एक झुंज तणावाशी!

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
26 Feb 2014 - 9:35 am

काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालत असताना एक भिंतीवर चिटकवलेली जाहिरात नजरेस पडली. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची. तसा रोजच्या संभाषणांमध्ये असंख्य वेळा आपल्या बोलण्यात हा शब्द येतो, ‘स्ट्रेस’, पण त्या संकल्पनेवर हवा तेवढा स्ट्रेस देत नसावं कुणी. म्हणूनच कदाचित अशा कन्सल्टंट्सचा जन्म होतो. पण मग हे कन्सल्टंट्स काय सांगत असावेत? असं तर नक्कीच काही नसेल जे आपल्याला ठाऊक नाही. हं, पण आपण आत्मसात केलेलं नाही असं बरंच काही असेल. असे विचार मनात चालू होते.

मुळात ताण किंवा स्ट्रेस हा एखाद्या आजारासारखा असतो. जसा एखाद्या विषाणूचा प्रतिकार करण्यास माणसाचं शरीर असमर्थ ठरतं आणि मग आजार उद्भवतो. त्याचे परिणाम जसे की, सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी इत्यादी. तसंच रोजच्या आयुष्यातील एखाद्या घटनेला, परिस्थितीला, स्वीकारण्यास मन किंवा मेंदू असमर्थ ठरतो आणि मग उद्भवतो तो ताण अर्थात स्ट्रेस. परिणाम म्हणजे चिडचिड, राग, मत्सर, इत्यादी. प्रथम हे परिणाम वैचारिक असतात आणि पुढे ते कृत्य स्वरूपात दिसू लागतात.

ताणाची कारणं असंख्य आहेत. ताण किंवा स्ट्रेस हा रोधता येत नाही, असं माझं मत आहे. त्याला वाट करून द्यावी लागते. आणि नेमका हाच त्याचं निरसन करण्याचा एक सुयोग्य मार्ग आहे. ही वाट करून द्यायलाच मुळात लोक विसरतात आणि ताणाचं एक अनामिक ओझं घेऊन वावरायला लागतात. ताण मार्गीकृत करण्याचे अनेक मार्ग आहेत. दुर्दैवाने टीव्ही आणि मोबाइलपलीकडे बहुतांश लोकांची मनोरंजनाची कल्पनाच पोहोचत नाही, त्यामुळे मग उरतो तो एकच मार्ग म्हणजे व्यसनाधीनता.

पण हे दुष्टचक्र टाळण्याचे काही सोपे उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे नियमित व्यायाम. मग तो धावण्याचा असेल, बलवर्धक असेल, योगासनं असतील किंवा मैदानी खेळ असतील. शरीराला क्रियाशील ठेवलं की मन प्रफुल्लित राहतं आणि ताणाचं निदान होतं. दुसरा सुरेल उपाय म्हणजे संगीत. आपल्याला जे आवडतं, ते संगीत रोज थोडासा वेळ जरी ऐकलं, तरीही मन एखाद्या संगणकासारखं रिस्टार्ट होतं आणि ताण नाहीसा होतो. तिसरा उपाय म्हणजे वाचन. एखादं आवडतं पुस्तक काढून किंवा नवीन पुस्तकं आणून त्यांचं वाचन केलं म्हणजे ताणाच्या कारक गोष्टींचा विसर पडायला मदत होते. उपाय अमर्याद आहेत आणि त्यांना बंधन नाही. म्हणजे अगदी साध्यात साधा छंद जोपासूनही तणावाशी यशस्वी झुंज देता येते. मुळात ताण देणाऱ्या विचारांना मनापासून वेगळं करणं हे गरजेचं आहे. स्ट्रेस वाढवणा-या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. परंतु त्या स्ट्रेसला मॅनेज करण्याची कला आपण नक्कीच आत्मसात करू शकतो.

ताणाचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम भयंकर व कल्पनातीत आहेत. झोप न लागण्यापासून ते हृदयविकार होण्यापर्यंत काहीही आणि कधीही ताणामुळे उद्भवू शकतं. त्यातून आजच्या काळात माणसाच्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की, त्यामुळे ताण किंवा स्ट्रेस होण्याची कारणं मुबलक आहेत. तेव्हा असं असताना, माणसांनी तो ताण मॅनेज करण्याचे उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. शक्य तोवर शांत रहाणं, मनन करणं आवश्यक असतं. आज प्रत्येक माणूस आपल्या आवडीचं काम करत असतो असं नाही आणि प्रत्येक माणसाला किमान एक कुठली तरी गोष्ट मनापासून, प्रामाणिकपणे आवडते हे नक्की. ती गोष्ट, ती आवड जोपासायला वेळ किंवा पैसा यापैकी एक गोष्ट कमी पडत असते हेही तितकंच सत्य. परंतु तो वेळ काढायला हवा, तो कमी पडणारा पैसा हळूहळू जमवायला हवा आणि ती आवड जोपासायला हवी. कुठेतरी निष्फळ करमणुकीची जागा सुफळ करमणुकीने घ्यायला हवी. इतकासा स्वार्थ प्रत्येकाने जोपासायलाच हवा. त्यामुळे ताण नाहीसा होतो आणि ताण नाहीसा होण्यात प्रत्येकाचा स्वार्थही आहे आणि परार्थही.

लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आला होता त्याचा हा दुवा

समाजजीवनमानतंत्रविचार

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

26 Feb 2014 - 10:07 am | खटपट्या

अतिशय चांगला विषय !!!

मुक्त विहारि's picture

26 Feb 2014 - 10:20 am | मुक्त विहारि

तुम्ही सुचवलेले उपाय पण आवडले...

आत्मशून्य's picture

27 Feb 2014 - 12:20 am | आत्मशून्य

आणि अर्धा तास प्राणायाम न चुकता करतो त्याला गहन प्रक्रिया करून स्ट्रेस आणावा लागतो.

अमित खोजे's picture

27 Feb 2014 - 3:45 am | अमित खोजे

ती गोष्ट, ती आवड जोपासायला वेळ किंवा पैसा यापैकी एक गोष्ट कमी पडत असते हेही तितकंच सत्य. परंतु तो वेळ काढायला हवा, तो कमी पडणारा पैसा हळूहळू जमवायला हवा आणि ती आवड जोपासायला हवी.

अगदि मनाला भिडले.

पैसा's picture

2 Mar 2014 - 8:37 pm | पैसा

यावर आणखी चर्चा वाचायला आवडेल.

धन्या's picture

2 Mar 2014 - 8:51 pm | धन्या

छान लेख !!!

सस्नेह's picture

2 Mar 2014 - 9:19 pm | सस्नेह

नियमित व्यायाम (विशेषतः योगासने), प्राणायाम अन ध्यान ही तणावमुक्तीची खात्रीची साधने आहेत.

मृगजळाचे बांधकाम's picture

2 Mar 2014 - 11:32 pm | मृगजळाचे बांधकाम

एक रामबाण उपाय सांगतो,एखाद्या चांगल्या संमोहन तज्ञाकडे जावे, तो तणाव मुक्त होण्यासाठी त्याच्या आवाजातील स्व संमोहन करण्याची cd देतो .player वर cd लावावी,कानात earphone लावून शांत पडावे,१ तासातच ब्रेन format होउन परत positive विचार reload पण होउन जातात,डोक शांत शांत हून जाते,प्रयोग करून पहाच.

वेल्लाभट's picture

3 Mar 2014 - 7:23 am | वेल्लाभट

आभार ! :)
ही खरच आजची मोठी समस्या आहे आपल्या सगळ्यांनाच ठाउक आहे. तिचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करायलाच हवं.

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2014 - 8:20 am | श्रीरंग_जोशी

तणावाचा अतिरेक वाईट परिणाम करणारा असला तरी अनेक वेळा तणावातच चांगली कामगिरी होते.

जसे शिक्षण सुरू असताना वर्षाच्या सुरुवातीला अभ्यासक्रमातील बऱ्याच गोष्टी नेमकेपणाने कळत नाहीत पण परीक्षे अगोदर काही दिवसांत अगदी सहजपणे कळू लागतात. हाच तर्क हापिसच्या कामाला व इतर वैयक्तिक जबाबदाऱ्यांनाही लावता येईल.

किती तणाव सहन होईल हे व्यक्तीगणिक बदलते. पण तणावाबद्दल या सकारात्मक बाजूचा उल्लेख नसेल तर या विषयावरील कुठलेही लेखन अपूर्ण वाटेल.

पैसा's picture

3 Mar 2014 - 9:16 am | पैसा

थोडासा ताण आवश्यक आहे. कारण ताणाखाली असतानाच तुमच्यातले सर्वोत्कृष्ट गुण बाहेर येतात, आणि जरा जास्त अवघड ध्येय साध्य करता येते. मात्र तणाव एवढाही असू नये की त्याच्या ओझ्याखाली सगळे व्यक्तिमत्व दबले जाईल.