युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Dec 2013 - 7:01 pm

युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३

हिमलरने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्या कागदावरुन नजर फिरवली.
‘हे तू बोलतो आहेस म्हणून ठीक आहे.’ एवढे म्हणून त्याने परत हाक मारली ‘ब्रान्ट......’
‘या माणसाचा हा अर्ज वाच व त्याची मुक्तता होईल ते बघ ! आपल्या डॉक्टरची विनंती आहे बाबा ती !’
ब्रान्टने कर्स्टनकडे एक कौतुकाचा कटाक्ष टाकला व तो बाहेर पडला. त्या नजरेतून कर्स्टनला ब्रान्टमधे एक सच्चा मित्र मिळाला व त्याला नाझींच्या राज्यात सोबत मिळण्याची आशा पालवली. अशा सोबतीची व मदतीची त्याला भविष्यात गरज भासणार होती.

हिमलरची तब्येत ठीक झाल्यावर तो परत मुळपदावर आला. त्याचे कर्स्टनबरोबरचे संबंध त्याच्या दुखण्यावर अवलंबून असत. कर्स्टनच्या विनंतीला मान देऊन त्याने त्या फोरमनला सोडल्याच्या तिसर्‍याच दिवशी तो कर्स्टनला म्हणाला,
‘कर्स्टन हेगमधे त अजूनही तुझे घर ठेवले आहेस हे खरे आहे का ? माझ्या गेस्टापोंचा अहवाल सांगतो. मी तुला अनेक वेळा सांगितले आहे की काही डच लोक तुझ्या या संबंधावर नाराज आहेत. तू ते घर विकून टाक.’
हे काम करण्यासाठी त्याने कर्स्टनला दहा दिवसाची मुदत दिली पण त्याला हॉलंडमधे असताना गेस्टापोच्या कार्यालयात दररोज चहा पिण्यास जावे असे सांगायलाही तो विसरला नाही.
‘तेवढे आदराथित्य त्यांनी केलेच पाहिजे नाही का ?’ तो हसून म्हणाला. त्याचाच दुसरा अर्थ त्याच्यावर हॉलंडमधेही नजर रहाणार होती.

कर्स्टन हॉलंडमधे आल्यावर त्याला तेथील नाझी राजवटीची चांगलीच कल्पना आली. त्याचे मित्रमंडळ मोठे होते व रोज ते त्याच्या कानावर अत्याचाराच्या कहाण्या घालत होते. अटकसत्र, हद्दपारी, अत्याचार, छळहावण्यातील अंगावर काटा आणणारी वर्णने या सगळ्यांनी तो खचला. कारण तो हे थांबविण्यासाठी काही करु शकत नव्हता. हॉलंडमधील सर्व पुढार्‍यांची हीच गत झाली होती. पण एके दिवशी त्याला काहीतरी मदत करायची संधी मिळाली.

त्याला हॉलंडमधे येऊन आता पाच दिवस झाले होते. गेस्टापोंचे छापे चर्चेत होतेच आज याच्यावर धाड पडली, उद्या त्याच्यावर पडणार आहे अशा अनेक बातम्या, अफवा कानावर पडत होत्या. त्यादिवशी अशाच एका छाप्याची बातमी कानावर पडल्यावर कर्स्टन अंथरुणातून ताडकन उठला व त्या ठिकाणी गेला. तेथून त्याने गेस्टापोंच्या कार्यालयाची वाट धरली. त्या कार्यालच्या प्रमुखाला वॉलथर राउटरला त्याला बघून मुळीच आश्‍चर्य वाटले नाही कारण तो रोजच तेथे हजेरी देण्यास येत असे. नेहमीचे हजेरीचे काम झाल्यावर कर्स्टन म्हणाला,
‘मी आज माझ्या मित्राला, बिग्नेलला भेटायला त्याच्या घरी गेलो असताना मला तेथे प्रवेश नाकारण्यात आला. तेथे पोलिस त्याच्या घराची तलाशी घेत होते.
‘ते माझाच हुकुम पाळत होते. हा बिग्नेल देशद्रोही आहे. तो लंडनशी सतत संपर्कात असतो असे आम्हाला आढळले आहे. तो आता लवकरच तुरुंगात जाईल मग मी त्याची उलट तपासणी घेईन....’ हातातील छडी दुसर्‍या हातावर आपटत राउटर बर्फासारख्या थंड आवाजात म्हणाला.

