रोजच्यासारखंच मुलांना बालमंदिरात सोपवून आम्ही मैत्रिणी घरी निघालो. सकाळच्या धावपळीनंतर हे मैत्रिणींसोबत गप्पा करत, हसत-खिदळत घरची वाट चालणं म्हणजे सगळा शीण घालवून उत्साहाची ओंजळ भरून घेणं असायचं. त्या दिवशीच्या गप्पांत विषय दिवाळीचा होता. सण तोंडावर आलेला. सुटीचे बेत, सणाची खरेदी. एकेकीचा उत्साहा उतू चालला होता. त्यातच एकजण हसत सांगू लागली, काल मी यांना विचारलं, 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' तिच्या हसण्याला इतरांनीही साथ दिली. मला मात्र त्या क्रूर विनोदाचं हसू आलं नाही. तिच्यावर झालेल्या त्या वाराने माझंच मन विध्द झालं, पार विस्कटलं. त्या गप्पांमधून मी एकाएकी बाजूला पडले.
दिवसभर मला त्याच घटनेने वेढून टाकलं होतं. तिच्या नवऱ्याचं ते अचाट, आचरट बोलणं, तिचं त्यावरचं लाचार हसणं, तो 'विनोद' मान्य करून स्वीकारणं आणि पुन्हा तो मैत्रिणींच्यात सांगणं, सगळंच अनाकलनीय अन् अस्वस्थ करून टाकणारं होतं. तिच्या नवऱ्याच्या कृतघ्नपणाचा संताप येत होता; तिच्या मूर्खपणाचाही येत होता. तेवढाच त्या दोघांच्या आणि तसल्याच सगळया मेल्या मनाच्या माणसांचा आणि ते तसलं बुध्दीहीन आंधळं जिणं जगणाऱ्यांना संताप येत होता. मन आणि बुध्दी हे आपल्या आणि इतरांच्याही अस्तित्वाचे महत्त्वाचे अंश आहेत हे त्यांना अखेर समजणार तरी कधी?
'ती' बिचारी आता कुठे असेल? तिचं आयुष्य ती कशी जगत असेल? कोण जाणे! मला मात्र ओवाळण्याचा विषय निघाला की अनिवारपणे 'तिची' आठवण होते. तिच्या काळजातली ती जखम कदाचित भरूनही निघाली असेल; पण माझ्या उरात तो सल अजूनही तेवढयाच तीव्रतेने ठसठसत आहे. खरंच, का वागतो आपण असे? आनंदाचे, उल्हासाचे क्षण वेचण्यासाठी सण-उत्सव निर्माण केले गेले. त्या साऱ्या उत्सवांतलं, चालीरीतीतलं सौंदर्य असं कालाच्या प्रवाहात वाहून जायलाच हवं का? त्यांची कशाचीच काहीच जाण का नसावी आपल्याला? सणाचा मुहूर्त साधून पुन: पुन्हा प्रेमाची ग्वाही देण्याचा आनंद आपण का लुटू शकत नाही? प्रथांच्या मागचे संकेत न जाणता त्यांचा बाजारू व्यवहार का करून टाकतो आपण? जीवनाच्या निर्मळ प्रवाहात मनातलं किल्मिष कालवून तो गढूळ का करतो आपण? आणि पुन्हा त्यात दगड टाकून चिखलही उडवतो! त्यावेळी त्या डागांनी इतरांबरोबर आपणही कलंकित होतोय् हे खरंच का समजत नाही आपल्याला?
'ओवाळणं, औक्षण करणं' ही अशीच एक सुंदर प्रथा. एखाद्यासाठी शुभचिंतन करणं हा उद्देश; मग तो पति, बंधू, पिता, पुत्र असे काही जवळिकीचे नाते सांगणारा असेल किंवा पराक्रम गाजवणारा एखादा वीर असेल. त्याला सुयश, कीर्ती, आयुरारोग्य चिंतणे याचे ते एक प्रतीक. भाळावर कुंकमतिलक लावणे, मस्तकी अक्षता टाकणे, सुवर्णाचा स्पर्श करणे अन् दीपज्योतींनी ओवाळणे हा सारा सोपस्कार कौतुकाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भाग्याचा! औक्षण करणारी स्त्री त्याचा आनंद घेत असते तसा औक्षण करून घेणारासुध्दा त्या साऱ्या कौतुकाचा, आनंदाचा धनी होत असतोच. असा हा आनंदसोहळा, प्रेमानुभव!
