कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
30 May 2013 - 12:54 pm

जेफ्री आर्चरच्या 'कमिशनर' कथेचा स्वैर अनुवाद....

"कशासाठी तो माझ्या भेटीची वेळ मागतो आहे?" कमिशनर साहेबांनी विचारले.
"तो म्हणत होता काही खासगी काम आहे"
"त्याला तुरुंगाबाहेर येऊन किती दिवस झाले?" कमिशनर साहेबांनी पुन्हा विचारले.
"दीड महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटला आहे." राज मलिक ची फाईल पाहत सचिवाने उत्तर दिले.
कमिशनर नरेश कुमार आपल्या खुर्ची वरून उठले आणि काहीतरी विचार करीत आपल्या खोलीत येरझारा घालू लागले. एखाद्या गहन विचारात असले म्हणजे त्यांच्या कडून ही कृती अगदी अभावितपणे होत असे. अशा फे-या मारल्यामुळे तेवढाच थोडाफार व्यायामही होतो अशी मनाची समजूत ते नेहमीच करून घेत असत. कधीकाळी दुपारी ते हॉकी खेळत असत, त्याच संध्याकाळी स्क्वाश चे तीन गेम खेळत असत आणि चालण्याचा व्यायाम करीत पोलीस मुख्यालयात परत येत असत. पण आता ते दिवस भूतकाळात जमा झाले होते. डोक्यावर पांढरे केस आणि कमरेवर चरबी वाढू लागली होती. 'एकदा का मी सेवानिवृत्त झालो की माझाकडे भरपूर वेळ असेल तेव्हा हे सर्व पुन्हा सुरु करणार आहे' असे त्यांनी त्यांच्या खालोखाल अधिकार असलेल्या अनिस खानला अनेकदा बोलून दाखवले होते. मात्र हे तसे खरोखरच करतील यावर त्या दोघांचाही विश्वास नव्हता. फे-या मारता मारता ते आपल्या चौदाव्या मजल्यावरील केबिनच्या खिडकीतून बाहेर पाहू लागले. मुंबईच्या गर्दीने फुललेल्या रस्त्यावर जगातले सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब लोक आपापल्या कामात व्यस्त होते. त्यांच्यामध्ये भिकारीही होते आणि कोट्याधिशही होते. या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस कमिशनर या नात्याने त्यांच्यावर होती.'आपले काम उकळत्या पाण्याच्या किटलीवरचे झाकण निघू द्यायचे नाही एवढेच आहे हा त्यांच्या आधीच्या कमिशनरांनी अनुभवातून दिलेला सल्ला नरेशकुमार विसरले नव्हते. त्यांचे संपूर्ण आयुष्य पोलीस खात्यातच गेले होते. त्यांचे वडीलही पोलीसखात्यातच असल्यामुळे लहापणापासुन या खात्यातील लोकांना काम करतांना पाहत आले होते. या नोकरीत रोज येणारे अनपेक्षीत अनुभव त्यांना फारच आवडायचे. दिवस सुरु होतांना आज काय समोर वाढून ठेवले आहे याची काहीच कल्पना नसतांना अचानक येणारे अनुभव बरंच काही शिकवून जातात असं ते नेहमीच म्हणायचे. आजचाही दिवस काही वेगळा नसावा असा विचार ते करीत होते तेवढयात अनिस खान त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांच्याबरोबर, काही ठिकाणी जप्त केलेली विनापरवाना शस्त्रे, ड्रग माफियांच्या कारवाया, दहशतवाद्यांविरुद्ध लढाई या सर्व आजच्या पोलिसांच्या जीवनाचा भाग झालेल्या कामांच्या चर्चेत व्यस्त झाले. या कामात पुन्हा एकदा राज मलिकच्या विचाराने डोकं वर काढलं. या माणसाला नरेश कुमारांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत तीन वेळा तुरुंगाची हवा खायला पाठवले होते. 'पण या जुन्या गुन्हेगाराला आज माझी भेट कशासाठी हवी आहे?' हा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला होता. याच उत्सुकतेपोटी त्यांनी आपल्या सचिवाला "ठीक आहे त्याला पंधरा मिनिटे दे आज आणि हो त्याला आधीच बजाऊन सांग मी आज फारच व्यस्त आहे जे काय आहे ते तेवढ्या वेळेत उरकून टाक".
त्यानंतर सोमवार सकाळच्या एका मागून एक येणा-या कामांमध्ये राज मलिक प्रकरण ते विसरूनच गेले होते. परंतु त्याला दिलेल्या भेटीच्या वेळेआधी त्यांच्या सचिवाने राज मलिकची फाईल टेबलावर ठेवली. एवढ्या कामात खरे तर त्याला भेटण्यात आता त्यांना रस राहीला नव्हता. म्हणुनच त्यांनी सचिवाला सूचना दिली 'तो एक मिनिट जरी उशीरा आला तर त्याला दिलेली वेळ रद्द कर'