कर्स्टनचा हा मित्र उतारवयाचा होता व तैलचित्रांचा व्यापार करत असे. स्वत: कर्स्टनने त्याच्याकडून अनेक चित्रे विकत घेतली होती. त्याची तब्येतही ढासळली होती. त्या उलटतपासणीत त्याचे काय होईल या कल्पनेनेच त्याच्या अंगावर काटा आला. हा विचार मनात आला आणि तो उस्फुर्तपणे म्हणाला,
‘मी त्याची खात्री देतो. त्याने कसलाही देशद्रोह केलेला नाही. त्याला सोडून द्या !’
राउउटरचा स्वत:च्या कानावर विश्‍वास बसेना.
‘हा माणूस जो दररोज सकाळी येथे हजेरी देण्यास येतो तो मलाच हुकुम करतोय. बहुतेक याचे डोके फिरले असावे’ तो मनात म्हणाला.
‘त्या डुकराला सोडू म्हणतोस !’ तो जोरात ओरडला व त्याने रागाने आपली मूठ टेबलावर आपटली.
‘ते मी कधीच करणार नाही आणि तू सांगतोस म्हणून तर नाहीच नाही !’

कर्स्टनने खरे तर शांत रहायचे ठरविले होते पण रागाने राग वाढतो म्हणतात. वरवर शांत दिसत असलेल्या कर्स्टन आतून धुसमसत होता. त्याच रागात त्याने कधीही केली नसती अशी गोष्ट केली. त्याने विचारले, ‘येथे फोन आहे ना ? मला हिमलरशी बोलायचे आहे’.
राऊटरला ते ऐकून धक्काच बसला. तो ताडकन खुर्चीतून उठला व म्हणाला, तुझे डोके फिरले आहे का? मलाही हिमलरशी बोलण्यासाठी पहिल्यांदा हायड्रिशची परवानगी घ्यावी लागते किंवा त्याच्या मार्फत बोलावे लागते’
‘प्रयत्न तर कर. बघुया काय होतंय ते !’ कर्स्टन शांतपणे म्हणाला.
राऊटरने टेलिफोन उचलला व कर्स्टनचे नाव घेऊन हिमलरला फोन लाऊन देण्यास सांगितले. राऊटरने टेबलावरच्या कागदात तोंड खुपसले पण त्यावे लक्ष फोनवरच होते. पाचच मिनिटात परत फोन वाजला. राऊटरने कर्स्टनकडे छद्मीपणे बघत फोन उचलला. थोड्याच वेळात त्याचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने घाईघाईने तो फोन डॉक्टरच्या हातात कोंबला. दुसर्‍या टोकाला स्वत: हिमलर होता.
खरे तर हा जो मधे काळ गेला त्यात कर्स्टनने विचार केल्यावर त्याला आपण उगीचच घाई केली असे वाटू लागले. हिमलर फोन वर आला नाही तर बरे होईल अशी तो देवाकडे प्रार्थना करत होता पण आता माघार घेणे त्याला शक्य नव्हते.
‘माझ्या एका जवळच्या मित्राला येथे अटक करण्यात आली आहे. मी त्याची खात्री देतो. मी तुला विनंती करतो त्याला सोडून दे. तो खरोखरच निर्दोष आहे’ पलिकडे हिमलर हे बोलणे न ऐकल्यासारखे करत बोलत होता,
‘तू परत केव्हा येणार आहेस ? मला तुझी आत्ता गरज आहे.’
कर्स्टनने सुटाकेचा नि:श्वास टाकला. त्याचे नशिब जोरात होते असे म्हणायला लागेल. हिमलर त्याच्या डॉक्टरला तातडीने बोलवत होता. अजून काय पाहिजे ? त्याचा खुनशी स्वभाव आता मागे पडून तो एक असाहय्य रुग्ण होता. त्याला आता कर्स्टनच्या उपचारांचे व्यसनच लागले होते.
‘माझे इथले काम अजून संपलेले नाही. आणि जर माझ्या मित्राला अटक झाली तर मीच कोणाला मदत करण्याच्या मनस्थितीत असेन असे मला वाटत नाही’.
‘राऊटरला फोन दे’ हिमलरने आज्ञा केली.
गेस्टापोच्या त्या प्रमुखाने फोन घेतला. तो आता सरळ ताठ उभा होता. त्याचा दुसरा हात खाली ताठ ताणला गेला व खांदे मागे झुकले व छाती पुढे आली. कर्स्टनला ऐकू आले, ‘चालेल ! राईशफ्युरर ! लगेचच कार्यवाही होईल खात्री बाळगा’ एवढे बोलून त्याने तो फोन परत कर्स्टनकडे दिला.
‘माझा तुझ्यावर विश्वास आहे कर्स्टन ! तुझ्या मित्राची सुटका होईल, पण लवकर परत ये ! जमेल तितक्या लवकर !’

