१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ४

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
14 Mar 2014 - 9:31 am

 
गोरान क्रप हा स्वीडनचा एकांडा शिलेदार शिखरावर सर्वप्रथम चढाई करणार होता. २९ वर्षांचा गोरान स्टॉकहोमहून सायकल चालवत एव्हरेस्टच्या पायथ्याशी आला होता. वाटेत ईराणमध्ये एका स्त्रीने त्याच्या डोक्यात बेसबॉलची बॅट घातली होती ! नशीबाने डोक्यावर हेल्मेट असल्याने तो वाचला होता. पाकीस्तानमधेही एकदा जमावाने त्याच्यावर हल्ला केला होता. या सगळ्यातून सहीसलामत बचावून तो काठमांडूत पोहोचला होता. त्याच्याबरोबर त्याच्या एव्हरेस्टच्या चढाईचं चित्रीकरण करण्यासाठी सहाय्यकही होते.

१ मे ला गोरानने बेस कँप वरून चढाईला सुरवात केली. शिखरापर्यंत कोणत्याही शेर्पाच्या मदतीविना आणि ऑक्सीजन टँकशिवाय जाण्याचा त्याचा निश्चय होता. २ मेच्या दुपारी मजल दरमजल करत तो साऊथ कोलवर पोहोचला.

ल्होत्से धारेवरून चढाईचा पुढचा टप्पा सुरु होतो. ल्होत्से धारेवरच्या कँप ३ मधून निघाल्यावर गिर्यारोहकांना ' जिनेव्हा स्पर ' आणि ' यलो बँड ' ओलांडून जावं लागतं. जिनेव्हा स्पर हा लांब पात्याच्या आकाराचा ( अ‍ॅन्व्हील शेप ) बर्फाने भरलेला खडकाळ भाग आहे. १९५२ च्या स्विस मोहीमेतील गिर्यारोहकांनी जिनेव्हा शहराचं नाव त्याला दिलं आहे ! हा बर्फाळ भाग ओलांडण्यासाठी सुरक्षा दोराचा वापर करावा लागतो. यलो बँड हा संगमरवर आणि अभ्रकाच्या दगडांचा बर्फाळ भाग आहे. हा भाग ओलांडतानाही किमान १०० मी सुरक्षा दोर लागतो. यलो बँड ओलांडून वर पोहोचल्यावर सुमारे ७९२० मी ( २६००० फूट ) वरचा टप्पा म्हणजे साऊथ कोल ! शिखरावर अंतीम चढाई करण्यापूर्वीचा शेवटचा कँप ४ साऊथ कोलवर असतो. साऊथ कोलच्या वर डेथ झोनची ( ८००० मी ) सुरवात होते. या उंचीवर गिर्यारोहक साधारणतः दोन किंवा तीन दिवस राहू शकतात. या कालावधीत चढाई करणं शक्य न झाल्यास खालच्या कँपवर परतणं श्रेयस्कर असतं.

साऊथ कोलवरच्या कॅंपवरुन साधारणतः मध्यरात्रीच्या सुमाराला अंतीम चढाईला सुरवात होते. सुमारे १० ते १२ तासाच्या चढाईचा पहिला टप्पा म्हणजे ८४०० मी ( २७६०० फूट ) उंचीवरील बाल्कनी. बाल्कनी हा अगदी छोटासा सपाट भाग आहे. पुढे गेल्यावर धारेच्या वरच्या बाजूला प्रचंड आकाराच्या शिळांच्या पाय-या गिर्यारोहकांची वाट अडवून उभ्या ठाकतात. या पाय-यांना वळसा घालण्यासाठी पूर्वेच्या दिशेला वळून कमरेपर्यंतच्या उंच बर्फातून वाट काढावी लागते. या भागात कधीही हिमप्रपात ( अ‍ॅव्हलॉन्च ) होण्याची भीती असते. इथून पार झाल्यावर ८७५० मी ( २८७०० फूट ) उंचीवर साऊथ समिट ( एव्हरेस्टचं दक्षिणेकडचं लहान शिखर ) !