'तो तर केव्हाचा आला आहे; आपण त्याला आंत कधी बोलावता याची वाट पाहात बाहेर थांबला आहे'
आता काहीच उपाय नसल्याने त्यांनी पुढे झुकून टेबलावरील फाईल उचलली राज मलिकचे गुन्हेगारी कारनामे वाचू लागले. एकंदरीतच त्याच्या फाईल मधील ब-याच घटना त्यांना माहित होत्या त्यांच्या पोलीस अधिकारी म्हणून अगदी सुरुवातीच्या दिवसात नरेशकुमारांनी त्याला पहिल्यांदा गजाआड केले होते, दुस-यावेंळी ते असि. कमिशनर बनले तेव्हा पुन्हा एकदा राज मलिक त्यांच्या तावडीत सापडला होता.
मलिक एक सभ्य दिसणारा गुन्हेगार होता. खरंतर एखादी चांगली नोकरी करण्याची पात्रता त्याच्याकडे होती. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर तो चटकन छाप पाडत असे, विशेषत: श्रीमंत आणि एकट्या राहणा-या उतारवयाकडे झुकणा-या स्त्रीया हे त्याचे सहज साध्य सावज असत.
त्याचा पहिला गुन्हा मुंबईसाठी नवा प्रकार नव्हता. त्यासाठी राजला गरज होती ती, एका विश्वासू छापखान्याची, काही लेटरहेडची आणि श्रीमंत विधवा स्त्रीयांच्या यादीची. 'मुंबई टाईम्स' मधल्या श्रद्धांजली विभागात एखादी 'योग्य' जाहिरात दिसतांच काम सुरु होत असे. तो अस्तित्वातच नसलेल्या विदेशी कंपन्यांचे शेअर विकण्यात निष्णात होता. या 'धंद्यातून' त्याला बराच काळ नियमीत उत्पन्न मिळत राहिले. परंतु असेच एकदा एका अट्टल गुन्हेगा-याच विधवेला फसवतांना पकडला गेला. खटला भरला गेल्यावर राज मलिकने अशा प्रकारे लाखों रुपये जमवल्याचे कबूल केले. मात्र नरेशकुमारांची खात्री होती की त्याने कबूल केलेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक संपत्ती जमा केली आहे. अशा कितीतरी महिला होत्या ज्या त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर प्रभावीत होऊन फसल्या गेल्या होत्या पण बदनामीच्या भीतीपोटी त्या तक्रार करायला पुढे येत नव्हत्या. त्या खटल्यात राज मलिकला पांच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली. त्याला पुण्याच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आणि नरेशकुमारांशी पुढील दहा - बारा वर्षे त्याचा काही संबंध आला नाही.
त्यानंतर पुन्हा एकदा 'एका दलदलीच्या जागेत उंच इमारत उभी राहणार आहे' असे भासवून त्या इमारतीमधल्या सदनिका विकण्याच्या गुन्ह्यात त्याला नरेश कुमारांनीच अटक केली. यावेळी राज सांत वर्षांसाठी खडी फोडायला गेला. आणि मध्ये पुन्हा दहा बारा वर्षे निघून गेली.
तिसर्यांदा राज आणखी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पकडला गेला. यावेळी त्याने विमा एजंट बनून लाखो रुपये जमवले मात्र कोणाचीच विमा पॉलिसी कंपनी पर्यंत पोहोचलीच नाही पकडला गेल्यानंतर त्याच्या वकिलांनी कबूल केले की राजाने एक कोटींच्या आसपास रुपये लोकांकडून घेतले होते मात्र त्यापैकी फारच थोड्या जिवंत लोकांच्या अगदीच किरकोळ रकमा राज परत करू शकला. यावेळी न्यायाधिशांनी त्याला बारा वर्षांसाठी तुरुंगाची हवा खायला पाठवले.
राज मलिकच्या फाईलमधल्या शेवटच्या पानावर पोहोचेपर्यंत कमिशनर नरेश कुमार पुन्हा एकदा कोड्यात पडले होते की या माणसाचे माझ्याकडे काय काम असेल?
केबिनचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतांच कमिशनर साहेबांनी वर पाहिले. आत येणा-या माणसामध्ये ओळखीच्या खुणा शोधू लागले. फाईल मध्ये वर्णन केलेली व्यक्ती आणि आता समोर असणारी व्यक्ती यांत काहीच ताळमेळ नव्हता. तो आहे त्यापेक्षा दहा बारा वर्षे म्हातारा दिसत होता. मुळचे आकर्षक व्यक्तिमत्व लोप पावून पाठीत पोक आलेला, सुरुकुतलेलेल्या कातडीचा दुबळा, दीनवाणा मनुष्य त्यांच्यापुढे उभा होता. आर्ध्याहून अधिक आयुष्य तुरुंगात काढल्यामुळे त्याची रयाच गेली होती. त्याने पांढ-या रंगाचा शर्ट घातला होता तो खांद्यापासून खाली ओघळत होता. त्याने घातलेली पँट कधीकाळी त्याच्या मापाची असावी असे वाटत होते. कमिशनर साहेबांनी तीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा अटक केलेला राज मलिक आता पूर्वीचा राहिला नव्हता. त्या राज मलिककडे सर्वच प्रश्नांची उत्तरे तयार असायची.
