शेत-तळं

मीराताई's picture
मीराताई in जनातलं, मनातलं
31 Aug 2013 - 11:24 pm

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरवर दृष्टी टाकत दिगंबर सायकल रेटत होता. रस्तारुंदीच्या कामात जुनीपुराणी झाडं तोडली गेली, तेव्हापासून रस्त्याला थंडगार सावली देणारी त्यांची डेरेदार छत्रंही गेली. एरवी हिरव्याचार शेतांवरून येणारी झुळुक थंडोसा आणायची अन् त्याबरोबरच तो हिरवा, ओला गंधही! पण आता पाहावं तर कालपरवापर्यंत भेगाळल्यासारखी दिसणारी शेतं, ढेकलं उलून आल्यानं केविलवाणी दिसत होती. बांधाबांधावरच्या एकटया दुकटया चिंचा-बाभळी उसासत कशाबशा तग धरून उभ्या होत्या, उद्याच्या आशेवर! उजाड माळरानांवर तेवढेच हिरवे ठिपसे जिवंतपणाची खूण पटवत होते. तुरळक रहदारीच्या रस्त्यावरून मधूनच विझलेल्या चेहऱ्याचे चार-दोघेजण गायी-गुरांना बाजार दाखवायला निघालेले दिसत होते. त्यांच्या विझलेल्या डोळयांमधले अबोल शोकसंदेश दिगंबरला सहजच वाचता येत होते. 'काहीतरी धडपड करायला पाहिजे.' त्यानं मनाशी ठरवलं आणि सायकलला जोराचा रेटा दिला.
उजव्या हाताला शंकरबाबाचा डोंगर दिसला, तसा गाव जवळ आल्याची खूणगाठ पटून त्याला हुरूप आला. त्या उघडया बोडक्या डोंगरमाथ्यावरच्या पडक्या बुरूजावरची चार झाडं मोकळया वाऱ्याच्या हाती हात गुंफून मजेत झिंज्या उडवत होती. त्या डोंगरावरून उतरणाऱ्या वाटेवरची जपून उतरत येणारी आकृति पाहून दिगंबरनं सायकलीचा वेग कमी केला...
हो! नकुसात्याच होती ती! तिच्या अंगाखांद्यावर तो लहानाचा मोठा झाला, ती नकुसात्या. वयात येते न येते, तो नवरा गेला महामारीच्या साथीत; मग सासरीपण ती 'नकुसी'च झाली. माहेरीपण मोटेचा बैल बरा म्हणावा, अशी राब राब राबली तरी कधी 'नकुसी'ची 'हवीशी' झालीच नाही. आताही उन्हातान्हाची एकटीच डोंगरावरच्या गडावर पाण्यासाठी जाऊन आली होती ती. गावात पाहावं तर कधी न आटणारी पाटलाची विहीरही आटली होती यंदा. ओढे-नाले-नदी साऱ्यांचीच पोटं खपाटीला गेली होती. नदीच्या रेतीत खोलवर खणून पाहिलं तरी नुसती तापलेली रेतीच फुत्कारत होती. बोअरचं म्हणावं तर तिथेही चार-चारशे फूट खोलीवरही पाणी लागत नव्हतं. दोन-चार वर्षांखाली मोठया उत्साहानं शेतकऱ्यांनी शेततळी बनवली होती, तीपण कोरडीठाक झाली होती. हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करणाऱ्या बयांच्या बरोबरीनं बाप्येपण कुणी कावड घेऊन तर कुणी सायकलला हंडे बांधून पाच-सात मैलावरच्या कॅनॉनमधून पाणी आणत होते. टँकरला पैसे कोण देणार? आपणच वणवण करायची झालं!
तसं वरच्या अंगाला असलेलं धरण बऱ्यापैकी पाणीसाठी राखून होतं. पण त्यालाही किती वाटेकरी, जवळच्या शहरासह! मग नकुसासारख्या काहीजणी पाण्यासाठी डोंगराची वाट चढत-उतरत होत्या. गडावर शिवबाराजांनी बांधलेल्या विहिरी न् टाक्या होत्या. त्याला जिवंत झरे तर होतेच, पण पावसाचं पाणी पण भरपूर साठवलं जायचं. काळया कातळाच्या भेगाभेगातून थेंबाथेंबानं डोंगरभर झिरपायचं. त्या ओलाव्यानंच डोंगरावरचे जुनाट वृक्ष-वेली, झाड झाडोरा, करवंदाच्या जाळया सारीच बारोमास सुखावून डुलत असायची. चारशे वर्षं होत आली तरी राजांच्या मायेचं ते देणं सरत नव्हतं.