२ तारखेच्या रात्री क्रपने आपल्या अंतीम चढाईस सुरवात केली. बेस कँपवरचे एकूण एक गिर्यारोहक आपापल्या रेडीओला कान लावून त्याच्या संदेशांची वाट पाहत होते. शिखराच्या जवळपास गेले कित्येक महीने घोंघावणा-या वा-यांचा सुदैवाने मागमूस नव्हता. मांडीपर्यंत उंचीचा बर्फ सर्वत्र पसरलेला होता. त्या बर्फातून वाट काढत क्रपने साऊथ समिटच्या पायथ्यापर्यंत मजल मारून २८७०० फूट उंची गाठली. शिखरापासून तो आता फक्त १०० मी खाली होता. दुपारचे दोन वाजले होते. आणखी तासाभरात तो शिखरावर पोहोचला असता. मात्र शिखरापर्यंत चढून गेल्यास पुन्हा सुखरूप खाली उतरून येण्याइतकी शक्ती आपल्या थकलेल्या देहात उरणार नाही याची क्रपला कल्पना आली. शिखरापासून १०० मी अंतरावर असताना त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला !

हॉल आणि फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहक कँप २ वर असताना क्रप बेक कँपवर परतला. क्रपच्या शिखरापासून अवघ्या १०० मी अंतरावरून परत फिरण्याच्या निर्णयावर हॉल कमालीचा प्रभावीत झाला होता.

" शिखराच्या एवढं जवळ पोहोचल्यावर सारासार विचार करून परत फिरणं सोपं नसतं !" हॉल उद्गारला, " आणखीन तासभर तो चढला असता तर वर पोहोचला असता ! पण योग्य वेळी अचूक निर्णय घेऊन तो परत फिरला ! ग्रेट जजमेंट ! "

क्रपसारखा योग्य वेळी परत फिरण्याचा निर्णय घेणं आणखी किती जणांना जमणार होतं ?

एव्हरेस्टच्या माथा गाठण्याची सर्वसाधारण वेळ ही दुपारी १ वाजेपर्यंत, जास्तीत जास्त २ वाजेपर्यंत असते. त्या वेळेपूर्वी माथ्यावर पोहोचता आलं नाही तर मागे फिरून साऊथ कोलवरच्या कँपच्या सुरक्षीत आश्रयाला येण्यास उशीर होऊ शकतो. रात्रीच्या अंधारात बर्फातून वाट काढणं हे कमालीचं धोकादायक असतं उघड्यावर मुक्काम करण्याची वेळ आलीच तर ते अत्यंत घातकी ठरू शकतं. आपल्या क्लायंट्सना जवळपास रोजच २ पूर्वी शिखरावरून परत फिरण्याची आठवण मोहीमेचे प्रमुख करून देत असत. सराव, शारिरीक तंदुरूस्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शिखराचा माथा गाठणं कठीण नव्हतं, पण सुखरूप खाली उतरून येणं तितकंच, किंबहुना अधिक महत्वाचं होतं.

डग हॅन्सनचा खोकला एव्हाना बराच कमी झाला होता. परंतु अद्याप त्याला अशक्तपणा जाणवत होता. शिखरावर पोहोचण्याची त्याची आशा मात्र अभंग होती. आदल्याच वर्षी १९९५ मध्ये शिखरापासून अगदी थोड्याशा अंतरावरून क्रप प्रमाणेच हॉल आणि हॅन्सनला परत फिरावं लागलं होतं. या वर्षी काहीही झालं तरीही वर पोहोचायचच या ईर्ष्येने तो तयारी करत होता.

फिशरच्या तुकडीतील डेल क्रूस बेस कँपवर परत निघून गेला होता. त्याला बेस कँप पर्यंत स्वतः फिशरने सुखरूप पोहोचवलं होतं. नील बिडलमनसह तो कँप २ वर परतला होता. फिशर आणि अनातोली बुकरीवचा क्रूसला खाली उतरवून नेण्यावरून काहीसा वाद झाला होता. बुकरीवला वीस वर्षे हिमालयातील मोहीमांचा अनुभव होता. पूर्वी दोन वेळा ऑक्सीजन टँकविना त्याने एव्हरेस्ट सर केलं होतं. तो म्हणतो,

" ऑक्सीजन सिलेंडर वापरल्याने सुरक्षीततेची खोटी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते !"

बुकरीवच्या मते क्लायंट हा स्वतः चांगला गिर्यारोहक असणं फार महत्वाचं होतं. क्लायंट्सना मार्गदर्शन करण्यासाठी गाईड होते, पण क्लायंटने सर्वस्वी गाईडवर अवलंबून असणं बुकरीवला नामंजूर होतं. बेस कँपवर एकदा क्राकुअरशी चर्चा करताना आपलं हे मत त्याने स्पष्टपणे मांडलं होतं.

