येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - २ (अंतिम)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
19 Apr 2014 - 8:00 am

येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला बिबट्या, मग तर काय विचारायलाच नको !

१९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता. बंगलोरपासून जेमतेम ९५ मैलावर असल्याने शनिवार-रविवारी विश्रांतीसाठी म्हणून त्याचा वापर करावा असा माझा विचार होता. कामच्या व्यापातून मला इथे येण्यास फारसा वेळ मिळत नव्हता, त्यामुळे माझ्या या 'फार्म हाऊस' वर लॅंटनाचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्याचा बंदोबस्त करणं अत्यावश्यक असल्याने तीन दिवसांची सुटी घेऊन मी येल्लागीरीला आलो होतो. काही दिवसांपूर्वीच बळी गेलेल्या त्या गुराख्याची हकीकत मला गवत कापणी करणा-या माझ्या मजुरांकडून कळली होती. त्यांच्या मते तो बिबट्या अद्यापही त्या परिसरातच होता. आदल्या दिवशीच त्याचे ठसे त्यांच्या दृष्टीस पडले होते.

बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करायचा मी निश्चय केला. माझ्याबरोबर मी माझी रायफल आणली नव्हती. माझ्या जवळ १२ बोअरची शॉटगन होती. अडीअड्चणीला असावीत म्हणून २ एल.जी. काडतूसं मी बरोबर घेतली होती. बाकीच्या हलक्या ताकदीच्या काडतूसांचा बिबट्यासाठी काही उपयोग नव्हता.

दुपारी बाराच्या सुमाराला गवत कापणीचं काम थांबवून मजुरांसह मी बिबट्याचे ठसे पाहण्यासाठी निघालो. गावातून बाहेर पडल्यावर लँटनाचा पट्टा शेतांना लागून गेला होता. लँटनाला लागूनच घनदाट जंगल पसरलेलं होतं. या शेतांपैकीच एका शेताच्या टोकाला असलेल्या पायवाटेवर एका मोठ्या बिबट्याचे ठसे स्पष्ट दिसत होते. तो एक मोठा नर होता. आदल्या रात्रीच तो तिथून गेला होता.

गावात परतून मी पाटलाची गाठ घेतली. बिबट्याची सविस्तर हकीकत त्याच्याकडून कळली. त्याच्या मदतीने बिबट्याला आमीष म्हणून मी एक लहानसा बोकड मिळवला. तो बोकड, पाटील आणि माचाण बांधण्यासाठी चार माणसं यांच्यासह त्या गुराख्याचा बळी गेला होता त्या जागी मी पोहोचलो. चारही बाजूला पसरलेल्या घनदाट काटेरी झुडूपांमुळे जमिनीवर लपून बसणं अशक्यं होतं त्यामुळे आम्ही परतून पायवाटेवर आलो. वाटेला लागूनच फणसाचं एक झाड होतं. या झाडावर बिबट्यासाठी टपून बसायचं मी ठरवलं.

माझ्याबरोबरच्या माणसांनी बाजूच्या जंगलातून झाडाच्या मजबूत फांद्या तोडून आणल्या आणि वेलींनी एकमेकींशी घट्ट बांधून चार फूट लांब आणि तीन फूट रुंद असा एक प्लॅट्फॉर्म दोन फांद्यांच्या बेचक्यात तयार केला. या प्लॅटफॉर्मच्या सर्व बाजूंनी छोट्या डहाळ्या आणि पानांनी तो आच्छादून टाकला गेला होता. कोणत्याही दिशेने बिबट्या आला तरी त्याला माचाण आणि त्यावर बसलेला माणूस दिसणार नाही याची पक्की खात्री मी करून घेतली. झाडापासून सुमारे वीस फूट अंतरावर एक मजबूत खुंटी जमीनीत ठोकून त्याला बोकड्बुवांना बांधलं. मग माचाणावर चढून खुंटाला बांधलेला बोकड आणि त्याच्या आजूबा़जूचा परिसर स्पष्ट दिसेल इतपत त्या पाना-डहाळ्यांतून मी झरोका तयार केला. माझी सारी सिध्धता होईपर्यंत पाच वाजले होते.

आधीच सांगीतल्याप्रमाणे मी येल्लागीरीला मोठ्या शिकारीच्या तयारीने आलो नव्हतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी मी नेहमी वापरत असलेली साधनं माझ्यापाशी नव्हती. माझा नेहमीचा मोठ टॉर्च आणि तो रायफलला लावयचा क्लॅम्प नव्हता. माझ्याजवळ टॉर्च होता तो मी नेहमी कँप मधे वापरत असलेला २ सेलचा छोटा टॉर्च. त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्यातून कृष्ण्पक्षातली रात्र असल्याने चांगलीच अंधारी असणार होती. एकंदरीत माझा अनुभव आणि पंचेंद्रियांवर विसंबून राहण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं.

हे सगळे विचार मनात घोळवतच मी माचाणात स्थानापन्न झालो आणि गावक-यांना परतण्याची सूचना दिली. माझ्या सूचनेप्रमाणे एकमेकांशी मोठ्याने बोलत गावकरी परतले. गावकर्‍यांना ही सूचना देण्यामागे माझे दोन हेतू होते. एकटेपणाच्या जाणीवेने बोकड मोठ्याने ओरडणार होता आणि बिबट्या जवळपास असलाच आणि त्याने आम्हांला पाहीलं असलंच तरी गावकरी परत गेले या समजुतीने तो बोकडावर झडप घालण्यासाठी येण्याची शक्यता होती.

गावकरी गावात परतताच बोकड्बुवांनी मोठ्याने बें बें करुन ओरडायला सुरवात केली. ओरड्ण्याबरोबरच त्याचं दोराला हिसके देणंही सुरू होतं. बोकड्बुवांनी असा काही सूर लावल होता की बिबट्या मैलभराच्या परिसरात कुठेही असता तरी त्याल तो आवाज गेला असता. एव्हाना सूर्यास्त होऊन गेला होता आणि अंधार पडायला सुरवात झाली होती, सततच्या ओरडण्यालाही कोणीच दाद देत नाही आणि आपल्याला सोडवायला येत नाही ही कल्पना आल्यावर बोकडबुवांनी जमिनीवर बैठक मारली आणि ते निद्राधीन झाले ! आता इतका गडद अंधार पडला होता की बिबट्या आला असता तरी त्याचा पाय पडल्यावरच बोकड कुठे आहे हे त्याल समजलं असतं. तरीही चिकाटीने मी माचाणावर बसून होतो.

अखेरीस रात्री नऊच्या सुमाराला बिबट्याच्या शिकारीची मोहीम रात्रीपुरती आवरती घेण्याचं मी ठरवलं. झाडावरुन उतरुन बोकडबुवांना सोडवलं आणि गाव गाठलं. माचाण बांधणार्‍यांपैकी एका गावकर्‍याच्या ताब्यात बोकडाला देऊन मी बिछान्यावर पाठ टेकली.

