साऊथ कोल ही २६००० फूट उंचीवरील एव्हरेस्ट आणि ल्होत्से या शिखरांना जोडणारी खिंड आहे. १९५२ च्या स्विस मोहीमेतील गिर्यारोहकांनी सर्वात प्रथम साऊथ कोल वर चढाई केली, परंतु शिखरावर पोहोचण्यात त्यांना अपयश आलं. १९५३ ब्रिटीश मोहीमेत ( हिलरी - तेनसिंग ) विल्फ्रेड नॉईस आणि अनुलू शेर्पा यांनी साऊथ कोलवर प्रथम प्रवेश केला. पुढे हिलरी - तेनसिंग यांनी साऊथ कोलचाही वरच्या भागातून आपल्या अंतिम चढाईला सुरवात केली होती.
सुमारे ४०० मी लांब आणि १५० मी रुंद असलेल्या या पठार वजा खिंडीच्या परिसरात तुफान वेगाने वाहणा-या वा-यांचं साम्राज्यं असतं. एव्हरेस्ट आणि ल्होत्से दरम्यानच्या बेचक्यात असल्यामुळे एव्हरेस्टच्या शिखरापेक्षाही साऊथ कोलवर वा-यांचा जोर अनेकदा जास्त असतो. या सतत घोंघावणा-या वा-यांमुळे कितीही हिमवर्षाव झाला तरीही भुसभुशीत बर्फ पूर्ण गोठण्यापूर्वी तो तिबेटच्या उतारांवर ढकलला जातो. कोलच्या पूर्वेला एका बाचूला ७००० फूट खोल कांगशुंग धारेचा कडा आहे तर दुस-या बाचूला ४००० फूट खोल वेस्टर्न कूम आहे. साऊथ कोलच्या या अनंत काळापासून गोठलेल्या बर्फावर वावरताना बुटांवरचे क्रॅम्पॉन्स आणि बर्फातील कु-हाड ( आईस एक्स ) न वापरणं हे आत्मघातकी ठरू शकतं. एव्हरेस्टच्या अंतिम चढाईपूर्वीचा शेवटचा कँप ४ साऊथ कोलवर उभारला जातो.
साऊथ कोलवर डेथ झोन ची सुरवात होते. ' अल्टीट्यूड सिकनेस ' अथवा उंचीचा त्रास इथे जीवघेणा ठरु शकतो. अनेकदा इथे गिर्यारोहकांची पचनसंस्था पूर्णपणे ठप्प होते ! गिर्यारोहकांना दोन फारतर तीन दिवस आपल्या अंतिम चढाईसाठी मिळू शकतात. हवामान अनुकूल नसेल तर खालच्या कँप वर अनेकदा तर बेस कँप पर्यंत परतावं लागतं.
९ मे च्या संध्याकाळपर्यंत जवळपास सर्व गिर्यारोहक साऊथ कोलवरच्या अखेरच्या कँपवर पोहोचले होते. अंधार पडण्याच्या सुमाराला मॉन्टेनेग्रोच्या मोहीमेतील गिर्यारोहक साऊथ कोलवर परतले. माथ्यावर पोहोचण्यात हवामानामुळे त्यांना अपयश आलं होतं. हिलरी स्टेपच्या पायथ्याशी त्यांनी माघारीचा निर्णय घेतला. दुस-या दिवशीही हवामान साथ देण्याची शक्यता सर्वांना कमीच वाटत होती.
हॉलच्या तुकडीतील कासिस्च्के, वेदर्स, हॅरीस आणि हॅन्सन आपल्या तंबूत विश्रांती घेत असतानाच त्यांना त्यांच्या तंबूबाहेर कोणाच्या तरी धडपडण्याचा आवाज आला. तुफान थंडीत आणि वा-याच्या मा-यात कासिस्च्केने तंबूची कनात उघडताच दक्षिण आफ्रीकन मोहीमेतील गिर्यारोहक ब्रूस हॅरॉड त्याच्या मांडीतच कोसळला ! ब्रूसची अवस्था केविलवाणी होती. तो जेमतेम बोलण्याच्या अवस्थेत होता. त्याच्या तुकडीतील इतर गिर्यारोहक साऊथ कोलच्या वाटेवर नक्की कुठे आहेत हे त्याला माहीत नव्हतं. हॅरीसने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं आणि एका कोप-यात बसवलं.
