युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-३
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-४
युद्धकथा-१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ५
...............‘ते ठीक आहे पण मी तुला जे सांगणार आहे....’ असे म्हणून हिमलरने त्याची तिजोरी उघडली व कर्स्टनच्या हातात एक फाईल ठेवली. हे करताना त्याला होणारे कष्ट व भीती स्पष्ट जाणवत होती.
‘वाच ! हिटलरच्या प्रकृतीची अत्यंत गोपनीय फाईल आहे ती !’..........................
नंतर कर्स्टनला हिमलरने ती फाईल त्याला का दाखविली याचे आश्चर्य वाटले. हिटलरची काळजी वाटत होती म्हणून, का युद्धाचे पारडे फिरल्यामुळे आता त्याला जे रागाचे झटके वारंवार येत होते त्यामुळे ! तो अहवाल २६ पानी होता. त्यात हिटलरला तरुणपणी सिफिलीस झाला होता व त्यातून तो पासवॉकच्या इस्पितळातून बरा होऊन बाहेर पडला होता हेही लिहिले होते. १९३७ साली त्याची लक्षणे परत दिसायला लागली होती. १९४२ च्या सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले होते की हिटलरला ‘प्रोग्रेसिव्ह सिफिलीस पॅरॅलिसिस’ची बाधा झाली होती.
कर्स्टनने काही न बोलता ती फाईल हिमलरला परत दिली. ती फाईल नजरेस पडणे याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात याचा नुसता विचार त्याच्या मनात आल्यावर त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहीला.
‘तू या आजारांवर उपचार करु शकतोस का ?’ हिमलरने विचारले.
‘दुर्दैवाने मी याच्यात काही मदत करु शकेन असे वाटत नाही. मी शारीरिक व्याधी बर्या करतो मानसिक नाही. त्याच्यावर उपचार चालू आहेत ना ?’
‘हो ! डॉक्टर मॉरेल ! त्याच्या मते त्याच्या उपचारामुळे तो आजार त्यामुळे वाढायचा थांबेल व त्याला काम करता येईल’
‘कशावरुन तो डॉक्टर असे म्हणतो ? या आजारावर उपाय नाही असेच वैद्यकीय शास्त्र सांगते.’
हिमलरने अचानकपणे अस्वस्थ होते येरझार्या घालण्यास सुरुवात केली.
"हा काही साध्यासुध्या माणसाचा आजार नाही. कुठल्याही इस्पितळात हिटलरला नेता येत नाही कारण त्याला मानसिक आजार झालाय ही बातमी बाहेर फुटली तर युद्ध जिंकण्याची आशा आत्ताच मावळेल. तोपर्यंत मोरेललाच त्याच्या उपचार करणे भाग आहे.'
‘मला कसली भयंकर काळजी आहे बघ ! जगासमोर हिटलरची प्रतिमा एका सम्राटाची आहे. इतिहासात त्याची नोंद अशीच व्हावी अशी माझी इच्छा आहे. आता तो आजारी राहीला तरी काय फरक पडतो ? त्याचे या जगातले काम झाले आहे.’'
हिमलरच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर कर्स्टनने ब्रान्टला त्या अहवालाविषयी विचारले. ते ऐकताच ब्रान्टचा चेहरा पांढराफटक पडला.
‘त्याने तुला तो अहवाल दाखवला ? तुला तू कुठल्या संकटात सापडला आहेस याची कल्पना आहे का ? तू जर्मनीचा नागरीक नसताना या देशाचे सगळ्यात गुप्त राखलेले रहस्य तुला माहीत झाले आहे. जर्मनीमधे राईशफ्युअरर सोडल्यास, बोरमन आणि गोअरिंग या दोघांनीच हा अहवाल वाचला आहे. एक लक्षात ठेव. यापुढे बोलताना या अहवालाचा साधा उल्लेखही तू करु नकोस. तसा तू केलास तर तुझी हत्या होईल हे लक्षात ठेव.’ ( खरे तर ही फाईल हायड्रिशने तयार केला होती. त्याने हिमलरवरही फाईल तयार केली होती.)
