पुणेरी ढोल म्हटलं की कान न टवकारणारी माणसं क्वचितच भेटतील. त्यातून पुण्यात, ठाण्यात, डोंबिवलीत वगैरे तर नाहीच. त्याची मजा काय आहे, बाज काय आहे, तो रोमांच काय आहे हे अनेकांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पणे अनुभवलं असेल. विशेषतः गणपतीच्या दिवसात तर अ़ख्खं पुणं ढोल ताशांनी निनादत असतं.
तीन वर्षांपूर्वी मी एक दिवस पुण्यावरून ठाण्याकडे येत होतो. अनंत चतुर्दशी चा दिवस होता. स्वारगेटवरून शिवनेरी पकडली होती आणि खिडकीतून ढगाळलेलं संध्याकाळचं आकाश बघता बघता माझा डोळा लागला होता. आणि मग जाग आली ती जाणवणा-या कंपनांमुळे. बसच्या काचेला, सीटला, आणि माझ्या छातीत एक तालबद्ध कंपनं जाणवायला लागली आणि मला जाग आली. बाहेर बघितलेलं दृश्य न विसरण्यासारखं होतं. मोठ्ठाले ढोल घेऊन चालणारे सुमारे ५० वादक. एका रांगेत; शिस्तीत. त्यांच्या मधोमध असलेला ताशावादकांचा चमू. आणि दोनही बाजूस भगवे झेंडे तालात नाचवणारे काही जण.
काचेच्या आतून मागे वळून वळून बघतानाच ठरवलं, यात एक दिवस आपण असणार. त्यानंतर योगायोगाने एका पुण्यातल्या प्रसिद्ध ढोल पथकातला एक मुलगा माझ्या संपर्कात आला. त्याला मी दुस-यांदा भेटलो होतो तेंव्हाच विचारलं, की, ’मला ढोल पथकात वाजवायची जाम इच्छा आहे. तुमच्या पथकात घेतील का मला? मी तबला शिकलोय ३ वर्ष त्यामुळे अबकड पासून सुरुवात नाहीये ही खात्री देतो’ पण त्यानेही प्रामाणिकपणे सांगितलं, की बरेच महिने आधी प्रॅक्टिस सुरू होते, तू ठाण्याला आम्ही पुण्याला, तुला नाही शक्य व्हायचं. मग दोन वर्ष अशीच गेली. गणपती आले की पुन्हा उत्साह उफाळून यायचा, गणपती गेले की पुन्हा तो विचार विरून जायचा.
चार महिन्यापूर्वी ठाण्यात एक फलक वाचला. पुण्याच्या धर्तीवर ठाण्यातही ढोल पथक तयार करण्याची ती योजना होती. दुस-याच दिवशी भेटायचं होतं. अर्थातच मी तिथे गेलो. पुण्यात न जाता ठाण्यातच मला माझी हौस पूर्ण करायची संधी होती. कल्पना जाणून घेतली, नाव नोंदवलं, आणि मग प्रॅक्टिस सुरू झाली. पहिल्यांदा त्या ढोलाची दोरी कमरेभोवती आवळली तेंव्हा जे वाटलं ते जाम भारी होतं. अंगावर शहारा आणणारं.
इथे अनेक नवी माणसं भेटली, नवे मित्र भेटले. पुण्याच्या एका प्रसिद्ध ढोल पथकाचे संस्थापक आम्हाला शिकवायला येत होते. ते आले त्या प्रत्येक वेळी त्यांनी जागवलेली इंटेन्सिटी, शिस्त केवळ कमाल होती. टोटल इम्प्रेस आणि इन्स्पायर झालो मी त्यांना बघून. किंबहुना पथकातले सगळेच. हळू हळू प्रॅक्टिस वाढत गेली. मग एका तालात सगळ्यांचे ठोके पडायला लागले, ताशाची भाषा समजायला लागली आणि त्या एकत्र वादनातली खरी मजा यायला लागली. ’माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाला आपण वाजवणार आहोत’ असं आम्हाला सांगण्यात आलं, आणि अगोदरच वाढलेला उत्साह दुप्पट झाला. आता समोर निश्चित उद्दिष्ट होतं, डेडलाईन होती.
इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे, ‘द रेस्ट इज हिस्टरी’. झपाझप दिवस सरकले, पथकाचं बारसं झालं; ‘वीरगर्जना’. नावच इतकं कडक होतं की काय विचारा. तितकाच कडक लोगो बनला, प्रत्येकाला राजबिंडा करेल असा गणवेष ठरला, आणि तो दिवस आला. माघी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस. नौपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला ढोल-ताशे वाजवून गणेशाला निरोप देण्याचा मान वीरगर्जनाला मिळाला होता.
त्या दिवशी सकाळपासूनच जरा दडपण होतं. प्रॅक्टिस करताना एकमेकांसमोर वाजवणं वेगळं; परंतु शेकडो लोकांसमोर वाजवणं वेगळं, अशी धाकधूक होती. पथकातील सगळेजण जिथे गणपती बसले होते त्या ठिकाणी जमलो. वेशभूषा, केशभूषा झाल्या. डोक्यावर फेटे चढले, कपाळावर गंध चढला आणि मुहूर्ताचा नारळ फुटला. गणपती बाप्पा, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला आणि पहिल्या ठोक्यासहित माहोल थरारला.
रस्त्याच्या दुतर्फा गर्दी, नातेवाईक, मित्र आणि अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे आमच्या सगळ्यांकडे कौतुकाने बघत होते. टाळ्या वाजवत होते, शिट्या वाजवत होते. अत्युच्च आनंदाचा, आणि समाधानाचा तो अनुभव होता ज्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. तेंव्हा काही फोटो, आणि व्हिडियोची लिंक खाली देत आहे. बघून आपल्या प्रतिक्रीया जरूर द्या. बाकी, संयोजक सरांनी आणि बघायला आलेल्या नातेवाईकांनी ‘उत्तम वादन झालं’ म्हटल्यावर खरा आनंद झाला. तरीही, आम्हाला किती वरची पातळी गाठायची आहे हे मात्र आम्हाला ठाऊक आहे.
वादनाची सुपारी द्यायची असल्यास सांगावे, मी संबंधित व्यक्तींचं नाव, त्यांचा फोन नंबर पुरवेन.
प्रतिक्रिया
15 Feb 2014 - 10:08 pm | ह भ प
ग्रेट..!! शेवटला फटू तुमचाय काय?
15 Feb 2014 - 10:27 pm | वेल्लाभट
व्हय
17 Feb 2014 - 9:55 am | विटेकर
वेल्लाभट एक्झॅक्ट्ली वेल्लाभटांसारखेच दिसताहेत !
उत्तम उपक्रम आणि हार्दिक शुभेच्छा !
स्पिकरच्या भिंती ( त्याच्या कर्ण-कर्कश आवाजावरुन हिडिस नाचणारे सो कॉल्ड कार्यकर्ते ) पाडून ढोले - ताश्या सारखी रण वाद्ये वाजू लागली तर बाप्पालाही बरे वाटेल, शेवटी तो गुणांचा ईश आहे .. सारे त्रिगुण त्याच्या अधिपत्याखाली आहेत . हा ' राजस' प्रकार त्याला नक्की आवडणार !
हे लोण मुंबई पर्यंत पोहोचावे ही त्या गण रायाला प्रार्थना !
15 Feb 2014 - 10:30 pm | फारएन्ड
जबरी! फोटोही मस्त. सुंदर लिहीले आहे.
16 Feb 2014 - 9:29 am | वेल्लाभट
थँक्स.... मी वाजवत असल्याने मला स्वतःला फार फोटो काढता नाही आले... पण नेव्हरदलेस...
जाम मजा आली
15 Feb 2014 - 10:30 pm | खेडूत
मस्तच!!
@व्हिडियोची लिंक खाली देत आहे. . . कुठाय?
(का माझा गणेशा झालाय?)
15 Feb 2014 - 10:40 pm | वेल्लाभट
http://www.youtube.com/watch?v=HR2nAvAd7T8
माफ करा, विसरलेलो टाकायला :)
15 Feb 2014 - 11:09 pm | जॅक डनियल्स
फारच भारी ...विडो बघून अंगावर काटा आला...
15 Feb 2014 - 10:31 pm | जोशी 'ले'
मस्त ...
