मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल
(१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी
(२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली
या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील
____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले.
ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय?
होय सायकिअॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्याचजणांना ही समस्या असते. मला बर्याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल????
______________________________________________________
दुसर्याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!!
पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले -
------बायपोलर डिसॉर्डर!!!------
मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली.
____________________________________________________________
घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो.
भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%.
..........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अॅटॅक्स!!!
सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल.
अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली.
_____________________________________________________
पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट???
पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले.
कधीही दुसर्याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले.
____________________________________________________
नवर्याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली.
हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
प्रतिक्रिया
21 Apr 2014 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वतःचा असा अनुभव मिपासारख्या सार्वजनिक संस्थळावर टाकण्याचे मनोधैर्य आणि त्यामागची इतरांना फायदा व्हावा ही इच्छा केवळ स्पृहणीय आहे ! तुमचे कौतूक व अभिनंदन करायला शब्द नाहीत !!!
21 Apr 2014 - 9:25 pm | शुचि
धन्यवाद इस्पिक एक्का जी.
माझ्या ओळखीतील बर्याच जणांना तर माहीत आहेच पण या संस्थळाद्वारे जर अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच. उन्हाळा सुरु झाला की "मॅनिआ" ची बरीच लक्षणे दिसू लागतात उदाहरणार्थ - चिडचिडेपणा, अत्यंत वाईट प्रसंगांची ठुसठुसणारी आठवण..... सतत सतत आठवण येणे. पण आउषढे फाईन ट्यून केली की ही लक्षणे केवळ अंतर्धान पावतात.
21 Apr 2014 - 9:46 pm | मधुरा देशपांडे
अगदी असेच म्हणते. इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.
26 Apr 2014 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुची, इतक्या प्रामाणिकपणे हे लिहिणे सोपे नाही. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.
-दिलीप बिरुटे
21 Apr 2014 - 10:42 pm | श्रीरंग_जोशी
शुचि - हा लेख वाचल्यावर तुमच्या बद्दल वाटणारा आदर दुणावला.
अवांतर - हा लेख वाचून झाल्यावर काही वर्षांपूर्वी वाचलेल्या 'शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी' या लेखाची आठवण झाली.
21 Apr 2014 - 11:31 pm | शुचि
लेख घरी जाऊन नीट वाचणार आहे. दुव्याबद्दल धन्यवाद श्रीजो.
21 Apr 2014 - 9:27 pm | पैसा
सांभाळ... कधीही वाटलं तर हाक मार. निदान तुझ्याशी बोलेन, आणखी काही करू शकणार नाही. तू काही लढाया लढून जिंकलीस, पण युद्ध चालूच आहे. मध्यंतरी तुझ्या कुटुंबापासून दूर रहावं लागलं तरी कोसळली नाहीस, तुझा अभिमान वाटला. तुझ्या नवर्याचंही प्रचंड कौतुक. अ बिग हग टू यू. :) तात्कालिक नैराश्य खूपजणांना येतं, पण अशा प्रकारच्या लोकांना न दिसणार्या पण भयंकर त्रासदायक आजाराने खचून न जाणं फार थोड्यांना जमतं. पुढच्या लढ्यासाठी शुभेच्छा!
21 Apr 2014 - 11:38 pm | सुबोध खरे
"तुझ्या नवर्याचंही प्रचंड कौतुक."
अगदी खरं. अशा आजारात बर्याच वेळेस त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण आपल्याला आजार आहे हे मनोरुग्णाला माहीतच नसते. त्यामुळे आपण विचित्र वागत आहोत हे रुग्णाला कळतच नसते.(lack of insight) पण त्या व्यक्तीच्या पती/पत्नीला आपला जोडीदार विचित्र वागत आहे हे कळत असते आणि फार मनस्ताप सहन करावा लागतो. बरेच जोडीदार तेवढे धैर्य दाखवू शकत नाहीत त्यामुळे आजार लवकर बरा होत नाही. त्यांना( आपल्या श्रीयुतना) याबद्दल एक सलाम
मनोरुग्णाच्या बरे होण्यात त्याच्या जोडीदाराचा/ कुटुंबाच्या आधाराचा फार मोठा वाटा असतो या साठी आपल्या श्रीयुत यांचे अतिशय कौतुक आहे.
आणि आपले कौतुक अशासाठी कि आपल्याला मानसिक आजार आहे हे मोकळेपणाने सार्वजनिक मंचावर सांगण्याला फार मोठी हिम्मत लागते. शिवाय आपले अनुभव प्रांजळपणे मांडण्याला फार मोठे मनोधैर्य लागते हे आपण बहुजन हिताय दाखवत आहात याबाबत आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्वसाधारणपणे बाकी सारे रुग्ण आपल्या डॉक्टरना सार्वजनिक ठिकाणी छान ओळख दाखवतात पण मनोविकार तज्ञ तेवढे सुदैवी नसतात.
21 Apr 2014 - 11:42 pm | शुचि
होय खरे साहेब जोडीदाराच्या त्रासाविषयीचे आपले विश्लेषण तंतोतंत खरे आहे. अक्षरक्षः १०१%!!!
22 Apr 2014 - 10:49 am | धन्या
शुचिताई आणि त्यांचा नवरा दोघांनाही सलाम !!!
21 Apr 2014 - 9:30 pm | आदूबाळ
लई दम लागतो असं काही लिहायला.
