कर्करोग स्तनांचा
मध्य वयातील वादळ
मध्यवयातील वादळ- पुढे
------------------------
हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे. मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केल्याने आलेल्या अनुभवातून आणि केलेल्या अभ्यासातून लिहित आहे. त्यातील काही वर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत यासाठी वरील संदर्भ देत आहे
स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो.स्तनात येणाऱ्यागाठी पैकी फक्त १०% कर्करोगाच्या असतात.दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच भीती आणि काळजी यामुळे रोग तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे काळ असतो. परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो. प्रत्येक ३५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी दर महिन्याला करणे हे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण (consistency )हि वेगळी असल्याने डॉक्टर ला त्याबद्दल माहिती असणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या शरीराची माहिती ठेवणे स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. वेळ नाही किंवा जमले नाही हि कारणे देऊन कोणाचा फायदा होईल? मासिक पाळीच्या ५-६ दिवसानंतर आंघोळीच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी आणि आपल्या घराच्या कैंलेन्डेर वर ओम किंवा बाण किंवा श्री अशी दुसर्याला लक्षात येणार नाही अशी खूण करावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तपासणी झाली आहे कि नाही हे कळेल. जर आपण तपासणी करण्यास विसरला तर जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा ती करावी.मासिक पाळी च्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे कि पाळी च्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात त्यामुळे हि तपासणी व्यवस्थित होत नाही. रजोसमप्ति नंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी. Breast self examination
www.slideshare.net/nashua_08/breast-self-examinationhttp://www.metacafe.com/watch/1310242/how_to_do_a_breast_self_examination/
स्तनाच्या कर्क रोगा बद्दल ची काही उपयुक्त माहिती --
१) बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता बरीच कमी होते.
२) गर्भ निरोधक गोळ्या (ORAL CONTRACEPTIVE PILLS) घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणी गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्यता बरीच कमी होते.या गोळ्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
३) गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता १:३००० इतकी असते त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये.
MAMMOGRAPHY हि चाचणी ४० वर्षे वयापासून दर वर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण ३०टक्क्यांनी कमी होते. वयाच्या पन्नाशीनंतर तर नक्कीच करावी.
यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्स रे काढले जातात आणि त्यानंतर सतांची सोनोग्राफी केली जाते या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक अश्या आहेत या चा मुंबईतील खर्च २००० रुपये आहे इतर शहरात तो कमी असावा.या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्यता ९०% पर्यंत असते एक महत्त्वाची गोष्ठ हि आहे कि कोणतीच चाचणी १००% नाही म्हणूनच स्वतपासणी काराने आवश्यक आहे.
कर्क रोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ७ वर्षे असतो आणि mammogrphy केल्याने कर्करोग हा साधारण एक ते दीड वर्ष अगोदर लक्षात येतो आणि या वेळेस केवळ गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्यता असते यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या कौटुंबिक डॉक्टर किंवा कर्करोग तज्ञाकडे जावे.
अनुवांशिकता --कर्करोग हा बर्यापैकी अनुवांशिक आहे त्यामुळे ज्या स्त्रीयांची जवळच्या(first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहिण) स्तनाचा कर्करोग झाला आहे तिला कर्करोग होण्याची शक्यता १० पटींनी वाढते आणि जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रिया (आई आणि बहिण किंवा दोन्ही बहिणी )न कर्करोग झाला आहे त्यांना कर्क रोग होण्याची शक्यता १०० पटींनी वाढते. म्हणून जर आपल्या नातेवाईक ला (आई व बहिण)ज्या वयात कर्करोग होतो त्याच्या ५ वर्षे अगोदरपासून mammography करण्यास सुरुवात करावी.उदा. आई ला जर ४० वयाला कर्करोग निदान झाले तर त्या स्त्री ने ३५ व्या वर्षी हि तपासणी सुरु करावी.
हे ज्ञान आपण आपल्या सर्व नातेवाईक मैत्रिणी मित्र यात वाटावे आणि कर्करोगावर विजय मिळवण्यात आपले सह्कार्य करावे हि विनंती.
आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे.
आपला कृपाभिलाषी
सुबोध खरे
प्रतिक्रिया
13 Feb 2013 - 12:44 pm | संजय क्षीरसागर
याविषयी आपलं काय म्हणणय?
13 Feb 2013 - 12:49 pm | कवितानागेश
महत्त्वाचा विषय.
धन्यवाद.
स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो. ही टक्केवारी जगातली आहे की भारतातली?
भारतात cervix च्या कर्करोगाची जास्त टक्केवारी आहे, असे मध्ये कुठेतरी वाचलं होते. त्याबद्दलही माहिती येउ दे.
13 Feb 2013 - 1:16 pm | सुबोध खरे
हि आकडेवारी जागतिक आहे. आपण म्हणता ते मान्य आहे कि भारतात गर्भाशयाच्या तोंडाचा cervix चा कर्करोग जास्त आहे पण आपले वाचक ज्या गटात मोडतात (मध्यम आणि उच्च वर्ग ) त्यात cervix च्या कर्करोगाचे प्रमाण बरेच कमी आहे म्हणून हि जागतिक आकडेवारी दिली आहे
13 Feb 2013 - 1:13 pm | अक्षया
धन्यवाद.
13 Feb 2013 - 1:13 pm | सुबोध खरे
use it or loose it
इतके साधे नाही साहेब अन्यथा आपल्या मुसलमान बांधवानी १५०० वर्षे न वापरलेली त्वचा (सुन्नत) नाहीशी झाली असती. पण तरीही हा संदर्भ कळला नाही
13 Feb 2013 - 1:19 pm | गवि
मला वाटतं की यूज इट ऑर लूज इट या न्यायाने "कॅन्सर" होत नसावा. सांधे, स्नायू यांचा वापर / व्यायाम अजिबात न केल्याने शक्ती नष्ट होणं, आखडणं, निकामी होणं असे इफेक्ट होताना दिसतात. पण वापर केला नाही म्हणून "रोग" होऊन तो भाग गमावणं अशी "शिक्षा" निसर्ग करताना दिसत नाही.
बाकी बाळांसाठी दीर्घकाळ स्तनपान चालू ठेवणार्या स्त्रियांत हा कर्करोग कमी प्रमाणात दिसत असला तर कल्पना नाही. तुमच्यासारखे डॉक्टरच ते सांगू शकतील.
तरीही कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे हा नवीन काळात तरी व्यवहार्य उपाय नव्हे कर्करोग टाळण्याचा..
13 Feb 2013 - 1:32 pm | सुबोध खरे
कमी शक्यता म्हणजे ० नव्हे आणि सतत मुले जन्माला घालून स्तनपान करीत राहिल्याने शक्यता एका विशिष्ट पातळी च्या खाली येत नाही. तसे असते तर गर्भारपणात कर्करोग झाला नसता.
मुल न झालेल्या स्त्रीच्या तुलनेत हि शक्यता कमी होते.
13 Feb 2013 - 3:23 pm | संजय क्षीरसागर
आता सगळं पुन्हा वाचणं आलं!
13 Feb 2013 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार
तुमचा प्रतिसाद mammography साठी नेला असावा.
असो..
डॉक माहितीबद्दल धन्यवाद.
महत्वाची माहिती अतिशय सोप्या शब्दात दिली आहेत.
13 Feb 2013 - 4:00 pm | संजय क्षीरसागर
करणार्यांचा जीव टांगणीला लागेल.
13 Feb 2013 - 1:26 pm | शुचि
एकदा "रेग्युलर" चेक-अप म्हणून केलेला आहे पण अनुभव हा की निकाल यायला आठवडा लागतो आणि मधल्या वेळेत मन पोखरले जाते.
खरं तर दर वर्षी चेक-अप केलाच पाहीजे.
13 Feb 2013 - 1:29 pm | सुबोध खरे
mammography चा निकाल त्याच दिवशी मिळतो एक आठवडा का लागला ते कळले नाही.
13 Feb 2013 - 1:35 pm | शुचि
अमेरीकेत मला १ आठवडा लागला. का ते माहीत नाही :( ..... डिस्टिन्क्ट्ली रिमेंबर द टेन्शन!!!
खरं पाहता मी जी ई हेल्थ्केअर मध्ये काही वर्षे मॅमोग्राफी मॉड्युलवर काम करत होते. रोज ते काम केल्याने इतका परीणाम व्हायचा की ४० वर्षाच्या जरा आतच मी घाबरुन टेस्ट करुन घेतली.
