सप्टेंबर मधली कुठल्यातरी वीकेंड ची कुठली तरी सकाळ... मी नेहमी प्रमाणे हिंदी सिनेमातल्या बायका कश्या नवऱ्याआधी उठून आटोपून वगैरे बसतात... तश्शी सगळं आटोपून व्हॉट्स ऍप वरचे मेसेजेस वाचत बसले होते. अश्याच एका ग्रूप मध्ये मैत्रिणीने लिहिले होते, "नवरा गाड्या बघायला गेलाय, मुलं पण अजून उठली नाहीत, एकटीच आहे, बोअर होतय." तो मेसेज वाचला मात्र आणि तिथे खरी ठिणगी पडली. मी तो मेसेज जसाच्या तसा स्त्रीसुलभ आणि त्यातही पत्निसुलभ लाडिक जिव्हाळ्याने बाजूलाच आढारलेल्या नवऱ्याला ऐकवला. "आपण इथे येऊन झाली की आता दोन वर्षं! कधी घ्यायची गाडी?" नवऱ्याने एक दिर्घ श्वास घेतला. मान माझ्याकडे वळवली आणि अतिशय त्रासिक आणि किलकिले डोळे उघडून माझ्याकडे "काय सकाळी सकाळी कट कट आहे" असा कटाक्ष टाकला आणि म्हणाला, "एक तासाभराने उठतो." मी खट्टू हॊऊन तिथून निघून गेले.
बरोब्बर साडेदहा वाजता घरात सूर्योदय झाला आणि पतिदेव नाश्त्यासाठी बाहेर येऊन बसले. आता गप्पा मारण्याच्या मूड मधे होती स्वारी. मी ठरवलं होतं विषय काढायचा पण गनिमी काव्याने. "आज जेवूया आणि मग सामान आणायला जावू दुपारी."- नवरा म्हणाला. "ठीकय पण बरंच सामान आणायचंय. भाज्या सगळ्याच संपल्यात. मागच्या आठवड्यात गेलोच नव्हतो आठवतंय ना.." "ह्म्म्म... ठीकय जाऊया..."- नवरा फक्त एव्ह्ढंच तरी बरं गप्पा मारायचा मूड होता. "आता एव्ह्ढं सामान वाहून आणायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का...? बर इथे काही रस्ते सरळ नाहीत. एव्ह्डे चढ उतार चढेपर्यंत दमछाक होते आपली... तू सुद्धा किती दमतोस हल्ली..." नवऱ्याच्या चेहऱ्यावर चमत्कारीक भाव होते. बायको सारखी तर दिसतेय पण बोलतेय काहितरी वेगळंच. नक्की काय चाल्लंय...? अर्थात या सगळ्या नमनाचा शेवट कुठे होणार हे त्याला समजत नव्हतं असं मुळीच नाही. पण अशावेळी मात्र बरोब्बर नवरे वेड पांघरतात. लगेच मला म्हणाला," एव्हडी काळजी वाटते माझी तर तू थोडं थोडं आणत जा ना आठवड्यातून सामान म्हणजे मला वीकेंडला आराम मिळेल." जोशी आणि त्यात पुण्याचे; ठाण्याच्या गोडबोल्यांना थोडीच दाद देतात. "तसं नाही रे पण मी काय म्हणते" असं म्हणून मी सरळ विषयालाच हात घालायचं ठरवलं. हे एक तंत्र आहे. नवऱ्याने ज्या विषयाला हात घातला तो मुद्दा तसा ज्वलंत होता. पण त्यावरून मी आत्ता चिडणं योग्य नाही. त्याबद्दल नंतर एखाद्या गोड क्षणी सविस्तर चर्चा करता आली असती.(अर्थात तो मुद्दा मी असाच बरा सोडून देईन) पण तूर्तास तो मुद्दा बाजूला ठेवला आणि मूळ विषयालाच हात घातला. "एव्ह्डी धावपळ करण्यापेक्षा गाडी घेऊया न एक." यावर नवऱ्याने चहाची एक भुरकी मारली आणि माझ्याकडे मिश्किल पणे हसत एव्हड्च म्हणाला, "घेऊया".
