१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ६

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
19 Mar 2014 - 10:15 am

१० मे १९९६

एव्हरेस्टच्या शिखरावर दुपारचे १.४५ वाजलेले होते.

अनातोली बुकरीव, अँडी हॅरीस, नील बिडलमन, मार्टीन अ‍ॅडम्स आणि जॉन क्राकुअर आधीच शिखरावर पोहोचलेले होते. क्राकुअरने मोजून पाचव्या मिनीटाला खाली उतरण्यास सुरवातही केली होती ! तो उतरून गेल्यावर १.५० च्या सुमाराला क्लेव स्कोनींगने शिखर गाठलं, दुपारी २.२० च्या सुमाराला सँडी हिल पिटमन आणि तिच्या पाठोपाठ लोपसांग जंगबू शेर्पा पोहोचले. त्यांच्या नंतर १० मिनीटांतच शार्लोट फॉक्स, टिम मॅडसन आणि लेनी गॅमलगार्डने एव्हरेस्टचा माथा गाठला. दुपारी २.३० च्या सुमाराला माईक ग्रूम, यासुको नम्बा आणि रॉब हॉल माथ्यावर पोहोचले.

दुपारी २.३० च्या सुमाराला बुकरीवने परतीचा प्रवास सुरू केला. तो जवळपास दीड तास शिखराच्या माथ्यावर ऑक्सीजन टँकविना इतरांची वाट पाहत होता ! त्याच्या पाठोपाठ मार्टीन अ‍ॅडम्स निघाला. इतर सर्वजणही लवकरच परतीच्या मार्गाला लागणार होतेच. मात्र अद्यापही डग हॅन्सन, स्कॉट फिशर आणि बेक वेदर्स यांचा पत्ता नव्हता !

शिखरावरून सर्वात आधी परतलेला क्राकुअर हिलरी स्टेपच्या माथ्यावर पोहोचला होता. क्राकुअर जेमतेम पाच-दहा मिनीटांत आणि २ वाजण्याच्या टर्न अराऊंड टाईम ( सुरक्षीत परत फिरण्याची वेळ ) च्या आधी वेळेत परत फिरला होता.हिलरी स्टेपच्या माथ्यावर तो पोहोचला तेव्हा अद्याप गिर्यारोहक वर चढत होते ! एव्हाना दुपारचे १.४५ झालेले होते. इतर सर्वजण वर चढून आल्याशिवाय हिलरी स्टेपवरच्या एकमेव सुरक्षा दोरावरून कोणालाही खाली उतरता येणार नव्हतं ! नाईलाजाने वाट पाहण्यापलीकडे त्याला गत्यंतर नव्हतं. एव्हाना अँडी हॅरीस त्याच्या पाठी येऊन पोहोचला होता.

क्राकुअर आणि हॅरीस हिलरी स्टेपच्या माथ्यावर तब्बल दीड तास वाट पाहत बसून होते ! दरम्यान क्राकुअरचा ऑक्सीजन टँक संपला होता ! ते वाट पाहत असतानाच एकेक करून मकालू गाऊ, यासुको नम्बा, रॉब हॉल आणि डग हॅन्सन वर आले. सर्वांच्या मागून शेवटी स्कॉट फिशर हिलरी स्टेप चढून आल्यावर हिलरी स्टेप उतरण्याचा मार्ग मोकळा झाला होता ! एव्हाना शिखरावरून निघालेले बुकरीव आणि अ‍ॅडम्स हिलरी स्टेपच्या माथ्यावर पोहोचले होते.

सुमारे ३ वाजता मकालू गाऊने शिखर गाठलं. हॉल आणि फिशरच्या मोहीमेतील शेर्पा अद्यापही शिखरावर वाट पाहत होते ! दुपारी ३ नंतर फिशर आलेला नसताना बिडलमनने परतीचा निर्णय घेतला. सँडी हिल, फॉक्स, मॅडसन आणि गॅमलगार्ड यांच्यासह तो उतरत असताना त्याची फिशरशी गाठ पडली. फिशर प्रचंड थकलेला असूनही अद्याप वर चढत होता. सुमारे ३.३५ ला तो माथ्यावर पोहोचला !

बिडलमनच्या आधीच काही वेळ ग्रूम आणि नम्बा परत निघाले होते. चार क्लायंट्ससह बिडलमन परत फिरल्यावरही अंग दोर्जे आणि इतर शेर्पा शिखरावर हॉल आणि हॅन्सनची वाट पाहत थांबले होते. अखेरीस सुमारे ३.१५ च्या सुमाराला ते परत फिरले. शिखरापासून काही अंतरावर त्यांना डग हॅन्सन दिसला. दोर्जेने त्याला परत फिरण्यास सांगीतलं पण हॅन्सनने काहीच उत्तर दिलं नाही ! त्याच वेळी हॅन्सनला पाहिल्यावर शिखरावरून उतरून हॉल तिथे पोहोचला. त्याने दोर्जेला खाली उतरण्याची सूचना दिली आणि हॅन्सनच्या मदतीला तो स्वतः तिथे थांबला !

रॉब हॉल आणि डग हॅन्सन माथ्यावर पोहोचले तेव्हा दुपारचे ४.०५ वाजले होते !

जास्तीत जास्त दुपारी २ पर्यंत परत फिरण्याची सर्वांना सूचना देऊनही स्वतः हॉल आणि फिशर हे सर्वात उशीरा वर पोहोचले होते !

शिखरावरून हिलरी स्टेपवर परतत असतानाच क्राकुअरने दक्षिणेला वातावरणात होत असलेला बदल हेरला होता. तासाभरापूर्वी - दुपारी साडेबारापर्यंत निरभ्र असलेल्या आकाशात आता ढग जमा होऊ लागलेले होते ! पुमोरी, अमा दाबाम आणि एव्हरेस्टच्या परिसरातील इतर लहान मोठी शिखरं ढगांत पार हरवून गेली होती !

नेमकी हीच गोष्ट दुपारी ३ वाजता शिखरावर पोहोचलेल्या मकालू गाऊच्या ध्यानात आली होती !

हिलरी स्टेपच्या माथ्यावर क्राकुअर वाट पाहत असताना त्याची आणि हॉलची गाठ पडली होती. बेक वेदर्स परत फिरल्याचं हॉलने क्राकुअरला सांगीतलं. क्राकुअर लिहीतो,

" आमच्या तुकडीतील पाच क्लायंट्स - फिशबेक, हचिन्सन, टेस्क, कासिस्च्के आणि वेदर्स परत फिरल्याने हॉल नाराज झाला होता. फिशरच्या तुकडीतील जवळपास सर्व क्लायंट्स त्याच्यापुढेच शिखराच्या दिशेने गेलेले होते. आणखीन काही क्लायंट्सना आपण शिखरावर नेऊ शकलो असतो तर.. तो म्हणाला !"

एव्हरेस्टच्या ईशान्य धारेवर नेपाळच्या बाजूने चढाई करणा-या गिर्यारोहकांची स्थिती अशी असताना वायव्य धारेवर काय घडत होतं ?

