२२ एप्रिलच्या दुपारी स्कॉट फिशरच्या तुकडीतील शेर्पा नवांग तोपचे याला 'हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा' ने ग्रासलं. फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहक सराव आणि अॅक्लमटायझेशन मध्ये मग्न होते. तीन दिवसांपासून नवांग वरच्या कँपवर सामान वाहून नेण्याचं काम करत होता. फिशर कँप २ वरून बेस कँपला परत येताना त्याला एका दगडावर बसलेला नवांग दिसला होता. दोन दिवसांपासून आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्याने फिशरपाशी कबूल केलं. फिशरने त्याला ताबडतोब बेस कँपला परतण्याची आज्ञा केली. नवांगची मात्र त्या गोष्टीला बिलकूल तयारी नव्हती. फिशरचा हुकूम न मानता तो कँप २ वर परत गेला.
शेर्पा हे हिमालयात उंचीवर राहणारे आणि अत्यंत काटक लोक असतात आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमानही असतो. सामान्यत: शेर्पांना उंच प्रदेशात वावरण्याची सवय असते आणि त्रास झाला तरी तो लपवण्याची त्यांची मनोवृत्ती असते. शेर्पाला उंचीचा त्रास होणं आणि ते त्याने कबूल करणं म्हणजे पुढच्या सर्व मोहीमांमधून त्याची गच्छन्ती अटळ असते. नवांग रोवलींगचा राहणारा होता. या प्रदेशातील शेर्पा हे विशेषतः आपल्या शारिरीक तंदुरूस्तीबद्दल ओळखले जातात. याच विचारसरणीमुळेच नवांगने फिशरची सूचना मनावर घेतली नसावी.
कँप दोनवर माऊंटन मॅडनेसच्या तुकडीतील पीट आणि क्लेव स्कोनींग, डेल क्रूस आणि टिम मॅडसन होते. नवांगची तब्येत आणखीनच खालावली होती. बेस कँपवरुन फिशरच्या तुकडीतील डॉ. इन्ग्रीड हंट आणि हॉलच्या तुकडीतील डॉ. कॅरोलीन मॅकेंझी रेडीओच्या सहाय्याने कँप २ वर नवांगवर उपचार करण्याच्या सूचना देत होत्या. कॅरोलीनच्या सूचनेवरून नवांगला ब्लडप्रेशर कमी होण्याचा धोका पत्करुनही नाईफ्डीपीन देण्यात आलं पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. ऑक्सीजन टँक आणि गमी बॅग मध्ये ठेवूनही नवांगची तब्य्रेत सुधारली नाही म्हटल्यावर मॅडसन आणि क्लेव्ह स्कोनींगने त्याला एका गमी बॅगमध्ये ठेवून ओढत खाली आणण्यास सुरवात केली. काही अंतरावर त्यांना नील बिडलमन आणि शेर्पा भेटले. त्यांच्या ताब्यात नवांगला देऊन स्कोनींग आणि मॅडसन कँप २ वर परतले.
नवांगला घेऊन खाली उतरताना अनेकदा बिडलमनला त्याला खांद्यावर उचलून आणावं लागलं. रात्री साडेबाराच्या सुमाराला नवांगसह बिडलमन बेस कँपला परतला.
बेस कँपला नवांग पोहोचताच डॉ. इन्ग्रीड हंटने त्याचा ताबा घेतला. रात्रभर नवांगला ऑक्सीजन वर ठेवण्यात आलं होतं. सकाळपर्यंत नवांगची तब्येत काहीशी सुधारल्यासारखी वाटली. पण दुपारच्या सुमाराला पुन्हा त्याची परिस्थिती खालावली. डॉ. हंटने नवांगला बेस कँपवरुन आणखीन कमी उंचीवर नेण्याचा प्रस्ताव मांडला, पण स्वतः नवांगसकट कोणीही शेर्पांची त्याला तयारी नव्हती. दोन शेर्पांसह स्वतः हंट नवांगसह खाली उतरण्यास निघाली पण काही अंतरावरच नवांगला एक पाऊलही चालणं अशक्यं झाल्याने ती बेस कँपवर परतली.