15 Feb 2014 - 10:34 pm | धन्या
हे ढोलवाले महिनाभर त्रस्त करतात अगदी.
सरावाच्या नावाखाली जवळपास महिनाभर सारा नदीकाठ दणाणून सोडतात. संध्याकाळी सहा ते अगदी रात्री दहा वाजेपर्यंत जरा म्हणून शांतता नसते. कान किटून जातात.
15 Feb 2014 - 10:47 pm | आदूबाळ
तुम्हाला कै भार्तीय संस्क्रूती म्हणून कै नैच..
15 Feb 2014 - 11:01 pm | धन्या
संस्कृती वगैरे बोलायला ठीक असतं हो, पण खरंच महिनाभर अगदी नकोसं होतं.
15 Feb 2014 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा
ए...ढम ढम ढोल बाजे....
15 Feb 2014 - 11:03 pm | सुहास..
धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड ! पुण्यात पोचलो मित्रा लेखामुळे बंगळुरातुन :)
15 Feb 2014 - 11:34 pm | सॅगी
गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु होताना मी काढलेला व्हिडीओ.
Ganesh Galli 2010 Visarjan Starts
वर्ष २०१०
15 Feb 2014 - 11:56 pm | मुक्त विहारि
दसर्याच्या ८/१० दिवस आधी नेहरू मैदान, डोंबिवली येथे या आणि तिथे विनय वेलणकर (हे वैद्य पण आहेत हेवेसांनल) मस्त तालीम देतात.
असो
डोंबिवली ती डोंबिवलीच
16 Feb 2014 - 9:31 am | वेल्लाभट
या वाक्याबद्दल घ्या टाळी !
16 Feb 2014 - 6:53 am | स्पंदना
व्वाह! वेल्लाभट!
मस्त हो!
16 Feb 2014 - 9:31 am | वेल्लाभट
@ जोशी, आत्मा, सुहास, सागर, मुवि, अपर्णा
धन्यवाद्स..... :)
16 Feb 2014 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे
या ध्वनीप्रदूषणामुळे घरात थांबणे अशक्य होते.घरात एकमेकांशी बोलता सुद्धा येत नाही.सार्वजनिक शांततेची हानी होते.ध्वनिप्रदुषणामुळे रक्तदाब, कर्ण बधिरता,डोकेदुखी इत्यांदिंना आमंत्रण तर मिळतेच पण मानसिक स्वास्थ्य बिघडून चिडचिड वाढते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे
लो.टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सावाचा हेतु समाज जागृती व समाजप्रबोधनाचा होता.आज ते स्वरुप दुर्दैवाने राहिले नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली केलेला समूहउन्माद अशा स्वरुपात आज ते दिसते आहे. समूह उन्मादात सारासार विवेक व विचार नष्ट झालेला असतो.अशा काळात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलोस यंत्रणेला जिकिरीचे बनते.
अंगात माझिया भिनलाय ढोलिया. या गाण्यात लोकस्ंस्कृतीचे वर्णन आहे. आदिवासिंचे लोकसंस्कृतीत ढोलाला फार महत्व आहे. कारण त्यामुळे दुष्ट शक्ती पळून जातात अशी समजूत आहे. आदिवासींच्या लोकनृत्यातील वाजणारे ढोल व शहरातील जागोजागी होणारे ढोलप्रदूषण यात फरक केला पाहिजे.कुठलाही गोष्टीचा अतिरेक वाईटच. विशिष्ट मर्यादेपर्यंत ती गोष्ट आनंद देते पण त्या पलिकडे गेली की जाचक वाटू लागते. ही विशिष्ट मर्यादा ओळखण्याचे तारतम्य समाजमनात येणे महत्वाचे आहे.
16 Feb 2014 - 9:47 am | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच मार्मिक प्रतिसाद.
16 Feb 2014 - 9:58 am | वेल्लाभट
कुठून ... कुठे ?
कठीण आहे.
16 Feb 2014 - 10:54 am | धन्या
होय कठीणच आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल वाजताना कितीही स्फुरण चढत असले तरी या ढोलपथकांचा महिना दिड महिना नदीकाठाला चालणारा सराव ही नदीकाठाला असणार्या निवासी संकुलांना सक्तीची शिक्षा आहे.