वायव्य दिशेने एव्हरेस्टवर चढाईचा मार्ग तिबेटमधून जातो. तिबेटमधील बेस कँप ५१८० मी ( १६९०० फूट ) उंचीवर आहे. या बेस कँपच्या वरच राँगबुक ग्लेशीअर आहे. बेस कँपवरून निघून कँप १ पार करुन आणि पूर्व राँगबुक ग्लेशीयरच्या बर्फाच्या मधल्या भागावरून चांगत्से शिखराचा पायथा गाठावा लागतो. चांगत्सेच्या पायथ्याशी ६१०० मी ( २०००० फूट ) उंचीवर कँप २ उभारला जातो. नॉर्थ कोलच्या खाली ६५०० मी ( २१३०० फूट ) उंचीवर कँप ३ पार केल्यावर कोलच्या पायथ्याशी असलेल्या सुरक्षा दोरांच्या सहाय्याने ग्लेशीयर पार करून नॉर्थ कोल वर चढाई करावी लागते. नॉर्थ कोलवर ७०१० मी ( २३००० फूट ) उंचीवर असतो कँप ४ ! कँप ४ वरून निघाल्यावर शिळांनी भरलेल्या उत्तर धारेवरून मार्गक्रमणा केल्यावर ७७७५ मी ( २५५०० फूट ) उंचीवर कँप ५ येतो. कँप ५ वरून निघाल्यावर पुढे एव्हरेस्टच्या पूर्व धारेवरून तिरप्या रेषेत चढाई करत यलो बँडचा पायथा गाठावा लागतो. यलो बँडच्या पायथ्याशी ८२३० मी ( २७००० फूट ) उंचीवर असतो शेवटचा कँप - कँप ६ !

कँप ६ वरून पहाटेच्या सुमाराला चढाईला सुरवात करावी लागते. कँप ६ वरून बर्फातून वेड्यावाकड्या वाटेने वाटचाल केल्यावर ८५०१ मी ( २७८९० फूट ) उंचीवर पहीली दगडी पायरी लागते. सुमारे ३३ मी ( ११० फूट ) उंचीची ही पायरी मोठ्या दगडी शिळांनी बनलेली असून बर्फाच्छादीत असल्याने गिर्यारोहकांची दमछाक करणारी ठरते. पहिल्या पायरीपासून काही अंतरावरच दुसरी पायरी आहे.

एव्हरेस्टच्या गिर्यारोहणाच्या इतिहासात वायव्येच्या मार्गावरील ही दुसरी पायरी चढाईसाठी अत्यंत कठीण म्हणून ओळखली जाते. ८६१० मी ( २८२५० फूट ) उंचीवरील ही दुसरी पायरी ४९ मी ( १६० फूट ) उंच असून प्रचंड मोठ्या शिळांनी बनलेली आहे. या पायरीचा शेवटचा ५ मी ( १७ फूट ) भाग तर सरळसोट उभ्या चढाईचा आहे. प्रचंड प्रमाणात बर्फाने झाकून गेल्यामुळे ही पायरी पार करणं हे एव्हरेस्टच्या चढाईतील एक बेजोड आव्हान आहे.

१९६० सालच्या चिनी मोहीमेत वँग फू चौ, चू यिंग हुआ आणि कोंबू शेर्पा या गिर्यारोहकांनी सर्वात प्रथम ही पायरी चढून जाण्यात यश मिळवलं ! १९७५ सालच्या चिनी मोहीमेतील गिर्यारोहकांनी या पायरीवर अ‍ॅल्युमिनीयमची शिडी बसवल्यामुळे या पायरीची चढाई पूर्वीच्या तुलनेने सोपी झाली आहे. १९२४ च्या तिस-या मोहीमेत जॉर्ज मॅलरी आणि अँड्रयू आयर्विन ही पायरी चढण्यात यशस्वी झाले होते का हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे !

दुसरी पायरी पार केल्यावर येणारी तिसरी पायरी चढाईच्या दृष्टीने बरीच सोपी आहे. ८७०० मी ( २८५४० फूट ) उंचीवरची सुमारे १५ मी ( ५० फूट) उंचीची ही पायरी चढून गेल्यावर शिखराचा उतार सुरू होतो. सुमारे ५० डिग्रीचा हा उतार चढून गेल्यावर अख्रेरीस गिर्यारोहक शिखराच्या माथ्यावर पोहोचतात !

कमांडर मोहींदर सिंगच्या नेतृत्वाखालील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांची तुकडी एव्हरेस्टच्या उत्तरेच्या धारेवरुन चढत कँप ६ वर पोहोचलेली होती ! १९९६ च्या मोसमात आतापर्यंत कोणीही त्या मार्गाने चढाई केलेली नव्हती. साहजिकच वाटेत दोर बांधण्याचं आणि शिखरापर्यंत मार्ग आखण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. बॉर्डर पोलीसांची संपूर्णपणे स्वावलंबी मोहीम असल्याने त्यांच्या मदतीला शेर्पा नव्हते !

भारतीय तुकडीने कँप ६ वर मुक्काम ठोकला होता. त्याच मार्गे जाणारी जपानी गिर्यारोहकांची मोहीम ११ मे रोजी शिखरावर चढाई करणार होती.

कमांडर मोहींदर सिंग मोहीमेचा प्रमुख असले तरी शिखरावर चढाई करणा-या भारतीय तुकडीचं नेतृत्व त्सेवांग सामलां कडे होतं मूळचा लडाखचा असलेला सामलां हा निष्णात अनुभवी गिर्यारोहक होता. १९८४ साली त्याने एव्हरेस्ट आणि १९९१ साली कांचनजंगा शिखरांवर त्याने यशस्वी चढाई केलेली होती. त्याच्या तुकडीत त्सेवांग पाल्जर, दोर्जे मोरुप, हिरा राम, ताशी राम आणि हरभजन सिंह यांचा समावेश होता.

सकाळी ५.४५ वाजता भारतीय तुकडीने कँप ६ वरून चढाईस सुरवात केली. अंतिम चढाईसाठी त्यांना काहीसा उशीरच झालेला होता. झपाट्याने चढाई करत त्यानी दुसरी पायरी ओलांडली. मात्र एव्हाना हवामान बिघडत चाललं होतं. दुपारी २ वाजता हरभजन सिंह, हिरा राम आणि ताशी राम यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र सामलां, मोरुप आणि पाल्जर यांनी शिखर गाठण्याच्या इराद्याने आगेकूच सुरूच ठेवली.

दुपारी ३.५० ला सामलांने रेडीओवरून आपण माथ्यावर पोहोचल्याची बातमी बेस कँपवर दिली.

जॉन क्राकुअरच्या मते भारतीय गिर्यारोहक शिखरापासून ५०० फूट खालीच थांबले होते. वाढत्या वादळामुळे शिखराचा भाग दिसत नसल्याने आपण शिखरावर पोहोचल्याची त्यांची कल्पना झाली. शिखरावर पोहोचलेल्या फिशर,हॉल, हॅन्सन आणि लोपसांगशी त्यांची गाठ पडली नाही.

एव्हरेस्टवरचं हवामान झपाट्याने बिघडत चाललं होतं. बर्फवृष्टीस आधीच सुरवात झाली होती. वा-याचा जोर वाढत होता. ही झंझावाती हिमवादळाची नांदी होती ! वादळाशी मुकाबला करत आणि बर्फवर्षावातून मार्ग काढत सुरक्षीत परत येणं किती जणांना जमणार होतं ?

