त्या बिचा-यांचा काहीच दोष नव्हता. एकतर आम्ही जंगलाच्या कोणत्या भागात आहोत हे त्यांना माहीत नव्हतं आणि बातमी कळवण्यासाठी आमचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत आणखीनच उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशा परिस्थितीत आपण छोर्डीला थांबून प्रत्येक वाटसरूबरोबर आम्हांला निरोप पाठविण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत योग्य होता. गिधाडांपासून वाचवण्यासाठी त्यांनी त्या रेडकाचे अवशेष डहाळ्यांनी झाकून ठेवले होते.
दुपारी साडेतीनच्या सुमाराला आम्ही रेडकू बांधून ठेवलेल्या जागी पोहोचलो. माचाण बांधण्यासाठीची माझी फोल्डींगची बाज मी बरोबर आणली होती. नेहमीपेक्षा अर्ध्या लांबीची ही बाज मी मुद्दाम माचाणाकरता बनवून घेतली होती. खाकी रंगाची मोठी टेप त्यावर मी चटईच्या पट्ट्यांप्रमाणे शिवून घेतली होती. टेपची शेवटची टोकं कडेच्या बांबूंभोवती गुंडाळून टाकलेली होती. बाजेचे जेमतेम फूटभर उंचीचे पाय सहा-सहा इंच वर-खाली बाहेर आलेले होते. माचाण झाडाला घट्ट बांधण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. ही बाज वजनाला हलकी आणि सुटसुटीत होती. मुख्य म्हणजे कोणत्याही हालचालीने तिचा बारीकसा देखील आवाज होत नसे !
मी रेडकू बांधलं होतं त्याच्या आसपासची सागाची झाडं चांगलीच उंच वाढलेली होती. परंतु आसपास दुसरी कोणतीही झाडं नसल्याने त्यावरच बसण्यापलीकडे पर्याय नव्हता. सागाच्या त्या झाडावर चढताना माझी चांगलीच त्रेधतिरपीट उडाली. त्या झाडाची सर्वात खालची फांदीच मुळात बारा फूट उंचीवर होती. मला सरळ उभ्या खांबावर चढण्याचा काहीही अनुभव नव्हता. शेवटी एका वनरक्षकाच्या खांद्यावर मी उभा राहीलो आणि इतरांनी खालून आणखीन थोडा वर ढकलल्यावर ती फांदी माझ्या हाताला लागली. हातांवर भार देऊन मी एकदाचा त्या फांदीवर चढलो ! एकदा वर चढल्यावर माचाण बांधणं ही सोपी गोष्टं होती. सागाच्या मोठ्या पानांत माचाण झाकण्यास आम्हांला काहीच प्रयास पडले नाहीत. त्या प्रदेशात सर्वत्र सागाचंच साम्राज्य असल्याने वाघाला संशय येण्याचाही संभव नव्हता. भक्ष्यं माझ्या माचाणापासून खाली वीस फूट अंतरावर होतं. त्याची मान मोडलेली होती. वाघाने त्यावर चांगलाच ताव मारलेला असला तरीही अद्याप एकदा परतण्याइतपत मांस शिल्लक होतं.
दोन्ही वनाधिकारी आणि वनरक्षकांपैकी कोणालाही कार चालवता येत नव्हती. पण दोन्ही लाकूडतोडे बरोबर आल्याने मी त्यांना माझी कार तिथून किमान अर्ध्या मैलांवर ढकलत नेऊन ठेवण्याची सूचना केली. वाघाने त्या ठिकाणी रस्ता ओलांडलाच तर उगाच संशयास कारण ! रस्ता तसा सरळच होता आणि सहाजण असल्यामुळे त्यांना माझी कार ढकलण्यास अडचण येणार नाही अशी माझी अटकळ होती.
पाच वाजण्याच्या सुमाराला मला माचाणात सोडून ते सर्वजण रस्त्यावर निघून गेले. अर्धा मैल कार ढकलण्यास त्यांना फारतर वीसेक मिनीटं लागणार होती. वाघ रस्त्याच्या बाजूने आला तर कार त्याच्या नजरेस पडणार नाही अशी मी आशा केली. अर्थात तो त्या रात्री आला तरच !
