मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल
(१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी
(२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली
या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील
____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले.
ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय?
होय सायकिअॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्याचजणांना ही समस्या असते. मला बर्याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल????
______________________________________________________
दुसर्याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!!
पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले -
------बायपोलर डिसॉर्डर!!!------
मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली.
____________________________________________________________
घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो.
भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%.
..........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अॅटॅक्स!!!
सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल.
अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली.
_____________________________________________________
पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट???
पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले.
कधीही दुसर्याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले.
____________________________________________________
नवर्याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली.
हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
प्रतिक्रिया
22 Apr 2014 - 3:24 pm | दिव्यश्री
+++++++++++++++++ १ . अगदी खर , योग्य बोलले , लिहिले आहे . सगळे लोक सगळीकडे सदासर्वदा सद्गुणांचा पुतळा असल्यासारखे नाही वागत . ते त्यांच्या सोयीनुसारच वागतात . मिपावर हे होणार नाही याची काळजी , खबरदारी आपणच घेतली पाहिजे .सगळी कडे चांगले / कमी चांगले / आजीबात चांगले नाही असे लोक आढळतातच कि . डॉ.णी अगदी योग्य तेच सांगितले आहे . शारीरिक आजार दिसतो मानसिक दिसत नाही त्यामुळे त्या व्यक्तीला होणारा त्रास /यातना ह्या फक्त ते भोगणारी व्यक्तीच जाणू शकते . मारणार्याचा हात धरता येतो पण बोलणार्याच तोंड नाही धरू शकत तसच लिहिणार्याचा हात नाही धरू शकत कोणी .
22 Apr 2014 - 3:07 pm | प्यारे१
खर्यांचं म्हणणं बरंचसं खरं आहे. ;)
22 Apr 2014 - 3:21 pm | मोहन
आपल्या व आपल्या जोडीदाराच्या धैर्यापुढे केवळ नतमस्तक .
अशा लेखांमुळेच मिपावर येण्याचे सार्थक होते.
22 Apr 2014 - 3:23 pm | बॅटमॅन
च्यायला काय डेरिंग हो तुमचं. मानलं बॉ _/\_
22 Apr 2014 - 3:33 pm | कुसुमिता१
शुचि ताई, खुप खुप कौतुक आणि अभिमान वाटला तुमच्या बद्दल! तुम्ही केवळ या आजाराशीच लढलात अस नाही तर त्याबद्दल लो़कांना सांगण्याच धैर्यही दाखवलत! खरच खुप कमी लोकांच्यात असतात असे गट्स! तुमच्या मिस्टरांचही खुप कौतुक!
22 Apr 2014 - 3:54 pm | संपत
बाय पोलर बद्दल पहिल्यांदा ऐकले ते 'homeland' ह्या मालिकेत. कुतूहलाने जालावर अधिक शोध घेतला असता नात्यातील एका 'विक्षिप्त' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या लक्षणांशी साधर्म्य आढळले. आणि त्या व्यक्तीशी त्याकाळी अधिक सहानुभूतीने वागायला पाहिजे होते याची दुखद अपराधी जाणीव झाली.
तुमचा लेख हा केवळ हि लक्षणे असणाऱ्या रुग्णासाठीच नव्हे तर आमच्या सारख्या अनेक जणांना जे अशा किंवा इतर मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांबरोबर कळत नकळत वावरतात त्यांच्यासाठी मोलाचा ठरेल.
तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. स्कीझोफ्रेनिया ह्या आणखीन एका अधिक रुद्र मानसिक आजाराला धैर्याने तोंड देणाऱ्या रुग्णासाठी व त्यांना आधार देणाऱ्या प्रमुख व्यक्तींसाठी आनंद नाडकर्णी यांची संस्था शुभार्थी आणि शुभंकर असे दोन सन्मान दरवर्षी देते. त्यातूनच साथ देणारी व्यक्ती ह्या आजारांवर मात करण्यासाठी किती महत्वाची असते हे अधोरेखित होते.
22 Apr 2014 - 4:10 pm | प्रभाकर पेठकर
एखाद्या मनोव्याधीचे दृष्य परिणाम दिसू लागले की आपण मानसोपचार तज्ञांकडे जातो. (जाणं अपेक्षित असतं) पण शारीरिक आजारांबाबत जशा कांही तपासण्या वरचेवर करून आपण संभाव्य शारीरिक व्याधीला दूर ठेवतो/तसा प्रयत्न करतो तसे मनोव्याधीबाबत करता येते का? म्हणजे आज मला (किंवा माझ्या आजूबाजूच्यांना) माझ्या कुठल्याही मनोव्याधीचे दृष्य परीणाम दिसत नसतील तरी भविष्यात तशी एखादी व्याधी उपटणार नाहीच असे नाही. तर आजच्या तथाकथित आरोग्यपूर्ण मनाने मानसोपचार तज्ञास भेट दिली तर स्वभावातील दोष शोधता येतात का?
मुंबईत किंवा पुण्यात चांगले अनुभवी मानसोपचार तज्ञ कोणाच्या माहितीत आहेत का?
22 Apr 2014 - 4:38 pm | राही
डॉ आनंद नाडकर्णी (ठाणे), डॉ.मनोज भाटवडेकर, डॉ.राजेंद्र बर्वे, डॉ पाटकर, डॉ. प्रभू ही मराठी नावे सर्वपरिचित आहेत. इतरही अमराठी डॉक्टर बरेच आहेत.
मानसोपचारतज्ज्ञांची मधून मधून भेट घेऊन मानसिक आरोग्य तपासून घेण्यात नुकसान काहीच नाही.
22 Apr 2014 - 4:55 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद राही.
22 Apr 2014 - 6:25 pm | आजानुकर्ण
डॉ. ज्योती शेट्टी या एक माहितीतील मनोविकारतज्ञ आहेत. चांगल्या मराठी बोलतात. बर्वे/मोहन आगाशे वगैरे ग्लॅमरस नावांपेक्षा मी यांना नक्कीच रेकमेंड करीन.
22 Apr 2014 - 6:38 pm | सूड
अपॉईंटमेंट घ्यायची गरज पडलीच कधी तर कॉन्टॅक्ट डिटेल्स व्यनि करु शकता का?