__/\__
बायपोलर ही "स्पेक्ट्रम डिसऑर्डर" आहे ना? म्हणजे एकाची बायपोलर दुसर्यासारखी नसते, असं.
24 Apr 2014 - 8:58 pm | मी-सौरभ
__/\__
21 Apr 2014 - 9:30 pm | प्यारे१
>>> सायकिअॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती.
मुख्य घोळ इथेच असतो. शरीराला जसा आजार होतो तसा मनालाही होतो आणि तो बर्याच केसेस मध्ये बरा देखील होतो हे नीट 'पोचत' नाही.
चित्रपटांमधे दाखवलेल्या अतिशयोक्ती आणि अतर्क्य घटनांंमुळे आणखीनच भीती निर्माण होते. दुर्दैवानं बाबा, बुवा नि महाराज ह्या 'अधिकार नसलेल्या पण विनाजबाबदारी पैसा मिळण्याच्या' क्षेत्रात मानसिक आजार असलेल्या लोकांना आणलं जातं नि आजार आणखीच बळावतात.
मानसिक आजारांमध्ये बर्याचदा झालेल्या/ केलेल्या स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या कळत नकळत दुर्लक्षामुळं आजार बळावलेल्या स्थिती पर्यंत आल्यानंतरच रुग्ण डॉक्टरांकडं आणला गेलेला असतो. औषध अवघड नि दीर्घ काळ घेण्याचं प्रमुख कारण उशीरा आणलं जाणं हे आहे. वन स्टीच अॅट अ टाईम सेव्ह्स नाईन असं इथं घडत नाही कारण मानसिक आजाराबद्दल असलेली भीती नि अकारण अथवा सकारण असलेलं सामाजिक दडपण!
बर्याच संस्था मानसिक आजारांबद्दल काम करत आहेत मात्र त्या पुरेशा नाहीत. त्या वाढायला हव्यातच.
सातत्यानं आवश्यक त्यातही टीन एजेस मध्ये अत्यंत आवश्यक असलेलं मानसिक आरोग्याचं क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहीलेलं आहे, आपल्या समाजाकडून ठेवलं गेलेलं आहे.
- इंजिनिअरींग करताना अॅन्टी डिप्रेसण्ट टॅबलेट्स चा भरपूर उपयोग झालेला प्यारे
21 Apr 2014 - 10:03 pm | आदूबाळ
बाबौ! खरंच??
21 Apr 2014 - 10:12 pm | प्यारे१
हो!
जौ दे! नको त्या आठवणी. :)
21 Apr 2014 - 10:27 pm | अजया
शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे सांगण्याच्या धैर्याला सलाम.
21 Apr 2014 - 10:33 pm | सखी
शुची ,तुझे कौतुक आणि हे इथे सांगण्याच्या धैर्याला सलाम.
ब-याचदा फार उशीरा या गोष्टी लक्षात येतात, आणि नंतर हळहळ होते. खाली बहुगुणींनी दिलेली माहीतीही अतिशय उपयोगी आहे.
21 Apr 2014 - 10:29 pm | बहुगुणी
"माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली...अन्य पीडीत व संबंधित लोकांना काही एक संदेश गेला तर उत्तमच "
एका पूर्णपणे public अशा संस्थळावर इतक्या सरळपणे वास्तव मांडणं आणि आपल्या समस्येतून इतरांना मार्गदर्शन करणं ही खरी प्रगल्भता, hats off to you, शुचि!तुमच्या दीर्घारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, आणि तुम्हाला व मदतीची गरज असणार्या इतर वाचकांना बायपोलर डिसऑर्डर या व्याधीसाठी उपयोगी पडावेत असे क्लिनिकल ट्रायल्स चे दुवे इथे मिळतील.
आपल्या आसपास या व्याधीने त्रस्त असे कुणी असतील तर त्यांना कशी मदत करावी याची थोडक्यात माहिती (आधिक माहिती इथे मिळेल):
21 Apr 2014 - 10:34 pm | शुचि
अतिशय उत्तम दुवे व प्रतिसादही छानच. धन्यवाद.
21 Apr 2014 - 10:37 pm | शुचि
मधुरा, पैसा, आदूबाळ , प्रशांत, अजया, सखी आपलेसुद्धा आभार.
21 Apr 2014 - 10:41 pm | आतिवास
प्रामाणिक कथन.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
21 Apr 2014 - 10:47 pm | सूड
Hats off !!
21 Apr 2014 - 10:53 pm | आजानुकर्ण
You are not alone....