सुमारे सव्वाआठच्या सुमाराला गडद अंधारात वाघोबा प्रगटले ! तो येण्यापूर्वी चितळांच्या कळपाने त्याच्या आगमनाची सूचना मैलभराच्या परिस्ररातील जनावरांना दिली होती. आश्चर्याची गोष्ट अशी की कोणतीही सावधगीरी न बाळगता तो आला होता. झाडाखालच्या पाचोळ्यावर त्याच्या वजनदार शरिराचा चालताना होणारा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता.
मी टॉर्चचं बटण दाबलं. त्याबरोबर त्याने मान वर करून प्रकाशाच्या दिशेने पाहीलं. त्या उजेडातही त्याच्या मानेभोवती आयाळ नाही असं क्षणभर मला वाटून गेलं. अर्थात कोणताही धोका पत्करण्यास मी तयार नव्हतो. त्याच्या छातीचा वेध घेऊन मी गोळी झाडली. गोळी लागताच तो भक्ष्याशेजारीच कोसळला.
मी पंधरा मिनीटे वाघाचं निरीक्षण करत होतो. अखेर तो मेल्याची खात्री होताच मी झाडावरून खाली उतरलो. अर्थात त्या प्रयत्नात मला सुमारी आठ-नऊ फूट उंचीवरुन उडी मारावी लागली होती. खाली पाय टेकताच बसलेल्या जोरदार दणक्याने मी स्वतःलाच दोन-चार शिव्या हासडल्या.
वाघाजवळ जाऊन मी त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं. गोळी झाडण्यापूर्वीच तो नरभक्षक नाही अशी मला जी शंका आली होती ती खरी असल्याचं मला दिसून आलं. वाघाच्या गळ्याभोवती आयाळीचा मागमूस नव्हता ! पुन्हा एकदा नरभक्षक निसटला होता आणि साधा निरुपद्रवी वाघ गोळीला बळी पडला होता. शिमोग्याच्या मुख्य वनाधिका-याला स्पष्टीकरण द्यावं लागणार होतं ते वेगळंच. त्याने मला अभयारण्यात नरभक्षकाची शिकार करण्याची खास परवानगी दिली होती आणि मी चुकून सामन्य वाघ मारला होता.
मी रस्ता गाठला आणि छोर्डीच्या दिशेने चालू लागलो. काही अंतरावरच मला माझी कार दिसेल अशी अपेक्षा होती. पण गाडीचा पत्ता नव्हता. माझी सूचना न कळल्यामुळे बिचा-यांनी कार पार छोर्डीपर्यंत दोन मैल ढकलत नेली होती की काय ?
मी छोर्डीला पोहोचलो आणि वनाधिका-यांचं निवासस्थान गाठलं. दोघंही तिथे हजर होते. मी त्यांना वाघाची शिकार केल्याचं परंतु तो नरभक्षक नसल्याची माझी खात्री असल्याचं बोलून दाखवलं. त्यांना ते पटलं नाही. दोन वर्षांत वाघाची आयाळ गळून गेली असावी किंवा मुळातच त्याला आयाळ नसावी आणि हा फक्त गैरसमज असावा असं त्यांचं मत पडलं. त्यांच्या मताशी मी सहमत झालो पण मला ते फारसं पटलं नाही.
मग मी त्यांच्याकडे कारची चौकशी केली.
" कार ?" त्यांनी खुलासा केला, " साहेब, कारचं तोंड तर कुमसीच्या दिशेने होतं आणि तुम्ही कार तिथून अर्धा मैल दूर ढकलण्यास सांगीतलं होतं. आम्ही कार ढकलत नेली !"
त्यांनी कार बरोबर विरुध्द दिशेला कुमसीच्या दिशेने ढकलत नेली होती.
मग वाघाला उचलून आणण्यास माणसं घेऊन आम्ही पुन्हा त्या जागी गेलो. ते सर्वजण दोराच्या सहाय्याने वाघ बांबूला बांधत असताना मी कुमसीच्या दिशेने चालत गेलो आणि बरोबर मैलभर अंतरावर रस्त्याच्या कडेला माझी गाडी दिसली. वाघाचं धूड घेऊन तासाभराने आम्ही कुमसीच्या बंगल्यावर परतलो.