कर्स्टनने हा सल्ला पाळला. पुढे काही दिवसात त्याने हिमलरची अनेक वेळा गाठ घेतली पण या विषयावर कसलेही बोलणे झाले नाही जणू काही तशी फाईलच अस्तित्वात नव्हती. पण एका बैठकीत हिमलरनेच हा विषय परत उकरुन काढला.
‘हिटलरवरील उपचारावर तू काही विचार केला आहेस का नाही ?’ या प्रश्नाचे उत्तर देताना कर्स्टन ब्रान्टने दिलेला इशारा विसरला. त्याला छळणार्या या विषयावर मग त्याने हिमलरशी चर्चाच केली. कर्स्टनने हिमलरला बजावले की हिटलरच्या सगळ्या निर्णयांवर या आजाराची छाया पडू शकते. त्याची प्रकृती व मानसिक संतुलन बिघडले आहे. कर्स्टनने हिमलरला सांगितले की डोकेदु:खी, इन्सोम्निया, हातांचा कंप, बोलताना अडखळणे, रागाचे झटके, पक्षघाताचे झटके हे सगळे वाढतच जाणार आहे. हिटलरला मोरेलच्या हाती सोपवून हिमलर फार मोठा धोका पत्करतो आहे. त्याला होणारे भ्रम त्याला कुठलाही विचार करायला भाग पाडू शकतात.
‘लाखो माणसांचे भवितव्य तू असल्या माणसाच्या हातात सोपविणार आहेस का ?’ शेवटी कर्स्टनने विचारले.
हिमलर काहीच बोलला नाही. स्वत:च्या धाडसाने आश्चर्यचकित झालेल्या कर्स्टनने त्याचा मुद्दा अधिक स्पष्ट करुन सांगितला.
‘ज्याची सर्व इंद्रीये शाबूत आहेत त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे. हिटलरचा स्वत:च्या बुद्धीवरचा ताबा सुटला आहे हे लक्षात घेता हिमलरला त्याला फ्युरर मानायचे कारण नाही’
‘मी त्या सर्व शक्यतांचा विचार केला नाही असे वाटते का तुला.....’ हिमलर पुटपुटला.
‘तर्कशास्त्राप्रमाणे तू म्हणतो आहेस ते खरे आहे पण येथे ते चालत नाही. गाडीचे घोडे बदलणे आता शक्य नाही’.
‘शिवाय फ्युररविरुद्ध काही हालचाल करणे मला आता शक्य नाही. मी एस् एसचा कमांडर आहे व एस् एसचे बोधवाक्य आहे ‘निष्ठा हाच सन्मान’ मी असले काही केले तर लोकं माझ्या तोंडात शेण घालतील. म्हणतील हिमलरने वैयक्तिक स्वार्थासाठी हिटलरचा काटा काढला.’
‘मग तू हिटलरचा आजार बळविण्याची वाट बघणार तर ! जर्मनीच्या लाखो तरुणांचे भवितव्य एका वेडसर माणसाच्या हातात सोपवून तू ते बघणार !’
‘बघू ! परिस्थिती अजून एवढी हाताबाहेर गेलेली दिसत नही. तसे वाटल्यास थोडा वेळ मिळेल त्यात काहीतरी करता येईल’.
१९४३च्या सप्टेंबरमधे फिनलँडच्या सरकारने कर्स्टनला फिनलँडला बोलाविले. आता फिनलँड जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरला असल्यामुळे हिमलरला त्याला थांबवता आले नाही.
‘जा ! पण तुमच्या सरकारने त्यांचे ज्यू आमच्या स्वाधीन का केले नाहीत याची माहीती काढून आण’ हिमलर त्याला हसत म्हणाला.
कर्स्टन फिनलँडला जाण्याची तयारी करत असताना त्याला स्वीडनच्या राजदूताकडून स्वीडनला भेट देण्याचे आमंत्रण मिळाले. स्वीडनच्या काही मंत्र्यांना त्याच्याशी गुप्त चर्चा करायची होती. हे अवघड होते कारण स्वीडन युद्धापासून अलिप्त होता व तो जर स्वीडनला गेला असता तर जर्मनीच्या (हिमलरच्या) कक्षेबाहेर गेला असता त्यामुळे अशी परवानगी मिळणे कठीण होती. त्या काळात स्वीडनमधे रशियाबरोबरच्या युद्धात जखमी झालेले फिनलँडचे पाच हजार सैनिक इस्पितळात भरती झाले होते. शेवटी कर्स्टनने या सैनिकांवर उपचार करण्यासाठी स्वीडनला जाण्याची परवानगी देण्यासाठी हिमलरचे मन वळविले.