बेस कँपवर परतल्यावर गमी बॅगमध्ये पडून राहण्याची हंटची सूचना नवांगने धुडकावली. ( गमी बॅग ही साधारण स्लिपींग बॅगच्या आकाराची प्लॅस्टीकची मोठी पिशवी असते. या पिशवीत हवेचा दाब जास्त करून माणूस कमी उंचीवर असल्याचं वातावरण निर्माण करता येऊ शकतं ), नवांगला खाली आणण्याच्या प्रयत्नात मॅडसनची परिस्थिती नवांगसारखीच होण्याची चिन्हं दिसत होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी मॅडसनला खाली आणण्यासाठी फिशर पुन्हा कँप २ वर पोहोचला होता.
नवांगला उपचारांसाठी फेरीचे इथे नेणं आवश्यक होतं पण ढगाळ हवामान आणि बर्फवृष्टीमुळे हेलीकॉप्टर उडू शकत नव्हतं. अखेर २४ तारखेला हंटने नवांगला एका बास्केट कम् स्ट्रेचरवर चढवलं आणि शेर्पांसह नऊ तासांची पदयात्रा करून ती त्याच्यासह फेरीचे इथे पोहोचली. नवांग राहत असलेलं गाव समुद्रसपाटीपासून फेरीचेइतक्याच उंचीवर होतं. फेरीचेला पोहोचताच नवांगला गमी बॅगेत ठेवण्यात आलं. त्या कल्पनेने गर्भगळीत झालेल्या नवांगने अखेरची प्रार्थना म्हणण्यासाठी लामाला बोलावून घेतलं होतं !
गमी बॅगमध्ये कमी उंचीवरचं वातावरण कायम राहण्यासाठी त्यात पंपाने हवा भरत राहणं आवश्यक असतं. बॅगेत हवा भरणा-या शेर्पा जेताच्या नवांग श्वास घेत नसल्याचं ध्यानात आल्याबरोबर त्याने हंटला बोलावलं. हंटने डॉ. लॅरी सिल्व्हरच्या मदतीने नवांगला कृत्रीम श्वासोच्छ्वास देण्यास सुरवात केली. काही क्षणांनी नवांगच्या तोंडात घातलेल्या नळीतून पंपाच्या सहाय्याने त्याच्या फुफुसांत ऑक्सीजन भरण्यात दोघं डॉ़क्टर यशस्वी झाले. नवांगचा श्वास परत सुरू झाला, परंतु तोपर्यंत तब्बल दहा मिनीटं गेली होती ! दहा मिनीटांत आवश्यक रक्तपुरवठा मेंदूला न झाल्यास मज्जासंस्थेवर कायमचा परिणाम होण्याची शक्यता असते.
पुढचे दोन दिवस हंट, सिल्व्हर आणि डॉ. लिच यांनी नवंगच्या फुफुसांत ऑक्सीजन भरण्याचं काम अव्याहतपणे सुरू ठेवलं होतं. २६ तारखेला हवामान सुधारताच नवांगला काठमांडूच्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. पुढचे कित्येक दिवस नवांग हॉस्पीटलमध्ये होता. त्याचं वजन दिवसेदिवस खालावत गेलं. जूनच्या मध्यावर अखेरीस तो मरण पावला !
बेस कँपवरील विविध मोहीमांमध्ये अनेक वार्ताहर होते. हॉलच्या तुकडीत जॉन क्राकुअर होता. आऊटलूक मासिकातर्फे एव्हरेस्टवर लेखमालिका लिहीण्याच्या कामगिरीवर तो आला होता. द्क्षिण आफ्रीकन मोहीमेच्या गिर्यारोहकांनी एक वेबसाईट चालवली होती. मॅल डफच्या तुकडीचीही वेबसाईट कार्यरत होती. आयमॅक्स मोहीमेट लिसेल क्लार्क आणि ऑड्री साल्केल्ड या दोघी पत्रकार होत्या. आयमॅक्स टीम एव्हरेस्ट चढाईचं संपूर्ण शूटींग करण्याच्या तयारीने आलेली होती. फिशरच्या तुकडीतही दोन पत्रकारांचा समावेश होता. जेन ब्रोमेट रोज फोनवरून आऊटसाईड ऑनलाईनला मोहीमेची प्रगती कळवत होती. मात्र तिला बेस कँपच्या वर चढाई करण्याची परवानगी नव्हती.