मला एक ते दीड वर्षे GAD आणि Panic Disorderचा त्रास झाला होता. चार-पाच किलोमीटर सहज पळू शकणाऱ्या, गडकिल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या मला दोन पायांवर उभे राहण्याचीही भीती वाटण्याइतका आत्मविश्वास गमावला होता. ऑफिसात मीटिंग वगैरे असताना अचानक चक्कर येऊन पडलो तर आधारासाठी भिंत किंवा खुर्ची जवळ असावी म्हणून धावतपळत आधीच मीटिंगमध्ये जाऊन सोयीस्कर जागा पकडल्याचे आठवले की आता हसू येते. मनावर कोरला गेलेला त्या आठवणींचा शेवटचा प्रसंग म्हणजे एकदा मॅनेजरने काही इनपुट्स घेण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये बोलावले होते. त्याची केबिन बरीच मोठी होती आणि उपलब्ध खुर्च्यांवर इतर दोघेजण बसले होते. भिंत बरीच लांब होती. आता केबिनमध्ये मधोमध उभे राहावे लागणार हे पाहूनच त्रिशंकू अवस्था होऊन गरगरल्यासारखे होऊ लागले. कसाबसा वेळ काढला. ते पाच मिनिट अक्षरशः पाच तासांसारखे वाटले होते. काय बोललो आठवत नाही. कदाचित त्यावर्षीचे अप्रेजल गंडले असावे. ;) मात्र या प्रसंगाने 'आधाराला काही सापडले नाही तरी आपल्याला उभे राहता येते व काहीही होत नाही' हे समजण्यास मदत झाली असावी असे वाटते. I think that was moment of realization. त्यानंतर हळूहळू औषधे कमी करण्याची डॉक्टरांना विनंती केली. मनोविकारतज्ज्ञांच्या उपचारांमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्याने बराच फायदा झाला. दवाखान्यात विविध प्रकारचे रुग्ण पाहून मनोविकारांबाबतची पुस्तकी नसलेली अशी नवी माहिती कळाली. गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आणि विथड्रॉल सिम्पटम्स फारच त्रासदायक होते. सुदैवाने गेली काही वर्षे कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही याचा आनंद वाटतो.
इंटरनेटवर या विकारांबाबत जास्त शोधत बसू नका हा एक अनुभवाचा सल्ला. :) शुभेच्छा...
21 Apr 2014 - 10:56 pm | शुचि
आजानुकर्ण आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपली औषधे कमी झाली याचा आनंद आहे.
अगदी खरं आहे.
21 Apr 2014 - 10:59 pm | आत्मशून्य
मिपावर स्वमग्नतेच्या लेखमालेचे अतिशय स्वागत असण्याचे.
21 Apr 2014 - 11:05 pm | किसन शिंदे
शुचि मामी, हॅट्स ऑफ टू यू!! :)
खुप जास्त अग्रेसिव्हनेस हा या आजाराचाच भाग असू शकतो का?
21 Apr 2014 - 11:22 pm | शुचि
फक्त तज्ञ व्यक्तीच तो अदमासा घेऊ शकते. आपण लक्षणे सांगीतल्यावर, प्रश्नावली वगैरे भरुन घेऊन ते तुमची मुलाकत घेतात , प्रश्न विचारतात व काहीएक पद्धतीने निदान करतात.
पण मॅनिया च्या फेझमध्ये अतिशय आनंदी व सकारात्मक (पॉझिटीव्ह) वाटते इतके की पेशंट रिस्की वागणूक देखील प्रदर्शित करतो. चूकीचे निर्णयही अति आत्मविश्वासाने घेतले जाऊ शकतात. मधे मधे अतिशय अॅग्रेसिव्ह वागणूकही घडते, चिडचिड्/इरिटेशन दिसून येते. विशेषतः उन्हाळ्यात मला हे त्रास जाणवतात. कटाक्षाने डोके थंड ठेवायच प्रयत्न आता करते कारण तेवढे आत्मभान डेव्हलप झाले आहे. पण औषधे लागतातच!!!!
21 Apr 2014 - 11:28 pm | किसन शिंदे
ओह! समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. :)
21 Apr 2014 - 11:32 pm | मुक्त विहारि
मनापासून आणि स्वानुभव लिहिल्याने जरा जास्तच आवडला.
तुमच्या नवर्याचे जास्त कौतूक वाटले.
21 Apr 2014 - 11:41 pm | शुचि
धन्यवाद मुवि.
आयुष्यात माझी पुण्यराशी कामात आली असेल ते हा नवरा मिळण्यात. कारण त्याने इतका आधार दिला आहे. अन अजूनही एकमेव माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने तो माझ्यावर सक्ती करतो, काळजी घेतो. मला व्यायाम हा रोजचा रोज करावाच लागतो नाहीतर आमच्यात खडाजंगी ठरलेली आहे. माझे खाणेपीणे/पथ्य स्ट्रीक्ट आहे. अर्थात फार फॅटी/जंक हे वर्जित बाकी काही नाही. झोपेची वेळ ठरल्याने खूप गोष्टी जसे कुटुंबाबरोबर रात्री पिक्चर पहात धमाल करणे हे वर्ज्यच झाले आहे.
ज्या काळात माझी औषधे सापडत नव्हती त्या काळात त्याने कमालीचा पेशन्स दाखवला. म्हणजे नवरा आहे म्हणून नाही तर माझ्या हृदयात एक माणूस म्हणून इतकं ऊंच स्थान त्याने मिळवलय!
आम्ही अनेक अनेक औषधे ट्राय केलेली शेवटी डॉक्टरांनी अॅबिलिफाय मला सुचवली. पण ती काही लागू पडेना तेव्हा याने बरोबर नीरीक्षण करुन डॉक्टरांना सुचविले की १००मिलीग्रॅम ऐवजी एकदा ५० मिलीग्रॅम ट्राय करुन पाहता का? कारण ती औषधांच्या मात्रांना फार सेन्सिटीव्ह आहे. अन डॉक्टरांनी ऐकले अन खरच गेली १० वर्षे ही माझी मूड स्टॅबिलायझर आहे.
एकेक खरच ऋणानुबंधच्च्च असतात.
21 Apr 2014 - 11:50 pm | शुचि
सॉरी १ मिलीग्रॅम ऐवजी, ०.५ मिलीग्रॅम!!
