शिक्षा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
6 Mar 2014 - 3:58 pm

म्या लिवत व्हते. आईशप्पत.
तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ”

म्या चालली बायेर.
तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत.
पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”

आदी हाताचेच अंगठे पकाडले.
समदी हसाया लागली.
गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे.

गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले.
पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली.
केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं.

पाय दुखायले.
येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा.
डोळे पुसले.
मान वाकडी करून बायेर पायलं.
रस्त्यावर मोत्या बसला व्हता. माज्याकडं तोंड करून.

घंटी वाजली.
जौन मोत्याच्या गळ्यात हात टाकला.

मोत्या मला कदीबी शिक्षा देत न्हाई.
शिक्षा फकस्त मान्सं देतेत का?
**
शतशब्दकथा
अन्यत्र पूर्वप्रकाशित

शिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

भावना कल्लोळ's picture

6 Mar 2014 - 4:09 pm | भावना कल्लोळ

मस्त आतीवास ताई, आवडले.

सखी's picture

6 Mar 2014 - 11:48 pm | सखी

मस्तच!

amit_m's picture

6 Mar 2014 - 4:12 pm | amit_m

समजले नाही!

आतिवास's picture

6 Mar 2014 - 6:06 pm | आतिवास

हं!
तुमच्यापर्यंत लेखन पोचले नाही; पण त्याबाबत मी काही करू शकत नाही, क्षमस्व!

जेपी's picture

6 Mar 2014 - 4:13 pm | जेपी

आवडल .

ज्यांच्यावर दुसऱ्यांना घडवायची जबाबदारी आहे, त्यांनी शिक्षा दिली तर त्यात वावगे काय?
गुरु आणि शासक यांना हा अधिकार नैसर्गिकरित्या प्राप्त होतो.
आणि ते सुद्धा देतांना मनातून हळहळतात, शेवटी ती सुद्धा माणसेच असतात.

बाकी लेखन खूप छान मजेशीर झाले आहे. "आन्जे"चे लहानपण हुबेहूब समोर आले.

आतिवास's picture

7 Mar 2014 - 9:22 am | आतिवास

'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा अधिकार' यांसारख्या तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर पुष्कळ काही बोलता येईल. पण इथं ते अवांतर होईल कदाचित ... म्हणजे मी लिहिणं अवांतर होईल. पण विषय महत्त्वाचा आहे, पुढे कधीतरी ...

आयुर्हित's picture

7 Mar 2014 - 9:07 pm | आयुर्हित

नक्कीच आवडेल आम्हाला, लिहा सवडीने!

आन्जी सॉल्लिड पात्र आहे. टॉम सॉयर, हक फिन, डेनिस (द मेनेस) यांच्या रांगेत आन्जी फिट्ट बसेल.

तै, सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा.

आतिवास's picture

10 Mar 2014 - 9:47 am | आतिवास

सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा.

फार महत्त्वाकांक्षी कल्पना आहे! बघू, आन्जीत किती जीव आहे त्यावर अवलंबून आहे ते!
तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

योगी९००'s picture

6 Mar 2014 - 5:05 pm | योगी९००

आवडेश..

प्रचेतस's picture

6 Mar 2014 - 11:41 pm | प्रचेतस

कथा आवडली.

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 11:43 pm | आत्मशून्य

म्या चालली बायेर.
तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत.
पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”

क्लास.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2014 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा

अतिशय परिणामकारक!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2014 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा

अतिशय परिणामकारक!

स्पंदना's picture

7 Mar 2014 - 7:18 am | स्पंदना

आंजी खोट नाही बोलायची.
उगा शिक्षा दिली मास्तरांनी. खवट कुठचे!! मास्तर झाल म्हणजे अगदी अमेरिका समजतेत स्वत्;ला.

अतिवास ताई मस्त.

प्रीत-मोहर's picture

7 Mar 2014 - 8:00 am | प्रीत-मोहर

आन्जी रॉक्स.

यशोधरा's picture

7 Mar 2014 - 9:27 am | यशोधरा

वाचतेय.

कानडाऊ योगेशु's picture

7 Mar 2014 - 7:36 pm | कानडाऊ योगेशु

आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही एक वेगळीच शैली तुम्ही निर्माण केली आहे. तुम्ही ह्या शैलीवर बिनदिक्कतपणे स्वामित्व हक्क सांगु शकता.
ह्या कथेत आधीच्या कथेत जो नेहेमीचा पंच असायचा तो काही दिसला नाही. अर्थात तसा तो प्रत्येक कथेत असावाच असाही काही हट्ट नाही.मी फक्त एक निरिक्षण नोंदवले.आन्जीच्या नजरेतुन आजुबाजुला नेहेमीच्या घटनांना पाहणे हे एकाच वेळी मनोरंजक व विचार करायला लावणारे असे आहे.

आतिवास's picture

10 Mar 2014 - 9:52 am | आतिवास

तुमचं निरीक्षण मोकळेपणाने सांगितलंत; त्याबद्दल आभार.
बाकी शैलीच्या हक्काबद्दल - ही आजुबाजूच्या वातावरणातून 'उचललेली' शैली आहे - आणि ती मिश्र शैली आहे!

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Mar 2014 - 8:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

या कथा वाचुन मला प्रकाश संतांचा लंपन आठवतो...किंवा मालगुडी डेजमधला व्यंकटेशा

पिशी अबोली's picture

10 Mar 2014 - 11:45 am | पिशी अबोली

+१११११
लंपन आठवला... :)

पैसा's picture

7 Mar 2014 - 11:21 pm | पैसा

मोत्या कंदीबी सगळ्यांपेक्षा लै चांगला! त्येला फकस्त मायाच करता येत्ये!

जयनीत's picture

9 Mar 2014 - 11:36 am | जयनीत

तसं नाय पैसा ताई मोत्या आन्जीचा फास्टफ्रेंड! आता तो गुर्जीं ना सोडतोय व्हय? निंगु द्या त्यास्नी भायर मंग बगा मजा.

आतिवास's picture

10 Mar 2014 - 9:53 am | आतिवास

हे 'भविष्य' सुचलं नव्हतं मला :-)

आतिवास's picture

10 Mar 2014 - 9:44 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

बॅटमॅन's picture

10 Mar 2014 - 11:42 am | बॅटमॅन

ही कथाही आवडली!

मौ चा उल्लेख वाचून कालच घरात २-३ तास अडकून पडलेल्या एका बोकोबांची आठवण झाली. मस्त गबदुल होता. तो सुटल्यावर अखेरीस जीव भांड्यात पडला.