आता मला कळेना की मला गप्प करायला दिलेलं हे उत्तर आहे की हा खरंच घेणार आहे. पण माझा चहा घेऊन मी त्याच्या बाजूला जाऊन सोफ़्यावर बसले आणि बघितलं तर साहेब गाड्यांच्याच साईट्स लॅपटॉप वर धुंडाळत होते. हुश्श्श्श! मला अगदी हायसं वाटलं. पहिला गड अगदीच सहज सर केला आणि इथून त्या तथाकथित वाहनशोधाला सुरूवात झाली. आम्हीही गाड्यांची स्वप्न रंगवायला लागलो.
दरम्यान मी व्हॉट्स ऍप वर एक इमेज बघितली. "मा. संजय शितोळे यांना नवीन हीरो होंडा पॅशन-प्रो घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा." भारतातला एक बॅनर. हा बॅनर लिहिणारा इथेच थांबला नव्हता तर पुढे त्याबरोबर असंही लिहिलं होतं. "आली लहर केला कहर" "हॊऊ दे खर्च" आणि बाजूलाच मा. संजय शितोळे यांचा बाईकवरचा, गॉगल लावलेला, कपाळावर नाम ओढलेला, गळ्यात सोन्याच्या चेन्स घातलेला असा फोटो...
मला त्याच आविर्भावात माझा नवरा दिसायला लागला. फक्त बाईकच्या ऐवजी कार आणि खाली "आली हुक्की म्हणून दिली बुक्की" किंवा "आली उचकी मारली ढुसकी" आणि हे नवऱ्याने खास माझ्यासाठी सुचवलेलं, "वाढली जाडी म्हणून घेतली गाडी."
घरी आईला सांगितलं, "जावई गाडी घेतोय म्हटलं." त्यावर आईने स्त्रीसुलभ आणि त्यातही आईसुलभ काळजित विचारलं, "अगं पण तुमच्या ४५७ विझा वर चालणार आहे का तुम्हाला गाडी घेतलेली? बघा बाई काय ते? इकडे असतात तर पहिल्या दिवाळीपासूनच गाडी उडवली असतीत अगदी नव्वी कोरी. आमचं ठरलंच होतं जावयांना गाडी घेऊन द्यायचं. पण तुम्हाला ऑस्ट्रेलिया प्रिय ना. कशाला तिथे गाडी घेताय? या आता इकडेच. तिथे कोण आहे आपलं? आणि कुणाला दाखवायचीये गाडी?" माझी आई कुठल्याही विषयावरून फेरफटका मारत पुन्हा "परत या" या विषयावर येते.
नवऱ्याला सांगितलं, "आई म्हणत होती पहिल्याच दिवाळीला घरात गाडी आली असती भारतात असतो तर..." नवरा लगेच म्हणाला," हो आणि गाडीबरोबर ठाण्याहून पुण्याला सारखे नातेवाईकही आले असते. आज काय आमक्या मावशीला जुईचं घर बघायचंय आज काय तमक्या मामाला जुईचं घर बघायचंय. दर शनिवार रविवारी माझा ड्रायव्हर झाला असता." यानंतर आम्ही या विषयावर बऱ्याच संयमित वातावरणात शांतपणे चर्चा केली आणि आपण भारतात असतो तर पहिल्या दिवाळीला गाडी मिळाल्यावर आयुष्य किती सुकर झालं असतं हे नवऱ्याला पटलं. तसंच त्याने उच्चारलेले माझ्या नातेवाईकांबद्दलचे शब्द हे अतिउत्साहाच्या भरात, ऑफिस मधल्या प्रेशर मुळे या आणि अशा तत्सम बऱ्याच कारणांमुळे उच्चारले. त्याला मनापासून तसं म्हणायचं नव्ह्तं हेही त्याने मान्य केलं. माझी आई नेहमी म्हणते चर्चेने सगळे प्रश्न सुटतात.
