" मॅडम, भीमनी घंटी इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज.
मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे - तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे.
आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं. पण एकंदर मी देवभक्त नाही हे माझ्या टीमला माहिती आहे. म्हणून एकजण लगेच पुढे सांगतो, " तिथं मस्त जंगल आहे, तुम्हाला आवडेल ते खूप. ते एक अभयारण्य आहे...". पूर्ण टीमच्या मनात तिकड जायची इच्छा आहे त्यामुळे मी नकार द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. "काम पूर्ण झालं पाहिजे पण आपण ठरवलेलं, बरं का" अशी फक्त मी सगळ्यांना आठवण करून दिली आहे कालच.
आम्ही पंचमहाल जिल्ह्यात आहोत. वडोदरा शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर. येताना रस्त्यावर आम्हाला पावागड दिसतो. हा पहाडी किल्ला आहे आणि १६ व्या शतकातल्या संस्थानाची राजधानी होती इथं. आम्ही वेळ नसल्याने तिकडे जात नाही पण एकदा जाण्यासारखी दिसती आहे जागा. रस्त्यावरच्या जाहिराती वाचून तिथं आता 'रोप वे'ची व्यवस्था आहे हे कळत - म्हणजे पर्यटक मोठया संख्येने येत असणार इथं.
आम्ही 'झंड हनुमान' या ठिकाणी पोचतो. 'झंड' शब्दाचा अर्थ काय याबद्दल आधी मी विचारलं, पण कोणाला सांगता नाही आलं नेमकं - पण झंड म्हणजे भव्य असणार. वाटेत मोहाची झाडे आहेत भरपूर आणि त्यांच्या फुलांचा मंद वास वेडावून टाकतो आहे. काही आदिवासी स्त्रिया आणि पुरुष मोहाची फुले गोळा करताना दिसतात. ती विकून थोडेफार पैसे मिळतात त्यांना - या काळात ती एक उपजीविकाच असते त्यांची. एप्रिल महिन्याचे दिवस असल्याने जंगल हिरवं नाही पण एकदम थंड आहे हवा. पावसाळ्यानंतर हे जंगल कसं दिसत असेल याची नुसती कल्पना करूनही मी एकदम ताजीतवानी होते. अर्थात एप्रिल-मे या काळातही जंगलाच सौंदर्य वेगळच असतं हे काही मुद्दाम सांगायला नको.
हनुमानाची २१ फूट उंच मूर्ती देखणी आहे. इथं फोटो घ्यायला बंदी आहे, त्यामुळे मी डिजीटल कॅमेरा उघडला नाही. गाडीचा चालक आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो. तो सांगतो की, पांडव त्यांच्या वनवासाच्या बारा वर्षांनतर म्हणजे अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षी या परिसरात राहिले होते. अर्जुनाने एका बाणाने जमिनीतले पाणी मोकळे करून पांडवांची तहान भागवल्याची एक गोष्टही तो मला सांगतो. आता हा झरा कोरडा पडला आहे पण पावसाळ्यात तो ओलांडणे अवघड असते असेही तो सांगतो. आता रामायणातला हनुमान महाभारतातल्या पांडवांच्या भेटीला इथं कशासाठी आला होता हे मात्र त्याला सांगता येत नाही. मी विचारल्यावर सगळेजण हसतात फक्त - एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं की फक्त हसायचं हे धोरण सगळीकडे दिसतं! असो, काहीतरी कथा असेल ती, शोधायला हवी.
पुढे आहे 'भीमनी घंटी'. मला खर तर गुजराती चांगलं समजतं, त्यामुळे घोटाळा व्हायला नको होता. पण तरीही कुठेतरी आपल्यावर मातृभाषेचे संस्कार जास्त खोल असल्याने 'घंटी' म्हणजे एका मोठया 'घंटेचं' - देवळात असतात त्या 'घंटेचं' - चित्र माझ्या नजरेसमोर येतं. 'ही घंटी भीम कशासाठी वाजवत असेल' असा विचार मी त्यामुळे करते आहे मनातल्या मनात. त्यामुळे 'भीमनी घंटी' पाहिल्यावर क्षणभर माझा विरस होतो. मग माझ्या लक्षात येतं की, मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांची सरमिसळ केलीय मी म्हणून घोटाळा झालाय; मग मी स्वत:शीच हसते. कारण माझ्यासमोर जे काही दिसत ते आहे एक प्रचंड मोठं जातं - त्याच्या आकारामुळे आणि पांडवांच्या इथल्या वास्तव्याच्या कथेमुळे ते झालं 'भीमाचं जातं' - भीमनी घंटी!
अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षात भीमाने 'बल्लवाचार्याचे' काम केले ही कथा आपल्याला माहिती आहेच. त्यावेळी हे जातं वापरलं गेलं होत का? म्हणजे या भागाची बरीच प्राचीन पाळेमुळे आहेत म्हणायची. हल्ली असली काही माहिती शोधायची म्हणजे इंटरनेट हे एक हाताशी असलेलं सोपं साधन झालं आहे. नव्या-जुन्याचा हा संगम मला नेहमी गंमातीदार वाटतो. आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून!
त्या जात्याच्या आसपास मला एकावर एक रचलेले भरपूर दगड दिसतात. "हे काय आहे?" माझा स्वाभाविक प्रश्न. आता माझ्या टीमला माझ्याकडून कधी आणि कोणत्या प्रश्नांची अपेक्षा करायची याचा अंदाज आलेला आहे एव्हाना. आमच्यातला एकजण सांगतो, "इथं पडलेल्या दगडांतून आपल्या मनातलं घर बांधायचं आपण. ते जर स्थिर राहिलं, (म्हणजे ते एकावर एक रचलेले दगड खाली पडले नाहीत) तर आपल्या ख-या आयुष्यात आपल्याला आपण इथं बांधलेल्या घरासारखं घर मिळतं. स्वत:च्या मालकीच्या घराची आपली इच्छा पूर्ण होते इथलं घर टिकलं तर." माझे सहकारी उत्साहाने दोन मजली, तीन मजली घर, चार मजली घर बांधतात. त्यांच्यात ते घर 'बांधताना' लहान मुलांसारखा उत्साह आहे.
अनेक धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या 'इच्छापूर्तीच्या' काही ना काही धारणा, समजुती आढळतात. मला माझ्या सहका-यांच्या डोळ्यात एक स्वप्न दिसते. मला एकदम जाणवत की अशा प्रकारच्या 'इच्छापूर्ती' च्या धारणा म्हणजे काही फक्त अंधश्रद्धा नाही. जे बेघर आहेत, जे जन्मभर भाड्याच्या घरात राहत आहेत ज्यांचे स्वत:च्या मालकीचे घर नाही, ज्यांची सध्याच्या घरात कुचंबणा होते आहे .. अशा लोकांच्या मनात एक आशा जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम ही जागा करते आहे. एका नजरेत मला तिथे अज्ञात लोकांनी आशेने बांधलेली असंख्य घरं दिसतात. किती लोकांना आत्ताच्या त्यांच्या जगण्यातून पुढे जाण्याची उमेद हवी आहे, एक नवा रस्ता हवा आहे त्याच एक चित्रच तिथं आहे. माझ्या हृदयात वेदनेची एक कळ उठते. मी तिथं घर 'बांधत' नाही - पण मी आता इतरांना हसतही नाही. 'इथं ज्यांनी घरं बांधली आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळो' अशी एक प्रार्थना माझ्या मनात उमलते.
आम्ही परत फिरतो. येताना परिसरात असंख्य पोलिस दिसले होते, आता त्यांच्या संख्येत आणखी भर पडली आहे आणि अधिकारीही दिसत आहेत. मी एक दोन पोलिसांकडे पाहून हसते, तेही हसतात. एका अधिका-याला मी विचारते, "आज कोणी व्ही. आय. पी. येणार आहेत का?" एक अधिकारी हसतो पण उत्तर देत नाही. मी पुढे म्हणते, "सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला माहिती न देणे मला समजू शकते. पण मीही सहज, फक्त कुतूहल म्हणून विचारते आहे. तुमची संख्याच आहे हा प्रश्न मनात आणणारी." दुस-या अधिका-याला माझ्या साधेपणाची बहुधा खात्री पटते. तो सांगतो, " गुजरातचे सरन्यायाधीश (मुख्य न्यायाधीश?) येत आहेत इथं दर्शनाला. तुम्ही आधीच लवकर आलात ते बरं केलंत. आता कोणत्याही क्षणी साहेब येतील आणि तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबायला लागलं असतं ते परत जाईपर्यंत." मी त्याचे आभार मानते.