21 Apr 2014 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
__/\__
21 Apr 2014 - 11:52 pm | यसवायजी
_/\_
22 Apr 2014 - 12:01 am | रेवती
प्रामाणिकपणे केलेले लेखन आवडले. तुझ्या जोडीदाराचे कौतुक आहे.
22 Apr 2014 - 1:06 am | अनन्या वर्तक
शुचि तुमच्या बद्दल मलाही आदर वाटतो. अगदी प्रामाणिक पणे स्वतःबद्दल लिहिले आहे तुम्ही. तुमचे पुढील आयुष्य असेच आनंदाचे आणि सुखाचे जावे म्हणून माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा.
22 Apr 2014 - 1:21 am | आत्मशून्य
वॉव! डिडंट सॉ इट कमींग... नाही, तुमच्या जालिय लिखाणात मिष्कीलता, वैताग, बालिशपणा, विज्ञान, काव्य, शास्त्र, विनोद, अध्यात्म, सुस्पष्ट तर्कसंगतीचा अभाव, वगैरे वगैरे वगैरे सर्व नेहमीच आढळले. आपल्या अगदी खुळचट लिखाणालाही एक सात्विक निरागसपणाची जोड दिसली, म्हणुनच जास्तिजास्त निखळ अल्लड छबीच कायम मनात उभी आहे. पॉइंट इज, कधिच म्हणजे कधिच अक्रस्ताळेपणा मात्र असा आढळला नाही. आणि तुम्ही स्वतःला बाइपोलार जाणता ...? ऐकावे ते नवलच.
तुम्हाला मानाचा मुजरा, मैत्रीचा सलाम आणी (हा) प्रेमाचा प्रतिसाद.
22 Apr 2014 - 1:22 am | खटपट्या
सलाम !!!
22 Apr 2014 - 1:38 am | दिव्यश्री
शुचि ताई या प्रकारे लिहायला खरचं एक वेगळी ताकद लागते असे मला वाटते . ती फारच कमी लोकांकडे असते .
नवर्याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही>>> तुमचे पूर्वसुकृत अन पुण्याइ असेलच . मला वाटते आपल्या आई - वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई देखील आपल्या पाठीशी असते कायमच . तुमच्या नवऱ्याला सलाम . जोडीदाराची अशा वेळेस फारच परवड होते . त्यांनी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली .
तुम्ही कधीही व्यनि करा , हाक मारा मला शक्य ते मी करण्यचा नक्की प्रयत्न करेन . देवाजवळ प्रार्थना करेन तुम्ही नेहमी आनंदी राहाव्यात . मनापासून शुभेच्छा . :)
22 Apr 2014 - 1:51 am | आयुर्हित
आपले अभिनंदन व आपल्या पतीदेवांना धन्यवाद. देवाने त्यांनाही आपल्याला गरजेच्या वेळी याग्य प्रकारे साथ देण्याची सुबुद्धी दिली.खरे तर हे संस्कारच असतात, आई वडिलांनी त्यांना घडवताना दिलेले! त्यामुळे तुमच्या सासू सासरे यांनाही धन्यवाद.
अशा या दुर्धर प्रसंगातून आपण व आपले कुटुंब तावून सुलाखून निघालेले आहे व आपल्याया खात्री आहे की कोण आपला सच्चा साथीदार आहे तो!
आता एकच म्हणेन "कॅरम रमवानू, जूस पिबानू, मज्जानी life"
फक्त Queen घेण्यासाठी(आपले goals साध्यकरण्यासाठीच) सदैव प्रयत्नशील रहा!
लोकांच्या कल्याणासाठी खूप मोठे कार्य आपल्या हातून नक्कीच घडेल अशी आशा बाळगतो.
22 Apr 2014 - 2:04 am | प्रभाकर पेठकर
बापरे! वाचता वाचता माझेच हातपाय गार पडू लागले. किती भयंकर संकट तुमच्यावर, नवर्यावर, घरच्या सर्वांवर आलं होतं. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची निकड ओळखणं, प्रत्यक्ष तिथे जाणं, त्यांचं निदान मान्य करणं, औषधोपचाराला मान्यता, सकारात्मक प्रतिसाद देणं अनेक अनेक अडचणी. प्रत्येक पायरीवर माघारी फिरण्याची, नकारात्मक भूमिकेत शिरण्याची केव्हढी ती शक्यता. प्रत्येक क्षणाक्षणाला संघर्ष. स्वतःशीच. मला ह्यातून बाहेर पडायचंच ह्या निर्धारानेच. त्यातून होणारे क्लेष, ते सहन करण्याची मानसिक शक्ती.... सर्व सर्व जिवनच उध्वस्थावस्थेत जाण्याची भिती. ह्या सर्वावर तुम्ही मात केलीत. तुम्हाला सुज्ञ आणि धैर्यवान साथीदार लाभला हे तुमचे भाग्यच म्हंटले पाहिजे. त्यांचे मनभरून कौतुक.
आहार, औषध, व्यायाम आणि निद्रा चारही सूत्रांवर तुमचे कायम नियंत्रण राहो आणि भविष्यातील आयुष्य निर्विघ्न पार पडो अशी इच्छा व्यक्त करतो.
22 Apr 2014 - 3:24 am | सानिकास्वप्निल
अनुभवकथन आवडले, अगदी मनापासून, प्रामाणिकपणे लिहिले आहे त्यामुळे जास्तं भावला शुचीताई
सिंपली ग्रेट ___/\___
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
22 Apr 2014 - 4:41 am | नंदन
स्फुट आवडलं.