" सर्वस्वी गाईडवर अवलंबून न राहता ज्यांना एव्हरेस्टवर चढाई करता येत नाही त्यांनी इथे येऊ नये ! वरच्या उतारांवर गाईडवर संपूर्णपणे अवलंबून असणारा क्लायंट हा दोघांच्याही दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. "

८ मे ला हॉल आणि फिशरच्या मोहीमांतले गिर्यारोहक कँप २ वरून कँप ३ वर पोहोचले. वाटेत जवळपास फूटभर लांबीचा एक दगड उतारावरून गडगडत येऊन अँडी हॅरीसच्या छातीवर आदळला. अनपेक्षीतपणे झालेल्या आघाताने हॅरीसचे दोरावरचे हात सुटून तो कोलमडला. सुदैवाने हार्नेसला असलेला हूक दोरात अडकवण्याची त्याने खबरदारी घेतली होती. अन्यथा तो पर्वतावरून त्याला निश्चीतच कोसळला असता आणि मग तो वाचण्याची शक्यताच उरली नसती.

" केवळ सुदैवानेच तो धोंडा माझ्या टाळक्यात लागला नाही !" हॅरीस म्हणाला, " नाहीतर...."

हॉलच्या तुकडीतील फ्रँक फिशबॅक आणि लू कासिस्च्के यांची कँप ३ वर पोहोचताना प्रचंड दमछाक झाली होती. अखेर हॉल आणि माईक ग्रूमच्या मदतीने ते कसेबसे वरपर्यंत पोहोचले. कँप ३ वर पोहोचताच हॉल आणि फिशरने आपापल्या क्लायंट्सना ऑक्सीजनचे टँक्स दिले. इथून पुढच्या चढाईसाठी ऑक्सीजनची जरूर लागणार होती !

एव्हरेस्टच्या चढाईसाठी ऑक्सीजन टॅंक्स आणि सिलेंडर्स वापरावे की नाही हा सुरवातीपासून मतभेदाचा आणि वादग्रस्त विषय. १९२१ सालच्या पहिल्या चढाईच्या वेळेस जॉर्ज मॅलरीनेही ऑक्सीजन सिलेंडरच्या वापराबद्दल तीव्र नाराची व्यक्त केलेली होती. ऑक्सीजन सिलेंडर वापरणं हे गिर्यारोहकांच्या खिलाडूपणाला धरुन नाही असं त्याचं मत होतं. मोहीमेतील शेर्पांनी तर सिलेंडरचं ' इंग्लीश हवा ' असं बारसं करून टाकलं ! परंतु ८००० मी वरच्या ' डेथ झोन ' मध्ये ऑक्सीजन सिलेंडर वापरले नाहीत तर अनेक जीवघेणे आजार ओढवण्याची शक्यता आहे हे सर्वांच्या ध्यानात आलं होतं. १९२४ सालच्या तिस-या मोहीमेवर मॅलरी आणि आयर्विनने अंतीम चढाईच्या वेळेस प्रत्येकी दोन सिलेंडर नेले होते.

८ मे १९७८ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास इटलीच्या दक्षिण टिरोल प्रांतातील रेनॉल्ड मेसनर आणि ऑस्ट्रीयन पीटर हेब्लर यांनी ऑक्सीजन सिलेंडरविना नेपाळमार्गे ( वेस्टर्न कूम - साऊथ कोल ) एव्हरेस्टचा माथा गाठला. गिर्यारोहणाच्या विश्वातील ही एक ऐतिहासीक घटना होती. मात्र अनेक गिर्यारोहक आणि विशेषतः शेर्पांनी यावर विश्वास ठेवण्यास साफ नकार दिला ! शेर्पांच्या मते वर्षानुवर्षे उंच प्रदेशात वावरणारे आणि अतिशय काटक शेर्पादेखील एव्हरेस्टवर ऑक्सीजनशिवाय जाऊ शकत नसताना पाश्चात्य गिर्यारोहकांना हे अशक्य कोटीतील गोष्ट होती. मेसनर आणि हेब्लर यांनी आपल्या अंगावरील कपड्यांत लपवून नेलेल्या लहानशा ऑक्सीजन सिलेंडर्सचा वापर केला होता असा शेर्पांनी दावा केला. तेनसिंग नोर्गे सह अनेक शेर्पांनी एका निवेदनाद्वारे नेपाळ सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीदेखील केली ! नेपाळ सरकारने केलेल्या चौकशीत मात्र दोघांनी ऑक्सीजन वापरल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, परंतु तरीही शेर्पांचा विश्वास बसला नाही.