हिलरी स्टेपचा रस्ता मोकळा होताच अँडी हॅरीसने दोरावरून उतरून स्टेपचा पायथा गाठला आणि अजिबात न थांबता तो साऊथ समिटला पोहोचला. त्याच्या पाठोपाठ क्राकुअर साऊथ समिटच्या वाटेला लागला. त्याचा ऑक्सीजन टँक रिकामा होऊन तासभार झाला होता. सुरक्षा दोराचा वापर करून तो समिटजवळ पोहचत असतानाच बुकरीव आणि अ‍ॅडम्स त्याला मागे टाकून पुढे निघून गेले. साऊथ समिटवर पोहोचत अस्तानाच त्याला ऑक्सीजन टँक नीट रचून ठेवत असलेला हॅरीस दिसला.

" हॅरॉल्ड, मला एक ऑक्सीजन टँक देशील काय ?" क्राकुअरने त्याला विचारलं.
" इथल्या एकही टॅंकमध्ये ऑक्सीजन नाही !" हॅरीस उत्तरला, " हे सगळे सिलेंडर्स रिकामे आहेत !"

क्राकुअरला या वेळी ऑक्सीजनची नितांत आवश्यकता होती. त्याच्या सुदैवाने माईक ग्रूम नेमका तिथे येऊन पोहोचला होता. ग्रूमने १९९३ मध्ये ऑक्सीजनविना एव्हरेस्टचा माथा गाठलेला होता. त्याच्या जवळच्या ऑक्सीजन टँकच्या मदतीने क्राकुअर साऊथ समिटवर पोहोचला.

साऊथ समिटवर पोहोचताच ऑक्सीजनचे सहा टँक्स पूर्ण भरलेले असल्याचं ग्रूम - क्राकुअरच्या ध्यानात आलं. मात्रं हॅरीसचा त्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता !

ऑक्सीजन टँक भरलेला आहे वा नाही याची तपासणी करण्यासाठी तो रेग्युलेटरवर बसवून त्याच्या डायलचं निरीक्षण करणं हा एकमेव उपाय होता. ग्रूमने याच पध्दतीने सर्व टँक्सची तपासणी केलेली होती. मात्रं यात हॅरीसची चूक नव्हती. हॅरीसच्या रेग्युलेटर बर्फ अडकल्याने तो हिलरी स्टेपच्या वर नादुरूस्त झाला होता. क्राकुअरने त्यावेळी त्यातला बर्फ काढून तो मोकळा केला होता. मात्र पुन्हा त्याचा रेग्युलेटर बिघडल्याने टँक्समध्ये ऑक्सीजन असूनही ते रिकामे असल्याचं त्याच्या डायलवर दिसत होतं. ऑक्सीजनचा पुरवठा नसल्याने हॅरीसला अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास जाणवत होता आणि तो डोकं ठिकाणावर ठेऊन विचार करू शकत नव्हता हे दुर्दैवाने क्राकुअर, ग्रूम आणि नम्बाच्या ध्यानी आलं नाही !

दुपारी - ३.३०

क्राकुअर पूर्ण भरलेला ऑक्सीजन टॅंक घेऊन साऊथ कोलकडे निघाला होता. अनातोली बुकरीव आणि मार्टीन अ‍ॅडम्स आधीच खाली गेलेले होते. माईक ग्रूम, यासुको नम्बा आणि अँडी हॅरीस साऊथ समिटवर होते. बिडलमन, पिटमन, फॉक्स, मॅडसन आणि गॅमलगार्ड परतीच्या मार्गाला लागलेले होते. मकालू गाऊ नुकताच परत निघाला होता. स्कॉट फिशर शिखरावर होता. हॅन्सन आणि त्याच्या मदतीसाठी शिखरावरून खाली उतरलेला हॉल अद्याप वर चढत होते ! दुसरीकडे सामलां, मोरूप आणि पाल्जरही शिखराच्या जवळपास पोहोचले होते.

क्राकुअर आणि ग्रूम नैऋत्य धारेच्या खडकाळ पाय-यांचा तळाशी बाल्कनीच्या वर पोहोचले. यासुको नम्बाला दोरावरून उतरण्यास बराच त्रास होत होता. ग्रूम तिची वाट पाहत होता. त्याने रेडीओवरून हॉलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा संपर्क होत नव्हता ! नम्बासाठी ग्रूमला थांबलेला पाहून क्राकुअर पुढे निघाला.

दुपारी ४.३०

डग हॅन्सन सर्वात शेवटी दुपारी ४ वाजता एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला होता. हॉलने जेमतेम मिनीटभरातच त्याच्यासह परतीचा मार्ग सुधारला होता. काही वेळ आधीच फिशर आणि लोपसांग आणि पाठोपाठच गाऊ आणि त्याचे शेर्पाही परत निघाले होते.

हॅन्सनची अवस्था बि़कट झाली होती. एकेक पाऊल उचलणं त्याला कठीण जात होतं. त्याची ती परिस्थिती पाहून लोपसांग हॉलच्या मदतीला थांबला. एका विशीष्ट धोकादायक उतारावरून सुखरूप पार झाल्यावर लोपसांग फिशरला गाठण्यासाठी पुढे निघाला.

हॉलने रेडीओ संदेश पाठवला,

" मी आणि डग अद्यापही शिखराच्या उतारावर आहोत. डगचा ऑक्सीजन संपला आहे. आम्हांला ताबडतोब ऑक्सीजन टँक पाठवा !"

हॉलचा संदेश ऐकताच ग्रूमने त्याला रेडीओ संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण ग्रूमचा रेडीओ नीट काम करत नव्हता !

४.४१ - हॉलने पुन्हा संदेश पाठवला,

" आम्ही अद्यापही वरच्या उतारावर आहोत, डगला ऑक्सीजनची जरुर आहे. साऊथ समिटवरून ऑक्सीजन पाठवा !"
" इथे एकही ऑक्सीजन टँक नाही !" हॅरीसने हॉलला उत्तर दिलं !

साऊथ समिटवर दोन पूर्ण भरलेले ऑक्सीजन टँक होते !

काही मिनीटांनी ग्रूमला हॉलशी संपर्क साधण्यात यश मिळालं.

" रॉब, साऊथ समिटवर दोन सिलेंडर्स ऑक्सीजन आहे !" ग्रूमने हॉलला संदेश दिला.
" मी पुन्हा सांगतो, इथे एकही टँक ऑक्सीजन नाही !" हॅरीस मधेच उत्तरला.

हॉलचा आता गोंधळ उडाला होता. नक्की कोणावर विश्वास ठेवावा हे त्याला कळेना. शेवटी डगला एकट्याला सोडून खाली येण्यापेक्षा त्याला ऑक्सीजनशिवायच खाली आणण्याचा हॉलने निर्णय घेतला !

फिशर एव्हाना हिलरी स्टेप उतरून साऊथ समिटच्या काहीसा पुढे आला होता. त्याच्यापाठोपाठ गाऊ होता.