22 Apr 2014 - 6:43 pm | आजानुकर्ण
सध्या त्यांचा नंबर माझ्याकडे नाही पण साधू वासवानी चौकातील परमार सेंटर बिल्डिंगमध्ये त्यांचे समुपदेशन केंद्र आहे.
खालील दुव्यावरील माहिती तपासून पाहता येईल. ती न चालल्यास जस्टडायल किंवा तत्सम सेवांमार्फत नंबर मिळवता येईल.
http://www.indiacom.com/bp/dr-jyoti-shetty_in_pune/
http://www.onlymyhealth.com/doctors/dr-jyoti-shetty-1848580167.html
22 Apr 2014 - 6:46 pm | सूड
धन्यवाद. ते जस्ट डायल विसरलोच होतो. :)
23 Apr 2014 - 7:00 pm | प्रसाद१९७१
पुण्यात उल्हास लुकतुके ( लक्ष्मी रोड वर ) आहेत. खूप अनुभवी आणि स्पष्ट बोलणारे.
23 Apr 2014 - 7:31 pm | सिफ़र
मन उलगडतांना या पुस्तकाची लेखिका डॉ. विजया फडणीस (हडपसर पुणे) यांच्याकडे जाऊ नये असं सुचवतो. पुस्तक तसं वाचायला बरं आहे.
25 Apr 2014 - 9:20 am | llपुण्याचे पेशवेll
पुण्यात डॉ के एस कुलकर्णी पण चांगले आहेत. निसर्ग हॉटेल समोर एक केरळी ख्रिश्चन असलेले डॉ जॉर्ज व्हर्गीस नावाचे डॉक्टर पण छान आहेत. फक्त त्यांना मराठी येत नाही अजून तितकेसे पण तुम्ही इंग्रजीतून संवाद साधू शकत असाल तर जॉर्ज एक उत्तम डॉक्टर आहे असे म्हणेन.
22 Apr 2014 - 6:23 pm | आजानुकर्ण
इतर शारीरिक व्याधींमध्ये ईसीजी, रक्तातील साखर वगैरे चाचण्या घेऊन आरोग्याचा धारण अंदाज घेता येतो. मनोविकाराच्या अशा चाचण्या घेता येत नाहीत असे वाटते. प्रत्येकाच्याच स्वभावात दोष असतात. मात्र काही मनोव्याधी दिसत नसेल तर मनोविकारतज्ञाकडे जाऊन खाजवून खरुज काढण्यात काहीच पॉईंट दिसत नाही. एखादा
मनोविकारतज्ञ बरा बकरा गावला म्हणून काहीतरी विचित्र गोळ्या सुरु करण्याचीही शक्यता आहे. नंतर गोळ्यांपासून सुटका करुन घेणे अवघड होते.
जेव्हा मनोव्याधी सुरु होते तेव्हा ती लख्खपणेच कळते. मनोविकारतज्ञाकडे जाण्याशिवाय गत्यंतरच नसते.
23 Apr 2014 - 12:01 pm | सुबोध खरे
पेठकर साहेब
मानवी मन हे अजून न समजलेले कोडे आहे. शिवाय शारिरिक आजाराचे संशोधन हे प्राण्यांवर करून औषधांचे संशोधन/ परिणाम त्यांच्या वर पडताळुन पाहता येतात. दुर्दैवाने मेंदूच्या रचनेत प्राणी आणि माणूस यात फार मोठा फरक आहे. म्हणजे सर्वात प्रगत प्राणी म्हणजे चिंपॅन्जी त्याच्या आणि मानवी मेंदूतच इतका फरक आहे की कोणतीही मेंदूवर परिणाम करणारी औषधे चिंपॅन्जी वर काय परिणाम करतात तसच माणसावर होत नाही. असे संशोधन दुसर्या महायुद्धातील युद्धकैद्यांवर केल्यावर आढळले मेंदूवरील संशोधनातील हा एक मोठा अडथळा असल्याने जशी शारिरिक रोगात प्राण्यांवर प्रयोग करून चाचण्या परिष्कृत करता येतात तशा मेंदूवर करता येत नाहीत.शिवाय बरोबर आणि चूक यातील रेषा ही फार रुंद आणि धूसर आहे त्यामुळे एखाद्या माणसाचे एकाच भेटीत रोगनिदान होणे कठीण असते. त्यामुळे आपल्या वागण्यात झालेला बदल याबद्दल आपल्या जवळच्या नातेवाईकांचे( आई वडील किंवा बायको) मत घेणे हि याची पहिली पायरी आहे.
23 Apr 2014 - 7:28 pm | प्रभाकर पेठकर
आजानुकर्ण, प्रसाद१९७१, सुबोध खरे मनापासून धन्यवाद.
सुबोध खरेसाहेब,
शारीरिक व्याधींबद्दल वेगवेगळ्या तपासण्या करुन अंदाज बांधता येतो. तद्वत, मानसोपचार तज्ञाला अगदी एका बैठकीत नसले तरी वारंवारच्या बैठकांमधून कांही स्वभावदोष लक्षात येत असतील असे वाटले होते. असो.
25 Apr 2014 - 1:15 pm | सुबोध खरे
होय मनोविकार तज्ञ या वरूनच आपले निदान करीत असतात. त्याच बरोबर ते आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून (आहार निद्रा भय मैथुन या चार मूल भूत बाबीसकट) आपली इतर बरीच माहिती मिळवून निर्णयाप्रत पोहोचतात. पण एकाच बैठकीत निदान होण्यासाठी मनोविकार बराच पुढे गेलेला असतो जेंव्हा रुग्णाची लक्षणे सहज लक्षात येऊ शकतात. पण जो मनुष्य अन्यथा व्यवस्थित आहे त्याची अव्यवस्था लक्षात येण्यास बरीच माहिती आणि मानसिक चाचण्या घ्याव्या लागतात. दुर्दैवाने मानसिक चाचण्या या व्यक्तीसापेक्ष असतात म्हणून एका फटक्यात काळे कि पांढरे सांगता येत नाही. .