‘ठीक आहे जा पण कायमचे जाण्याचा विचार करत असलास तर..........’
‘ माझा संशय येण्यासारखे माझ्या हातून आत्तापर्यंत काही घडले आहे का ?’ कर्स्टनने विचारले. त्याने त्याचा मोठा मुलगा जर्मनीमधेच असणार आहे हे हिमलरच्या लक्षात आणून दिल्यावर घाईघाईने हिमलर म्हणाला,
'माझ्या या कामाने मला प्रत्येकाकडे संशयाने बघायला शिकवले आहे.....मला माफ कर. तू एकच माणूस या जगात आहे ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे...खरंच !.’
कर्स्टन स्वीडनला पोहोचला आणि त्याने चार वर्षामधे प्रथमच मोकळा श्वास घेतला. जर्मनीमधील अन्नाचे दुर्भिक्ष, थंडी, विजेचा तुटवडा, रात्रभर चालणारे बाँबहल्ले, भोंग्यांचे आवाज, सतत तणावाखाली रहाणे, याने तो वैतागला होता. स्वीडनमधे त्याला स्वर्गात आल्यासारखे वाटले पण स्वीडनचा परराष्ट्रमंत्री ख्रिश्चन गुंथरबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्याचे पाय परत जमिनीला लागले.
‘जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी दोस्तराष्ट्रे आमच्यावर रोज दडपण वाढवत आहेत. पण आमच्या परंपरेच्या ते विरुद्ध आहे व या मोठ्या सत्तांच्या युद्धात आम्हाला पडायचेही नाही. आम्ही युद्ध पुकारले तर दुसर्याच दिवशी स्टॉकहोम धुळीस मिळेल. त्या ऐवजी आम्ही दोस्तराष्ट्रांना त्यांच्या इतर कामात मदत करायची ठरविले आहे. उदा.जर्मनीच्या छळछावणीतील शक्य तेवढ्या कैद्यांचे प्राण वाचविण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. या कामात आम्हाला तुझी मदत लागेल. करशील का तू आम्हाला मदत ?’
कर्स्टनने उत्साहित होत म्हटले, ‘जरुर माझ्याकडून शक्य तेवढी मदत करण्यास मी तयार आहे’.
या बैठकीनंतर अनेक दिवस ते दोघे भेटत होते. अखेरीस त्यांनी हजारो कैद्यांच्या सुटकेची एक अवाढव्य योजना आखली ज्यात ते कैद्यांना स्वीडनमधे आसरा देणार होते. या योजनेअंतर्गत स्वीडनचे सरकार त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविणार होते तर रेडक्रॉसचा काऊंट फोक बर्नाडोट्टे हा नाझींशी या बाबतीत वाटाघाटी करणार होता. यात कर्स्टनवर फार मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती ती म्हणजे या कैद्यांना स्वीडनला जाऊ देण्यास हिमलरची परवानगी मिळवणे.
या चर्चेनंतर कर्स्टन हेलसिंकीला गेला तेथे त्याने त्याचा अहवाल सादर केला व जर्मनीला परतला. त्याला खरेतर त्याच्या बायकोला व मुलाला स्टॉकहोममधेच ठेवायचे होते पण बर्याच जणांच्या आयुष्याचा प्रश्न होता व मुख्य कारण या नवीन जबाबदारीसाठी त्याला हिमलरचा पूर्ण विश्वास संपादन करणे अत्यंत महत्वाचे होते आणि तसेच झाले. २६ नोव्हेंबरला जेव्हा त्याने त्याच्या फार्महाऊसवरुन हिमलरला तो आलाय हे सांगण्यासाठी फोन केला तेव्हा हिमलरने त्याला पहिला प्रश्न केला,
‘तुझ्या बायका पोरांना तू तिकडेच सोडून आला असशीलच !’