दुस-या दिवशी वाघाचं कातडं सोडवून घेण्यात वेळ गेला.
दरम्यान दोन्ही वनाधिका-यांनी शिमोग्याच्या वरीष्ठ अधिका-याला आपला रिपोर्ट पाठवून दिला. मी मारलेल्या वाघाला मानेभोवती आयाळ नव्हती. कदाचित तो नरभक्षक नसण्याची शक्यता होती. माझ्याजवळ कराडीबेट्टा अभयारण्यात फक्त नरभक्षकाची शिकार करण्याची परवानगी होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असं त्यांनी रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं.
रिपोर्ट पाठवल्यावर त्यांनी मला असा रिपोर्ट पाठवावा लागल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. अर्थात त्यांचा काहीच दोष नसल्याची मला कल्पना होतीच.
माझी सुटी संपेपर्यंत मी त्या भागात राहीलो, पण माझ्या इतर कोणत्याही जनावरावर वाघाने हल्ला केला नाही. दरम्यान शिमोग्याच्या वरिष्ठ वनाधिका-याने मला चौकशी करणारं पत्रं पाठवलं. मी मारलेला वाघ नरभक्षक नसल्याचा रिपोर्ट त्याला मिळाला होता. माझ्याजवळ फक्त नरभक्षकाच्या शिकारीचा परवाना असतांना मी दुस-या वाघाची शिकार केल्याबद्द्ल त्यात माझ्याकडून स्पष्टीकरण मागीतलेलं होतं.
हिंदुस्थानात अनेक वर्षे घालवल्यामुळे सरकारी कामकाज कसं चालतं याचा मला चांगला अनुभव होता. त्यामुळे वनाधिका-याच्या पत्राला मी तपशीलवार उत्तर लिहीलं. त्याला चुकीची माहीती मिळाल्याबद्दल मी खेद प्रगट केला होता. मी मारलेला वाघ नरभक्षकच होता आणि अभयारण्यात नरभक्षकाची शिकार करण्याच्या मला देण्यात आलेल्या खास परवानगीचं मी उल्लंघन केलेलं नाही असं मी ठामपणे कळवून टाकलं.
माझ्या उत्तराने सर्वांचं समाधान झालं. सरकारच्या दृष्टीने सर्वांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली होती.
मी बंगलोरला परत निघालो. दोन्ही कनिष्ठं वनाधिका-यांचे आणि वनरक्षकांचे मी आभार मानले. आमिष म्हणून बांधलेली उरलेली चारही जनावरं आधी ठरल्याप्रमाणे मूळ मालकांना पावपट किंमतीत विकून टाकली. परत येताना शिमोग्याला थांबून मी तिथल्या वनाधिका-याची गाठ घेतली. दोन्ही कनिष्ठ वनरक्षकांनी पाठवलेल्या रिपोर्ट्मुळे त्याने मला पत्रं पाठवल्याचं आणि मी त्याला योग्य उत्तर पाठवल्याचं त्याने मला सांगीतलं. अर्थात मला सगळ्याची आधीच कल्पना होती. त्याचा निरोप घेऊन मी बंगलोरला परतलो.
वर्षभर शांततेत गेलं. लाकूडतोड्या आणि त्याचा मुलगा यांच्यानंतर आणखी कोणाचाही बळी वाघाने घेतला नव्हता. वाघाच्या आयाळीची कथा कपोलकल्पीतच होती आणि त्या रात्री मी मारलेला वाघच नरभक्षक होता अशी माझ्यसकट सर्वांची समजूत झाली. ती चुकीची होती हे वाघानेच दाखवून दिलं !
वाघाने सागर शहराजवळच एक माणूस उचलला. आणखी पंधरवडयभरातच त्याने आनंदपुरमपासून दहा मैलांच्या परिसरात असलेल्या गौजा आणि तगार्थी गावातून अनुक्रमे एक पुरुष आणि स्त्री यांचा बळी घेतला. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला वाघाने एका लंबानी तरूणाची शिकार केली. हा तरूण कुमसी गावाच्या बाहेर रस्त्यालगतच गुरं चारत असतांना वाघाने भर दिवसा त्याला उचलंल होतं.