डग हॅन्सनचीही तब्येत काहीशी खालावलेलीच वाटत होती. तो दोन दिवसांपासून झोपलेला नव्हता. आदल्या दिवशी सकाळनंतर त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं. मात्र कोणत्याही परिस्थितीत शिखर गाठण्याचा त्याचा निर्धार होता. आदल्याच वर्षी त्याला शिखरापासून १०० मी अंतरावर परत फिरावं लागलं होतं. यावर्षी मात्र जीवात जीव असेपर्यंत वर पोहोचण्याचा त्याचा ठाम निश्चय होता. हॅन्सनप्रमाणेच क्राकुअरही दोन दिवसांपासून झोपलेला नव्हता. सतत खोकल्याची उबळ येत असल्याने तो हैराण झाला होता.
साऊथ कोलवरच्या आपापल्या तंबूत विसावलेल्या पन्नास पेक्षा जास्त गिर्यारोहकांना आता रात्रीची प्रतिक्षा होती. प्रत्येक जण मनातून हवामान सुधारण्यासाठी प्रार्थना करत होता. एकत्र तुकडीत असूनही सर्वांच्याच मनात एकाकीपणाची भावना मूळ धरू लागली होती. अंतिम चढाईच्या टप्प्यात प्रत्येकाला आपलं लक्ष्य नजरेसमोर ठेवूनच वाटचाल करावी लागणार होती. आपल्या सहका-यांपैकी कोणी मागे पडलं तरी त्याकडे फारसं लक्षं न देता स्वत: शिखर गाठणं हे प्रमुख उद्दीष्टं होतं.
एव्हरेस्टच्या विरूध्द बाजूला भारतीय तुकडी ८३०० मी ( २७२३० फूट ) उंचीवरील आपल्या कँप ६ वर पोहोचलेली होती. १० मे रोजीच एव्हरेस्टचं शिखर गाठण्याचा त्यांचा पक्का निर्धार होता. जपानी मोहीमेतील गिर्यारोहकांनी ११ मे तारीख निवडली होती. कोणत्याही परिस्थितीत ११ मे ला एव्हरेस्ट पादाक्रांत करायचंच या इराद्याने जपानी तळ ठोकून बसले होते.
९ मे च्या दुपारपासून साऊथ कोलवर तुफानी वेगाने वारे वाहत होते. अनेक गिर्यारोहकांना आपल्याला शिखरावर जाण्याची संधी न मिळताच परतावं लागेल अशी भीती वाटू लागली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला मात्रं आश्चर्यकारक रितीने वातावरण निवळलं ! घोंघावणा-या वा-याचा जोर पूर्ण ओसरला ! एव्हरेस्टच्या क्षणांत बदलू शकणा-या हवामानाची एक चुणूक सगळ्यांनाच अनुभवण्यास मिळाली.