पुढचे तीन दिवस असेच गेले. दिवसभर गवत कापणीवर देखरेख करावी आणि रात्री वेगवेगळ्या बोकडांना आमीष म्हणून बांधून अर्ध्या रात्रीपर्यंत माचाणावर बसून चित्त्याची वाट पाहवी. सकाळी गावाभोवतालच्या जंगलात त्याच्या ठशांचा माग घ्यावा. पण माझी ही सगळी मेहनत व्यर्थ गेली. बिबट्याची काही खबरबात मिळाली नाही आणि त्याचे ताजे मागही आढळले नाहीत.

चौथ्या दिवशी मी टेकडी उतरून बंगलोरल माझ्या घरी परतलो. निघण्यापूर्वी मी पाटलाकडे माझा पत्ता आणि बिबट्याने पुढचा बळी घेतल्यावर मला तार करण्यासाठी पैसे देऊन ठेवले होते. बिबट्याने बळी घेतल्यावर पाटलाने जालारपेट गाठून मला तार करायची होती.

मी बंगलोरला परतल्याला महिना उलटून गेला होता. पाटलाची तार आली नव्हती. बिबट्याने येल्लागीरीचा परिसर सोडून जावडी टेकड्यांच्या परिसरात स्थलांतर केलं असावं. जावडी टेकड्यांची रांग तिरुमलाईच्या पवित्र टेकडीपर्यंत पसरलेली आहे. कदाचीत बिबट्या निर्ढावलेला नरभक्षक नसावा आणि अपवादात्मक परिस्थीतीत त्याने गुराख्याचा बळी घेतल असावा असा मी मनाशी अंदाज केला.

येल्लागीरीच्या नरभक्षकाने माझा अंदाज साफ धुळीला मिळवला !

सात आठवड्यांनी पाटलाची तार आली तेंव्हा मी या बिबट्याला जवळपास विसरुनच गेलो होतो. जालारपेट स्टेशनवरुन येल्लागीरी आणि परिसरातल्या वस्त्यांवर येणार्‍या पोस्टमनचा बिबट्याने बळी घेतला होता.

माझ्या हातात तार पडेपर्यंत दुपार उलटून गेली होती. खूप धावपळ करून सर्व तयारीनीशी बंगलोरहून ७ वाजता सुटणारी त्रिचनापल्ली एक्सप्रेस मी गाठली आणि रात्री १०.३० ला जालारपेटला उतरलो. माझ्याजवळ माझा पेट्रोमॅक्स कंदील होता त्यामुळे भर रात्री येल्लागीरीची वाट तुडवताना काळजी नव्हती. पेट्रोमॅक्सच्या प्रखर प्रकाशात हल्ला करण्याचं नरभक्षकाचं धाडस झालं नसतं. माझी .४०५ विंचेस्टर रायफल आणि सामनाने भरलेली हॅवरसॅक पाठीवर आणि हातात पेट्रोमॅक्स घेऊन खड्या चढणीच्या वाटेने रात्री दोनच्या सुमाराला मी टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा चांगलाच घामाघूम झालो होतो. गावापासून मैलभर अंतरावर असताना थंडगार वार्‍याची सुखावणारी झुळूक आली आणि जरा बरं वाटलं.

पाटलाच्या घरी जाऊन मी त्याला उठवलं. तशा अपरात्रीही सगळं गाव माझ्याभोवती जमा झालं. पाटलाची जेवणाची सूचना नाकारुन गरमा-गरम चहा रिचवताना मी पाटलाला बिबट्याची हकिकत विचारली.

माझ्या गेल्यावेळच्या भेटीनंतर गावकर्‍यांनी सावधगीरी बाळगण्यास सुरवात केली होती. दिवसा कोठेही जायचं झालं तरीही तीन-चारच्या गटाने काठ्या-कुर्‍हाडीसारखी शस्त्र असल्याशिवाय कोणीही बाहेर पडत नव्हतं. रात्री कोणीही बाहेर पडण्याच प्रयत्नही केला नव्हता. सुमारे दोन महिने चित्त्याची कोणतीही बातमी न आल्याने सर्वजण तसे निर्धास्त झाले होते.

येल्लागीरीच्या टेकडीवर येणारा पोस्ट्मन जालरपेट स्टेशनच्या शेजारीच असलेल्या पोस्टातून सकाळी सहाच्या सुमाराल निघत असे. रात्रभरात बंगलोर, मद्रास आणि कालिकतहून येणार्‍या गाड्यांमधून येल्लागीरीला येणारं टपाल जालारपेटला येत असे. जालारपेटला ते टपाल उतरून घेतल्यावर पोस्टमन टेकडी चढून येल्लागीरीला येत असे. त्याच्याजवळ असलेलं एकुलतं एक शस्त्रं म्हणजे एक छोटासा भाला ! या भाल्याच्या फाळाच्या तळाशी लोखंडी रिंगा बसवलेल्या असत. दर दहा-पंधरा पावलानंतर तो भाला जमिनीवर आपटत असे. लोखंडी रिंगा फाळावर आपटून होणार्‍या आवाजाने वाटेतले कृमी-किटक आणि जाणवणार्‍या आघातांमुळे साप दूर पळून जात. भाल्याच्या फाळाला लावलेल्या रिंगांचा तो आवाज गेली जवळपास शंभर वर्षे भारताच्या गावा-गावांतून पोस्टमनचं आगमन सूचित करत आहे.

ज्या दिवशी तो दुर्दैवी पोस्टमन बळी गेला होता त्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे सकाळी जालारपेटहून निघाला होता. पण तो टेकडीच्या माथ्यावर पोहोचलाच नाही.

दुपारच्या जेवणानंतर काही माणसे टेकडी उतरून जालारपेटला जाण्यास निघाली. गावापासून सुमारे एक चतुर्थांश अंतर चालून गेल्यावर एका खडकावर उडालेले वाळलेल्या रक्ताचे डाग त्यांच्या नजरेस पडले. नक़्की काय झालं असावं याची आपापसांत चर्चा करत असतानाच एकाची नजर बाजूच्या झुडूपाजवळ पडलेल्या पोस्टमनच्या भाल्यावर गेली. काय प्रकार झाला असावा याची कल्पना येताच सर्वांनी धावतपळत गाव गाठलं. गावातून आणखी माणसांची कुमक घेऊन पाटलासह सर्वजण त्या जागी परतले. थोडा शोध घेतल्यावर एका झुडूपामागे अर्धवट खाऊन टाकलेलं पोस्टमनचं शव दिसलं. पाटलाने जालारपेटला जाणार्‍या लोकांकडे मला तार करण्यासाठीचा मज़कूर लिहून दिला. पण बंगलोरहून जालारपेट फक्तं ८९ मैल असूनही मला तार तब्बल २४ तास उशिराने मिळाली होती. दरम्यान पोलीसांनी पंचनामा आटोपून पोस्टमनचा मृतदेह ताब्यात घेतल होता.

पाटलाकडून एक बाज घेऊन मी गावाबाहेर आलो आणि बाजेवर आडवा झालो तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते. दोन तासांनी मला जाग आली ती गावातल्या कुत्र्यांच्या भुंकण्याने. येल्लागीरीच्या आजू-बाजूच्या जंगलात आदीवासींची वस्ती नसल्याने गावकर्‍यांना बिबट्याबद्दल असलेली माहीती आणि माझा अनुभव यावर अवलंबून राहण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं.