माझं घर नदीकाठाने राजाराम पुलापासून हाकेच्या अंतरावर आहे. वर अवतरणात दिलेले पकाकाकांचे वाक्य माझ्या बाबतीत शब्दशः खरे आहे. एरव्ही अगदी रम्य वाटणारे माझे घर मला ढोलपथकांच्या सरावाच्या दिवसांमध्ये सोडून देऊन महिनाभर दुसरीकडे जावून राहावेसे वाटते.
16 Feb 2014 - 11:16 am | माझीही शॅम्पेन
वेल्लभट तुमच्या कौशल्याचे नक्कि कौतुक आहे !!!!!
पण कुठल्याही रंगात-धन्गात चकचकीत वेष्तानात लपेटल तरी ध्वनी-प्रदूषण हे वाईटच तरी पण चार समजा हे चार भिंतीत असेल तर लोकांना ते निवडण्याच स्वातंत्र्य असत
आणि आज-काल संस्कृती-रक्षांच्या नावाने जे काही चालत ते तर पाहताना आपण सारासार विचार-शक्ति गमावतोय की काय ?
ह्या निमित्ताने ढोल-ताशे हे नाटक आठवल !!!
16 Feb 2014 - 1:28 pm | वेल्लाभट
चालायचंच...
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली जे राजकीय धंदे होतात त्यापेक्षा हे बरंच आहे की! आणि असं बघा की या निमित्ताने कुठेतरी `ये गांव मेरा है' चा मेसेज कन्व्हे होतोय अमराठी लोकांना जे आज गरजेचं आहे; नाही का?
16 Feb 2014 - 1:35 pm | धन्या
तुमच्या या धाग्यावरुन तुम्ही ढोल पथकाचे क्रियाशील सदस्य तसेच पुरर्स्कर्ते ही दिसत आहात. बाकीच्या प्रतिसादांना तुम्ही उत्तरे देत आहात.
मात्र मी जी प्रामाणिक व्यथा मांडली आहे त्यावर तुम्ही चकार शब्द टाईप करायला तयार नाही. "ये गांव मेरा हैं" वगैरे मेसेज अमराठी लोकांना कन्व्हे होण्याची पडली आहे. मात्र गाववाल्यानाच होणार्या त्रासाची तुम्हाला काही पडलेली नाही.
ढोल पथकांचे प्रतिनीधी म्हणून साधी पोच देण्याचीही संवेदनशीलता नाही का?
16 Feb 2014 - 2:22 pm | वेल्लाभट
सांगायचं झालंच तर; प्रॅक्टिस मोकळ्या, जिथे वस्ती नाही अशा जागी व्हावी, तशी काळजी घेतली जावी, हे माझंही मत आहे. तुमची व्यथा रास्तच आहे. नो डाऊट.
16 Feb 2014 - 3:25 pm | प्रकाश घाटपांडे
धन्या, धागाकर्त्याच्या संवेदनशीलतेला एक रिजोल्युशन नक्की आहे.
16 Feb 2014 - 4:50 pm | धन्या
केव्हढा विरोधाभास. :)
17 Feb 2014 - 9:31 am | प्रमोद देर्देकर
विरोधाभास तर आहेच. पण प.का. काकांनी मस्त शालजोडीतले दिलेत.
@लीमाउजेटः- अहो माणसांना आता राहायला जागाच कुठे राहली आहे. तसेच मोठे मोठे प्रकल्प "नदीकाठच्या रम्य ठिकाणी या" अशीच आपल्या साईट्ची ओळख करुन देतात ना!
16 Feb 2014 - 2:44 pm | कवितानागेश
पण मी काय म्हणते, इतक्या लांब नदीकाठी रहायला कशाला जायचं माणसानी?
तिथे जाउनच काय ते ढोल वाजवणार लोक.
गावातच रहावं शांत वातावरणात. :P
(स्वगतः ती पाशवी हसणारी स्मायली कुठे गेली?)
16 Feb 2014 - 3:02 pm | वेल्लाभट
उगा वाद ओढवून घ्यायचा नाही म्हणून मी `स्वगतच' राहू दिलं.
