आज पहाटे मी दचकून जागी झाले. तशी माझी झोप सावधच असते पण आज काहीतरी विचीत्रच झालं.
माझ्या गालावर कुणीतरी हलकेच हात फिरवतंय असं आधी वाटलं.
मग झोपेतच ओळखीचा सुगंध आल्यासारखं वाटलं.
बर्याच वर्षांनी असं काहीतरी झालं पण गालावर पिस फिरवणारा स्पर्श हळूहळू सगळ्या चेहेर्यावरच फिरायला लागला आणि मी दचकून ..दचकून कसली जवळजवळ किंचाळतच उठले.
डोळे उघडले तर काय ह्यांचाच चेहेरा समोर .
मी म्हटलं "काय हो हे !!! घाबरवून टाकलंत मला"
आणि काही काळवेळ .."
असं म्हटल्यावर ह्यांचा चेहेरा आणखीच ओशाळगत झाला.
"अगं मी उठवणार नव्हतो तुला पण अगदी नाईलाजच झाला."
बेडरुमच्या निळ्या अंधारात मला नक्की काही कळेना.
"अहो चक्क गालावरून हात फिरवताय आणि ...
मग माझं लक्ष ह्यांच्या हाताकडे गेलं .
मी उठले बाई पटकन आणि दिवे लावले.
ह्यांचे हात ओलसर दिसत होते .
"काय हो हे हातावर "?
"अगं आजपासून मी सकाळी फिरायला जाणार होतो ना .बाहेर बर्यापैकी थंडी असेल म्हणून म्हटलं जरा तुझं क्रीम लावू या "
"बरं मग" ?
"अगं थोडं हातावर घ्यावं म्हटलं तर बाहेरच येईना"
- मग ?
मग काही नाही अंधारात ट्युब जरा जास्तच पिळली तर फस्कन तळाहातापासून कोपरापर्यंत उडलं ".
"आता एव्हढं महागडं क्रीम वाया का घालवा म्हणून तुझ्या चेहेर्यावर लावत होतो तर ....
आता हळूहळू मी वर्तमानात आले.
गेले साताठ दिवस हा सकाळी फिरायला जाण्याचा कार्यक्रम अमलात आणण्याची तयारी चालाली होती.
सुरुवातीला मी पण सोबत यावं म्हणून आग्रह चालला होता.
मग काल रात्री मला म्हणाले "तर मग तू येणार नाहीस ना सकाळी "
मी नाही म्हटल्यावर " मी एकटाच जाईन ची " घोषणा करून हे झोपले .
अगदी झोप लागता लागता माझ्या लक्षात आलं की मला सोबत न्यायचा प्लान नव्हताच पण मी अगदी माझ्या तोंडानी नाही म्हणेपर्यंत आग्रह चालला होता .
आपल्याला हवे ते दुसर्याकडून वदवून घेण्याची ही ट्रीक तीस वर्षं जुनी आहे आणि सालाबाद प्रमाणे यंदाही मी फशी पडलेच.
पण हे कळेपर्यंत मेली झोपच लागली.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
..... नंतर हे कधी बाहेर पडले हे कळायच्या आतच मला पुन्हा एकदा झोप लागली ती अगदी मानसीने दारावर टकटक करून आणि आई उठताय ना ? असं चार वेळा विचारल्यावर जाग येईपर्यंत .
तो पर्यंत महाराज सकाळचा फेरफटका आटपून आलेले नव्हते.
अर्थात मला हे काही नविन नव्हतं .यांच्या उपक्रमाचं वेळापत्रक असंच असणार हे मला इतक्या वर्षाच्या संसारानंतर माहीती होतं .
शाळेच्या भूगोलाच्या बाईंनी शिकवलेलं ज्ञान संसारात वापरणारी गृहीणी बहुतेक मी एकटीच असेन.