त्या पाहुण्यांच्या आधी आमची भेट झाली या जागेला आणि वेळ वाचला याचा आम्हाला आनंद होतो. पोलिस उगाच त्रास देत नाहीयेत कोणाला पण वेळ तर गेलाच असता आमचा वाया. आम्ही निघताना समोरून गाडयांचा ताफा येतो. मी उगीच गाडया मोजते. एक, दोन, तीन ..... वीस गाडया धूळ उडवत येतात. सबंध जिल्ह्याची यंत्रणा आज याच कामात दिसते आहे. आज खरं तर कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे मुख्य न्यायाधीश जाम्बुघोडा इथं आलेले आहेत. एकदा मला मोह होतो त्या दृश्याचा फोटो काढावा म्हणून. पण मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही - उगीच कशाला पोलिसांचं लक्ष वेधून घ्यायचं?
तर राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनीही आमच्यासारखी ' थोडं काम आणि थोडी मजा' अशी योजना केलेली दिसते आहे. आमच्या मौजेचा खर्च कोणी उचलला आहे ते मला माहिती आहे - पण या साहेबांच्या मौजमजेच्या खर्चाचा बोजा कोणावर पडणार? - असा एक प्रश्न माझ्या मनात येतोच. उत्तर अर्थातच माहिती आहे आणि पर्याय नसल्याने आपण ते स्वीकारलेलं पण आहे.
त्या न्यायाधीशांनीही 'भीमनी घंटी' ला त्यांच्या स्वप्नातले घर बांधलं की नाही ते मला माहिती नाही. कदाचित नसेलही - स्वतःचं घर असणारे भाग्यवान लोक आहोत आम्ही. कदाचित स्वप्नं पाहण्याइतका निरागसपणा आता आमच्यात उरलेला नाही. जगताना सारखी बुद्धीची तलवार वापरून आम्ही स्वप्नं पाहण्याची ताकद गमावली आहे का?
आपण सुखी असतो तेव्हाच फक्त बुद्धीवादी असण्याची चैन आपल्याला परवडते का? हाही एक प्रश्नच! अनुत्तरीत प्रश्न!
**
*अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रतिक्रिया
23 Jan 2014 - 10:35 am | आतिवास
हं! शुद्धलेखनाच्या काही चुका - विशेषतः अनुस्वारच्या- तशाच राहिल्या आहेत. स्व-संपादनाची सोय नसल्याने त्या दुरुस्त करता येत नाहीत. पुढच्या वेळी अधिक काळजीपूर्वक तपासून घेईन - यावेळी वाचकांनी क्षमा करावी ही विनंती.
23 Jan 2014 - 12:03 pm | आतिवास
लेख अपडेट (अद्ययावत?) केल्याबद्दल पैसा यांचे आणि संपादक मंडळाचे आभार.
23 Jan 2014 - 10:45 am | क्रेझी
आतिवासताई हा लेख तुम्ही खूप घाईघाई लिहीला आहे असं वाटलं.नेहमीच्या लिखाणातली लय थोडी बिघडल्यासारखी वाटली.असो,नविन जागेबद्दल कळालं,धन्यवाद :)
23 Jan 2014 - 10:34 pm | आतिवास
आभार. पुढच्या वेळी असं होऊ नये याची काळजी घेईन.
कदाचित खाली राही यांनी प्रतिसादात म्हण्यलाप्रमाणे ही लेखनशैली तुटक (तटस्थ) स्वरुपाची आहे, त्याचाही परिणाम असावा हा.
23 Jan 2014 - 11:20 am | भ ट क्या खे ड वा ला
लेख आवडला .
नवीन जागेची माहिती झाली धन्यवाद
एकावर एक दगड रचून ठेवण्याचा प्रकार विदर्भात कोठेतरी पाहिल्याचे स्मरते.
चित्र पाहून अंदाज येत नाही म्हणून विचारतो , साधारण किती परीघ आहे या जात्याचा?
(कारण माझ्यासमोर जे काही दिसत ते आहे एक प्रचंड मोठ जातं - )
कोकणात भात भरड ्यासाठी जे जाते वापरत त्याला घरट असे म्हणत. नेहमीच्या जात्याच्या दुप्पट आकाराचा असतो घरट
"घंटी आणि घरट" थोडे साम्य वाटते.
23 Jan 2014 - 2:33 pm | सुनील
जाते आणि घरोटा यावरून बहिणाबाईंची एक कविता आठवली!
23 Jan 2014 - 10:29 pm | आतिवास
कोणती कविता?
23 Jan 2014 - 10:53 pm | कवितानागेश
अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसे तसे माझं गाणं
पोटातून येतं ओठी....
अश्या ओळी आहेत.