माझ्या जवळच्या आप्तांपैकी एक व्यक्तीही बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. एका बुद्धिमान, आनंदी व्यक्तीचं मलूल, कुठलीच उमेद न राहिलेल्या डॉपलगॅन्गरमध्ये होणारं रुपांतर पाहणं फार त्रासदायक. लिथियम बेस्ड् औषधांनी फरक पडतो; पण प्रचंड झोप येणं, अनुत्साह वाटणं, भूक न लागणं - यासारख्या साईड इफेकख्यामुळे तो पर्यायही तितका व्यवहार्य नाही. तुमच्यासारखेच गुणकारी औषधांचे कॉकटेल कधीतरी सापडेल अशी आशा आहे.
अगदी असेच.
22 Apr 2014 - 7:31 pm | शुचि
नंदन, बायपोलर व्यक्तींनी रोजच्या रोज एका विशिष्ठ वेळी व्यायाम करणे हे अति-अति निकडीचे असते. I cannot enough iterate the importance of it. एक दिवस जरी मिस झाला तरी दुसर्या दिवशी लेथार्जिक वाटते,मूड एकदम ड्ल होऊन जातो वगैरे. हे त्या त्या औषधांच्या दुष्परीणामांमुळेच होते.
पण त्यांच्यावर मात करायची असेल तर व्यायामाची जोड अति आवश्यक असते. अर्थात एवढं होऊनही सगळं आलबेल (परफेक्ट) वाटेलच असे नाही पण खूप सुधारणा जाणवते.
किंबहुना मी वाचलेल्या माहीतीनुसार, व्यायाम हा शरीराच्या स्वास्थ्याहूनही जास्त मेंदूच्या स्वास्थ्यासाठी करायचा असतो.
22 Apr 2014 - 4:44 am | शुचि
सर्वच मिपाकरांचे आभार. खरं तर या विषयावर लिहायचे होते पण कसे अन कितपत ते कळत नव्हते.
मूकवाचक, इस्पिक एक्का, वल्ली, शरद जी या सर्वांचे अन्य सुगरणी चे धागे वाचतानाच हे लक्षात आलेले की सारेजण त्यांना इण्टेन्सली जे वाटते , आवडते त्याबद्दल लिहितात अन त्यातून समाजाला, सर्वाना काहीतरी भरीव मिळते, वैचारिक चालना मिळते. मला या विषयावर सांगावेसे वाटत होते. अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही. त्यामुळे खूप दुवे व माहिती तर नाही देउ शकले पण अनुभवकथन मात्र १००% सत्य केले आहे.
22 Apr 2014 - 2:02 pm | तुमचा अभिषेक
अर्थात मी फार सखोल अभ्यास केलेला नाही याचे कारण काय सापडेल अन काय औषधांचे दुष्परिणाम दृष्टोत्पत्तीस पडतील या चिंतेपायी मी या विषयावर फार सर्फींग करत नाही.
हे तसे योग्य करता. मलाही एक तुलनेत दुर्मिळ असा पोटाचा आजार आहे जो शरीराच्या बरेच ठिकाणी आघात करून जातो पण ते सारे होईलच असे नाही म्हणून मी सुद्धा त्यावर स्वतातर्फे संशोधन करत नाही अन्यथा नको ते नजरेस पडून ती भिती मनात राहील. डॉकने देखील अप्रत्यक्षपणे हाच सल्ला दिलाय.
असो,
बाकी हे लिहिण्याच्या धाडसाबद्दल प्रणाम सलाम नमस्ते !
तसेच तुमच्याकडे पाहता हे असे काही असू शकते हे तुम्हीच सांगितले नसते तर विश्वासही बसला नसता. याबद्दल विशेष कौतुक.
22 Apr 2014 - 2:04 pm | तुमचा अभिषेक
अरे हो आणि तुमच्या नवर्याचे कौतुक राहीलेच. मला वाटायचे की मीच काय तो एक जगात भारी नवरा आहे ;)
22 Apr 2014 - 5:09 am | यशोधरा
शुचि तुझे व तुझ्या नवर्याचे खूप कौतुक. शुभेच्छा!
22 Apr 2014 - 6:36 am | बोबो
तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सगळ्यांच्याच धैर्याला सलाम.
22 Apr 2014 - 7:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
असं काही लिहायला आणि कबुली द्यायला प्रचंड मानसिक ताकद लागते. शुचि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जिद्दीला सलाम.
बी पॉसिटीव्ह. गर्तेमधुन बाहेर आला आहात. आपली पथ्यं व्यायाम पाळुन आयुष्य मस्त एंजॉय करा. कदाचित असही होईल लवकरं काही शोध लागेल आणि ह्याच्यावर कायमचा उपचार सापडेल. युनिव्हर्स गिव्ह्स यु व्हॉट यु क्रेव्ह फॉर, मे बी नॉट ईमिजिअटली बट ईव्हेच्युअली. :)
22 Apr 2014 - 8:42 am | प्रमोद देर्देकर
तुम्हाला आणि तुमच्या श्रीं ना _/\___ आणि खूप खूप शुभेच्छा.
22 Apr 2014 - 8:54 am | स्पंदना
ह्म्म्म्म! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
22 Apr 2014 - 9:05 am | स्वप्नांची राणी
किती धीराची आहेस तु शुचि..!!