फिशरच्या तु़कडीतील दुसरी पत्रकार मात्र गिर्यारोहक होती ती म्हणजे सँडी हिल पिटमन. एव्हरेस्टवर येण्याची तिची ही तिसरी खेप होती. १९९३ साली तिला २४००० फूट उंचीवरुन परत फिरावं लागलं होतं. १९९४ साली डेव्हीड ब्रेशीअर्स, बॅरी ब्लांचार्ड आणि गाजलेला गिर्यारोहक अॅलेक्स लोवे ( मॅकीन्ली पर्वतावरुन कॉनरॅड अॅन्कर च्या साथीने मकालू गाऊ आणि त्याच्या सहका-यांची सुटका करणारा ) यांच्यासह पिटमन पुन्हा एव्हरेस्टच्या मोहीमेवर आली होती. पण २२००० फूट उंचीवरील हिमवादळ आणि खराब हवामानामुळे त्यांना परत फिरावं लागलं होतं. एव्हरेस्टची चढाई पूर्ण करून तिला सेव्हन समिट्स ( सात खंडांतील सात सर्वोच्च गिरीशिखरं - एव्हरेस्ट (आशिया), अकोन्काग्वा (द.अमेरिका), मॅकीन्ली (उ.अमेरिका), किलीमांजारो (आफ्रिका), एल्ब्रस (युरोप), व्हिन्सेंट मॅसीफ (अंटार्क्टीका), कॉस्कीझ्को (ऑस्ट्रेलिया) ) चढून पूर्ण करण्याची आकांक्षा होती. नेमक्या त्याच इराद्याने जपानची यासुको नम्बा एव्हरेस्टच्या मोहीमेवर आलेली होती.
हॉलच्या तुकडीतील डग हॅन्सनला कँप २ वर असताना हिमबाधा झाली. १९९५ मध्येही हिमबाधा झाल्यामुळे त्याला एका पायाच्या अंगठ्याचा काही भाग गमवावा लागला होता. हिमबाधा झाल्यामुळे डग उदास झाला होता. गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील एव्हरेस्ट सर न करताच परतावं लागेल ही रुखरुख त्याच्या मनाला लागून राहिली होती. हॉलने त्याचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केला.
कँप २ हा सामन्यतः वेस्टर्न कूमच्या ल्होत्से धारेच्या बाजूला उभारला जातो. १९२१ सालच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहीमेदरम्यान जॉर्ज मॅलरीने वेस्टर्न कूमचं नामकरण केलं होतं. लांबलचक पसरलेल्या या बर्फाळ दरीच्या मध्यावर असलेल्या मोठ्या कपारीमुळे वेस्टर्न कूम ओलांडण्यासाठी उजव्या टोकाला नुपसेच्या पायथ्याशी ओलांडावी लागते. या प्रदेशाच्या भूसंरचनेमुळे अनेकदा हिमालयातील वा-याच्या झंझावाती आवाजाचा वेस्टर्न कूमवर मागमूस नसतो. या कारणामुळे ' व्हॅली ऑफ सायलेन्स ' म्हणूनही वेस्टर्न कूम ओळखली जाते.
कँप २ वरून निघाल्यावरचा महत्वाचा टप्पा म्हणजे ल्होत्से धारेवरची चढाई. या धारेवरच्या चढाईपूर्वी सुरक्षीततेच्या दृष्टीने चढाईच्या मार्गावर दोर बांधणं अत्यावश्यक होतं. एप्रिलच्या उत्तरार्धात वेस्टर्न कूमच्या वरच्या भागापासून ते ल्होत्से धारेच्या अर्ध्या भागापर्यंत दोर बांधून झालेला होता. या दोर बांधलेल्या शेवटच्या टोकाला कँप ३ होता. कँप ३ वरून ते २६००० फूट उंचीवरच्या ल्होत्से धारेवरच्या कँप ४ पर्यंत दोर बांधण्यासाठी हॉल, फिशर, वूडॉल, गाऊ, बर्लसन आणि इतर मोहिमेच्या प्रमुखांनी परस्परांना सहकार्य करण्याचं मान्य केलं होतं.