बिबट्याची गुहा किंवा दुसरं नेहमीचं विश्रांतीचं ठिकाण कुठे असावं याची गावकर्‍यांना कल्पना नव्हती, पण अधिक चौकशी करता त्यांच्यापैकी दोन गुराख्यांनी चित्त्याला 'पेरियामलई' किंवा 'मोठी टेकडी' च्या जवळपास उन खात बसलेला असताना ३-४ वेळा पाहिलं होतं. येल्लागीरीच्या माथ्यावरच्या मोठ्या पठारावर पेरियामलई ही एकमेव टेकडी समुद्र्सपाटीपासून ४५०० फूट उंचीवर सरळसोट उभी ठाकलेली आहे. मी त्या दोन गुराख्यांना बिबट्या दिसलेल्या जागेपर्यंत मला नेण्याची विनंती केली पण भीतीपोटी त्यांनी ठाम नकार दिला. पाटलाच्या दरडावणीपूढे मात्र त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांच्यासह मी बिबट्याच्या मागावर निघालो.

पेरियामलईची टेकडी गावाच्या पूर्वेला - जालरपेटहून येणार्‍या रस्त्याच्या बरोबर विरुध्द दिशेला तीन मैलांवर आहे. बिबट्याचा शेवटचा बळी - पोस्टमन - गेला ती जागा आणि गुराख्यांनी बिबट्या पाहिला ती जागा यात ५ मैलाचं अंतर होतं. या ५ मैलांच्या पट्ट्यात संपूर्ण शेती होती. पेरियामलईचं जंगल विरुध्द बाजूला येल्लागीरीच्या पायथ्यापर्यंत पसरलेलं होतं. या सर्व परिस्थितीचा विचार करता गुराख्यांनी पाहिलेला बिबट्या पोस्टमनचा बळी घेणारा नरभक्षक नसावा असा विचार माझ्या मनात आला.

पेरियामलईच्या पायथ्याच्या एका मोठ्या खडकाकडे निर्देश करत त्या गुराख्यांनी बिबट्या दिसलेली जागा मला दाखवली. पेरियामलईच्या पायथ्यापासून त्या ठिकाणापर्यंत लँटनाचं रान माजलं होतं. टेकडीच्या पायथ्यापासून वर भरगच्च झाडी होती. येल्लागीरीप्रमाणेच पेरियामलईवरही जागोजागी भलेमोठे खडक पसरलेले होते. त्या खडकांमध्ये आणि घनदाट झाडीत बिबट्याचा शोध घेणं अशक्यप्रायच होतं. टेकडीच्या पायथ्याशी आमीष बांधण्यासाठी सोईस्कर जागा आणि माचाण बांधण्यासाठी योग्य झाड पाहून आम्ही गावात परतलो.

पाटलाकडे परतून त्याला मी माझी योजना सांगीतली, त्याने आमीष म्हणून एक गाढव मला मिळवून दिलं. त्या रात्री मी माचाणावर बसणार नसल्याने बोकडाचा उपयोग नव्हता. एक वेळच्या भोजनात बोकडाचा फडशा पाडल्यावर बिबट्याला परत येण्याचं काही कारणंच उरलं नसतं. अर्थात बोकडाने ओरडून बिबट्याला आकर्षून आणलं असतं तसं गाढवाने केलं नसतं, परंतु टेकडीवरुन पायथ्याशी बांधलेली गाढवाची आयती मेजवानी बिबट्याच्या सहज नजरेला पडेल अशी मी आशा केली. माझ्याबरोबर आलेल्या दोन गुराख्यांच्या ताब्यात गाढवाला देऊन मी योजलेल्या ठिकाणी गाढवाला बांधण्याची त्यांना सूचना दिली.

पाटील आणि चार-पाच गावकर्‍यांसह मी पोस्टमन बळी गेला त्या ठिकाणी आलो. गावापासून सुमारे दीड मैल अंतरावर लँटना आणि खडकांच्या मधून जालारपेटहून येणार्‍या वाटेच्या बाजूलाच ही जागा होती. आदल्या रात्रीच मी तिथून गेलो होतो पण पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात खडकांवर उडालेले रक्ताचे डाग माझ्या नजरेतून सुटले होते. गावकर्‍यांनी मला बिबट्याने पोस्ट्मनचा फडशा पाडला होता ती जागा दाखवली. तिथून गावाच्या दिशेला सुमारे ३०० यार्डांवर मी दुसरं गाढव बांधायचं ठरवलं. गावात परतून गावापासून जवळच जिथे जंगल सुरु होत होतं तिथे तिसरं गाढव बांधायचा मी बेत केला. माझ्या सूचनेनुसार पाटलाने गाढवं बांधण्याची व्यवस्था केली, एव्हाना दुपारचा एका वाजला होता. आता माझ्या हाती वाट पाहण्यापलीकडे काहीच नव्हतं. त्या रात्री बिबट्या तीनपैकी एकातरी गाढवाचा बळी घेईल अशी मी आशा केली.

पाटलाने माझ्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. परातभर भाताचा डोंगर आणि त्यावर वांगी घातलेली कांद्याची झणझणीत आमटी! आमटीमध्ये मुक्तहस्ताने मिरच्या घातलेल्या होत्या ! माझ्या डोळ्यातून पाण्याची धार लागलेली पाहून पाटलाला फार वाईट वाटलं. तो पुन्हा-पुन्हा दिलगीरी व्यक्त करु लागला. अर्थात मला तिखट जेवण मुळात आवडत असल्याने मी त्याला काळजी न करण्याचं सांगून आश्वस्त केलं. जेवणानंतर भरपूर कॉफी झाली आणि मी उठलो तेव्हा माझं पोट तुडुंब भरलेलं होतं !

वेळ घालवण्यासाठी मी माझ्या फार्म हाऊस वर गेलो आणि संपूर्ण संध्याकाळ कुंभाराच्या चाकावर घालवली, हे माझं फार्म हाऊस सुमारे दीड एकर लांबीच्या तुकडयावर पसरलेलं आहे. फणस, पेरू, पीच आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाल इथे लावलेला आहे. काही पक्षी आणि बदकंही मी इथे पाळलेली आहेत. या फार्म हाऊस वर दोन कोठ्या आहेत. कुडाच्या आणि चिखलाचं लिंपण केलेल्या भिंती आणि गवताची शाकारणी असलेलं छप्पर ! एक छोट्याशा विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मी बंगलोरहून मासे आणून विहीरीत सोडले होते. समोरुनच वाहणारा एक लहानसा झराही आहे. एका कोठीसमोर खास गुलाबाची बाग आहे. झर्‍याच्या जवळच्या जमिनीच्या तुकड्यावर मी खास ब्रम्हदेशातूना आयात केलेला काळा तांदूळ लावला आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हा काळा तांदूळ दक्षिण भारतात फार थोड्या ठिकाणी चांगला वाढलेला आहे.

