जीवनगाणे - १ जीवनगाणे - १
जीवनगाणे - २ जीवनगाणे - २
जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३
जीवनगाणे - ४ जीवनगाणे - ४
जीवनगाणे - ५ जीवनगाणे - ५
प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या पोलो खेळाडूंना आता जेम्स वॉटसनच्या रूपाने एका अस्सल पोलो खेळाडूची साथ मिळाली होती.
जेम्स डिवी वॉटसन. जन्म ६ एप्रिल १९२८ रोजी अमेरिकेतल्या इलीनॉय राज्यातील शिकागो इथे. जेम्स डी. वॉटसन याच नावाच्या (बच्चे लोग टाळ्या वाजवा, बापलेक दोघांचे एकच नाव) एका उद्योगपतीच्या पोटी जन्म. आईचे नाव जीन मिचेल. त्याचे पूर्वज इंग्रज होते आणि त्यांच्या कित्येक पिढ्या मध्य पश्चिमेत राहिल्या होत्या. आईचे वडील स्कॉटीश शिंपी होते आणि आईची आई होती १८४०च्या सुमारास अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आयरिश कुटुंबातली. किशोरवयीन जेम्स बहुतेक काळ शिकागोमध्येच होता. होरेस मान ग्रामर स्कूलमध्ये त्याने आठ वर्षे तर नंतरची दोन वर्षे साउथ शोअर हायस्कूलमध्ये काढली.
त्यानंतर त्याला शिकागो विद्यापीठाची ट्यूशन स्कॉलरशिप मिळाली. १९४३च्या उन्हाळ्यात त्याने तिथल्या चार वर्षाच्या प्रात्यक्षिकांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
सन १९४७मध्ये वॉटसनला प्राणीशास्त्रातील बी. एस. सी. पदवी प्राप्त झाली. आता त्याच्या किशोरावस्थेतल्या पक्षीनिरीक्षणाच्या छंदाचे रूपांतर गांभीर्याने जीवोत्पत्तीशास्त्र शिकण्याच्या इच्छेत झाले होते. ब्लूमिंग्टनला इंडियाना विद्यापीठातून प्राणीशास्त्राच्या स्नातकीय अध्ययनासाठी फेलोशिप मिळाल्यामुळे ते शक्य देखील झाले. १९५० साली इथे जेम्स वॉटसन यांना प्राणीशास्त्रातील पी. एच. डी. मिळाली.
इंडियानामध्ये त्यांच्यावर एच जे मुल्लर आणि ट्रेसी मॉर्टन सनबॉर्न (T. M. Sonneborn) हे जीवोत्पत्तीशास्त्रज्ञ तसेच साल्वादोर ई. ल्यूरिया या इटालीत जन्मलेल्या आणि तेव्हा इंडियाना विद्यापीठात रोगजंतूशास्त्र विभागात असलेले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ या तिघांचा प्रभाव पडला. ल्यूरिया यांच्या सक्षम मार्गदर्शनाचा लाभ वॉटसन यांना झाला आणि ’रोगजंतूंच्या गुणित वर्धनावर हॊणारा तीव्र क्ष-किरणांचा परिणाम’ या विषयातील प्रबंधावर त्यांना पी. एच. डी. मिळाली.
सप्टेंबर १९५० ते स्प्टेंबर १९५१ या एक वर्षाच्या काळात त्यांनी कोपनहेगन येथे नॅशनल रीसर्च कौन्सिल मर्क (Merck) फेलो म्हणून पोस्ट डॉक्टरल संशोधन केले. यातील काही काळ हर्मन काल्चकर Herman Kalckar या जीवरसायन शास्त्रज्ञाबरोबर तर उरलेला काळ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ Ole Maaløe (मी उच्चारायचा प्रयत्न केला पण उच्चार करता आला नाहीच वर मर्ढेकरांचे पिपात मेले ओले उंदीर … कवितेतले हे शब्द आठवले) यांचेबरोबर घालवला. इथे त्यांनी रोगजंतू आणि विषाणूंवर संशोधन केले. विषाणू कणांना संसर्ग झाल्यावर त्यांच्या पेकेचे पुढे काय होते यावरचे हे संशोधन होते. अशा तर्हेने विविध जीवांच्या पेकेशी त्यांचा संवाद आता चांगलाच सुरू झाला होता.