22 Apr 2014 - 9:18 am | इरसाल
झाले ते विसरा आणी पुन्हा जोमाने नव्या जीवनाला तुमच्या अत्यंतिक काळजी घेणार्या जोडीदाराबरोबर पुन्हा एकदा सामोरे जा. जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने उपभोगा.दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा.
22 Apr 2014 - 9:26 am | अनुप ढेरे
बायपोलर असलेले एक दोघे जण माहित आहेत. तुमच्या करेजला सलाम
22 Apr 2014 - 9:26 am | पिवळा डांबिस
पुढील आयुष्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!!
22 Apr 2014 - 9:41 am | पेट थेरपी
वाचून काळजी वाटली. अवघड असते हे सगळे. तुम्हाला व तुमच्या अहोंना हार्दिक शुभेच्छा. पुढील जीवनासाठी.
22 Apr 2014 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार
शाब्बास आहे तुमच्या नवर्याला आणि तुम्हालाही.
मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने त्यांनी आणि तुम्ही आलेल्या आपत्तीचा मुकाबला केलात.
पुढील वाटचाली साठी तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा.
(लेख वाचता वाचता एक नवरा म्हणुन माझ्या कडुन झालेल्या चूकांची यादी माझ्या डोळ्या समोर तरळुन गेली आणि वाटलं त्यातल्या काही चूका टाळता आल्या असत्या तर बरं झाल असत.)
22 Apr 2014 - 2:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खरचं मी मिपाचा सदस्य आहे याचा आज अभिमान वाटतोय.
बाकी
याच्याशी बाडीस.. :-(
22 Apr 2014 - 9:50 am | नि३सोलपुरकर
शुचि..!!
जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने उपभोगा.दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा
22 Apr 2014 - 9:55 am | सुधीर कांदळकर
आवडले. आमच्या माजी शेजार्यांनी सुमारे १९८५ साली मला डॉ. श्रीकांत जोशी लिखित 'मनाचा मागोवा' नावाचे पुस्तक वाचायला दिले होते. त्यात बर्याच मानसिक विकारांचे वर्णन आहे. परंतु आता उपचारपद्धती बरीच बदलली आहे. त्या लेखकाच्या मते ज्याने मनोविकारावरच्या पहिल्या औषधाचा शोध लावला त्याला नोबेल मिळायला हवे होते. या मतात मनोविकारोपचाराचे महत्त्व आढळून येते.
माझ्या एका डॉक्तर मित्राच्या मते समुपदेशनाने बर्याच प्रमाणात खिन्नता, भावनोद्दीपन वगैरेंवर ताबा मिळवता येतो. मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक हे बहुधा जोडीने उपचार करतात. समुपदेशक हा शक्यतो स्वभाषिकच असावा. त्यामुळे भावना आणि व्यथा अचूक व्यक्त करणे चांगले जमते.
समाजातल्या निदान २० ते ३० टक्के व्यक्तींना समुपदेशनाची गरज आहे असे मला वाटते. त्यांच्यामुळेच वास्तुशास्त्र वगैरे थोतांडाचे अमाप पीक येते. आपल्या यजमानांना प्रणाम.
चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.
22 Apr 2014 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे
शुचि आपल्या लिखाणावरुन मी हे निदान केव्हाच केले होते.फक्त ते व्यक्त केले नव्हते. कारण तसे ते व्यक्त करणे हे उचित ठरले नसते.
आपले लिखाण हे प्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. शरिर जसे आजारी पडते तसे मन पडते, शरिराला जसे व्यायाम,स्वच्छता,डागडुजी आवश्यक असते तसे मनालाही. पण समाजाचा मानसिक आरोग्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनही मागासलेला आहे.तो मुख्यतः अज्ञानामुळे व पुर्वदूषितग्रहांमुळे.तो आपल्यासारख्या लोकांच्या प्रबोधनामुळे हळू हळू सुधारेल. मी स्वतः आयबीएस या पोटाच्या सायकोसोमॅटिक त्रासासाठी मानसोपचारतज्ञांची मदत घेतो. समाजात हळू हळू हा बदल होतो आहे ही मला समाधानाची बाब वाटते. अंधश्रद्धा व मनोविकार यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे हा विषयासाठी अंनिस मधे मानसमित्र या संकल्पनेचा व उपक्रमाचा उदय झाला आहे. असो आपल्या लेखाचा अनेकांना सकारात्मक उपयोग होणार आहे हे भाकित मी वर्तवतो :)
22 Apr 2014 - 2:13 pm | शुचि
हाहाहा :)
22 Apr 2014 - 10:26 am | मदनबाण
सायकिअॅट्रीस्ट्कडे जाणे म्हणजे त्यांच्याकडे जाणारी व्यक्ती ही गॉन केस आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे.जशी शरिराला व्याधी होउ शकते तशीच अवस्था मनाची देखील होउ शकते. जर त्यातुन बाहेर पडणे शक्य असेल तर मग उपचार का घेउ नये ? त्यामुळे तुझे विशेष अभिनंदन ! ? :)
22 Apr 2014 - 10:28 am | ऋषिकेश
कडक सलाम!
_/\_
मागे "कोणार्कची शिल्पे" आणि आता हे लेखन.