ला़कूडतोड्या आणि त्याच्या मुलाचा बळी घेतल्यावर गायब झालेला नरभक्षक आता पुन्हा प्रगटला होता आणि माणसांचा संहार करण्याचं आपलं सत्रं त्याने पुन्हा आरंभलं होतं. का हा दुसराच नरभक्षक होता ?
मी आठवड्याभराची रजा मिळवली आणि शिमोगा गाठून तिथल्या वरिष्ठ वनाधिका-याची भेट घेतली. पूर्वीचा वनाधिकारी बदलून नवा अधिकारी आला होता. त्याने मला सुयश चिंतलं. छोर्डी आणि कुमसी इथले दोन्ही कनिष्ठ वनाधिकारी अद्याप बदलले नसल्याचं मला त्याच्याकडून समजलं. मी दोघांचीही गाठ घेतली. त्यांच्या मते हा नरभक्षक या भागात नव्यानेच आला होता आणि वर्षाभरापूर्वी माझ्या गोळीला बळी पडलेला वाघ खात्रीने नरभक्षकच होता. अन्यथा तो इतके दिवस कुठे गायब झाला होता ? गेल्या दोन महिन्यांपूर्वीपर्यंत वाघाने एकही मानवी बळी घेतल्याची बातमी नव्हती. वाघ कधीही मानवी बळी घेण्याचं सोडत नाही असं त्यांचं ठाम मत होतं. पूर्वीच्या नरभक्षकाने कुठेही स्थलांतर केलं असतं तरी तिथल्या बळींची खबर त्यांच्यापर्यंत पोहोचलीच असती.
त्यांचं बोलणं तर्कसंगत होतं आणि मनोमन पटत नसूनही मला ते मान्यं करण्यावाचून पर्याय नव्हता.
आता पुढची योजना आखायची होती. या वाघाने सागर, आनंदपुरम, तागार्थी, गौजा आणि आता कुमसी इथे माणसं उचलली होती. या विभागातच पूर्वी आयाळ असलेल्या वाघाचा संचार होता. नक्की कुठून सुरवात करावी, आमिष म्हणून कुठे जनावरं बांधावीत हा प्रश्न माझ्यापुढे उभा ठाकला.
माझ्यापुढच्या हा प्रश्न वाघोबानेच सोडवला. कराडीबेट्टा अभयारण्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या अमलीगोला गावातून वाघाने भर दिवसा एका गुराख्याला ओढून नेलं होतं. वनरक्षकांनी ही बातमी ताबडतोब छोर्डीच्या वनाधिका-याला कळवली. मला खबर देण्यास तो कुमसीला आला तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. आम्ही ताबडतोब बाहेर पडलो.
छोर्डी गाव मागे टाकून आम्ही बैलगाडीच्या चाकोरीच्या मार्गाने अमलीगोला गाठलं. अमलीगोला गावात वनखात्याचं लहानसं विश्रामगृह होतं. या विश्रामगृहाच्या मागेच एक लहानसा झरा वाहत होता. झ-याच्या पलीकडेच अभयारण्य पसरलेलं होतं. हा झरा सुमारे दोन मैलांवर एका तळ्याला जाऊन मिळत होता. ज्या गुराख्याचा बळी गेला होता, तो आपली गुरं घेऊन या तळ्याच्या परिसरातच आला होता. झ-याच्या पात्रातून येऊन वाघाने गुराख्याला उचललं आणि परत वळून पात्रातून चालत तो जंगलात निघून गेला होता. आजूबाजूच्या गाई-गुरांकडे त्याने ढुंकूनही पाहिलं नव्हतं. वाघाने गुराख्यावर हल्ला केला होता तिथे त्याच्या पंजांचे ठ्से आणि गुराख्याला ओढून नेल्याची खूण स्पष्ट दिसून येत होती.