पण जास्त सखोल आठवण ही नंतरच्या टेन्शनची असल्याने आता खरं तर गरज असतेवेळी हयगय होते आहे.
पण आपला लेख वाचून परत प्रकर्षाने जाणीव झाली. धन्यवाद.
13 Feb 2013 - 1:32 pm | गवि
वरचेवर तपासणीबाबत अत्यंत सहमत, कारण जवळच्या सर्कलमधे उदाहरणं पाहिली आहेत. केवळ वेळेत डिटेक्ट झाल्याने पुढे पंधरावीस वर्षं नॉर्मल जगून अन्य कारणाने निधन पावलेल्या व्यक्ती एकीकडे आणि केवळ दुर्लक्ष केल्याने कॅन्सर स्तनातून अन्यत्र पसरुन तीनचार वर्षांतच मृत्यू आलेल्या व्यक्ती दुसरीकडे असं स्पष्ट चित्र आहे. मला वाटतं की हा कॅन्सर मूळ जागेववर असताना काढून टाकण्याजोगा आणि एकदा का अन्य भागात शिरला की पूर्ण नियंत्रणाबाहेर जात असावा.
निदान या कॅन्सरबाबत. इतर टाईप्सविषयी वेगळं असू शकेल.
13 Feb 2013 - 2:06 pm | jaypal
>>>> केवळ वेळेत डिटेक्ट झाल्याने पुढे पंधरावीस वर्षं नॉर्मल जगून अन्य कारणाने निधन पावलेल्या व्यक्ती एकीकडे आणि केवळ दुर्लक्ष केल्याने कॅन्सर स्तनातून अन्यत्र पसरुन तीनचार वर्षांतच मृत्यू आलेल्या व्यक्ती दुसरीकडे असं स्पष्ट चित्र आहे.
१०००% सहमत. कर्करोगात लवकर निदान हा अत्यंत मह्त्वाचा मुद्दा ठरतो.
डॉ.साहेब खुप खुप धन्यवाद.
अवांतर १)या लेखामुळे डॉ.अरविंद बावडेकर यांच्या केन्सर माझा सांगाती या पुस्तकाची आठवण झाली.
२) माझ्या जवळच्या मीत्राची आई ब्रेनट्युमरने ३ते४ महीन्यात गेली. काही वर्षांनंतर सख्खा मोठा भाउ अन्ननलीकेच्या कर्करोगाने ४ते५ महीन्यात गेला. दोघांचाही कर्करोग थर्ड स्टेजला लक्षात आलाहोता. निद्रानाश आणि नैराश्यासाठी सध्या त्याला मनोरुग्ण डॉ.ची ट्रीट्मेंट चालु आहे. त्याला सारख वाटत की कर्करोग अनुवंशिक असल्याने मला पण तो (आज ना उद्या) होणारच. :-(
13 Feb 2013 - 1:28 pm | पैसा
माझ्या आईला १९९० सालात ती ५३ वर्षांची असताना स्तनाचा कर्करोग लक्षात आला. लगेच त्यावर सर्जरी होऊन केमोथेरपीनंतर ती पूर्ण बरी झाली. यात तिचा प्रचंड आत्मविश्वास आणि एकूणच आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन याचाही मोठा हात असावा असे वाटते. आत्मविश्वास इतका की २ वर्षांनंतर तिने डॉक्टरांकडे तपासणीसाठी जायचे सुद्धा सोडून दिले. नंतर कधी भेटले की डॉक्टरच तक्रार करत असत, "तुझी आई तपासायला येत नाही" म्हणून! आज ती ७६ वर्षांची आहे. वृद्धापकाळामुळे येणारे किरकोळ आणि नेहमीचे प्रकार आहेत. पण कर्करोगाचे नावसुद्धा नाही.
अर्थात, नंतर तपासण्या करणे आवश्यक आहे हे मला माहिती आहे आणि कोणीही असे डॉक्टरांकडे न जाण्याचे धाडस करू नये असेच मी म्हणेन.
तिच्या म्हणजे माझ्या आईच्या अगदी जवळच्या नात्यातल्या १० एक लोकांना वेगवेगळे कर्करोग झाले आहेत. माझे आजोबा सुद्धा कर्करोगाने गेले. कर्करोग आनुवंशिक आहे हे तुम्ही सांगितलेच, आणि रत्नागिरीतील सर्जननी पण तेव्हाच मला काळजी घे हे सांगितले होते. पण कर्करोगाच्या प्रकारांमधे स्तनाचा कर्करोग लवकर लक्षात आला तर इतर प्रकारांपेक्षा सर्वात कमी धोकादायक आहे का?
15 Feb 2013 - 10:35 am | सुबोध खरे
ज्योती ताई ,
आपले लेखन नजरचुकीने निसटून गेले क्षमस्व.
रुग्णाला एका विशिष्ट कालावधी पर्यंत परत तपासणी साठी बोलावले जाते याची काही करणे आहेत. शस्त्रक्रिये नंतर जर कर्करोगाचा छोटासा कण एखाद्या कोपऱ्यात राहून गेला असेल तर तो परत वाढू लागतो. तो जितका लहान असेल तितके त्यावरील उपचार सोपे असतात.केमोथेरेपी देण्याचा हेतू सुद्धा हाच असतो कि जो सूक्ष्म डोळ्यांना न दिसणारा भाग राहू न गेला असण्याची शक्यता असते तो कर्करोग सुद्धा त्यात अंतर्भूत होऊन जातो. दुर्दैवाने कर्करोगाच्या काही पेशी मुळात केमोथेरेपीला दाद न देणाऱ्या असू शकतात त्यामुळे ज्या पेशी केमोथेरेपीचा प्रभाव होऊन मरतात त्या निघून जातात पण ज्या पेशी दाद न देणाऱ्या असतात त्या त्यात जिवंत राहतात (survival ऑफ fittest). तेंव्हा ज्या पेशी जिवंत राहतात त्या पुढे वाढून कर्करोग केमोथेरेपीला दाद न देणारा होतो.म्हणूनच रुग्णाची परत परत तपासणी करणे आवश्यक असते. प्रत्येक तर्हेचा कर्करोग हा किती कालावधीत दुप्पट होतोTUMOUR DOUBLING TIME त्यावरून रुग्णाला किती काळ पर्यंत तपासनीस बोलवायचे ते ठरते. सर्वसाधारणपणे स्तनाच्या कर्करोगास ५ वर्षे हा कालवधी पुरतो. या कालावधीत जर रोगाचा पुनरुद्भव झाला नाही तर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असे समजता येते.पण पहिला अवसर हा सगळ्यात चांगला असतो.
लष्कराच्या तोफखान्याचे बोध वाक्य कर्करोगासाठी जसेच्या तसे वापरले जाते HIT FIRST,HIT HARD, KEEP HITTING.
रुग्णाच्या आत्मविश्वासाचा आणि कर्करोगाच्या परत येण्याचा काही संबंध नाही.त्यांचा कर्करोग बहुधा पूर्णपणे मारला गेला होता म्हणून परत उद्भवला नाही हे सुदैव. आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवून न चावता निघालात या बद्दल परमेश्वराचे आभार मानावेत. आपल्या मातोश्रींना शतायुष्य लाभावे हि परमेश्वर चरणी प्रार्थना.
कर्करोगा बद्दल मी हेच म्हणेन कि साप म्हणू नये धाकला आणी नवरा म्हणू नये आपला.
स्तनाच्या कर्करोगामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात आणी त्यात सुद्धा काही ANAPLASTIC TYPE इतक्या जलद वाढतात कि रुग्ण ६ महिन्यात दगावतो
15 Feb 2013 - 10:38 am | पैसा
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद!
13 Feb 2013 - 2:02 pm | नगरीनिरंजन
या आणि इतर सामान्यपणे होणार्या कर्करोगांचे मूळ कारण काय?
म्युटेशन की अन्युप्लॉइडिटी (aneuploidity)? अन्युप्लॉइडिटी असेल तर ती कशाने होते?