22 Apr 2014 - 5:04 pm | चित्रगुप्त
अत्यंत मननीय धागा. तुमच्या आणि पतिदेवांच्या हिंमतीला सलाम.
काही प्रश्नः ही व्याधी जन्मजात असते का? की काही विशेष परिस्थिती/कारणांमुळे ती होऊ शकते? अशी कारणे कोणती?
या व्याधीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत कोणती लक्षणे दिसून येतात?
जन्मपत्रि़का बघून या व्याधीबद्दल भाकित करता येते का? (हा प्रश्न घाटपांडे सरांसाठी)
22 Apr 2014 - 5:09 pm | निनाद मुक्काम प...
कडक सलाम
तुमच्या यजमानाचे विशेष कौतुक
22 Apr 2014 - 5:18 pm | स्मिता चौगुले
हॅट्स ऑफ टू यू..
तुमच्या आणि तुमच्या नवर्याच्या धैर्याला सलाम..
22 Apr 2014 - 5:22 pm | उपाशी बोका
तुम्ही अगदी मनापासून आणि प्रांजळपणे लिहिले आहे. तुमची तब्बेत अशीच छान राहू दे ही सदिच्छा आणि तुम्हाला आणि तुमच्या नवर्याला शुभेच्छा.
तुमचे आणि तुमच्या नवर्याचे पण खूप कौतूक वाटले. (हो ना, नाही तर इतक्या खुलेआम नवर्याची स्तुती करणारी बायको पण तशी दुर्मिळच. :)
22 Apr 2014 - 5:23 pm | राही
स्वतःविषयी असे काही लिहून स्वतःला इतके उघडे करणे यासाठी जबर आत्मविश्वास लागतो. तसा तो तुमच्यामध्ये आलाय हे या लिखाणावरून स्पष्ट आहेच पण आणखीही एक गोष्ट स्पष्ट होतेय-आणि मला ती फार महत्त्वाची वाटतेय-ती म्हणजे असा संतुलित आत्मविश्वास येणं ही तुमचा आजार बरा झाल्याची किंवा बरा होत असल्याची खूण आहे. तुम्ही हिंमतीने या भयानक कालखंडाला तोंड दिलंत आणि तुमच्या कुटुंबाने, विशेषतः नवर्याने तुम्हाला पुरेपूर साथ दिली यासाठी तुमच्याबरोबर त्यांचे खास अभिनंदन. इतकी समंजस माणसे मिळणे हे तुमचे सद्भाग्य आहे.
तुमच्या लिखाणावरून तुमच्या स्थितीची थोडीफार कल्पना आली होती. पण व्य.नि. एकदाच आणि फार सौम्य आणि अवगुंठित भाषेत केला कारण थेट लिहिलेले कसे घेतले जाईल आणि त्यामुळे मूड अधिक बिघडेल की काय असे वाटले. शिवाय नुसत्या जालीय ओळखीद्वारे कुणाच्या पत्रव्यवहारात शिरणे उचित नसतेच.
बायपोलर, ओसीडी, स्किझोफ्रेनिआ, लो आय क्यू, अल्झाय्मर्स (हा मानसिक आजार नाही पण मेंदूपेशी मृत होऊ लागल्याने स्मरणशक्तीवर परिणाम होऊन मानसिक रुग्णावस्थेतली काही लक्षणे दिसतात.) या सर्व आजारांशी फारच जवळून संबंध आला आहे. आत्यंतिक भीती, आत्यंतिक आक्रमकता, स्वतःच्या भ्रामक विश्वात रमणे, प्रेम, माया ही नाती किंवा व्यावहारिक संबंध न कळणे, मूर्खपणाकडे झुकणारा आत्यंतिक भाबडेपणा या सर्व गोष्टी कुटुंबियांना सळो की पळो करून सोडतात. समाजाकडून सहानुभूती तर मिळत नाहीच उलट अवहेलना होते. मुंबईत रेल्वे मध्ये विकलांगांसाठी वेगळा डबा अलीकडे झालाय. पूर्वी जाणत्या मुलाला उपचारांसाठी रेल्वेने घेऊन जायचे म्हणजे पुरुषांच्या डब्यांतून जावे लागे. त्या जीवघेण्या गर्दीतून मुलाला घेऊन चढणे-उतरणे हे आईसाठी दिव्यच असायचे. शिवाय अशा लोकांना सतत कोणीतरी श्रोता हवा असतो. त्यांच्या खर्याखोट्या सर्व तक्रारी कोणीतरी सतत ऐकत रहायला हव्या असतात. आईवडिलांना एव्हढा वेळ देता येईलच असे नाही. बाकीची सपोर्ट-सिस्टिम भक्कम असेल तर थोडाफार निभाव लागतो. आईवडील करतेसवरते असतील तोपर्यंत सांभाळतात. पुढे काय हा प्रश्न भयानक असतो. अलीकडे अनेक संस्था निघाल्या आहेत, त्या आपापल्या परीने प्रयत्न करताहेत हे खरे पण हे प्रयत्न फारच तोकडे आहेत.
असो. आपल्या पुढील आयुष्यास अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
22 Apr 2014 - 6:26 pm | आजानुकर्ण
स्वतःच्या आजाराकडे तटस्थ पाहण्याइतपत सुधारणा होणे हे प्रगतीचे लक्षण आहे.