एव्हाना अंधार पडायला सुरवात झालेली होती. त्या दुर्दैवी मुलाच्या मृतदेहाचा शोध घेणं लगेच शक्यं नव्हतं. बळीची बातमी कुमसीला ब-याच उशीरा पोहोचल्याबद्दल मी नशिबाला दोष दिला. माझा ईलाज नव्हता. अमलीगोलाला पोहोचण्या-या रस्त्यावरून गाडी चालवताना गाडी नादुरुस्त झाली असती तर वेगळीच समस्या माझ्यापुढे उभी राहीली असती. त्या संध्याकाळी मुलाचं शव सापडलं असतं तर मी नक्की माचाण बांधून वाघासाठी बसलो असतो.
आम्ही विश्रामगृहात परतलो. बंगल्याच्या एका खोलीत दोघं वनाधिकारी झोपले. मी दुस-या खोलीचा आसरा घेतला. दोन्ही वनरक्षकांनी स्वैपाकघराजवळच्या साठवणीच्या खोलीत मुक्काम टाकला. वाघाच्या विचारातच मला झोप लागली.
मध्यरात्रीनंतर अचानक वाघाच्या आवाजाने मला जाग आली. आमच्यापासून सुमारे मैलभर अंतरावरून तो जात असावा. पुन्हा त्याने आवाज दिल्यावर दोन्ही वनाधिका-यांच्या माझ्या खोलीचं दार वाजवलं. मी बहुधा झोपेत असेन अशी त्यांची कल्पना होती. दार उघडून मी दोघांना आत घेतलं.
मी व्हरांड्यात उघडणारं मुख्य दार उघडलं. चंद्रप्रकाशात भोवतालचं जंगल चमकत होतं. मी वाघाच्या दिशेचा अंदाज घेत असतांनाच पुन्हा जवळून त्याचा आवाज आला. वाघ बंगल्याच्या पाठी असलेल्या झ-याच्या काठा-काठाने जात असल्याचं मला अचानक जाणवलं. दहा एक मिनीटांत तो बंगल्याच्या पाठून जंगलात निघून गेला असता. हाच नरभक्षक असावा असा मी अंदाज केला.
माझा टॉर्च रायफलच्या क्लॅम्पवर बसवण्यास मला जेमतेम दोन मिनीटं लागली. बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या बाथरूमच्या दारातून मी बाहेर पडलो. कंपाऊंड जवळच्या काजूच्या झाडांमधून मुसंडी मारत उतारावरून धावतच मी झ-याच्या काठावर पोहोचलो.
चंद्रप्रकाशात झ-याचं पाणी चमकत होतं. पण काठावरच्या झाडांच्या बुंध्यांपाशी मात्र अंधार पसरलेला होता. झ-याच्या पलीकडच्या काठापलीकडे अभयारण्य पोहोचलेलं होतं. मी उभा होतो त्या काठावर असतानाच वाघाला गाठणं आवश्यक होतं अन्यथा तो पुन्हा अभयारण्यात पसार झला असता.
काय करावं या विचारात मी असतानाच वाघाचा आवाज आला. फारतार पाव मैल अंतरावर होता तो !
आता माझ्यापुढचा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे वाघ दोनपैकी कोणत्या काठावरुन चालला होता ? तो जर अभयारण्याला लागून असलेल्या पलीकडच्या काठावरून चाललेला असला तर चंद्रप्रकाशात वाघ दिसण्यासाठी मला झ-याच्या काठावर जाणं आवश्यक होतं. पण तो जर मी उभा असलेल्या अलीकडच्या काठावरूनच येत असला तर मी झ-याकाठी उभा त्याच्या नजरेस पडलो असतो. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे वाघ माझ्यापेक्षा उंचीवर असणार होता आणि मी त्याला पाहण्यापूर्वीच त्याने मला पाहिलं असतं !
वाघाचा पुन्हा आवाज आला. आता तो जेमतेम फर्लांगभर अंतरावर होता. आता विचार करण्यासही वेळ नव्हता. मला ताबडतोब निर्णय घ्यावा लागणार होता. बहुधा वाघ पलीकडच्या काठावर असावा.