"तुमच्या एवढ्या कामाच्या गडबडीत माझ्यासाठी वेळ दिल्याबद्दल आभार" कसेनुसं हसत तो म्हणाला, त्याच्या आवाजातही कंप जाणवत होता.
कमिशनर साहेबांनी हसून मान हलवली आणि आपल्या समोरील खुर्चीवर बसायची खुण करीतच ते म्हणाले, "मलिक, माझ्यासमोर सकाळपासूनच कामाचा ढिगारा पडला आहे, मी खरचं फारच गडबडीत आहे, तुला जे काही सांगायचं आहे ते सरळ काहीही प्रस्तावना करत न बसता पटकन सांगून टाक".
"हो, हो, नक्कीच", खुर्चीत बसण्यापूर्वीच तो सरळ मुद्याचं बोलला, "मी सध्या नोकरीच्या शोधात आहे"
आपल्या उण्यापु-या तीस वर्षांच्या पोलिसी अनुभवातुंन मलिक कशासाठी भेटत असावा याचा मनाशीच अंदाज बांधताना कमिशनर साहेबांनी अनेक शक्यता गृहित धरल्या होत्या. पण त्यामध्ये तो आपल्याकडे नोकरी मागायला येईल ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नव्हती.
"माझे म्हणणं हसण्यावारी उडवून लावण्यापूर्वी मला काय म्हणायचं आहे हे एकदा ऐकून घ्या" तो अगदी तळमळीने म्हणाला.
त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी नरेशकुमार खुर्चीवर मागे रेलून बसले.
"माझ्या आयुष्याचा बराचसा काळ मी तुरुंगातच काढला आहे. मी नुकतीच पन्नाशी ओलांडली आहे, आणि माझ्यावर पुन्हा तुरूंगात जाण्याची वेळ येऊ नये एव्हढीच इच्छा उरली आहे आहे". कमिशनर साहेबांनी मान हलवून त्याचे म्हणणे ऐकत असल्याची खूण केली त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे मात्र त्यांनी टाळले. गेल्या आठवड्यात मुंबई टाईम्स मध्ये 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृतांत आला आहे त्यात तुम्ही केलेल्या भाषणाचा भाग मी उत्सुकतेने वाचला. त्यामध्ये तुम्ही शहरातील प्रमुख उद्योजकांना केलेली सूचना वाचून मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुरुंगवास भोगून आलेल्या कैद्याला सामान्य जीवन जगण्याचा हक्क आहे. त्याला प्रामाणिकपणे जगण्याची दुसरी संधी मिळणे आवश्यक आहे. उद्योजकांनी अशा व्यक्तींना जर नोकरी दिली तर ते निश्चितच जगण्याचा सोपा मार्ग निवडतील आणि गुन्हेगारी जगताला राम राम करतील. तुमच्या या विचाराने प्रभावीत होऊन मी येथे आलो आहे. त्याला मध्येच थांबवत कमिशनर साहेब म्हणाले " हो पण मी तेथे हेही म्हणालो आहे की ही सूचना फक्त पहिल्यांदा तुरुंगात जाऊन येणा-या व्यक्तींसाठी करीत आहे". "माझेही हेच म्हणणे आहे, मलिक आपली बाजू लावून धरत म्हणाला, "तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकदांच तुरुंगात जाऊन येणा-यांसाठी जर इतकी बिकट परिस्थिती असेल तर माझ्यासारख्याचे नोकरी शोधतांना काय हाल होतील?" थोडावेळ थांबून आवंढा गिळत त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. "तुम्ही केवळ टाळ्या मिळवणारे बोलले नसाल, जर खरोखरच गंभीरपणे विचार मांडले असतील तर मग स्वत:च एक पाउल पुढे येऊन समाजासाठी उदाहरण का घालून देत नाही?" ठीक आहे, तुझा काय विचार आहे? पोलीस कर्मचा-यांसाठी आवश्यक पात्रता तुझ्याकडे नाही हे तर तुला माहित असेलच". कमिशनर साहेबांनी आपला पवित्रा बदलला. त्यांच्या बोलण्यातल्या उपरोधाकडे दुर्लक्ष करीत तो म्हणाला, "तुमचे भाषण ज्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे त्याच अंकात तुमच्या खात्यात एका 'रेकॉर्ड विभागात फाईलिंग कारकूनाची' जागा भरण्याविषयी जाहिरात आली आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात मी याच शहरात पी & ओ शिपिंग कंपनीत एक कारकून म्हणूनच केली होती. मला खात्री आहे जर तुम्ही त्या कंपनीत चौकशी केलीत तर ती नोकरी पूर्ण कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे केली होती. तेथे जोपर्यंत होतो एकही बेकायदेशीर काम माझ्याकडून झाले नव्हते". "ते ठीक आहे पण ही झाली तीस वर्षांपूर्वीची गोष्ट". हा युक्तिवाद करण्यासाठी कमिशनर साहेबांना समोरची फाईल पाहण्याचीही गरज नव्हती. "तरीही मला वाटतं ज्या कामापासून माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली त्याच कामात शेवट करावा, एक फाईलिंग कारकून."