‘नाही ! ती आत्ता येथे माझ्याबरोबर आहेत’
‘याचा अर्थ तुझा जर्मनीच्या विजयाबद्दल अजुनही खात्री आहे तर ! तुझ्याबद्दल मी नाही नाही त्या अफवा ऐकल्या. मला माफ कर तू माझा एक चांगला मित्र आहेस हे परत एकदा सिद्ध झाले आहे.’
बर्लिनमधे स्थिरस्थावर झाल्यावर त्याला त्याचे काम किती अवघड आहे हे उमजायला लागले. छळछावण्यातील कैद्यांना गेस्टापो प्रेतेच समजत. त्यांची सुटका करण्यासाठी त्याला मदत लागणार होती. हिमलरचे दोनाधिकारी कर्नल वॉल्टर शेलेनबर्ग व जनरल बर्गर हे त्याला नेमस्त वाटत होते आणि ते हिमलरच्या जवळचेही होते.
जनरल बर्गर.........
बर्गर सैन्यात साध्या सैनिकापासून वर चढत चढत अधिकारी झाला होता. त्याचे त्या वेळेस वय पन्नास असेल. त्याला राजकारणात बिलकुल रस नव्हता पण त्याला सेनादलाचा अभिमान होता. सेनादलातील शिस्तीचा तो विशेष भोक्ता होता. त्याचे हे गुण पाहून हिमलरने त्याला वॅफेन एस् एसचा प्रमुख केले होते. याच वॅफेन एस् एस् मधून कैद्यांच्या छावण्यांचे रक्षक निवडले जात. बर्गरला कर्स्टन पहिल्यांदा बिलकुल आवडत नसे. हा जाड्या सामान्य नागरीक या येथे काय करतो असे त्याला नेहमी वाटायचे. पण एकदा हिमलरनेच त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कर्स्टनची भेट घेण्यास सुचविले होते. हिमलरनेच सांगितल्यावर चडफडत का होईना त्याला कर्स्टनकडे जावेच लागले. बर्गरची तपासणी करत असतानाच कर्स्टनने त्याला कुठली दुखणी आहेत हे सांगायला सुरुवात केली. ते ऐकून बर्गर आश्चर्यचकित झाला.
‘मी हे कोणाजवळही बोललो नव्हतो. तुला कसे काय हे समजले ?’
जसे जसे उपचार होऊ लागले तसे त्याच्या आणि कर्स्टनमधे मैत्रीचा धागा तयार होऊ लागला. कर्स्टनच्या लक्षात एक गोष्ट आली म्हणजे हा सेनाधिकारी नुसताच शिस्तीचा भोक्ता नव्हता तर त्याची आत्मसन्मानाबद्दलची मते टोकाची होती. वॅफेन एस् एस् आणि एस् एसच्या मुडदेफरासांमधे त्याच्या दृष्टीने काहीही साम्य नव्हते. एवढेच नव्हे तर त्याच्या माणसांना तो त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असे. गेस्टापो, छळछावण्या, सामुदायीक कत्तलीसारख्या गोष्टींची त्याच्या मस्तकात तिडीक जात असे.
शेलेनबर्ग हा एक वेगळाच माणूस होता. तो तरुण होता व त्यावेळी त्याचे वय होते चौतीस. त्याची पार्श्वभूमी सुसंस्कृत होती. तो अस्खलित इंग्रजी बोलत असे. हायड्रीशच्या हाताखाली त्याने त्याच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती व थोड्याच काळात त्याचा बर्यापैकी दबदबा पसरला. वयाच्या तीसाव्या वर्षी तो कर्नल झाला होता व त्याची महत्वाकांक्षा जर्मनीतील सगळ्यात तरुण जनरल व्हायची होती. त्यासाठी तो उघडपणे हिमलरची खुषामत करण्यास मागेपुढे बघत नसे. दोनच वर्षापूर्वी हिमलरने कर्स्टनला या माणसाला तपासण्यास सांगितले होते. त्याला काही आजार होते म्हणून नाही तर उपचारादरम्यान कर्स्टनला त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता येईल म्हणून.