तिथे 'ओवाळणी देण्याची प्रथा कशी आली? 'शुभचिंतन केल्याबद्दल', आभार मानायचे प्रतीक म्हणून? पण असे लगेच 'आभार' मानून टाकण्याची ही प्रथा आपली नाही. शुभचिंतनाबद्दल आभार हे तर अतीच झालं. शुभचिंतन केलं जातं ते आभाराच्या अपेक्षेने नव्हे, मोबदल्याच्या तर कधीच नाही. शुभचिंतन हा मनात सदैव दरवळत राहणारा भावगंध, विशेष प्रसंगी तो विशेष रितीने प्रकट केला जातो इतकंच. एरवी घरीदारी राबणाऱ्या आपल्या जिवलगासाठी झिजत राहणाऱ्या स्त्रीला तिच्या आवडीची एखादी भेट द्यावी असं वाटणं ही मधुरभावाची खूणच. प्रेमाच्या व्यक्तीची एखादी हौस पुरवल्यावर तिच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद, कृतज्ञता, आपल्या मनातली आस कोणीतरी जाणली म्हणून तिचं हरखून जाणं हे सगळंच अनुभवण्यासारखं असतं. सणा-समारंभाच्या आनंदोल्हासात त्याने भरच पडते हेही खरं. पण...
ज्या कोण्या क्षणी या प्रेमाच्या अभिव्यक्तीची सांगण 'औक्षण' या कृतीशी घातली गेली त्या क्षणीच त्यातलं हे सौंदर्य हरपायला सुरुवात झाली असावी. कोणत्याही नात्यात, प्रेमात देणं-घेणं हे घडतच असतं. घडायला हवंही असतं. जोवर हे देणं-घेणं अमूर्त भावनेचं असतं, तोवर त्यात अलौकिक अशी कोवळिक असते, माधुर्य असतं. प्रेमाची अमूर्त भावना जेव्हा मूर्त देणगीच्या रुपाने व्यक्त होते, जेव्हा ती 'देण्या'ची ऊर्मि अगदी आतून उमललेली असते तेव्हाही ती आपलं अंगभूत माधुर्य सांभाळून असते. मात्र जेव्हा तिची 'प्रथा' होते, एखाद्या कृतीशी ती निगडित केली जाते तेव्हा ती अनिवार्य होऊन बसते. अशावेळी त्यातला तो भावगंध हरवतो, सारं माधुर्य, सारी उत्स्फूर्तता, सहजता कोळपून जाते. मग तो एक जुलमाचा रामराम होऊन बसतो. सहजच मनात येईल तेव्हा, पाहिल्याबरोबर मनात भरलेली, प्रेमाच्या व्यक्तीला आवडेल अशी वस्तू कारणा-प्रसंगाशिवायच दिली जाते तेव्हा तोच एक प्रेमाचा उत्सव असतो. पण तीच अनिवार्य प्रथा झाली की ते सहज देणेही 'ओवाळण्याच्या मुहूर्तापर्यंत' लांबणीवर टाकले जाते. मग तो सारा कुरूप असा उपचार, एक व्यापार-व्यवहार होऊन बसतो. देणे हे 'टाकणे' 'निस्तरणे' होऊन जाते. तर स्वीकारणे हे 'काढणे', 'लुबाडणे' होऊन जाते. प्रेमाच्या देण्याचा 'भार' होणे, याहून दु:खाची, असहय अन् कुरूप गोष्ट जगात कोणती असेल? अन् असली कुरूप गोष्टही मान्य केली जाते, नाईलाजाने का होईना, ही एक गंमत म्हणून स्वीकारली जाते, नाईलाजाने का होईना, ती एक गंमत म्हणून स्वीकारली जाते आणि पुन्हा मैत्रिणींना सांगितली जाते - हसत हसत हे काय आश्चर्य आहे?