24 Jan 2014 - 5:23 pm | आतिवास
जातं 'घरघर' असा आवाज करतं म्हणून त्याला 'घरोटं' म्हणत असावेत का?
अवांतरः आपल्याला आपल्या समाजाबद्दल किती कमी माहिती आहे हे असं पुन्हा लक्षात येतं!
23 Jan 2014 - 10:46 pm | आतिवास
भटक्या खेडवाला, दुसरा फोटो पाहिलात का? तो साधारण आठ-दहा फूट अंतरावरुन काढला आहे - मागचे दगड दिसावेत म्हणून लांबून घेतला फोटो.
मला वाटतं जात्याचा व्यास फार (अनपेक्षितपणे) मोठा नाही - गावात या व्यासाची, याच्या जवळपास जाणारी काही जाती मी पाहिली आहेत. इथं जात्याच्या पाळ्यांची जाडी खूप जास्त आहे - तेच लक्षात येतं.
जाणकारांनी अधिक भर घालावी.
आणखी एखादा फोटो आहे का पाहते संग्रहात!
24 Jan 2014 - 12:35 am | भ ट क्या खे ड वा ला
जात्याची पाळी (पेड ) नेहमी पेक्षाखूपच जास्त जाड दिसते आहे.
23 Jan 2014 - 11:56 am | कंजूस
सरस मजानी वात छे । तमारु एक घर चोक्कस थशे ए खरुं ।
24 Jan 2014 - 5:25 pm | आतिवास
:-)
23 Jan 2014 - 12:29 pm | बॅटमॅन
नेहमीप्रमाणेच उत्तम पण किंचित अर्धवट राहिलाय असं का बरं वाटतंय????
23 Jan 2014 - 1:01 pm | अनिरुद्ध प
+१
23 Jan 2014 - 12:39 pm | बिपिन कार्यकर्ते
आवडलं!
23 Jan 2014 - 1:25 pm | प्यारे१
लिखाण आवडलं. नेहमी आवडतं.
अवांतरः तुम्ही थोड्या 'नाही रे' वाल्या का असता नेहमी? ;)
आदिवासी अथवा वेगळ्या संस्कृती जपणार्या, कुरवाळणार्या लोकांना नेहमी झुकतं माप मिळावं का?
तसं ते काही ठिकाणी मिळतं असं वाटतं. त्यालाही हरकत नाही मात्र त्याबरोबर यंत्रणा /सरकार कसं लुबाडणूक करतं असं चित्र का मांडलं जातं?
सरकार सगळीकडं पोचू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. समाजातले काही घटक दुर्लक्षित राहतात त्यावेळी निव्वळ विरोधाभास मांडण्यापेक्षा आत्यंतिक कष्ट करुन गरीबीतून वर येऊन समाजात स्थान निर्माण करणार्या लोकांना जास्त महत्त्व मिळायला हवं असं वाटतं.
काही विशिष्ट गटातले लोक ह्या आदिवासी लोकांचा 'वापर' सरकार विरोधी करुन स्वतःच्या तुंबड्या भरुन घेतात का, स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी करतात का असा प्रश्न पडला म्हणून विचारलं.
लोकशिक्षणाचा जास्तीत जास्त वापर व्हावा नि तो समाजाच्या पर्यायानं सरकार नि देशाच्या सुसंगत, किमान अविरोधी व्हावा असा प्रयत्न जास्त फलदायी ठरेल.
______
अर्थात शासकीय मुलभूत निर्णय घेताना कोण कोण निर्णय घेतं हे पाहिलं गेलं पाहिजे. समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, भागातले नागरीक एखाद्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून त्यामध्ये जोडले जाणं, त्यांनी विस्तृत स्वरुपात विचार करुन निर्णय घेणं, आधीच पुनर्वसनाच्या, रोजगाराच्या समस्या सोडवणं हे सगळं (की काहीच) होत नाही का?
अम्मलबजावणी करताना अर्थकारणच त्रास देतं का?
24 Jan 2014 - 10:57 pm | आतिवास
अवांतरः तुम्ही थोड्या 'नाही रे' वाल्या का असता नेहमी? Wink
असते का?