नकुसा ते थंडगार पाणी पोटभर प्यायची अन् घटकाभर निवांत बसायची. रानवाऱ्याचा धसमुसळा तरी हवाहवासा वाटणार स्पर्श अनुभवायची, डोळे मिटून. घरी-दारी पडलेला कामांचा रगाडा अन् कामं लावून देणाऱ्यांचा गराडा यांनी शिवलेल्या नकुसावर गडावरची दैवी शांतता पाखर घालायची. मन निवलं की जराशानं उठून डोळया-कमरेवर हंडे घेऊन ती सांभाळून डोंगर उतरायची. ढेकळं उलून आलेल्या वावरातून तोल सावरत ते ओझं वाहण्यापेक्षा तो भक्कम डोंगर उतरणं तिला सोयीचं वाटत होतं.
दिगंबरच्या काळजात माया दाटून आली. सायकल जरा बाजूला लावून तो पुढं गेला. तिच्याकडून थोडं ओझं घेत तो निघाला. सायकलला हंडे बांधून झाले, तशी तीही जरा मोकळी चालू लागली.
'आजची कितवी खेप आत्या?'
दिगंबरच्या या प्रश्नावर ती खिन्नशी हसली. म्हणाली, 'आमच्या खेपा कोन मोजतंय् बाबा म्हून मी मोजायच्या? भुईला पाठ लागस्तवर कामं उरकत ऱ्हायची, दिसतील ती. मोजमाप करंल त्यो, आन् कदी न कदी टाकील माप पदरात.' वरती बघत तिनं हात जोडले. आपल्या जगण्याचं तत्त्वज्ञान तिनं स्वत:साठी इतकं सोपं करून टाकलं होतं.
काही आठवल्यासारखं तो थबकला, अन् म्हणाला,
'मी तरी कसा विसरलो बघ. उन्हाची डोंगर उतरून आलीस एवढं ओझं वाहात. आधी चार घोट पाणी पी बरं तूच.'
'आरं नग, आसं प्येत ऱ्हायले वाटंनं, तर घरापत्तूर कसं पोचनार पानी?'
'पोचेल ते पोचेल. झीट येऊन पडलीस म्हणजे?'
'काय मोठं व्हानारय्?...
हातानंच वारून, तिला पुढे बोलू न देता त्यानं हंडा घेतला, अन् जपून धार धरत तिला पाणी प्यायला लावलंच त्यानं.पोटाला वेळेला, पुरेसं, चांगलं-चुंगलं मिळणं... कठीणच होतं ते, पण साध्या पाण्याच्या घोटासाठीही मनं मारावी, या माय-बहिणींनी? तो अबोलपणीच चालत राहिला. काहीतरी तड लावायलाच पाहिजे, असा त्याच्या मनाचा कल होत राहिला. दार जवळ आलं तसं त्यानं पुन्हा हंडे तिच्या डोईवर दिले. 'जरा जाऊन येतो' येवढाच निरोप देऊन त्यानं पुन्हा सायकलवर टांग टाकली.
गावापासून वीसएक मैलावरच धरण होतं. साहेबराव देशमुख, सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारे आमदार, बडं प्रस्थ होतं. धरणाच्या आसपासची शेकडो एकर जमीन खरेदी करून जोडत चालले होते ते गेली पाच वर्षं. त्यांना भेटून पाण्याचा प्रश्न रेटायचा प्रयत्न करणार होता तो. त्याशिवाय इलाज नाही.
विचारांच्या तंद्रीत बराच पुढे आला तसं दृश्य बदलत गेलं. धरणाच्या भोवतालची जमीन हिरवं वैभव मिरवत होती. स्वाभाविकच होतं म्हणा! श्रीमंतांची पोरं खाऊनपिऊन सुस्त, मस्त, गरीबाची पोरं उघडी-नागडी, तहान-भुकेनं त्रस्त, श्रीमंतांची कुत्रीसुध्दा धष्ट-पुष्ट अन् शिष्टही, तर गरीबांची उकिरडा फुंकणारी शुष्क काष्ठ, तशीच श्रीमंतांची जमीन शेकडो एकर, ओली कंच, हिरवीगार, तर गरीब शेतकर्‍याचे वावराचे तुकडे कोरडेठाक, गपगार!