बाईंनी वर्गात शिकवलेलं मला अजूनही लख्ख आठवतं. "समजा आज चंद्र साडेसहा वाजता उगवला तर दुसर्या दिवशी तो पसतीस मिण्टं उशीरा मग तिसर्या आणखी पसतीस मिण्टं उशीरा ....आणि पंधरा दिवसानी गायब म्हणजे उगवणारच नाही "ह्यांच्या उत्साहाचं अगदी अस्संच असतं .दर दिवशी थोडी थोडी घट होत शेवटी उपक्रम बंद करण्याच्या कारणांची यादी जाहीर होते आणि उपक्रम संपतो आणि दुसरा सुरु होतो.
आणि हे अगदी पुराव्यानिशी शाबीत करण्यासाठी कपाटात सगळी एक्झीबिट एक ते अनंत ज्ञानेश्वरी-जपाची माळ आणि काउंटर- शाखेचा गणवेश- एक दुर्बीण -चार कसलेतरी दगड -दहा बारा सिड्या - अॅमवेचं किट - शेरबाजाराची पुस्तकं मी जपून ठेवलीत.
हा विचार मनात येईस्तो श्वासाची मेली लय चुकलीच.
मला यांची काळजी वाटायला लागली .
आधी बिस्कीट जास्तच भिजलं आणि कपाच्या तळाशी गेलं मग चहाच सांडला.
बाबा म्हणतात ते अगदी खरंय लय हटी -दुर्घटना घटी.
तोपर्यंत माझ्याकडे मकरंद -मानसी -मुकुल एकाच वेळी बघतायत हे पण लक्षात आलं नव्हतं .झालं मग प्रश्नोत्तरं सुरु .
"आई बाबा कुठे गेलेत "? मकरंद
"कुणाबरोबर फिरायला जाणारेत सांगीतलंय का"? मानसी
"आबा एकटेच गेले ? म्हणून तू रागावलीस ? "मुकुल
आणि हे प्रश्न संपेस्तो मकरंदनी एक लांब श्वास घेऊन सोडला .
आज घरात सुंगध कसला येतोय ?
ह्यांनी पिळलेल्या ट्युबचा घमघमाट आता बाहेरपर्यंत आला होता.
मी बापडी सांगणार तरी काय ?
मग मुकुलच म्हणाला "हा आज्जीच्या क्रीमचा वास "
आता शहाण्या सुनेनी गप्प बसावं ना ?
पण नाही तिच्या डोक्यात चौकशीचं रक्त सळसळायला लागलं आणि त्यातला वाईट्ट प्रश्न म्हणजे "आई तुम्ही नाईट क्रीम सकाळी लावलंत का ? "
मग मुकुल म्हणाला " नाही काई .आज्जी बसली टुबवर आणि मग ....
खरं काय ते सांगणारंच होते तेव्हढ्यात महाराज आले .
अहाहा काय ध्यान. चित्पावन संघाच्या सभेत मिळालेला केशरी टी शर्ट -शाखेत घालून जायची हाफ पँट..आणि बहीणीनी चार वर्षापूर्वी अमेरीकेतून पाठवलेले स्पोर्ट शूज ...
आता यातली एकेक वस्तू म्हणजे यांचे एकेक उपक्रम ..
खाकी हाफ पॅट म्हणजे त्यातल्या त्यात नविनच .ती पण एक मोठी कथाच ...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मध्यंतरी कधीतरी एकदा सकाळी हे स्टेशनवर गेले होते. कुठलंतरी पथक काहीतरी मोहीम यशस्वी करून मुंबईत परत आलं होतं त्याच्या स्वागतासाठी.
ह्यांच्याच भाषेत सांगायचं तर संकीर्ण उद्योग.
पहाटे बाहेर पडले होते ते साडेसात आठला घरी परत आले. ह्यांचा चेहेरा वाचून मला कळलं की काहीतरी नविन संकीर्ण उद्योगाचा शोध लागला आहे
ह्यांचे संकीर्ण उद्योग म्हटले की माझ्या डोक्याचा तवा हलके हलके गरम व्हायला लागतो. काही दिवसानी मोहरी तडतडावी इतका गरम होतो पण आताशा या उद्योगांकडे मी अगदी तटस्थ नजरेनी बघते.