बेस कँपमध्ये हॉलच्या संदेशाने खळबळ उडाली होती. डॉ. मॅकेंझी आणि हेलन विल्टन यांनी फिशरच्या तंबूत धाव घेतली, हॉलला मदत करणं फिशरच्या तुकडीलाच शक्य होतं. डॉ. हंटकडून फिशरची तुकडीही वादळाशी झगडत असल्याची बातमी मिळाल्यावर सर्वांना ख-या परिस्थितीची कल्पना आली !

हॉलचा मित्र गाय कॉटर बेस कँपपासून जवळच काही अंतरावर होता. हॉलचा संदेश मिळताच त्याने ताबडतोब हॉलशी संपर्क साधला.

" रॉब, तू साऊथ समिटवर उतरून ये. ऑक्सीजनशिवाय तू डगला मदत करू शकणार नाहीस !"
" मी स्वतः खाली उतरू शकतो, पण डगसह उतरणं मला शक्यं नाही !"

संध्याकाळी - ५.००

अनातोली बुकरीव साऊथ कोलवरच्या कँप ४ वर पोहोचला होता !

वादळाचा जोर वाढत असलेला पाहून बुकरीव झपाट्याने खाली उतरला होता. कँपवर असलेल्या दोन शेर्पांच्या सहाय्याने गरज भासल्यास सुटका पथक ( रेस्क्यू पार्टी ) तयार ठेवण्यासाठी त्याने घाई केली होती. एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वी चढाई केल्यामुळे मार्टीन अ‍ॅडम्सचा आत्मविश्वास आता वाढला होता. आपण साऊथ कोलवर एकट्याने सहज उतरून येऊ या विचाराने त्याने बुकरीवला खाली जाण्यापासून अडवलं नाही.

बाल्कनीत पोहोचलेल्या क्राकुअरची बेक वेदर्सशी गाठ पडली ! बर्फाच्या वर्षावात आणि वादळात तो तिथे बसून होता. वेदर्सला पाहून क्राकुअरला आश्चर्याचा धक्काच बसला !

अनेक वर्षांपूर्वी वेदर्सच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं. त्याचा परिणाम असा झाला होता की एव्हरेस्टच्या वरच्या उतारांवर - साऊथ कोलच्या वरच्या भागात जिथे हवेचा दाब विरळ होता, तिथे बेकच्या दृष्टीवर परिणाम झाला होता ! त्याला एका डोळ्याने अजिबात दिसेनासं झालं होतं आणि दुस-या डोळ्याने सर्व अंधुक दिसत होतं. त्याच्या डोळ्यांना तात्पुरतं अंधत्वं आलं होतं ! बेकने हॉलला हे सांगताच हॉलने ताबडतोब त्याला परत पाठवण्याची तयारी केली.

" तुला परत जावंच लागेल बेक. मी दोन शेर्पांना तुझ्याबरोबर देतो आहे !"
" मला सकाळपर्यंत वेळ दे रॉब !" बेक हॉलला म्हणाला, " सूर्यप्रकाशाबरोबर माझी दृष्टी सुधारेल अशी माझी खात्री आहे !"
" ठीक आहे !" हॉलने मान डोलवली, " पण अर्ध्या तासाच्या आत तुझी नजर साफ झाली नाही तर तू एकट्याने खाली उतरू नकोस ! इथेच थांब म्हणजे तू नेमका कुठे आहेस ते माझ्या लक्षात राहील ! मी शिखरावरून परत येताना तुला खाली घेऊन जाईन !"

हॉलची वाट पाहत वेदर्स अद्याप तिथे बसून होता. दुपारी बाराच्या सुमारालाच हचिन्सन, टेस्क आणि कासिस्च्के दोन शेर्पांसह त्याला ओलांडून खाली गेले होते, पण वेदर्स त्यांच्याबरोबर गेला नाही. क्राकुअरसोबत खाली जाण्याचंही त्याने आधी नाकारलं पण अखेरीस तो तयार झाला. पण नेमक्या त्याच वेळी माईक ग्रूम लवकरच येत असल्याचं क्राकुअरने त्याला सांगताच त्याने आपला बेत बदलला आणि ग्रूमची वाट पाहण्याचं ठरवलं !

माईक ग्रूम आणि यासुको नम्बा बाल्कनीत पोहोचले होते. बाल्कनीपासून साऊथ कोलकडे जाणारी वाट मार्गावर इथे दक्षिण दिशेला वळते. ग्रूमने वाटेच्या विरुध्द बाजूला पाहीलं आणि त्याला वाट चुकून कांगशुंग धारेवरून तिबेटमध्ये उतरणारा एक गिर्यारोहक दिसला ! ग्रूम आणि नम्बाकडे लक्षं जातात त्याला आपला मार्ग चुकल्याची जाणीव झाली आणि त्याने पुन्हा त्यांच्या दिशेने चढण्यास सुरवात केली. तो मार्टीन अ‍ॅडम्स होता ! ग्रूमने नम्बाला पुढे पाठवून दिलं आणि तो अ‍ॅडम्सची वाट पाहत बाल्कनीत थांबला. नेमक्या याच वेळी बेक वेदर्स त्याच्यासमोर येऊन उभा राहीला ! ग्रूमने त्याला आपल्या कमरेला असलेल्या सुरक्षा दोराच्या सहाय्याने खाली आणण्यास सुरवात केली. वेदर्स जवळपास पूर्ण दृष्टीहीन झाला होता !

बिडलमन, फॉक्स, मॅडसन, स्कोनींग, गॅमलगार्ड आणि सँडी हिल एव्हाना साऊथ समिटवरुन पुढे आलेले होते. सँडीची अवस्था गंभीर झालेली होती. काही पावलांवर ती कोसळून पडली. शार्लोट फॉक्सने डॉ. हंटने दिलेलं इंजेक्शन तिला दिलं. डेक्सामेथासन ( डेक्स ) च्या इंजेक्शन मुळे उंचीचा परिणाम काही काळ जाणवत नाही. साऊथ समिटवर ऑक्सीजन टॅंक आणण्यासाठी परत गेलेल्या बिडलमनने गॅमलगार्डचा ऑक्सीजन टॅ़क सँडीला दिला आणि पूर्ण वेगाने ऑक्सीजन चालू केला ! तिच्या कमरेला सुरक्षा दोर बांधून बिडलमनने तिला खेचण्यास सुरवात केली. सुदैवाने इंजेक्शन आणि ऑक्सीजनच्या एकत्रीत परिणामाने पंधरा मिनीटांतच स्वतःच्या पायाने चालण्याइतकी सँडीला तरतरी आली !

संध्याकाळी ५.३०

साऊथ समिटवर असलेल्या अँडी हॅरीसच्या डोक्यात अखेर प्रकाश पडला !

दोन पूर्ण भरलेले सिलेंडर घेऊन त्याने हॉल आणि हॅन्सनला गाठण्यासाठी अखेर हिलरी स्टेपच्या दिशेने चढाईला सुरवात केली ! लोपसांग फिशरसह साऊथ समिट ओलांडून पुढे आला होता. काही वेळातच गाऊ आणि दोन शेर्पांनीही साऊथ समिट मागे टाकलं आणि ते पुढे निघाले.

हॉल आणि हॅन्सन हिलरी स्टेपच्या माथ्यावर पोहोचले होते. हॅन्सन जेमतेम शुध्दीवर होता. हॉलच्या बेस कँपवरून आणि जवळच असलेला त्याचा मित्र गाय कॉटरकडून त्याला सतत संदेश जात होते.

