नको वाटणाऱ्या अलार्मच्या कर्कश्य आवाजाने त्याला जाग आली…तो उठून बसला…यांत्रिकपणे करायच्या पुढच्या सगळ्या हालचाली आता अंगवळणीच पडलेल्या. उत्तररात्रीच्या त्या अखेरच्या प्रहरात शुभ्र चांदणं पसरलेलं.
"थंडी आहे रे खूप…असुदे" म्हणत आईनं बळेच दिलेल्या गोधडीकडे पाहताना त्याला लहानपणीचा गारवा आठवला.
आई कधीचीच उठलेली आहे. स्वयंपाक घरातल्या पिवळट बल्बचा प्रकाश डोक्यावरून घेतलेल्या चादारीतूनही आत पाझरायचा. वडील बाहेरगावी जायचे असले कि त्यासाठी आईची लगबग चाललेली असायची. आपल्याला जाग येऊ नये म्हणून दबक्या चालीनच ती सगळी काम करायची.
कपबश्यांचा आवाज, आंघोळीचं पाणी काढल्याचा आवाज, एवढचं काय तर… चहाचं आधण ठेवलेलं त्याचाही आवाज ऐकू यावा इतकी नादमय शांतता.
त्या पुसट आवाजांची एक गुंगी चढायची.
कानाच्या पाळ्या आणि नाकाचा शेंडासुद्धा लाललाल करणाऱ्या त्या गारठ्यानं दारातला मोगरापण बिचारा पार गारठून जायचा.
पांढरी शुभ्र अशी, धुंद करून टाकणारी त्याची फुलं नंतर आई आणायची, पूजेला म्हणून…नुकत्याच फोडणी दिलेल्या भाजीचा वासही त्यात मिसळून जायचा.
कुठलसं स्तोत्रं म्हणणारी आज्जी बराच वेळ ते म्हणत राही. ऐकायला अगदी गोड वाटे.
"म्हणत जावं रे काहीतरी, देव चांगली बुद्धी देतो मग" आज्जी म्हणायची. आपण ऐकलच नाही कधी. जमलही नसत म्हणा!!!
अंगावर काटा आणणारा तसला पौषातला गारठा आता कुठला असायला? मोठेपणी आणखी 'मोठं ' व्हायच्या नादात तो सुखद गारठा आपण हरवून बसलोत या जाणिवेने डोळ्यातली चिपाडं तशीच ठेऊन तोंडही न धुता तो परत पांघरुणात शिरला.
असो!
प्रतिक्रिया
23 Dec 2013 - 11:43 pm | यसवायजी
असो! ?? का म्हणुन?
चांगलं चाल्ल होतं की.. अजुन थोडं लिहायला हवं होतं.
24 Dec 2013 - 1:19 am | ग्रेटथिन्कर
छान.फारच सेन्टी
24 Dec 2013 - 2:00 am | प्रभाकर पेठकर
फार त्रोटक झाले लिखाण. सुर गवसला गवसला म्हणे पर्यंत पुन्हा हातून निसटला. असो.
इतक्या सुंदर वातावरण निर्मितीनंतर,
>>>>डोळ्यातली चिपाडं तशीच ठेऊन तोंडही न धुता तो परत पांघरुणात शिरला.
हे वाक्य बासुंदीत माशी पडल्यासारखे वाटले.
24 Dec 2013 - 3:02 am | पाषाणभेद
काहीतरी हरवलेलं आहे ते पुन्हा मिळणार नाही.
"डोळ्यातली चिपाडं तशीच ठेऊन तोंडही न धुता परत पांघरुणात शिरून" कदाचित तो हरवलेलं लहाणपण पुन्हा
गवसण्यासाचा प्रयत्न कदाचित तो करत असावा.
छान स्फुट...
24 Dec 2013 - 5:22 pm | अनिरुद्ध प
+१
24 Dec 2013 - 9:45 am | सुज्ञ माणुस
अहाहा ! सकाळी सकाळी एकदम आठवणच झाली त्या क्षणांची. काही सेकंदातच पार मागे गेलो. मस्त !
24 Dec 2013 - 10:38 am | जेपी
आवडल .
24 Dec 2013 - 11:02 am | आनन्दा
द्विशतशब्दकथा आहे हो ती.
24 Dec 2013 - 5:15 pm | पैसा
पण अचानकच संपून गेली. तुम्ही नक्कीच चांगलं लिहू शकता.
24 Dec 2013 - 5:25 pm | हाडक्या
हे आधी वाचल्यासारखे वाटतेय.. बहुतेक प्रविण टोकेकरांनी साप्ताहिक 'लोकप्रभा' चे संपादक असताना लिहिलेले संपादकिय याच तर्हेच्या सकाळचे वर्णन होते..
तरी असो.. सुन्दर थंडीची सकाळ आणि बालपणाच्या आठवणी यावर कोणाचाही प्रताधिकार असू शकत नाही..
24 Dec 2013 - 11:08 pm | तुमचा अभिषेक
थोडकंच पण सुंदर लिहिलेय.. पार पोचवलंत हो त्या आठवणींत.. घोंगडीत झोपून घेतले ईतक्यात..