तर गाडी संशोधनाला एकंदरीत अशी दणक्यात सुरूवात झाली आणि आमच्या संशोधन कार्यात बरेच जण सामिल झाले. टोयोटाची गाडी घ्यायची एव्हडंच नक्की केलेलं पण सिडॅन घ्यायची का हॅचबॅक? कुठून घ्यायची, फायनान्स किती आणि आपले पैसे किती घालायचे? इन्शुरन्स कुठला घ्यायचा? रेजो चं काय? असे अनेक प्रश्न भेडसावत होते. कोणी म्हणालं, पहिला हात साफ करण्यापूर्ती घ्या गाडी जुनी एखादी ३-४ हजाराची कार सेल्स वरून वगैरे. पण पुण्याच्या जोशींना हात साफ करण्यापुरते ३-४ हजार घालणं आज्जिबातच पटत नव्हतं आणि कुठलीही चर्चा न करता मलाही ते मान्य झालं. कुणी म्हणालं, "गाडी काही परत परत घेणं व्हायचं नाही एकदाच काय ती घेऊन टाका." हे पटण्यासारखं होतं पण नवी कोरी गाडी घेऊन टाकणं खिशाला नक्कीच परवडलं नसतं. यावरही आमचं एकमत झालं. कुणी म्हणालं, ऑक्शन मधून घ्या. कुणी म्हणालं अज्जिबात नको डिलर कडून घ्या. आम्ही आपले सरड्या सारखे रंग बदलत होतो. म्हणेल त्याच्या मागे गाड्या बघत हिंडत होतो. कुणी म्हणालं इकडे जाऊया इकडे, कुणी म्हणालं तिकडे जाऊ तिकडे. वारा येईल तश्शी पाठ फिरवत होतो.
सांगणारे सगळेच जण आमच्याच मित्र मंडळींपैकी. प्रत्येक जण आपला अनुभव सांगत होते. एकाने सांगितलं, "जुनी गाडी घ्या मी पण सुरुवातीला तशीच घेतली. ३००० ला घेतली". आमचं जेव्हा फार जुनी गाडी घ्यायची नाही असं ठरलं तेव्हा हाच मित्र परत म्हणाला," नकाच घेऊ जुन्या गाड्या. माझी गाडी मी ३००० ला घेतली आणि त्यावर नंतर तेव्हडाच खर्च करावा लागला. पण अगदी सुरेख चालली." नवरा भंजाळल्यासारखा घरी येऊन म्हणाला, "काय अतरंगी माणूस आहे. ३००० च्या गाडीवर ३००० खर्च केला. मग गाडीच ६००० ची घ्यायची ना."
आमच्या बाबतीत सांगायचं तर ही आमच्या घराण्यातली पहिली गाडी ठरणार होती. अगदी महा गायक, महा गायिक तसं महा गाडी आणि तो मान आता कुठल्या गाडीला द्यावा ते कळेना. माझे वडिल आणि सासरे दोघांनीही आयुष्यातली सगळीच वळणं चालतच पार केली. कुठल्याही गाडीच्या वाटेला न जाता. त्यामुळे आमच्या आयुष्यातली पहिली गाडी आणि तीही आस्ट्रेलियात.... हुश्श्श्श... बापरे किती गोष्टी आहेत?
आमच्या आणखिन एका मित्राने आम्हाला एक ३० पानी गाईडच दिलं. "गाडी घेताना कुठकुठ्ल्या गोष्टी बघाव्यात?" याचं समग्र निरूपण त्या ग्रंथात केलेलं होतं. आम्ही दोघांनी तो ग्रंथ संपूर्ण वाचला आणि या निकषावर आलो की, "छे छे एव्हडं कुठे बघत बसणार...?" नाही म्हणायला या ग्रंथाचा मनावर व्हायचा तो परिणाम झालाच आणि नव्या कोऱ्या गाडीतही खुसपटं काढू शकू इतके आम्ही चिकित्सक झालो. प्रत्येक गाडी विकणारा हा आम्हाला फसवणारच आहे अशी भावना मनात दॄढ झाली आणि वाहन संशोधन कार्य आणखिनच बिकट झालं.
त्यात आम्हाला काय सुचलं माहित नाही. आम्ही कॉमन वेल्थ बँकेत लोन मागायला गेलो. त्या धारदार चेहऱ्याच्या बाईने तितक्याच धारदार शब्दात सांगितलं,"तुमचा विझा अजून दोन वर्ष वॅलिड आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला (फार तर) १८ महिन्यांसाठी कर्ज देऊ शकतो तेही १३-१८% व्याजदराने. आम्ही तुमच्यासाठी एव्हडंच करू शकू त्याहून जास्त अपेक्षा ठेऊ नका.(हे कंसात) आणि शिवाय पहिल्यांदाच गाडी घेताय तेव्हा इन्शुरन्स सुद्धा जास्तच असेल. (बघा बाबा काय करताय ते). गाडी घेण्याचा उत्साह संपूर्ण जमिनीत गाडून त्यावर आईने पुस्तकात वाचून सांगितलेल्या भविष्याची रांगोळी पण काढून झाली.