९ मे च्या रात्री ११.३० च्या सुमाराला रॉब हॉलच्या तुकडीतील गिर्यारोहकांनी आपल्या अंतिम उद्दीष्टाकडे वाटचाल सुरु केली ! स्वतः हॉल, अँडी हॅरीस, माईक ग्रूम हे गाईड ,आठ क्लायंटस जॉन क्राकुअर, डग हॅन्सन, लू कासिस्च्के, बेक वेदर्स, स्टुअर्ट हचिन्सन, जॉन टेस्क, फ्रॅंक फिशबेक, यासुको नम्बा आणि चार शेर्पा असे एकूण पंधरा जण शिखराच्या दिशने निघाले. हॉलच्या पाठोपाठ अर्ध्या तासाच्या अंतराने स्कॉट फिशरच्या तुकडीतील फिशर, अनातोली बुकरीव, नील बिडलमन हे गाईड आणि सहा क्लायंट्स शार्लोट फॉक्स, टिम मॅडसन, सँडी हिल पिटमन, क्लेव स्कोनींग, लेनी गॅमलगार्ड आणि मार्टीन अॅडम्स आणि सहा शेर्पा अशा एकूण १५ जणांनी शिखराकडे कूच केलं. त्यांच्यापाठोपाठ तीन शेर्पांसह मकालू गाऊ शिखराच्या वाटेला लागला. इयन वूडॉलचा त्याच रात्री निघण्याचा अट्टाहास होता, पण साऊथ कोलपर्यंतच्या चढाईतच दमछाक झालेल्या दक्षिण आफ्रीकनांनी आपल्या तंबूंतून बाहेर पडण्याचीही तसदी घेतली नाही.
एकूण ३४ गिर्यारोहक एव्हरेस्टवर विजय मिळवण्याच्या इराद्याने साऊथ कोलवरून निघाले होते. यापैकी किती जण आपलं उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होणार होते ?
चढाईला आता सुरवात झाली होती. काही वेळातच मकालू शिखराच्या धारेच्या आडून चंद्रोदय झाला. चंद्रप्रकाशात चढाईचा मार्ग सुस्पष्ट दिसत होता. दूर अंतरावर ईशान्येला तराई भागावर असलेलं ढगांचं साम्राज्य हळूहळू दूर होत होतं.
चढाईला सुरवात झाल्यावर तीन तासांनी फ्रँक फिशबेकने परत फिरण्याचा निर्णय घेतला. एव्हरेस्टचा माथा गाठण्याचा त्याचा चौथा प्रयत्न इथेच संपला. फिशबेकच्या पाठोपाठ डग हॅन्सननेही परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या तुकडीतील सर्वजण पुढे जाण्याची वाट पाहत असतानाच सर्वात मागून येणा-या हॉलशी त्याची गाठ पडली. दोघात झालेल्या लहानशा चर्चेनंतर हॅन्सनने परत फिरण्याचा इरादा बदलून पुन्हा चढाईस प्रारंभ केला.
साऊथ कोलवरून निघण्यापूर्वी हॉलने आपल्या तुकडीतील गिर्यारोहकांना बाल्कनी गाठेपर्यंत एकमेकांपासून फार दूर न जाण्याबद्दल बजावलं होतं. नेमकी हीच सूचना फिशरने आपल्या गिर्यारोहकांनाही दिलेली होती. परिणामतः हॉलच्या तुकडीतील आघाडीवर असलेल्या क्राकुअर, ग्रूम आणि शेर्पा अंग दोर्जे यांना मागून येणा-या इतर गिर्यारोहकांसाठी वाट पाहत खोळंबून राहवं लागत होतं. एव्हाना फिशरच्या तुकडीने त्यांना गाठलं होतं. मकालू गाऊ आणि त्याचे शेर्पाही पाठोपाठ येतच होते. लवकरच शिखराच्या दिशेने जाणा-या तीनही तुकड्यांतील गिर्यारोहकांची एकच रांग तयार झाली.