या फार्म हाऊसबद्द्ल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे यातली एक कोठी झपाटलेली असल्याची वदंता होती. १९४१ साली सुमारे ५००/- रुपयांना ज्या बाईकडून ही जागा मी घेतली तिच्या भावाचं - जागेच्या मूळ मालकाचं भूत इथे दिसतं असा प्रवाद होता. त्याने ही जागा २५ वर्षे जोपासूना वाढवली होती. त्याच्या मृत्यूनंतर गावकर्‍यांनी त्याचं भूत अनेकदा कोठीसमोर पाहीलं होतं म्हणे ! मी ती जागा रोख पैसे देऊन माझ्या नावावर रजिस्टर करून घेईपर्यंत तिने मला यातलं काहीही सांगीतलं नव्हतं. मी खरेदीचा बेत रद्द करेन अशी तिला धास्ती वाटली असावी. तिने स्वतः ही अनेकदा तिच्या भावाला पाहिलं होतं ! चांदण्या रात्री त्याच्या आवडत्या गुलाबाच्या झुडुपांजवळ तो हमखास उभा असे! अर्थात ते भूत निरुपद्रवी आहे हे सांगायला ती विसरली नाही. या खरेदीबरोबरच मला थोडंफार जुनंपुराणं फर्नीचरही मिळालं होतं. दोन्ही कोठ्यांत पलंग, एक फुटकं ड्रेसींग टेबल आणि एक आरामखुर्ची याचा त्यात समावेश होता.

त्या कोठ्यांमध्ये घालवलेली पहिली रात्र मी जन्मात विसरणं शक्यं नाही. ज्या कोठीत त्या जागेच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला होता त्या कोठीतच मी झोपलो होतो. पलंगावरच्या टोचणार्‍या बाजेमुळे माझा बिछाना मी जमिनीवर अंथरला आणि मेणबत्ती विझवून पाठ टेकताच मला गाढ झोप लागली.

मला किती वेळाने जाग आली कोणास ठाऊक. चोहीकडे मिट्ट काळोख पसरलेला होता. रातकिड्यांची किरकिरही ऐकायला येत नव्हती.

आणि त्याच वेळी माझ्या गळ्यावर मला कसला तरी थंडगार स्पर्शाची जाणीव झाली ! हाताची दोन बोटं असावीत असा तो स्पर्श माझ्या गळ्याच्या दोन्ही बाजूला मला जाणवला !

आता मी काही फार कल्पनाशक्ती असलेला माणूस नाही. अंधाराची मला भीती वाटत नाही आणि मी अंधश्रद्धाळूही नाही, पण त्या क्षणी माझ्या मनात झर्रकन विचार आला तो त्या मूळ मालकाचा आणि त्याच्या भूताचा ! माझा टॉर्च काही फूटांवरच्या खिडकीत होता. मी काड्याची पेटी कुठे ठेवली ते आठवण्याचा प्रयत्न करत होतो आणि नेमक्या त्याच क्षणी माझ्या गळ्याभोवती त्या बोटांचा दाब वाढल्याचं मला जाणवलं ! माझ्या मानेवरचे केस ताठ उभे राहिले. तो जो काही प्रकार होता त्याला निमूटपणे बळी जायची माझी तयारी नव्हती. सगळी ताकद एकवटून मी उठलो आणि खिडकीच्या दिशेने मुसंडी मारली. अंधारात न दिसलेल्या खुर्चीला मी धडकलो आणि भूतालाच धडक मारली या कल्पनेने माझी पाचावर धारण बसली. टॉर्च शोधण्यासाठी मी अंधारात चाचपडत असतानाच माझ्या हाताला टॉर्चचा थंडगार स्पर्श जाणवला ! टॉर्च हातात येताच मी मनोमन भूताच दर्शन घेण्याच्या तयारीने टॉर्चचं बटण दाबलं आणि पाहतो तो काय... जवळपास एक फूट्भर लांबीचा भलामोठा टोड माझ्या बिछान्यावर बसून माझ्याकडे पाहत होता ! पावसामुळे तो माझ्या कोठीत आला असावा. स्वतःशीच मनसोक्त हसत मी त्याला कोठीच्या बाहेर घालवलं आणि सगळ्या वातावरणाशी - भुतासकट - सूर जुळल्यागत मी शांत झोपी गेलो !

दुसर्‍या दिवशी सकाळी माझी तीनही गाढवं जीवंतं होती. दुसरं काहीच करण्यासारखं नसल्याने मी दिवसभर आराम केला. तिसर्या दिवशी सकाळीही एकाही गाढवावर चित्त्याने हल्ला केला नव्हता.

बिबट्याने पोस्टमनचा बळी घेतल्यावर नवीन पोस्टमनला अंगरक्षक म्हणून दोन चौकीदारांची नेमणूक करण्यात आली होती. जालारपेटहून आता पोस्टमनसह दोन्ही चौकीदारही टेकडीवर ये-जा करत असत. दोन्ही चौकीदारांपाशी भाले होते. खेरीज पोस्टमनकडे त्याचा रिंगांचा आवाज करणारा भालाही होताच ! जालारपेटहून येताना पोस्टनचा बळी गेल्याच्या जागेपासून सुमारे पाव मैलांवर दगडांवर ऊन खात बसलेला बिबट्या त्यांच्या दृष्टीस पडला होता. त्यांच्याकडून ही बातमी कळताच पाटलाने मला बोलावण्यासाठी कोठीवर माणूस पाठवला. माझी रायफल घेऊन शक्य तितक्या घाईने मी ती जागा गाठली. बिबट्या माझ्या स्वागताला न थांबता निघून गेला होता. त्या खडकाळ भागात त्याचा शोध घेण्यात अर्थ नव्हता, पण त्या परिसरातलं त्याचं दर्शन उत्साहवर्धक होतं हे निश्चीत ! काजूच्या झाडाखालच्या गाढवाचा बिबट्याने बळी घेतला तर माचाण बांधण्यासाठी कोणतं झाड निवडावं याचा विचार करतच मी माझ्या फार्म हाऊसवर परतलो.
माझ्या अपेक्षेप्रमाणे बिबट्याने त्या रात्री काजूच्या झाडाखालच्या गाढवाचा बळी घेतला. गाढवाचं अर्धं मांस खाऊन बिबट्या गेला होता, बळीची व्यवस्था पाहणार्यांनी गाढवाचे अवशेष गिधाडांपासून संरक्षण होण्यासाठी डहाळ्यांनी नीट झाकून ठेवले आणि मला वर्दी देण्यासाठी ते माझ्या कोठीवर आले.

दुपारचं जेवण लवकरच आटपून मी माझा कोट, टॉर्च, थर्मासमध्ये भरपूर चहा आणि बिस्कीटं घेऊन गावात गेलो. माचाणासाठी बाज आणि चार माणसांना घेऊन पाटील माझ्याबरोबर आला. माचाण बांधण्याचं आणि ते चारही बाजूंनी खुबीने लपवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. नरभक्षकाच्या बाबतीत तर ते जास्तच काळजीपूर्वक करावं लागतं. एखादी क्षुल्लक दिसणारी चूक पण त्यावरही यशापयश अवलंबून असतं. उलट्या बाजूला वळलेलं एखादंच पान, झाडावर जास्तं दिसणारी पानं, वेगळ्याच झाडाची पानं, चुकून दिसणारा माचाण सांधणारा दोर नरभक्षकाला संशय येण्यास पुरेसा असतो. मारून टाकलेल्या भक्ष्यावर परतणारा नरभक्षक कमालीचा सावध असतो.