अशाच विचारांच्या नादात त्यानं देशमुखांच्या मळयात प्रवेश केल्याचं त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. रस्त्याच्या बाजूनं नीटस कुंपणाच्या आत सुरक्षित फळबागा होत्या. पलीकडं कुठं कडधान्यं, तर कुठं गहू ज्वारीची शेतं डुलत होती. जरा बाजूला खाली उसाचा फड तुऱ्यावर आलेला, हे सगळं तो शून्य नजरेनं पाहात होता. बाजूच्या फळबागांमध्ये ठिबकसिंचनासाठी लावलेल्या पाईपांच्या मधून उडणाऱ्या बारीक धारांमुळे वातावरणात थंडोसा आला होता. अन् मधूनच अंगावर तुषारही येत होते. त्यानंच तो भानावर आला होता.
मनातल्या मनात शिवी हासडून, साहेबरावांशी कायकाय बोलायचं याचा विचार करू लागला. धोरणानं बोलून, दबावतंत्र वापरून, पण गोडीनंच शक्य तेवढं साधायला पाहिजे. जास्त धाक घातला, तर गावाची राख-रांगोळीसुध्दा व्हायची, हेही तो जाणून होता.
दिगंबर तसा जात्याच हुषार, चुणचुणीत. शिकत गेला तसं घरातल्यांसारखा बाहेर, गावकऱ्यांनाही त्याचं कौतुक होऊ लागलं. तालुक्याच्या गावी शाळा-कॉलेजमध्ये शिकत असता काही उपक्रमांच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते दिवाकर सातपुते यांच्याशी त्याचा संबंध आला. संपर्क वाढत गेला तसतसं समाजरचना, जातीपाती, शिक्षण, राजकारण, शासनयंत्रणा यातल्या समस्यांकडे पाहण्याची एक दृष्टी येत गेली. कौटुंबिक अर्थकारण तर डोळयांसमोर उघडंच होतं, त्यातच गावपातळी, जिल्हापातळीवरचं अर्थकारण, व्यक्तिगत तसंच शासनयंत्रणेतलं उघडं आणि छुपं अर्थकारण, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवरचं कोटयावधींचं 'विस्तृत' अर्थकारण यांचीही जाण येत गेली. धरणातला पाणीसाठा, त्यातून निघणारे कालवे, पाईपलाईनी आणि पुढे जाऊन खेळणारं (साहेबरावांच्या शेतातल्या) पाटाचं पाणी हे सगळं जसं डोळयांना ठसठशीत दिसतं, तसं त्याला जलसंसाधनासाठी येणारा शासकीय निधी, त्याला फुटणारे कालवे, पाईपलाईनी अन् मग तट्ट फुगलेल्या भक्कम खिशांमध्ये खुळखुळणारा पैसाही जाणवू लागला. अगदी अपरात्री अर्ध्या झोपेतून उठवून त्याला कुणी विचारलं तरी तो ते सारे आकडे टक्केवारीसह सांगू शकला असता. आधीच तर जंगलांची वाट लागलेली. या मराठी मुलुखातल्या ज्या घनदाट राईच्या भरवशावर शिवाजीराजांनी गनिमी काव्यांच्या योजना पार पाडल्या, मोगलांना धूळ चारून टेकीला आणलं ती राई तर इतिहासजमाच झाली होती. राई गेली, राहिली धूळ. पावसाचं वेळापत्रक कोलमडलं अन् लागवडीखालची जमीनही कमी होत चाललीय्. दिवस आले एन्.ए.चे...
दिगंबरच्या विचारांची चक्रं साहेबरावांच्या बंगल्याच्या आवारात येता येता थांबली. कारण त्यांच्या भल्या मोठया बुलडॉगने त्याचं पारंपारिक पध्दतीनं स्वागत केलं होतं. गडीमाणसांनी त्याला आवरून बाजूला नेलं, तसा दिगंबर पुढे झाला. आतमध्ये वर्दी जाऊन, साहेबरावांची भेट होण्यापर्यंत किसनअण्णांशी एकडच्या - तिकडच्या गोष्टी करून तो भोवतालच्या हिरव्या वैभवाचं निरीक्षण करत होता. शेतावरून ये-जा करणाऱ्यांना ते सूचना देत होते, त्याकेही त्याचं लक्ष होतं. किसनअण्णा एकाला सांगत होते,