" रॉब, डगची काय परिस्थिती आहे ?" डॉ. कॅरोलीन मॅकेंझी.
" डग शुध्दीवर आहे, पण अगदी जेमतेमच !" हॉल.
" प्लीज रॉब ! डगसह तुला खाली येणं अशक्यं आहे ! तू खाली उतर !" गाय कॉटर
" डगला सोडून मी खाली उतरणार नाही !" हॉल

कितीही झालं तरी डग हॉलचा क्लायंट होता. डगला सुरक्षीत खाली आणण्याची नैतीक जबाबदारी हॉलवर होती. याच विचाराने डग शुध्दीवर असेपर्यंत त्याने त्याला एकट्याला सोडण्यास नकार दिला असावा !

फिशर एव्हाना बाल्कनीच्या वर असलेल्या दगडी शिळांच्या पायर-यांच्या माथ्यावर पोहोचला होता. दोरावरून खाली उतरण्याची त्याच्यात शक्ती नव्हती. त्याच्या ऑक्सीजन टँकच्या रेग्युलेटरमध्ये बिघाड झाला होता. दोरावरून उतरण्याऐवजी फिशरने सरळ बर्फावरुन घररण्याचा मार्ग पत्करला ! पण पाय-यांच्या तळाशी पोहोचल्यावर पुन्हा मुख्य वाटेवर येण्यासाठी त्याला सुमारे १०० मी अंतराचा आडवा चढ ( ट्रॅव्हर्स ) पार करावा लागणार होता.

जॉन क्राकुअर साऊथ कोलपासून काहीशे फूट उंचीवर बर्फाने भरलेल्या उतारावरच होता . त्याच्या पाठोपाठ मार्टीन अ‍ॅडम्स होता. त्याच्यापासून काही अंतरावर यासुको नम्बा, माईक ग्रूम, बेक वेदर्स, क्लेव स्कोनींग, लेनी गॅमलगार्ड, नील बिडलमन, सँडी हिल पिटमन, शार्लोट फॉक्स आणि टिम मॅडसन अशी रांग लागलेली होती. सर्वात शेवटी असलेल्या मॅडसनने फिशरला आडवा चढ चढताना पाहिलं होतं.

संध्याकाळी ६.००

हॉल आणि हॅन्सन अद्यापही हिलरी स्टेपच्या वरच होते. अँडी हॅरीस ऑक्सीजन आणि पाणी घेऊन त्यांच्या मदतीला निघाला होता.

फिशर आणि लोपसांग बाल्कनीच्या काही फूट वर होते. फिशर प्रचंड थकला होता. एकेक पाऊल उचलणं त्याला कठीण जात होतं. वैतागून तो लोपसांगला म्हणाला,

" मला एक पाऊलही उचलत नाहीये. मी सरळ इथून खाली उडीच टाकतो !"

लोपसांगने फिशरच्या कमरेचा सुरक्षादोर आपल्या कमरेच्या हूकला अडकवला आणि त्याच्यासह तो हळूहळू खाली उतरू लागला.

इतर सर्वजण अद्यापही साऊथ कोलच्या वाटेवरचा उतार उतरतच होते.

एव्हाना हवामान पूर्ण बिघडलं होतं. इतका वेळ पडणारा बर्फ आणि जोरदार वारे यांचं आता झंझावाती हिमवादळात रुपांतर झालं होतं. ताशी ७० मैल वेगाने वाहणारे वारे आणि त्याबरोबर होणारा बर्फाचा मारा गिर्यारोहकांची परिक्षा पाहत होता. दृष्यमानता जेमतेम काही मीटर होती. भरीला जवळपास सर्वांचे ऑक्सीजन टँक्स जवळपास रिकामे झालेले होते !

आणि त्या परिस्थितीतही खाली उतरण्यावाचून पर्याय नव्हता !

साऊथ कोलवर पोहोचलेल्या अनातोली बुकरीवला एव्हाना परिस्थितीची कल्पना आली होती. तो गिर्यारोहकांच्या मदतीला जाण्याच्या तयारीला लागला होता. ऑक्सीजनचे तीन टँक्स आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन तो बाहेर पडण्याच्या तयारीत होता. पण हिमवादळाने जेमतेम एक मीटर अंतरापर्यंतच दिसू शकत होतं, त्यामुळे बुकरीवचाही नाईलाज झाला होता !

बुकरीवप्रमाणेच स्टुअर्ट हचिन्सनही सुटकेच्या प्रयत्नाला लागला होता. परंतु बुकरीवही त्याच प्रयत्नात असल्याची त्याला काहीच कल्पना नव्हती.

संध्याकाळी ६.३०

हिमवादळ आता पूर्ण भरात आलं होतं !

दिवसाच्या प्रकाशाचा अंशही कुठे टिकून उरला नव्हता !

यासुको नम्बाच्या ऑक्सीजन टँकमधला ऑक्सीजन कधीच संपला होता. परंतु त्याची कल्पना नसलेली नम्बा माईक ग्रूमला आपला मास्क काढून देण्यास तयार नव्हती ! त्या मास्कमुळे तिचा श्वास अधीकच कोंडला जात होता. अखेर साऊथ कोलपासून ५०० फूट उंचीवर असताना तिने खाली बसकण मारली ! बेक वेदर्स आतापर्यंत जवळपास पूर्ण आंधळा झाला होता. ग्रूमने त्याला आपल्या खांद्याचा आधार देत खाली उतरवलं होतं. सुदैवाने त्याच वेळी नील बिडलमन तिथे पोहोचला होता. त्याच्या बरोबरचे सर्व जण अद्यापही स्वतः चालण्याच्या परिस्थितीत होते. वेदर्सला आधार देण्यात ग्रूम गुंतलेला पाहून बिडलमनने नम्बाला खाली ओढण्यास सुरवात केली. नम्बा फिशरची क्लायंट असूनही बिडलमनने त्या परिस्थितीत माणुसकीचा विचार करून मदतीचा हात पुढे केला होता.

आघाडीवर असलेला जॉन क्राकुअर कँप ४ पासून आता फक्त २०० फूट उंचीवर पोहोचला होता. त्याच्या वाटेत आता एकच शेवटची अडचण होती. पुढे झुकलेल्या आणि निसरड्या बर्फाचा एक मोठा उंचवटा त्याला अद्याप पार करणं आवश्यक होतं.

या उंचवट्यावर सुरक्षा दोर नव्हता !

कँप ४ वरचे तंबू ६५० फूट अंतरावर मधूनच जेमतेम दिसून येत होते. वादळाचा जोर कमी होण्याची वाट पाहत क्राकुअर त्या उंचवट्यापाशीच बसून राहीला. अचानक त्या वातावरणातून क्राकुअरच्या शेजारी अजून एक गिर्यारोहक प्रगटला.

" तंबू कोणत्या दिशेला आहेत ?" त्याने प्रश्न केला.

क्राकुअरने दाखवलेल्या दिशेला त्याने पाहीलं आणि सरळ पार्श्वभाग बर्फावर टेकून घसरण्यास सुरवात केली ! पण काही क्षणांतच त्याचा तोल गेला आणि तो खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत तुफान वेगात उतारावरून घसरू लागला ! हा प्रकार पाहून हादरलेल्या क्राकुअरला काय करावं कळेना.