सुमारे ४.१५ च्या सुमाराला आघाडीवर इतरांसाठी खोळंबून राहिलेल्या क्राकुअर आणि अंग दोर्जेने पुन्हा चढाईस सुरवात केली. पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणांबरोबरच ५.३० च्या सुमाराला पोटरीपर्यंत येण्या-या भुसभुशीत बर्फातून वाट काढत त्यांनी बाल्कनी गाठली. तुकडीतील सर्वजण बाल्कनीत पोहोचल्याशिवाय पुढे चढाई न करण्याविषयी हॉलने आपल्या तुकडीतील सर्वांना सक्त ताकीद दिलेली होती. त्यामुळे तिथे थांबून वाट पाहण्यापलीकडे त्यांच्या हाती काही नव्हतं. स्कॉट फिशरची तुकडी आणि आपल्या तीन शेर्पांसह मकालू गाऊ पुढे निघून गेल्यावरही हॉलच्या तुकडीतील सर्वजण बाल्कनीच्या परिसरात थांबून राहिलेले होते. अखेरीस दीड तासानंतर सुमारे ७.१० च्या सुमाराला हॉल आणि वेदर्स बाल्कनीत पोहोचले आणि आगेकूच पुन्हा सुरू झाली.
काही वेळातच हॉलच्या तुकडीत आघाडीवर असलेल्या क्राकुअर आणि ग्रूमची फिशरचा शेर्पा सरदार लोपसांग आणि सँडी हिल पिटमन यांच्याशी गाठ पडली. लोपसांग सँडीला दोराच्या आधाराने वर नेत होता. सँडीच्या मते तिला कोणत्याही आधाराची आवश्यकता वाटत नव्हती परंतु केवळ लोपसांगबद्दच्या आणि त्याच्या गिर्यारोहण कौशल्याविषयीच्या आदराने तिने नापसंती व्यक्त केली नाही.
साऊथ कोल वरून निघाल्यानंतरच्या अधीक उंचीच्या प्रदेशात - डेथ झोन मध्ये कमीत कमी वेळेत शिखरावर चढाई करून पुन्हा खाली परतून येणं हे अत्यंत महत्वाचं असतं. सामान्यतः साऊथ कोलवरून शिखराकडे मार्गक्रमण करताना गिर्यारोहक ऑक्सीजनचे दोन टँक बरोबर घेऊन निघतात. तिसरा टॅंक साऊथ समिटजवळच्या ऑक्सीजनच्या साठ्यातून मिळू शकतो. साऊथ समिटपाशी शेर्पांनी ऑक्सीजन टँकचा पुरेसा साठा आधीच केलेला असतो. तीन टँक्समधील ऑक्सीजनचा पुरवठा सामान्यतः दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत पुरतो. सरावाने आणि अॅक्लमटायझेशनमुळे नंतरही काही काळ गिर्यारोहक तग धरू शकतात. मात्र कितीही धडधाकट माणूस असला तरी एका विशीष्ट मर्यादेनंतर त्याची शारिरीक क्षमता संपुष्टात येऊन हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा ( एच.ए,पी,ई ) आणि हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडेमा ( एच.ए.सी.ई. ), हिमबाधा ( फ्रॉस्टबाईट ) असे घातक आजार बळावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वेळेचं नियोजन सुरक्षीततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं.
हॉल, फिशर आणि बुकरीव यांनी यापूर्वीही एव्हरेस्टवर चढाई केलेली असल्याने या सर्व परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. साऊथ कोलपासून शिखरापर्यंतची चढाई वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने भागात सुरक्षीत दोर बांधणं अत्यावश्यक होतं. परंतु या वर्षी आतापर्यंत कोणीही शिखरापर्यंत पोहोचण्यात यशस्वी न झाल्याने दोर बांधलेले नसणार हे उघड होतं. गोरान क्रपने शिखरापासून १०० मी च्या अंतरापर्यंत मजल मारली होती, पण त्याने एकही दोर बांधला नव्हता ! मॉन्टेनेग्रो मोहीमेतील गिर्यारोहकांनी क्रपच्याही पुढे मजल मारली होती आणि काही अंतरापर्यंत दोरही बांधला होता, पण कोणाकडेही फारसा अनुभव नसल्याने त्यांनी सुरवातीच्या सोप्या उतारांच्या भागातच सर्व दोर बांधून टाकला होता !