नंतर तेथे शांतता पसरली. दोघेही एकमेकांकडे पहात राहिले. बहुदा बसलेल्या धक्क्यातून कर्स्टन व राऊटर दोघेही सावरले नव्हते.

गेस्टापोंच्या तावडीतून सोडविलेल्या माणसाची ही तोपर्यंतच्या इतिहासातील एकमेव घटना होती अर्थात कर्स्टनने त्याबदल्यात त्याचा उपचाराचा सर्व मोबदला पणास लावला होता. पण एका माणसाचे प्राण वाचविण्यात त्याला यश आले होते हे महत्वाचे. देशद्रोहासारखा अत्यंत गंभीर आरोप असूनसुद्धा कर्स्टनच्या शब्दाखातर त्याची सुटका झाली होती. केवढा हा विरोधाभास ! देशद्रोहाच्या आरोपातून सुटका फक्त कर्स्टनने शब्द टाकला म्हणून झाली. हा विरोधाभास मान्य नाही केला तर तो निर्दोष होता हे मान्य करावे लागते. असो. कर्स्टनने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला व सुस्कारा टाकला. ‘ही अचानक गवसलेली शक्ती किती वेळ टिकणार, कुठपर्यंत जाणार, देवालाच ठाऊक’ तो मनात म्हणाला.

त्याच्या बर्लिनच्या मुक्कामात कर्स्टनला हॉलंडच्या वित्तंबातम्या मिळत होत्या. कोणाला अटक झाली, कोणाची रवानगी छळछावणीत झाली ते आता कोणावर नजर आहे तेथपर्यंत. या बातम्या त्याला अत्यंत सोप्या पद्धतीने मिळत. पोस्टाने !. ती पत्रे हिमलरच्याच पत्यावर येत असत व ब्रान्टच्या हातात पडत. ब्रान्ट ती न फोडता तशीच कर्स्टनच्या हवाली करत असे. ही परवानगी त्याने सहज मिळविली. त्याला त्यासाठी थोडे खोटे बोलावे लागले पण ते त्याला जमून गेले. त्याने प्रथम ब्रान्टच्या कानावर घातले की त्याची हॉलंडमधे अनेक स्त्रियांशी प्रेमप्रकरणे चालू आहेत व सेन्सॉरच्या माणसांनी ती वाचावीत असे त्याला वाटत नाही. ते त्याला अत्यंत अडचणीचे वाटते. ही बाब ब्रान्टने हिमलरच्या कानावर घातल्यावर त्याला ती पत्रे हिमलरच्या पत्यावर मागवायची परवानगी मिळाली. हिमलर स्वत:ला जर्मनीचा सुपरमॅन समजत असल्यामुळे त्याला कर्स्टनची ही विनंती आपण मान्य करतोय याचा गर्व होता. कर्स्टन काहीतरी मागतोय याचाही त्याला आनंद होत होता. त्याचे आणि कर्स्टनचे नाते आता एका पातळीवर आल्याचेही त्याला समाधान वाटत होते. इतके दिवस कर्स्टन दाता होता व तो याचक. आता या नात्यामधे जरा सुधारणा झाली.