१९५१च्या वसंत ऋतूत ते नेपल्समधील प्राणीशास्त्राच्या विभागात जाऊन हर्मन काल्चकर यांना भेटले. मे महिन्याच्या उत्तरार्धात तिथे झालेल्या एका परिसंवादात त्यांची मॉरीस विल्कीन्स यांच्याशी गाठ पडली. इथे त्यांनी पहिल्यांदाच पेकेची क्षकिडीप्र पाहिली. विल्कीन्स यांनी दाखवलेली. त्यामुळे त्यांच्या संशोधनाचा रोख पेशीकेंद्रकाम्ले आणि प्रथिने यांच्या रेण्वीय रचनेच्या रसायनशास्त्राकडे वळण्यास चालना मिळाली. नंतर ल्यूरिया यांनी जॉन केन्ड्र्यू यांच्याशी संपर्क साधून वॉटसन यांना कॅव्हेंडीश प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधी मिळण्यासाठी विचारणा केली. उत्तर होकारार्थी आले आणि अखेर वॉटसन यांचा कॅव्हेंडिशमध्ये प्रवेश झाला. इथे ते क्रीक यांना भेटले आणि त्या दोघांच्याही ध्यानात आले की पेकेची रेणूरचना उलगडणे हे आपले दोघांचेही एकच ध्येय आहे.
रेणूत जनुकीय माहितीचा साठा कसा केला जातो या प्रश्नाची मुळे उकरण्यात दोघांनाही स्वारस्य होते. दोघे एकमेकांशी पेकेवर अथक चर्चा करीत राहिले. उद्देश होता की पेकेचे रेण्वीय त्रिमाचि कसे असेल याची संकल्पना उभी करणे. यातील एक कळीचा भाग त्यांना मॉरीस विल्कीन्सकडून भविष्यात मिळणार होता. नोव्हेंबर १९५१ मध्ये विल्कीन्स केंब्रिजमध्ये आले आणि त्यांनी या दोघांशी चर्चा केली. पेकेच्या रेणूचा आकार दंडसर्पिलाकृती आहे ही क्षकिडीप्रमधून मिळालेली माहिती विल्कीन्सनी या दोघांना दिली. परंतु पुराव्यात त्रुटी मिळत असल्यामुळे रोझलिंड फ्रॅंकलीनने तुसडेपणाने हा निष्कर्ष पक्का असल्याचे नाकारून उडवून लावला.
पण या चर्चेचा परिणाम वेगळाच झाला. क्रीक-वॉटसन जोडगोळीला आता पेकेवर आपणच संशोधन करावेसे वाटू लागले. इथे वाटते की मॉरीस विल्कीन्स यांच्या व्यक्तीमत्त्वात, बोलणाचालण्यात असा काहीतरी करिष्मा असावा की ते पेके रेणूरचनेविषयी एखाद्याच्या मनात अपार कुतूहल निर्माण करू शकत असावेत. क्रीकच्या मनांतही त्यांनी लंडनमध्ये त्यांची भेट झाल्यावर असेच कुतूहल निर्माण केले होते. त्यानंतर एकदा फ्रॅंकलीनशी पेकेवरील तिच्या संशोधनाबद्दल बोलतांना बर्याच गोष्टी वॉटसन यांच्या ध्यानात आल्या.
आता शर्यतीत त्यांची गाठ होती लीनस पाउलींगशी. प्रथिनांचे आल्फा हेलीक्स त्रिमाचि बनवून पाउलींगने बाजी मारली होती. जर का एकदा पाउलींग ब्रिटनला आले तर ते चुटकीसरशी पेकेचे त्रिमाचि बनवतील आणि बाजी मारतील अशी या जोडगोळीला काय सर्वच ब्रिटीश शास्त्रज्ञांना भिती होती. पण या वेळी परिस्थितीचे फासे उलटे पडले. युद्धविरोधी चळवळीतल्या पाउलींगच्या राजकीय प्रचारकार्यामुळे अमेरिकन सरकारने मे १९५२ मध्ये त्यांच्या हालचालींवर निर्बंध घातले गेले. त्यामुळे बराच काळ ते काही ब्रिटनला जाऊ शकले नाहीत. पेकेवरील ब्रिटनमधील एकाही संशोधकाला ते भेटू शकले नाहीत हे खरेच. तसेही पाउलींग प्रथिनांवर संशोधन करण्यात मग्न होतेच.
१९५१च्या उत्तरार्धात क्रीक यांनी केंब्रिजच्या कॅव्हेंडीश लॅबोरेटरीत जेम्स वॉटसन यांच्याबरोबर इतर माहितीबरोबरच किंग्ज कॉलेजच्या ‘मॉरीस विल्कीन्सकडून मिळालेल्या माहितीच्या संदर्भाने संशोधनास सुरुवात केली. वॉटसन आणि क्रीक यांनी मग पेकेच्या दुहेरी दंडसर्पिलाकार रेणूचे त्रिमाचि बनवण्यास सुरुवात केली.
आता गंमत अशी होती की वॉटसन क्रीक हे सध्या अधिकृतरीत्या पेकेवर संशोधन करीत नव्हते. क्रीक आपला पी. एचडीचा प्रबंध लिहीत होते. जेम्स वॉटसन गुंतले होते क्षकिडीप्र साठी मायोग्लोबीनचे रेणू मिळवण्यात. मे १९५२ मधेच वॉटसनने टोमोव्हावर केलेल्या संशोधनात देखील दंडसर्पिलाकार आढळून आला. पहिले त्रिमाचि चुकल्यामुळे आता मात्र त्यांना पेकेवर काम करायला बंदी होती.