‘त्याला तुझ्या उपचाराची गरज आहे असे मला वाटत नाही परंतु त्याचा तुला अभ्यास करता येईल. तो एक अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहे पण जरा जास्तच महत्वाकांक्षी आहे. ते मला खटकते.’ हिमलर कर्स्टनला म्हणाला होता.
जेव्हा शेलेनबर्ग कर्स्टनला भेटला तेव्हा दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. वैद्यकीय तपासणी वगैरे काही झाली नाही.
‘कर्नल तुला भेटून मला आनंद झाला. हिमलरच्या कार्यालयात तुला फार शत्रू आहेत कारण तू फारच लवकरच वरती चढला आहेस. पण तुला मला घाबरायचे कारण नाही. आपली मैत्री झाली तर मी तुला बरीच मदत करु शकतो.’
‘मला माहीत आहे ते डॉक्टर म्हणूनच मी तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करायला आलो आहे’. त्या दिवसापासून शेलेनबर्गने कर्स्टनच्या योजनेमधे त्याला मदत करण्यास सुरुवात केली. तो घातपातीदलाचा प्रमुख असल्यामुळे त्याचा तेथे बराच दबदबा होताच.
त्याच्या योजनेबद्दल हिमलरशी चर्चा करण्याआधी त्याने ती योजना या दोघांना सांगितली. आश्चर्य म्हणजे त्यांचे मन वळविण्यास त्याला अजिबात कष्ट पडले नाहीत. शेलनबर्गला हिटलर संपल्यात जमा आहे याची खात्री होती व दोस्त राष्ट्रे युद्ध जिंकल्यावर, त्याने हजारो माणसांचा जीव वाचवला आहे हे त्याच्या पथ्थ्यावर पडणार होते. बर्गरचे तर या सगळ्या अत्याचारांनी मन विटले होते. आता ब्रान्टबरोबर कर्स्टनला हे अजून दोघे त्याच्या बाजूने होते.
त्यांचा मुख्य शत्रू होता अर्नस्ट काल्टेनब्रुनर जो हायड्रीशच्या जागेवर गेस्टापोचा प्रमुख म्हणून आला होता. हा माणूस हिंसक, व वेडा होता. अत्याचार व कत्तलींसाठी त्याचे हात नेहमी शिवशिवत असत. हिमलरही याला घाबरत असे. कर्स्टनने वाचविलेल्या प्रत्येक प्राणाबरोबर काल्टेनब्रुनरचा जळफळाट होई. कर्स्टनच्या माणुसकीचा तो द्वेष करे.
‘त्या जनावरापासून सावध रहा ! तो तुझा खूनही करु शकतो’. ब्रान्टने त्याला इशारा दिला.
अनेक महिने कर्स्टनने हिमलरपुढे कोणाच्याही मदतीला जाण्याचा प्रस्ताव मांडला नाही परंतु तो नॉर्वे, हॉलंड,डॅनिश वंश हा जर्मन वंशाचाच एक भाग आहे हे त्याच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करत होता. जेव्हा दोस्तांनी आपल्या सेना नॉर्मंडीवर उतरविल्या त्या काळात त्याने हे प्रयत्न इतके केले की शेवटी हिमलरची हिटलरप्रती असलेली निष्ठा डळमळीत होऊ लागली.
‘मला वाटते कर्स्टन तू म्हणतोस त्यात काहीतरी तथ्य असावे. सगळ्यांनाच ठार मारण्यात काही अर्थ नाही. जर्मन वंशाच्या जनतेला थोडी सहानभूती दाखवायलाच लागेल’
दुर्दैवाने काहीच आठवड्यानंतर हिटलरला मारण्याचा प्रयत्न एका सेनाधिकार्याने केला आणि हिमलरची हिटलरनिष्ठा परत उफाळून आली. त्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन हिटलरने 2000 सेनाधिकार्यांचा बळी देण्याचे ठरविले. ते काम अर्थातच हिमलरकडे आली. लवकरच हिमलर व काल्टेनब्रुनरने जर्मनीत अटकसत्र आरंभले ज्यात अनेक निष्पाप अधिकारीही मारले गेले.