कमिशनर साहेब थोडा वेळ गप्प बसून मलिकच्या प्रस्तावावर विचार करीत राहीले. मग ते म्हणाले, "ठीक आहे तू म्हणतो त्याबत काही विचार करून नंतर मी तुला कळवतो, जातांना तुझ्याशी संपर्क कसा साधायचा याची माहिती माझ्या सचिवाकडे देऊन जा".
हो साहेब, तसा मी रोज रात्री मुक्कामासाठी व्हिक्टोरीया रस्त्यावरील वाय. एम. सी. ए. होस्टेलवर असतो. एवढ्यात दुसरीकडे कोठेही जाण्याचा माझा विचार नाही.
दुपारच्या जेवणाच्या वेळी, त्यांनी अनिस खान यांच्याबरोबर बोलतांना हा विषय काढला. "मलिकने तुम्हाला बरोब्बर तुमच्याच शब्दात पकडले, सर." खान हसत म्हणाले. "हो आहे खरं तसं, पण पुढच्या वर्षी तू जेव्हा माझ्या जागी असशील आणि या कामाचे जाहीर कौतुक होईल त्यावेळी तुला हा सर्व घटनाक्रम नक्कीच आठवेल." त्यांनीही हसून प्रत्युत्तर दिले.
"म्हणजे तुम्ही त्या माणसाला पोलीसदलात नोकरीवर घेण्याचा खरोखर विचार करीत आहात?" आपल्या वरिष्ठ अधिका-याकडे आश्चर्याने पहात खान म्हणाले.
"बहुतेक हो, पण मला सांग तुझा या कल्पनेला का विरोध आहे?"
"सर मला तुमच्या बद्दल काळजी वाटते. तुमच्या सेवानिवृत्तिला जेमतेम एक वर्ष राहिलं आहे. आजपर्यंत एक स्वच्छ प्रतिमेचा, धाडसी अधिकारी असा लौकीक असतांना मलिक सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसासाठी आपली प्रतिमा बिघडवण्याचा अनावश्यक धोका कशाला घ्यायचा असा माझा साधा सरळ विचार आहे."
"मला वाटतं खान तू जास्तच हळवा झाला आहेस", कमिशनर साहेब म्हणाले, "मलिक एक परिस्थितीपुढे पराभूत झालेला दुबळा माणुस आहे. आज सकाळी माझ्याबरोबर तो असतांना तू पहायल हवं होतं, त्याची काय अवस्था झाली आहे".
"एकदा का माणुस गुन्हेगार झाला की तो कायमचा गुन्हेगारच असतो म्हणूनच मला पुन्हा एकदा वाटतं कशाला धोका पत्करायचा? " खान ठाम पणे म्हणाले.
"कारण संधी दिली तर माणुस सुधारणा करू शकतो, हे माझं नेहमीचं मत आहे आज जर मी मलिकला संधी नाकारली तर माझे विचार लोकांनी गांभिर्याने का ऐकावेत?मी ही इतरांसारखाच फक्त भाषणबाजी करणारा असे त्यांना का वाटू नये?"
"पण सर, फाईलिंग कारकुनाचे काम ब-यापैकी संवेदनाशील आहे. अनेक महत्वपूर्ण आणि गोपनीय स्वरूपाची कागदपत्रे त्याच्याकडे फाईलिंगसाठी येतात, ज्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल जराही शंका घ्यायला जागा असू नये अशाच माणसाला असे महत्वाचे कागदपत्र हाताळण्याची परवानगी आपण देतो."
"खान त्याचा विचार मी केला आहे, तुला तर माहितीच आहे की आपल्याकडे दोन फाईलिंग विभाग आहेत एक येथे आपल्या मुख्यालयात ज्याठिकाणी तू म्हणतोस त्याप्रमाणे संवेदनशील माहिती जमा होते. पण आपला दुसरा फाईलिंग विभाग शहराच्या दुस-या भागात आहे. त्यामध्ये एक तर तपास पूर्ण झालेल्या किंवा तपास बंद झालेल्या फाईल असतांत. ती जागा फारशी धोकादायक नाही असं मला वाटतं."
"तरीही ही नस्ती ब्याद गळ्यात बांधून घेऊ नये असंच मला वाटतं, सर" खान अजूनही आपल्या म्हणण्यावर ठाम होते.
आपले जेवण पूर्ण करीत कमिशनर साहेब म्हणाले, मी धोका अजून कमी केला आहे, मलिकला एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर कामावर घ्यायचं त्याच्यावर एक सुपरवायझर बारकाईने लक्ष ठेऊन असेल. तो संपूर्ण अहवाल मला देत राहील, मलिकने चलाखी करण्याचा थोडा जरी प्रयत्न करू लागला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवायला आपण मोकळे आहोतच."
"तरीही मला हे नसतं झंझंट वाटतं आहे".