या उद्योगाचे खिळे स्क्रू बिजागर्या हळूहळू ढिल्या - मोकळ्या करत राहते.
मग संकीर्ण उद्योग कोसळला तरी मी बापडी नामानिराळी.
एकूण परीस्थितीचा अंदाज घेता चहा पिता पिता त्या उद्योगाची अधिकृत घोषणा कानावर पडणार आहे असा तर्क बांधला आणि अगदी तस्संच झालं.
"तुला माहीत्ये अंजू आज सकाळी येताना मी काय पाह्यलं ?"
मी श्वास छातीत पूर्ण भरून घेतला. बाबा टिव्हीवर सांगतात तसं माझं लक्ष कपाळाच्या मध्यभागी आणून म्हटलं
"अहो मला कसं कळणार काय ते तुम्हीच सांगा ."
श्वास सोडला आणि यांचं उत्तर ऐकण्यापूर्वी डब्ब्ल श्वास आत घेतला.
"अगं -पडवळनगर मध्ये सकाळची शाखा चालू आहे."
प्रकरण फारसं धोकादायक नसल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी फसक्न श्वास सोडला आणि म्हटलं
"अहो काहीतरी काय शाखा काय सकाळी उघडत नाही. बाळासाहेब गेले त्याच आठवड्यात सकाळी उघडल्या असतील "
आता यांचा चेहेरा जरा चमकायला लागला.
मला म्हणाले "अगं सेनेची शाखा नाही गं .शाखा म्हणजे राष्टीय स्वयंसेवक संघ."
आता माझ्या माहेरी सगळेच संघे.त्यामुळे मला काही फारसा धक्का बसला नाही पण हे शाखेत जाणार म्हणून जरा काळजी वाटायला लागली.
हे तिकडे गेले की चारपाच तरी माणसं शाखेत येण्याची बंद होतील याची मला खात्री होती.
फार वर्षांपूर्वी हे आमच्या कडे आले होते आणि यांची आणि माझ्या भावाची राजूची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल चर्चा चालू होती.
त्याचं बोलून झाल्यावर ह्यांनी समाजवादावर बोलायला सुरुवात केली.
नंतर संक्रांतीला गेले तेव्हा कळलं की राजू आता युक्रांदमध्ये गेलाय !!!! मी म्हटलं अहो हा सगळ्या तुमच्या चर्चेचा परीणाम.त्यावर हे म्हणाले मी कुठे युक्रांदचा सदस्य आहे. मला फक्त राजूच्या मनातला वैचारीक गोंधळ दूर करायचा होता म्हणून मी थोडीशी माहीती त्याला दिली.
थोडक्यात काय तर इतर संकीर्ण उद्योगाप्रमाणे हा खटाटोप थोड्याच दिवसात आटपेल हे कळल्यावर माझा श्वास आपोआप नॉर्मल !!! बाबा म्हणतात ते खरंय .श्वास म्हणजे जीवन .जसे जीवन तसा श्वास .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------त्या दिवशी बहुतेक मंगळवार होता.
शुक्रवारी खाकी हाफ प्यांटी आणि पांढर्या शर्टाचे कडक घडीबंद जोड घरात आले.
रात्री झोपण्यापूर्वी यांचे चिटोरी सर्वीस चालू होती.
घरातल्या सगळ्यांच्या हातात हे अधून मधून बारीक सारीक चिठ्ठ्या देत असतात.
म्हणजे माझा वाढदिवस असला तर माझ्या नकळत मकरंदच्या हातात एक चिटोरं :
'आईचा वाढदिवस २९ तारखेला आहे."
मी विचारलं "काय हो आज कुणासाठी "? हे म्हणाले "माझ्यासाठीच"
"म्हणजे काय ? "मी विचारलं
" रविवारी कित्येक वर्षांनी शाखेत जाणार आहे म्हणून तयारी करतो आहे."