आई म्हणाली, "तुमच्या वाहनसौख्यात शनि आहे. शनि जेव्हा गरज असेल तेव्हाच देतो. आता आकाशातल्या शनिला आम्हाला गाडीची गरज केव्हा आहे हे कसं कळतं हे शनिदेवच जाणे." नवरा पुन्हा वैतागला," मी तुझ्या जागी असतो तर गाडी घेतल्यावर "गाडी घेतली" असं आणि एव्हढंच सांगितलं असतं माझ्या घरी. माझ्या घरच्यांना मी सवयच लावलीये. कुठली? कुठून? केव्हढ्याला? वगैरे असे फुटकळ प्रश्न (ज्यातलं त्यांना काही कळणार नाही असे) ते विचारत नाहीत." आता अर्थातच इथे चर्चेचा मुद्दा नवऱ्याने प्रस्थापित केला आणि पुन्हा संयमित वातावरणात चर्चेला सुरुवात झाली. सगळ्या गोष्टी घरच्यांचा, आपल्यापेक्षा वडिल धाऱ्यांचा सल्ला घेऊन कराव्यात हे त्याला मन:पूर्वक पटलं आणि आधी जे काही तो म्हणाला ते ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात तो म्हणाला त्याच्या मनात असं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. कारण माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात.
तरीही गाडीचा विचार काही डोक्यातून जात नव्हता. एक मित्र म्हणाला, "अच्छा सी बी ए मधे गेली होतीस का लोन मागायला? अगं सी बी ए मधे जाऊन आम्ही पण डिप्रेस झालो होतो. तिथे जायचं नसतं..." हे त्याने रात्रीच्या वेळी वडाखालून नाहीतर पिंपळाखालून जायचं नसतं इतक्या श्रध्देने सांगितलं आणि पुन्हा आमच्या शोधकार्याला चढण लागलं.
प्रत्येक वेळी गाडी बघताना मी नेहमी महत्त्वाच्या गोष्टी बघायचे. ही माहिती सगळ्या होतकरू गाडी घेणाऱ्यांसाठी मला इथे प्रकर्षाने नमूद करायला आवडेल. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गाडीचा रंग, सीट चा रंग, कप होल्डर्स मागे-पुढे दोन्हीकडे आहेत का आणि ड्रायव्हरच्या बाजूची सीट बसायला मजबूत आणि व्यवस्थित आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथे सन प्रोटेक्शन फ्लॅप च्या मागे मिरर आहे कि नाही? हे सगळं. बाकी इंजिन, मायलेज, गिअर बॉक्स या सारख्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींची चर्चा नवरा करायचा. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण फारच वर वरच्या गोष्टी बघतो आहोत. थोडं खोलात जाऊनही गाडी बघायला हवी. मग मी गाडीचा सी डी प्लेअर आणि ए सी वगैरे पण चालवून बघायला लागले. गाडी खरेदी करताना तीही महत्त्वाचीच गोष्ट हो. नाहीतर उपयोग काय गाडीचा.
आता नवरा कावला. तब्बल एक महिना शोध करूनही मनासारखी गाडी काही मिळेना आणि हा प्रश्न कुठल्याच चर्चेने सुटत नव्हता. पु.ल. देशपांड्यांनी जे बायको आणि नोकरी बद्दल म्हटलंय तेच गाडीलाही लागू होतं. शेवटी सगळ्या नोकऱ्या, सगळ्या बायका आणि सगळ्या गाड्या सारख्याच. दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोड्ण्यात काहीही अर्थ नसतो. शिवाय मला असं वाटतं की हे मॅचमेकिंगच आहे. गाडीची आणि ड्रायव्हरची पत्रिका जुळायला हवी आणि दोघांच्याही पत्रिकेत लग्नाचा योग हवा.
महिना झाला तरी गाडी शोधतोच आहोत हे जेव्हा अवगत झालं तेव्हा आमचाही थोडा थोडा वाहनसौख्यातल्या शनिवर विश्वास बसायला लागला. हे अनुवंशिक आहे की काय असंही वाटायला लागलं. आध्यात्म नावाच्या दुधारी शस्त्राची मदत घेतली. खरंच कशाला हवीये गाडी? ठेविले अनंते तैसेचि रहावे... गाडी आली की चालणं बंदच होईल. बरं आहे आत्ता तेव्ह्ढाच व्यायाम होतोय. असे अनेक काय्च्या काय विचार मनात अगदी आसरून पसरून बसले. मनातून आणि डोक्यातून गाडी काढून टाकणं एकवेळ शक्य झालंही असतं पण रंगवलेल्या स्वप्नांतून ती निघणं आता कठिण हॊऊन बसलं. प्रयत्न चालूच होते. गाडी संशोधनाला वेगवेगळी वळणं, चढ-उतार लागत होते पण ब्रेक मात्र वरच्याच्या हातात किंवा कदचित आमच्या वाहनसौख्यात घर करून बसलेल्या शनिच्या हातात.