13 Feb 2013 - 3:31 pm | संजय क्षीरसागर
लेखकाकडून उत्तराच्या अपेक्षेत
13 Feb 2013 - 2:03 pm | चौकटराजा
आपण आज स्त्री कितीही सुधारली असे म्हणालो तरी तिच्या प्रायॉरिटी फेशीयल, लिप्स्टीक, दागिने, साड्या, मंगळसूत्राची डिझाईन्स, भजनी मंडळ, हलदीकुंकाचे कार्यक्रम, उपास तापास हे आहेच.आरोग्याच्या बाबतीत स्वतः चे तिचे काही प्रेफरन्सेस
असतात की नाही हा प्रश्नच आहे. याचा परिणाम अनिमिया, कर्करोग यांचा उदभव दिसून येतो.
13 Feb 2013 - 2:09 pm | jaypal
हायला राष्ट्रपती पुत्रा सारख्या कॉमेंट नका देऊ. उगा वाद वाढुन धाग्याचा ऊद्देश भरकटतो :-(
13 Feb 2013 - 2:31 pm | सुबोध खरे
साहेब ,
आपण आपल्या कारचा महिन्याचा हप्ता भारत असतो म्हणून त्याची वेळेवर तेलपाणी इ.(सर्विसिंग) केले जाते. आपल्या शरीराचा कोणताही हप्ता न भरल्याने (किंबहुना आपल्याला शरीर परमेश्वरा कडून फुकट मिळाल्यामुळे) त्याबद्दल चालढकल होत असते. मग स्त्रिया, ज्यांच्याकडे कोणतेही आर्थिक अधिकार नसल्याने स्वतः वर खर्च करणे हे त्याना संकोचाचे किंवा अडचणीचे वाटते. आणि आपल्या संस्कृतीने त्यांना त्यागाची मूर्ती बनवल्याने बोलणेच संपले. रोग जेंव्हा हाताबाहेर जातो तेंव्हाच त्या घरी सांगतात किंवा डॉक्टर कडे जातात.
पूर्ण स्तनात पू भरलेल्या किंवा कर्करोग स्तनाबाहेर गेल्याने हात पूर्ण सुजलेल्या अवस्थेत किती रुग्ण दिसतात.समाजाची मनोवृत्ती जोवर बदलत येत नाही तोवर आपली खरी प्रगती होणार नाही
13 Feb 2013 - 3:06 pm | NiluMP
सहमत.
13 Feb 2013 - 2:16 pm | तर्री
लेखकाची आरोग्य विषयक "कळकळ" शब्दा-शब्दातून दिसते आहे. मि.पा. वर एक वेगळा विषय अधिकाराने प्रस्तुत केल्याबद्दल सुबोध रावांचे आभार. अमेरिकेमध्ये "पिंक रिबीन " ही स्तनाच्या कर्करोगाचे प्रतिक आहे. भारतातही तशी मोहीम असावी.
माझ्या मित्राच्या पत्नीला स्तनाचा केंसर झाला तेंव्हा ती ३६ वर्षांची होती. स्तन काढून टाकावा लागला. त्या ऑपरेशन नंतर तीची मनोवस्था कमालीची खालावली आहे.
शारीरिक रोगा बरोबर "मानसिक" खच्चीकरण करणारा हा रोग आहे, सावधानतेचा इशारा पोहोचला.
13 Feb 2013 - 2:50 pm | सुबोध खरे
कोणतीही स्त्री केवळ स्तनाचा कर्करोग हे ऐकले तरी घाबरून जाते
त्यातून स्तन हा एक स्त्रीत्वाचे लक्षण असल्याने तिला तिच्या मूळ स्त्रीत्वावर आघात झाल्याची भावना येते. मुलीला आपल्या वाढत्या वयात वाढणाऱ्या स्तनाबद्दल (जसा रुपाबद्दल) एक अभिमान निर्माण होत असतो. म्हणूनच ज्या मुलीचे स्तन लहान असतात तिला एक न्यूनगंड निर्माण होतो.
ज्यावेळी स्त्रीला सांगितले जाते कि आता स्तन काढून टाकायला लागेल तेंव्हातिला धक्काच बसतो. ती आपोआप निराशेच्या गर्तेत जाते या वेळी तिचे मानसिकदृष्ट्या पुनरुत्थान करणे आवश्यक आहे.
आता दोन्ही तर्हेचे इम्प्लांट मिळतात (implant and explant ) implant हा त्वचेच्या आत शस्त्रक्रियेद्वारा घातला जातो (जेंव्हा कर्करोग त्वचेपर्यंत पोहोचलेला नसेल तेंव्हा किंवा शस्त्रक्रियेमध्ये जास्त त्वचा गेली नसेल तर. अन्यथा ब्रा च्या आत घालण्यासाठी explant मिळतो.डॉक्टर बरोबर चर्चा करून या सर्व शक्यता पडताळून पहिल्या तर हा आघात बराच कमी करता येतो. पण त्यात कुटुंबियांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.
13 Feb 2013 - 2:20 pm | तिमा
खरे यांना हा प्रश्न गंभीरपणे विचारत आहे. स्त्रियांना जसा स्तनांचा कर्करोग होऊ शकतो तसा तो पुरुषांनाही त्याच जागी होऊ शकतो का ?
अशा केसेस मेडिकल हिस्टरीमधे आहेत का ?
13 Feb 2013 - 2:21 pm | बॅटमॅन
रोचक. हीच शंका कधीकाळी मलादेखील आली होती. उत्तराच्या प्रतीक्षेत.
13 Feb 2013 - 2:25 pm | शुचि
होतो. म्हणजे मॅमोग्राफी मॉड्युलमध्ये पेशंट लिंग - स्त्री/पुरुष दोन्ही होते व आम्हाला सांगीतले होते की होतो.
13 Feb 2013 - 2:28 pm | बॅटमॅन
ईंटरेस्टिंग! आणि तितकेच भयावहही. असो. धन्यवाद.
13 Feb 2013 - 2:36 pm | सुबोध खरे
होय साहेब पुरुषांना पण हा रोग होतो आणि वाईट म्हणजे तो फार लवकर पसरतो कारण पुरुष स्तन फार लहान असल्याने हा कर्करोग लगेचच छातीत पसरतो आणि रुग्णाचा घास घेतो.साधारण २ वर्षात पुरुषाला मृत्यू येतो.त्यामुळे पुरुष स्तनात गाठ दिसली तर ताबडतोब डॉक्टर कडे जाने आवश्यक आहे. सुदैवाने पुरुष रोगाचे प्रमाण १:१०००० आहे.
13 Feb 2013 - 3:07 pm | बॅटमॅन
धन्यवाद :)
13 Feb 2013 - 2:23 pm | ५० फक्त
एका महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयाकडं लक्ष वेधल्याबद्दल अतिशय धन्यवाद.
13 Feb 2013 - 3:11 pm | दादा कोंडके
धन्यवाद खरे साहेब. वर चौकटराजांचं मतसुद्धा पटलं.
आठवणः एकदा कटींगच्या दुकानात एक (गरीबच दिसणारा) माणूस दोन-चार लोकं पकडून लेक्चरबाजी करत होता. "दर सहा म्हैन्याला थोडं-थोडं, आर्धा-येक ग्राम का होइना सोनं घ्यायाचं. सोन्याचा भाव लै होणाराय. पब्लीकला काय आक्कल नाय. खाउन गांडीला हात पुसतं. वगैरे वगैरे." मी त्याला म्हणालो, "त्यापेक्षा तू आरोग्य विमा का उतरवत नाहीस बाबा. तेच पैसे तिथे भर. आजारपणात उपयोगी येतील." लै खवळला होता माझ्यावर. वर म्हणाला, "खूप खर्च येणार असेल तर पेप्रात दिल्यावर पब्लीक मदत करतं" आता बोल! :)
13 Feb 2013 - 8:13 pm | सुबोध खरे
तहान लागल्यावर विहीर खणायला घेणारे काय कमी आहेत?
13 Feb 2013 - 6:56 pm | पांथस्थ
डॉ. साहेब समर्पक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
कॅन्सर विषयी माहितीसाठी (वैद्यकिय नाही) हे एक अप्रतिम पुस्तक आहे - The Emperor of All Maladies: A Biography of Cancer. मी सध्या वाचतो आहे.