माझ्या मनाप्रमाणे सगळी व्यवस्था झाल्याची मी खात्री केली. या सगळ्यात एकच थोडासा धोक्याचा भाग म्हणजे माझं माचाण जमिनीपासून फक्त दहा फूट उंचीवर होतं. ते का़जूचं झाड चढायलाही तसं सोपंच होतं. रात्रीतून मी परतलो नाही तर सकाळी लवकरच येण्याची सूचना मी गावकर्यांना दिली, मला माचाणावर सोडून ते गावात परतले तेंव्हा दुपारचे अडीच वाजले होते.

दुपारच्या रणरणत्या उन्हाने मी घामाघूम झालो. सूर्यास्तानंतर मला हायसं वाटलं. माझ्यासमोर पसरलेल्या म्हैसूरच्या पठारावर मला जालारपेटचं रेल्वे स्टेशन अगदी स्पष्ट दिसत होतं. दूरवर जंगलात आलेला एका मोराचा आवाज सोडला तर जंगल अगदी शांत होतं.

माझ्या समोरच्या पठारावर रात्रं चढू लागली, जालारपेटचा एकेक दिवा हळूहळू उजळू लागला. रेल्वे स्टेशनवरचे निळे निऑन साईन्स मला पाच मैलांवरुनही स्पष्ट दिसत होते. काही वेळाने इंजिनाच्या हेडलाईटचा अंधार चिरत जाणार प्रकाशझोत फेकत एक गाडी जालारपेट्च्या दिशेने येताना मला दिसली. स्टेशनच्या आधीचा चढ चढून ती स्टेशनवर विसावली.

जंगलात नेहमी सतावणार्या किटकांचा पत्ता नव्हता. रातकिड्यांची किरकिरही ऐकू येत नव्हती. मधूनच एखाद्या डासाला माझा शोध लागत होता. मग त्याला हाकलणं हे एक काम होऊन बसत होतं. वेळ जाता जात नव्हता आणि माझ्या रिकाम्या डोक्यात अशा वेळी हमखास येणारे नवनवीन शोध लावण्याचे विचार येत होते! मी अशा एका सायकलच्या शोधात मग्न होतो जी कमीतकमी मेहनतीत लांब अंतर काटू शकेल!

सायकलच्या शोधात मी बुडालेलो असतानाच मला गाढवाच्या दिशेने एक पुसटसा आवाज आला. बिबट्या भक्ष्यावर आला होता तर. बिबट्यावर आत्ताच बार टाकण्यात अर्थ नव्हता. त्याल भोजनाला सुरवात करु द्यावी आणि तो स्थिरावला की मग त्याला टिपावं असा मी विचार केला.

मी मांस फाडण्याचे, हाडांचे तुकडे पाडण्याचे आवाज ऐकायला आतूर झालो होतो. पण यापैकी कोणताही आवाज आला नाही. काहीतरी घोटाळा झाला होता खास ! कानांत प्राण आणून कोणतीही हालचाल न करता मी बसून राहीलो. नऊ वाजून गेले होते आणि माझ्या उजवीकडच्या खडकाआडून मला बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाच आला !

बिबट्याला माझा पत्ता लागला होता हे निश्चित ! त्याला माझा वास आला नसावा कारण वासाच्या बाबतीत चित्ता म्हणजे शुध्द नंदी ! मी कोणताही आवाज केला नव्हता त्यामुळे त्याला माझा आवाज गेला नसावा याबद्द्ल माझी खात्री होती. त्याने सहजपणे वर पाहीलं असावं आणि त्याच्या नजरेला माचाण पडलं असावं किंवा त्याच्या अंतर्मनाने त्याला सावध केलं असावं ! आजपर्यंत त्याला बळी पडलेल्या माणसांप्रमाणे झाडावरचा माणूस नसून हा माणूस त्याला अपाय करू शकतो ही धोक्याची सूचना त्याला मिळाली असावी !

कदाचीत हा बिबट्या नरभक्षक नसावा असा विचार माझ्या मनात आला, पण त्याची एकंदर वागणूक पाहता तो नरभक्षक असल्याची माझी पक्की खात्री पटली होती.

बिबट्याच्या डरकाळ्या सुरवातीला सूचनावजा स्वरात होत्या. हळूहळू तो स्वतःचं धैर्य वाढवीत होता. एका विशीष्ट वेळी मी बसलेल्या झाडावर हल्ला करून तो माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार होता हे निश्चीतच. तत्पूर्वी मला झाडावरुन पळवून जमिनीवर उतरवण्याचा तो प्रयत्न करत होता. बिबट्या माकडांच्या शिकारीसाठी ही युक्ती नेहमीच वापरतात. त्याच्या डरकाळ्यांची तीव्रता आता शिगेला पोहोचली होती. माझ्या अंदाजाप्रमाणे तो झाडावर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार या अपेक्षेने मी तयारीत बसलो होतो.

घशातून खोकल्यासारखा घुसमटल्यासारखा गुरगुराट करत अखेर त्याने झाडाच्या दिशेने मुसंडी मारली. तो झाडाच्या बुंध्याशी पोहोचत असतानाच मी बाजेवरुन पुढे झुकलो आणि माचाण लपवण्यासाठी लावलेल्या डहळ्या बा़जूला सारत रायफलची नळी खाली रोखली आणि टॉर्चचं बटण दाबलं. जमिनीपासून अवघ्या दहा फूट उंचीवरच माचाण असल्याने मला ही घाई करणं आवश्यंकच होत़ं अन्यथा क्षणार्धात तो माझ्यापर्यंत पोहोचला असता. दुर्दैवाने माचाणाची एक फांदी थेट वर चढू पाहणार्या चित्त्याच्या अंगावरच पडली. त्याला वर चढण्यापासून परावृत्त करण्यासाठी नाही पण क्षणभर थोपवण्यासाठी फांदीचा उपयोग झालाच, पण त्या फांदीच्या आडोशामुळे टॉर्चचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. मला माचाणावरुन हलणारी फांदीच फक्त दिसली.

त्यानंतर मी त्या रात्रीची दुसरी घोड्चूक केली. मूर्खपणाच ! बिबट्याला फांदीखालून बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ न देताच मी तो जिथे असेल अशी कल्पना केली होती तिथे नेम धरुन गोळी झाडली. गोळीच्या आवाजा पाठोपाठ चित्ता जमिनीवर पडल्याचा धप्पदिशी आवाज झाला. चित्ता गोळीला बळी पडला होता की काय ? क्षणभरच हा विचार माझ्या मनात आला क्षणभरच ! पण दुसर्‍याच क्षणी बाजूच्या झुडूपात झेप घेणार्या बिबट्याच्या देहावरचे पिवळसर ठिपके मला स्पष्ट दिसले. त्याचा जीव बचावण्यास कारणीभूत झालेल्या फांदीपासून सुटका करुन घेत बिबट्या पसार झाला होता! मला दुसरी गोळी चालवण्याची त्याने संधीच दिली नाही.