दोनच वर्षांनी मेसनरने तिबेटमधून पुन्हा ऑक्सीजनविना एव्हरेस्टवर चढाई केली. यावेळी तर मेसनरने एकट्यानेच कोणत्याही शेर्पांच्या मदतीविना २० ऑगस्ट १९८० च्या दुपारी ३ वाजता एव्हरेस्टचा माथा गाठला आणि आपल्या टिकाकारांचा आवाज बंद केला ! माथ्यावर उतरलेल्या ढगांतून आणि बर्फवृष्टीतून चढाईच्या आपल्या अनुभवाबद्दल मेसनर लिहितो,

" दर काही पावलांनी मी थकून आडवा पडून राहत होतो. मधून मधून येणारा खोकला हीच काय ती माझ्या जिवंतपणाची खूण होती. बाकी मी जवळपास पूर्ण सुप्तावस्थेतच असे. काही वेळाने तीव्र ईच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा पुढे काही पावलं टाकायची आणि पुन्हा बर्फात आडवं पडायचं ! शेवटी मी वर पोहोचलो तेव्हा माझ्या मनात कोणतीही भावना उरलेली नव्हती ! "

मेसनरने पुढे १७ ऑक्टोबर १९८८ मध्ये ल्होत्से शिखरावर चढाई करून ८००० मी उंचीवरील सर्व शिखरं पादाक्रांत करणारा पहिला गिर्यारोहक बनण्याचा मान मिळवला. ऑक्सीजनविना एव्हरेस्ट चढाईनंतर मेसनरला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला,

" तू ऑक्सीजनविना दोनदा एव्हरेस्ट चढून आलास. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील मानवाने निसर्गावर मिळवलेला हा सर्वोच्च विजय आहे असं तुला वाटतं का ?"

" ज्या दिवशी मानव थंडीवा-यापासून आणि बर्फापासून कोणत्याही संरक्षणाविना, संपूर्ण नग्नावास्थेत एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचेल तो दिवस मानवाच्या विजयाचा असेल !" मेसनर उत्तरला !

१९९६ पूर्वी ३६ गिर्यारोहकांनी ऑक्सीजनविना एव्हरेस्टचा माथा गाठला होता !

९ मे च्या सकाळी तैवानी मोहीमेतील एक गिर्यारोहक चेन यु नान हा प्रातर्विधीसाठी आपल्या तंबूबाहेर पडला. आपल्या बुटांवर क्रॅम्पॉन लावण्याची तसदी त्याने घेतली नव्हती ! अर्थात या चुकीची शिक्षा त्याला लगेच मिळाली. क्रॅम्पॉनविना त्याच्या बुटांची बर्फावरची पकड सुटली आणि तो ल्होत्से धारेवरून खाली कोसळला आणि सत्तर फूट कोसळल्यावर तो एका कपारीत अडकून थांबला ! आयमॅक्स मोहीमेतील जंगबू शेर्पाने त्याला कोसळताना पाहिल्यावर गाऊला उठवलं आणि दोघांनी मिळून दोराच्या सहाय्याने त्याला बाहेर खेचलं. चेन कमालीचा भेदरलेला असला तरी त्याला जास्तं मार बसला नव्हता. विश्रांतीसाठी चेनला तंबूत सोडून गाऊ आणि इतर गिर्यारोहक दोन शेर्पांसह साऊथ कोलच्या मार्गाला लागले ! १० मे ला चढाई न करण्याचं हॉलला दिलेलं आश्वासन बासनात गुंडाळून त्याच दिवशी चढाई करण्याचा गाऊचा बेत होता !

कँप ३ वर आपल्या तंबूत विश्रांती घेणा-या चेनची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडतच गेली. त्याला प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्याची अवस्था पाहून तैवानी मोहीमेतील एका शेर्पाने त्याच्यासह ल्होत्से धारेवरून खाली कँप २ वर उतरण्यास सुरवात केली. रेडीओद्वारे चेनची अवस्था समजताच साऊथ कोलवर गेलेला जंगबू घाईघाईत खाली उतरून कँप ३ वर आला आणि चेनला खाली उतरवण्यास मदत करू लागला. बर्फाच्या उतारावर कँप २ पासून तीनशे फूट उंचीवर असताना चेन बेशुध्द झाला ! जंगबूने रेडीओद्वारे आपल्या मोहीमेचा प्रमुख डेव्हीड ब्रेशीअर्सला ही बातमी दिली. ब्रेशीअर्स आणि एड व्हिस्टर्स जेमतेम पस्तीस मिनीटांत वर पोहोचले पण तोपर्यंत चेनची प्राणज्योत मालवली होती ! ब्रेशीअर्स आणि व्हिस्टर्स यांनी दोन्ही शेर्पांच्या मदतीने चेनचा मृतदेह कँप २ वर आणला.