13 Feb 2013 - 7:40 pm | रेवती
माहितीबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब! चाळीशीनंतर मॅमोग्राफी करण्याबद्दल डॉक्टर आग्रही असतातच पण स्त्रीयांनीही यात चालढकल करू नये हेही तितकेच खरे! आमच्या ओळखीच्या बाईंना त्यांच्या डॉ. नी मॅमोग्राफी करण्याचा आग्रहाचा सल्ला दिला. त्यांनी फारसे लक्ष दिले नाही पण बाईंच्या नवर्याने आग्रहाने तपासणी करवून घेतली आणि बरे होण्याच्या टप्प्यातला कर्करोग लक्षात आला. त्यांची ट्रीटमेंट केली गेली, त्या बर्या झाल्या पण आम्ही सगळ्या ओळखीच्या बायका चाळीशी येण्याच्या आतच घाबरून गेलोय. माझे डॉक्टर तर चाळीशीनंतर पॅप स्मीअर तपासणीही दर वर्षी करून घेण्यायला साम्गतात. चाळीशीपेक्षा लहान स्त्रीयांना मात्र एक आड वर्षाने किंवा दोन वर्षांनी. त्याबद्दलही लिहिण्याची विनंती करते.
13 Feb 2013 - 8:32 pm | अमित दळवे
http://www.ted.com/talks/deborah_rhodes.html
वरील दुव्यावर mammography पे़क्षाही अधिक परिणामकारक चाचणीची माहिती दिली आहे. यात क्ष किरणा ऐवजी गामा किरणाचा वापर होतो. ही भारतात उपलब्ध आहे अथवा नाही या बद्दल जाणकार मंडळीनी माहिती पुरवावी.
13 Feb 2013 - 11:10 pm | सुबोध खरे
MOLECULAR BREAST IMAGING याबद्दल खालील दुवा वाचावा.त्यात या चाचणीच्या बद्दल आतापर्यंत च्या स्थिती बद्दल चांगली माहिती आहे
http://www.breastcancer.org/symptoms/testing/types/mbi
13 Feb 2013 - 11:16 pm | सुबोध खरे
हि चाचणी भारतात करणे शक्य आहे परंतु ती सर्वाना खरोखरच गरज आहे असे वाटत नाही. ज्या स्त्रियांचे स्तन घन (DENSE) असतात आणि ज्यांना कर्करोगाची शक्यता (जवळच्या नातेवाईकाना कर्करोग असल्याने) जास्त आहे अशा स्त्रियांना जेंव्हा mammography मध्ये निदान होत नाही केवळ अशांनाच याचा आत्ता तरी फायदा आहे असे वाटते. अजून जास्त अभ्यासानंतरच या गोष्टी सिद्ध होतील.
13 Feb 2013 - 8:35 pm | विकास
गंभीर, महत्वाच्या विषयावर येथे सोप्या भाषेत लिहील्याबद्दल धन्यवाद. असेच आरोग्यासंदर्भात लेख येऊंदेत असा विनंतीवजा आग्रह.
तुम्ही जे कर्करोग अनुवंशीक असतो असे म्हणालात, ते स्तनांच्या कर्करोगासंदर्भातच आहे असे वाटते. (अजून देखील काही असतील, पण सगळे नाही.)
अमेरीकेत दरवर्षी प्रत्येकाला (म्हणजे ज्याच्या कडे इन्श्यूरन्स आहे अशा प्रत्येक व्यक्तिस) स्वतःची वार्षिक चाचणी करता येते आणि बहुतांशी लोकं ती करतात. आता तर ओबामाच्या हेथ केअरने ती मोफत देणे कम्पल्सरी केले आहे, जेणे करून माणसे जायला टाळाटाळ करणार नाहीत. त्यात कदाचीत फुकट नसेल पण मॅमोग्राम आणि पॅस्पस्मिअर करायला लावतात हे ऐकलेले आहे. तसे काही भारतात आहे का?
हा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्ही येथे लिहून आणि अनेकांनी अनेक ठिकाणि लिहून सतत लोकशिक्षण करायचा प्रयत्न केला आहे. पण आपल्याकडील फॅमिली डॉक्टर्स संकल्पनेतील डॉक्टर्सना याची कितपत माहिती असते आणि ते त्यांच्या नेहमीच्या पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या करायला उत्तेजन देतात का? (मला दुर्दैवाने तसे होत नसावे असे वाटते. पण मी चूक असलो तर चांगलेच आहे).
अजून एक प्रश्नः काही कॅन्सर होण्यामागे प्रदुषण हे देखील कारण असते. तसे स्तनांच्या कॅन्सरच्या मागे काही (इतर) कारण असते का?
पुलेशु
13 Feb 2013 - 11:03 pm | सुबोध खरे
काखेत वापरायचे दुर्गंध विरोधक किंवा घामरोधक स्प्रे स्तनांच्या कर्करोगास जबाबदार आहेत कि नाहीत हि गोष्ट अजून पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. हि रसायने काखेतून स्तनात जाऊन तेथे कर्करोग निर्माण करतात हे गृहीतक अजून सिद्ध झालेले नाही परंतु ALARA (AS LOW AS reasonably achievable) तत्वाप्रमाणे त्या रसायनांचा/ स्प्रे चा वापर कमीत कमी करावा असा सल्ला शास्त्रज्ञ देतात. बाकी कोणत्याही प्रदुशकाचा स्तनाच्या कर्करोगाशी संबंध अजूनतरी आढळलेला नाही.
14 Feb 2013 - 6:38 am | नगरीनिरंजन
हा हा! अशा पदार्थांनी कॅन्सर होतो हे कधी पूर्णपणे सिद्ध होईल़ काय?
एखाद्या विषाणूवर सगळा दोष ढकलता आला तर बरे म्हणून बरेच प्रयत्न केले गेले आहेत.
युनिव्हर्सिटि ऑफ कॅलिफोर्नियामध्ये रिट्रोव्हायरस आणि सेल बायॉलॉजीवर संशोधन करणार्या पीटर ड्यूसबर्ग या शास्त्रज्ञाने राऊस सार्कोमा नावाच्या रिट्रोव्हायरसचा शोध लावला तेव्हा सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला आणि त्या शास्तज्ञाला अनेक पुरस्कार मिळाले. पण पुढे त्याच शास्त्रज्ञाने अशा विषाणूंच्या घातकपणाबद्दल शंका व्यक्त केली तेव्हा तो एकदम नावडता झाला. कर्कजनक द्रव्यांमुळे अन्युप्लॉइडी पेशी निर्माण होतात आणि त्यास्टेबल झाल्या की पुनरुत्पादन करून कॅन्सर नावाचा एक परजीवी सजीव तयार होतो असा त्यांचा नवा सिद्धांतही दुर्लक्षिला गेला कारण त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये तयार होणार्या, केल्या जाणार्या कर्कजनक द्रव्यांवर थेट आरोप येईल आणि ते किती गैरसोयीचे असेल नाही?
आईच्या दुधापासून नदीच्या पाण्यापर्यंत चराचरात भरून राहिलेले डायॉक्सिन, बायस्फिनाल सारखी प्लॅस्टिकजन्य विषारी द्रव्ये, गाड्यांच्या आणि कारखान्याच्या धुरातून हवेत मिसळणारे हायड्रोजन सायनाईड सारखे कर्कजनक वायू वगैरे आवश्यकच आहेत. दे मेक अवर लाईफ बेटर, यू नो?
अमेरिकेत १९०० मध्ये प्रत्येक १०० मृत्युंपैकी फक्त ३ कॅन्सरने व्हायचे, आता २५ होतात. "छे छे! पूर्वी यापेक्षा वाईट होतं, आता फक्त जास्त प्रमाणात डिटेक्ट होतात" असं संख्याशास्त्री ठासून सांगतीलच. काय करणार? "इट्स द इकॉनॉमी, स्टुपिड!"
14 Feb 2013 - 7:00 am | स्पंदना
निव्वळ नगरी!
तसाही १९७० च्या सुमारास डायरेक्ट कॅन्सर टारगेट करणारी, अन केमो रेडीओ शिवाय अमलात येणारी एक उपचारपद्धती संशोधनात होती, हीचे पेपर्स त्यावएळच्या मेडीकल कॉम्फरन्समध्ये सादरही झाले होते, पण त्यावरच्या पुढच्या संशोधनाला फार्मास्युटीकल्स कंपन्यांनी फायनान्शीयल मदत नाकारुन ती उपचारपद्धती दाबुन टाकली. कारण? केमो अन रेडीओ जरी पेशंटला धोकादायक अन त्याची उरलेली शक्तीही खच्ची करत असले तरी फार्मास्युटीकल कंपनींना फायदेशीर आहेत. अरांउंड २०००ला फिरुन हा पेपर वाचण्यात आला, अन ज्या शास्त्रज्ञाने तो लिहिला होता त्याला वयाच्या ७५व्या वर्षी पुन्हा तोच पेपर सादर करायला बोलावले गेले. तो म्हणतो फार्मास्युटीकल्सचा हा अॅटीट्युड अन ही ताकद्(बिनफायद्याचे उपचार दाबुन घालायचे ) त्याला खरच विनाशकारी वाटते. मला संदर्भ अन नावे आठवत नाही आहेत.