हॉल आणि फिशर यांनी अगोदरच या परिस्थितीचा विचार केला होता. बेस कँपवरून निघण्यापूर्वीच त्यांनी आपल्या तुकडीतील दोन-दोन शेर्पांनी कँप ४ वरून इतरांच्या आधी दिड तास निघून पर्वताच्या वरच्या भागात योग्य त्या जागी सुरक्षा दोर बांधण्याची योजना केलेली होती. दीड तास आधी निघाल्यावर शेर्पांना इतर गिर्यारोहक पोहोचण्यापूर्वी दोर बांधण्यास पुरेसा कालावधी मिळणार होता. नील बिडलमन म्हणतो,
" हॉलने या योजनेप्रमाणे दोर बांधण्याचं शेर्पा आणि आम्हा गाईडना बजावून सांगीतलं होतं. कोणत्याही परिस्थितीत वरच्या भागात वाहतूक कोंडी ( बॉटलनेक ) होणं टाळणं अत्यावश्यक होतं. जाणार प्रत्येक क्षण किती मोलाचा असू शकतो याची त्याला आणि स्कॉटला पूर्ण कल्पना होती !"
असं असतानाही हॉलने तुकडीतील सर्वजण बाल्कनीत पोहोचेपर्यंत पुढे जाण्यापासून ग्रूम, क्राकुअर आणि अंग दोर्जेला का रोखलं होतं ?
हॉल आणि फिशरच्या योजनेनुसार दीड तास आधी शेर्पांनी कँप ४ वरून शिखराकडे प्रस्थान करणं आवश्यक होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र दोन्ही तुकडीतील एकही शेर्पा अथवा गाईड आधी पुढे निघाला नव्हता ! संध्याकाळी तब्बल साडेसात पर्यंत सुरू असलेल्या वादळाने त्यांना लवकर पुढे निघणं अशक्यं केलं असण्याची शक्यता होती. लोपसांगच्या मताप्रमाणे मात्र हॉल आणि फिशरला मॉन्टेनेग्रोच्या गिर्यारोहकांकडून साऊथ समिटपर्यंत दोर बांधलेले असल्याची माहीती मिळाल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांनी तो बेत रद्द केला होता ! मात्र बिडलमन, ग्रूम, हॅरिस किंवा बुकरीवला याची अजिबात कल्पना नव्हती !
जॉन क्राकुअरच्या मतानुसार अंग दोर्जे आणि लोपसांग यांचं एकमेकांशी अजिबात पटत नव्हतं. १९९५ सालच्या एव्हरेस्ट मोहीमेत हॉलच्या तुकडीत दोघांचाही समावेश असताना हॉलने सरदार असलेल्या दोर्जेला वगळून लोपसांगला शिखरावर चढण्याची शक्यता आजमावून पाहण्याची संधी दिली होती. दोर्जेला तो स्वतःचा अपमान वाटला होता. या वर्षी दोघंही वेगळ्या तुकडीत असले तरीही लोपसांगबरोबर पुन्हा त्याला दोर बांधण्याचं काम करावं लागणार होतं, परंतु सँडी हिल पिटमनला मदतीची आवश्यकता नसतानाही लोपसांग तिच्यासाठी मागे रेंगाळला होता. क्राकुअरबरोबर बाल्कनीत लोपसांगची वाट पाहत अंग दोर्जे बसला असताना येऊन पोहोचलेल्या नील बिडलमनने लोपसांगऐवजी दोर बांधण्यास मदत करायची जबाबदरी स्वीकारल्यावर दोर्जे कामाला लागला. दगडी पाय-यांच्या खाली गिर्यारोहक वाट पाहत असतांना बिडलमन आणि दोर्जे तासभर दोर बांधण्याच्या कामात मग्न होते !
शिखरावर पोहोचण्यास उशीर होण्यास कारणीभूत ठरणारी पहीली अडचण उद्भवली होती !