हॉलच्या तुकडीतील अंग दोर्जे आणि लाखपा चिरी हे शेर्पा, फिशरच्या तुकडीतील बुकरीव आणि बर्लसनच्या तुकडीतील एक शेर्पा २६ एप्रिलच्या सकाळी या कामगिरीवर निघाले तेव्हा गाऊ आणि वूडॉलच्या तुकडीतील शेर्पा आपापल्या स्लिपींग बॅग्जमध्ये झोपून होते. कँप २ वर आल्यावर हॉलने दुपारी रेडीओद्वारे गाऊ आणि वूडॉलकडे याबद्दल चौकशी केली. गाऊचा शेर्पा सरदार कामी दोर्जे शेर्पा याने दिलगीरी व्यक्त केली आणि यापुढे अशी दिरंगाई होणार नाही हे कबूल केलं, पण वूडॉलने मात्र हॉलला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
" मी तुझ्याशी सभ्यपणे बोलतो आहे इयन " हॉलने सुनावलं, " तुझे शेर्पा का आले नाहीत ?"
" माझ्या शेर्पांना कोणीही उठवण्यास आलं नाही " वूडॉलने उत्तर दिलं.
" अंग दोर्जेने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला होता !"
" तू आणि तुझा शेर्पा दोघंही खोटारडे आहात ! माझे दोन शेर्पा पाठवून तुझ्या अंग दोर्जेला मी फटकावून काढेन !"
वूडॉलच्या या पवित्र्यामुळेतर इतर मोहीमेच्या प्रमुखांशी त्याचे संबंध अधिकच बिघडले.
फिशरच्या तुकडीतील एका महिला गिर्यारोहकाचे ल्होत्से शिखरावर चढाई करणा-या गिर्यारोहकांच्या तुकडीतील एका गिर्यारोहकाशी 'मधुर' संबंध प्रस्थापीत झाल्याची वदंता बेस कँपवरच्या सर्व शेर्पांत पसरलेली होती. त्यांच्या तंबूकडे बोट दाखवून शेर्पा आपापसात कुजबूजत होते. बौध्द धर्मीय शेर्पांच्या सागरमाथा ( एव्हरेस्ट्चं स्थानिक नाव ) पर्वतावर अशा प्रकारच्या संबंध हा अनैतीक होता. त्यांच्या मते सागरमाथा देवतेचा कोप झाल्यामुळे नवांग तोपचे आजारी पडला होता ! अर्थात शेर्पा स्वतः अशा संबंधात गुंतलेले असत हा भाग अलाहिदा. आयमॅक्स तुकडीतील एका स्त्रीचं एका शेर्पाशी सूत जमलेलं होतं आणि त्याकडे मात्र शेर्पांनी सोईस्कररित्या दुर्लक्षं केलं होतं !
फिशरच्या शेर्पांचा सरदार लोपसांग जंगबू शेर्पा हा उत्कृष्ट गिर्यारोहक होता. १९९३ मध्ये विसाव्या वर्षी बचेंद्री पालच्या नेतृत्वाखालील भारतीय मोहीमेत सामानाची वाहतूक करण्याच्या कामगिरीवर त्याची प्रथम नेमणूक झाली होती. मात्र त्याचा काटकपणा आणि शारिरीक क्षमता यांनी प्रभावित झाल्यामुळे त्याला शिखरावर जाण्याची संधी देण्यात आली. ऑक्सीजन टॅंकविना एव्हरेस्टवर पोहोचल्यावर त्याने पुन्हा मागे वळून पाहीलं नव्हतं. पुढच्या अवघ्या तीन वर्षांत त्याने दहा मोहीमांत भाग घेतला होता आणि एव्हरेस्ट, चो यू आणि ब्रॉड पीक ही ८००० मी वरची शिखरं पादाक्रांत केली होती ! फिशरचा लोपसांगवर स्वतःपेक्षाही गाढ विश्वास होता !