असं म्हणत माझ्या हातात एक चिटोरं दिलं
त्यावर लिहीलं होतं " केशरी गुहे समीप मत्त हत्ती चालला."
मी म्हटलं अहो मोठ्यांच्या शाखेत काय हे गाणं म्हणतील का ?
त्याला उत्तर म्हणून दुसरं चिटोरं भारता जागा रहा
नविन संकीर्ण उद्योग जरा जडच जाणार हे माझ्या लक्षात आलं पण मी बापडी काय करणार होते ?
उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं अहो तुम्हाला काही आठवतंय का आता ?आणि लक्षात आलं की आपलं चुकलंच गड्या .
नंतर अर्धा तास सायं शाखा -प्रभात शाखा -प्रदोष शाखा आणि चर्म वेत्र -छुरीका -दंड ह्या विषयावर व्याख्यान.
मी चार जांभया दिल्यावर यांच्या डोक्यात प्रकाश पडला .दिवे मालवून माझ्या शेजारी पडले आणि माझ्या गळ्यात हात घालून विचारतात कसे ? " मला अजूनही क्रमीका एक -दोन -तीन सगळं काही येतं ?आणि बळेच माझा चेहेरा स्वतःकडे वळवून म्हणाले "मग " " काय विचार आहे ?"
मी म्हटलं
"काही नाही .संघ विकीऱ."
आणि पाठमोरी होतं झोपून गेले. जागरणाचा उत्साह माझ्यात काही शिल्लक नाही.
( क्रमशा )
प्रतिक्रिया
25 Apr 2013 - 11:32 am | नंदन
हे नुस्तं नाव वाचून. आता सावकाश घुटक्याघुटक्याने लेख वाचायचा.
25 Apr 2013 - 11:49 am | बॅटमॅन
+१११११११११११११.
असेच म्हणतो.
25 Apr 2013 - 11:53 am | सूड
+१
25 Apr 2013 - 11:43 am | निखिल देशपांडे
बर्र्र वाचतोय..
पुढे काय होतय ते बघुया. अर्थात पुढचा भाग आला तर.
25 Apr 2013 - 11:48 am | नंदन
मस्त! तुम्हीच मागे लिहिलेले निवासी आईचे स्वगत आठवले.
हा खास समर्थ टच!
25 Apr 2013 - 11:52 am | कवितानागेश
..वाचतेय. :)
25 Apr 2013 - 12:01 pm | पैसा
खासच! शेवटचं क्रमश: वाचून जीव भांड्यात पडला!
25 Apr 2013 - 12:03 pm | लाल टोपी
रामदास काकांची शैली...मस्तच
25 Apr 2013 - 12:10 pm | नन्दादीप
मस्त.....
25 Apr 2013 - 12:43 pm | श्रावण मोडक
दमदार सुरवात झाली आहे.
25 Apr 2013 - 12:47 pm | सस्नेह
मजेदार !
25 Apr 2013 - 1:34 pm | पिलीयन रायडर
तुम्ही खरंच "समर्थ" आहात!!!
25 Apr 2013 - 1:41 pm | मन१
ज्यासाठी मुद्दाम मिपावर यावं असं काहीतरी.
पुभाप्र.
25 Apr 2013 - 1:49 pm | विसुनाना
कथेच्या नावापासूनच रामदास टच आहे. खुसखुशीत (असे म्हणायचे नाही असे ठरवूनही म्हणवे लगते )...तर खुसखुशीत विनोद.
पुढेपुढे आणखी खुमासदार होवो ही अपेक्षा.
25 Apr 2013 - 1:51 pm | स्मिता.
मजा आली वाचतांना... आणि खालचं क्रमशः बघून बरं वाटलं.
25 Apr 2013 - 1:59 pm | छोटा डॉन
हेच बोल्तो ...
पुढचा भाग येऊद्यात लवकर काकाश्री...
- छोटा डॉन
25 Apr 2013 - 2:18 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
पूर्ण वाचू शकलो नाहीये.... निवांत बसून वाचेन!