हॉलंडमधून प्रेमपत्र येतच होती. त्यात उल्लेख झालेल्या प्रत्येक अत्याचाराच्या, अन्याय झालेल्या प्रकरणात हस्तक्षेप करणे कर्स्टनला शक्यच नव्हते. त्यातील अत्यंत महत्वाची प्रकरणे शोधून, ज्याने त्याच्या ह्रदयास घरे पडत अशी प्रकरणे तो योग्यवेळी हिमलरच्या कानावर घाले. (ही वेळ अर्थातच त्याच्या दुखण्याच्या वेळी असे) हळूहळू कर्स्टनला हे अर्ज हिमलरला कसे सादर करायचे व केव्हा करायचे याचे गणित जमू लागले. जेव्हा हिमलरचे दुखणे पराकोटीस पोहोचायचे तेव्हा कर्स्टन एखाद्या कैद्याच्या सुटकेचा विषय काढायचा. पण अर्थात अशा संधी फार वेळा येत नसत. एकदा बरे झाल्यावर हिमलर परत त्याच्या वळणावर येत असे. त्यावेळेस मात्र कर्स्टनलाही एखाद्या माणसासाठी गयावया करावी लागे किंवा हिमलरच्या अहंकारास फुंकर घालावी लागे.

हिमलरला जर्मन वंशाचा जसा अभिमान होता तसा जर्मन महानायकांचाही होता. उदाहरणार्थ फ्रेडरिक बार्बारोसा, हेन्री द फाउलर इत्यादि.... हेही हिटलरसारखेच होते. हिटलरलाही बार्बारोसाचा विलक्षण अभिमान होता. रशियावर हिटलरने जे आक्रमण केले त्या योजनेचे नाव त्याने ‘ऑपरेशन बार्बारोसा‘ ठेवले होते यावरुन हे लक्षात येईल. कर्स्टनने त्याच्या या अभिमानाचा बरोबर फायदा उचलला. तो त्याला म्हणे, ‘जर जर्मनीने युद्ध जिंकले तर या नायकांप्रमाणे तुही या महानायकात गणला जाशील. या विजयाच्या शिल्पकारात तुझेही नाव लिहिले जाईल. पण एक लक्षात ठेव ही जी बार्बारोसा सारखी थोर माणसे होऊन गेली ती त्यांच्या क्रुरतेबद्दल जनतेची लाडकी झाली नाहीत. त्यांचे औदार्य, त्यांची न्याप्रियता, दानशूरपणा यासाठी जनतेने त्यांना इतकी वर्षे ह्रदयात जागा दिली आहे. तुलाही जर ते पाहिजे असेल तर तुला त्यांच्यासारखे वागावयास लागेल. तुझी प्रतिमा जाणीवपुर्वक तशी करावी लागेल.’