पुढच्याच महिन्यात एक तारखेला राज मलिक शहराच्या दुस-या भागात असलेल्या पोलीस कार्यालात दाखल झाला. त्याला आठवड्यातून सहा दिवस सकाळी आठ ते सायंकाळी सहा अशी कामाची वेळ आणि महिना ४००० पगार ही व्यवस्था करून देण्यात आली होती. त्याला क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तेथे बंद करण्यात आलेल्या अथवा तपास पूर्ण झालेल्या फाईल गोळा करून दुपारपर्यंत सुपरवायझरच्या ताब्यात देत असे. सुपरवायझर मग त्यांच्यावर आवश्यक नोंदी करून ठरलेल्या कार्यपध्दती प्रमाणे तळघरात असलेल्या कपाटांत ठेवत असे. या फाईलिंची क्वचितच पुन्हा गरज पडत असे.
पहिला महिना संपतांच सुपरवायझरने ठरल्याप्रमाणे कमिशनर साहेबांना मलिकच्या कामाबाबत अहवाल पाठवला. 'मला अजून डझनभर मलिक मिळाले तर या विभागाचा चेहरा बदलता येईल. आज कालच्या तरुणांसारखा उशिरा कामावर येऊन लवकर घरी पळण्याची घाई करीत नाही, त्याच्या वर जबाबदारी नसलेले एखादे काम करायला सांगीतले तर अगदी विनातक्रार करतो, तुमची परवानगी असेल तर पुढील महिन्यापासून त्याचा पगार चार हजारावरून पांच हजार करावा असा माझा विचार आहे.
पुढील महिन्याचा अहवाल आणखी उत्साहवर्धक होता. गेल्या आठवड्यात माझा एक कामगार आजारपणामुळे सुट्टीवर होता. मलिकने स्वत:चे काम संभाळून आजारी कामगाराचे बरेचसे काम स्वखुशीने संभाळले. तिस-या महिन्याचा मलिकच्या कामाचा अहवाल पाहून कमिशनर साहेब आणखी खुश झाले. त्या दिवशी त्यांनी रोटरी क्लबच्या वार्षिक स्नेहभोजनात केलेल्या भाषणात मलिकच्या प्रकरणाचा अभिमानाने उल्लेख केला. इतरांना देत असलेला सल्ला मी स्वत: पाळतो. गुन्हेगारांना सुधारण्याची एक संधी दिली तर ते सुधारू शकतात हा आपला जुना सिध्दांत त्यांनी लोकांपुढे मांडून तो कशा प्रकारे यशस्वी झाला हे मलिकचे उदारहण देऊन पटून दिला.
दुस-या दिवशी 'मुंबई टाईम्स'ने 'कमिशनरांनी घालून दिलेला धडा' या शीर्षकाखाली मलिकच्या प्रकरणाला मोठी प्रसिध्दी दिली. मलिकच्या पूर्व ईतिहासाची माहिती, त्याचा फोटो, कमिशनर साहेबांनी केलेली मदत या सर्वच गोष्टींची गौरवपूर्ण दाखल मुंबईच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतली. या लेखाचे कात्रण त्यांनी आवर्जून अनिस खान यांच्याकडे पाठवले.