25 Apr 2013 - 2:54 pm | राही
सुम्दर नर्मविनोदी लेखन. गंगाधर गाडगिळांच्या 'कडू आणि गोड'(या लेखात कडू असे फारसे काही नाहीय म्हणा.) किंवा बंडूच्या कथांची आठवण झाली.
25 Apr 2013 - 3:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाण्याखेरीज काहीही करु शकत नाही, याची नोंद घ्यावी.
25 Apr 2013 - 3:18 pm | आतिवास
लेखन आवडलं.
"क्रमशः" आहे म्हणून तर जास्तच आवडलं :-)
25 Apr 2013 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास खुसखुशीत. :)
-दिलीप बिरुटे
25 Apr 2013 - 4:14 pm | स्पंदना
किती आपल्या आयुष्यातलेच वाटावे असे प्रसंग, किती साधे तरी किती भावपुर्ण. अगदी नात्याचे पिळे हळुवार उलगडत जातात तुमच्या लेखनशैलीने.
सुरेख!
25 Apr 2013 - 4:48 pm | झकासराव
कडक :)
25 Apr 2013 - 5:17 pm | ऋषिकेश
छानच.. पुढील भागाची वाट पाहणे आले
25 Apr 2013 - 6:02 pm | आदूबाळ
सगळ्यात बेष्टः "क्रमश:" :)
25 Apr 2013 - 6:12 pm | शुचि
वा!!! मस्तच
लेख वाचायला मजा येतेय. लवकर टाका.
25 Apr 2013 - 6:24 pm | रेवती
सायं शाखा -प्रभात शाखा -प्रदोष शाखा आणि चर्म वेत्र -छुरीका -दंड
वा! मजा आहे वाचकांची. लेखन आवडले.
तुमचे लेखन आवडल्याचा/नावडल्याचा स्पष्ट प्रतिसाद मी नेहमी देते आणि माझ्या पाकृंवर फक्त एक प्रश्न टाकून तुम्ही निघून जाता हे अनेक दिवसांपूर्वी लक्षात आले आहे.
25 Apr 2013 - 6:47 pm | सुहास झेले
सहीच.....वाचतोय :) :)
25 Apr 2013 - 8:35 pm | किसन शिंदे
निवृत्ती नाथांच्या कथा असं शिर्षक वाचलं. :D
काकूस हि गोष्ट तरी पुर्ण करणार का??
25 Apr 2013 - 8:39 pm | प्राध्यापक
बर्याच दिवसांनी मिपावर काहीतरी चांगल वाचायला मिळाल्,रामदास काका आता दुसर्या भागाला जास्त वेळ लावु नका.
25 Apr 2013 - 9:01 pm | गणपा
विंटरेस्टिंग.
25 Apr 2013 - 9:03 pm | अर्धवटराव
तो सज्जनगड निवासी, आणि हा मिपानिवासी. आयुष्य सुंदर, मजेदार बनवायला दोघांचेही साहित्य मोलाचे :)
अर्धवटराव
25 Apr 2013 - 9:36 pm | मुक्त विहारि
हेच म्हणतो..
25 Apr 2013 - 9:17 pm | मदनबाण
वेळ काढुन अगदी शांतपणे आनंदाने वाचायचा धागा. :)
आता तरी पुढच्या भागासाठी ताटकाळत ठेवु नका ! तो सॉफ्टवेअरवाल्यांचा पुढच्या भागाची अजुन वाट पाहतोच आहे...
25 Apr 2013 - 9:36 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
25 Apr 2013 - 9:50 pm | राजेश घासकडवी
छान. संसाराला तीस-चाळीस वर्षं झाल्यानंतर नवऱ्याकडे बघण्याचा स्थितप्रज्ञ दृष्टिकोन सुंदर टिपला आहे. पुढे घडणाऱ्या सगळ्या खेळाची दिशा लय काय असणार हे तोपर्यंत माहित झालेलं असतं. त्या अंतिम ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत पोचण्यापूर्वी अंधारात चाचपडणं, धडपडणं, चिडचिडणंही झालेलं आहे या बाईचं, हेही नकळत सांगितलेलं आहे.