यू सेड इट !
16 Feb 2014 - 3:13 pm | प्रकाश घाटपांडे
तुमच स्वगत मला ऐकू आल होत. :)
16 Feb 2014 - 3:24 pm | वेल्लाभट
ऐला! :)
16 Feb 2014 - 4:53 pm | धन्या
तुमच्या रिजोल्युशनमधल्या मोठमोठाल्या बाता वाचल्यानंतर या वाक्याची मौज वाटली. :)
16 Feb 2014 - 5:56 pm | वेल्लाभट
चला वाटली ना मौज, ग्रेट
16 Feb 2014 - 3:39 pm | प्रचेतस
अहो ते म्हणतात ना की नदीकाठीच यच्चयावत प्राचीन संस्कृती बहरास आल्या होत्या. त्यानुसार धनाजीराव आपल्या मूळ प्रवृत्तीला अनुसरून तेथे रहावयास गेले असतील तर त्यांचं काय चुकलं?
17 Feb 2014 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो मग मूळ प्रवृत्तीला अनुसरून संस्कृतीसंवर्धनही तिथेच चालणार ना? तसेही पुण्यात काही काही नदीकाठी भावी संस्कृतीसंवर्धक निर्मितीप्रक्रियाही चालू असते.
16 Feb 2014 - 4:56 pm | धन्या
आम्ही गरीब बापडी हिंजेवाडीला मजूरी करण्यासाठी बाहेरुन आलेली मजूर लोकं.
गावात राहण्यासाठी आमच्यासाठी जागा उरलीय कुठे? आणि असली तरी ती पुण्यासारख्या रियल ईस्टेट सिटीत आम्हाला परवडायला हवी ना. ;)
16 Feb 2014 - 7:07 pm | प्यारे१
+१.
बुजवलेल्या ओढ्याशेजारचा रहिवासी.
16 Feb 2014 - 3:08 pm | प्रकाश घाटपांडे
ढोलपथकात स्त्रियांचा वाढता सहभाग हा नोंद घेण्यासारखा आहे. आमच्या सोसायटीत गणपतीच्या वेळी ढोलपथक हे बाहेरुन आणले जात होते. पण यावेळी ते सोसायटीतच तयार केले गेले.प्रशिक्षक बाहेरुन बोलावले. त्याचा सराव रोज सोसायटीतच व्हायचा. त्यात स्त्रियांची संख्या मोठी होती. इतर वेळी हे लोक सुसंस्कृत वाटावे असेच होते.
मला त्याचे कारण असे वाटते कि पुरुषांपेक्षा आम्हीही कुठे कमी नाही हे स्त्रियांना दाखवायचे असते.( मला ते मान्य देखील आहे) मग हे क्षेत्र अपवाद कशाला? दुसरी गोष्ट अशी कि माध्यमांनी विशेतः सकाळने याला प्रतिष्ठा दिली. ग्लॅमर दिले. त्यामुळे हा तरुणांचा सहभाग वेगाने वाढला.आपण एक सामाजिक उपक्रम राबवतो आहे असे समाधान त्यांना मिळू लागले. ध्वनीप्रदुषणाचा परिणाम हा ध्वनिप्रदूषकांवरही होतच असतो.फक्त त्यांना त्याचे भान नसते. हा मास हिस्टेरिया सारखा प्रकार असतो. सकाळ च्या मुक्तपीठ मधे मी एकदा एका अशा ध्वनीप्रदूषकाचे मनोगत वाचले होते. या ढोलवादन समाजसेवेची परिणीती म्हणून तो कर्णबधीर झाला होता.ही त्याने या 'समाजसेवे'ची द्यावी लागलेली किंमत म्हणुन केवळ स्वीकारली नव्हती तर एक सामाजिक हौतात्म्य म्हणुन मिरवलीही होती. एखादा योद्धा कसा रणांगणावर झालेला वार हा वीरत्व म्हणुन बाळगतो तशी!