मिपाकरांकडे मनातले खास काही उघड बोलायला लोकांना आवडते-जमते-चालते, हे मिपाच्या वातावरणाचेही यश आहे
23 Apr 2014 - 9:59 pm | शुचि
:) हे वाक्य आपल्या मनाचा मोठेपणा दाखविते ऋषीकेश. आपल्याबद्दलचा आदर अधिक दुणावला.
22 Apr 2014 - 10:35 am | प्रचेतस
प्रांजळपणाने केलेले लिखाण मनापासून आवडले.
भावी वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा.
22 Apr 2014 - 10:53 am | मृगनयनी
शुचि. तुम्हाला _________/\_________ खरोखर हिम्मत लागते.. हे सगळं सहन करायला.. आणि तितक्याच धैर्याने लोकांसमोर मांडायला!!!.. रीअली हॅट्स ऑफ्फ!!!.....
22 Apr 2014 - 10:48 am | मेघना मन्दार
खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी .. :-) नेहमी आनन्दी रहा आणि हसत रहा.. :)
22 Apr 2014 - 10:57 am | रामदास
आणि इतर मिपाकरांशी सहमत आहे.
हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा आजार संपणार असे म्हणण्यापेक्षा येणार्या प्रत्येक दिवसात हा आजार सोबत असण्याची शक्यता शून्याकडे जाईल असेच म्हणू या. शुभेच्छा.
22 Apr 2014 - 10:57 am | सार्थबोध
तुमच्या यजमानाना मानले, आणि तुमची रोगवर मात करायची धमक पाहुन तुमचे कौतुक करावे तीतके थोड़ेच ....तुम्हाला दोघाना नमस्कार
22 Apr 2014 - 11:16 am | थॉर माणूस
_/\_
तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांनाही...
22 Apr 2014 - 11:46 am | सविता००१
शुचि तुझे व तुझ्या नवर्याचे खूप कौतुक. शुभेच्छा!
22 Apr 2014 - 11:53 am | पिलीयन रायडर
किती वेगळी आहेस ग तू.. तुझं लिखाण नेहमीच वेगळं असतं.. म्हणजे त्यात एक निरागसपण आहे.. तुझ्या धाग्यांवर अनेकदा कुणी निगेटिव्ह केमेंट केली तरी तू ती अनेकदा सहजपणे स्वीकारतेस. तुझ्या त्या परवाच्या ऑफिसवरच्या धाग्यावर सुद्धा तू विरोधी कमेंट्सपण समजुन घेतल्यास..
आताही हा लेख वाचुन समजत नाहीये की काय बोलावं.. किती प्रांजळपणे लिहीलय.. मनापासुन.. तुला खरच सलाम!
आणि हो तुझ्या नवर्यालाही!
22 Apr 2014 - 12:00 pm | बाबा पाटील
या आजारातुन उभे राहिल्या बद्दल. दुसरे तुमच्या धैर्याला सलाम.
22 Apr 2014 - 12:01 pm | पिंगू
दंडवत तुला आणि साष्टांग स्पेशल दंडवत तुझ्या नवर्याला. कारण भोगणार्यापेक्षा शुश्रुषा करणार्याला अधिक त्रास असतो.
22 Apr 2014 - 12:22 pm | अद्द्या
काकू. .
असं लिहायला जबरदस्त मानसिक ताकत लागते .
तुम्हाला . आणि तुमच्या "ह्यांना" . . लैच कडक सेल्युट . .
बाकी फक्त एवढंच करू शकतो .
________/\_________
22 Apr 2014 - 12:44 pm | मृत्युन्जय
शुचितै तुम्हाला आणि तुमच्या नवर्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
22 Apr 2014 - 1:44 pm | Mrunalini
शुचि ताई, तुम्हाला आणि तुमच्या नवर्याला खुप शुभेच्छा!! असा नवरा मिळणे खरच खुप भाग्य लागते.
22 Apr 2014 - 2:11 pm | शुचि
इतक्या शुभेच्छा दिल्यात, मनोधैर्य वाढविलेत, कौतुक केलेत, इतकी परिपक्वता दाखविलीत काय बोलू. मला खूप बरे वाटले. रामदास म्हणतात तसे "प्रत्येक दिवस मला व्याधी पासून मुक्तच करतो आहे." ही भावनाच सुखावह आहे.
कांदळकर यांनीही समुपदेशनाचा मांडलेला मुद्दा योग्यच आहे. पिरा म्हणते तशी - "विरोधी कमेंट्स समजून घेते" कारण मला माहीत आहे की I do not (absolutely) do not have luxury of excited mood, any unusal upheavals of mood. भावनोद्दॆपन टाळायचे (sorry I am typing on some site & copy pasting hence many typos)
परत एकदा सर्वांचे आभार.
22 Apr 2014 - 2:18 pm | कवितानागेश
खूप हिंमत आहे शुचि तुझ्याकडे. अगदी डॉक्टरचे निदान स्विकारण्यापासून आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार होण्यापासून खरोखरच खूप हिंमत दाखवली आहेस. त्यामुळेच तु त्यातून बाहेर पडलियेस आणि आनंदी राहू शकतेयस. असे स्वतःकडे नि:पक्षपाती द्रुष्टीनी पहायची हिम्मत सगळ्यांकडे नसते. उलट 'बाहेरच्या' कुठल्यातरी कारणाकडे बोट दाखवलं जातं. पण 'आत' काहीतरी बिघदलय, काहितरी कमी पडतय, त्यामुळे imbalance व्हायला बाहेरचे निमित्त पुरतंय, हे लक्षात घेतले जात नाही. मानसिक आजारांच्या बाबतीत तर नाहीच नाही, त्यामुळे बरेचवेळेस पुढचे उपाय करणंच शक्य होत नाही.