'शेतातळयाचं खोदकाम पूर्ण झालं की नीट बघून घे. २००X२०० मीटर मोजून घ्या. अन् हो, खोली दोन पुरुष तर पायजेच. मोजमापं बरोबर करा. मी येतोच तासा दोन तासात.'
किसनअण्णा जुन्या ओळखीचे, त्यामुळे गप्पा मोकळया. गावकऱ्यांची हालहवाल - हालहवाल कसली, हालहालच ते. त्यांना ठाऊक होतीच. त्यांनीही साहेबरावांकडे काम लावून धरावं म्हणून दिगंबर त्यांना नावाजत म्हणाला,
'बघा, तुम्ही त्यांच्या जवळचे, विश्वासातले म्हणून सांगतो, आमच्याकडच्या कालव्यातनं पाणी जरा सोडलं तरच गाव वाचेल. नाहीतर कठीण आहे. त्यांनी मनावर घेतलं तर...'
'वा: ! हे काय सांगायला पायजेल का?'
जराशानं आलेच साहेबराव. धोतराचा सोगा आडव्या हातावर सावरत, दुसऱ्या हातानं भरघोस मिशांवर ताव देत त्यांनी प्रवेश करताच किसनअण्णांनी दिगंबरला खूण केली. आपल्या नम्रतेला लाचारीचा वास येऊ नये याची काळजी घेत त्याने साहेबरावांना नमस्कार केला. आपल्या मुरब्बी नजरेनं त्याला वर-खाली न्याहाळत साहेबराव त्याचा अंदाज घेत होते, 'गडी कामाचा आहे खरा, पण विरोधी, पक्षाच्या अस्तनीत जाऊन बसलाय्. इकडं ओढला तर खरा कामाचा.' असेच काहीसे हिशेब मनात चालू होते.
'मी दिगंबर शिंदे, वर्णापूरचा... ओळखलं नसेल म्हणून...'
'वळखलं तर! बोला, काय काम काढलंत?'
'काम म्हंजे हेच की, पाण्याविना जमिनी, सारा गाव होरपळायला लागलेत.त्या बाजूला पाण्याचा विसर्ग सोडावा म्हणून मंत्र्यांकडं किंवा धरणावरच्या अधिकाऱ्यांकडं शब्द टाकला तर बरं व्हील. पेरण्या तर खोळंबल्यातच, गायी-गुरं चाललीत बाजाराकडं आणि आता माणसांचंपण काय खरं दिसेना.'
'खरं हाय तुमचं म्हन्नं, पन आसं पानी येवढया-तेवढयाला सोडायला लागलं तर उद्या धरनच तळ गाठील की, मग काय करायचं वर्षभर?'
'येवढया-तेवढयाला?' दिगंबरच्या मनानं फणा उभारला. पण सबुरीनं तो बोलत राहिला,
'पण धरण तर भरलेलं आहेच... आता पावसाळा पण येतोय्च की.'
'पावसाचा भरोसा, द्येता तुमी? ऑं? अन् त्या शेहराच्या जिम्मेदारीचं काय?'
'शहराचं काय हो? तो तर राक्षराचा जबडाच आहे, सदा वासलेला. इकडचं सगळंच तिकडं धाडलं तरी कमीच पडणार. पाण्याच्या घोटाला आम्ही महाग, तर तिकडं 'शॉवर' घेतात अर्धा तास सहज.'
साहेबरावांनी त्याच्याकडं एक तीव्र कटाक्ष टाकला. पण तिकडं दुर्लक्ष करत नेट लावून तो म्हणाला,
'आमचं मागणं फार नाही. गुरांना, माणसांना प्यायला पाणी तर पाहिजेच अन् थोडं पाटाला; निदान घरच्या भाकरीपुरतं तर पिकलं पाहिजे काही. आम्ही काही ऊस-द्राक्षं लावत नाही की साखरकारखान्यासाठी पाणी मागत नाही.'
दिगंबरच्या तोंडून गेलं खरं, पण घाव वर्मी लागला होता साहेबरावांच्या. पण ते प्रतिवाद करायला योग्य शब्दांची वाट पाहात होते. दिगंबरच पुढे बोलत राहिला,
'नाही म्हणजे, परवाच पेपरात वाचला लेख, त्यात होता हिशेब दाखवलेला.'
'कसला हिशेब?'
'हेच की, उसाच्या लागवडीपासून तो त्याची साखर होईपर्यंत दर किलोला पंधराशे लिटर या हिशेबानं पाणी लागतंय् म्हणून. एवढया पाण्यात तर माझं आठ माणसांचं घर आठवडाभर चालेल की. आमच्याकडच्या सांडपाण्यावरसुध्दा घरची भाजी होतीय्. तेही वाया दवडत नाही आम्ही.'