टॉर्चचा प्रखर झोत तो गेलेल्या दिशेकडे मी टाकला, पण त्याचं नखही दृष्टीस पडलं नाही किंवा पुसटसा आवाजही आला नाही, चोहीकडे नीरव शांतता पसरली होती. कदाचित बिबट्या झुडूपात शिरुन मरुन पडला असावा.. कदाचित जखमी झाला असावा.. कदाचित दूर निसटून गेला असावा. काहीच कळायला मार्ग नव्हता. काही वेळाने टॉर्च बंद करुन मी बिबट्याचा कानोसा घेत बसलो होतो. तासाभरात कोणताही आवाज आला नाही. तासाभराने तो ज्या दिशेला गेला होता त्या दिशेने मी एक गोळी झाडली. गोळीचा आवाज आणि टेकडीवरुन आलेला प्रतिध्वनी वातावरणात विरुन गेले. बिबट्याचा कसलाही आवाज आला नाही.

रात्री साडेअकरापर्यंत मी माचाणावर बसून होतो. मद्रास-कोचीन एक्सप्रेसच्या इंजिनाच्या शिट्टीचा आवाज आला आणि मी गावात परतण्याचा निर्णय घेतला. माचाणावर बसून रात्र घालवण्यापेक्षा कोठीत परतून निवांत झोप काढावी. बिबट्या रात्री परतण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. तो आसपास कोठे असलाच तरी माझ्या शेवटच्या गोळीच्या आवाजाने तो गुल झाला असणार याची पक्की खात्री मला होती, झाडावरुन उतरून टॉर्चच्या प्रकाशात मी गाव गाठलं. पाटील आणि उत्सुकतेने वाट पाहणार्‍या गावकर्‍यांना सगळी हकीकत सांगून मी माझ्या कोठीत येऊन गाढ झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी वीस गावकरी आणि अर्धा डझन गावठी कुत्री यांच्यासह मी पुन्हा त्या काजूच्या झाडापाशी परतलो. गाढवाच्या अवशेषांना कोणीही तोंड लावलं नव्हतं. जमिनीवर पडलेल्या खड्ड्याने मला माझ्या आदल्या रात्रीच्या गोळीचा परिणाम आ SS वासून दाखवला होता. आजूबाजूच्या खडकांवर अत्यंत कसोशीने शोध घेऊनही रक्ताचा एक थेंबही मला कुठे दिसला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता. माझा नेम साफ चुकला होता आणि बिबट्या सहीसलामत निसटला होता !

स्वतःवरच चरफडत-चिडत मी सर्वांसह गावात परतलो. माझी रजा संपल्यामुळे बंगलोरला परतण्यावाचून मला गत्यंतर नव्हतं. बिबट्याच्या पुढच्या हालचाली मला तारेने कळवण्यास मी पाटलाला बजावून सांगीतलं. कोठीतलं सगळं सामान आवरुन टेकडी उतरून जालारपेट स्टेशन गाठलं आणि मद्रास-बंगलोर एक्सप्रेसने रात्री मी बंगलोरला माझ्या घरी पोहोचलो.

येल्लागीरीच्या नरभक्षकाशी झालेल्या माझ्या सामन्याचा पहिला अध्याय अशा रितीने संपला.

पुढचे दोन महिने बिबट्याची काहीही बातमी आली नाही. पाटलाला पत्रं पाठवून मी चौकशी केली पण त्याच्याकडेही काहीच बातमी नव्हती. कदाचित बिबट्याने नरमांसभक्षण सोडलं असावं किंवा १५ मैलांवरच्या जावडी टेकड्यांच्या भागात मुक्काम हलवला असावा. अर्थात त्याने जावडी भागात नरबळी घेतले असते तर सरकारी वृत्तपत्रातून मला कळलंच असतं. त्या रात्रीची माझी गोळी वर्मी लागून बिबट्या दाट जंगलात जाऊन मेला तर नसेल ? अर्थात अशी शक्यता जवळजवळ नव्हतीच.

आणखीन अडीच महीने गेले आणि एक दिवस पाटलाची तार येऊन धड्कली. नरभक्षक पुन्हा प्रगटला होता आणि त्याने आणखीन एक बळी मिळवला होता. तार हातात पडल्यापासून दोन तासांत मी बाहेर पडलो आणि जालरपेटला जाणारी पहिली गाडी पकडली.

ही पॅसेंजर गाडी होती. जालारपेटला ती पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले होते. रात्री टेकडी चढून जाण्यात काहीच हशील नसल्याने स्टेशनवरच्या वेटींगरुम मध्ये विश्रांती घेण्याचा मी विचार केला. पण रात्रभर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांचे आवाज आणि डास-ढेकणांची संयुक्त फौज यामुळे झोप घेणं अशक्यं झालं. शेवटी प्लॅटफॉर्मवर चकरा मारत मी रात्र घालवली आणि पहाटे पाचच्या सुमाराला येल्लागीरीकडे प्रस्थान ठेवलं. पाटलाच्या घरी मी पोहोचलो तो साडेसात वाजले होते.

पाटलाने माझं आनंदाने स्वागत केलं आणि कॉफीचे घुटके घेताना बळीची हकीकत सांगीतली. तीन दिवसांपूर्वी पेरियामलई टेकडीच्या पूर्वेला पायथ्याशी असलेल्या झर्‍यावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणीची बिबट्याने शिकार केली होती. गावातल्या लोकांनी माग काढून तिचे अवशेष ताब्यात घेतले होते. तिच्या प्रेतावर ताव मारण्यास बिबट्याला फारसा वेळ मिळाला नव्हता.

याखेपेला माझ्यापाशी फक्त चार दिवस सुट्टी होती त्यामूळे आमीष म्हणून बोकड बांधून बसायचं मी ठरवलं. पाटलाने बोकडाची व्यवस्था करायचं कबूल केलं, मात्र ज्या वस्तीवरुन त्याने पूर्वी बोकड आणले होते त्या लोकांनी आता बोकडांची किंमत चांगलीच वाढवून मागीतली होती.

माझ्या कोठीवर जेवण आटपून आणि थोडी विश्रांती घेऊन मी गावात परतलो तरी बोकडाचा पत्ता नव्हता. अखेर दुपारी दोननंतर पाटलाचा माणूस एका काळ्या वयस्कर बोकडाला घेऊन आला. हा म्हातारा बोकड किती वेळ ओरडून बिबट्याला आकर्षित करेल याबद्द्ल शंकाच होती. बिबट्या-वाघ यांच्यासाठी आमीष बांधताना शक्यतो तपकीरी रंगाचा प्राणी बांधावा. वाघ-बिबट्याच्या नैसर्गिक भक्ष्याशी त्याचा रंग मिळताजुळता असल्याने ते लवकर भक्ष्यावर येतात असा माझा अनुभव आहे. काळा किंवा पांढरा प्राणी म्हणजे नरभक्षकाच्या संशयाला आमंत्रण. अर्थात आता माझा निरुपाय होता.

माचाण बांधायचं सामान आणि काही माणसं बरोबर घेऊन पाटलासह मी त्या बळी गेलेल्या तरुणीच्या वस्तीवर पोहोचलो. वस्तीपासून सुमारे पाऊण मैल अंतरावर बिबट्याने तिला उचललं होतं. पेरियामलई टेकडीच्या पायथ्याशी एक लहानसा ओढा पूर्व-पश्चिम वाहत होता. ओढ्याच्या दोन्ही तीरांवर लँटना आणि काटेरी झुडूपांचं रान माजलं होतं. या ओढ्याच्या मध्यावर पाणी साठवण्यासाठी गावकर्‍यांनी लहानसा खड्डा खणलेला होता. या खड्ड्यातून पाणी भरतांनाच बिबट्याने त्या तरूणीवर झडप घातली होती.