14 Feb 2013 - 10:13 am | संजय क्षीरसागर
तोपर्यंत `डिटेक्शन झाल्यावर करायचे उपाय' असंच चर्चेच स्वरूप राहिल. आणि त्याचा न झालेल्यांना उपयोग नाही.
14 Feb 2013 - 10:36 am | सुबोध खरे
साहेब,
हा फार मोठा विषय आहे कर्करोग का होतो जगभर यावर फार मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. माझ्यासारख्या सामान्य वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्याच्या आवाक्याबाहेरचा आहे. कदाचित अजून ३० वर्षांनी मी याचे उत्तर देऊ शकेन असे वाटते.
http://www.nature.com/nature/journal/v432/n7015/full/nature03099.html
http://www.nature.com/nrc/journal/v5/n10/full/nrc1714.html
http://www.cancer.org/cancer/cancercauses/geneticsandcancer/oncogenesand...
मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी
14 Feb 2013 - 11:11 am | शैलेन्द्र
डॉक्टरसाहेंबांनी सांगितल्याप्रमाणे कर्करोग का होतो याचे नक्की कारण आज माहित नाही.
म्युटेशन.. हो, ते एक कारण आहे पण सगळेच म्युटेशन कर्करोगात बदलत नाहीत.
म्युटेशनचे अनेक प्रकार आहेत, मानवी शरिरात आजच्या घडीला साधारण ५००००० माहीत असलेले single nucleotide polymorphisms आहेत, माहीत नसलेले अजून लक्षावधी असतील.
दर सेकंदाला कित्येक डिएनए बेसेस चुकीचे गुंफले जातात, त्यातले बरेचसे लगेच विकरकाकडुन दुरुस्त होतात. काही तसेच पुढे जातात पण त्यातही बर्याचशा चुकांचा प्रथिनांच्या जडणघडणीत काही फरक पडत नाही, जर तो फरक पडत असेल तर तो कुठे पडतोय तेही महत्त्वाचं असतं.
थोडक्यात, कॅन्सरच्या बाबतीत अनुवंशिकता हाच सर्वात मोठा फॅक्ट्र आहे हे हळु हळु लक्षात येत चाललय..
14 Feb 2013 - 12:39 pm | संजय क्षीरसागर
एक साधा मुद्दा आहे. ज्यांना झालाय त्यांचा डेटाबेस घेऊन एक समान सूत्र नाही का काढता येणार?
डायबेटीसचा हाच प्रकार आहे. सतत चेकींग, त्याचा धसका आणि नंतर इन्शुलीन घेतल्यानं पँकरीअस निकामी होणं (कारण त्यांना कामच रहात नाही). त्यापेक्षा ग्रंथी अकार्यक्षम का होतात आणि त्या होऊ नयेत यासाठी काय करता येईल, अशी वैद्यकाची दिशा असू शकत नाही का?
14 Feb 2013 - 12:47 pm | गवि
अशा मार्गाने संशोधन होत नसेल असं का वाटतंय? माझ्यामते अशाच पद्धतीने बरीच संशोधनं होत असावीत. सध्याच्या पेशंटसचा डेटा, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधला संचित रिट्रोस्पेक्टिव्ह डेटा वगैरे यांचा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध होताना दिसतातच. तरीही त्यातून ठोस उपचार होईल असं मूळ कारण सापडलेलं नाही, किंवा सापडलं असलं तरी ते उपचार व्यावहारिक नाहीत यापैकी एक काहीतरी निश्चित..
14 Feb 2013 - 1:18 pm | सुबोध खरे
साहेब
तुम्ही म्हणाल्या प्रमाणेच वैद्यकीय संशोधन चालते कर्करोग म्हणाल तर सर्व तर्हेच्या शक्यता पडताळून पहिल्या जातात. मुंबईत टाटा रुग्णालयात आत्तापर्यंत उपचार झालेल्या सर्व रुग्णांचा पूर्ण तपशील उपलब्ध आहे त्या सर्वांचे वरीलप्रमाणे सर्व तर्हेची माहिती मिळवून त्या आजाराचे मुल कारण काय असू शकते असे संशोधन तेथील डॉक्टर करीत असतात. पण जसे जसे ज्ञान वाढत जाते त्यात्या प्रमाणे ते आपल्याला सल्ला देत असतात. या संख्याबलावरच गुटखा खाल्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो हे सिद्ध करून सरकार वर त्याला बंदी घालण्याचा दबाव आणला गेला.
ता.क.
इन्सुलिन घेतल्यामुळे स्वादुपिंड निकामी होत नाही तर स्वादुपिंड निकामी झाल्यामुळे इन्सुलिन घ्यावे लागते. ज्यावेळी गोळ्यांचा पूर्ण डोस घेऊनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही तेंव्हा नाईलाजाने इन्सुलिन चालू करावे लागते
14 Feb 2013 - 1:43 pm | शैलेन्द्र
अजुन एक ईटरेस्टींग गोष्ट,
आपण इंसुलीन चालु करतो, पण शेवटी इंसुलीन हे ग्रोथ हार्मोन आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त, न वापरलेले इंसुलीन अपोप्टोसीस (पेशींचे नियंत्रित मरण) यात गडबड करते, ज्यामुळे कर्करोग होवू शकतो.. होता होईल तितका शरिराचा इंसुलीन प्रतिरोध कमी करणे चांगले या मताला हल्ली लोक पोहचतायेत..
14 Feb 2013 - 2:19 pm | संजय क्षीरसागर
एकदा इंशुलिन घ्यायला सुरूवात केली की ग्रंथी अकार्यक्षम व्ह्यायला सुरूवात होते. कारण त्यांच काम एक्स्टर्नली घेतलेलं इंशुलिन करतं. इंशुलिनचा डोस वाढवत न्यावा लागतो आणि पुढे इंजेक्शनपर्यंत स्थिती येते.
माझा अनुभव सांगतो. थकवा येतो म्हणून डॉक्टरनं मला ब्लडशुगर करायला सांगितली होती (हिस्ट्री होतीच). त्याऐवजी मी वज्रासनात बसून कपाळ जमीनीवर टेकवणे, कपालभाती सारखे प्राणायम आणि सुप्तवज्रासनात अॅबडॉमिनल मसाज (याचा मला कसा शोध लागला कल्पना नाही) एकदम नित्यनेमानं सुरू केलं.
त्यातनं, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन आणि डायजेशन या तीन प्रणाली उत्तम तर आरोग्य उत्तम हा शोध लागला.
आज या घटनेला दहा/बारा वर्ष होऊन गेली. मी कोणतही पथ्य पाळत नाही. एकही टेस्ट करत नाही. उत्तम प्लेक्सिबिलीटीमुळे कायम उत्साह. प्राणायम, योगा आणि खेळामुळे जोमदार रेस्पिरिटी. त्यामुळे बीपी, हार्ट असल्या कोणत्याही भानगडीची शक्यता शून्य. आणि सर्वांचा परिणाम म्हणजे शरीर कायम स्वस्थ!
आता या बॅकग्राऊंडवर माझे सगळे मित्र जे रेग्युलर चेक-अप वगैरेच्या नादी लागले ते कायमचे चेक-अप आणि औषधांच्या चक्रात अडकलेत. दोघांच्या तर बायपास झाल्यात.
आता माझी पहिली कमेंट वाचा. गविनं त्याचा भलताच अर्थ (`कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे') काढला आहे.
वॉट आय मीन टू से, जसं पँकरीअस अकार्यक्षम न होऊ देणं (किंवा त्या पुन्हा कार्यक्षम करणं) हे इंशुलीन घेण्यापेक्षा श्रेयस आहे तसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत काही करता येईल का?