पुण्यात डॉ कल्याणी मांडके या ध्वनीप्रदूषणाबाबत प्रबोधन करतात. खर तर त्यांचा श्रवण यंत्रांचा व्यवसाय आहे.जेवढे लोक या ध्वनीप्रदूषणाला बळी पडतील तेवढा त्यांचा व्यवसाय वाढेल पण सामाजिक जाणीवा त्यांना असल्याने ते वैज्ञानिक दृष्टीकोनातून ध्वनीप्रदूषणाच्या दुष्परिणाबद्दल माहिती देत असतात.
17 Feb 2014 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे
हे बघा त्या नादखुळ्याचे मुक्तपीठातील मनोगत.
17 Feb 2014 - 2:24 pm | बॅटमॅन
अतिशय मार्मिक प्रतिसाद.
16 Feb 2014 - 10:41 am | विअर्ड विक्स
ढोल पथकाची शान काही औरच…… कधी गिरगावात या … चिमुकल्या गिरगावात ३ पथके आहेत…. त्यातील एक तर स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गणपतीला performance सादर करते….
सचिनच्या निवृत्तीच्या MCA करील कार्यक्रमाकरिता गिरगावातील पथक होते हो…
परंतु मिपावरही ढोल वादक आहेत हे जाणून आनंद झाला …
पुण्याच्या धर्तीवर मुंबई नि ठाण्यातही स्वरराज स्पर्धा होईल तेव्हाची मजा काही और असेल.
काहीही म्हणा पण नाद हा फक्त नादब्रह्म -पुणे पथकाचा ऐकावा… कान तृप्त होतात अगदि…
16 Feb 2014 - 11:22 am | मराठी_माणूस
ढोल नाशिक चा ऐकला होता , पुण्याचा पहिल्यांदा ऐकतोय
16 Feb 2014 - 11:26 am | धन्या
नाशिकचे ढोल, पुण्याचे ढोल पथक.
16 Feb 2014 - 1:33 pm | कंजूस
तुमच्या आवडीला आणि चिकाटीला मानले भाऊ .
आपले ढोल आणि परदेशातले ड्रम मध्ये वाजवण्यात आणि वाद्य म्हणून काय फरक आहे ?
बिजिंग ऑलंपिकमध्ये समारंभाची सुरुवात ढोल वाजवण्याने झाली होती .
ढोल हे जागे करणारे ,ढोलकी गुंगी आणणारे आणि तबला दहा हातांपुढे फुस्स .
दिवसा वाजवून त्रास होत असेल तर रात्री झोपल्यावर
वाजवा .
16 Feb 2014 - 3:07 pm | सुहास झेले
मस्तच... अगदी शब्दात वर्णन करता येत नाही उत्साहाच... दोन वर्षापूर्वी मित्राने काढलेला हा व्हिडीओ..
Shriram Pathak Raja Shivachatrapati Taal from Saurabh Kulkarni on Vimeo.
16 Feb 2014 - 3:23 pm | वेल्लाभट
लाइक्क्क्क
16 Feb 2014 - 4:00 pm | किसन शिंदे
टोलवाला कसला जीव खावून हाणतोय टोलावर. :D
16 Feb 2014 - 6:01 pm | यशोधरा
मस्त!
16 Feb 2014 - 6:04 pm | सानिकास्वप्निल
वाह! मस्तचं
16 Feb 2014 - 9:55 pm | आरोही
खरच खुप मस्त.........
16 Feb 2014 - 10:40 pm | पैसा
गेल्या वर्षी पुण्यातले एक ढोलपथक पाहिले/ऐकले होते. थोडा वेळ पाहणार्याला अद्भूत वाटते खरेच! मात्र प्रॅक्टिस कुठे आणि कशी करणार प्रश्नच आहे!
17 Feb 2014 - 9:19 am | वेल्लाभट
सानिका, यशोधरा, अद्वेय, ज्योती,
धन्यवाद
17 Feb 2014 - 10:44 am | आशु जोग
ढोल पथकाचे हे लोण
मुंबईच नव्हे तर जम्मू-काश्मीरपर्यंत पोचणार आहे
तसं मुळी ठरलेलच आहे
17 Feb 2014 - 10:52 am | मदनबाण
मला आवडतो हा प्रकार... नाशिक ढोल प्रसिद्ध होताच, पण पुण्याची पथकही मस्त आहेत.
बाकी यांच्या अभ्यासामुळे जवळ राहणार्यांना त्रास होत आहे ही बाब सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.