-क्रमशः

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

30 May 2013 - 2:03 pm | सस्नेह

स्वैर अनुवाद चांगला जमला आहे. मिपावर रहस्यकथांच्या कमी असलेल्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर कथा आवर्जून वाचली अन भावली.
पुढील भागाची उत्कंठापूर्ण प्रतिक्षा.
(रहस्यकथा आवडणारी) -स्नेहांकिता

आदूबाळ's picture

30 May 2013 - 2:04 pm | आदूबाळ

वा वा! पुभाप्र!

लॉरी टांगटूंगकर's picture

30 May 2013 - 2:17 pm | लॉरी टांगटूंगकर

आवडतोय, लिहीत राहा

छान झालाय हा भाग. पुभाप्र. :)

पिलीयन रायडर's picture

30 May 2013 - 4:14 pm | पिलीयन रायडर

मस्त झालाय..
पण ते पुढचा भाग चटकन टाकायचं पहा हो...

अजो's picture

30 May 2013 - 6:10 pm | अजो

अरे वा मस्त.
जेफ्फेरी आर्चर चे २-३ पुस्तक वाचली आहेत. केन एंड एबेल आवाडाले आहे. मराठीत त्यांचे हे लिखाण वाचून मजा आली. हे मला वाटते cat ' O nine Tales मधील आहे.
हा भाग इंटरेस्टिंग. पुभाप्र

लाल टोपी's picture

30 May 2013 - 10:04 pm | लाल टोपी

बरोबर आहे त्याच कथासंग्रहातील आहे.

अमोल खरे's picture

30 May 2013 - 6:13 pm | अमोल खरे

हा मलिक काहीतरी झोल करणारच. रामदास काकांच्या अनेक कथा वाचल्या आहेत. उत्सुकता खुप वाढली आहे. पुढील भाग लवकर टाका.

भटक्य आणि उनाड's picture

30 May 2013 - 6:25 pm | भटक्य आणि उनाड

पुढील भाग लवकर टाका....मस्त चालु आहे..

काय बेत असेल या मलिकचा? खुद्द अार्चरप्रमाणेच गुन्ह्यांची पुनरावृत्ती?

अनुवाद छान जमलाय.
येऊद्या लवकर.

प्यारे१'s picture

30 May 2013 - 8:21 pm | प्यारे१

वाचतोय.

श्रीरंग_जोशी's picture

30 May 2013 - 8:22 pm | श्रीरंग_जोशी

पहिला भाग आवडला. पु. भा. प्र.

मी-सौरभ's picture

1 Jun 2013 - 1:00 pm | मी-सौरभ

सहमत आहे