जपानची यासुको नम्बा साऊथ कोलवर पोहोचेपर्यंत अगदी हळूहळू चढत होती. मात्र चढाईच्या या शेवटच्या टप्प्यात तिच्यात आगळाच उत्साह संचारला होता. यासुकोच्या एव्हरेस्टच्या चढाईकडे तिचे सर्व मित्र-मैत्रीणी डोळे लावून बसले होते. सातही खंडातील सर्वोच्च शिखरं चढण्याची सँडी हिल प्रमाणेच तिचीही मनीषा होती. शिखरावर जाण्यास ती विलक्षण आतुर झाली होती. तिच्या घाईच्या नादात आणि अनुभवाच्या अभावामुळे नील बिडलमनच्या जवळजवळ जीवावर बेतलं !
अंग दोर्जेच्या मदतीला उतरलेला बिडलमन इतर गिर्यारोहकांपासून सुमारे १०० फूट उंचीवर सरळ उभ्या दगडाला लगटून दोर बांधण्यात मग्न होता. त्याचा दोर सुरक्षीतपणे बांधून झाला नव्हता. उरलेला दोर त्याने कड्यावरुन खाली सोडलेला होता. नेमक्या या दोरालाच यासुकोने आपल्या हार्नेसला असलेला सुरक्षा हूक ( जुमार ) अडकवला आणि दोरावरून चढण्याची तयारी केली ! आपल्या देहाचा सर्व भार तिने दोरावर टाकण्यापूर्वीच माईक ग्रूमचं तिच्याकडे लक्षं गेलं ! तिने आपल्या देहाचा भार दोरावर टाकला असता तर वरती दगडाला लगटलेला बिडलमन एक क्षणात खाली कोसळला असता ! नम्बाच्या अधीरतेमुळे होऊ घातलेला अपघात वेळीच टळला होता !
बाल्कनीत दोर बांधण्यास लागणा-या वेळामुळे गिर्यारोहकांची एकापाठी एक अशी रांग लागली होती. या रांगेच्या शेवटच्या टोकाला स्टुअर्ट हचिन्सन, जॉन टेस्क आणि लू कासिस्च्के हॉलबरोबर चढत होते. त्यांच्या पुढ्यातच मकालू गाऊ आणि त्याचे तीन शेर्पा एकमेकांना जवळपास चिकटूनच पुढे सरकत होते.
" ते एकमेकांच्या इतक्या जवळ होते की त्यांना ओलांडून पुढे जाणं आम्हाला अशक्य झालं होतं !" हचिन्सन म्हणतो, " कित्येकदा त्यांच्यामुळे आम्हाला आमचा वेग कमी करावा लागत होता !"
एव्हरेस्टच्या शिखरावरून सुरक्षीत परत उतरायचं असल्यास दुपारी १ ते जास्तीत जास्त २ च्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू करावा लागतो. बेस कॅंपवर असताना सर्वच मोहीमांच्या प्रमुखांनी आपल्या क्लायंट्सच्या गळी पुन्हा-पुन्हा ही गोष्ट उतरवलेली होती. मात्रं चढाईच्या दरम्यान शिखरावरची परिस्थिती आणि हवामान पाहूनच अखेर निर्णय घ्यावा लागणार होता.
बाल्कनीत दोर बांधण्यात बिडलमन आणि दोर्जे मग्न असताना हचिन्सनने हॉलकडे शिखरावर पोहोचण्यासाठी लागणा-या वेळेची चौकशी केली. शिखरावर पोहोचण्यास अद्याप किमान तीन तास लागणार होते. सकाळचे ११ वाजलेले होते. हॉल गाऊच्या तुकडीला ओलांडून जाण्यास पुढे सरकला. हचिन्सन, टेस्क आणि कासिस्च्के यांनी आपसात चर्चा केली. दुपारी दोन पूर्वी शिखरावर पोहोचण्याची शक्यता धूसर होत चालली होती. अखेरीस तिघांनीही परत फिरण्याचा निर्णय घेतला ! हॉलने दोन शेर्पा त्यांना सुरक्षीतपणे साऊथ कोलवर पोहोचवण्यासाठी त्यांच्याबरोबर पाठवले.
