पूर्वसूत्रः
कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)
(या कथेचा हा भाग आधीच टाकला होता परंतु मिपाच्या गेल्या काही दिवसांच्या पडझडीत गायबलेला दिसतोय कथा पूर्ण असावी केवळ याच हेतूने हा भाग पुन्हा टाकत आहे).
मलिकच्या पूर्व ईतिहासाची माहिती, त्याचा फोटो, कमिशनर साहेबांनी केलेली मदत या सर्वच गोष्टींची गौरवपूर्ण दाखल मुंबईच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतली. या लेखाचे कात्रण त्यांनी आवर्जून अनिस खान यांच्याकडे पाठवले.
आता पुढे...
आणखी काही महिने गेल्यानंतरच्या एका दुपारी मलिक त्याचा सुपरवायझर जेवायला जायची वाट पहात थांबला. तो रोज दुपारी बाराच्या सुमारास जेवणासाठी आपल्या बाईक वरून घरी जाऊन तास दीड तासाने परत येतो हे मलिकने हेरून ठवले होते. त्याची बाईक दूरवर गेल्याची खात्री करून मलिक तळघराकडे निघाला. तेथे गेल्यावर अचानक कोणी येऊन विचारले तर बतावणी करण्याच्या उद्देशाने जातांना आपल्या बरोबर फाईल करण्यासाठी कागदांचा गठ्ठा घेतला.
तळघरात येतांच जुन्या फाईल असलेल्या आणि एकावर एक ठेवलेल्या लाकडी मांडण्यांकडे गेला. जवळपास आठ-नऊ महिने प्रयत्न केल्यानंतर तो 'P' आद्याक्षराच्या फाईलिंच्या गठ्ठ्यापर्यंत पोहोचला होता. परंतु अजूनही त्याला पाहिजे असलेल्या 'उमेदवारा'पर्यंत पोहोचला नव्हता. त्याला गेल्या दोन आठवड्यांपासून 'पटेल' नावांच्या ब-याच फाईल मिळाल्या होत्या पण त्याने त्या फाईल अनावश्यक किंवा निरुपयोगी म्हणुन पुन्हा जागेवर ठेऊन दिल्या होत्या. शेवटी त्याला एकदाची 'पी.पी. पटेल' या नावाची गलेलठ्ठ मिळाली. ती घेऊन तो अधीरपणे टेबलाकडे आला. फाईल उघडून एक एक पान उलटून पाहू लागला. दोन तीन पाने वाचतांच त्याला कळून चुकले हीच ती फाईल आहे जी तो गेले कित्येक महिने शोधत होता. त्याला जॅकपॉट लागला होता. माहिती नीट वाचून आवश्यक असलेले फोन नंबर, पत्ता एका कागदावर व्यवस्थीत लिहून घेऊन फाईल पुन्हा जागेवर ठेऊन दिली. त्याच्या चेह-यावर आता हास्य फुलले होते. दुपारच्या चहाच्या वेळी त्याने पी.पी. पटेल यांना फोन करून दोन दिवसांनंतर भेटीची वेळ निश्चित केली.
सेवानिवृत्तीला काही दिवस उरले असतांना कमिशनर साहेब शहरातील एक आघाडीचे उद्योगपती ब-याच आर्थिक कंपन्यांचे संचालक आणि नरेश कुमार यांचे जवळचे मित्र असेलेल्या पी.पी . पटेल यांचा फोन येईपर्यंत आपल्या 'प्रज्ञावान' माजी कैद्याला विसरूनही गेले होते. श्री. पटेल कमिशनर साहेबांना खासगी कामासाठी तात्काळ भेटण्याची विनंती करत होते. कमिशनर साहेब श्री. पटेल यांना चांगलेच ओळखत होते, त्यांच्या अगदी खास वर्तुळातले होते. अगदीच आवश्यक असल्याशिवाय पटेल 'तात्काळ भेटण्याची' विनंती करणार नाहीत हे कमिशनर साहेब जाणून होते.
श्री. पटेल यांनी केबिनमध्ये प्रवेश करतांच नरेशकुमार उठून त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले. आपल्या जुन्या मित्राला आरामशीरपणे बसायला सांगून त्यांच्या चहापानाची व्यवस्था केली. त्यांनी अनिस खान यांनाही बोलावून घेतले. "मला वाटतं खान देखील आपल्याबरोबर असावेत कारण काही आठवड्यातच ते माझी जागा घेणार आहेत. श्री. पटेल यांनीही अनिस खान यांना अभिवादन केले.
"हां, आता मला सांग काय एवढे महत्वाचे काम होते?"