हिमलर कर्स्टनच्या या असल्या खुषामतगिरीवर खुष होत असे.
‘डॉक्टर तू माझा सगळ्यात जुना व विश्वासू मित्र आहेस. तूच मला समजून घेतोस’
मग तो ब्रान्टला कर्स्टनने सुचविलेल्या माणसांच्या नावाची यादी तयार करण्यास सांगत असे व त्यांच्या नावाच्या माफीपत्रावर सह्या करे. सहीवर जी जागा अनवधावनाने रहात असे त्यात ब्रान्ट अजून दोन तीन नावे घुसडत असे. शेवटी शेवटी या माफी पत्रांची संख्या एवढी वाढली की बर्‍याच गेस्टापो अधिकार्‍यांना शंका येऊ लागली. त्यांना एक कळत नसे की भाषणातून हिमलर या लोकांचा समाचार घेण्यास सांगत असे, त्यांचा काटा काढण्यास सांगत असे व इकडे माफीपत्र जारी करत असे.. हे कसे काय? कर्स्टनला माहीत होते की हे अधिकारी शेवटी त्याच्यापर्यंत पोहोचणार फक्त कधी हाच प्रश्‍न होता.

आख्खा डिसेंबर कर्स्टन एकटाच रहात होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्याला भेटायला दोन अवचित पाहुणे आले. दोन गेस्टापोंचे अधिकारी.
‘आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे.’ अजुनही झोपायचाच पायजमा अंगावर असलेल्या कर्स्टनने त्यांना आत घेतले व त्याच्या अभ्यासिकेत घेऊन गेला. वरुन शांत दिसणार्‍या कर्स्टनच्या मनात मात्र शंकेचे वादळ उठले होते.
‘कोण असेल हा विश्‍वासघातकी ? हॉलंडमधला का बर्लिनमधला? का ब्रान्ट नावे घुसडतो हे कोणाच्यातरी लक्षात आले आहे?’ त्याला काही समजेना. शेवटी शांततेचा भंग करत एका गेस्टापोने विचारले,
‘तुझ्या रुग्णांपैकी काही ज्यू आहेत का ?’
‘आहेत ना !’ हा प्रश्न ऐकल्यावर त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.
‘कदाचित तुला माहिती नसेल ज्यूंवर उपचार करण्यास जर्मन डोक्टरांना बंदी आहे’
‘मी जर्मन डॉक्टर नाही. मी एक फिनिश नागरीक आहे.’ कर्स्टनने अत्यंत नम्रपणे सांगितले. हातात न फेटाळण्यासारखा पुरावा ठेवल्यावर दोघांचीही वाचा बंद झाली. त्यांनी कर्स्टनची क्षमा मागितली व ते निघून गेले. जेव्हा कर्स्टनने हिमलरला या प्रसंगाबद्दल सांगितले तेव्हा तो रागाने लाल झाला. त्याने फोन खेचला व एक क्रमांक मागितला. फोन जोडला गेल्यावर तो त्यावर जवळजवळ किंचाळलाच, ‘कुठल्याही कारणासाठी डॉक्टरच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ होता कामा नये. डॉक्टर ही फक्त माझी जबाबदारी आहे. हा माझा हुकुम समजा’.

