साक्षात्कार वगैरे मला कधीच होत नव्हते पण गेल्या शुक्रवारी आमच्या एचआर डिपार्ट्मेंटनी एका एक दिवसीय झंझावाती कार्यशाळेला मला पाठवल्यानंतर हे असं काहीतरी मला व्हायला लागलं आहे.
आयुष्यात शिकायचं थांबू नका-आयुष्य तुम्हाला रोज काहीतरी शिकवत राहील असं काहीतरी एक मुलायम कोमलांगी सांगत होती.
आता खरं सांगायचं तर हे दिवस काही शिकण्याचे आहेत यावरून विश्वास उडलेल्या लोकांसाठी ही कार्यशाळा होती, म्हणजे आमच्या कंपनीने "पुढील शिक्षणास निकामी" असा शेरा मारलेल्या लोकांचा एक जथ्था या कार्यशाळेला पाठवला होता.
"अ वन डे मॅरॅथॉन इन्स्पीरेशनल कोर्स फॉर लोअर मिडल मॅनेजमेंट सिनीअर्स " चे हे खूळ आमच्या कंपनीत सध्या बोकाळलं आहे.आमच्या कंपनीत या खूळाला बेबीज डे आउट म्हणतात
माझ्या शेजारी बसलेले गुप्ते पुढच्या आठवड्यात सेवा निवृत्त होणार्यांच्या यादीतलेहोते.ह्यालाच म्हणतात एचआर. त्यांच्या डाव्या हातानी घेतलेला निर्णय उजव्या हाताला कळत नाही.
समोर येणारा प्रत्येक क्षण हा एक लर्नींग कर्व्ह आहे हे मात्र त्या मुलायम कोमलांगीकडे बघून सगळ्यांनाच पटलं.
पन्नाशीनंतरचे प्रत्येक वर्षं नुकत्याच विसर्जीत झालेल्या पंधराव्या लोकसभेसारखं आहे असा साक्षात्कार मला त्याच दिवशी झाला.आपलं नशिब मिराकुमार सारखं एका उंच खुर्चीवर बसून फक्त हसतंच आहे असं काहीसं फिलींग आताशा रोज येतं.जड जड वाटायला लागतं.
संध्याकाळी जेवणानंतर "बरं वाटतंय आता" असं बायकोला सांगायला जावं तर ती फणकारून म्हणते,"उग्गाचच चिडचिड करता. ... तुम्हाला भूक लागलेली कळत नाही आजकाल " वगैरे म्हणते.
पन्नाशीनंतरच्या नविन शैक्षणीक वळणाचे हे ताजे अनुभव.
*********************************************************************************************
चिरंजीव इंजीनीअरींगच्या सहाव्या वर्षाला आहेत.
सिक्स इअर्स इंटीग्रेटेड ग्रॅज्युएशन कोर्स .दोन फुल केटीसकट.
सकाळी आठ वाजता आंघोळ करून नखशिखांत कपडे घालून त्यांचे दर्शन मला विस्मयकारी वाटले.
एरवी त्यांना या वेळेत त्यांच्या झोपेत आलेला व्यत्यय जरा पण खपत नाही.
अशा वेळी त्यांना ऊठवणार्याचा ते जो अपमान करतात तो त्यांची आईच फक्त सहन करू शकते.
(डु नॉट डिस्टर्ब. यु विल बी इन्सल्टेड.)
छातीच्या डाव्या बाजूला (त्यांच्या) उजवा हात ठेवून ते मला म्हणाले ,
"बाबा प्रणाम "
माझा चश्मा नाकाच्या शेंड्यावरून गळून खाली पडला. तो उचलून मी परत जागच्याजागी लावेपर्यंत ते मला म्हणाले,
"बाबा, मी निर्णय घेतला आहे ...
त्यांच्या आवाजातला ठाम निर्धार मला जाणवून मी प्रतिक्षिप्त प्रश्न विचारला ,
"चेक चालेल का ?"
यावर त्यांनी मंदसे स्मित केले.
"नाही, बाबा आता मला पैशाची गरज नाही."(मला उगाचच " मॉ, मैने बीए पास किया है " आठवलं.)
पण एखाद्या जबाबदार पित्यासारखं मी त्याला विचारलं ,
"अरे, कॉल सेंटरच्या नोकरीची घाई करू नकोस .आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर."