22 Apr 2014 - 6:12 pm | चौकटराजा
आपली कहाणी व त्यावरील सर्व प्रतिसाद पूर्ण वाचले. गतिमंद मुलगी व अल्झायमर झालेली ( फार गंभीर अवस्थेचा नव्हे) आई याच्या खेरीज डॉक्टरानाच मनोरूग्ण ठरवणारा व पूर्ण बरा झालेला मित्र अशा विविध रूपात मनविषयक आजार जवळून पाहिले आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा यातील कोणी टोकाचे आजारी नव्हते. पण मानवी मन हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. काही वाचन त्या बाबत झाले आहे पण फार नाही. माणसाचे मानसिक आजार हे मानसिक व मनोशारिरिक असे असतात. आपल्या भवतालची परिस्थिती आपल्या मनाची जडण घडण करीत असते. तर आपल्या मेंदूत काही बदल अपघाताने वा अनुवांशिक कारणानी होतात. कौन्सिलिंगने मानसिक आजार बरे होतात .मन व मेंदू तसे भिन्न आहेत. आपला आजार मेंदूतील विशीष्ट रासायनिक प्रक्रियानी दोन्ही पैकी कोणत्या तरी दिशेने बळावतो. तो मेंदूतील आजार आहे म्हणून औषधानी थोडा सुधारता येतो. यात आपले नशीब आहे. मन हे मत बनविते तर मेंदू हा वर्तणूक असा सर्वसाधारण नियम करायला हरकत नाही. मस्त जगा खुशीत जगा बी पॉसिट्व्ह असे मानसिक सल्ल्ले न देता आपले औषध वेळेवर घ्या असा सोमॅटिक सल्ला देतो. आपण दीर्घकाळ जास्तीत जास्त " सेटर" ला राहून जगा अशी प्रार्थना करतो.
22 Apr 2014 - 9:01 pm | प्रसाद गोडबोले
इतक्या प्रांजळपणे लेख लिहिल्याने अतिषय उत्कृष्ठ झाला आहे :)
(लेख वाचुन मनात बरेच प्रश्न उद्भवले आहेत जसे की असे काही ना काही प्रॉब्लेम सगळ्यांना असतातच मग मनोविकार कोणता हे कसे ठरवणार ? वगैरे वगैरे पण हे कदाचित इथे अवांतर ठरेल म्हणुन टाळत आहे ! )
पुनश्च एकदा आभार आणि शुभेच्छा !
22 Apr 2014 - 9:13 pm | आजानुकर्ण
'बोस्टन लीगल' या मालिकेत याबाबतचा एक उत्कृष्ट प्रसंग आहे. डिप्रेशनची रुग्ण असलेली तरुणी अॅलन शोअरशी बोलताना त्याला सांगते की बऱ्याच लोकांना मी माझ्या डिप्रेशनबद्दल सांगते तेव्हा त्यांना ते पूर्णपणे कळत नाही. घरातले नातेवाईक, मित्र वगैरे ऊठ, मोकळ्या हवेत फिर वगैरे गोष्टी डिप्रेशनवरचा उपचार म्हणून सांगत असतात पण मी हे सर्व करण्याची इच्छा असूनही करु शकत नाही कारण डिप्रेशनमुळे मी बेडमधून उठूच शकत नाही. माझे शरीर प्रतिसादच देत नाही. I literally cannot get up even though I want to.
जेव्हा तुम्हाला तुमचे सामान्य जीवन जगणे अशक्य होते व 'शारीरिक' चाचण्यांमध्ये काही सापडत नाही तेव्हा मनोविकाराचे निदान केले जाते.
22 Apr 2014 - 9:17 pm | शुचि
अगदी अगदी!!! तू असे विचार करु नको/तसे विचार करु नको, डोकं थंड ठेव अशा सूचना लाख मिळतात पण खरच कंट्रोलच नसतो. कारण मेंदूतील रासायनिक बदल!
23 Apr 2014 - 12:06 am | मूकवाचक
नैराश्याचा प्रवास वर्तुळाकार असतो. नैराश्यामुळे खचून गेलेली व्यक्ती नैराश्यातून बाहेर पडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्याने अधिक खचत जाते, हताश होत जाते. असे म्हणतात की भोवर्यात सापडलेली व्यक्ती पोहताना बाहेर पडण्यासाठी जितके हातपाय मारेल, तितकी खोलवर बुडायला लागते, तसलाच प्रकार! त्यात जवळच्या नातेवाईकांनी मंद, आळशी वगैरे लेबले लावण्यापासून सुरूवात करून याला चांगल्या दोन सणसणीत लाथा घाला म्हणजे कामाला लागेल पर्यंतचा टप्पा गाठेपर्यंत जगणे असह्य होउन गेलेले असते. एकीकडे मस्त रिलॅक्स व्हा, बीअर घ्या, चिल आउट मॅन वगैरे सल्ले देणारे महाभाग जीव खातात. आपण कसल्या कसल्या प्रसंगावर मात केली आहे याचे आत्मप्रौढीयुक्त अतिशयोक्त किस्से सांगणारे काका मामा चान्स पे डान्स करून घेतात. नैराश्याने पुरत्या खचून गेलेल्या माणसाला अंधश्रद्ध, बावळट, थोतांडी वगैरे ठरवून तोंडसुख घेणारे महाभाग त्यांचे वैफल्य हलके करून घेतात. आधुनिक श्रद्धाविरहीत अध्यात्मवाले त्यांची प्रवचनबाजी करून घेतात. असो.
योग्य उपचार आणि व्यावसायिक तज्ञांचे समुपदेशन मिळेपर्यंत हे दुष्टचक्र तसेच सुरू राहते. दुर्दैवाने नैराश्याने खचलेल्या रूग्णाला योग्य उपचार मिळावेत असा विचार करणारे आणि तशी तजवीज करणारे लोक तथाकथित सुशिक्षित समाजातही अल्पसंख्यांकच आहेत ...
23 Apr 2014 - 12:34 am | शुचि
=)) =)) तू नेहमीप्रमाणेच चौके लावलेयस :)
पण खरं आहे तुझं म्हणणं. योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. अन औषधाचाही गुण यावा लागतो. तेच अजानुकर्ण यांच्या खवत लिहीत होते की - इतका त्रास होतो नवीन नवीन लागू न होणारी औषधे घेऊन.
त्या काळात मी संध्याकाळी "औषधे चिंतयेद विष्णुं भोजने च जनार्दनम" तसच "वैद्यनाथाष्टक" अन "वैद्यो नारायणो हरि:" असल्या छापाची स्तोत्रे म्हणत असे. खरच बुडत्याला काडीचा आधारही पुरतो, लागतो.
23 Apr 2014 - 9:58 am | सुबोध खरे
@मूकवाचक
आपले म्हणणे म्हणजे नैराश्य या आजाराच्या रुग्णाची खरी कैफियत आहे. दुर्दैवाने अगदी जवळच्या नातेवाईकाला सुद्धा हा माणूस नखरे करीत नाही हे समजत नाही. त्यामुळे अशा रुग्णांची फार हेळसांड/ परवड होते.