"सांगतो, ही माहिती तुम्हाला लगेच कळवावी असे वाटले, कालच मला तुमचा एक माणुस भेटून गेला"
कमिशनर साहेबांच्या भुवया उंचावल्या. "श्री. राज मलिक"
तो तर एक कनिष्ठ फाईलिंग कारकून आहे...अं अं. तो देखील तात्पुरत्या काळासाठी, राज आपला माणुस आहे हे याठिकाणी स्वीकारणेही त्यांना अवघड जात होते. श्री. पटेल सांगू लागले "तो म्हणत होता तुमच्याकडे माझी एक फाईल आहे आर्थिक गैरव्यवहाराची". कमिशनर साहेबांच्या मुठी वळल्या गेल्या होत्या.
आपल्या आवाजावर संयम ठेवत ते म्हणाले, "मला सगळं आठवतयं पी.पी, ९ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाच्या आदेशावरून आम्ही मोठे आर्थिक व्यवहार करणा-या व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली होती त्या प्रमाणे तुझीही चौकशी झाली होती, बरीच वर्षे झाली त्या गोष्टीला, तो एक नियमीत चौकशीचा भाग होता. मीच तुझ्या कंपनीच्या 'क्लियरन्स सर्टीफिकेट' वर सही केली होती.
"हो मला सर्व तुम्ही त्यावेळीही सांगीतले होते पण आता तो तुमचा माणुस.."
"तो माझा माणुस नाही" नरेशकुमार ओरडले.
पी.पी. पुढे म्हणाले "म्हणत होता मी त्याचे छोटेसे काम केले तर तो माझी फाईल नष्ट करेल"
"आणि छोटेसे काम...." नरेश कुमारांनी जवळ जवळ किंचाळले.
"एक कोटी रुपये"
"पी.पी. मला काय बोलावे हेच कळत नाही." कमिशनर साहेब हताशपणे म्हणाले.
"तुम्हाला काहीच बोलायची गरज नाही. मला अगदी एक मिनिटासाठी देखील तुम्ही अशी काही मागणी कराल अशी शंकाही आली नाही. मी त्या मलिकलाही तसे स्पष्ट सागितले."
"तुझा खरोखरीच आभारी आहे मित्रा"
तरीपण एक लक्षात घ्या, सगळेच माझ्यासारखे तुमच्यावर पूर्ण भरवसा ठेवणारे नाहीत, विशेषत: तुमची सेवानिवृत्ती इतक्या जवळ आली असतांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आणखी एक, ही सगळी कहाणी पत्रकारांपर्यंत पोहोचली तर तुमच्या विषयीचे गैरसमज किती वेगाने पसरतील याची कल्पना करा.
पी.पी. मी योग्य ते सर्व उपाय योजतो. खरच तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाही".
ते राहू दे, खरंतर तुम्ही केलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल या शहरानेच आपले सदैव ऋणी रहायला हवे. म्हणुनच मला वाटतं की तुम्ही जेव्हा या खात्यातून बाहेर पडाल तेव्हा सन्मानाने, ताठ मानेने बाहेर पडावे, "संशयाच्या भोव-यात, चौकशीच्या चक्रात गुंतुन नव्हे". अनिस खान देखील पी.पी. पटेल यांच्याशी सहमत होते.
आतापर्यंत कमिशनर साहेबांशी अधिकाराच्या मर्यादा संभाळून अंतर ठेऊन बोलणारे पी.पी. भावनेच्या भरात आपल्या जुन्या मित्राशी सलगीने बोलू लागले.
"तुला एका सांगू नरेश, तू जर त्या दिवशी रोटरी क्लबच्या कार्यक्रमात त्या माणसाची भरभरून स्तुती केली नसतीस तर मी त्याला दरवाजातही उभा केला नसता, त्याने 'मुंबई टाईम्स' मधल्या बातमीचे कात्रणही बरोबर आणले होते. त्या वरून हे सर्व तुझ्याच इशा-यावर चालले आहे असा कोणाचाही समज होईल" शेवटी निरोप घेतांना पी.पी. अनिस खान कडे वळून "नव्या जबाबदारीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. पण या भल्या माणसाच्या पावलावर पाऊल टाऊन चालू नका असा सल्ला मात्र जरूर देईन." असे निरोपादाखल बोलून चालू लागले. कमिशनर साहेब त्यांना निरोप देऊन येई पर्यंत या प्रकरणात काय काय घडू शकते यावर विचार करून नक्की काय केले पाहिजे हे त्यांनी मनाशी पक्के करून टाकले होते.
"खान,मलिकला एक तासाच्या आत अटक करून ताबडतोब खटला भरण्याची व्यवस्था कर" आत येतांच संतापलेल्या कमिशनर साहेबांचा पहिले वाक्य होते.
"मला नाही वाटत सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय योग्य आहे" खान म्हणाले.