वॉटसन आणि क्रीक यांच्या पेके रेणूचे त्रिमाचि उभे करण्याच्या प्रयत्नात सर्वात जास्त महत्त्व होते ते रोझलिंड फ्रॅंकलीनच्या रसायनशास्त्रातील ज्ञानाला. जलाकर्षक साखळ्या बाहेरच्याच बाजूला असायला हव्यात. तरच ग्लुकोजसारखी जलविद्राव्य इंधने तसेच क्षार व रसायने पाण्यात विरघळलेल्या स्थितीत पेशीमध्ये आतबाहेर जाऊयेऊ शकतील. तसेच जलापकर्षक (पाण्यापासून दूर पळणारे – हायड्रोफोबिक) फॉस्फेट्स मध्यभागी गच्च भरून टेवलेले असायला हवेत. त्यांनी बनवलेले पहिले त्रिमाचि पाहिल्यावर ही रसायनशास्त्रीय माहिती तिने या जोडगोळीला दिली. अशा तर्हेने त्यांचे पहिले त्रिमाचि चुकीचे होते हे तिने दाखवून दिले.
ही माहिती त्यांचा प्रतिस्पर्धी लीनस पाउलिंगकडे नसल्यामुळे तो त्याने बनवलेल्या त्रिमाचि मध्ये सुधारणा करू शकला नाही. माझ्या मते रोझलिंड फ्रॅंकलीनचे हे फोटो-५२ पेक्षा जास्त महत्त्वाचे योगदान आहे. १९६२ साली जेव्हा नोबेल जाहीर झाले तेव्हा ती जिवंत असती तर तिला बहुधा नोबेलमध्ये सहभागी करून घेतले असते. मृत व्यक्तीला नोबेल दिले जात नाही. तिच्या काही चरित्रकारांच्या मते नोबेल न मिळाल्यामुळे तिच्यावर अन्याय झाला. माझ्या मते तिच्यावरचा हा अन्याय मृत्यूनेच केला. असो, पुन्हा मागे जाऊयात.
याच सुमारास विल्कीन्स मॉरीसशी संबंध विकोपाला गेल्यामुळे फ्रॅंकलीनने रॅंडल यांच्याकडे बदलीसाठी अर्ज केला. आता तिला बर्कबेकला जायचे होते. रॅंडलनी तिला पेकेवरील संशोधन थांबवून दुसरे संशोधन हाती घेण्याच्या अटीवर तशी परवानगी दिली.
मॉरीस विल्कीन्स आणि रोझलिंड फ्रॅंकलीनमधील वितुष्ट विकोपाला गेल्यानंतर त्या दोघांच्यात सहकार्य होणे कठीण आहे आणि म्हणून पेके संशोधनाच्या त्यांच्या कार्यात प्रगती होणे कठीण हे क्रीकनी जाणले आणि या संशोधनात दुसरा प्रयत्न करावयाचे ठरवले. आपले प्रमुख विलीयम लॉरेन्स ब्रॅग्ज आणि या संशोधनावर पूर्वी काम करणारे आपले स्नेही मॉरीस विल्कीन्स यांच्याकडे त्यांनी तशी परवानगी मागितली.
त्याच सुमारास लीनस पाउलींग हे देखील पेकेवर संशोधन करीत असल्याची बातमी इंग्लंडमध्ये आली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉरीस विल्कीन्स काम करीत असलेले किंग्ज कॉलेज आणि क्रीक-वॉटसन काम अकरीत असलेली कॅव्हेंडीश प्रयोगशाळा या दोन्ही संघटनांना अर्थसाहाय्य मिळत होते मेडीकल रीसर्च काउन्सील म्हणजे MRCचे. त्यामुळे क्रीक-वॉटसनना दुसर्या प्रयत्नाची परवानगी मिळालीच, शिवाय पाउलींगच्या स्पर्धेत MRC चीच संस्था पुढे जाण्यासाठी रोझलिंड फ्रॅंकलीनने रॅंडलना पाठविलेल्या संशोधनातील प्रगतीच्या लेखी अहवालातील विदा आणि प्रतिमा या जोडगोळीला मिळाल्या. त्याशिवाय रोझलिंड फ्रॅंकलीनच्या अप्रकाशित संशोधनाचा पद्धतशीर, शिस्तबद्ध राखलेला विदा (डाटा) त्यांना मॉरीस विल्कीन्सकडून उपलब्ध झाला. त्यामुळे त्रिमाचिची रचना अचूकतेकडे वळली. परिस्थितीचे फासे अनुकूल पडावेत ते असेच छप्पर फाडके, नाही का?