14 Feb 2013 - 3:15 pm | गवि
आँ? मला तर वाटलं की मी उलट छोटा सांकेतिक प्रतिसाद इंटरप्रीट करायला मदत करतो आहे. स्तनाचा नैसर्गिक उपयोग बाळासाठी दुग्धोत्पादन याकरिता असतो. अन्य कोणताही उपयोग केला तर तो नैसर्गिक उपयोग, अतएव "यूज इट ऑर लूज इट" तत्वाशी सुसंगत उपयोग ठरणार नाही अशी माझी समजूत आहे.
उलट मुद्दा इंटरप्रीट करुन झाल्यावर त्यात तथ्य असू शकेल (पक्षी: स्तनपान न करवणार्या स्त्रियांमधे हा धोका अधिक असू शकतो हे कदाचित वैद्यकीय सत्य असू शकेल) हे मी मान्य करुन फक्त त्यातली अव्यवहार्यता सुचवली. स्तनपानासाठी स्तनाचा उपयोग एका बाळाच्या बाबतीत मर्यादित काळच करता येतो. अर्थात हा नैसर्गिक उपयोग दीर्घकाळ करायचा (सो दॅट डिसयूज डज नॉट एंड अप इन लॉस) तर ठराविक काळाने मूल जन्माला आले पाहिजे (स्वतःला मूल झाल्यावरच दुग्धनिर्मिती होत असल्याने दत्तक मुलांचा उपयोग नाही..)
वगैरे.. अशी पुढे फक्त माझ्या मताची नोंद केली. भलताच अर्थ काढण्याचा उद्देश नाही.
दीर्घ स्पष्टीकरण समाप्त.. :)
14 Feb 2013 - 6:30 pm | संजय क्षीरसागर
पण उपाय प्रदीर्घ आहे इतकेच सांगून ११ शब्द संपवतो
15 Feb 2013 - 7:54 am | नगरीनिरंजन
धन्यवाद साहेब!
अनुवंशिकतेच्या तुमच्या मुद्द्याला अनुमोदन देणारी बातमी आजच आलीय पेपरमध्ये.
आता लवकरात लवकर जीनथेरपीचे तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे म्हणजे अनुवंशिकतेतून येणारे हे गुणसूत्रांमधले दोष दूर करता येतील.
15 Feb 2013 - 7:30 pm | शैलेन्द्र
प्रश्न असा आहे की आपण या सगळ्याशी किती खेळणार? मानवी शरीराच्या ब्ल्यु प्रिंटचेच संपादन करणे किंवा कट पेस्ट करणे अतिशय धोकादायक आहे.. सगळे आजार आपण बरे करु शकत नाही आणि मृत्यु ही अनिवार्यता आहे.
16 Feb 2013 - 7:42 am | नगरीनिरंजन
मृत्यु ही अनिवार्यता आहे आहे असं उघडपणे म्हणू नका साहेब, नाहीतर मॉडर्न मेडिसिनच काय संपूर्ण मानवी सिव्हिलायझेशन जस्टिफाय करणे अवघड होऊन बसेल.
17 Feb 2013 - 6:31 pm | शैलेन्द्र
:) .. मृत्युपासुन तात्पुरती सुटका आपण कोणती किंमत मोजून करवून घेणार हा प्रश्न आहे..
18 Feb 2013 - 12:08 am | सुबोध खरे
पिकले पान गळून पडणार हे कितीही सत्य असले तरी आपल्या आई आणि वडिलांच्या बाबतीत हे सत्य स्वीकारणे फार फार कठीण असते --ग दि माडगूळकर.
आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाबद्दल कोणाचीही कितीही किंमत मोजण्याची तयारी असते. म्हणूनच कर्करोग झाल्यास वेळेत उपचार करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करावा.त्यासाठी त्याबद्दल ज्ञान वाटणे/पसरविणे हे महत्त्वाचे आहे
18 Feb 2013 - 6:53 pm | शैलेन्द्र
डॉक्टरसाहेब, माझे उत्तर तुम्ही चुकीच्या संदर्भात पाहताय.
कॅन्सरचं नव्हे तर कोणत्याही रोगावर वेळेत व पुर्ण उपचार मिळणे हा मुलभूत मानवी अधिकार आहे. प्रश्न हा आहे की हे उपचार करताना मानवी शरीराची, ब्लुप्रिंट, म्हणजे त्याचा "जिनोम" त्याला छेडावे का? आपल्याला अजुन या रोगांमागचा त्यामागचा कार्यकरणभाव उमगत नाहीये, जे निव्वळ आनुवंशिकतेतून पसरतात. असं काय कारण असावं की निसर्गाने असे कॉम्बीनेशन्स उत्क्रांतीच्या प्रक्रियेतही तसेच ठेवले. कदाचित निसर्गाच्या दृष्टीने या चुका असाव्यात, व त्या पुढच्या पिढीत संक्रमित होवू नये म्हणुन निसर्ग त्या दुर करत असावा.. मानवी शरीरातला एकही रेणु विनाकारण नसतो हे तर तुम्हीही मान्य कराल, मग ही अशी चुक पेशीत का घडते?
माझा विरोध जिन थेरपीला मुख्यतः दोन कारणांसाठी आहे, एक तर तुम्ही सोमॅटीक थेरपी द्याल तेंव्हा कुठलीतरी जिन (किंवा आर एन ए) तुम्ही मास्क कराल, पण फक्त तितकीच जीन मास्क होईल याचा काय भरवसा?
जर्म लाईन ट्रीट्मेंट हा तर अजूनच मोठा घोळ आहे, कधितरी निवांत लिहील त्याबद्दल.
13 Feb 2013 - 11:22 pm | रेवती
पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या करायला उत्तेजन देतात का?
उत्तेजन देत नसावेत असे वरवर पाहता दिसते. मी दोन चार ओळखीच्या बायकांना विचारले तर त्यांना हा काय प्रकार असतो तेच माहित नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांची बाळंतपणे होऊन गेल्यावर वर्षानुवर्षे त्यांच्या कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत, त्यांची गरज आहे का?/ का आहे? हेही त्यांना माहित नव्हते. या सगळ्या उच्चशिक्षित, उच्चमध्यमवर्गीय स्त्रीया आहेत.
13 Feb 2013 - 11:50 pm | सुबोध खरे
दुर्दैवाने आपले कुटुंबाचे डॉक्टर आजच्या आपल्या ज्ञानास अद्ययावत ठेवण्याचे फारसे प्रयत्न ठेवीत नाहीत हे कटू परंतु सत्य आहे.
सैन्यात आम्हाला दर सात वर्षांनी २ किंवा ३ आठवड्याचा उजळणी कोर्स करण्यासाठी ए एफ एम सी पाठवत असत तेथे आतापर्यंत काय काय नवीन ज्ञान उपलब्ध आहे ते शिकवले जात असे आणि त्यानंतर त्याची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुण हे आपल्या पुढच्या बढती साठी मोजले जातात त्यामुळे सैन्यात डॉक्टराना ज्ञान अद्ययावत ठेवणे भाग पडते.सैन्यातून निवृत्त झाल्यावर बाहेर अशा तर्हेची कोणतीही पद्धत रूढ दिसत नाही त्यामुळे फक्त तज्ञ डॉक्टर आपापल्या विषयाचे ज्ञान अद्ययावत करताना आढळतात आणि त्यामुळे त्यानच्या आणि फामिली डॉक्टरांच्या ज्ञानातील तफावत वाढताना दिसते. यामुळेच आज वरील परिस्थिती उद्भवताना दिसते. यावर सोपा उपाय मला आज तरी दिसत नाही.
आपण आपल्या कारचा महिन्याचा हप्ता भारत असतो म्हणून त्याची वेळेवर तेलपाणी इ.(सर्विसिंग) केले जाते. आपल्या शरीराचा कोणताही हप्ता न भरल्याने (किंबहुना आपल्याला शरीर परमेश्वरा कडून फुकट मिळाल्यामुळे) त्याबद्दल चालढकल होत असते. मग स्त्रियाना हे संकोचाचे किंवा अडचणीचे वाटते. आणि जेवढे आवश्यक आहे तेवढाच विचार करावा या विचारसरणीमुळे काय करायचे आहे आपल्याला जेंव्हा गरज पडेल तेंव्हा बघू .या वृत्तीमुळे उच्च वर्गातील स्त्रिया सुद्धा या विषयात उदासीन दिसतात
15 Feb 2013 - 7:51 pm | आनंदी गोपाळ
डॉ. सुबोध,
माफ करा, आपल्यातले काही आळशी लोक स्वतःचे ज्ञान अद्ययावत करण्याचे कष्ट घेत नसतील तर, सर्वच डॉक्टरांवर ज्ञान अद्ययावत करण्याचे 'कंपल्शन' ऑलरेडी करण्यात आलेले आहे, व ही चांगली गोष्ट आहे, हे आपल्या व येथील सर्वांच्याच माहीतीसाठी इथे देवू इच्छीतो.