खरं तर आणखी थोडी असायला हवी आहे मी - पण कधीकधी आपल्याच नादात राहिलं की ते धूसर होतं काही काळ :-(
बाकी तुम्ही मांडलेल्या सगळ्या मुद्यांवर माझे विचार (उत्तरं नव्हे) मांडायचं म्हटलं तर तो एक स्वतंत्र लेख होईल. पण थोडक्यात सांगायचं तर : अंमलबजावणी करताना केवळ अर्थकारण त्रासदायक नसतं तर त्यामागे राजकारण, समाजकारण, जीवनविषयक दृष्टिकोन, समाजाची परंपरागत रचना, पर्यायांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव, मर्यादित संधी, स्पर्धा, स्वार्थ, असंवेदनशीलता, योग्य धोरणांचा आणि कधीकधी धोरणं योग्य असली तरी अंमलबजावणीचा अभाव, उपजीविकेचे बदलते स्रोत, गरीबी, आरोग्यसेवा पुरेशा आणि चांगल्या नसणे ..... असे असंख्य पैलू असतात. त्यांची कॉम्बिनेशन्स दरवेळी बदलत राहतात .... परिणाम मात्र कमी-अधिक त्याच स्वरुपाचा होतो.
आणि या जंजाळात जे नेहमी मागे राहतात - त्यांची बाजू मला दिसत राहते ....
अर्थात ही कोंडी फोडणारे लोक आहेत, लोकांच्यात ती ताकद आहेच. या लेखातही 'स्वप्नं पाहण्याच्या' लोकांच्या ताकदीचा उल्लेख आलेला आहे.
हं! आता 'केस स्टडी' लिहा म्हणत असाल तर गोष्ट वेगळी :-)
25 Jan 2014 - 12:24 pm | प्यारे१
बरंच काही पटण्यासारखं. काही न पटण्यासारखं. पण सगळंच बोलण्यासारखं मात्र आहे. तरीही इथं नको. असो.
23 Jan 2014 - 2:27 pm | राही
श्रावण मोडकांच्या अश्या तश्या गोष्टींची आठवण झाली. वरवर अगदी तटस्थ निवेदन, पण काही जागा अश्या पेरायच्या की बिट्वीन द लाइन वाचणार्याला व्यवस्थेचा नाकर्तेपणा जाणवेल आणि त्याविषयीचा तिरस्कार जागा होईल. म्हणजे इथे निवेदकाने ठरवून पांघरलेल्या तटस्थपणाच्या आवरणाला एक खिडकीही आहे ज्यात डोकावून पहाणार्याला निवेदकाला हवी ती बाजू दिसेल, निवेदकाने बटबटीतपणे दाखवल्याशिवाय.
ही अवघड लेखनशैली छान साधली आहे. इतर अनेक लेखांप्रमाणे हा लेखही आवडला.
अवांतर: कोल्हापूर येथल्या टेंभलाईच्या देवळाच्या आसपास अशी घर म्हणून प्रतीकरूपात दगड रचून ठेवण्याची पद्धत आहे.
आणखी खूपच अवांतर : कोंकणातली ती अवाढव्य जाती बहुधा लाकडाची, झाडाच्या टणक बुंध्यापासून पाडलेली असत. भातगिरण्यांच्या आगमनापूर्वीच्या काळात भात भरडून तांदूळ करण्यासाठी ती वापरत. ती आकाराच्या मानाने हलकी असावी लागत कारण फक्त तूसच वेगळे करायचे असे, तांदूळ दाणा अखंड रहायला हवा असे. रहाट हा शब्द 'रथ' वरून आला आहे, तसा 'घिरट' हा शब्द 'गृहरथ'वरून आला असेल काय? शंकर सखारामांनी बहुधा या बाबतीत काही लिहिले आहे.
23 Jan 2014 - 3:26 pm | प्यारे१
मोडकांचं नाव मुद्दामच टाळलेलं. असो.
बाकी त्या अतिअवांतराबाबत नि जनरलच एखादा लेख येऊ द्या राही मॅडम!
लेखनाबाबत अम्मळ आळशी आहात बरं ;)
25 Jan 2014 - 10:38 am | आतिवास
राही यांचे प्रतिसाद वाचनीय आणि अभ्यासू असतात; मुख्य म्हणजे त्यात कोणताही अभिनिवेश नसतो.
आणि त्यांचे अवांतर तर माहितीत भर टाकणारे असते नेहमीच.
आता त्या लेख लिहिपर्यंत आपणच लेख लिहून त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहणे - याला सध्या तरी काही पर्याय दिसत नाही ;-)
23 Jan 2014 - 2:44 pm | बॅटमॅन
प्यारे आणि राही या दोघांचेही प्रतिसाद आवडले. उपस्थित केलेले प्रश्न पटणीय आहेत खास!! राहींचे शैलीबद्दलचे निरीक्षण तर एकदम मार्मिक आहे.