हा प्रसंग घडून गेल्यावर काहीच दिवसात ब्रान्टने त्याला सावधगिरीचा इशारा दिला. हिमलरच्या दशहतीच्या साम्राज्याचा दुसर्‍या क्रमांकाचा अधिपती होता राइनहार्ट हायड्रीश. याने नुकतच कर्स्टन हा शत्रूचा हेर असल्याचा संशय त्याच्या अधिकार्‍यांजवळ व्यक्त केला होता ते ब्रान्टच्या कानावर आले होते. लवकरच तो याबाबतीत पुरावाही सादर करणार होता म्हणे. फेब्रुवारीच्या शेवटी एका दिवशी हिमलरच्या ऑफिसमधून बाहेर पडताना त्याची हायड्रीशची समोरासमोर गाठ पडली.
‘मला एकदा तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत’ हायड्रीश म्हणाला.
‘केव्हाही ! आज आहे का आपल्याला वेळ ?’ कर्स्टन म्हणाला. आतून तो घाबरला होता. आता हे काय समोर उभे ठाकले आहे असे तो मनात म्हणाला पण चेहर्‍यावरचे भाव लपवायची त्याला आता सवय झाली होती. त्यांनी संध्याकाळी गेस्टापोच्या कार्यालयात भेटायचे ठरविले. त्या संध्याकाळी बोलताना हायड्रीशने कर्स्टनला स्पष्टच सांगितले की गेस्टापोंना त्याला हॉलंड व फिनलँडमधून बातम्या येतात हे माहिती आहे.
‘खरे तर डॉक्टर तू ही जी मदत लोकांना करतोस, त्यात आम्ही तुला मदत करु शकतो. जो माणूस तुला त्याची राईशफ्युररकडे रद्बदली करायला सांगतो, तो खरं बोलतो आहे की नाही हे तुला कळायला नको का ? का खोटारड्या माणसांनाही तू मदत करणार आहेस ? आम्ही तुझ्यासाठी अशा माणसांची इत्यंभूत माहिती काढून तुला देऊ शकू. अर्थात आम्ही दिलेल्या माहितीची खातरजमा तू केव्हाही करुन घेऊ शकतोस किंवा ती वापरायची की नाही हेही तुच ठरवू शकतोस. शेवटी तुझी इच्छा.!’
राईनहार्ट हायड्रिश....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हायड्रीशला खरे तर कर्स्टनला कोण बातम्या पुरवतो याची माहीती काढायची होती. कर्स्टनने मोघम उत्तर देऊन तो विषय बदलला पण एकंदरीत त्याला हायड्रीशला फार संशय आलेला दिसला नाही. जेव्हा दुसर्‍या दिवशी त्याने या मुलाखतीबद्दल ब्रान्टला सांगितले तेव्हा त्याने त्याला जास्त काळजी घेण्यास सांगितले.
‘काळजी करु नकोस, ते मी अगोदरच ठरविले आहे’ कर्स्टनने त्याचे आभार मानत म्हटले. त्याच्या दुर्दैवाने काही दिवसांनंतर तो उघड्यावर पडणार होता.

१९४१मधे मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेस कर्स्टन नेहमीप्रमाणे हिमलरच्या कार्यालयात दुपारी आला. तो नेहमी याच वेळेस येथे येत असे. हिमलर कुठल्यातेरी बैठकीत अडकल्यामुळे त्याने अधिकार्‍यांसाठी असलेल्या मेसहॉलमधे प्रवेश केला. तो हॉल नाझी अधिकार्‍यांच्या वर्दळीने गजबजलेला होता पण एकाही माणसाने कर्स्टनची ना दखल घेतली ना त्याला अभिवादन केले. त्यांच्या उद्दामपणाकडे दुर्लक्ष करत कर्स्टनने कोपर्‍यातील एक जागा पकडली. जो कनिष्ट अधिकारी त्या मेसचे व्यवस्थापन बघत होता त्याने नेहमीप्रमाणे कर्स्टनच्या आवडीचा गोड केक व कॉफी टेबलावर आणून ठेवली. त्याला डॉक्टरला काय आवडते हे आत्तापर्यंत माहिती झाले होते आणि त्याला डॉक्टरला हवं नको ते बघण्याचा आदेश होताच. कॉफीचे घुटके घेत असताना तेथे एकदम शांतता पसरली. त्याने नजर वर करुन बघितले तर हायड्रीश व वाल्थर राऊटर त्या हॉलमधून त्याच्या दिशेलाच येत होते. कर्स्टनरच्या पोटात खड्डा पडला पण आश्‍चर्य म्हणाजे त्या दोघांनीही त्याला बघितले नाही. त्यांनी जवळच्याच एका टेबलावर जागा घेतली. ते गप्पांमधे इतके रंगून गेले होते की त्यांचे कर्स्टनकडे अजिबात लक्ष गेले नाही. कर्स्टन त्यांची बोलणे कान देऊन ऐकू लागला.
राऊटर बोलत होता,
‘त्या डच डुक्करांना आता चांगलाच धडा मिळेल. परवाच त्यांनी माझ्या दोन सैनिकांना ठार मारले. हलकटांना तीच शिक्षा योग्य आहे..............''
क्रमशः
अवांतर : बर्‍याच जर्मन सेनाधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर आपल्याला व्रण दिसतात. बहुतेक सगळ्याच. हे व्रण तलवारबाजीत झालेले असत. त्या काळात लष्करी विद्यापिठात प्रवेश घेतला की त्यांना तलवारींच्या द्वंद्वात भाग घ्यावाच लागे. या जखमा मोठ्या आभिमानाने पुढे आयुष्यभर मिरवल्या जात. पार्टीच्यावेळेस एकत्र जमले की प्रत्येक जखमेच्या वाराबद्द्ल चवीने चर्चा केल्या जात....अजूनही तसे आहे असे म्हटले जात फक्त आता पूर्ण सुरक्षितेची काळजी घेऊन ही द्वंद्वे होतात असे म्हणतात.....पण असे आता होत असावे याची मला खात्रीलायक माहिती नाही. ही प्रशियन परंपरा आहे........