माणसं इतकी बधिर, गूढ होऊ शकतात? इतकी मेल्या मनाने का जगत असतील ती? एक सुखवस्तू, घरासाठी, सुरक्षित असण्यासाठी केलेली ती तडजोड असते का? तथाकथित प्रतिष्ठित जीवनासाठी ते सहन केलं जातं का? समाजात आदर्श मिरवण्यासाठी ते दिखाऊ नातं जपलं जातं का? कुटुंबवत्सलतेचं हे नाटक दोन्हींकडून असंच वटवलं जातं का? दुर्दैवाने या साऱ्या प्रश्नांची उत्तरे बऱ्याच अंशी होकारार्थी येतात. या सर्वच कारणांसाठी माणसं तडजोड करून राहतात; जीवनातल्या जिवंतपणाशी, रसरशीतपणाशी, मनाच्या निर्मल आनंदाशी अकृत्रिम प्रेमभावनेशी, खरं म्हणजे एकूणच अस्तित्वाशी! अस्तित्वाशी केलेली तडजोड तीही अस्तित्वासाठीच!! जीवनातली ही विसंगती माणसं सहजपणे मान्य करतात. निष्प्रेम जीवनावर व्यर्थ प्रथांची झूल पांघरून ते सजवत राहतात. अखेर निष्प्रेम जीवन हे असंच 'साजरं' करावं लागतं ना?
वस्तुत: प्रेम ही किती नैसर्गिक, सहज, अकृत्रिम भावना आहे. ती खरोखरच तशी असेल तर ती लपूनही राहात नाही. तो भावगंध अनिवारपणे आसमंतात दरवळत राहतो. ते अकृत्रिम, सहजोद्भव प्रेम तसेच सहजतेने बहरते तेव्हा जीवन समृध्द करत जाते. त्या प्रेमाचे ते झिरपत राहून हृदयात मुरणे हेच त्या आत्म्याची तहान भागवत असते. त्याची अभिव्यक्तीपण तशीच सहज असायला हवी. त्यासाठी सण-वार, वेळ-प्रसंग, भेटवस्तू हे उपचार आवश्यक असतात का? सहजपणे केलेली एखादी कृती, एखादा कटाक्ष, एखादा शुब्दसुध्दा ते सारं काही व्यक्त करू शकतात. येवढंच की प्रेमाच्या या वेलीला अशा 'खत-पाण्याची' फार फार आस असते. पण स्त्री-पुरुषांच्या सहजप्रवृत्तीच किती भिन्न असतात!
स्त्रियांचं मन हे अंगणातल्या फुल-झाडासारखं असतं. थोडासाही प्रेमाचा ओलावा मिळताच ते फुलून येतं, सर्वतोपरी प्रेमाने बहरून जातं; तेवढंच जरा दुर्लक्ष झालं की लगेच कोमेजतंही. तर बहुतांश पुरुषाचं मन हे वळवाच्या पावसासारखं असतं. वळवाच्या मेघांसारखं लहर लागेल तेव्हा ते धो धो बरसतं, नाहीतर कोरडयाखंक भुरटया ढगांसारखं वाऱ्यावर भरकटत राहातं. त्या धो धो बरसण्याच्या स्मृतीवर धरतीने तगावं, हिरवाई धरून ठेवावी, नाहीतर...! 'ती तिची समस्या आहे, मी आहे हा असा आहे. रोजरोज काय सांगायचं असतं.' 'तू मला फार फार हवीशी वाटतेस.' म्हणून? हँ:! काहीतरीच!' ...असतं खरं असं!
... कोणत्याही प्रकारे का होईना प्रेम हे जोपासावं लागतं, येवढं खरं.नाहीतर ते असंतुष्ट, विटलेलं निष्प्रेम जीवन जगताना मनातल्या त्या वेदनेला कळत-नकळत, गमतीत म्हणून मैत्रिणींजवळ वाट करून देणारी 'ती अतृप्त राहून वैफल्यग्रस्त होऊन घरात चिडचीड करत राहते. भांडयांची आदळआपट करते. मुलांना उगीचच धपाटे घालते, नाना प्रकारांनी त्रागा करत राहते. प्रेमाने फुलून येणे विसरून जाते अन् 'कर्कशा' होऊन बसते. आणि तरीही...
- मनात, खोल खोल मनात, प्रतीक्षा करत राहते, पुढच्या वेळच्या प्रेमाच्या ओवाळणीची! तृप्ततेत नाहून निघण्याची! ज्याच्यावरून जीव ओवाळून टाकावा अशा दोन शब्दांची!
प्रतिक्रिया
9 Apr 2014 - 4:52 pm | शुचि
अतिशय संवेदनशील लिखाण.