नंतर कॉल सेंटरचीच नोकरी मिळणार आहे असं मला म्हणायचं होतं पण सत्य परीस्थितीची जाणीव करून देणे हा त्यांचा अपमान झाला असता.
या वाक्यावर ते पुन्हा एकदा मंद हास्य करीतसे होऊन मला म्हणाले .
"बाबा, मी आता सोशल एंजीनीअर होणार आहे."
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे वाण नक्कीच ह्याच्या आईकडून आलं असावं. आमच्याकडे खापर पणजोबांपासून सगळे खत्रूड म्हणून नावाजलेले आहेत.
लग्न झाल्या दिवसापासून याच्या आईचं माणसाळून टाकण्याचं कौशल्य कधीकधी फार्फार कौतुकाचं वाटतं.
आमच्या सोसायटीतल्या सी विंगमधल्या हिप्परगीकरांची कामवाली बाई त्यांच्याकडे खाडा करून हिच्या केसाला रंग वगैरे लावत बसते आणि ही तिच्या नखांना रंग लावते.
पण हे तसं आता आताशाचं.पोस्टमन घरापर्यंत टपाल आणून द्यायच्या काळात ही माउली पोस्टमनला कोथींबीर मिरच्या आणायला पण पिटाळायची.
पण वास्तवाचे भान राखा हा संदेश मला आठवला आणि मी त्यांना विचारलं.
"बाप रे ! म्हणजे तू घर सोडून जंगलात जाणार का क्काय ? ते नर्मदा आंदोलना सारखं ? अँ ? "
माझा आवाज जरा चिरकलाच असावा.
चिरंजीव नकारार्थी मान हलवून म्हणाले
"बाबा ,मला ते तुमच्यामुळे शक्य नाही."
"तुम्ही मला लहानपणापासून पॉटी -पॉटी ची सवय लावली.नॉर्मल शी करायला शिकवलंच नाही. जंगलात जायचं म्हणजे उकीडवं बसावं लागेल ..माझा नाईलाज आहे "
मी जरा रीलॅक्स झालो.
नर्मदा नाही -म्हणजे छत्तीसगड नक्कीच नाही.
त्यावर ते पुढे म्हणाले की " मी अर्बन सोशल एंजीनीअर होणार आहे."
आता ह्या प्रकरणात इतके बारकावे असतात हे माझ्या ज्ञानकक्षेच्या बाहेरच होतं.
"म्हणजे ?
"म्हणजे मी घरी राहूनच कोर्स करणार आहे."
(-म्हणजे ते दिवसभर अंथरुणात पडून राहणार आहेत.
-म्हणजे अठ्ठ्यात्तरव्या हाकेला पण ते ओ देणार नाहीत.
-म्हणजे त्यांना जन्मजात पाण्याची अॅलर्जी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही त्यांना आंघोळीचा आग्रह करायचा नाही.
केलाच तर बाथरुंअमध्ये त्यांनी काढून टाकलेल्या चड्डीचा "ळ" उचलून टाकण्याची जबाबदारी आग्रहकर्त्याची असेल.
-म्हणजे त्यांनी भरलेल्या जीमच्या पैशाचे स्मरण त्यांना वारंवार करून द्यायचे नाही.
-त्यांचा कॉल चालू असताना तुम्ही त्यांच्या पंधरा फुटाच्या परीघात फिरकणार नाही.
-म्हणजे ते जॅमींगसाठी घराबाहेर पडलेच तर ते तुमचे कॉल सतत कट करतील याला तुमचा आक्षेप नसेल हे ते गृहीत धरतील.वगैरे वगैरे ...)
हे सगळं मला उगाचच आठवलं.
"मग याची सिएमटी -जीएमटी वगैरे असेल ना ? त्याचे क्लास पण असतील ना ?"
त्यांच्या अकाली सुटलेल्या पोटावरून टीशर्ट ओढत ते म्हणाले
"बाबा तसं काही नाही .त्यांच्या सिंपल टेस्ट मी आधीच पास झालोय."
काय काय विचारतात रे हे सोशल एंजीनीरींग वाले "
"व्हेरी सिंपल डॅड. त्यांनी फक्त एक एसे लिहायला सांगीतला. "मिसअंडरस्टुड सोशल एंजीनीअर या विषयावर...
म्हणुन मी अब्दुल करीम तेलगी साहेब यांच्यावर एसे लिहून टाकला."
तेलगी आणि सोशल एंजीनीअर ?