वादाचा मुद्दा हा होता की फ्रॅंकलीनला कळवल्याशिवाय किंवा तिच्या परवानगीशिवाय तिला तिचे निष्कर्ष प्रसिद्ध करायची संधी मिळण्याअगोदर त्या निष्कर्षाचा कोणी वापर करावा कां? डॉ. जगदीशचंद्र बोसांच्या मते संशोधनासाठी अप्रत्यक्षपणे जनतेचाच पैसा खर्च होत असल्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक संशोधन सर्वांनाच विनामूल्य उपलब्ध झाले पाहिजे तर आपले हळदीच्या आणि बासमतीच्या पेटंटच्या मुद्द्यावरून अमेरिकेकन कंपन्यांशी पंगा घेऊन ती लढाई जिंकणारे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मते या संशोधनावर शास्त्रज्ञाचीच मालकी असावी व पेटंटमधून मिळणार्या आर्थिक उत्पन्नाचा ४० टक्के भाग हा त्या शास्त्रज्ञालाच मिळावा. आणि अशा रीतीने वैज्ञानिक संशोधनाचे रूपांतर संपत्तीत झाले पाहिजे. मान्यवर शास्त्रज्ञांची अशी मतमतांतरे आहेत. असो. तेव्हा काय झाले ते पाहू. हा वाद टाळायला मग कॅव्हेंडीश प्रयोगशाळेचे मॅक्स फर्डीनन्ड पेरूट्झ यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. असे काय होते या निवेदनात?
फ्रॅंकलीन आणि क्रीक-वॉटसन यांच्या भेटीत फ्रॅंकलीनने या जोडगोळीला जी माहिती दिली त्यापलीकडे या विदामध्ये काहीही नव्हते असे या निवेदनात म्हटले होते. म्हणजे चोरी केली पण चोरीच्या सामानात महत्त्वाचे किंवा मौल्यवान असे काही नव्हते असे आपण म्हणावे का? विविध संस्थामध्ये परस्परसामंजस्य, आणि सहकार्य असावे तसेच विविध संस्थामधील तज्ञांच्या गटांमध्ये संवाद व्हावा, ज्ञानाची देवाणघेवाण घडावी म्हणूनच MRC ची स्थापना झालेली आहे. तशीच ही ज्ञानाची देवाणघेवाण आहे आणि दोन्ही संस्थांचे अर्थसाहाय्य देखील MRC चेच आहे. तेव्हा या वादावर आता पडदा टाकावा.
तथापि दंडसर्पिलाकाराचे ठोस विधान करण्याआधी क्रीक-वॉटसनना त्यात एक त्रुटी सापडली. फ्रॅंकलीनच्या विदावरून पेकेचा रेणू दंडसर्पिलाकार आहे असा एकच निष्कर्ष निघत नव्हता. शिवाय दोन उभ्या दंडातल्या पायर्या एकाच पातळीवर एकमेकींना मिळत नव्हत्या त्यामुळे त्रिमाचि स्वीकारता येत नव्हते. त्यामुळेच फ्रॅंकलीन या संदर्भात ठोस विधान करीत नव्हती. त्यामुळे या जोडगोळीच्या मनात चलबिचल सुरू झाली.
फ्रॅंकलीनचा अप्रकाशित विदा क्रीक-वॉटसनच्या प्रारूपबांधणीत किती महत्त्वाचा होता हे मात्र कळत नाही. या विदावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत नव्हती. दोन कण्यांना जोडलेल्या जलापकर्षक फॉस्फेट्सची एका बाजूची पायरी वर तर दुसरी खाली. वेगवेगळ्या पातळीवरच्या या पायर्या मध्यभागी एकमेकींना कशा काय जोडायच्या?