पण म्हणतात ना अगदी तस्सं झालं बोला फूलाला गाठ पडली आणि आम्हाला आमची स्वप्न सुंदरी एकदाची काय ती मिळाली. आमच्या आयुष्यातली पहिली गाडी होण्याचा मान आम्ही टोयोटा कोरोला ला दिला. देर है मगर अंधेर नही या न्यायाने आमच्या आयुष्यात एका सुरेख, आकर्षक आणि देखण्या गाडीचं नुकतंच पदार्पण झालं. पुढे-मागे कप होल्डर्स आहेत, गाडीचा आणि सीट्चा रंगही बरा आहे, ए सी आणि सीडी प्लेअर अगदी दणक्यात चालतोय आणि ड्रायव्हरच्या बाजूची जागाही अगदी भरभक्कम आणि सुट्सुटीत आहे. "मैत्रिणीचा नवरा गाड्या बघायला जातोय" इथून सुरू झालेला प्रवास इथे संपला (नंतर त्या मैत्रिणीशी बोलणं झाल्यावर कळलं की तिचा नवरा त्यादिवशी युट बुक करायला गेला होता. कारण नुकतीच ती मंडळी एका नवीन घरात शिफ्ट झालीयेत.) असो शनिदेवानेही आमची गरज ओळखून आमच्या पदरात हे दान टाकलं खरं...
राक्षसाचा जीव पोपटात वगैरे कसा असायचा तसं आता नवऱ्याचा जीव त्या गॅरेज मधल्या गाडीमध्ये आहे. पहिले काही दिवस मला घरात सवत आल्याचाच फील आला "इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, सांभाळ तुटेल, मोडेल, एका जागी स्वस्थ बस, मला एकाग्रतेने गाडी चालवू दे, बोलू नको वगैरे वगैरे आणि या बाबतीत तो कुठल्याच चर्चेला तयार नव्हता. माझाही नाईलाज झाला. पण सुरुवातीचे दिवस असे खडतरपणे पार केल्यावर आता मात्र आयुष्य खूपच सहज सोप्प झालंय. घरातून निघताना, "गाडीची चावी घेतलीस का?" असं विचारतानाही आनंदाच्या उकळ्या फुटतात.
आता कप होल्डर्स मध्ये कॉफिचे दोन कप, रेहमानच्या गाण्यांची साथ... चर्चा, संवाद सगळं तोच घडवतो... निखिल ला गाडी चालवताना बघून स्वर्ग दोन बोटं उरतो... आणि त्या दोन बोटांची जागा आमची गाडी भरून काढत असते...भरून काढत असते... भरून काढत असते...
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 2:20 pm | जे.पी.मॉर्गन
मस्त... खुसखुशीत!
जे.पी.
1 Nov 2013 - 2:29 pm | टवाळ कार्टा
चायला लग्नाआधी आणि लग्नानंतर्सुध्धा गाडी मात्र पुरुषांनी"च" घ्यायची???
1 Nov 2013 - 3:37 pm | बॅटमॅन
या ज्वलंत मुद्द्याला शिताफीने बगल देऊन दुसरीकडेच लक्ष वळवल्या गेले आहे. निषेध असो!
1 Nov 2013 - 2:36 pm | यशोधरा
मस्त लिहिलंय! :)
1 Nov 2013 - 2:46 pm | आतिवास
खुसखुशीत लेख.
1 Nov 2013 - 3:22 pm | संजय क्षीरसागर
अत्यंत दिलखुलास लेखनशैली. मस्त मूड बनवलास. अशीच मजेत राहा.
1 Nov 2013 - 3:36 pm | विटेकर
अगदी सुरेख लेखन !
..........माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात
या वाक्यातील " माझी आई नेहमी म्हणते..." हा भाग .".. चर्चेने प्रश्न सुटतात" या भागापेक्षा अधिक महत्वाचा आहे हे मी स्वानुभवाने सांगु शकतो !