ल्होत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचं शिखर एव्हरेस्टच्या अगदी जवळ दक्षिणेला आहे. ल्होत्से आणि एव्हरेस्ट अगदी शेजारीच असल्याने ते सर्वात दुर्लक्षीत गिरीशिखर आहे. एव्हरेटवर नेपाळमधून जाणारे गिर्यारोहक ल्होत्सेच्या वायव्य धारेवरूनच पुढे साऊथ कोलकडे जातात. एव्हरेस्टच्या ल्होत्से धारेवरच सुमारे २४००० फूट उंचीवर एका अरूंद जागी कँप ३ उभारलेला असतो. सामान्यतः चढाईचा सराव आणि वेदर अॅक्लमटायझेधन साठी गिर्यारोहक बेस कँप पासून कँप १, २ आणि ३ पर्यंत ये-जा करत असतात.
फिशरच्या तुकडीतील डेल क्रूसला कँप २ वरुन कँप ३ वर चढून आला होता. दुपारी चहा पिऊन तो सहज म्हणून आडवा झाला तो दुस-या दिवशी तब्बल चोवीस तासांनी शेर्पांनी उठवल्यावरच उठला ! त्याचं डोकं धडपणे काम देत नसल्याची सर्वांना जाणीव झाली. दुस-या दिवशी सकाळी क्रूसने आपली हार्नेस बरोबर उलटी चढवली होती. त्याने कँप २ वर उतरण्यास सुरवात करण्यापूर्वीच फिशर आणि बिडलमनच्या ते ध्यानात आलं होतं. त्या परिस्थितीत जर त्याने उतरण्याचा प्रयत्न केला असता तर रॅपलींगला सुरवात करताक्षणीच तो खाली फेकला गेला असता ! क्रूसला हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडेमा ( मेंदूला सूज येऊन द्रवपदार्थ साचणं ) ची बाधा झाल्याचं फिशरच्या ताबडतोब ध्यानात आलं. बिडलमनला बरोबर देऊन क्रूसची बेस कँपला रवानगी करण्यात आली. हॉलच्या तुकडीतील क्राकुअर आणि वेदर्स यांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. जोडीला क्राकुअरला खोकल्याने ग्रासलं होतं. त्याचं सुमारे वीस पौंड वजन आतापर्यंत कमी झालं होतं. यासुको नम्बालाही उंचीचा त्रास काहीसा जाणवत होता.
एव्हरेस्टच्या चढाईत अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज. संपूर्ण एप्रिलमध्ये बेस कँपवरचं वातावरण शांत असलं तरी झंझावाती आवाज बर्फाचा वर्षाव करीत शिखराजवळ वारे वाहत असतात. बंगालच्या उपसागरावरून येणा-या ईशान्य मौसमी वा-यांमुळे एव्हरेस्टच्या शिखरावर बर्फाचा वर्षाव करणारे वादळी वारे तिबेटकडे ढकलले जातात. मान्सूनच्या आगमनापूर्वीचा हा दोन-तीन आठवड्यांचा काळ हा शिखर गाठण्याच्या
दृष्टीने अत्यंत उत्तम हवामानाचा काळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः ९-१० मेचं वातावरण हे चढाईला सर्वात अनुकूल असतं.
चढाईच्या या अनुकूल वेळापत्रकाची सर्वच मोहीमांच्या प्रमुखांना कल्पना होती त्यामुळे सर्वजण त्याप्रमाणे आपापली अंतीम चढाई आखणार हे उघड होतं. एकाच दिवशी अनेक मोहीमा शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्यास शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी खोळंबा होण्याची शक्यता असते. शिखरावरून उतरण्यास उशीर झाल्यास कडाक्याच्या थंडीत उघड्यावर रात्र काढण्याची पाळी गिर्यारोहकांवर येऊ शकते. अशा परिस्थितीत उंचीमुळे आणि उघड्यावर राहवं लागल्याने उद्भवणारे जीवघेणे आजार गाठतातच !