सर्वसामान्य लोकांच्या भाषेत सांगायचे झाले तर मेंदूत उत्साहवर्धक रसायनांची झालेली कमतरता हे मूळ कारण आहे. असे का होते ते रुग्णाला सांगता येत नाही( खर तर डॉक्टरना सुद्धा नाही कारण असे का होते यावर संशोधन चालू आहे).त्यामुळे त्याला मानसिकच् नव्हे तर शारिरिक सुद्धा मंदपणा येतो. यावर त्याला तुम्ही कितीही द्न्यानामृत पाजले तरी पालथ्या घड्यावर पाणी असते. ही उत्साहवर्धक रसायने तयार होतात आणि थोड्या वेळात त्यांचे विघटन होऊन ती नष्ट होतात. जी औषधे दिली जातात ही या विघटनाच्या क्रियेला आळा घालतात त्यामुळे कमी प्रमाणात तयार झाली तरी उत्साहवर्धक रसायने मेंदूत जास्त वेळ टिकून रहात असल्याने रुग्णाची उत्साहाची पातळी वाढते आणि नैराश्य कमी होते. हे औषध जास्त झाले तर रुग्णाच्या स्नायुना ताठरता येते आणि नंतर कंप होतो(ट्रेमर्स) आणि कमी झाले तर नैराश्य परत येते. त्यामुळे त्याची पटली हळूहळू वाढवत न्यायला लागते. शिवाय या औषधांचा परिणाम पूर्णपणे दिसायला तीन आठवडे ते एक महिना लागतो त्यामुळे रुग्णाची परिस्थिती अगदी पूर्ववत व्हायला सहा महिने पर्यंत लागू शकतात. या कळत त्या रुग्णच्या जोडीदाराला फार धीर आणि संयम ठेवायला लागतो.
मुळात हे का होते हे माहित नसल्याने हा आजार आजमितीला पूर्णपणे बरा होत नाही. औषधे थांबविली तर आजार परत येतो.मधुमेह या आजाराचे तसेच आहे पण मी म्हटल्याप्रमाणे तो उच्चभरु आजार आहे आणि दुर्दैवाने मनोविकार हे कलंकित आजार आहेत.म्हणून त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.
जेंव्हा सामान्य लोक मनोविकार हा शारिरिक आजारासारखाच आहे हे समजून घेतील तेंव्हाच मनोविकाराच्या रुग्णांची परवड थांबेल.
22 Apr 2014 - 10:38 pm | Prajakta२१
आणि आपल्याला शुभेच्छा
22 Apr 2014 - 11:17 pm | निशदे
तुम्हाला अन तुमच्या सर्व कुटुंबाला माझा प्रणाम....
22 Apr 2014 - 11:39 pm | विकास
आपला लेख आणि सर्व प्रतिक्रीया आत्ता वाचल्या! प्रांजळपणे स्वानुभव सार्वजनिक संस्थळावर सांगण्याबद्दल तुमचे तसेच आलेल्या आजारास धैर्याने सामोरे जाण्यासाठी मदत करणार्या आपल्या नवर्याचे मनःपूर्वक कौतुक!
मला आपला अनुभव वाचत असताना स्किझोफ्रेनिया असलेले नोबेल पारीतोषिक विजेते प्रा. जॉन नॅश आणि त्यांच्या जीवनावर आधारीत असलेला ऑस्कर विजेता A Beautiful Mind हा चित्रपट आठवला.
या धाग्याच्या निमित्ताने आलेले प्रतिसाद तसेच अजानुकर्ण यांचा स्वानुभव ह्यांना देखील "सलाम" !
22 Apr 2014 - 11:49 pm | पैसा
आजानुकर्ण यांनीही अगदी निर्लेपपणे आपला अनुभव आणि त्याअनुषंगाने अतिशय उपयोगी अशा सूचना दिल्या आहेत. त्यांनाही अभिनंदन आणि धन्यवाद!
23 Apr 2014 - 1:37 am | स्वाती२
शुची,
हॅट्स ऑफ! तुमच्या धैर्याचे आणि तुमच्या जोडीदाराच्या समंजसपणाचे फार कौतुक वाटले. खूप जवळच्या व्यक्ती बायपोलर आणि स्किझोफ्रेनिआ या व्याधीसमवेत जगत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यातील कसोटीचे क्षण फार जवळून अनुभवलेत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा!
23 Apr 2014 - 12:19 pm | झकासराव
आजाराविषयी काहीच माहिती नव्हतं.
काल गुगलुन थोडसं कळाल.
हॅट्स ऑफ टु तुमचे जोडीदार आणि तुम्ही दोघांसाठीही. :)
शुभेच्छा नेहमी आहेतच सोबत.
23 Apr 2014 - 12:23 pm | मीता
स्किझोफ्रेनिआ जवळून माहित आहे .घरातली कर्ती बाई जर या आजाराची बळी असेल तर घर कसं विस्कटत ते माहिती आहे . माझा वय तेव्हा १० वर्ष होत आणि माझी बहिण ४ वर्षाची. काय होतंय आईला ते समजून घेण ,तिच्याशी कसं वागायचं या सगळ्यात डॉक्टर्रांनी खूप मदत केली होती .
23 Apr 2014 - 1:59 pm | भ ट क्या खे ड वा ला
आवडले, हेतू प्रामाणिक असल्यामुळे फारच भावले.
आपण उभयतांनी पती पत्नीच्या नात्याला एका वेगळ्याच उंची वर नेउन ठेवले आहे.
23 Apr 2014 - 5:13 pm | ऋतु हिरवा
तुमचे आत्मकथन अतिशय प्रांजळ आणि उपयुक्त आहे. मानसिक आजाराबद्दल सहसा कोणी बोलत नाही आणि तो आजार स्विकारतही नाही. त्यामुळे त्या व्यक्तिचे आणि तिच्याबरोबरच्या इतर नातेवाईकांचेआयुश्यष्य त्रासात जाते. पण तुम्हाला तुमच्या पतीने यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली यासाठी त्यांचे अभिनंदन. तुम्हांला पुढील वाटचालीसाठीशुभेच्।च!