एखादा वाघ जेव्हा नरभक्षक होतो तेव्हा त्याच्या मनातली मनुष्यप्राण्याविषयीची भीती समूळ नष्ट होते, त्यामुळे भर दिवसाही माणसावर हल्ला करायला तो कचरत नाही. याउलट चित्ता किंवा बिबळ्या यांनी कितीही मानवी बळी घेतले तरी माणसाबद्दलची त्यांची नैसर्गीक भीती कधीच लोप पावत नाही, त्यामुळे त्यांच्या हालचाली शक्यतो रात्रीच होत असतात, येल्लागीरीचा नरभक्षक मात्र याला अपवाद असावा.

अर्थात अशीही एक शक्यता होती की त्या ओढ्याजवळ बिबट्या आधीच आराम करत पडलेला असावा आणि ती तरुणी पाणी भरण्यासाठी आल्यावर आयतीच त्याच्या तावडीत सापड्ली असावी. हा विचार मनांत येताच हातापायावर रांगत मी झुडूपात शिरलो आणि माझा तर्क अचूक असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. बिबट्याचं ते नेहमीचं लपण्याचं ठिकाण असावं. खाली पडलेल्या पाचोळयामुळे त्याच्या पायाचे ठसे मिळणं अशक्यं होतं, पण चित्त्याच्या शरिराला येणारा एक प्रकारचा उग्र गंध अद्यापही तिथे दरवळत होता. त्या झुडूपांत बेमालूमपणे दडून राहून पाण्यासाठी ओढ्यावर येणार्‍या कोणत्याही जनावरावर झडप घालणं बिबट्याला सहज शक्यं होतं. अर्ध्या मैलावर असलेल्या पेरियामलईच्या वरच्या खडकांमध्ये बिबट्याची गुहा असावी असा मी अंदाज केला.

माझी पुढची योजना मी लगेच आखली. एका खुंटाला बोकडाला बांधून त्याला ओढ्याच्या काठावर उभं करायचं. टेकडीवरुन पाहणार्‍या बिबट्याला बोकड पाण्यासाठी ओढ्यावर आल्याची खात्री पटणार होती, हाता-पायांवर रांगत मी त्या झुडूपात शिरलो आणि आरामशीर बैठक मारली. या योजनेत मला तसा कोणताही धोका नव्हता. टेकडीवरून बोकड दिसल्यावर बिबट्या निश्चितच त्याच्यावर हल्ला करणार होता आणि नेमका माझ्या तावडीत सापडणार होता. शिकार साधण्यासाठी आपण नेहमी वापरत असलेल्या सापळ्यात आपणच सापडू शकतो हे त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता नव्हती.

माझ्या रायफलच्या क्लॅम्पवर मी माझा नवीन टॉर्च नीट बसवून टाकला, नंतर मी किटलीभर चहा प्यायलो आणि पाटलाला बोकडाला खुंटाला बांधून गावात परतण्याची मी सूचना केली. ही सर्व तयारी चालू असताना आम्ही बोकडाला मुद्दाम लांबवरच ठेवलं होतं. त्या झुडूपाखाली मी दडलो आहे याची कल्पना बोकडाला आली असती तर त्याने तोंडातून एक आवाजही काढला नसता. बोकडाने आवाज काढून बिबट्याला आकर्षित करण्यातच माझ्या योजनेचं यश अवलंबून होतं.

पाटील आणि त्याची माणसं गावात परतली आणि मी त्या बोकडावर माझी पाळत सुरु केली. बोकडाने सुरवातीला थोडा ओरडा-आरडा केला, पण थोड्याच वेळात तो पार शांत होऊन गेला होता ! थोड्यावेळाने तो पुन्हा आवाज करेल आणि त्याच्या आवाजाच्या मागाने बिबट्या येईल अशी आशा धरुन मी बसलो होतो. बोकडाला मात्र त्याचं काही नव्हतं. आपले चारही पाय मुडपून तो आडवा झाला आणि सरळ झोपून गेला !

मला डासांनी हैराण केलं होतं. झुडुपाखाली अनेक प्रकारचे कीटक माझ्या अंगावरुन उड्या मारून जात होते. जंगलात आढळणार्‍या छोट्या उंदरांची मध्येच खुसफूस चालू होती. मध्येच माझ्या पायाला कसलातरी थंडगार स्पर्श झाला. तो साप होता. विषारी का बिनविषारी ते कळायला मार्ग नव्हता. मनातल्या मनात शांत झोपलेल्या बोकडाचा मला हेवा वाटत होता. मला मात्र एक क्षणभरही डोळे मिटणं शक्यचं नव्हतं. कोणताही आवाज न करता मी निश्चलपणे बसून होतो.

अखेर एकदाची ती प्रदीर्घ आणि कंटाळवाणी रात्र संपली. पूर्वेला तांबडं फुटायला सुरवात झाली आणि हात-पाय आखडत मी त्या लँटनाच्या झुडूपाखालून बाहेर आलो. रात्रभरात बिबट्याच काय दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचा मला आवाजसुध्दा ऐकू आला नव्हता. पाय मुडपून मजेत झोपलेल्या त्या बोकडाला मनोमन मी शिव्यांची लाखोली वाहीली. माझी चाहूल लागताच तो बोकड धडपडत उठला. हात-पाय ताणून त्याने झक्कपैकी आळस दिला, छोटीशी शेपटी हलवली आणि प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिलं. जणू तो मला विचारत होता,

" बळीचा बकरा म्हणून तू मला इथे बांधून ठेवलंस खरं, पण बकरा कोणाचा झाला ? माझा ? की तुझा ? "

मी अर्थातच त्याला उत्तर देण्याचं टाळलं.

गावात परतून मी बो़कडाला पाटलाच्या ताब्यात दिलं आणि विश्रांती घेण्यासाठी माझ्या कोठीवर गेलो. त्या रात्री दुसरा बोकड बांधून त्या ओढ्याकाठच्या झुडूपात छपून बसायचं मी आधीच ठरवलं होतं. बिछान्यावर अंग टाकताच मला गाढ झोप लागली.

दुपारी बारानंतर मला जाग आली. सामन माशाचा डबा फोडून मी त्यावर ताव मारला आणि चहासाठी पाणी उकळत ठेवलं. पोटभर चहा पिऊन झाल्यावर किटलीभर चहा मी बाटलीत भरुन घेतला. रात्र तशी उबदारच असल्याने कोटाची जरुर नव्हती, गावात परतून मी पाटलाची गाठ घेतली आणि बोकडाची निवड करायला निघालो. मनाजोगता बोकड निवडल्यावर बरीच घासाघीस करुन सौदा पटवला आणि दुपारी चारच्या सुमाराला आम्ही बोकडासह ओढ्यापाशी पोहोचलो. माझी सर्व सिध्दता झाली आणि बोकडाला खुंटाला बांधून पाच वाजण्याच्या सुमाराला पाटील गावकर्‍यांसह परतला.