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

5 Dec 2013 - 7:27 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र

जेपी's picture

5 Dec 2013 - 7:54 pm | जेपी

जबरदस्त .

बाकी हिमलरला नेमका कुठला आजार होता .?

मधुरा देशपांडे's picture

5 Dec 2013 - 8:13 pm | मधुरा देशपांडे

आवर्जून वाचते आहे. पु. भा. प्र.

सचिन कुलकर्णी's picture

5 Dec 2013 - 9:57 pm | सचिन कुलकर्णी

क्रमश: बघून परत बरे वाटले. कथानक सुंदर वळणावर.
(स्वगत: देवा, कर्स्टन ला वाचव रे बाबा..)

मुक्त विहारि's picture

5 Dec 2013 - 10:42 pm | मुक्त विहारि

क्रमशः

हा शब्द तुमच्या लेखांत परत परत येवो....

अमित खोजे's picture

5 Dec 2013 - 10:45 pm | अमित खोजे

अगदी मनाला भिडणारे कथानक सजलेले आहे. खरे सांगायचे तर तुमच्या लेखांमुळे दुसर्या महायुद्धाबद्दल अधिक वाचायची आवड निर्माण झाली.

जयंत कुलकर्णी's picture

5 Dec 2013 - 10:45 pm | जयंत कुलकर्णी

:-)

विनोद१८'s picture

6 Dec 2013 - 12:49 am | विनोद१८

जयन्तराव....

*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*

अगदी नेहमीप्रमाणेच जबरदस्त लिहीलेला. वाचताना डोळ्यापुढे चित्र उभे राहते, उत्कन्ठा वाढविणारी मालिका.

*i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^

विनोद१८

Dhananjay Borgaonkar's picture

6 Dec 2013 - 11:36 am | Dhananjay Borgaonkar

पुढचा भाग कधी??

हरिप्रिया_'s picture

6 Dec 2013 - 1:52 pm | हरिप्रिया_

आता कर्स्टनच काय होणार म्हणून धाकधुक वाटत आहे.
पुभाप्र

झकासराव's picture

6 Dec 2013 - 2:27 pm | झकासराव

थरारक, जबरदस्त मालिका.

जयंत कुलकर्णी's picture

6 Dec 2013 - 2:33 pm | जयंत कुलकर्णी

पुढचा भाग आता सोमवारी टाकेन !

प्यारे१'s picture

6 Dec 2013 - 4:36 pm | प्यारे१

उत्कंठावर्धक.
आता सोमवारपर्यंत वाट बघणं आलं. :(

पुढे काय झालं?