एव्हरेस्टवर चढाईसाठी क्लायंट्सना सुमारे ६०००० ते ७०००० डॉलर्स खर्च करावे लागले होते. साऊथ कोलवर पोहोचण्यापूर्वी अनेक दिवस सराव आणि अॅक्लमटायझेशनसाठी बेस कँपपासून नियमीतपणे कँप १,२ आणि ३ पर्यंत फे-या कराव्या लागलेल्या होत्या. अशा परिस्थितीत परत फिरणं म्हणजे सगळ्या मेहनतीवर आणि पैशांवर पाणी सोडणं आणि एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याची मिळालेली कदाचित एकमेव संधी वाया घालवणं होतं. परंतु त्या दिवशी हचिन्सन, टेस्क, कासिस्च्के आणि आधीच परतलेला फिशबेक यांनी योग्य वेळी निर्णय घेऊन माघार पत्करली.
साऊथ समिटपासून शिखरावर जाणारा मार्ग हा ईशान्येला असलेल्या सुरीच्या पात्याप्रमाणे आणि पुढे ओथंबलेल्या धारेवरून जातो. या वाटेवरून चालताना एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तरीही डावीकडे २४०० मी ( ८००० फूट) वायव्य धारेच्या पायथ्याशी आणि उजवीकडे ३०५० मी ( १०००० फूट ) कांगशुंग धारेच्या पायथ्याशी कडेलोट होण्याची भीती असते. ही वाट ८७६० मी ( २८७४० फूट ) उंचीवरच्या आणि १२ मी ( ४० फूट ) उंचीच्या खड्या चढणीच्या दगडी भिंतीशी येऊन संपते. हीच ती प्रसिध्द हिलरी स्टेप !
एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे आपल्या पहील्या चढाईच्या वेळेस ही भिंत बाल्यावस्थेत असलेल्या साधनांनी चढून गेले होते ! हिलरी स्टेप पार केल्यावर शिखरापर्यंतची चढाई तुलनेने तशी सोपी आहे. मात्रं या शेवटच्या चढाईतही कडेलोटाची भीती असल्याने ओथंबलेल्या धारेवरच्या बर्फावरून जपूनच चढाई करावी लागते. या चढाईचचा शेवटचा टप्पा म्हणजेच ८८४८ मी ( २९०२९ फूट ) उंचीवरचं एव्हरेस्टचं शिखर !
बाल्कनीच्या वरती १०.४५ च्या सुमाराला बुकरीव, हॅरीस आणि बिडलमन साऊथ समिटवर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ क्राकुअर ११ वाजता साऊथ समिटवर पोहोचला. सुखद वा-याची झुळूक येत होती. निळंभोर आकाश आणि त्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारं जगातील सर्वोच्च शिखर अतिशय मनोहर दिसत होतं. ते दृष्य नजरेत साठवून घेताना कोणालाही वेळेचं भान राहीलं नव्हतं.
साऊथ समिटच्या वरच्या भागात पुन्हा दोर बांधणं आवश्यक होतं. अंग दोर्जे आणि हॉलच्या तुकडीतील आणखीन एक शेर्पा तिथे पोहोचलेले होते, पण ते आरामात चहा पीत बसलेले होते ! त्यांच्यावर नजर जाताच शेवटी ११.४५ च्या सुमाराला बिडलमनने प्रश्न केला,
" अंग दोर्जे, तू दोर बांधणार आहेस की नाही ?"
" नाही ! " दोर्जे शांतपणे उत्तरला !
" नाही ? " बिडलमन तीन ताड उडाला ! " अरे पण का ?"