'ते ठीकाय्, पण ते पेपरवाल्यांचं, सांगू नका मला. त्यांनी छापलं म्हणून सत्य झालं काय?'
साहेबराव गुरकावून बोलले. पण आता फुटलंच आहे तोंड तर मागे हटायचं नाही, दिगंबरनं विचार केला,
'सरकारी आकडे आहेत हे दादासाहेब. असं पाणी लागतं म्हणून तर सिंचनाखाली असलेल्या सोळा टक्के जमिनीपैकी फक्त चार टक्के उसाखालची जमीन सत्तर टक्के पाणी पितीय् गपागपा. बाकीच्या तीस टक्के पाण्यात उरलेली बारा टक्के जमीन अन्न-धान्य देते. बाकीची चौऱ्याऐंशी टक्के तर कोरडवाहूच. आम्ही तर कालव्यांच्या इतके जवळ असून कोरडवाहू होऊन बसलोय्. कुणाकडं पाहायचं आम्ही? म्हणून तर...'
तिरिमिरीनं दिगंबर बोलत होता. साहेबरावांचं पित्त भडकत होतं, पण डोकं मात्र थंडपणे हिशेब करत होतं. मतदारसंघाचं लफडंपण होतंच ना! अगदी डोळयाआड करूनही चालणार नव्हतं. ताठपणानंच ते बोलले,
'व्हय्, तुमी येनार शेवटला आमच्याकडंच. पण सरकारी मदत येतीय् तिचं काय? सारा माफ केला, बिनव्याजी कर्ज दिली, अनुदान दिलं, त्ये कुटं जातय्? लग्नात आन् व्यसनात! पुन्हा तोंड वेंगाडलेली! कुटवर पुरं पडणार आम्ही आन् सरकार तरी?'
'बघा, खरं काय ते सगळयांनाच ठाऊक आहे. कागदोपत्री असेल लाख कर्ज अन् अनुदान; पण आमच्या हाती लागेस्तवर गळती लागतीय, त्याचं काय? बैलजोडीसाठी मिळतं, त्यात शेरडूपण येत नाही. हे काय नवीन नाही.'
'मग काय आमच्या बैलजोडया आणून बांधायच्या का तुमच्या दारात?'
'आता..., माफ करा दादासाहेब, पण तुम्ही हा विपर्यास करताय्. माझ्घी विनंती हीच की पाण्याचं काहीतरी बघा. आपण शब्द खर्च केलात तर सोय होईल. मग कष्टाला आम्ही मागं नाही. दुष्काळानं बैलं विकावी लागली तरी आख्खं वावर स्वत: नांगरून काढू; पाणी तेवढं पाहिजे...'
उठता उठताच साहेबराव म्हणाले, 'बघू जमतंय् का.' दिगंबरही जडपणे उठला.
पाठोपाठ आलेल्या किसनअण्णांना साहेबरावांनी विचारलं,
'गेली का ब्याद? xxx! फोन लावा धरणावरच्या इंजनेराला. आमचा निरोप हाय् म्हनावं, खालच्या गावाला पानी लावून द्या थोडं दोन दिस. आनि आमच्या पाईपलायनीचं कनेक्शन लावून द्या डायरेक शेततळयाला. चार दिसाच्या आत शेततळं भरून व्हायला पाहिजे.
धरणावरून भराभर हुकूम सुटले. साहेबरावांच्या पाईपलाईनीमधून धबधबा पाणी वाहू लागलं. तिकडे गावाकडच्या कालव्यातूनही पाणी झुळझुळू लागलं. घराघरातल्या पिण्यावापरण्याची सोय झाली. पण वावरात वळवावं तर तिथवर येतायेताच ती धार पाटतच जिरुन गेली. आणखी येईल, उद्या तरी सोडतील पुरेसं, या आशेवर गडीमाणसं वाट पहात राहिली. आपल्या धडपडीला थोडं तरी यश आलं म्हणून दिगंबरही जरा खुशाल झाला.
तिकडे साहेबरावाचं शेततळं तुडुंब भरुन गेलं होतं. शेकडो एकरातले त्यांचे उसाचे फड, फळबागा, शेतं अन् फुलबागसुद्धा त्रुप्त होउन डोलत होत्या. आणि-
विदेशी मद्य रिचवून अन् कोंबडी-माशांची कालवण ओरपून तुडुंब पोट भरलेले इंजिनीअर साहेब साहेबरावांनी नव्याने घेतलेल्या चारशे एकरातल्या शेततळयांविषयी योजना न् चर्चा करण्यात मश्गूल झाले होते.