आता सगळे उपाय करणं शक्य असतानाच्या काळात सुद्धा काही स्किझोफ्रेनिच/डिप्रेशनच्या पेशन्ट असलेल्या मुलींना परत माहेरी आणून सोडलेलं पाहिले आहे. त्या पाश्वभूमीवर, तुझ्या नवर्यानी मात्र कायम तुझ्या बाजूनी आणि तुझ्या आजाराविरुद्ध उभे रहाणं अगदी आदर्श म्हणावं असंच आहे. खरोखरचा 'सखा सोबती'.
ग्रेट कपल. :)
22 Apr 2014 - 2:31 pm | श्रीगुरुजी
प्रांजळ कथन आवडले. तुम्हाला आणि तुमच्या पतिदेवांना सलाम! उगाच ज्योतिषी, ग्रहशांती, फेंगशुई असले काहीतरी अशास्त्रीय करण्याऐवजी थेट डॉक्टरांकडे तुमची समस्या घेऊन गेल्यामुळेच लवकर समस्यामुक्त झालात. बायपोलर डिसऑर्डर असणारे इतरही काही जण असतील. अशांसाठी एखादा मदत/आधार गट असेल तर त्यात सामील होऊन इतरांना मदत करता येईल.
22 Apr 2014 - 2:32 pm | चिगो
सर्वप्रथम तर एवढा समजूतदार नवरा मिळाला, ह्याबद्दल अभिनंदन.. त्यानंतर, मनोरोग म्हणजे फिल्मी स्टाईल वेडेपणा नसतो, आणि त्यावर उपाय आहेत हे समजुन उपचारांना सामोर्या गेल्यात, ह्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि, उपचार लागू पडल्याने तुम्ही आता सुखात आहात, ह्यासाठी त्रिवार अभिनंदन..
आता दाद घेण्याची पाळी.. स्वतःला एक मनोरोग होता, आहे हे खुल्या संस्थळावर सांगण्याची हिंमत दाखवलीत, त्या हिंमतीला दाद देतो.. ह्या लेखातून जर दुसर्या कुणाला त्रास असेल तर त्यानी तो ओळखावा आणि इलाज करावा म्हणून स्वतःची गोष्ट सांगितलीत, त्या नि:स्पृह वृत्तीची दाद देतो..
आणि तुमच्या पुढच्या सुखाच्या आणि समृद्धीच्या सहजीवनासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा..
22 Apr 2014 - 2:36 pm | vrushali n
hats off
22 Apr 2014 - 2:44 pm | आरोही
खरेच ग शुचीताई खूप कठीण काळातून गेलीयेस ग ...आणि धीराची आहेस हे सुद्धा पटले ..असा अनुभव सार्वजनिक स्थळी मांडायला खरेच खूप धैर्य हवे...hats off to you and your husband
22 Apr 2014 - 2:50 pm | सुबोध खरे
शुचि ताई,
कौतुक इ. इ. बरेच झाले.
आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. आपल्याला त्यांच्या "अशा" प्रती-प्रतीसादाची अपेक्षा ठेवूनच वागावे लागेल.
असे फार मोठ्या प्रमाणात भारतात समाजात होताना दिसते.
22 Apr 2014 - 3:02 pm | सूड
>>आता यापुढे आपण कुणावर जरासा तिरकस प्रतिसाद दिलात तरी ( मिसळपाव मधील माझ्या थोड्याशा अनुभवानुसार) लोक आपल्या आजारावर घसरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
एखाद्याला असलेल्या आजाराच्या बाबतीत तरी मिपाकरांनी असं काही केलेलं अजून तरी पाहण्यात नाही. आधीही असा कोणाचा आजार उघडकीस आला/ त्या व्यक्तीने स्वतःहून मिपाकरांना सांगितला त्याला/तिला इथे समजून घेण्याचाच प्रयत्न केला गेला आहे.
22 Apr 2014 - 3:11 pm | कवितानागेश
निदान ९०% लोकांबद्दल खात्री आहे, की ते असे करणार नाहीत.
आणि कुणी तसे केलंच तरी त्याचा त्रस करुन न घेण्याइतकी शुचि खंबीर आहे.
22 Apr 2014 - 3:18 pm | प्रचेतस
सूड आणि माऊशी सहमत.
22 Apr 2014 - 3:12 pm | सुबोध खरे
सूड साहेब
हाच मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक आहे.
लोक वाद थांबवताना पटकन "अरे वो सायकिक केस है, जाने दो" असे म्हणून त्या रुग्णाला न भरून येणारी जखम करून जातात. आजाराचे सुद्धा उच्चभ्रू आणि गरीब असे प्रकार आहेत. चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच पन्नाशीचा माणूस चष्मा सहजपणे लावतो पण कानाचे यंत्र लावत नाही.
22 Apr 2014 - 3:15 pm | प्यारे१
>>>चष्मा लावणाऱ्या कडे कुत्सित नजरेने पाहिले जात नाही पण कानाला यंत्र लावणाऱ्या कडे " वेगळ्या" नजरेने पहिले जाते. हि वस्तुस्थिती आहे.
:) खरंय!
- डाव्या कानानं आजाबात ऐकू न येणारा आणि उजव्या कानाचं आप्रेशन झालेला ;)