"या प्रकरणात आपल्याकडे आणखी काही पर्याय तरी कोठे आहे खान" असे म्हणून स्वत:च फोन उचलून नंबर फिरवायला सुरुवात केली.
"सर तुम्ही म्हणता ते खरे असले तरी या सर्व प्रकरणाचे प्रतिसाद कसे उठतील याचाही आपण विचार केला पाहिजे, विशेषत: पत्रकार या प्रकरणाला काय रंग देतील याचा विचार काही पावले उचलण्यापूर्वीच केला पाहिजे.
"पत्रकारांच्या भितीने गप्प बसून कसे चालेल. तसं झाले तर माझ्या नावावर लाच गोळा करणारा मोकळाच राहील आणि या खुर्चीवर बसणारा सर्वात मूर्ख माणूस मीच ठरेन"
"नाही तरीपण आता विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. खास करून आपल्या खात्यातले तुमचे विरोधक याचा नक्कीच फायदा उठवतील. या सर्व प्रकरणामागे तुम्ही आहात ही चुकीची असलेली माहितीच सत्य आहे असे ते सहजपणे पसरवतील . तुमच्यावर लांच मागण्याचा आरोप जर या प्रकरणामध्ये झाला तर माझ्यासारखे तुमचे हितचिंतक देखील फारशी मदत करू शकणार नाहीत". खान ने परिस्थितीचे भान करून दिले.
पण तीस वर्षांहून अधिक काळ मी प्रामाणिकपणे काम करीत आहे लोक माझ्यावर नक्कीच विश्वास....
त्यांचे बोलणे मध्येच थांबवत खान म्हणाले,"लोक ज्यावर त्यांची विश्वास ठेवण्याची इच्छा आहे त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि सर्वात महत्वाचे तुम्ही मलिकला खटला भरून त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय तुरुंगात डांबून ठेऊ शकत नाही. ".
"ठीक आहे पण त्या गुन्हेगारावर कोण विश्वास ठेवेल?"
"कोर्टाच्या आवारात प्रथम 'आग असल्याशिवाय धूर निघत नाही' अशी कुजबूज सरू होईल, मलिक च्या वकिलाला तुमची केस म्हणजे त्याच्या कारकीर्दीत मानाचा तुरा खोवणारी पर्वणी असेल त्यामुळे त्याच्या एक एक प्रश्नामुळे दुस-या दिवशीच्या वर्तमानपत्रांसाठी नवी हेडलाईन असेल."
आपल्या सहका-याच्या हा युक्तिवाद नरेश कुमार केबिन मध्ये अस्वस्थपणे फे-या मारत ऐकत होते. यावेळी त्यांनी काहीही प्रतिक्रीया दिली नाही.
"कल्पना करून पहा, या ऊलटतपासणीच्या बातम्या कशा प्रसिध्द होतील? 'मित्राची फाईल नष्ट करण्यासाठी कमिशनरांनी घेतली लाच." मुंबई टाईम्स सारख्या दर्जा संभाळणा-या वर्तमानपत्रात असा मथळा असेल पण सनसनाटीच्या च्या शोधात असणा-या दुय्यम दर्जाच्या वर्तमानपत्रात तुमची यथेच्छ नामुष्की करणारा मजकूर छापून येईल".
अनिस खान यांच्या बिनतोड युक्तिवादानंतर नरेश कुमार यांनी सरळ प्रश्न केला "ठीक आहे माझ्या लक्षात सर्व परिस्थती आली आहे पण आता करायचं काय?"
"जे आपण नेहमीच करीत आलेलो आहोत, कायदेशीर मार्गाने काटा काढायचा".
"मलिक तू काय गोंधळ घातला आहेस, कमिशनर साहेबांनी तुला ताबडतोब भेटायला बोलवलं आहे." फोन खाली ठेवायच्याही आधी सुपरवायझर किंचाळला.
मलिकचेही धाबे दणाणले, "कशासाठी बोलावले आहे काही सांगीतले का?"
"नाही त्यांना असें सांगायची सवय नाही आणि हो लगेच जा त्यांना वाट पहात ठेवलेलं आवडत नाही"
त्यांना हो म्हणून तो लगेचच निघाला खरा पण डोक्यात विचारचक्र सुरु झाले होते. आपला ताजा पराक्रम त्यांना कळला असेल काय? नक्की काय झाले असेल, काय पुरावा त्यांच्या हातात असेल? थोडावेळ एका जागी उभे राहून आपल्या समोर काय पर्याय आहेत याचा विचार तो करू लागला. पोलिस मुख्यालयात जाण्याऎवजी सरळ पळून जावे का? पण या पर्यायात फारसा दम नव्हता काही दिवसच काय काही तासांतच ते पकडून नेतील.