("पाणी" विशेषांक - विश्व संवाद केंद्र, दिवाळी अंक २०१२ मध्ये पूर्वप्रकाशित)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

31 Aug 2013 - 11:36 pm | आदूबाळ

छान लेखन! (असं म्हणताना पण हात थबकला जरा...)

आमच्या गावाकडं पण हीच बोंब आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असूनही आठ महिने ठणठणाट असतो. त्यातून डोंगरउतरणीचं असल्याने वॉटर टेबलचाही आनंदच आहे.

ऐन उन्हाळ्यात गावी गेलं की कोणाकडे प्यायला पाणी मागायचा संकोच वाटतो. :(

सस्नेह's picture

31 Aug 2013 - 11:51 pm | सस्नेह

पत्रकारितेची झलक जाणवली.

दादा कोंडके's picture

1 Sep 2013 - 11:51 am | दादा कोंडके

आवडलं.

उगा काहितरीच's picture

1 Sep 2013 - 12:14 pm | उगा काहितरीच

+1

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Sep 2013 - 12:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

सत्य परिस्थितीचे अचूक वर्णन केले आहे

मुक्त विहारि's picture

1 Sep 2013 - 3:00 pm | मुक्त विहारि

पटली..

पैसा's picture

4 Sep 2013 - 11:16 pm | पैसा

अगदी जसं आहे तसं..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Sep 2013 - 11:30 am | मिसळलेला काव्यप्रेमी

+१ टू पैसातै..

अनिरुद्ध प's picture

6 Sep 2013 - 11:52 am | अनिरुद्ध प

+१११ सहमत

कोमल's picture

7 Sep 2013 - 9:48 pm | कोमल

असचं म्हणते..

बाबा पाटील's picture

6 Sep 2013 - 12:03 pm | बाबा पाटील

पण फक्त लिहुन उपयोग नाही,विचारांची धग विषयामध्ये जाणवतेय्,शक्य होत असेल तर प्रत्यक्ष लोकांनपर्यंत पोहचा.खुप उलथापालथ करु शकतील तुमचे शब्द्,त्या ताकतीने जनतेत उतरा....

बॅटमॅन's picture

6 Sep 2013 - 12:05 pm | बॅटमॅन

अगदी आहे तस्से लिहिलेय. :(

मधुरा देशपांडे's picture

6 Sep 2013 - 1:57 pm | मधुरा देशपांडे

पाण्यासाठी करावी लागणारी ही वणवण खूप जवळून अनुभवली आहे. तेच सगळे दिवस आठवले. खूप छान लिहिलंय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Sep 2013 - 5:41 pm | निनाद मुक्काम प...

परदेशासारखे पाण्याचे नियोजन भारतात नाही
खरे तर कृषिप्रधान भारताला त्याची जास्त आवश्यकता आहे.