23 Apr 2014 - 5:38 pm | मितान
शुचि, अतिशय प्रांजळ कथन वाचून फार बरं वाटलं. अगं साधं मुलांच्या अभ्यासासंदर्भात चर्चा करायला बोलावलं तरी आधीच 'आम्हाला काउन्सेलिंगची गरज कशी नाही' हे सांगत येणारे अनंत लोक रोज पाहाते. अतिशय भयंकर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी लोक जितक्या सहजतेने सांगतात तेवढे त्यामानाने साधे असणारे मानसिक आजार सांगत नाहीत. स्वीकार तर पुढची गोष्ट. लोकांना सायकिअॅट्रिक ट्रीटमेंटसाठी तयार करणं हे एक आव्हानच असतं.
माझ्याकडे एक पिल्लु येतं बायपोलारची लक्षणं स्पष्ट दाखवत. आज तुझा लेख त्या पालकांना वाचायला दिला. मला आशा आहे की ते योग्य उपचार घेतील.
असे अनुभव शेअर करणं ही मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातली फार मोठी समाजसेवा आहे. तू हे केलंस त्याबद्दल खूप आभार. तुझ्या निर्भय प्रांजळतेबद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन ! :)
23 Apr 2014 - 6:49 pm | सिफ़र
ले़खानासाठी तुम्हाला सलाम __/\__
या निर्वाणीच्या वाक्यासाठी तुमच्या नवर्याने जी काही मनाची तयारी केली असेल कदाचित त्याचा अर्थ फक्त "तू सायकिअॅट्रीस्ट कडे चल!" एव्हडाच असेल. तो अर्थ समजुन तुम्ही उगाच "नवरा माझ्या विरुद्ध कट वगैरे रचतोये" असा विचार न करता सायकिअॅट्रीस्ट कडे जाण्याची तयारी दाखवली यासाठी तुमच्या वैचारीक कृतीची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे. त्यामुळेच तुमच्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
पण काही स्त्रि-पुरुष/पालक असा सारासार विचार न करता असा प्रसंग आल्यास उगाच अभिव्यक्तीस्वातंत्र, टोकाची स्त्रिवादी भुमीका घेउन पार बिघडवुन टाकतात. फार जवळुन अशी उदाहरणं बघीतली आहेत. असो.
कालच माझ्याबरोबर जुन्या कंपनीत सोबत असनार्या एका बायपोलर मित्राचा फोन आला,आम्ही रोज किमान तासभर तरी गप्पा मारायचो. त्याने अचानक एक दिवस रागाच्या भरात रीझाईन केल होतं.
त्याची तब्येत आता चांगली झालीये आहे असं सांगत होता. आज तो आनंदी तर आहेच परत त्याने कॅपजेमीनी मध्ये अडीच वर्षे यशस्वीरीत्या पुर्ण केलीत. फार बरं वाटलं.
भावी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा.
23 Apr 2014 - 7:42 pm | गणपा
_/\_
प्रांजळ आत्मकथन आवडलं.
डेयरींग लागते बप्पा असं चार चौघात सांगायला.
आपल्या यजमानांचंही कौतुक आहेच.
24 Apr 2014 - 3:22 am | लंबूटांग
अतिशय प्रामाणिक आणि धाडसी लेखन. हॅट्स ऑफ टु यू बोथ!
तू आधी कुठेतरी कुत्रे आवडत नाहीत असे लिहीले आहेस पण गूगल वर या विषयी बरीच माहिती मिळाली
https://www.google.com/search?q=pet+therapy+bipolar+disorder
अर्थात कुत्रे म्हणजे बरेच काम आहे त्यामुळे ते समजूनच त्या फंदात पडणे, नाहीतर बायपोलर चालेल पण कुत्रा आवर असे व्हायचे ;)
24 Apr 2014 - 3:31 am | शुचि
धन्यवाद लंबूटांग. कुत्रा एकदा चावला असल्याने आवडत नाही. मांजर मात्र आवडते. हा दुवा नक्की वाचेन.
24 Apr 2014 - 6:28 am | लंबूटांग
आपण एकदा पडलो म्हणून चालायचे थांबत नाही किंवा एकदा गाडीचा अपघात झाला म्हणून गाडी थांबवायचे थांबवत नाही. त्यामुळे कधीतरी कुत्रा चावल्याने कुत्राच पाळू नये हे काहीसे पटत नाही. हा, पण सांभाळणे शक्य नसेल व्यापामुळे तर समजू शकतो.
-(श्वानप्रेमी आणि मालक) लंबूटांग
24 Apr 2014 - 7:01 am | शुचि
sorry मला म्हणायचे होते - कुत्री आवडतात खरच आवडतात पण भीती वाटते.
24 Apr 2014 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या बायकोला तर कुत्रा कधी चावलेलाही नाही पण तरी तिला कुत्रा आवडत नाही. त्यामुळे, मला आणि मुलाला कितीही आवडला तरी, 'कुटुंबप्रमुखाला' तो आवडत नसल्याने आम्हाला पाळता येत नाही.
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad:
24 Apr 2014 - 4:15 pm | प्रकाश घाटपांडे
पेठकर साहेब यावर एप्रिल च्या अनुभव च्या अंकात एक छान सत्यकथा आहे डॉ समीर कुलकर्णी यांची. वाचाच श्वानद्वेष्ट्या कुटुंब प्रमुखाचे धर्मांतर कसे झाले ते.
24 Apr 2014 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर
आंतरजालावर आहे? 'दुवा'.दिलात तर मी दुवा देईन तुम्हाला.
25 Apr 2014 - 1:23 pm | प्रकाश घाटपांडे
आंतरजालावर उपलब्ध नाही. पण माझ्याकडे तो अंक आहे. मी वर्गणीदार आहे अनुभवचा. या कि एकदा!
26 Apr 2014 - 1:18 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद. पुढच्या पुणे भेटीत हे एक अत्यंत तातडीचे आणि तितकेच महत्वाचे कार्य हाती घेतले पाहिजे.