१ऑगस्टला हिमलरने कर्स्टनला त्याच्या इस्टेवर दूरध्वनी केला व त्याला ताबडतोब त्याच्या खाजगी आगगाडीने पूर्व प्रशियात येण्याची विनंती केली. त्या हिटलरच्या हत्येच्या प्रकरणात जी त्याला धावपळ करावी लागली त्यामुळे तो भयंकर आजारी पडला होता. कर्स्टन गाडीत बासणार तेवढ्यात एक मोटरसायकलस्वार सैनिक त्याच्यापाशी येऊन थांबला व त्याने एक लिफाफा त्याच्या हातात दिला ‘कर्नल शेलेनबर्गकडून’ एवढे म्हणून तो ज्या वेगाने आला त्याच वेगाने अंतर्धान पावला. आतील चिठ्ठीवर जो मजकूर लिहिला होता त्याने कर्स्टनचे हातपाय कापू लागले व त्याच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले. ‘काल्टेनब्रुनरने तुझ्या हत्येचा कट रचला आहे. तू स्टेशनवर दुसर्या रस्त्याने जा’
कर्स्टनने पटकन विचार केला. त्याचा कुठल्याच अधिकार्यावर विश्वास नव्हता पण काल्टेनब्रुनर हा शेलेनबर्गचा कट्टर शत्रू होता या एकाच गोष्टीवर विसंबून त्याने त्याच्या वाहनचालकाला स्टेशनचा दुसरा रस्ता पकडायला सांगितले. स्टेशनवर आगगाडीत बसेपर्यंत त्याला काही अडचण आली नाही. हिमलरकडे पोहोचल्यावर त्याने योग्य संधी साधून ती चिठ्ठी हिमलरला दाखविली. हिमलरने ताबडतोब ब्रान्टला बर्लिनला अधिक माहिती काढण्यासाठी पाठविले. ते सहज शक्य होते कारण त्या काळात संशयाचे वातावरण इतके पसरले होते की प्रत्येक अधिकार्याचे हेर दुसर्या अधिकार्याच्या गोटात असायचेच. शेलेनबर्गचे काल्टेनब्रुनरच्या गोटात होते तसेच काल्टेनब्रुनरचे शेलेनबर्गच्या गोटात होते. ब्रान्टने हिमलरसाठी दोघांच्याही गोटात त्याचे हेर पेरले होते.
दुसर्या दिवशी ब्रान्ट परत आल्यावर त्याने त्याचा अहवाल हिमलरला सादर केला. जे चिठ्ठीत लिहिले होते ते सत्य होते. स्टेशनच्या रस्त्यावर ओरॅनिअनबर्ग नावाच्या एका भागात सापळा लावण्यात आला होता. कर्स्टननची गाडी त्या भागातून जात असताना एका तपासणी नाक्यावर त्यांच्या गाडीची चाळण उडवायची योजना होती. ते झाल्यावर त्या नाक्यावरील अधिकार्याने या घटनेचा अहवाल काल्टेनब्रुनरला सादर करताना ही गाडी इशारा केल्यावर न थांबता त्यांच्या दिशेने आली असे लिहायचे होते...इ.इ.... काल्टेनब्रुनरने मग हिमलरला या दुर्दैवी घटनेची माहिती द्यायची होती.
हा सगळा अहवाल हिमलरने कर्स्टन त्याच्यावर उपचार करत असताना ब्रान्टकडून ऐकला. हे ऐकताच तो ताडकन उठला व त्याने कपडे केले.‘ ब्रान्ट, आपण आता जेवायला जाणार आहोत. काल्टेनब्रुनरला तसा निरोप दे !’
औपचारिकता संपल्यावर जेवण शांततेत सुरु झाले. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली होती. वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. त्या शांततेचा भंग करत राईशफ्युरर हिमलर एकदम काल्टेनब्रुनरला म्हणाला,
‘काल्टेनब्रुनर, कर्स्टननंतर तू एक तासही जिवंत राहिला नसतास !’.................
क्रमशः
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
10 Dec 2013 - 1:22 pm | आनन्दा
आता वाचतो
10 Dec 2013 - 1:26 pm | llपुण्याचे पेशवेll
वाह.. कथा पकड घेत आहे.