23 Jan 2014 - 6:37 pm | सोत्रि
सेंट परसेंट सहमत!
बाकी लेख नेहमीप्रमाणे छान!
- (मार्मिक) सोकाजी
23 Jan 2014 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम वाचनिय लेख... तुमचे सगळेच लेखन तसेच असते म्हणा ! प्रवासवर्णन व अनुभव आणि त्यापुढे जाऊन शांतपणे केलेले वस्तुस्थितीचे विवरण फार आवडले. मनाला भिडणारे--- आणि विषेशतः कोणताही आक्रस्ताळेपणा करता अथवा अभिनिवेष न बाळगता--- लिहू शकणार्यांचा नेहमीच हेवा वाटला आहे... तो येथेही वाटतोय.
तुमच्या एवढ्या भटकंतीत कोठेतरी एखाद-दुसरा आशादायी स्फुलिंग जरूर दिसला असेल. त्यांचाबद्दलचे तुमचे लिखाणाही वाचायला फार आवडेल.
27 Jan 2014 - 12:34 pm | आतिवास
तुमच्या एवढ्या भटकंतीत कोठेतरी एखाद-दुसरा आशादायी स्फुलिंग जरूर दिसला असेल. त्यांचाबद्दलचे तुमचे लिखाणाही वाचायला फार आवडेल.
जरुर लिहीन.
जाताजाता: अनेक वाचकांना हा लेख 'नकारात्मक' का वाटला असावा याचा विचार करतेय. :-)
27 Jan 2014 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी तुमच्या लिखाणाला नकारात्मक म्हणणार नाही. सद्या भारतात अनेक उत्तम गोष्टी होत आहेत. पण त्याबरोबरच अनेक तृटी आहेत. राजकारणामुळे, बाबूकारणामुळे किंवा केवळ धनदांडग्यांच्या स्वार्थकारणामुळे झालेल्या सुधारणांचा त्यांना होऊ शकणार्या योग्य फायद्यांपासून अनेक लोक वंचित आहेत. थोडक्यात, विकासासाठी पैश्याच्या कमतरतेपेक्षा तो ज्या नळातून तळागाळात पोचला पाहिजे त्या नळाला लक्षणीय गळती आहे, हे जास्त मोठं दुखणं आहे. आणि ही उघड परिस्थिती परखडपणे (विथ ब्रुटल ऑनेस्टी) स्विकारायला आपल्या सर्वांना जरा कठीण जातंय इतकंच.
ती गळती बहुंताश तरी थांबेल तो भारताचा सुदिन. पण तो सुदिन प्रत्यक्षात आणण्यासाठी "ती गळती आहे, ती अन्याय्य आहे आणि तिच्यामुळे अनेक लोकांचे मूलभूत हक्क डावलले जात आहेत" हे सत्य आपल्याला डोळे उघडे ठेवून स्विकारायलाच हवे. आणि हेच तुम्ही केले आहे.
खडतर परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्यांच्या कथा कटू सत्यावर मात करायला मनाला उभारी देण्याचे काम करतात.
23 Jan 2014 - 4:51 pm | अजया
अगदी हेच म्हणायला आले होते!
23 Jan 2014 - 7:10 pm | Atul Thakur
नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण :) वाचल्यावर अंतर्मुख करायला लावणारे :)
24 Jan 2014 - 10:07 pm | आयुर्हित
१००% सहमत.
जगताना सारखी बुद्धीची तलवार वापरून आम्ही स्वप्नं पाहण्याची ताकद गमावली आहे का?
या साहेबांच्या मौजमजेच्या खर्चाचा बोजा कोणावर पडणार?
आपण सुखी असतो तेव्हाच फक्त बुद्धीवादी असण्याची चैन आपल्याला परवडते का?
आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून!
ह्या व अशा प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील.
23 Jan 2014 - 9:01 pm | प्रचेतस
लेख आवडला.
23 Jan 2014 - 11:42 pm | मिसळपाव
... वाचल्यावर काय वाटलं ते मला शब्दात सांगणं कठीण आहे. अतिशय नेमके विचार.
24 Jan 2014 - 12:16 am | अर्धवटराव
मारुतीराया कधिही कुठेही कोणालाही भेटु शकतो... त्याला काय.. मारली टण्कन्न उडी आणि आला पांडवांसमोर :)
आपल्या लोककथांमधे भीम का रुजला याचं छान परिक्षण इरावती कर्व्यांनी युगांतात केलं आहे. आडदांड, निरागस, विवेकाची चाड असलेला, सगळ्यांना अगदी नि:संकोच आधार वाटावा असा साईडहिरो भीम. तो भाग मुळातुनच वाचण्यासारखा आहे. कदाचीत तसच काहि हनुमंतरावांच्या बाबतीत पण असावं.