विलीयम ऑसबरी याने १९३० मध्ये पेकेच्या काही प्राथमिक क्षकिडीप्र घेतल्या होत्या. त्याविषयी बोलतांना त्याने सांगितले होते की न्यूक्लीओटाईडसच्या साखळ्या पेके मध्ये ३.४ ऍंगस्ट्रॉम म्हणजे ०.३४ नॅनोमीटर अंतरावर रचलेल्या असतात. फ्रॅंकलीनच्या पहिल्या प्रबंधातील निर्देश केलेल्या फक्त आठ संदर्भापैकी हा एक संदर्भ होता. ऑसबरीने प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षाचे विश्लेषण आणि विल्कीन्स-फ्रॅंकलीनने घेतलेल्या जास्त चांगल्या क्षकिडीप्र यावरून दंडसर्पिलाचा समावेशक निष्कर्ष काढता येतोच. दंडसर्पिलाच्या एका वेढ्यात किती आम्लारीं रेणू भरले आहेत हे शोधून काढता येत होते. पेकेच्या निर्जल ‘अ’ नमुन्यासाठी दंडसर्पिलाची लांबी २७ ऍंगस्ट्रॉम किंवा एकूण २.७ नॅनोमी. तर सजल ‘ब’ नमुन्यासाठी ती भरते एकूण ३४ ऍन्गस्ट्रॉम म्हणजे ३.४ नॅनोमी. विल्कीन्स यांनी बहुधा फक्त ही माहिती क्रीक-वॉटसनना दिली. स्वतःची आक्डेमोड तपासण्यासाठी आणखी एका त्रयस्थाची आकडेमोड आवश्यक असते हे सांगायला नकोच. फोटो ५१ ही प्रतिमा क्रीकने त्रिमाचि बनवून प्रसिद्ध केल्यानंतरच पाहिली. (संदर्भ – विकीपेडिया)
क्रीक-वॉटसननी त्रिमाचि प्रसिद्ध करतांना आणखी एक संदर्भ दिलेला आहे. तो आहे ‘स्वेन फरबर्ग’ने प्रसिद्ध केलेले पेके प्रारूप. यात आम्लारि किंवा बेसेस आतील बाजूस आहेत. अशा तर्हेने क्रीक-वॉटसन यांचे आम्लारी रेणू मध्यभागी असलेले अचूक त्रिमाचि हे काही जगातले पहिलेच त्रिमाचि नव्हते. फरबर्गच्या निष्कर्षातून देखील पेकेमधील उभ्या दंडातले साखररेणू बेसेसच्या आतील की बाहेरील, नक्की कुठल्या दिशेला असावेत हे कळतेच. पण असे का याची कारणमीमांसा मात्र रोझलिंड फ्रॅंकलीनने आपल्या रसायनशास्त्रातल्या ज्ञानाच्या जोरावर ठामपणे दिली.
दुहेरी दंडसर्पिलाचे त्रिमाचि बांधतांनाच चकित करणारी आणखी एक गोष्ट ध्यानात क्रीक-वॉटसनच्या ध्यानात आली. न्यूक्लीओटाईडसच्या साखळ्यांचे दोन कणे समांतर परंतु परस्परविरुद्ध दिशेने जाणारे आहेत. ते तसे ठेवल्यास दोन्ही दंडांना जोडलेल्या पायर्या एका पातळीत येतात आणि दंडसर्पिलाच्या मध्यभागी बरोब्बर जोडता येतात. म्हणजे शिडीच्या दोन उभ्या दंडांना जोडलेल्या समोरासमोरच्या दोन्ही पायर्या एकमेकींना जोडता येण्यासारख्या एकाच पातळीवर येतात. कदाचित त्यांनी एक बाजू चुकून उलटी उभी केली होती असेल किंवा कदाचित तसे नाही तर असे जोडून पाहूयात म्हणून मुद्दाम उलटी जोडून पाहिली असेल आणि सारे जुळून आले असेल. पुढे दिलेल्या दुव्यातले त्रिमाचि पाहिले की याची यथार्थ कल्पना येते. क्रीक-वॉटसननी त्रिमाचि माहितीच्या इतर स्रोतांच्या आधाराने बांधून उभे केले पण फ्रॅंकलीनच्या विदामुळे क्रीक-वॉटसनच्या दुहेरी दंडसर्पिलाच्या निष्कर्षाला दुजोरा मिळाला व त्यामुळे त्यांना भरपूर आत्मविश्वास मिळाला.
त्यांनी पेके रेणूच्या त्रिमाचिची किती सुरेख मूर्ती किंवा सांगाडा प्रयोगशाळेत बनवला होता. याचे एक छान प्रकाशचित्र इथे इथे आहे. संशोधनाच्या या मोक्याच्या वळणावर त्यांना रोझलिंड फ्रॅंकलीन आणि मॉरीस विल्कीन्स या जोडगोळीची मदत झाली. प्रथम त्यांना रोझलिंड फ्रॅंकलीनकडून जलाकर्षक कणे पेके रेणूच्या बाहेरील बाजूला असल्याचे स्पष्टीकरण मिळाले. A- ऍडोनीन, T- थायामाईन, C- सायटोसीन आणि G - ग्वानीन हे रेणू कसे बांधले गेले आहेत ते चित्रात सुरेख दिसते आहे. बाजूलाच क्रीक-वॉटसन उभे असल्यामुळे त्रिमाचि च्या आकारमानाची कल्पना येते. आणि दुसरे म्हणजे हा रेणू दुहेरी दंडसर्पिलाकार असल्याचा ठोस पुरावा असलेले मे १९५२ मध्ये रोझलिंडने घेतलेले छायाचित्र क्र. ५१ हे क्रीक-वॉटसन यांना मॉरीस विल्कीन्स यांनी दाखवले.