सुमारे २०० फूट खाली तो गिर्यारोहक अचानकपणे एका चढावर आदळून थांबला. पण काही क्षणांतच तो उठून उभा राहीला आणि क्राकुअरला हात करून तो तंबूंच्या दिशेने निघाला ! तंबूपासून जेमतेम ३० फूट अंतरावर तो असताना मध्ये आलेल्या ढगांच्या आवरणामुळे तो दिसेनासा झाला.

क्राकुअरने आपल्या पाठीवरची बॅग खाली भिरकावली आणि तो त्या उतारावरून खाली उतरू लागला. जेमतेम पंधरा मिनीटांतच तो खाली पोहोचला. आपली बॅग पाठीला लावून त्याने तंबूंचा रस्ता पकडला.

क्राकुअरला आपण पाहीलेला गिर्यारोहक अँडी हॅरीस असल्याची खात्री वाटत होती. हॉल आणि हॅन्सनच्या मदतीसाठी हॅरीस पुन्हा हिलरी स्टेपच्या दिशेला गेल्याची त्याच्यापाशी रेडीओ नसल्याने त्याला काहीच कल्पना नव्हती. या गैरसमजुतीमुळे हॅरीसच्या कुटुंबियांना आणि प्रेयसीला पुढे अतीशय मनस्ताप होणार होता.

क्राकुअरच्या आधी कँप ४ वर पोहोचणारा गिर्यारोहक मार्टीन अ‍ॅडम्स होता.

संध्याकाळी ७.००

हिमवादळाचा जोर आता वाढला होता. ७० मैलाच्या वेगाने वाहणारे वारे आणि बर्फ साऊथ कोलला झोडपून काढत होतं.

मार्टीन अ‍ॅडम्स आणि जॉन क्राकुअर कँप ४ वर सुरक्षीत पोहोचले होते !

बिडलमन, ग्रूम, वेदर्स, नम्बा, फॉक्स, मॅडसन, गॅमलगार्ड, स्कोनींग, सँडी हिल आणि दोन शेर्पा एव्हाना क्राकुअरची ज्या उंचवट्यापाशी हॅरीसला पाहील्याची समजूत झाली होती, त्या उंचवट्यावर पोहोचले होते. मात्र त्या उंचवट्यावरुन दोराच्या मदतीशिवाय वेदर्स आणि नम्बा यांच्यासह खाली उतरून येणं अशक्य होतं. भरीला शार्लोट फॉक्सलाही मॅडसनच्या आधाराची गरज भासत होती. फक्त तीन-चार जणांच्या हेडलँपचा प्रकाश अद्याप टिकून होता. बिडलमन आणि ग्रूमने बर्फाचा उंचवटा उतरणं टाळून वेगळ्याच मार्गाने साऊथ कोलवर उतरण्यास सुरवात केली.

मकालू गाऊ आणि त्याचे दोन शेर्पा अदयापही वरच्या उतारावरच होते. त्यांच्याही वर काही अंतरावर फिशर आणि लोपसांग होते.

अँडी हॅरीस जवळपास हिलरी स्टेपच्या पायथ्याशी पोहोचला होता.

हॉल आणि हॅन्सन अद्यापही हिलरी स्टेपवरच होते !

संध्याकाळी ७.३०

अनातोली बुकरीव कँप ४ मधून बाहेर पडला आणि गिर्यारोहकांना शोधून सुरक्षीत परत आणण्यासाठी त्याने पुन्हा चढाईला सुरवात केली ! त्याच्याजवळ ऑक्सीजनने भरलेले तीन टँक्स होते. हेडलँपच्या प्रकाशात तो शक्य तितक्या वेगाने चढाई करण्याचा प्रयत्न करत होता पण झंझावाती वादळामुळे त्याचा वेग मंदावला होता.

नील बिडलमन आणि माईक ग्रूमने इतरांसह साऊथ कोलच्या पठारावर उतरण्यात यश मिळवलं होतं. परंतु ते साऊथ कोलच्या पूर्वेकडच्या तिबेटच्या बाजूला असलेल्या भागात पोहोचले होते. कँप ४ वर पोहोचण्यासाठी त्यांना भर वादळाच्या दिशेकडे तोंड करून किमान २०० ते २५० मी अंतर पार करावं लागणार होतं. त्यांच्याबरोबर असलेल्या शेर्पांना दिशा समजत नव्हती. भर वादळात दिसेल त्या दिशेला ते भरकटत होते. सर्वांना एकत्र ठेवण्याची बिडलमनची पराकाष्ठा सुरू होती. कोणत्याही कारणामुळे एखादा इतरांपासून वेगळा झाला असता तर तो वाचण्याची शक्यताच उरली नसती !

मकालू गाऊ आणि त्याचे दोन शेर्पा, फिशर आणि लोपसांग अद्यापही वरच्या उतारावरच होते.

हॅरीस हिलरी स्टेपच्या पायथ्याशी पोहोचला होता. हॉल आणि हॅन्सन हिलरी स्टेपवरून इंचभरही हलले नव्हते !

रात्री ८.००

साऊथ कोलवर क्राकुअर आणि अ‍ॅडम्स आपल्या तंबूत कोसळलेले होते.

बुकरीवची इतर गिर्यारोहकांच्या शोधात चढाई सुरूच होती. एव्हाना तो साऊथ कोलपासून ६०० फूट उंचीवर पोहोचला होता

बिडलमन, ग्रूम आणि इतर सर्वजण साऊथ कोलवर हिमवादळात इतस्ततः भरकटतच होते.

लोपसांग आणि फिशरची बाल्कनीच्या खाली ३०० फूट उंचीवर मकालू गाऊशी भेट झाली. गाऊची अवस्था अतिशय बिकट झाली होती. पुढच्या उतारावरून उतरुन जाणं त्याला अशक्य झाल्यामुळे त्याच्या शेर्पांनी साऊथ कोलपासून सुमारे १२०० फूट उंचीवर गाऊला एका सुरक्षीत ठिकाणी बसवून साऊथ कोल गाठली होती.

गाऊप्रमाणे फिशरलाही खाली उतरणं अशक्य झालं होतं. त्याने गाऊच्या जोडीला तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ऑक्सीजन टँकच्या रेग्युलेटरमध्ये बर्फ अडकला होता. फिशरने लोपसांगला खाली उतरण्याचा सल्ला दिला. पण फिशरच्या काळजीने लोपसांगने खाली उतरण्यास ठाम नकार दिला. एव्हाना लोपसांग स्वतःही प्रचंड थकला होता, पण फिशरला सोडून जाण्याची त्याची तयारी नव्हती.

हॉल आणि हॅन्सन हिलरी स्टेपवरच होते, पण हॅरीस कुठे आहे याचा कोणालाच पत्ता नव्हता.

रात्री ९.००

अनातोली बुकरीव इतरांचा शोध घेण्याचा प्रयत्न सोडून कँप ४ वर परतला होता. पर्वताच्या उतारावर एकही गिर्यारोहकाशी त्याची गाठ पडली नव्हती. आपले सहकारी आणि इतर सर्वजण साऊथ कोलवरच भरकटत असल्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.