गाऊ आणि त्याचे साथीदार साऊथ कोलवरील कँप ४ वर पोहोचले होते. ब्रेशीअर्सने रेडीओवरून गाऊला बातमी दिली,

" मकालू, चेन मरण पावला! "
" ओ.के.!" गाऊ उत्तरला

आपल्या सहका-यांना गाऊने चेनच्या मृत्यूची बातमी सांगीतली. चेनच्या मृत्यनंतरही शिखराचा माथा गाठण्याच्या आपल्या पूर्वीच्या बेतात कोणताच बदल होणार नसल्याचं त्याने आपल्या सहका-यांना आणि ब्रेशीअर्सलादेखील सांगीतलं !

गाऊच्या या कोरडेपणाच्या उत्तराने ब्रेशीअर्स रागाने लालबुंद झाला. तो म्हणतो,

" चेन गाऊचा जवळचा मित्र होता. माझ्या हाताने मी त्याचा मृतदेह खाली आणला आहे. आपल्या मित्राच्या मृत्यूची बातमी तो इतक्या शांतपणे ऐकून दुर्लक्ष कसं करू शकतो हे तोच जाणे ! कदाचीत एव्हरेस्टवर विजयी चढाई ही चेनला योग्य श्रध्दांजली ठरेल असा त्याचा विचार असावा !"

गेल्या सहा आठवड्यांत अनेक मोहीमांतील शेर्पा आणि गिर्यारोहकांना अनेक अपघात झाले होते. रॉब हॉलच्या तुकडीतील शेर्पा तेनसिंग कपारीत पडला होता. नवांग तोपचे हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा ची शिकार झाला होता. मॅल डफच्या तुकडीतला तरूण इंग्लिश गिर्यारोहक जिंज फुलेन ला खुंबू आईसफॉल ओलांडल्यावर ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आला होता. डफच्याच तुकडीतील किम सेबर्ग या डेन्मार्कच्या गिर्यारोहकाच्या हिमखंडाच्या आघाताने बरगड्या तुटल्या होत्या. अँडी हॅरीसच्या छातीवर आदळलेल्या दगडाने त्याला हादरवलेलं होतं. नॉर्वेजियन पीटर नेबी जीवावरच्या संकटातून वाचला होता. मात्र आपला प्राण गमावण्याची वेळ कोणावरही आलेली नव्हती. चेन हा या मोसमातील एव्हरेस्टचा पहिला बळी ठरला होता.

चेनच्या मृत्यूची बातमी साऊथ कोलवरच्या कँप ४ वर वा-यासारखी पसरली. सर्वत्र दु:खाची छाया पसरलेली होती. पण त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर ३३ गिर्यारोहक जगातील सर्वोच्च शिखराच्या चढाईवर निघणार होते. त्या क्षणाची प्रतीक्षा करण्यात आणि आपापल्या चढाईच्या विचारात गुरफटलेला प्रत्येकजण आपल्यापैकीच एकाच्या मृत्यूची बातमी जणू विसरूनच गेला होता. शिखरमाथ्यावरून परतल्यावर झालेल्या घटनेचा शोक करण्यास भरपूर वेळ मिळणार होता.

गोरान क्रपसारखी योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता कोणामध्ये होती ?
 
क्रमश :

प्रतिक्रिया

इरसाल's picture

14 Mar 2014 - 9:39 am | इरसाल

पुन्हा एकदा वाचुनही मन भरत नाही.
असे कधी झालेय काय की स्वतः आधी वर जायचे म्हणुन कुणी मागुन येणार्‍या लोकांचा सुरक्षा दोर कापला किंवा भरकटवला वगैरे ?

अनुप ढेरे's picture

14 Mar 2014 - 10:16 am | अनुप ढेरे

भारी!
आवडलं...

अजया's picture

14 Mar 2014 - 1:35 pm | अजया

मस्तच !

पैसा's picture

14 Mar 2014 - 9:50 pm | पैसा

मस्त लिहिलं आहे! आता आधीचे भाग वाचते.

खटपट्या's picture

14 Mar 2014 - 10:10 pm | खटपट्या

शुभेच्छा