पाटील आणि गावकरी दिसेनासे होतात तोच बोकडाने जोरदार आवाजात ओरडायला सुरवात केली. तो इतक्या जोराने ओरडत होता की त्याची निवड केल्याबद्दल मी स्वतःलाच मनोमन शाबासकी दिली.

चारही बाजूला अंधाराचं साम्राज्यं पसरलेलं होतं. बोकडबुवा अद्यापही मोठयाने ओरडतच होते ! आता कोणत्याही क्षणी मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो बिबट्या येण्याची शक्यता होती. अशातच अजून तासभर गेला आणि मला पायाखाली काटकी मोडल्याचा आणि अंगाला पानं घासल्याचा अगदी हलकासा आवाज ऐकू आला ! बिबट्या येत होता तर ! ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो येऊन ठेपला होता. पूर्वीच्या अनुभवावरुन मला टॉर्चचा उपयोग फार काळजीपूर्वक करावा लागणार होता. बिबट्या पूर्णपणे दृष्टीक्षेपात येण्यापूर्वी टॉर्च चालू केला असता तर बिबट्या पसार झाला असता. मला क्षणभराचा उशीर झाला असता तर त्याने माझ्यावर निश्चितच हल्ला केला असता किंवा पुन्हा सूंबाल्या केल्या असत्या.

पूर्ण सावध होऊन मी बिबट्याच्या हालचालींचा कानोसा घेत होतो. त्याच्या हालचालीचा पुसटसाही आवाज येत नव्हता. काही क्षण गेले आणि हलकेच हिस्स.. असा आवाज आला ! डरकाळी फोडण्यापूर्वी त्याच्या ओठांची जी हालचाल झाली त्याचा तो आवाज होता ! बिबट्याने मला पाहिलं होतं यात शंकाच नव्हती. नाऊ ऑर नेव्हर !

माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याने मी टॉर्चचं बटण दाबलं. अंधार चिरत त्याचा प्रखर प्रकाशझोत पडला तो थेट बिबट्याच्या लालसर डोळ्यांवरच ! माझ्यापासून दहाएक फूट अंतरावर होता तो. टॉर्चच्या प्रकाशात त्याचं तोंड आणि छाती मला स्पष्ट दिसली. त्याच्या गळयावर नेम धरून मी गोळी झाडली. तो एक पाऊल पुढे आला आणि मागच्या दोन्ही पायांवर उभा राहिला. माझ्या विंचेस्टर रायफलच्या दुसर्‍या गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. छातीत गोळी बसताच तो मागच्या मागे कोसळला आणि झुडूपात दिसेनासा झाला. काही क्षण त्याचे विव्हळण्याचे आणि घशात लागलेल्या घरघरीचे आवाज आले आणि मग सर्वत्र शांतता पसरली.

मी झुडूपात द्डून अर्धा तास बिबट्याची हालचाल टिपण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर मी झुडूपातून बाहेर पडण्याच निर्णय घेतला. लोड केलेली रायफल हातात धरुन कोणत्याही क्षणी गोळी झाडण्याच्या तयारीने मी झुडूपातून बाहेर पडलो. बिबट्या मेला असावा याची मला पक्की खात्री होती. बोकडाला सोडून बरोबर न्यावं असा विचार माझ्या मनात आला, पण तसं करण्याचं मी विचारपूर्वक टाळलं. न जाणो हा बिबट्या सामान्य बिबट्या असून नरभक्षक मोकळाच असला तर ? पाटलाच्या गावाकडे परतताना मला खूपच सावधानता बाळगावी लागणार होती. अशा परिस्थीतीत बोकडाला बरोबर नेणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं होतं. त्याला तसाच ओढ्याकाठी सोडून सावधपणे मार्गक्रमणा करत मी गावात पोहोचलो. पाटील आणि गावकरी जागेच होते. त्यांना सगळी कथा सांगून मी रात्रीच्या निवांत झोपेसाठी माझी कोठी गाठली.

दुसर्‍या दिवशी सकाळी पाटील आणि काही गावकर्‍यांसह मी परत ओढा गाठला, बिबट्याला मी जिथे गोळी घातली होती तिथेच तो मरुन पडला होता. आम्ही त्याची पूर्ण तपासणी केली. तो एक वयस्कर म्हातारा नर होता. त्याचा रंग फिकट झालेला होता. दात झिजलेले होते. नखं चिरलेली होती. ही सगळी नरभक्षकाचीच लक्षणं. अर्थात येणारा काळच मी मारलेला बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे ठरवणार होता.

दुपारनंतर मी त्याचं कातडं सोडंवलं आणि बंगलोरला परतण्यासाठी टेकडी उतरून जालारपेट गाठलं.

या घटनेला आता बरीच वर्षं उलटून गेली आहेत. येल्लागीरी किंवा जावडी टेकड्यांच्या परिसरात त्यानंतर मानवी बळी गेल्याची कोणतीही नोंद नाही. त्या रात्री माझ्या रायफलच्या गोळ्यांना बळी पडलेला बिबट्या हाच येल्लागीरीचा नरभक्षक होता हे मी आता खात्रीपूर्वक सांगू शकतो !

(मूळ कथा : केनेथ अँडरसन )

समाप्त

कथा

प्रतिक्रिया

इरसाल's picture

19 Apr 2014 - 9:12 am | इरसाल

आवडले.
पुढील कथा कोणती असेल ? पुलेशु.

अमोल मेंढे's picture

19 Apr 2014 - 12:55 pm | अमोल मेंढे

आवड्ली...आणखी येऊ द्या..

अजया's picture

19 Apr 2014 - 9:29 pm | अजया

मस्त !

सुहास झेले's picture

20 Apr 2014 - 7:10 am | सुहास झेले

मस्त :)

शेवट्पर्यंत अगदी खिळवुन ठेवलं या कथेने.
भारीच!

किसन शिंदे's picture

20 Apr 2014 - 1:43 pm | किसन शिंदे

येस्स! शेवटपर्यंत अगदी खिळवून ठेवलं या नरभक्षक बिबट्याने! दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले.

जोशी 'ले''s picture

20 Apr 2014 - 8:25 am | जोशी 'ले'

मस्त..

खटपट्या's picture

20 Apr 2014 - 12:53 pm | खटपट्या

मस्त !!!
टोड म्हणजे काय ?

स्पार्टाकस's picture

29 Apr 2014 - 12:20 pm | स्पार्टाकस

टोड हा बेडकाच्या कुळातला त्याच्यापेक्षा बराचसा थोराड असणारा एक भाऊबंद..!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2014 - 2:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली.

अश्याच आशयाची एक मराठी कादंबरी पण वाचली होती. नाव बहुतेक राणीमा होतं. राणीमा, एक निष्णात शिकारी एडवर्ड. नरभक्षकाची शिकार करायला आलेला शिकारी चक्क राणीमाच्या नवर्‍याच्या खुनाचा शोध लावतो. नंतर राणीमा आणि एडवर्ड् प्रेमात पडतात. कोणाला नावं आठवत असेल तर कृपया सांगा.

शुभां म.'s picture

21 Apr 2014 - 8:16 pm | शुभां म.

अप्रतिम......................

प्रभो's picture

22 Apr 2014 - 12:00 am | प्रभो

भारी!!