फिशरने लोपसांगचं मन वळवण्यात यश मिळवलं होतं. लोपसांग थंडी आणि वा-याने कुड़कुडत होता. फिशरने त्याला सांगीतलं,

" तू खाली जा लोपसांग आणि अनातोलीला शेर्पांबरोबर वर पाठव !"

लोपसांगने अखेर खाली उतरण्याची फिशरची सूचना मान्यं केली. त्याला आणि मकालू गाऊला दोराला सुरक्षीत बांधून ठेऊन लोपसांगने खाली उतरण्यास सुरवात केली. फिशर आणि गाऊ साऊथ कोलपासून सुमारे १२०० फूट उंचीवर होते.

हॅरीस, हॉल आणि हॅन्सन अद्यापही वरच होते !

रात्री १०.००

स्टुअर्ट हचिन्सन कँप ४ वर तंबूपासून काही अंतरापर्यंत गिर्यारोहकांच्या शोधात अद्यापही खेपा मारत होता. वादळ थंडावण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं. झंझावाती वारे आणि बर्फवृष्टी सुरूच होती. दृष्यमानता जेमतेम १ मी अंतरापर्यंत कमी झालेली होती ! हचिन्सनने इतरांच्या शोधात रात्री ८.०० पासून सहा फे-या मारल्या होत्या. एका फेरीत त्याची परत फिरलेल्या बुकरीवशी गाठ पडली होती.

बिडलमन आणि ग्रूम बरोबरचे सर्व गिर्यारोहक साऊथ कोलवर अद्यापही भरकटत होते ! सर्वांना सरळ एका रांगेत चालण्याची वारंवार सूचना दोघंही देत होते. मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच बिडलमन एका लहानशा उंचवट्यावर पोहोचला आणि.....

आपण एका प्रचंड दरीच्या काठावरच आपण उभे आहोत हे त्याच्या ध्यानात आलं !

भरकटलेले गिर्यारोहक साऊथ कोलच्या पूर्वेच्या टोकाला कांगशुंग धारेच्या ७००० फूट खोल दरीच्या काठाजवळ पोहोचले होते ! कँप ४ त्यांच्यापासून पश्चिमेला ३०० मी ( १००० फूट ) अंतरावर होता !

" वादळात तसेच भरकटत राहीलो तर आमच्यापैकी कोणीतरी कोसळून पडेल याची मला जाणीव झाली." बिडलमन म्हणतो, " नम्बाला ओढताना मी पार दमलो होतो. माईकचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. फॉक्स आणि सँडी जेमतेम उभ्या राहू शकत होत्या. शेवटी मी वादळ निवळेपर्यंत सर्वांना एका जागी बसून राहण्याची सूचना दिली."

बिडलमन आणि स्कोनींगने आडोसा शोधण्यास सुरवात केली, पण कसलाच आडोसा उपलब्ध नव्हता. अखेर एकमेकाला चिकटून सर्वजण वादळाचा जोर कमी होण्याची वाट पाहत बसले. तुफान वेगाने वाहणा-या थंडगार वा-यामुळे सर्वांची अवस्था बिकट झाली होती. शार्लोट फॉक्स म्हणते,

" माझे डोळे जवळजवळ गोठले होते. त्या वादळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मी हातपाय जवळ दुमडून मृत्यूची वाट पाहत बसले !"

" मला मरायचं नाही ! मला घरी घेऊन चला !" सँडी हिल पिटमन मधूनच वेडाच्या झटक्यात बरळत होती !

लोपसांग साऊथ कोलच्या मार्गाला लागलेला होता.

फिशर आणि गाऊ साऊथ कोलपासून १२०० फूट उंचीवर होते. हॉल आणि हॅन्सन अद्यापही हिलरी स्टेपच्या माथ्यावरच होते. अँडी हॅरीसचा अद्यापही पत्ता नव्हता !

११ मे १९९६
मध्यरात्री १२.००

नील बिडलमन सावधपणे हिमवादळावर लक्षं ठेवून होता. मध्यरात्रीपूर्वी काही मिनीटेच त्याला आकाशात चमकणा-या चांदण्या दृष्टीस पडल्या. साऊथ कोलवर हिमवादळाचं थैमान अद्यापही सुरू होतं, पण आता ढगांचं आवरण निवळण्यास सुरवात झाली होती. एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखरं आता स्पष्ट दिसू लागली होती. या शिखरांच्या दिशेवरून आपण कँप ४ शोधून काढू शकतो अशी क्लेव स्कोनींगला खात्री होती. आपणापैकी कोणीतरी कँप ४ गाठून सुटका पथक आणण्यात यशस्वी झालं नाही तर आपण निश्चीतच मृत्युमूखी पडू याबद्दल बिडलमनला कोणतीच शंका वाटत नव्हती. स्कोनींगच्या भरवशावर त्याने कँप ४ गाठण्याचा निर्णय घेतला.

सँडी हिल, वेदर्स, फॉक्स आणि नम्बा यांना एक पाऊलही चालणं अशक्यं झालं होतं. टिम मॅडसनची त्याची प्रेयसी असलेल्या फॉक्सला त्या अवस्थेत सोडून जाण्याची तयारी नव्हती. त्याने त्या सर्वांबरोबर सुटका पथक येईपर्यंत थांबण्याचं ठरवलं ! बिडलमन, ग्रूम, स्कोनींग, गॅमलगार्ड आणि दोन शेर्पा कँप ४ च्या वाटेला लागले.

फिशर आणि गाऊला सोडून खाली निघालेला लोपसांग वादळात मार्ग चुकून भऱकटला होता. पश्चिमेला साऊथ कोलच्या खालच्या भागात पोहोचल्यावर आपण मार्ग चुकल्याचं त्याच्या ध्यानात आलं. ल्होत्से धारेच्या उत्तरेची कड चढून अखेर त्याने साऊथ कोल गाठली आणि मध्यरात्रीनंतर काही मिनीटांनी तो कँप ४ वर पोहोचला. बुकरीवला गाठून त्याने फिशरची खबर दिली.

" स्कॉट वर आहे. तो चालू शकत नाही. शेर्पाना घेऊन त्याच्या मदतीला जा !"

लोपसांगकडून फिशरची बातमी कळताच बुकरीव सुटकेच्या तयारीला लागला.

अँडी हॅरीस हिलरी स्टेप चढून हॉल आणि हॅन्सनपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला !

रात्री १२.३०

स्टुअर्ट हचिन्सन सुटकेच्या प्रयत्नाला लागला होता. क्राकुअर आणि दोन शेर्पा शिखरापर्यंतच्या चढाईने पार दमून झोपले होते. कासिस्च्के, फिशबॅक, टेस्क अर्ध्या वाटेतून परत फिरूनही त्यांच्या अंगात त्राण नव्हतं. हचिन्सनपुढे एकट्याने प्रयत्न करण्याशिवाय पर्याय उरला नाही. पण कँप सोडून फार दूरवर जाण्यात त्याला यश आलं नाही.