ढोल आणि ध्वनिक्षेपक यांच्या अती आवाजाने सुद्धा त्रास होतोच !
17 Feb 2014 - 10:54 am | ऋषिकेश
एकदा "संस्कृती" हे लेबल लागलं की त्याबद्दल लहानसा किंतुसुद्धा तुम्हाला संस्कृतीविघातक लेकाचे म्हणून बघायला पुरेशी ठरते.
तरी विचारतोचः
या ढोलपथकाच्या प्रॅक्टिसच्यावेळी एखाद्या लोकवस्तीपासून दूरच्या मोकळ्या जागी सराव करता येणार नाही का? ऐन लोकवस्ती जवळ असणार्या ठिकाणी ही प्रॅक्टिस करून संस्कृतीरक्षण कसे होते? तुमचे आमचे ठिके हो, कित्येक रुग्णांच्या, वृद्धांच्या, ऑटिझमसारख्या अधिक सेन्सिटिव्हीटी असणार्या आपल्यापेक्षा वेगळ्या नागरीकांच्या ताणाची कल्पना केली तर काहितरी पर्याय या ढोलपथकांनी शोधायला हवा असे वाटते.
17 Feb 2014 - 10:56 am | बिपिन कार्यकर्ते
मस्त!
17 Feb 2014 - 11:07 am | विअर्ड विक्स
गिरगावातील पथकांचा सराव चौपाटी वरील मैदानांवर होतो… त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा बागुलबुवा नको आणि तसेही सरावाचा वेळेस ढोल पूर्ण शक्तीने बडवत नाही कारण ढोल फुटायची भीती असते.….
आमच्या तरी पथकात सर्व हौशी वादक आहेत व त्याचे कोणीही पैसे घेत नाही तर केवळ हौसेखातर वाजवतात आणि मिळालेली बिदागी विधायक कार्यांसाठी वापरतात…
17 Feb 2014 - 11:11 am | ऋषिकेश
होय. अॅक्च्युअली मी हा सराव बघितला आहे आणि तो बघुनच "हे असे करणे शक्य आहे" हे पटले आणि त्यातून वरचा प्रश्न विचारला आहे. पथकांनी ठरवले तर त्रास न देताही ते असा सराव करू शकतात हे गिरगाव चौपाटीवरच बघितले.
मुंबईत गिरगावातींल पथकांना समुद्र किनारा आहे ही पळवाट पुरेशी नाही असे वाटते. पथकांनी दुसर्या बाजुचाही विचार करून काहीतरी पर्याय शोधायला हवे असे वाटते.
17 Feb 2014 - 11:25 am | सुबोध खरे
आवाजामुळे येणारी कर्ण बधीरता यात लोकांच्या त्रासाबद्दलच्या बधीरतेचा(insensitivity to others feelings) अंतर्भाव नाही
ही दोन प्रकारची असते
१) सतत मोठा आवाज ऐकत रहाणे
२) एकच जोरात झालेला स्फोटासारखा आवाज
विजेच्या कडकडाटाचा आवाज हा १२० डेसीबेल असतो आणि पुण्याच्या उत्सवात ढोल ताशांचा आवाज ११५ डेसीबेल पर्यंत होता.
खालील दुवे मुळापासून वाचावेत.
http://www.punemirror.in/article/62/2013092020130920104813250b11530a5/In...
http://www.dangerousdecibels.org/education/information-center/noise-indu...
http://www.nidcd.nih.gov/health/hearing/pages/noise.aspx
http://www.medicinenet.com/noise_induced_hearing_loss_and_its_prevention...
17 Feb 2014 - 12:39 pm | वेल्लाभट
आणि अनेक पथकं ही काळजी निश्चित घेतात त्यामुळे सरसकट प्रतिक्रीया नसावी.