10 Dec 2013 - 1:31 pm | जेपी
रोचक , जबरदस्त .
लवकर भाग टाकल्याबद्दल धन्यवाद .
10 Dec 2013 - 1:32 pm | प्यारे१
नेहमीप्रमाणेच उत्कंठावर्धक.
10 Dec 2013 - 2:10 pm | विअर्ड विक्स
उत्कंठा वाढते आहे ..........
कर्स्तनच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमी आहे
10 Dec 2013 - 2:11 pm | पद्माक्षी
खूप मस्त..
10 Dec 2013 - 2:12 pm | पद्माक्षी
खूप मस्त..पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
10 Dec 2013 - 2:17 pm | lakhu risbud
जगाच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट पर्वाकडे आणि त्यातील माणुसकीच्या झऱ्यांकडे लक्ष वेधणारी
सुंदर अशी लेख मालिका. मिपावरच्या विशेष या सदरात प्रकाशित होण्यायोग्य. काका लिखाण अत्यंत ओघवते, एखादा चित्रपटच बघतो आहे असे वाटण्याजोगे. सगळे प्रसंग घडत असताना मी जणू कर्स्टन बरोबरच उभा आहे असे वाटले. अप्रतिम !
10 Dec 2013 - 4:38 pm | हरिप्रिया_
+१
पुभाप्र
10 Dec 2013 - 5:49 pm | वसईचे किल्लेदार
वाचतोय ...
11 Dec 2013 - 1:44 am | अर्धवटराव
+१००
10 Dec 2013 - 2:19 pm | मुक्त विहारि
खतरनाक.....
10 Dec 2013 - 2:36 pm | भटक्य आणि उनाड
.पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
10 Dec 2013 - 2:56 pm | अनिरुद्ध प
लिखाण पु भा प्र
10 Dec 2013 - 3:41 pm | राही
कहाणीने वाचकांची पूर्ण पकड घेतली आहे.
10 Dec 2013 - 4:20 pm | विटेकर
वाचताना अंगावर काटा येतो.....
10 Dec 2013 - 5:17 pm | मधुरा देशपांडे
युद्धविषयक चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी वगैरे मला बरेचदा कंटाळवाणे वाटतात, त्याउलट तुमचे लेख वाचताना ते संपूच नये असं होतंय. हा भाग लवकर टाकला त्यासाठी धन्यवाद.
10 Dec 2013 - 7:29 pm | सुधीर कांदळकर
आणि मनोरंजनातले सातत्य अप्रतिम. आवडले.
10 Dec 2013 - 10:27 pm | विनोद१८
..जबरदस्त ताणली जाणारी उत्कन्ठा..उत्तरोत्तर बहरणारी मालिका..क्या बात है.....
विनोद१८
10 Dec 2013 - 10:37 pm | श्रीरंग_जोशी
वाह, सदर लेखमालिका एक पर्वणी आहे कारण मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत काळे पर्व घडत असताना काहीतरी चांगले घडावे किंवा किमान वाईटाची तीव्रता कमी व्हावी व्हावे यासाठी त्याच ठिकाणी झटणारे कुणीतरी होते हे वाचून बरे वाटले.
पुभाप्र.
10 Dec 2013 - 10:45 pm | मृत्युन्जय
डेली सोपसारखे एकदम उत्कंठावर्धक वळणावर पॉज घेतला आहे. आधीच्या भागांप्रमाणेच हा भागही सुंदर. पुभाप्र.
10 Dec 2013 - 11:33 pm | टिवटिव
_/\_
11 Dec 2013 - 12:26 am | खटपट्या
जबरदस्त !!!!
लाखो लोकांचे हत्याकांड करणारा हिटलर मानसिक रुग्ण असणारच…
11 Dec 2013 - 1:48 am | अभ्या..
खुपच जबरदस्त लिखाण कुलकर्णी साहेव.
नियमित वाचत आहेच.
11 Dec 2013 - 4:50 pm | कोमल
__/\__
मस्तच
पुभाप्र
11 Dec 2013 - 10:27 pm | संताजी धनाजी
लवकर येवुद्या