दगड धोंड्याच्या घरांची कल्पना आवडली. ते घर टिकलं तर जगण्याची उमेद, नाहि टिकलं तर मनाला अंधश्रद्धेच्या बोधाची एक हलकिशी चापट. गाजराच्या पुंगीसारखं :) उत्तम कल्पना आहे.
बाकी सरकारी यंत्रणांचा वैयक्तीक कामांसाठी वापर वगैरे... ह्म्म्म... तो एक चाणक्य होऊन गेला... आता केजरीवालांकडुन फार अपेक्षा आहेत.
24 Jan 2014 - 8:32 am | प्रचेतस
बाकी महाभारतात भीम-मारुती भेटीचे वर्णन खरोखरच आहे बरं का. :)
आरण्यकपर्वात गंधमादन पर्वताच्या शिखरावरील कुबेराच्या मालकीच्या सरोवरातून सौगंधिक कमले द्रौपदीसाठी आणायला जाताना वाटेत हनुमान शेपटी आडवी घालून भीमाची वाट अडवतो व ती उचलायला सांगून भीमाचे गर्वहरण करतो. शिवाय नंतर संक्षिप्त रामचरित्र ऐकवून आपले समुद्रोल्लंघनाच्या वेळचे उग्र स्वरूपही दाखवतो शिवाय पुढे होणार्या युद्धात अर्जुनाच्या रथध्वजावर आरूढ होईन असे वरप्रदान करतो.
बाकी हा हनुमान-भीम भेटीचा सर्वच प्रसंग प्रक्षिप्त आहे असे माझे मत.
हे बघा त्या प्रसंगाचे शिल्पांकन

24 Jan 2014 - 9:21 am | यशोधरा
अरे किती सुरेख शिल्प आहे हे! कुठे आहे हे? भलतंच सुरेख!
अर्धवटराव +१
लेख आवडला. आतिवास, असं कधीतरी भटकंतीत मला येता येईल का हो तुमच्याबरोबर? मी मुळ्ळीच काही त्रास देणार नाही, प्रॉमिस! :)
24 Jan 2014 - 9:38 am | प्रचेतस
सिद्धेश्वर मंदिर, टोके प्रवरासंगम. पुणे औरंगाबाद रोडवर.
24 Jan 2014 - 10:58 am | मुक्त विहारि
तुमच्या पोतडीतून काय काय निघेल, त्याचा नेम नाही...
प्रणाम स्वीकारावा..
24 Jan 2014 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
24 Jan 2014 - 11:28 am | आतिवास
वा! अगदी 'पुराव्याने शाबित' करण्यासाठी योग्य फोटो.
शिल्प सुंदर आहे.
बाकी हा हनुमान-भीम भेटीचा सर्वच प्रसंग प्रक्षिप्त आहे असे माझे मत.
सहमत.
पण अशा कथा कसलाही अभिनिवेश न ठेवता वाचल्या/ऐकल्या की छान वाटतात. त्यातून त्या त्या काळच्या समाजाचं अंतरंग काहीसं उलगडतं आपल्याला - म्हणजे तसं निदान वाटतं तरी!
24 Jan 2014 - 11:33 am | अर्धवटराव
काय जबरी शिल्प आहे.
वल्लीशेठची श्रीमंती लाजवाब.
>>बाकी हा हनुमान-भीम भेटीचा सर्वच प्रसंग प्रक्षिप्त आहे असे माझे मत.
-- छे हो. इन फॅक्ट याच प्रसंगापासुन ओरिजनल महाभारत सुरु होतं.
24 Jan 2014 - 12:50 pm | बॅटमॅन
वल्लीशेठच्या श्रीमंतीबद्दल कचकून सहमत आहे.
वल्लीला असलेल्या माहितीवर दररोज एक धागा काढायचे म्हटले तरी चारेक म्हयने फक्त तेवढ्यावर मिपा तगू शकेल.
27 Jan 2014 - 12:38 pm | आतिवास
मारुतीराया कधिही कुठेही कोणालाही भेटु शकतो...
हे बरीक खरं, अगदी मान्य!
24 Jan 2014 - 10:56 am | मुक्त विहारि
जात्याचा फोटो, अजून जवळून घेतला असाता तर बरे झाले असते,
27 Jan 2014 - 12:39 pm | आतिवास
हं! शोधला संग्रहात, पण नाहीये दुसरा फोटो.