पण खरं सांगायचं तर ते "लाथ वगैरे घालणं" रांगडेपणाने बोलणं ती मैत्रिण ओळखूनही असेल कदाचित. त्या दोघांनी इतकी सुख-दु:ख वाटून घेतली असतील, एकमेकांची इतकी ओळख असेल की त्याचं ते रांगडं उत्तर तिने मनाला लावूनही घेतलं नसेल. लाचारच झाली असेल कशावरून? कशावरून तिला त्याने पापणीवर ठेवले नसेल? बरेचदा आपण एका हिमनगाच्या टोकावरून अंदाज बांधत असतो पण वस्तूस्थिती काही वेगळॆहॆ असू शकते.
पण तुमच्या संवेदनशीलतेला मात्र सलाम!!!
9 Apr 2014 - 4:59 pm | अनुप ढेरे
चेष्टेमध्ये असं बोलण्यात काय प्राब्लेम आहे? मित्रामित्रांमध्येही बोलतात असं. लाथ घालीन, फटकावीन आणि अजूनही बरच काही. त्याचा एवढा बाऊ काय करायचा?
9 Apr 2014 - 4:56 pm | पैसा
बहुतेक गोष्टींशी सहमत आहे. मात्र बहुतेकवेळा हे असं स्त्रियाच स्वतःला कमी लेखतात आणि आपली अशी अवस्था करून घेतात असं पहायला मिळतं. स्त्री ही माणूस आहे हे तिने स्वतः आधी स्वीकारायला पाहिजे. मग सगळं आपोआप व्यवस्थित जागेवर जाईल.
11 Apr 2014 - 2:09 pm | नाखु
लाख वेळा सहमत. स्त्री ही माणूस आहे हे तिने स्वतः आधी स्वीकारायला पाहिजे ही तर स्वत्वाची पहीली पायरी.
दुसरा सोपान म्हणजे ती सोडून ईतर स्त्री सुद्धा माणूस आहे हे तिने मनापासून स्वीकारायला पाहिजे.
नात्यांचा गुंता ईतका किचकट की सख्खा "ना याचा ना त्याचा" या नात्यातच घुसमटतो.
9 Apr 2014 - 4:56 pm | दिपक.कुवेत
आवडलं आणि भावलं.
9 Apr 2014 - 5:08 pm | आदूबाळ
गँग्ज ऑफ वासेपूर हा चित्रपट (विशेषतः त्यातला "बाजार में हमरी नाक ना कटवाना" हा शीण) पहावा असे सुचवतो.
9 Apr 2014 - 5:23 pm | थॉर माणूस
>>> 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!'
एक पाणचट विनोदाचा प्रयत्न होता... त्याच्या बायकोला कळला, तिला वाटलं तुम्हाला पण कळेल म्हणून तिने तुम्हाला सांगितला. तो तुमच्यापर्यंत पोचला नाही, इतकंच असावं बहुतेक.
हे असले विनोदाचे प्रयत्न जोडीदारांमधे कित्येकदा होत असतात, आणि पुरूषांकडूनच होतात असे नव्हे (फक्त स्त्रीयांकडून केल्या जाणार्या विनोदाचा साचा थोडा वेगळा इतकंच). असे विनोद होणं किंवा ते गंभीरपणे न घेणं ही नात्यातला खुला संवाद यशस्वी होण्याची शक्यता वाढवते असं माझं मत आहे. नाहीतर आपण एक वाक्य बोललो तर त्याचं एवढं काही होतं हे कळल्यावर संवादच खुंटायचा.
लिखाणातला ओवाळणीवरचा विचार आणि रोख मात्र बर्यापैकी पटला. (लेखाच्या ट्रीगरबद्दल शंका असली तरीही)
ह्या असल्या पीजे मुळे तुम्ही असं काही लिखाण लिहीत असाल तर तीच्याकडून रोज एक पीजे ऐकत जा. तेवढाच आम्हा वाचकांचा फायदा. :)
9 Apr 2014 - 5:35 pm | शुचि
खरं आहे. असे विनोद एकमेकांत तर चालतात. आता मी एकदा तावातावाने "बार्बी कल्चर" विरुद्ध मुलीशी बोलत होते अन नवरा छद्मी हसत अन मला नखशिखान्त न्याहाळत म्हणाला "आपल्याकडे नाही ग ते कल्चर ;) " मला कळेचना हसावे की रडावे. :D कितीही लागला तरी मला त्याच्याविनोदबुद्धीचे कौतुकाच वाटले. असो, :)
9 Apr 2014 - 5:47 pm | मीराताई
हा प्रसंग ३५ वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळची जोडपी असे विनोद करत नसत. तसेही हे सांगताना त्या मैत्रीणीच्या डोळ्यात दु:ख डोकावतच होते. हे विचार केवळ एका प्रसंगावरुन लिहिले नसून अनेक वर्षांतून अनेक माणसांच्या वर्तनातून घेतलेल्या अनुभवाचा परिपाक आहे.