हा सर्व विचार करत असतांनाच मी लपण्यासाठी जागा शोधत होतो. मी उभा असलेल्या काठापासून सुमारे दोन-तीन फूटांवर झ-याच्या पात्रात एक लहानसं बेट तयार झालं होतं. या बेटावर उंच गवत वाढलेलं होतं. झरा अजिबात खोल नसल्याची मला कल्पना होती. कोणताही आवाज न करता मी पाण्यात शिरलो आणि त्या लहानशा बेटावर गवतात द्बून बसून राहीलो. दोन मिनीटं शांततेत गेली. दोन्ही तीरांवर भरपूर झाडं होती. अंधारात त्यांच्या बुंध्यापासचं काहीही दिसत नव्हतं
आणि काही मिनीटांपूर्वी ज्या काठावर मी उभा होतो नेमक्या त्या दिशेने वाघाचा आवाज आला !
मी एक ते पाच आकडे मनातल्या मनात मोजले. एव्हाना वाघ उतारावरुन झ-याच्या पातळीत आला होता. मी टॉर्चचं बटण दाबलं, माझ्यापासून जेमेतेम पंधरा यार्डांवरून तो चालला होता.
प्रकाश दिसताच तो थांबला आणि वळून पाहू लागला. मी त्याच्या उजव्या खांद्यामागे गोळी झाडली. गोळी लागताच तो उडाला आणि मागच्यामागे कोलमडला. मी दुसरी आणि पाठोपाठ तिसरी गोळी झाडली. एव्हाना मी नेमका कुठे आहे याचा त्याला पत्ता लागला होता. घसरत धडपडत तो माझ्यावर चाल करून आला. अवघ्या पाच यार्डांवर असताना माझ्या चौथ्या गोळीने त्याच्या मेंदूचा वेध घेतला.
सकाळी मी त्या वाघाची तपासणी केली. त्याच्या मानेभोवती खरोखरच आयाळीसारखे भरपूर केस वाढलेले होते !
जंगलातील काही रहस्यं ही अनेकदा गुलदस्त्यातच राहतात. या वाघाला आयाळ का होती हे देखील असंच एक रहस्यं होतं.
( मूळ कथा : केनेथ अँडरसन )
( समाप्त )
प्रतिक्रिया
27 Apr 2014 - 7:14 am | खटपट्या
वाचतोय !!
27 Apr 2014 - 7:48 am | खटपट्या
जबरी !!! साधारण खालील चित्राप्रमाणे दिसत असावा !!!
27 Apr 2014 - 8:28 am | जोशी 'ले'
शिकार कथा आवडली
27 Apr 2014 - 7:52 pm | शुभां म.
एकदम भारी.................
27 Apr 2014 - 8:17 pm | llपुण्याचे पेशवेll
एकदम भारी. पण कथा एकदमच संपल्यासारखी वाटते.
27 Apr 2014 - 9:25 pm | टिल्लू
हा व्हिडिओ पाहून साधारण कल्पना येईल त्या काळातील शिकारीची.
http://www.youtube.com/watch?v=FmYznJ88lY4
28 Apr 2014 - 1:39 am | सुहास झेले
थरारक... :)
28 Apr 2014 - 2:24 am | आत्मशून्य
बाकी नरभक्षकांवर आधारीत द घोस्ट एंड द डार्कनेस कोणी बघितला आहे काय ?
28 Apr 2014 - 5:55 am | स्पार्टाकस
द घोस्ट अॅन्ड द डार्कनेस पाहीला आहे. केनियातील त्सावो इथल्या नरभक्षक सिंहांच्या सत्यकथेवर आधारीत आहे. त्या नरभक्षकांनी केलेल्या हल्ल्याला अनेक भारतीय मजूर बळी पडले होते. युगांडा - मोंबासा रेल्वेमार्गाचं काम अनेकदा त्यामुळे स्थगित झालं होतं. लेफ्टनंट कर्नल जॉन हेनरी पॅटरसनने दोन्ही सिहांची शिकार केली.
या पिक्चरमध्ये पॅटरसनच्या भूमिकेत वॅल किल्मर आणि त्याच्या मदतनीस आणि शिकारी चार्ल्स रेमींग्टनच्या भूमिकेत मायकल डग्लस होता. भारतीय मजुरांचा प्रमुख अब्दुल्लाची भूमिका ओम पुरीने केली होती.