"ऑफकोर्स डॅड !!! हि वॉज मिसइंटर्प्रेटेड. खरं म्हणजे सरकार खाजगीकरणाला प्रोत्साहन देते. तेलगी साहेबांनी सरकारी परवानगीची वाट न बघता छापखान्याला न झेपणार्या डोलार्याचे खाजगीकरण केले. आता त्यांचे कागद जास्त खपायला लागल्यावर सरकारचा जळफळाट झाला आणि स्पर्धेला घाबरून त्यांना जेलमध्ये टाकलं. आता आतमध्ये ते तुरुंगाचं खाजगीकरण कसं करता येईल याचा अभ्यास करणार आहेत."
आता मला सात्वीक म्हणतात असा संताप आला. आणि मी म्हटलं म्हणजे " उद्या कचेरीत तेलगी आणि टिळक यांचे फोटो सोबत लावायचे का ?"
माझ्या प्रश्नामुळे आणखीच खूष झाले.
कानातल्या डुलाला हलकेच स्पर्श करत मला म्हणाले
"डॅड -तुम्ही फार लवकर गोंधळता."
(हे मात्र अगदी खरं आहे. आम्ही सगळे फार लवकर गोंधळून जातो.याच्या बहीणीच्या आणि याच्या वयात पाच वर्षाचं तरी अंतर असावं अशी आमची अपेक्षा होती... पण गोंधळाच्या मनस्थितीतून बाहेर येण्यापूर्वीच याचा जन्म झाला होता. असं मला उगाचच सारखं सारखं आठवायला लागलं.)
मग ते पुढे बोलतच राहीले...
"सोशल एंजीनीअर आणि क्रिमीनल यांच्या कक्षा ठरवणार्या रेषा फार धूसर आहेत.आजचा सोशल एंजीनीअर उद्याचा क्रिमीनल होऊ शकतो. सप्टेंबर पर्यंत तेजपाल सोशल एंजीनीअर होते -ऑक्टोबर मध्ये क्रिमीनल झाले की नाही ?
आणि समाजाला याची जाणिव असल्यामुळे प्रत्येक सोशल एंजीनीअरच्या नावाने एक रस्ता आणि एक पोलीस स्टेशन असते."
"बघा लोकमान्य टिळक मार्ग -एल.टी मार्ग पोलीस स्टेशन ---दादासाहेब भडकमकर मार्ग-डि.बी मार्ग पोलीस स्टेशन ..."
माझ्या घशाला आता कोरड पडली होती. मी पाण्याचा एक घोट घेतला.
बेंबीला थुंकी लावत त्यांना शेवटचा प्रश्न मी विचारला.
"माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या ? "
तुमची गेल्या तीन वर्षाच्या फॉर्म-१६ च्या प्रती हव्या आहेत.ही एकच कंडीशन फुलफील करायची बाकी आहे .
"पण फॉर्म १६ कशाला "
त्यांनी खिशातून एक कागद काढून वाचून दाखवला.
" सहारा इंस्टीट्युट ऑफ सोशल मॅनेजमेंट अँड सोशल एंजीनीअरींगच्या विद्यार्थ्याचा किमान एक पालक -गरज भासल्यास- जामीन देण्याच्या लायकीचा आहे याचा पुरावा प्रवेश देण्यासाठी अत्यावश्यक आहे. "
माझा चेहेरा वेडावाकडा झाला. माझा हात अचानक माझ्या छातीच्या डाव्या बाजूला गेला.
आता ते घाबरले आणि त्यांनी विचारलं
"डॅड ..काही होतंय का तुम्हाला ?
मी मान हलवत इतकंच बोलू शकलो..
"काही नाही. सहारा प्रणाम "
प्रतिक्रिया
26 Mar 2014 - 5:00 pm | विटेकर
खूपच छान .. आम्च्याकडे हेच आणि असेच त्यामुळे आवडेश !
26 Mar 2014 - 5:12 pm | प्यारे१
खुदूखुदू ते खदाखदा सगळ्या प्रकारे हसलो.
:) ते =))
भन्नाट दिवाळीफराळ असल्यासारखं. भन्नाट!
26 Mar 2014 - 5:13 pm | मृत्युन्जय
प्रणाम. एक्दम भारी.
26 Mar 2014 - 5:22 pm | तुषार काळभोर
सहारा प्रणाम...