या सर्व परिस्थितीचा विचार करून रॉब हॉलने सर्व मोहीमांच्या प्रमुखांशी चर्चा करून शिखरावर जाण्याचं वेळापत्रक निश्चीत केलं. पार स्टॉकहोमपासून सायकलवरून काठमांडू पर्यंत आलेला एकांडा शिलेदार गोरान क्रप ३ मे ला सर्वप्रथम एकटा चढाई करणार होता. त्याच्या पाठोपाठ मॉन्टेनेग्रोची मोहीम जाणार होती. ८ आणि ९ मे हे दिवस आयमॅक्स मोहीमेसाठी राखून ठेवण्यात आले होते, १० मे ला हॉल आणि फिशरची मोहीम चढाई करणार होती.टॉड बर्लसन, मॅल डफ आणि गाऊची तैवानी मोहीम त्यानंतर चढाई करणार होते. इयन वूडॉलने मात्र सहकार्य करण्याचं नेहमीप्रमाणे साफ नाकारलं.
" आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही शिखरावर चढाई करू. १० मे किंवा इतर कधीही. इतरांशी मला काही कर्तव्य नाही. ज्याला कोणाला पटत नसेल त्याने आमच्या वाटेत येऊ नये !"
वूडॉलच्या या आडमुठेपणापुढे मात्र सर्वजण वैतागले. हॉलने तर हे पंटर लोक वरती असताना मला जवळपासही जाण्याची ईच्छा नाही असं सरळ जाहीर करून टाकलं !
नॉर्वेचा एकांडा शिलेदार पीटर नेबीने नैऋत्य धारेवरून चढाईचा प्रयत्न सुरुही केला होता. त्याच्या चढाईदरम्यान झालेल्या प्राणघातक अपघातातून तो मरतामरता बचावला होता. अनपेक्षीतपणे कोसळलेली प्रचंड मोठी शिळा त्याच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर धडकली होती. हबकलेला नेबी बेस कँपवर परतला होता. एका भल्या सकाळी सर्व आवरून त्याने बेस कँप सोडला आणि काठमांडूची वाट धरली.
सर्व मोहीमांतील गिर्यारोहकांची पूर्व तयारी झालेली होती. शरिराला चढाईचा आणि उंचीचा सराव झालेला होता. वातावरणाशी समरस होण्याची - अॅक्लमटायझेशनची प्रक्रीया पूर्ण झाली होती. आता प्रत्यक्ष शिखरावर चढाईला सुरवात होणार होती. पुढे काय होणार होतं ? शिखरावर पोहोचण्यात कोण कोण यशस्वी होणार होतं ? तैवानी मोहीमेतील अननुभवी गिर्यारोहक यशस्वी होऊ शकणार होते का ? हुकूमशाही आणि हेकेखोर वूडॉलचे दक्षिण आफ्रीकन्स काही संकट निर्माण करणार होते का ? हॉल आणि फिशरचा अनुभव कितपत कामी येणार होता ? तिबेटच्या बाजूने चढाई करणारी भारतीय मोहीम आणि जपानी मोहीम यांच्यापैकी कोण बाजी मारणार होतं ?
या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांतच मिळणार होती.
क्रमश :
प्रतिक्रिया
13 Mar 2014 - 3:37 pm | इरसाल
मस्त चालु आहे लेखमाला.
पु.भा.प्र.
13 Mar 2014 - 3:41 pm | अजया
वाचतेय.
पु.भा. प्र.
13 Mar 2014 - 6:24 pm | राजो
एक वेगळंच जग अनुभवायला मिळतंय. अप्रतिम..
पुभाप्र हेवेसांनल
13 Mar 2014 - 11:34 pm | लॉरी टांगटूंगकर
+१११११११११
हेच म्हणतो.
14 Mar 2014 - 12:08 am | खटपट्या
पु. भा. प्र.
21 Mar 2014 - 8:53 pm | पैसा
वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटतंय वाचताना!