" तुझ्या शेर्पांपैकी एकही जण इथे आलेला नाही ! मला मदत कोण करेल इथे? "
बिडलमनला काय बोलावं ते कळेना ! खाली गिर्यारोहकांची गर्दी वाढतच होती. अखेरीस बिडलमनने निर्णय घेऊन हॅरीस आणि बुकरीवसह स्वतः दोर बांधण्यास सुरवात केली. क्राकुअरही त्यांच्या मदतीस लागला.
एव्हाना दुपारचे बारा वाजले होते ! अजून एक तास फुकट गेला होता !
शिखर गाठण्यास आणि खाली उतरण्यास आणखीन एक तास उशीर होणार होता !
साडेबाराच्या सुमाराला साऊथ समिटच्या वरच्या धारेवर दोर बांधून बुकरीव, बिडलमन, हॅरीस आणि क्राकुअर हिलरी स्टेपच्या पायथ्याशी पोहोचले होते. त्या चौघांपैकी बुकरीव हा सर्वात अनुभवी गिर्यारोहक होता. पूर्वी दोन वेळा त्याने एव्हरेस्टवर चढाई केली होती. हिलरी स्टेपवर काळजीपूर्वक चढाई करून दोर बांधण्याचं काम साहजिकच त्याच्यावर आलं. बुकरीव वर चढत असताना बिडलमन त्याला खालून दोर पुरवत होता. काळजीपूर्वक हिलरी स्टेप चढून बुकरीव वर पोहोचला आणि त्याने दोर सुरक्षीत आधाराला बांधून इतरांना वर येण्यास इशारा दिला.
हिलरी स्टेपच्या वर सर्वजण पोहोचताच बुकरीव शिखराच्या दिशेन पुढे निघाला. सावधपणे पायाखालच्या बर्फात आईस एक्स रुतवून आधार घेत आणि इतरांसाठी दोर बांधत तो बर्फाने भरलेल्या लहानशा उंचवट्यावर पोहोचला. एका रिकाम्या ऑक्सिजन सिलेंडरच्या सहाय्याने तिथे एक सर्व्हेसाठी खुणेचा खांब ठोकण्यात आलेला होता. बौध्द धर्माच्या परंपरेतील अनेक झेंडे तिथे फडकत होते. पलीकडे नजर टाकल्यावर तिबेटचा विस्तीर्ण बर्फाच्छादीत प्रदेश दिसून येत होता !
१० मे १९९६ - दुपारी १.०७ मी - अनातोली बुकरीव एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला !
बुकरीवच्या पाठोपाठ पाच मिनीटांनी जॉन क्राकुअर शिखरावर येऊन पोहोचला, त्याच्या पाठोपाठ अँडी हॅरीस आला. आणखीन वीस मिनीटांनी नील बिडलमन आणि मार्टीन अॅडम्स यांनी शिखरावर पाय ठेवला.
एकापाठोपाठ एक गिर्यारोहक माथ्यावर पोहोचण्यास सुरवात झाली. चढाई संपली होती. आता यशस्वीपणे उतरून साऊथ कोल गाठणं महत्वाचं होतं. पण अद्यापही कित्येक गिर्यारोहक खालीच होते.
बाल्कनी आणि हिलरी स्टेपशी झालेला खोळंबा किती महागात पडणार होता ?
योग्य वेळी परत फिरण्याचा निर्णय घेणं कोणाला जमणार होतं ?
एव्हरेस्टचं आतापर्यंत उत्तम असलेलं लहरी हवामान काय खेळ मांडणार होतं ?
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Mar 2014 - 2:06 pm | अजया
मजा येतेय वाचायला !
18 Mar 2014 - 2:19 pm | केदार-मिसळपाव
काय मस्त लिहिलेय तुम्ही....
पु. भा. प्र.
18 Mar 2014 - 3:13 pm | इरसाल
आवडले. मायबोलीवर वाचले होते पुन्हा वाचावेसे वाटतेय. मस्त लिहिता तुम्ही.