28 Apr 2014 - 2:55 pm | llपुण्याचे पेशवेll
हे दोन्ही सिंह जे मारले गेले होते ते नर होते. त्यांच्याही जबड्यांचा अभ्यास केल्यावर त्यांचे वरचे आणि खालचे सुळे एकमेकांवर घट्ट बसत नसल्याने भक्ष्याचे लचके पटापट तोडण्यात हे सिंह मागे पडले होते. त्यामुळे कुपोषण आणि ओघानेच आयाळ गळणे ई. आले. म्हणूनच तुलनेने सोपे भक्ष्य म्हणजे मानव. त्यांच्यावर हल्ले चालू झाले. जालावर शोध घेतल्यावर कोणत्यातरी संग्रहालयात हे सिंह भुसा भरलेल्या अवस्थेत मिळाले.
28 Apr 2014 - 3:10 pm | अभिरुप
नेहमीप्रमाणेच ओघवतं आणि सुंदर लेखन
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
28 Apr 2014 - 6:42 pm | एस
जिम कॉर्बेटच्या लेखनात किंचित आत्मप्रौढीचा सूर सापडतो आणि केनेथ अँडरसनच्या कथा त्यामानाने जास्त रसाळ वाटतात असा सूर काही वेळेस वाचकांकडून लावला जातो. कॉर्बेटच्या कथा वाचत असताना वाचकाला आपण स्वतः त्याठिकाणी आहोत आणि नरभक्षक झाडोर्यातून आपलाही पाठलाग करतो आहे असा भास होत राहतो. हा केवळ या दोन लेखकांच्या शैलीतील फरक असावा असे माझेतरी मत आहे. बाकी दोघेही ग्रेटच. सलाम!
28 Apr 2014 - 7:43 pm | आत्मशून्य
उत्तम स्टोरी टेलर आहे, हे खरे कारण त्यामागे असावे.
29 Apr 2014 - 1:22 pm | एस
'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या' (The Man-eating Leopard of Rudraprayag) हे पुस्तक वाचताना तर अक्षरशः खुर्चीला खिळून बसलो होतो. तीच गोष्ट 'Tigers of Chowgarh' ची. या दुसर्या कथेत एका हातात पक्ष्याची अंडी आणि एका हातात लाइट कॅलिबर रायफल असा कॉर्बेट जेव्हा त्या ओढ्यात खडकाला वळसा घालून थेट नरभक्षक वाघिणीच्या समोरच येतो तेव्हा क्षणभरासाठी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो...
कॉर्बेटचे प्रत्येक परिस्थितीचे विश्लेषणही तितकेच भारी असते. वरील उदाहरणातही एका हातात अंडी व दुसर्या हातात नेहमीपेक्षा वेगळी हलकी रायफल असणे आणि वाघिणीचे नरभक्षक असणे या सर्व बाबींचा अंतिमतः त्याला फायदाच कसा झाला हे त्याच्याच शब्दांत (मूळ इंग्रजीतून) वाचण्यात मजा आहे.
28 Apr 2014 - 7:58 pm | प्रचेतस
सहमत.
अॅण्डरसनच्या कथानकांपेक्षा कॉर्बेटच्या कथा जास्त वाचनीय आहेत.
29 Apr 2014 - 1:12 am | सुहास झेले
+१
29 Apr 2014 - 3:28 pm | उदय के'सागर
रोचक माहिती आणि शिकार कथा.
हे भाषांतर नेमके कोणत्या पुस्तकाचे आहे हे सांगाल का?
29 Apr 2014 - 10:12 pm | स्पार्टाकस
हि कथा केनेथ अँडरसनच्या ब्लॅक पँथर ऑफ सिवानीपल्ली मधील आहे.
29 Apr 2014 - 4:01 pm | कवितानागेश
मस्त शिकार कथा.
हे असे नरभक्षक वाघाच्या मागावर चालत जाणं फारच धोकादायक होतं. त्यातून टोर्च लावल्याशिवाय वाघ कुठेय हे दिसणार नाही. पण वाघाला मात्र आपण तॉर्चशिवाय सहज दिसणार... भयानक.