(चड्डीचा "ळ";बेंबीला थुंकी... -> हे खास!!)
26 Mar 2014 - 5:23 pm | विटेकर
क्रमश: लिवायचे राहिल्य काय ?
26 Mar 2014 - 5:39 pm | बॅटमॅन
एकेक पंचेस इतके भारी आहेत की ते वेगळे काढायचे म्हटलं तर अख्खा लेखच पुन्हा पेष्टवावा लागेल. ती ऑष्ट्रेलिया वि. सौथाफ्रिका म्याच न्हौती का ४३४ वाली? हायलैट्स अन म्याचीत फरकच नै.
26 Mar 2014 - 5:59 pm | झकासराव
जबराट :)
26 Mar 2014 - 6:24 pm | रेवती
लेखन आवडले.
आता मनाची तयारी सुरु करते. प्रत्येक आईबापाला आपापलं भविष्य दिसायला लागलं असेल. सध्या आमच्याकडे दुधापेक्षा 'मॅड्रास कॉफी' कशी चांगली याचे धडे आम्हालाच मिळतात. पाह्यलं तर मद्रास कुठे आहे किंवा काय आहे हेही माहीत नसेल.
26 Mar 2014 - 6:26 pm | जेपी
झक्कास .
26 Mar 2014 - 6:36 pm | सूड
मस्तच!!
26 Mar 2014 - 6:41 pm | यशोधरा
झक्कास!
26 Mar 2014 - 7:01 pm | आत्मशून्य
खुसखुशीतपणाची एक अतिशय ताकतवान व सुखद झुळुक.
26 Mar 2014 - 7:26 pm | यसवायजी
"काही नाही, माझ्यातर्फे आणी या मुलायम कोमलांगीका गॄपतर्फे सहारा प्रणाम " __/\__
--------------------
1 Apr 2014 - 1:43 pm | प्यारे१
'आचारसंहिते'मुळं ह्या फोटोवर काही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत/ आलेल्या दिसत नाहीत का?
26 Mar 2014 - 7:34 pm | दिव्यश्री
माझा चश्मा नाकाच्या शेंड्यावरून गळून खाली पडला.
हे वाण नक्कीच ह्याच्या आईकडून आलं असावं
माझ्या प्रश्नामुळे आणखीच खूष झाले.
कानातल्या डुलाला हलकेच स्पर्श करत मला म्हणाले
"डॅड -तुम्ही फार लवकर गोंधळता." >>>> :D *LOL*
सहीच लेख आहे . पंचेस कसे असावेत याचे उत्तम उदाहरण . :)
26 Mar 2014 - 7:35 pm | प्रदीप
खास रामदास!
26 Mar 2014 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
>>>आपलं नशिब मिराकुमार सारखं एका उंच खुर्चीवर बसून फक्त हसतंच आहे.
...एकदम डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं :)
रामदासांचे पूर्वीचे लेखन वाचले आहेच. त्यामुळे ताजे, स्ट्रेट फ्रॉम ओव्हन, लेखन वाचायला मिळाल्यामुळे खास मजा आली.
खास रामदास टच. भन्नाट.
26 Mar 2014 - 8:00 pm | मधुरा देशपांडे
भारीच. मजा आली वाचताना.
26 Mar 2014 - 11:06 pm | Prajakta२१
एकदम refreshing लेख
27 Mar 2014 - 12:14 am | पिवळा डांबिस
विशेषतः पहिला भाग आवडला!! रिलेट करता आला!!!
:)
आजकाल उग्गाच चिडचिड करणारा,
पिडांकाका
27 Mar 2014 - 2:50 am | मूकवाचक
_/\_
27 Mar 2014 - 5:01 am | खटपट्या
जबरी !!!!
27 Mar 2014 - 6:27 am | निनाद मुक्काम प...
आमचे तरुणपणीचे दिवस आठवले.
सत्या पहिल्यापासून मुळे वकील व्हायचे मनात आले होते.
वाचून खदाखदा हसलो.
27 Mar 2014 - 8:25 am | स्पंदना
मस्त!
बाकी सारं तर आहेच पण अर्धांगिनीची स्तुती फार म्हणजे फारच भावली.
डोळ्यासमोर धुक तरळल हे वाचताना. आठवणींच हो! असो
27 Mar 2014 - 8:40 am | अजया
मजा आली वाचायला!!