सैन्यातून निवृत्तीनंतर आपण महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी केली आहे काय? सध्या मेडीकल काऊन्सिल च्या नोंदणी नूतनीकरणासाठी दर वर्षी ६ सीएमई क्रेडीट पॉईंट कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. एक संपूर्ण दिवसाचा वर्कशॉप, ज्यात ६ तासांचे करंट मेडिकल एज्युकेशन (सीएमई) असलेले, व वक्ते अॅक्रेडिटेड बाय एमएमसी असतील तर १ सीएमई पॉइंट मिळतो. असे ६ पॉईंट प्रत्येक वर्षी हवेत. महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल रजिस्ट्रेशन शिवाय महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. दर ५ वर्षी लायसेन्स रिन्यू with 30 CME points.
गेल्या वर्षी ज्यांचे नूतनीकरण होते, त्यांना १२ पॉइंट आवश्यक होते. कारण २०१० पासून ही योजना कार्यान्वित झाली. -त्या आधी एम.एम.सी. (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल) प्रशासकाच्या ताब्यात असून डीफन्क्ट होती.-
सदर नूतनी करण व सीएमई क्रेडीट सर्व प्रकारच्या मॉडर्न मेडिसिन डॉक्टरांसाठी अनिवार्य आहे. म्हणजेच शिकत रहाणे आवश्यक. सीसीआयएम - सेंट्रल काऊन्सिल फॉर इंडियन मेडिसिन, जिच्या अखत्यारीत आयुर्वेद व होमिओ, युनानी हे लोक येतात, त्यांनीही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असल्याचे ऐकिवात आले, परंतू इम्प्लिमेंटेशन पहाण्यात आलेले नाही.
मॉडर्न मेडीसिनच्या कंटीन्यूड मेडीकल एज्युकेशन व रजिस्ट्रेशन रिन्युअल बद्दलची अधिक माहिती महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या नव्या वेबसाईटवर पहायला मिळेल.
15 Feb 2013 - 7:55 pm | आनंदी गोपाळ
ता. क. : सीएमई क्रेडीटसाठी अटेंड केलेले वर्कशॉप, कॉन्फरन्स इ. जर फार्मा कंपनी कडून स्पॉन्सर असतील, तर त्या ठिकाणी कितीही उच्च शिक्षण घेतले, तर त्यास प्वाइंट मिळत नाहीत ;) म्हणजेच, कंपनीच्या खर्चाने ट्रिप करून आले अन खोटे खोटे सर्टिफिकेट घेतले असे करता येत नाही. याचे इम्प्लिमेंटेशन बरेच कडक आहे.
- (आनंदी) डॉ. गोपाळ
15 Feb 2013 - 8:25 pm | सुबोध खरे
डॉक्टर साहेब
माझे महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे १९८७ सालीच नोंदणीकरण आहे आणि त्यानंतर माझे अधिक पदवीचे क्षकिरण तज्ञ म्हणून सुद्धा नोंदणीकरण आहे. माझे नोंदणीकरण अद्ययावत असून ते २०१७ पर्यंत केलेले आहे. दर वर्षी मी IMA ची विविध विषयांची व्याख्यानाला जात असतो त्याशिवाय IRIA (इंडियन रेडियोलोजिकल असो) च्या ४ दिवसाच्या CME दर वर्षी जातो त्यामुळे पुनरनोंदणीकरणाच्या वेळेस माझ्याकडे १२ ऐवजी ३६ points होते.शिवाय मी जेव्हा वक्ता म्हणून जातो तेंव्हा त्याचे २ points वेगळे मिळतात.
मुद्दा फक्त व्याख्यानाला हजर राहण्याचा नाही. त्याबरोबर देण्यात येणारे ज्ञान आत्मसात करण्याचा आहे. हि आधुनिक वैद्यकशास्त्राची परिस्थिती आहे. आयुष (आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी) ला अशी कोणतीही आत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती बोलूच नये.
या CME चा हेतू अत्यंत स्तुत्य आहे परंतु आपली भारतीय पद्धती पाहता लोक प्रत्यक्ष हजार असतात पण मानसिक दृष्ट्या फक्त ५०% तेथे असतात. असो.
15 Feb 2013 - 8:58 pm | विकास
सहमत.
लोकशिक्षण देणे गरजेचे आहे. मला होत असेल का याची कल्पना नाही, पण जसे पुर्वी कुटूंबनियोजन, एल आय सी वगैरेच्या संदर्भात खूप चांगल्या जाहीराती सरकार सतत दाखवत असे, त्याचा अंशतः परीणाम झाला आहे. तसे काही या संदर्भात होते का? (वार्षिक चाचणी वगैरे?)
15 Feb 2013 - 9:02 pm | विकास
उत्साहाने ते संस्थळ बघायला गेलो आणि होमपेजवर महत्वपूर्ण वाक्य दिसले:
This site is now discontinued :(
13 Feb 2013 - 8:58 pm | अनिवासि
खर तर धाग्याशी सरळ सम्बध नाही पण आजचा दिवसच असा निघाला आहे की लिहिल्याशिवाय राहवत नाही.
माझ्या एका मैत्रीणिला ३ एक वर्षापुर्वी नेहिमिच्या रुटीन तपासणीत स्तनाचा कर्क रोग असल्य्याचे कळले आणि यथाअवकाश तो स्तन कापावा लागला. त्या वेळची आणि नतरची तिची स्थीति पाहुन वाईट वाटत होते पण कोण काय करणार?
दोन आठवड्यापुर्वी ती परत hospital मध्ये तपासणीस गेली. काल निकाल येणार होते. रात्री व आज सकाळी तिचे फोन आले पण दुर्दैवानी मला घेता आले नाहीत. मशीन वर निरोपः गर्भाशयाचा कर्क रोग झाला आहे.
सकाळ्पासुन फोन करावयाचा प्रयत्न करत आहे- बहुतेक hospital मध्ये, मिपावर आलो आणि हा धागा पाहीला आणि मन मोकळे करुन घेतले.
सतत काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे सुबोध रावानी सान्गितलेच आहे- follow करा
14 Feb 2013 - 5:53 am | स्पंदना
अतिशय स्पष्ट शब्दात अन व्यवस्थीत लिहिलेला लेख!
माहीती आवडली. विशेषतः कर्क रोग डिटेक्ट व्हायच्या आधी सात वर्षे आपल्या शरीरात असतो हे वाचुन तर उडालेच मी.
14 Feb 2013 - 7:48 am | रुप्स
खुप छान माहीती !!!!
ईथे सुद्धा (ऑस्ट्रेलियात) दर २ वर्षानी पॅस्पस्मिअर टेस्ट करायला सांगतात, म्ह्णजे तसं पत्रच येते घरी (रिंमायडर म्हणून).
14 Feb 2013 - 9:51 am | शैलेन्द्र
अतिशय उत्त्तम लेख व तितकाच महत्वाचा विषय..
मॅमोग्राफी या थोड्याशा वेदनादायी व कठीण प्रकाराऐवजी www.breastlight.com हे उपकरण प्रत्येक स्त्रीरोग तज्ञाने जवळ ठेवायला हवे.. भारतात अवघ्या १०००० रुपयात हे उपलब्ध आहे..
14 Feb 2013 - 10:03 am | सुबोध खरे
साहेब
breastlight हे mammography च्या ऐवजी वापरण्याचे उपकरण नसून ते स्वयं तपासणीला(breast self examination)ला पूरक असे आहे. ते उपकरण बनवणार्या कंपनीच्या वेबसाईट वर तसे स्पष्ट म्हणले आहे. कृपया या दोन मध्ये गल्लत करू नये.
mammography हि बर्याच कालपासून सिद्ध झालेली चाचणी आहे आणि जोवर एखादी चाचणी त्यापेक्षा जास्त चांगली आहे हे सिद्ध होत नाही तोवर वापरणे धोक्याचे ठरू शकते.
