सेन्टी मेन्टी : जखम आणि खपली

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
23 Mar 2013 - 1:19 am

काहीतरी भस्सकन खुपतं. जखम होते. कधी वरवरची तर कधी खोल खोल रुतलेली. कधी साधसच खरचटत्;कधी बाहेरचं काहीतरी खोल आत रुतून बसतं. कधी आपलाच एखादा भाग हिसकटून, उचकटून बाहेर निघतो ना, तेव्हाची जखम तर जीवघेणी असते. जखम कसली, तेवढ्या प्रमाणात आलेला त्या भागाचा मृत्यूच की तो.
तेव्हा ठणकतं; खुपतं; दुखतं. पण तरीही show goes on ह्या उक्तीप्रमाणे आहे तिथून आहे तशीच जमेल तितकी जखम हळूहळू भरुन यायला लागते. फार मोठ्ठा भाग गेला असेल तर शरीर तो संपूर्ण भाग पुन्हा बनवूही शकत नाही कित्येकदा. पण जगताना त्याचीही सवय करुन घ्यावी लागते; खरं तर सवय होउन जाते.
वेदनेचा आणि तीव्र दु:खाचा तो क्षण मागे सरु लागतो. अवचित पुरेसा मागे गेला तर कधी तो घडलाही होता हेही जणू आपण विसरून जातो. ह्यासाठी आख्खं आयुष्यच वगैरे जायची गरज नाही; रडून थकलो, नंतर एक दीर्घ झोप झाली की काहीकाळ डोकं कसं एका वेगळ्याच विश्वात जातं. तोवर खपली धरु लागलेली असते.
वेदना नाही, तर घटनेची आठवणही नाही. पण कधीतरी आपल्याही नकळत आपलाच हात त्या जखमेवरच्या नव्यानं बसू लागलेल्या खपलीकडे जातो. आपलाच हात तीच खपली काढू पाहतो. आपल्याला त्रासही होतो. भळभळत पुन्हा रक्त येउ लागतं. पण आपलाच हात आपलीच दुखरी जागा सोडायला तयार नसतो. आपण आपल्यालाच दचकतो. जणू त्या दुखण्यातूनही,त्रासातूनही काही समाधान मिळतं की काय.
खपली खरवडली जाते.सोलली जाते.पुन्हा त्रास होतो. पुन्हा जखम नव्यानं ताजी होते. नव्यानं त्रास होतो. मागचा आघात आता अधिकच दृढमूल होतो. त्याची जाणीव घट्ट खोलवर अजूनच मेंदूत जाउन बसते. हे कळत असतं; जखमेनं आपण कळवळतही असतो. पण तरीही पुढच्याही वेळेस आपलाच हात आपल्याही नकळत जखमेच्या खपलीवर टवका मारतोच.
.
आंधळी असते म्हणे जखम. एकदा लागलं की पुन्हा पुन्हा तिथेच लागतं.आश्चर्य वाटायचं ह्या गोष्टीचं; murphy's law कसे रोचक, पण सार्वत्रिक अनुभवास येणारी निरिक्षणं सांगतात तसच त्याच त्या जागेवर जखम होण्याचं आश्चर्य वाटायचं. पण कित्येकदा तर आपल्या स्वतःलाच ती जखम पुन्हा उचकटायला हवं असतं; ट्रिगर फक्त आपणच तिथे जाउन शोधतो असं होतं. किंवा तसंही नसेल होतं एखादेवेळेस. पण जाता येता खूप सार्‍या छोट्या मोठ्या गोष्टी आख्ख्या अंगाला लागतच असतात. पण शरीर दुभंग नसताना कसं कामाच्या व्यस्तेतेत त्या क्षुल्लक धक्क्यांची जाणीवही होत नाही. त्याचा फरकही पडत नाही.
नंतर तुम्ही जखमी असता; आणि जाता येता, इथे तिथे उठबस करताना काही गोष्टी अंगाला लागतातच. त्यातच हा भाग कसा काहिसा कमजोर झालेला असतो.संवेदनशील असतो. इथे छोटासा स्पर्शही दुखर्‍या नसेची जाणीव करुन द्यायला पुरेसा असतो. हे नेहमी होणारे छोटे मोठे क्षुल्लक धक्के मग मात्र त्या जागेवर जीवघेणे वाटतात.जखम पुन्हा पुन्हा भळभळायला लागते. दुखरी होते. जखम आंधळीच असते; तेच प्रारब्ध असते; ह्यावर मग आपणही विश्वास ठेवू लागतो; वेदना हेच प्रारब्ध स्वीकारुन. विव्हळत, कण्हत.