२८ फेब्रुवारी १९५३ रोजी एका पबमध्ये फ्रॅन्सीस क्रीक यांनी ‘जीवनाचे रहस्य सापडले’ आहे असा जाहीर दावा केला. परंतु अजून आपल्याला त्रिमाचि अद्याप पूर्ण करायचे आहे हे त्यांना ठाऊक होते. ७ मार्च १९५३ रोजी त्यांचे त्रिमाचि रचून, बांधून पूर्ण झाले. १० मार्च रोजी त्यांना फ्रॅंकलीनने पत्र लिहिले. तिला त्रिमाचि पाहायचे आहे असे तिने पत्रात म्हटले होते. त्रिमाचि पाहिल्यावर नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न विचारून झाल्यावर नंतर त्रिमाचि बनवण्यात फारच घाई केली वगैरे ताशेरे तिने ओढलेच. त्रिमाचि पाहिल्यावर मात्र ‘फारच सुंदर! पण हे सिद्ध कसे करणार?’ असे उद्गार तिने काढले.
हे त्रिमाचि त्यांनी १९५३ साली प्रसिद्ध केले. या अजोड कार्याबद्दल या जोडगोळीला मॉरीस विल्कीन्स यांच्याबरोबर १९६२ सालचे ‘शरीरशास्त्र आणि औषधे’ या विषयातले नोबेल परितोषिक मिळाले.
पेके रेणूरचना उकलण्यात फ्रॅन्सीस क्रीक-जेम्स वॉटसन यांचे योगदान काय?
१. जैविक माहितीचा साठा पेके मध्येच असल्याचे सिद्ध करणारा अगोदरच्या संशोधनाचा पुरावा प्रथम प्रबंधात मांडला.
२. प्रथिनांचे आल्फा हेलीक्स त्रिमाचि उलगडतांना संशोधकांच्या हातून राहिलेल्या त्रुटी वेळीच ओळखून स्वतःच्या पेके संशोधनाचे वेळी त्या टाळण्याची घेतलेली खबरदारी.
३. दुहेरी दंडसर्पिलाकाराचा संबंध क्षकिडीप्रमधील प्रतिमेशी जोडणारे गणिताने सिद्ध करणारे कूट गणिती सूत्र क्रीकने स्वतः शिकून प्रबंधाला जोडले.
४. पेके रेणूचे त्रिमाचि हे जिग-सॉ-पझल जोडतांना पायर्या जुळत नव्हत्या तरीही नाउमेद न होता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सतत प्रयत्न करून एक कणा वरून खाली येणारा तर दुसरा खालून वर जाणारा असे त्यांच्या एका पातळीतल्या पायर्या एकमेकांस जोडून समाकारारूप - सिमेट्रीक आकाराचे त्रिमाचि पुरे करण्यात चिकाटी आणि धडाडी याबरोबरच अपूर्व अशी प्रतिभा दाखवली. कागदावरील आकृतीतच बहुधा या पायर्या जुळत नसल्यामुळे फ्रॅंकलीन नाउमेद झाली असावी व पॅटर्सन सिंथेसिसवरून जाणारा मार्ग तिने निवडला असावा. यशाच्या वाटेवरची पायर्या न जुळण्याची अवघड पायरी फ्रॅंकलीन ओलांडू शकली नाही तर क्रीक-वॉटसन यांनी असामान्य प्रतिभा, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन याच्या जोरावर ओलांडून दाखवली.
जिथे सारे मार्ग खुंटतात तिथून नवा मार्ग प्रतिभावंत स्वतःच तयार करतात हे किती खरे आहे हे मग इथे आपल्याला मनापासून पुरेपूर पटते. मानवी प्रज्ञा खरोखरच किती अचाट आहे, नाही? निसर्गाने दिलेल्या दृष्टीने जे तो पाहू शकत नाही तो ते आपल्या असामान्य प्रज्ञेने शोधून काढतो. पृथ्वीची गोलाई, सूर्यकेंद्री विश्वाचे त्रिमिती मानसचित्र, अणूचे त्रिमिती मानसचित्र, काल अवकाश आणि गुरुत्त्वाकर्षण यांची एकत्रित संकल्पना, हे सारे किती अचाट आहे! या संकल्पना नुसत्या वरवर समजून घेणेच किती कठीण आहे! थोर संगीतकारांच्या संगीतात, बोरकरादिकांच्या कवितेत, व्हॅन गॉ किंवा लीओनार्दो-द-व्हिन्सी आदिकांच्या चित्रात, शिल्पात जशी उत्तुंग प्रतिभा दिसते तशीच ती विज्ञानातही दिसते ती अशी. रीमानच्या गणितातही ती दिसते. असो. पुन्हा आपले पेके आख्यान पुढे नेऊयात.