27 Mar 2014 - 8:41 am | जोशी 'ले'
मस्त लिहलंय
27 Mar 2014 - 9:08 am | ब़जरबट्टू
अप्रतिम, आवडले.. मजा आल =))
27 Mar 2014 - 9:41 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. :-)
27 Mar 2014 - 9:52 am | पर्नल नेने मराठे
मस्त :))
27 Mar 2014 - 2:22 pm | प्यारे१
रामदास काका, लिहीत जा हो.
दफन मुर्दे उजागर हो गये आपके लिखने से! ;)
27 Mar 2014 - 12:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
तुम्हाला साष्टांग __/\__!!
=))
27 Mar 2014 - 12:43 pm | सुहास झेले
टिपिकल रामदासकाका.... :)
12 Apr 2014 - 1:45 pm | किसन शिंदे
+१
ते "ळ" पटकन क्लिक झालं नाही आणि जेव्हा झालं तेव्हा दात काढून हसलोय. :D हे असं. :)
27 Mar 2014 - 12:56 pm | सचिन कुलकर्णी
हसून हसून पुरेवाट झाली पंचेस वाचून.
27 Mar 2014 - 2:14 pm | गणपा
राजकारणावरच्या लेखांच्या जंजाळात मनाला आल्हाद देणारं लेखन.
धन्यवाद रामदासकाका.
:)
27 Mar 2014 - 9:10 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
27 Mar 2014 - 9:52 pm | सस्नेह
एकदम खुमासदार फर्मास लेखन !
27 Mar 2014 - 8:02 pm | भाते
नेहमीप्रमाणेच खास रामदासकाका टच.
काका, येऊ द्या असेच आणखी बरेच काही.
27 Mar 2014 - 9:27 pm | पैसा
मस्तच! आमच्या हापिसात "इतकी वर्षे काम करून काहीच शिकला नाहीत म्हणून ट्रेनिंगला पाठवताहेत" असं म्हणायचे. भारताचे भविष्य असलेल्या पिढीबद्दल लिहिलेलं तर मस्तच!
27 Mar 2014 - 10:09 pm | मुक्त विहारि
झक्कास...
31 Mar 2014 - 12:13 am | प्रसाद गोडबोले
:)
31 Mar 2014 - 4:07 pm | चिगो
फर्मास, रामदासकाका.. लै म्हणजे लैच जोरदार..
हे अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.. %)
आयला.. हे तर एकदमच "सर्कारी" टायपातलं की.. ;-)
एक एक पंच म्हणजे अगदी लोळवणारा आहे. =))
31 Mar 2014 - 9:33 pm | शैलेन्द्र
खास रामदास.. मान गये :)
सहारा प्रणाम :)
1 Apr 2014 - 9:09 pm | शिद
मस्त...एकदम खुशखुशीत लेखन नेहमीप्रमाणे. आमचा पण सहारा प्रणाम स्विकारावा.
1 Apr 2014 - 11:59 pm | कवितानागेश
मस्तच आहे.
'मिराकुमार' तर खासच! :)
2 Apr 2014 - 11:54 am | वैदेही बेलवलकर
नेहमीप्रमाणेच खास रामदासकाका टच +११११११
2 Apr 2014 - 2:42 pm | मदनबाण
मस्तच ! :)
10 Apr 2014 - 2:39 pm | मार्मिक गोडसे
लहानपणी सार्वजनिक स्वछतागृहासमोर प्रवेशाच्या प्रतिक्षेत दाब असह्य झाल्यास आम्ही बेंबीला थुंकी लावायचो, चारचौघात फजिती होत नसे. आपला बेंबीला थुंकी लावण्याचा हेतू तोच असेल तर तुम्ही आम्ही सेम सेम ...
12 Apr 2014 - 7:31 am | जयराज
त्यांना जन्मजात पाण्याची अॅलर्जी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही त्यांना आंघोळीचा आग्रह करायचा नाही.
केलाच तर बाथरुंअमध्ये त्यांनी काढून टाकलेल्या चड्डीचा "ळ" उचलून टाकण्याची जबाबदारी आग्रहकर्त्याची असेल.
हसून हसून मेलो.
.:-)
22 Jan 2021 - 7:52 pm | NAKSHATRA
पण हे तसं आता आताशाचं.पोस्टमन घरापर्यंत टपाल आणून द्यायच्या काळात ही माउली पोस्टमनला कोथींबीर मिरच्या आणायला पण पिटाळायची.