17 Feb 2014 - 1:57 pm | सुबोध खरे
साहेब
पहिला दुवा वाचावा
पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणात दहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री बारा पासून ते सकाळी आठ पर्यंत दर १५ मिनिटानी आवाजाची पातळी मोजण्यात आली. याची सरासरी ११४.४ डेसीबेल आली
17 Feb 2014 - 1:45 pm | बाबा पाटील
सैन्याएत बंदुकीचा अथवा तोफेचा आवाज किती डेसिबल असतो.आणी सरावाकरता एक सैनिक साधारण किती राउंड फायर करतो,त्याचा त्याच्या कर्णेंद्रीयावर काय परिणाम होतो.कारण मी पहिल्यांदा .३२ चे एक सहा सात राउंड सलग फायर केले तेंव्हा मला साधारण १५-२० दिवस कानात स्टेथो घालता येत नव्हता.नंतर मात्र सवय होत गेली.
17 Feb 2014 - 2:06 pm | सुबोध खरे
http://www.freehearingtest.com/hia_gunfirenoise.shtml
बंदुकीच्या गोळी झाडण्याचा आवाज फारच मोठा असतो. त्यामुळे जेंव्हा प्रशिक्षण देतात तेंव्हा सैनिकांच्या डोक्यावर शिरस्त्राण असते त्यात कान झाकून त्यात आवाज कमी करणारे मफलर असतात. असे असूनही जेंव्हा सायंकाळी आपण परत येतो तेंव्हा कानात किं~~ असा आवाज येत रहातो(tinnitus). हा आवाज दुसर्या दिवशी नाहीसा होतो. नौदलात आम्हाला कानावर फिट बसणारे प्लास्टीक चे असे मफलर देत असत की ज्यामुळे समोरच्याचे बोलणे मुळीच ऐकू येत नसे. असेच मफलर विक्रांत च्या उड्डाण तळावर(फ्लाइट डेक) आम्ही वापरत असू.
पण प्रत्यक्ष दहशतवाद्यांबरोबर होणार्या चकमकीत तुम्हाला आपल्या साथीदारचे बोलणे ऐकणे पण आवश्यक असते म्हणून अशा युद्धमान परिस्थितीत बर्याच वेळेस सैनिक हे मफलर वापरीत नाहीत.
18 Feb 2014 - 12:05 pm | बाबा पाटील
माहिती बद्दल आभार...!
17 Feb 2014 - 2:15 pm | मदनबाण
आवाज /ध्वनी प्रदुषण या संदर्भात मध्यंतरी एक लेख माझ्या वाचनात आला होता... तो इथे देतो.
दुवा :- The last place on Earth without human noise
17 Feb 2014 - 2:46 pm | इरसाल
ढोल वाजवणे ही आवड "जपायची" पण त्याने दुसर्याची "झोपायची" अडचण होवु देवु नये ह्याचेही भान ठेवायचे. हाकानाका !
17 Feb 2014 - 3:46 pm | सूड
मस्तच की!!
18 Feb 2014 - 2:05 pm | अभ्या..
लै वेळा पाह्यली ती प्रॅक्टीस. कौतुक पण लै ऐकलं.
सोलापुरात हजार हजार लेझीम वाल्यांना दोन ढोल अन तीन ताशेवाले पुरतेत. आम्हाला तेच भारी वाटत्येत.
तुमचं कौतुक तुमच्यापाशी. आमचं आमच्यापाशी.
18 Feb 2014 - 2:49 pm | माजगावकर
तूनळीवरील व्हिडीओ पाहुन आणि हे वाचुन
अंगावर शहारे आले!
तुम्ही भाग्यवान आहात...
22 Feb 2014 - 9:46 pm | मदनबाण
आज हा व्हिडीयो ऐकला :-
12 Mar 2015 - 4:53 pm | नितिन५८८
पुणेरी ढोल ताशा मुळे कोणाला त्रास होत असेल तर गणपतीच्या आधी १ महिने रजा घेऊन एकांतवासात जावे. आम्हाला कधी याचा त्रास होत नाही आणि होणार पण नाही, राहिले अभ्यास करणाऱ्याचे, एक तर गणपतीच्या दिवसात कोणतीच परीक्षा नसते मग अभ्यास करून कुठे दिवे लावणार,
एकतर पोलिसांमुळे वेळ कमी मिळतो वाजवायला, त्यात असली कट कट… स्वताला वाजवता येत नाही म्हणून त्रास होतो असे स्पष्ट सांगावे.
उगाच नको तिथे बोट घालून खाजून अवधान घेऊ नये.