1 Nov 2013 - 5:39 pm | टवाळ कार्टा
:D
27 Nov 2013 - 9:04 pm | अगोचर
अहो "संयमित" राहिलं
1 Nov 2013 - 4:12 pm | इरसाल
आधी जे काही तो म्हणाला ते ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात तो म्हणाला त्याच्या मनात असं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. कारण माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात.
हे बाकी प्रकर्षाने पटले.
1 Nov 2013 - 4:28 pm | प्यारे१
दिवाळी जोरात आहे.
छान लेखनशैली.
मिसळपाववर हे फूल नवीन आहे का?
1 Nov 2013 - 4:55 pm | michmadhura
अगदी सुरेख लेखन !
1 Nov 2013 - 5:35 pm | जय - गणेश
काही प्रश्न
टोयोटाचा नबंर काय ?
गाडीच्या पुडच्या काचेवर कोणत्या देवाच नाव रेडियम ने लिहले आहे ?
डेस्क बोर्ड वर गणपतीची मुर्ती स्थापन केली का ?
''बेबी ऑन बोर्ड '' ही पाटी मागे कधी टांगणार आहात ?
बाकी लेख आवडला.
1 Nov 2013 - 6:24 pm | राही
फारच सुंदर लिखाण. दिवाळी अंकात शोभले असते.
मस्त मूड बनून गेला.
1 Nov 2013 - 6:24 pm | रेवती
लेखन अगदी गुदगुल्या केल्यागत वाचत होते. छान झालय.
1 Nov 2013 - 7:08 pm | मुक्त विहारि
झक्कास
खुसखुशीत
1 Nov 2013 - 7:31 pm | जेपी
व्वा व्वा व्वा व्वा
आवडल
1 Nov 2013 - 8:00 pm | उपास
चकलीसारख्म खुसखुशीत.. आवडलंच!
1 Nov 2013 - 8:21 pm | शैलेन्द्र
भन्नाट लेखन, खुप आवडलं.. वाक्यावाक्यागणिक मारलेल्या कोपरखळ्या चेहर्यावरचे हसू मावळू देत नाहीत.. छान ..
1 Nov 2013 - 9:24 pm | वाटाड्या...
अभिनंदन नवीन गाडीबद्दल...अगदी मनापासुन....आणि लेखनपण खुसखुशीत आहे.
पण टोयोटा आणि देशी हे परदेशात अगदी समीकरण आहे. हो..हो..लगेच अगदी अंगावर यायची गरज नाही...अत्यंत भीकार टमरेल गाड्या आणि येता जाता लेकाचे रीकॉल्स करत असतात....
- वाट्या...
1 Nov 2013 - 10:56 pm | लंबूटांग
पण इतर देशांतील लोकही टोयोटा आणि हाँडा या गाड्यांना तितकीच पसंती देतात आणि त्याचे कारण म्हणजे विश्वासार्हता. २ लाखांहून अधिक माईल्स चालवूनही रेग्युलर मेंटेनन्स शिवाय काही मोठा खर्च न करावा लागणे ह्या कारणास्तव लोक ह्या दोन ब्रॅन्ड्स ना पसंती देतात.
रीकॉल्स वगैरे सर्वच कार कंपन्या करतात. अगदी mercedes, BMW, Bentley वगैरे सुद्धा. त्यांचा ग्राहकवर्ग कमी असल्याकारणाने तितके गाजत नाहीत इतकेच. टोयोटाचा अगदी अलिकडचा सर्वात गाजलेला अन इंटेन्डेड अॅक्सिलरेशनचा रीकॉलही फ्लोर मॅटमुळे होत होता. त्याच वेळेस अमेरिकेत मंदी आलेली असल्या कारणाने बी अमेरिकन बाय अमेरिकन (फोर्ड, जीएम, शेव्ही इ.) ही घोषणाही वारंवार होत होती त्यामुळे ह्या जॅपनीज कार मधील दोषाला वाजवीपेक्षा अधिक प्रसिद्धीही मिळाली. खरे तर टोयोटा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत बनत आहेत आणि फोर्ड, जीएम, शेव्ही ह्या साउथ अमेरिकेत. असो.
टोयोटाच्या कोणत्याच रीकॉलचे कारण आग वगैरे लागून अथवा जीवघेणा अपघात होऊन कोणाचा जीव गेला असल्याचे मला तरी आठवत नाही.