नवऱ्याचं व्यक्तिचित्रण चालू असलं तरी तितक्याच प्रमाणात नरेटरीणबाईंचंही चाललं आहे.
25 Apr 2013 - 10:01 pm | बिपिन कार्यकर्ते
When Peter talks about Paul, you learn a lot about Paul!
25 Apr 2013 - 10:06 pm | पैसा
गडबड झाली काय?
26 Apr 2013 - 7:16 am | स्पंदना
तंग ऑफ स्लिप?
अग पैसाताई ते कुडकुडताहेत.
26 Apr 2013 - 8:04 am | बिपिन कार्यकर्ते
ओ तायांनो! ते बरूबर ल्हिल्यालं हाये! नीट वाचा.... आणि समजून घ्या! :) ... विंग्रजीतलं प्रसिद्ध वाक्य आहे ते.
26 Apr 2013 - 8:08 am | स्पंदना
न्हाय वो!
पी चा पॉ झालाय.
:)) :))
(देवा ! हा नुसता योगायोग म्हणावा का काय?:| माझ्याच नशीबी हे उत्तर देण्याचा योग का म्हणुन लिहिला गेला?)
26 Apr 2013 - 9:13 pm | शुचि
होय होय ते असं हवं ना - When Peter talks about Paul, you learn a lot about Peter!
9 May 2013 - 4:12 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
25 Apr 2013 - 9:53 pm | काकाकाकू
आधी घाईत निवृत्ती नाथांच्या कथा असे वाचले....पण नंतर नीट सविस्तर वाचले. पुढिल भागाची वाट आम्ही दोघे पहात आहोत.
26 Apr 2013 - 12:28 am | काकाकाकू
शिर्षक वाचलं मी पण!
25 Apr 2013 - 10:16 pm | सूड
मी अगोदर शीर्षक वाचलं तेव्हा 'निवृत्तीनाथांच्या कथा असं लिहाचंय का तुम्हाला' असा (खवचट) प्रश्न विचारायला सरसावलो. पण म्हणलं लेखक कोणाय बघू. लेखकाचं नाव वाचल्यानंतर म्हणलं ही स्पेलिंग मिस्टेक असणं शक्यच नाही आणि मग मात्र धागा उघडल्याचं सार्थक झालं, नेहमीप्रमाणेच !! ;)
25 Apr 2013 - 10:47 pm | बहुगुणी
(परकायाप्रवेशाची अफाट ताकद आहे या माणसात, लेखनशैलीला पुन्हा एकदा सलाम!)
25 Apr 2013 - 11:54 pm | श्रावण मोडक
परवाच, रामदासांच्या काही कथा वाचत होतो. पूर्वीच्या. इथंच प्रसिद्ध झालेल्या. अचानक वाटून गेलं, हा माणूस लिहायचा का थांबलाय... त्यांना विचारायचं ठरवलं, आणि ही कथा आली. साला... असं सारखं वाटत रहावं.
असं वाटलं त्याचं कारण असलेली कथा, गडबोले आणि का रे, ऐसी माया....
26 Apr 2013 - 12:16 am | बांवरे
मला पण तुमच्या लिखाणाबद्दल हेच्च वाटतं ओ !
पण साला काही येतच नै नवीन. ;)
26 Apr 2013 - 12:15 am | बांवरे
सुरूवात आवडली !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
26 Apr 2013 - 1:03 am | प्यारे१
हा हा हा!
घासकडवींशी सहमत.
आधी आवेशपूर्ण, आरंभशूर, खूप काही करावंसं वाटणारा, मधेच पाऊल घसरणारा, कधी घुसमटलेला, कधी प्रचंड धुमसता, चिडचिड्या, बडबड्या, अवचित गंभीर नि भावनिक आणि असंच बरंच बरंच काही बाही असलेला नवरा बायकोला बरोब्बर ठाऊक होतो.