साऊथ कोलवरच सुरु असलेल्या वादळाच्या मा-याला तोंड देत देत अखेर बिडलमन, ग्रूम, स्कोनींग, गॅमलगार्ड आणि शेर्पा कँप ४ वर पोहोचले ! कँपवर पोहोचताच त्यांची बुकरीवशी भेट झाली. बुकरीव फिशरच्या सुटकेच्या प्रयत्नात होता. पण पाच गिर्यारोहक साऊथ कोलवरच असल्याचं बिडलमनकडून समजतात तो त्यांच्या सुटकेच्या तयारीला लागला.

" सर्वात सँडीची अवस्था खराब आहे !" बिडलमनने त्याला सांगीतलं, " ती जवळपास मरणाला टेकलेली आहे !"

साऊथ कोलवरच्या प्रत्येक तंबूत मदत करू शकतील अशा गिर्यारोहकांचा तो शोध घेऊ लागला. मात्र सर्वच गिर्यारोहक पार थकलेल्या अवस्थेत असल्याचं त्याला आढळून आलं. इयन वूडॉलने मात्र इतरांच्या सुटकेसाठी बाहेर पडण्यास स्पष्ट नकार दिला !

अखेर बुकरीव एकटाच हिमवादळात बाहेर पडला !

फिशर, गाऊ, हॉल, हॅरीस आणि हॅन्सन अद्यापही आपापल्या जागीच होते.

रात्री १.३०

हिमवादळात सुमारे तासभर बुकरीव साऊथ कोलवर इतरांचा शोध घेत होता ! मात्र एकही गिर्यारोहक त्याच्या नजरेस पडला नाही. कँपमध्ये परतून त्याने पुन्हा बिडलमनची गाठ घेतली. त्याच्याकडून इतरांचा नेमका ठावठिकाणा विचारुन घेत तो पुन्हा बाहेर पडला !

टिम मॅडसनच्या हेडलँपची बॅटरी अद्याप टिकून होती ! सुदैवाने त्याच्या हेडलॅंपचा प्रकाश यावेळी बुकरीवला दिसला ! बुकरीव त्यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा ते सर्वजण बर्फावरच आडवे झाले होते !

बिडलमन आणि इतर गिर्यारोहक कँप ४ कडे गेल्यावर मॅडसनने सर्वांना एकत्र केलं होतं. बेक वेदर्सची अजिबात हालचाल दिसून येत नव्हती ! नम्बाचीही तिच परिस्थिती होती. ती बहुदा मरण पावली असावी अशी त्याची कल्पना झाली, परंतु अचानक तिची हालचाल झाली आणि ती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली ! क्षणभरानेच ती पुन्हा आडवी झाली आणि तिची हालचाल बंद पडली !

बुकरीव त्यांच्यापाशी पोहोचताच मॅडसन वगळता इतरांची अवस्था अतिशय कठीण असल्याचं त्याला जाणवलं. नम्बा मरण पावली असावी अशी मॅडसनप्रमाणेच त्याची कल्पना झाली. बुकरीवसमोर प्रत्येक वेळी एकेक गिर्यारोहकाला कँप ४ वर नेण्यावाचून पर्याय उरला नव्हता. आपल्याजवळचा ऑक्सीजन सिलेंडर त्याने सँडीच्या रेग्युलेटरला लावला. सँडीला ऑक्सीजन मिळाल्यावर तिच्यात थोडी तरी ताकद येणार होती. इतरांवर लक्षं ठेबण्यास मॅडसनला बजावून बुकरीव फॉक्ससह कँप ४ कडे निघाला.

रात्री २.३०

शार्लोट फॉक्ससह बुकरीव कँप ४ वर पोहोचला. कँप ४ वर तिला सोडून तो पुन्हा बाहेर पडला !

फॉक्ससह बुकरीव कँप ४ कडे गेल्यावर वेदर्स अचानक उठून उभा राहीला आणि धडपडत निघाला ! मॅडसनच्या ध्यानात येण्यापूर्वीच तो अंधारात दिसेनासा झाला !

रात्री २.४५

रेडीओवर संदेश आला.

" लवकर चल.. चालत रहा वाटेत थांबू नको !"

संदेश देणारा आवाज हॉलचा होता ! त्याच्या नकळतच त्याच्या रेडीओवरून संदेश आला होता ! हॉल बहुधा हॅन्सन आणि हॅरीसला उतरण्याची घाई करत होता !

पहाटे ३.३०

बुकरीव मॅड्सन, सँडी हिल आणि नम्बा पाशी पोहोचला ! सँडी सह तो परत फिरताच मॅडसन त्यांच्यापाठोपाठ निघाला. नम्बा मरण पावली असावी असं दोघांनाही वाटलं होतं. बेक वेदर्सचा पत्ता नव्हता !

पहाटे ४.३०

सँडी हिल आणि मॅडसन यांना कँप ४ वर आणण्यात बुकरीव यशस्वी झाला होता !

अद्याप सात गिर्यारोहक वादळात बाहेर होते !

फिशर आणि गाऊ साऊथ कोलपासून १२०० फूट उंचीवर होते. हॉल, हॅन्सन आणि हॅरीस त्यांच्याही वर होते. नम्बा आणि वेदर्स साऊथ कोलवरच पण मरणासन्न अवस्थेत होते.

दुस-या बाजूला भारतीय तुकडीतील तीन गिर्यारोहकांची परिस्थिती काय होती याचा काहीही पत्ता लागत नव्हता ! त्यांच्याकडून एकही रेडीओ संदेश आलेला नव्हता !

येणारा दिवस काय दाखवणारा होता ?

क्रमशः

प्रतिक्रिया

भटक्य आणि उनाड's picture

19 Mar 2014 - 6:12 pm | भटक्य आणि उनाड

अधाशासारखा वाचतो आहे.. पु भा.टाका लवकर..

केदार-मिसळपाव's picture

19 Mar 2014 - 7:17 pm | केदार-मिसळपाव

हेच लिहावेसे वाटले..

प्रचेतस's picture

19 Mar 2014 - 6:13 pm | प्रचेतस

अत्यंत थरारक.
सलग सर्व भाग वाचून काढले
निसर्ग आणि मानवाचं द्वंद्व उत्तम प्रकारे रेखाटलं आहे.

अजया's picture

19 Mar 2014 - 10:31 pm | अजया

़ पु.भा.प्र.

एका दमात, अधाशासारखे पुर्ण वाचुन काढले. ले़खा मध्ये काही छायाचित्रे, रेखाचित्रे डकवल्यास समजण्यास सोपे जाईल.

~आसिफ.

mayu4u's picture

9 Dec 2016 - 12:13 pm | mayu4u

एवढी सगळी नावं गोंधळात टाकताहेत!

सगळेच भाग एका दमात वाचले.....

पु भ प्र...... लवकर येउदेत....

>>ही पायरी चढून गेल्यावर शिखराचा उतार सुरू होतो. सुमारे ५० डिग्रीचा हा उतार चढून गेल्यावर अख्रेरीस गिर्यारोहक शिखराच्या माथ्यावर पोहोचतात !

"चढ" चढून गेल्यावर... असं म्हणणं अधिक योग्य ठरेल का?

या घटने वर आधारीत एवेरेस्ट नावाचा सिनेमा येउन गेलाय.... त्याची आठवण झाली.
फारच भयानक घटना झाली होती. निसर्गा पुढे माणुस किती हतबल होतो याची प्रचीती.