24 Apr 2014 - 4:32 am | आश
शुचीताई,
मनापासुन अभिनंदन आपले, कि यातुन आपण, आपलं कुटुंब सावरलं. कमाल आपल्या मनोध्येर्याची, आपण हे फार चांगल्या हेतुने जगासमोर मांडले, आणि यातुन लोकांना नक्कीच फायदा होईल.
24 Apr 2014 - 9:52 am | मृगजळाचे बांधकाम
तुझ्या या लेखामुळे माझ्या आयुष्यातला न सुटणारा गुंता सुटायला मला मदत झालीय.खूप खूप आभारी आहे तुझा
24 Apr 2014 - 4:43 pm | आयुर्हित
मृगजळाचे बांधकाम, आपले अभिनंदन!
आणि
शुचि तसेच मिपा दोघांनाही आधी धन्यवाद मग मनापासून अभिनंदन.
24 Apr 2014 - 5:45 pm | शुचि
होय बांधकाम भाऊंनी व्यनि केला होता. उत्तर दिलेले आहे. त्यांना काही मदत झाली असेल तर आनंदच आहे.
24 Apr 2014 - 1:28 pm | दिपक.कुवेत
शुचितै जे असाध्य होतं ते समजुन/उमजुन तु साध्य करुन दाखवलस त्याबद्दल अभिनंदन. ह्या खडतर प्रवासात तुझ्या मि. साथ होती म्हणुन त्यांचहि कौतुक करावं तेवढं थोड आणि हे सगळं ईथे लिहिण्याचं जे डेअरिंग केलेस त्याला आपला सलाम. तुला आनंदि दिर्घायुष्य लाभुदे हिच सदिच्छा.
24 Apr 2014 - 8:27 pm | पद्मश्री चित्रे
तुम्हा दोघान्चे प्रथम अभिनंदन. तुझे कौतुक की तू या सर्वातून सावरत आहेस. इतरांचा विचार करात इथे लिहित आहेस.. तुझा सच्चेपणा , निस्वार्थीपणा आणि धीटपणा.. मानलं तुला ..
25 Apr 2014 - 2:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रसिद्ध ब्रिटीश विनोदवीर स्टीव्हन फ्राय याने स्वतःच्या बायपोलरबद्दल बनवलेला माहितीपट -
याचा दुसरा भागही आहे, तो ही पहा.
25 Apr 2014 - 3:57 am | शुचि
धन्यवाद, बघते आदिती. मी "अन्क्वाएट माईंड" पुस्तक वाचलय अन नेट्फ्लिक्स वरची बायपोलर्वरची एक डॉक्यु. पाहीली आहे. वरील क्लिप्स देखील पाहीन.
25 Apr 2014 - 8:56 am | सुधीर
__/\__ शब्द नाहीत.
25 Apr 2014 - 10:05 am | चावटमेला
सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.
25 Apr 2014 - 1:08 pm | संजय क्षीरसागर
सगळ्या मानसिक आजारांची एकच किमया आहे, ते तुम्हाला स्वतःपासून दूर नेतात. जेंव्हा तुम्ही एकसंध होता तेंव्हा बरे होता. हे एकसंध होणं स्वास्थ्य आहे; आणि मेंटल अॅक्टिवीटी कह्यात असणं हे मानसिक आरोग्याचं एकमेव लक्षण आहे.
प्रेम हे मनाला एकसंध करणारं सर्वोच्च औषध आहे, कारण प्रेमात तुम्ही हृदयाशी संलग्न होता. प्रेमात मेंटल अॅक्टिवीटी शून्यवत होते आणि शरीर आपापतःच मेंदूच्या संप्रेरकांचं कार्य सुधारण्याच्या कामी लागतं. सो इन अ वे, योर हजबंड वॉज योर फर्स्ट मेडिसीन. (अँड ऑफ कोर्स, ही विल कंटिन्यू टू बी सो टिल द एंड.) पती-पत्नी नात्यातला पारस्पारिक अनुबंध, कोणत्याही मानसिक आंदोलनात (दोघांचाही) सर्वात मोठा आधार आहे. आणि त्यामुळेच भारतीय संस्कृतीत विवाहाला केंद्रस्थानी ठेवलंय.
मानसिक अस्वास्थ्याला (हा आजारापेक्षा विधायक शब्द आहे, मग ती बाय-पोलर डिसॉर्डर असो, स्किझोफ्रेनीया की अल्झायमर); न्यूरो, सायको, फिजीओ आणि सिच्युएशनल अशी चार परिमाणं आहेत.
१) शारीरिक दृष्ट्या मेंदू उत्तम राहण्यासाठी सर्वांगासन आवश्यक आहे त्यानं मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
२) सुप्तवज्रासनात सुखावह होईल तीतका वेळ राहाण्यानं आणि त्या आसनात सावकाशपणे चेहरा डावीकडे व उजवीकडे फिरवण्याचा व्यायम केल्यानं न्यूरो सिस्टमची इफिशियंसी (फ्लेक्सिबिलीटी) कायम राहाते.
३) अनुलोम-विलोम या प्राणायमानं न्यूरो सिस्टमची कार्यक्षमता वाढते. भ्रामरी हा प्राणायाम सायको सिस्टीमसाठी सर्वोच्च मानला गेला आहे, त्यानं मनावर उत्तम नियंत्रण राहातं.
४) सिच्युएशनल फॅक्टर्स तुमच्या अवाक्या बाहेर असतात पण त्यावर मात करण्याचा उपाय म्हणजे प्रसंगाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेलं बौद्धिक समायोजन हे आहेत.
यू आर लकी, आय विश यू बोथ अँड योर फॅमिली अ हॅपी लाईफ.
शेवटी एक नक्की, बायपोलर डिसॉर्डर शेवटापर्यंत बरोबर राहाणार हा विचार निराधार आहे आणि तशा भीतीखाली राहाण्यात अर्थ नाही. कोणतंही मानसिक आंदोलन तुम्हाला स्वतःपासून किती दूर नेतं याला महत्त्वं नाही, किती कमीतकमी वेळात तुम्ही स्वतःशी पुन्हा कनेक्ट होता ते खरं कौशल्य आहे. आणि हे एकदा समजलं की तुम्ही कायम निर्भय आणि आनंदी राहाल.