अशा रीतीने पेके रेणूरचना उलगडून सिद्ध करून दाखवण्यात क्रीक-वॉटसन यांचा सिंहाचा वाटा होता. पेशीमधल्या डीएनएमधून आरएनएमध्ये आणि तिथून प्रथिनांमध्ये जैव माहितीचा साठा एकमार्गी पद्धतीने कसा जातो त्या संकल्पनेसाठी ‘सेंट्रल डॉग्मा’ हा शब्दप्रयोग क्रीक यांनी पहिल्यांदा केला आणि नंतर तो रूढ झाला. यामुळे सजीवाच्या गुणधर्माची पेकेच्या डीएनएच्या रेणूतच साठवलेली असते हे अधोरेखित झाले. तसे ते झाले नसते तर या शोधाला नोबेल मिळाले असते की नाही हे सांगता येत नाही. पारितोषिकांमुळे जरी शास्त्र मोठे होत नसले तरी त्यामुळे संशोधनाला चालना मिळते, वेग येतो हे मात्र खरे.
आपल्या कारकीर्दीच्या शेवटी क्रीक यांनी अमेरिकेतील ला जोला, कॅलिफोर्निया इथल्या सॉल्ट लेक इन्स्टीट्यूटमध्ये जे. डब्ल्यू. कीकेफर विशेष संशोधन प्राध्यापकपद भूषवले. पुढील काळातले त्यांचे संशोधन सैद्धांतिक मज्जाजीवशास्त्र अर्थात थिअरेटीकल न्यूरोबायॉलॉजी या विषयाभोवती होते. मानवी जागृतावस्थेचे वैज्ञानिक अध्ययन पुढे नेण्यासाठी हे संशोधन होते. मृत्यूपर्यंत ते या पदावर होते. मृत्यूशय्येवर असतांना देखील ते आपल्या दुःखद अंतापर्यंत एका हस्तलिखिताचे संपादन करीत होते असे ख्रिस्तोफर कॉक यांनी म्हटले आहे.
फ्रॅंन्सीस क्रीक यांच्याबद्दल त्रोटक वैयक्तिक माहिती: त्यांची दोन लग्ने झाली, त्यांनी तीन मुलांना जन्म दिला आणि सहा नातवंडांचे ते आजोबा झाले. १९१८ साली जन्मलेले त्यांचे धाकटे बंधू त्यांच्या आधीच १९६६ साली निवर्तले. जन्माने ब्रिटीश नागरिक असलेल्या फ्रॅन्सीस क्रीक यांचा मृत्यू मात्र २८ जुलै २००४ रोजी अमेरिकेत सान दिएगो इथे कोलॉन कॅन्सरने झाला.
पेकेच्या रेणूरचनेचे त्रिमिती मानसचित्र उभे केले त्या वेळी जेम्स वॉटसन हे टोमोव्हावर सप्रयोग क्षकिडीप्र पद्धतीने या रेणूतील रासायनिक घटकांची रेणूरचना ओळखणे या विषयावर संशोधन करीत होते. या घटकांची रचना दंडसर्पिलाकार असते हे स्क्रॅम - Schramm यांच्या सुरेख प्रयोगात आढळून आले होते. कॅव्हेंडिशमध्ये नवीनच बनवलेल्या फिरत्या ऍनोडच्या क्षकिरण नळ्यातून विषाणूंच्या रचनेच्या निःसंशय, सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकल्या.
नंतर १९५३ ते १९५५ या काळात वॉटसन कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जीवशास्त्रातील वरिष्ठ मानद संशोधक होते. इथे त्यांनी अलेक्झांडर रीच याच्याबरोबर शर्करा-केंद्रकाम्लावर – आरएनए – वर संशोधन केले. १९५६ मध्ये ते पुन्हा परत कॅव्हेंडीशला येऊन क्रीकना मिळाले. विषाणूरचनेवर त्यांनी क्रीकच्या साथीने अनेक प्रबंध लिहिले.
१९५६ साल सरतांना ते हार्वर्ड विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून आले. १९५८ साली ते असोसिएट प्राध्यापक तर १९६१ साली प्राध्यापक झाले. या पाच वर्षांच्या काळात त्यांचा प्रमुख संशोधनविषय होता प्रथिनोत्पादनातील शर्करा केंद्रकाम्लाचे कार्य. त्यांच्या तिथल्या सहकार्यांत होते स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड तिसिएरे Alfred Tissières आणि फ्रेन्च जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रॅन्को ग्रॉस François Gros. शर्करा केंद्रकाम्लाच्या संदेशवहनाचे बरेच पुरावे त्यांनी गोळा केले. वॉटसन म्हणतात त्याप्रमाणे खळबळजनक असलेले प्रायोगिक रेण्वीय जीवशास्त्र नुकतेच शिकून घेतलेले मूळचे भौतिकी शास्त्रज्ञ वॉल्टर गिल्बर्ट हे त्यांचे सध्याचे सहकारी आहेत.