--मनोबा

राहणीस्थिरचित्रप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

23 Mar 2013 - 1:51 am | इन्दुसुता

जखम नवी असताना हे होतही असेल कदाचित.
मनुष्य गेल्यानंतर, मागे उरलेल्यांसाठी ही ग्रीव्हींग प्रोसेस जवळपास ७ वर्षे सुरू असते. यकु जाऊन ७ महिनेदेखील झालेले नाहीत... स्वत:ला सांभाळून रहा असा अनाहुत सल्ला जाता जाता देते ( वयाने मोठी असल्याने जरा स्वातंत्र्य घेत आहे सल्ला देण्याचे)

थँक्स; पण यकुबद्दल नाहिये.

लॉरी टांगटूंगकर's picture

23 Mar 2013 - 8:41 am | लॉरी टांगटूंगकर

दुखणं खुपण ठीक आहे.. आता जखमेला कुरवाळत बसायचं, विव्हळत, कण्हत जगायचं का शौर्यखुण आहे म्हणून त्याचा अभिमान बाळगायचा हे आपल्यावरच आहे. सहन करण्याची ताकद दिली म्हणूनच तर काहीही न करता जखमा सहन करू शकतो ना.. पुन्हा पुन्हा तिथेच लागतं हा एखाद्या वेळेचा योगायोग असेल हो.. शारीरिक जखमा आणि मानसिक जखमा दोन्हीही वाईटच. उगाच अंगावर घ्यायला जाऊ नये पण आता समोरून आल्यात तर आनंदाने घ्याव्यात. प्रेमभंग झाल्या शिवाय गझल,शायरी कळत नाही म्हणतात ;) . मुख्य सैन्य लढत असताना राखीव बसलेल्या सैनिकाला बरे वाटत असेल का मला जखमा नाहीत म्हणून? की लढायला मिळाले नाही याचं दुखः असेल ?? त्या अनुभवा पर्यंत गेलोत यात पण काही तरी मिळवलेच ना ??

धमाल मुलगा's picture

23 Mar 2013 - 10:39 am | धमाल मुलगा

तोडलंस भावा! अगदी सहमत.
दु:ख काय, प्रत्येकालाच असतात...हां, तुलना करायला गेलं तर कमी जास्त होऊ शकतील, पण जो भोगतो त्याच्यासाठी ते मोठंच असतं. पण आहे त्या दु:खाला/परिस्थितीला भिडायचं अन टाचेखाली चिरडून पुढं जायचं की आपल्या जखमा पाहून उसासे टाकत रहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. ह्या त्रासावर जो विजय मिळवून (किंबहुना, काळजाच्या कोपर्‍यात दाबून दडवून) लढत पुढे जात रहातो त्याचा आदर्श ठेवावा असं आपलं माझं मत. :)

प्यारे१'s picture

23 Mar 2013 - 2:07 pm | प्यारे१

+१११११

असं कुरवाळत राहण्यात नुकसान होतं ते वर्तमानाचं. वर्तमान हा हा म्हणता भूतकाळ बन तो नि ह्या सगळ्या काळात आपण नेमकं केलं तरी काय ह्याचा विचार करण्यात भविष्यकाळ निघून जाण्याची शक्यता निर्माण होते.

मनोबा, कदाचित जास्त विचार करताय आपण! जगामध्ये घडणार्‍या घटनांवर आपला कंट्रोल फारच कमी असतो. किंबहुना नसतोच. आपण आपलं 'जग' सीमित करुन घ्यावं नि त्यानुसार वाटचाल करावी. आक्ख्या दुनियेचा विचार नाही करु.
काही घटना, गोष्टी ह्या होणारच असतात. घटना घडतात त्या आपल्या प्रतिक्रियानुरुप संधी अथवा समस्यांचं स्वरुप धारण करतात. घटना घडणारच. त्यांवर प्रतिक्रिया देणं टाळा. दुसर्‍या कुणासाठी नाही तर प्रतिक्रिया मनात उमटतानाच तिच्यावर काबू करा.
जर अशी घटना घडण्यामध्ये माझा काही हात नसेल तर मी ह्याबाबत अपराधी अथवा इतर काहीही का वाटून घ्यावं? घटना घडल्यावर त्यामध्ये आपल्याला शक्य असेल तितकी सर्वार्थानं मदत करावी. नुसतं बसल्याजागी चुळबूळ नि हळहळ करण्यापेक्षा चळवळ करावी.

थोडंसं सिझन्ड हो भावा!

दुखत असेल तर दुखत म्हणयच नाही का?
अस का लगेच दुसर्‍या दिवशी कोरा चेहरा घेउन बाहेर पडायच?
तीही एक हिलींग प्रोसेस आहे. अगदी खर्‍या जखमा भरायला सुद्धा वेळ द्यावा लागतो, मग मनाच्या जखमा का नाकारायच्या?

मन१'s picture

26 Mar 2013 - 8:27 am | मन१

सर्व वाचकांचे आभार.
लोकहो, मी ठीक आहे हो. नसेन तेव्हा तेही सांगेनच की.(पूर्वीही इथे मिपावरच लिहिलय.)
तस्मात, चिंता नसावी.