प्रतिक्रियांबद्दल आभार.
9 Apr 2014 - 9:33 pm | संजय क्षीरसागर
आणि इतकी जुनी घटना आजच्या परिप्रेक्षात सर्वस्वी गैरलागू आहे. स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत आणि कोणताही सूज्ञ पती अशा ओवाळणीची भाषा करणार नाही. त्यामुळे लेख `निष्कारण संवेदनाशील' वाटला.
पण पुढे तुम्ही अशीही पुस्ती जोडली आहे :
तुम्ही बहुदा ३५ वर्षापूर्वीच्या घटनेतून निर्माण झालेल्या दृष्टीकोनातून आजतागायत जगाचा अनुभव घेत राहिलात त्यामुळे असं झालं असावं.
10 Apr 2014 - 6:00 am | आत्मशून्य
हैट्स ऑफ़ सर. काय बोललात ? काय सांगता ? दया टाळि
13 Apr 2014 - 11:55 am | दादा कोंडके
सहमत. कैच्याकै लिहलंय.
9 Apr 2014 - 10:28 pm | शुचि
विनोदांवरुन आठवलं. अमेरीकेत सामान्य लोकही बागेत्/घरावर अमेरीकेचा ध्वज फडकावतात. एकदा रपेटीला गेलेले असताना, मारे गंभीर चेहेरा करत मी नवर्याला विचारलं "काय रे अमेरीकेत झेंड्याचं तोंड (= फडकणं) कोणत्या बाजूला ठेवतात ..... घराच्या की घराच्या विरुद्ध?
.
.
.
तो म्हणाला "हा काय प्रश्न झाला? जिकडे वारा वाहणार तिकडे फडकणार ना झेंडा" =)) :D
झालं नंतर आठवडाभर नणंद/सासू सगळ्यांपुढे "सरदारजीपणाबद्दल" मान खाली घालावी लागली होती.
10 Apr 2014 - 6:07 am | स्पंदना
औक्षणाबद्दलचे विचार आवडले.
त्यात ओवाळणी येउन त्याचे झालेले देवाणघेवाण रुप सुद्धा उमजले.
लात्/लाथ या शब्दाबद्दल अतिशय घृणा आहे. त्यामुळे त्याबद्दल टिप्पणी टाळते आहे.
11 Apr 2014 - 7:45 pm | कानडाऊ योगेशु
नवरा बायको दोघांचेही सूर जुळाले तर दोघांमध्येही एक छान Genderless म्हणता येईल तसे नाते तयार होते.
त्यावेळी हॉट दिसणार्या एखाद्या तरूणीला पाहुन नवर्याऐवजी बायको कडुनच एरव्ही नवर्याने केली असती अशी कॉमेंट पास होते व ड्रायव्हींग करताना समोर एखाद्याने त्याचे वाहन घातले तर एखादी कचकचीत शिवीही नवर्याआधी बायकोकडुन घातली जाते.
कदाचित बैलपोळ्याच्या दिवशी तिने त्याला उद्देशुन "पुरुणपोळी खा रे बैला" असाही पाणचट जोक केला असू शकतो.
11 Apr 2014 - 8:15 pm | संजय क्षीरसागर
`गोड पापा' असा जवाब देणारा पती देखिल असू शकतो!
11 Apr 2014 - 7:49 pm | कानडाऊ योगेशु
बहुदा पु.लंच्या बाबतीतच हा जोक सांगितला जातो.
पु.लं ना त्यांच्या कोणी स्नेह्यांने विचारले कि का हो तुम्हा दोघांचा दिवस तर अगदी हसत खेळत जात असेल ना?.तेव्हा पुल उत्तरले कि हो..स्वयंपाकघरातुन ही मला दिवसभर भांडी फेकुन मारते..तिचा नेम चुकला तर मी हसतो आणि नाही चुकला तर ती हसते.....!
12 Apr 2014 - 4:43 pm | आत्मशून्य
किती दिवस ही दिशाभुल सहन करायची हे ब्रम्हदेवही बहुदा जाणत नसावा.