जेम्स वॉटसन यांना अनेक मानमरातब मिळाले. १९५९ साली त्यांना क्रीकच्या जोडीने मॅसाच्युसेटस जनरल हॉस्पिटलचे जॉन कॉलिन वॉरेन पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी त्यांना जीवरसायनशास्त्रातील एली लिली पारितोषिक देखील मिळाले. १९६० साली त्यांना क्रीक आणि विल्कीन्स यांच्यासह लास्कर पारितोषिक मिळाले तर १९६२ साली क्रीक यांचेसमवेत मिळाले रीसर्च कॉर्पोरेशन पारितोषिक. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस ऍंड सायन्सचे सदस्यत्व आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यत्त्व, डॅनिश अकॅडमी ऑफ आर्टस ऍंड सायन्सचे विदेशी सदस्यत्त्व अशा दुर्लभ मानद सदस्यत्त्वांचा त्यांना मान मिळाला. राष्ट्राध्यक्षांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीवर ते आहेत.
आता जेम्स वॉटसन यांचेविषयी वैयक्तिक माहिती. अविवाहित असलेल्या पुरुषाला पक्षीनिरीक्षणाचा छंद पाहिजेच नाही का? तसा तो अविवाहित वॉटसनना आहेच, त्याशिवाय चालणे हाही त्यांचा छंद आहे ही दोन वात्रट विधाने करून ही लेखमाला पूर्ण करतो. विषयांतराच्या खोगीरभरतीचे पाल्हाळ लावणारी ही लांबलचक लेखमाला वाचणार्या सर्व संयमी वाचकांना मनापासून धन्यवाद.
संपूर्ण.
संदर्भ:
१. विकीपेडीया.
२. रोझलिंड फ्रॅंकलीन:वीणा गवाणकर
३. फार पूर्वी वाचलेली पण टिपणे न काढलेली काही पुस्तके, लेख इ.
प्रतिक्रिया
9 Mar 2014 - 7:12 am | मुक्त विहारि
छान लिहीली होती.
अज्जून लिहा...
9 Mar 2014 - 12:50 pm | नरेंद्र गोळे
सध्या खालील शब्दांकरता सुयोग्य शब्दपर्याय हुडकत आहे. यथावकाश सविस्तर प्रतिसाद लिहेन.
हार्दिक अभिनंदन!!
A- ऍडोनीन, T- थायामाईन, C- सायटोसीन आणि G - ग्वानीन
11 Mar 2014 - 12:22 pm | बॅटमॅन
त्यांना प्रतिशब्द हुडकायची गरज नाही.
9 Mar 2014 - 4:06 pm | प्रचेतस
लेखमाला आवडतीय.
9 Mar 2014 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर आणि अतिशय माहितीपूर्ण लेखमाला ! पुलेशु.
10 Mar 2014 - 6:25 am | सुधीर कांदळकर
मुवि, गोळेसाहेब, वल्ली आणि एक्कासाहेब, सर्वांना धन्यवाद.
11 Mar 2014 - 12:02 pm | सुधीर कांदळकर
प्रत्यक्षात तो
जीवनगाणे ५
असा आहे
29 Mar 2014 - 9:32 am | पैसा
वीणा गवाणकरांच्या पुस्तकाबद्दल हिटलरवरच्या लेखात तुम्ही लिहिले आहेच. मालिका अतिशय उत्तम झाली. इतकी सगळी माहिती थोडक्यात आणि मनोरंजक पद्धतीने लिहिल्याबद्दल धन्यवाद!
29 Mar 2014 - 9:50 am | यशोधरा
अख्खी मालिका वाचली/ वाचत होते. एकदम सही झाली ही मालिका पण निदान १० लेखांची तरी करायचीत.
अजूनही विचार कराल का प्लीज?
29 Mar 2014 - 4:51 pm | सुधीर कांदळकर
@ पैसाताई : दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
@यशोताई : जवळजवळ दोन वर्षे गावी असतांना सुरुवातीला घरात चित्रवाणीचा उपद्रव नव्हता. रिकामपणचा उद्योग म्हणून हे सहा आणि शिकेलग्रुबरचा सातवा असे लेख लिहिले होते. त्यावर शेवटचा हात फिरवून आता मिपावर चढवले होते. पेकेच्या रेणूच्या प्रारूपाच्या सिद्धतेबरोबर तो विषय संपला. सध्या जास्त क्लिष्ट विषयावर लेखमालेचे लेखन सुरू आहे. विषयाच्या क्लीष्टतेमुळे ती जास्त खमंग चुरचुरीत करावी लागेल. असे लेख वाचून एका जरी विद्यार्थ्याने शुद्ध विज्ञानात प्राविण्य मिळवले तरी लेखनाचे सार्थक झाले असे वाटेल. आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.