मुंबईच्या गर्दीत धक्के खात, द्विधा मन:स्थतीत तो पोलिस मुख्यालयाच्या दिशेने चालत होता खरा पण विचारचक्र थांबत नव्हते. तुरुंगातील वास्तव्यात शिकलेला सोनेरी नियम त्याला आठवला. सर्व प्रकार सरळ सरळ नाकारायचा. कानावर हात ठेवायचे. आपला त्या प्रकाराशी काहीच संबंध नाही असाच पवित्रा घ्यायचा.
पोलीस मुख्यालयाची इमारत आता त्याला दिसत होती. काय करावे हे त्याला कळत नव्हते. शेवटी जे होईल ते होईल असा निर्धार करून तो इमारतीमध्ये शिरला. तिथल्या नोंदणी करणा-याला काही सांगण्यापूर्वीच तो अधिकारी स्वत:च म्हणाला "जा कमिशनर तुमची वाट पहात आहेत, चौदाव्या मजल्यावर पोहोचून त्यांच्या ऑफिसच्या दरवाजाबाहेर पोहोचतांच कमिशनर साहेबांच्या सचिवाचा आवाज कानावर पडला. त्याच्या ही आवाजात आज पोलिसी खाक्याची झाक जाणवत होती. 'साहेब तुझी वाटच पहात आहेत जा थांबू नकोस, लगेच आत जा.'
त्याला पाहतांच हातातील फाईल खाली ठेवत ते म्हणाले, 'बस मलिक, एक मिनिट असाच शांततेत गेला. कमिशनर साहेब आपल्या टेबलवरील कागदपत्र चालत होते. शेवटी त्यांनी एक कागद उचलला "मलिक माझ्यासमोर तुझ्या कामाचा वार्षिक अहवाल आहे. मलिकला आता घाम फुटला होता. तुझ्या सुपरवायझरने तुझे फारच कौतुक केले आहे. अतिशय उपयोगी माणुस असे त्याचे म्हणणे आहे. एक वर्षापूर्वी तू असाच या खुर्चीवर बसला होतास त्यावेळी तू इतकी चांगली कामगीरी करशील याची मलाही कल्पना नव्हती. तुझ्या सुपरवायझरचा आग्रह आहे की तुझ्यावर अधिक महत्वाची जबाबदारी सोपवली पाहिजे. तू त्यासाठी लायक आहेस.
धन्यवाद, सर गेल्या दोन तासांत पहिल्यांदाच त्याच्या चेह-यावर हसू आले होते आणि तणाव कमी झाला होता.
"एक जागा रिकामी आहे आहे- शासकीय शवविच्छेदनगृहात (Morgue )सहाय्यकाची-" कमिशनर साहेब हसून म्हणाले. आपल्या समोरील कागदांमधून एक कागद उचलून ते म्हणाले, "तुला फार अवघड काम करावे लागणार नाही. बस, शव विच्छेदानाचे काम झाले की लगेच रक्ताने माखलेले टेबल, उपकरणे, फरशी साफ करायची एवढेच काम आहे. हां, तेथे सुरुवातीला दुर्गंधामुळे काही दिवस तुला अवघड वाटेल वाटेल पण हळू हळू सवय होऊन जाईल. ही सहाय्यक सुपरवायझर च्या दर्जाची नेमणूक आहे. त्यामुळे पगारवाढ्ही होईल, त्याबरोबर काही सुविधाही मिळतील, तुला रहायला दोन खोल्यांचे घर मिळेल; तेही तुझ्या कामाच्या जागेजवळ खरंतर शवविच्छेदनगृहाच्या वरच्याच मजल्यावर.. तेथे तुला त्रास द्यायला आजूबाजूला कोणीही नाही. वाय.एम.सी.ए. ला जाण्या येण्याची गरज आता तुला पडणार नाही. तुझा साठावा वाढदिवस साजरा होईपर्यंत आता तुला तेथेच रहायचे आहे. शिवाय नंतर थोडीफार पेन्शनही मिळेल". हातातील कागद खाली ठेवत त्यांनी विचारले "काही शंका?"
"नाही, या शिवाय दुसरा पर्याय नाही का?"
"आहे ना", आवाजातला मवाळपणा एकदम नाहीसा होऊन कठोरपणे ते म्हणाले, "उरलेले सारे आयुष्य तुरुंगात घालवायला आवडेल?"
-समाप्त
प्रतिक्रिया
13 Jun 2013 - 8:34 pm | पैसा
एकदम नाट्यपूर्ण कथा आहे. परत प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद!
15 Jun 2013 - 4:46 pm | सस्नेह
नाट्यमय कथानक अन खिळवून ठेवणारी शैली.
धन्यवाद .
22 Jun 2013 - 5:20 pm | आतिवास
+१. अनुवाद आवडला.