सुरुवातीच्या दोन एक वर्षात आगगाडी ट्रॅक बदलताना करते तशी खडखड असते. नंतर सगळ्याच मालगाड्या! :)
26 Apr 2013 - 6:21 am | धमाल मुलगा
एकतर ते शिर्षक 'निवृत्तीनाथांच्या कथा' असं वाचलं, अन त्यात भर म्हणून कथेच्या सुरुवातीची तीन वाक्यं वाचल्यावर कायतरी नाथपंथी विषयावरचं दिसतंय असं वाटलं अन सरसावून बसलो वाचायला! :)
शेवटापर्यंत वाचत आलो तर कळालं की च्यायला, हे तर सालं अनाथपंथी आहे!
कथेबद्दल बोलायचं तर, लहानतोंडी मोठा घास तो काय घेऊ?
:)
सालं ह्या आमच्या म्हातार्यानं सरळ शब्दात लिहिलेल्या वाक्यांतली कोडी सोडवता सोडवता दिल एकदम रेशमी रेशमी होऊन जातो यार!
और भी लिख्खो चचाजानी, हम वाट बघता हय.
30 Apr 2013 - 2:10 pm | दिपक
असेच म्हणतो!
पुढील भागाच्या तीव्र प्रतिक्षेत.
26 Apr 2013 - 10:23 pm | पिवळा डांबिस
चांगलं चाललंय, पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे....
पण त्याबरोबरच आता 'मी रिटायर होऊ की नको?' हा प्रश्न पडलाय!!!
:)
(स्वगतः आणि रिटायर झाल्यानंतर या रामदासांबरोबर रोज चालायला जाण्यापेक्षा प्रभूमास्तरांबरोबर जावं! निदान चित्तवृत्ती तरी उल्हासित रहातील!!!)
:)
26 Apr 2013 - 10:47 pm | श्रावण मोडक
पिडां काका, हे रामदास वायले, कथेचा नायक वायला... तसंही प्रभूमास्तरांसमवेत हे 'रामदास'ही असतातच. ;-)
आता तुम्हाला आंबा हवा पण क्रीम नको, असं असेल तर तेही वायलं. ठरलं की सांगा, अर्धा माणूस तुम्हा तिघांमध्ये आरामात खपून जाईल... ;-)
(स्वगत: हे तिघं कुठं मला पत्ता लागू देतायेत...)
27 Apr 2013 - 10:35 am | अग्निकोल्हा
सॉलीड सिटकॉम (मराठी प्रतिशब्द ? ).
27 Apr 2013 - 4:15 pm | आप्पा
रामदासजी,
छान. ठाण्यात तीस वर्ष होतो. कधी परिचय झाला नाही. परत कधी येणे झाल्यास परिचय करुन घेण्यास आवडेल. आपले लेख आवडतात.
27 Apr 2013 - 4:42 pm | अभ्या..
रामदासकाकांनी लिहिलेलं आहे म्हणजे काय सांगायचे अधिक?
केवळ अप्रतिम.
27 Apr 2013 - 6:14 pm | निनाद मुक्काम प...
शीर्षकांच्या नावावरून ते लेखाच्या शेवटपर्यंत
सबकूच रामदास
29 Apr 2013 - 9:46 pm | आजानुकर्ण
छान लेख
30 Apr 2013 - 7:30 pm | पिलीयन रायडर
पण आता कळालं की शीर्षक 'निवृत्तीनाथांच्या कथा' असं नाहीये!!!!
9 May 2013 - 8:16 pm | तर्री
"काही नाही .संघ विकीऱ."
- हा हा हा ....22 Jan 2021 - 8:33 pm | NAKSHATRA
आज पहाटे मी दचकून जागी झाले. तशी माझी झोप सावधच असते पण आज काहीतरी विचीत्रच झालं.
माझ्या गालावर कुणीतरी हलकेच हात फिरवतंय असं आधी वाटलं.