25 Apr 2014 - 3:40 pm | शुचि
सं क्षी, विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.
सहज करता करता मला एकाच आसन आत्तापर्यंत जमलेले आहे ते म्हणजे सर्वांगासन. अन तेही मजेमजेत , जिममध्ये मैत्रीणीशी स्पर्धा करत/खेळत सापडलेले आसन. मला वाटायचे की थायरोईड वरती ते उपयुक्त आहे पण जर मेंदूही कार्यरत रहाणार असेल तर मी नक्कीच रोज करत जैन.
होय क्वालिटी ऑफ लाइफ़ यालाच आमचाही अग्रक्रम आहे.
25 Apr 2014 - 9:06 pm | संजय क्षीरसागर
ही दोन्ही कामं होतात.
बोकोमा (Bokoma) हेडमसाजरनं मेंदूच्या सर्व पेशी कार्यन्वित राहायला मदत होते. हा अत्यंत साधा, सोपा आणि अत्यंत स्वस्त डिवाइस आहे.
सुप्तवज्रासन जमायला थोडा वेळ लागेल पण इट इज द बेस्ट रेमीडी फॉर न्यूरो फिटनेस
प्राणायामावर लिहीन तेवढं कमी आहे कारण सर्व सायकी आणि इंडोक्राईन सिस्टम श्वासाच्या लयीशी संबधित आहे. तरीही अनुलोम-विलोमनं (मध्यनाडीतून श्वसन सुरु झाल्यानं) मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि भ्रामरीमुळे मेंदूच्या सर्व पेशी सक्षम राहून अल्झायमर होण्याची शक्यता नाहीशी होते.
25 Apr 2014 - 9:10 pm | शुचि
ते बोकोमा मस्त वाटतय राव!!!! मला माहीत नव्हते असे काही यंत्र उपलब्ध आहे. आताच अॅमेझॉनवर मागवते.
25 Apr 2014 - 9:53 pm | संजय क्षीरसागर
इट इज अ लवली, हँडी डिवाईस अँड गीवज द बेस्ट रिलॅक्सेशन एनी टाईम, ट्राय.
25 Apr 2014 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'बेड, बाथ अँड बियॉंड'मध्येही मिळेल. स्वस्त आहे बरंच. अॅमेझॉनवर पोस्टेजचाच खर्च जास्त होईल. तुला काय सोयीचं आहे ते पहा.
25 Apr 2014 - 10:01 pm | शुचि
वा!!! धन्यवाद. जाइनच बेड अँड बाथ मध्ये. :)
26 Apr 2014 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे
अच्छा याला बाकोमा म्हणतात तर. फार मस्त असते. आपले आपण करण्यापेक्षा इतरांनी आपले डोके मसाज केले तर एकदम भारी इफेक्ट येतो. याला मी ङ ङ इफेक्ट म्हणतो. एकदम ब्रह्मानंदी टाळी.
26 Apr 2014 - 4:25 pm | अनन्न्या
साष्टांग दंडवत!!! आता सर्व काही छानच होईल्, अगदी खात्रीने!! पुढील आयुष्यासाठी खूप साय्रा शुभेच्छा!
27 Apr 2014 - 4:15 am | चाणक्य
तुमच्या धैर्याला, स्वतःमधे बदल घडवून आणण्याच्या तुमच्या दुर्दम्य ईच्छाशक्तीला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पतींच्या साथ देण्याला !
27 Apr 2014 - 8:07 pm | धमाल मुलगा
फार भोगलंस गं. आणि हे असं जाहीरपणे मांडण्याचं धाडस पाहता नि:शब्द झालो आहे.
29 Apr 2014 - 2:57 pm | समीरसूर
शुचि जी,
हा धागा नजरेतून इतके दिवस निसटला याचे अतीव दु:ख होत आहे. त्याबद्दल क्षमस्व!
आपल्या धैर्याला त्रिवार सलाम! आपण (आणि आपले पती) कुठल्या परिस्थितीमधून गेल्या असाल याची कल्पनादेखील करता येणे कठीण आहे. घरातल्या अशा कुंद वातावरणामुळे घरात राहणार्यांची कशी ससेहोलपट होते हे ठाऊक आहे. काहीच पुढे सरकत नाहीये असे वाटत राहते. बाकीचे जग, आप्तेष्ट, मित्र, आणि इतर सगळे या घोडदौडीत आपल्या शतयोजने पुढे निघून गेलेत आणि आपण या दलदलीत कसे अडकून पडलो आहोत या विचारांची काजळी मूळ आजाराइतकीच मन आणि बुद्धी पोखरून तीव्र वेदना देणारी असते. तुमच्या पतिराजांना मनापासून सलाम! सोबत राहून हे सगळं सहन करणं आणि सगळं सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. रोजच्या जगण्यात लक्ष लागत नाही; दिवस-रात्र मेंदू विचारांनी पोखरला जातो. घर भकास होत जातं.
तुम्ही उभयतांनी खूप धैर्याने या संकटाचा सामना केलात आणि समंजसपणा दाखवून औषधोपचार, आहार, व्यायाम या उपचारसूत्राचा अवलंब करून तुम्ही समाधानी आयुष्य जगत आहात हे वाचून बरे वाटले. आपल्याला हार्दिक शुभेच्छा!
आपण एका सार्वजनिक संकेतस्थळावर आपल्या आजाराविषयी व्यक्त होण्याचे धाडस केलेत ही तर खरंच खूप धाडसाची गोष्ट आहे.
कुठल्याही प्रकारे मदत होऊ शकेल असे वाटल्यास अवश्य सांगा.
आजानुकर्ण यांचा अनुभवदेखील सुन्न करणारा होता. आयुष्यात असे काही टप्पे येतात बहुधा. भक्कम साथसोबत, मित्र-नातेवाईक यांचा आधार, औषधी, व्यायाम, आहार, आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपण नक्कीच यातून बाहेर पडू शकतो आणि एक चांगले सुदृढ आयुष्य जगू शकतो हाच संदेश या अनुभवांवरून मिळतो. हे अनुभव कथन केल्याबद्दल धन्यवाद.
--समीर
11 Feb 2016 - 3:00 pm | मन१
चांगलं लिहिलस गं