14 Feb 2013 - 1:45 pm | शैलेन्द्र
मान्य.. ऐवजी या शब्दापेक्षा पुरक हा शब्द योग्य.. प्राथमिक तपासणीसाठी ही एक चांगली सोय ठरु शकते.
14 Feb 2013 - 7:42 pm | पिलीयन रायडर
खुप छान लेख..
एक प्रश्न..
आपण जर बर्याच हॉस्पिटल चे "फुल बॉडी चेक अप पॅकेजेस" पाहिले तर त्यात बर्याच अनावश्यक टेस्टही दिसतात. तर नक्की ३५-४० नंतर स्त्रियांनी कोण्-कोणत्या टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे?
14 Feb 2013 - 10:08 pm | जेनी...
सुंदर धागा ... एकदम बॅलन्स्ड चर्चा ...
वाचतेय ....
सगळ्यांना लेखनासाठी थँक्स ... :)
15 Feb 2013 - 6:45 pm | चिगो
धन्यवाद, डॉक्टरसाहेब..
15 Feb 2013 - 8:06 pm | आनंदी गोपाळ
व सुंदर चर्चा. उपयुक्त माहीती देऊन चर्चा घडवून आणल्याबद्दल डॉ. सुबोध यांना धन्यवाद.
नेट-कन्सल्टेशन्स टाळल्याबद्दल डॉक्टरसाहेबांचे विषेश अभिनंदन.
15 Feb 2013 - 10:23 pm | बहुगुणी
(डॉ. खरे: धागा पाहिल्यादिवशीच आपल्याला व्य नि पाठवला होता, आपण पाहिलेला नसावा असं वाटतं म्हणून इथे कळवतो आहे, जमल्यास उत्तर द्या.)
16 Feb 2013 - 7:13 pm | सुबोध खरे
.
18 Feb 2013 - 1:56 am | सुकामेवा
आमच्या मातोश्रीना सुद्धा स्तनाचा कर्करोग झाला होता व त्यामुळेच तिचे निधन झाले.
स्वत: कडे दुर्लक्ष केल्यामुळे आईला फार त्रास झाला,
मला आणि माझ्या भावाला , तो तिला होणारा त्रास बघून जो त्रास झाला तो शब्दात सांगता येणार नाही.
तरी सर्वाना नम्र विनंति कि या कडे दुर्लक्ष न करता, स्वत:वर वेळेत उपचार करून घेऊन आपला जीव व पैसे दोन्ही वाचवावेत .
18 Feb 2013 - 9:00 pm | सुबोध खरे
मानवी शरीरात एकही रेणू अनुपयुक्त नसतो हे सत्य नाही. जर आपण हे पहिले कि ८०% फलित बीजांडे नाहीशी होतात आणि फक्त २०% बीजांडाची वाढ होऊन गर्भ तयार होतो. ज्यावेळी गुण सुत्रांचे विभाजन होते तेंव्हा त्यात बऱ्याच चुका होतात. यातल्या ज्या चुका लहान असतात त्या पुढच्या पिढीत उतरतात ज्या चुका गंभीर असतात ते गर्भ जगत नाहीत आणि म्हणूनच ८०% गर्भ हे पडून जातात(गर्भपात होतो)
स्तनांच्या कर्करोगावर आपण सध्या करतो ती जीन थेरेपी नाही आपण फक्त शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडियो थेरेपी आहे.
19 Feb 2013 - 12:49 am | शैलेन्द्र
बरोबर, पण माझं उत्तर हे जीन थेरपीच्या संदर्भात होतं.
गुणसुत्रांचे नुस्तेच विभाजन नव्हे तर पुनर्मीलन होताना जास्त चुका होतात.
19 Feb 2013 - 7:25 am | नगरीनिरंजन
या विभाजन-पुनर्मीलनाच्या चुका माणसाच्या लक्षावधी वर्षांच्या अस्तित्वात पहिल्यापासून होतच आलेल्या असणार. मग त्यांचं प्रमाण वाढतंय किंवा वाढणार आहे असं म्हणण्यासाठी आधार काय? पूर्वी अशा चुका झालेले जीव टिकत नव्हते आणि आता आपण कृत्रिम उपायांनी त्यांना जगवतोय असं काही आहे काय? की पूर्वीही लोक कॅन्सरनेच मरायचे पण तेव्हा ते कॅन्सरने मेले हे कळत नव्हते?
ही लिंक पाहा: Cancer Epidemic Infographic
19 Feb 2013 - 10:39 am | शैलेन्द्र
जीन थेरपीवर माझा अगदी हाच आक्शेप आहे..
19 Feb 2013 - 7:26 pm | सुबोध खरे
जवळजवळ ८० % गर्भ हे पहिल्या १० आठवड्यात नष्ट होत असतात त्यावर १९८०-९० या दशकात खूप मोठ्या प्रमाणात संप्रेरके(hormones) देऊन ते जीव जागवण्याचे प्रयत्न झाले परंतु हे सर्व जागवलेले जीव मोठ्या प्रमाणात व्यंग असलेले होते यामुळे १९९० नंतर हे प्रयत्न थांबवले गेले आणि जे गर्भ निकोप आहेत ते जगतील अन्यथा गर्भपात होईल ते होऊ द्यावे अस विचार पुढे आला.
साध्या शब्दात आंबा सडका असेल तर तो पडू द्या झाडाला चिकटवण्याचा प्रयत्न करू नका.
पूर्वी सुद्धा लोक कर्करोगाने मरत होते (इजिप्त च्या ममी मध्ये कर्करोग सापडले आहेत) पण तेंव्हा आपल्याला कारणे माहित नव्हती म्हणून वैर्याने मूठ मारली. अमक्याने कारणी केली आणि तो रक्त ओकून मेला असे समजत असत.
20 Feb 2013 - 1:46 pm | वाहीदा
बर्याचश्या गोष्टी आम्ही डॉक्टरांस सांगण्यासही लाजतो,
विचारायचे कसे तेच कळत नाही अन गोंधळ आणखीन वाढतो.
तुमच्या लेखाने मा़झे खुपसे गैरसमज दुर केले , धन्यवाद !!
~ वाहीदा
20 Feb 2013 - 1:52 pm | वाहीदा
डॉक्टर खरे, नमस्कार !
आपण कदाचित व्यनी पाहीला नाही म्हणून येथे टंकत आहे.
कृपया व्यनीचे उत्तर देणे .
~ वाहीदा
20 Feb 2013 - 7:51 pm | सुबोध खरे
वाहीदाताई,
मी सिनेमाला गेलो होतो म्हणून आपला व्य नि पहिला नाही. उत्तर दिले आहे.आपण कोणताही प्रश्न निस्संकोच पणे विचारावा.डॉक्टर आणी वकीलापासून काहीही लपवू नये कारण त्याने आपलाच तोटा होतो. व्य नि पाठविला आहे
21 Feb 2013 - 10:41 am | वाहीदा
व्यनीत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले धन्यवाद !
~ वाहीदा
21 Feb 2013 - 1:25 pm | सुबोध खरे
काही लोकांच्या शंकांसाठी मी एक साधारण माहिती देत आहे
स्तनातील प्रत्येक गाठ हि कर्करोगाची नसते. खर तर फक्त ५-६% गाठी या कर्करोगाच्या असतात. पण एखादी गाठ आपल्याला नवीन जाणवली असेल किंवा अगोदर असलेली गाठ जर मोठी झाली असेल तर जरूर डॉक्टर न दाखवावी.
जर आपल्याला जास्त काळजी वाटत असेल तर माझा सल्ला असा आहे कि आपण टाटा कर्करोग रुग्णालयात जाऊन पूर्ण शरीराची तपासणी करून घ्या हि तपासणी सुमारे ७००-१४०० रुपयात होते आणी ती अनुभवी डॉक्टर कडून होत असल्याने जास्ती खात्रीची असते.त्याची माहिती https://tmc.gov.in/medical/departments/popup/css.htm येथे मिळेल. त्यांचा दूरध्वनी +91-22-24177000, +91-22-24146750 - 55 असा आहे.
स्तनाच्या कर्क रोगाबद्दल लोकजागृती खालील स्थळावर मिळेल
https://tmc.gov.in/cancerinfo/breast/Popup/Awareness.html
https://tmc.gov.in/medical/departments/popup/css.htm