24 Jan 2014 - 11:18 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
24 Jan 2014 - 11:40 am | प्रभाकर पेठकर
'घंटी' म्हणजे जातं. जसे 'घरघंटी' म्हणजे पीठ, मसाले दळायचे, विजेवर चालणारे यंत्र किंवा ज्याला विजेरी जातं म्हंणता येईल. गुजराथी भाषेत हा वापरतात शब्द.
एकंदरील लिखाण सुंदर आहे. वर्णन निवांत न होता जरा धावतं झालं आहे. आपण जिथे जातो, जे पाहतो त्याचे ऐतिहासिक किंवा पौराणिक संदर्भ जाणून घेणं. नावांचे अर्थ समजावून घेणं आणि त्यावर विचारमंथन करणं ही 'नुसत्या स्थळांना भेटी देऊन छायाचित्रं काढण्यापेक्षा' चांगली पद्धत आहे. मलाही असे संदर्भ, शब्दांचे अर्थ आणि उगम समजुन घ्यायला आवडते. असो.
24 Jan 2014 - 12:10 pm | चिगो
आवडला..
न्यायसंस्थेला असे प्रश्न विचारणे किंवा तसा विचारही मनात आणणे, ह्यालान " न्यायसंस्थेचा अवमान" मानल्या जाते, असे ऐकीवात आहे.. ;-)
27 Jan 2014 - 12:42 pm | आतिवास
न्यायसंस्थेला असे प्रश्न विचारणे किंवा तसा विचारही मनात आणणे, ह्यालान " न्यायसंस्थेचा अवमान" मानल्या जाते, असे ऐकीवात आहे.. Wink
हं! जोवर 'मनातले विचार' (अप्रकट विचार) न्यायसंस्थेला कळत नाहीत, तोवर चिंता नाही आपल्याला ;-)
24 Jan 2014 - 1:14 pm | तिमा
लेख आवडला आणि अर्थातच राही यांचा प्रतिसाद. लेख वाचल्यावर जे मनांत आले होते तेच जणु, राही यांनी शब्दबद्ध केले आहे.
गुजरात मधले पोलिस इन जनरल, महाराष्ट्रातल्या पोलिसांपेक्षा सामान्य जनतेशी नीट वागतात असा माझा अनुभव आहे.
24 Jan 2014 - 7:16 pm | गणपा
लेख तर आवडलाच पण मिपाकरांनी (विषेशतः वल्लीने) पुरवलेली वाढीव माहितीही झक्कास.
24 Jan 2014 - 9:25 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
27 Jan 2014 - 10:43 am | संतोषएकांडे
हे घ्या अगदी ताजे कालच काढलेले त्याच प्रवासाचे फोटो






हाच तो पावागढ
रोप वे
खाण्यापीण्याचा सामान अशा रीत्या वर चढवतात
हे झंड हनुमान
पांडवकालीन झंडेश्वर महादेव
आणी हीच ती 'भीमनी घंटी'
27 Jan 2014 - 12:47 pm | आतिवास
धन्यवाद.
हे फोटो पाहून या ठिकाणची शांती गायब झाल्यासारखं का वाटतंय मला?
का हे ठिकाण नेहमी असंच होतं आणि मी एखाद्या शांत दिवशी गेले होते?
जात्याभोवतीचं कुंपण पाहून तर फारच वाईट वाटलं; जणू काही ते कैद झालंय :-(
27 Jan 2014 - 11:32 am | ऋषिकेश
छानच लेखन!
फोटो बघेपर्यंत मनात एक चित्र तयार झाले होते. शेवटी प्रतिसादातील चित्रांमुळे ते विस्कटले गेले :(
27 Jan 2014 - 5:15 pm | वेल्लाभट
यू स्टोल माय वर्ड्स.
हेच वाटलं मलाही. अशी गूढ, ऐतिहासिक जागा वाटते ती मूळ लेखात. प्रतिसादातील चित्रात त्याविरुद्ध. असो. लेखन अप्रतिम यात वाद नाही. मजा आली वाचून.
27 Jan 2014 - 12:04 pm | पैसा
असे सगळे प्रश्न पडणं हे जिवंत असल्याचं लक्षण. पण ज्यांना पडत नाहीत ते खरे सुखी. त्यांना विचार करण्यामुळे येणारा पुढचा बराचसा त्रास चुकतो.
27 Jan 2014 - 12:48 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.