रीकॉल हे तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठीच असतात आणि फुकटात दुरूस्त करून मिळतात त्यामुळे त्या बद्दल त्रागा करण्यात काही अर्थ नाही.
अहो एखाद्या सॉफ्ट्वेअर प्रणाली मधे सुद्धा bugs असतातच, इथे तर चालती फिरती कार आहे आणि जगभरात कितीतरी व्यक्ती प्रकृती आणि environmental conditions. So there is only so much they can do to get everything right the first time.
अवांतराबद्दल क्षमस्व.
1 Nov 2013 - 9:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुन्हा संयमित वातावरणात चर्चेला सुरुवात झाली.>> आधी जे काही तो म्हणाला ते ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात तो म्हणाला त्याच्या मनात असं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. >>>>कारण माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात.>>>
2 Nov 2013 - 1:40 am | पैसा
अगदी जबरदस्त! मस्त लिहिलंय! ठाण्याचे गोडबोले आणि पुण्याचे जोशी आणि त्यांच्या संयमित चर्चा वगैरे भन्नाट आवडल्या. यानिमिताने आमच्याही पहिल्या गाडीची आठवण झाली!
26 Nov 2013 - 6:13 pm | इष्टुर फाकडा
हेच लिहायला आलो होतो.
2 Nov 2013 - 1:55 am | किलमाऊस्की
खुसखुशीत लेख. अगदी असाच प्रसंग काही दिवसांपूर्वी आमच्या घरात घडला.
आमचे अहो 'कन्या' राशीचे असल्याने संशोधकांच्या वरताण संशोधन करतात. चार महिने अॅनालिसिस करुन शेवटी आमच्याही खानदानातल्या पहिल्यावहील्या गाडीचं आगमन महिन्याभरापूर्वी झालं. आणि तीही टोयोटाच! :-) फक्त आमची चलती का नाम कॅम्री..
+१००
अभिनंदन नवीन गाडीबद्दल!!
2 Nov 2013 - 7:02 am | वेल्लाभट
गुड... एक्दम फोकस्ड क्रायटेरिया आहे :)
26 Nov 2013 - 2:00 pm | स्वराजित
खुप छान लेख.
26 Nov 2013 - 2:30 pm | मृत्युन्जय
मस्तच. :)
26 Nov 2013 - 4:16 pm | मधुरा देशपांडे
वर्णन आवडले. ४ महिन्यांपूर्वीचे आमच्या घरातील सगळे प्रसंग आठवले. गाडी घेण्याआधीची सगळी चिकित्सा आणि घेतल्यानंतर नवऱ्याकडून गाडीला मिळणारी अति प्रेमाची वागणूक.
26 Nov 2013 - 5:07 pm | अग्निकोल्हा
सवतीची उपमा खतरनाक वास्तववादी.
26 Nov 2013 - 6:51 pm | प्रभाकर पेठकर
अत्त्तिशय सुरेख, खुसखुशीत लेखन.
माझे पहिले वाहन हे सेकंडहँड 'मोटरसायकल' होते. मी मस्कतात आणि बायको चिपळूणात होती.
तिला पत्रातून कळविले,
'कालच तिला मित्राकडे पाहिले. पाहताक्षणी आवडली. अगदी कोणाच्याही नजरेत भरावी अशी. मित्राला म्हणालोही तसं. तर तो म्हणाला, 'आवडली?' तर म्हंटलं,' हो! फार सुंदर आहे'. तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. मित्र म्हणाला, 'हवी आहे तुला? घेऊन जा.'
काल रात्री घेऊन आलो घरी. कालची रात्र फार फार सुखात गेली. आयुष्यभर जिची नुसती स्वप्नेच बघितली ती आज माझी होती....स्वतःची.
सुझुकी २५० मोटरसायकल.
पत्र वाचताना बायकोला अर्थातच घाम फुटला होता.
26 Nov 2013 - 7:07 pm | राजेश घासकडवी
तरल आणि नर्म विनोदी लेखनाचं उत्कृष्ट उदाहरण.
27 Nov 2013 - 7:54 am | स्पंदना
आमचीही कोरोलाच आहे हो जुइ बाई! अन मस्त आहे गाडी.
वर म्हणल्याप्रमाणे देशी लोक टोयोटाच घेतात अस मी ही ऐकल आहे. असो बिचारे! :(
27 Nov 2013 - 11:21 am | आदूबाळ
संयमित वातावरणात शांतपणे चर्चा - हे बाकी पटलं हो! घरोघरी...