येशील?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
8 Jan 2013 - 2:31 pm

अजुनही आठवतंय...
सुंदर पुरीया रंगलेला असतांना
कटकन सतारीची एकचं तार तुटावी
असे काहीतरी झाले होते
-----
तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं
मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो
घरभर पानचं पानं आणि मध्ये मी
----
अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस
मला चंद्रचं हवाय
त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन
खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता
तेव्हा कुठे समाधान झाले तुझे
ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात
त्या कागदाच्या चंद्रावरची कविता
ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय...
-----
दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना
डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या
एकाने मला बांधून टाकले आणि
दुसरा तुझ्या गालावरून चरचरत
ओठांवर आला होता
तोंड फिरवून तो गिळतांना
तुझ्या बटांनी जी जीवघेणी हालचाल केली होती !
कां कोण जाणे पण आता
माझ्या बाजूला पडलेल्या या कवितेच्या
शाईचा रंग त्याच बटेसारखा झालाय
तपकिरी...
------
आत्ता या क्षणी हातात आहे ती कविता आहे
जेव्हा तुझं माझं पहिलं भांडण झालं होतं
किती झरझर उतरली होती ही कविता
ती वाचल्यावर जी घट्ट मिठी मारली होतीस
जिवाचा ठाव घेऊन गेले होते ते शब्द
'वेडा! इतकं कां कोणी मनाला लावून घेतं असतं?'
पिसासारखा हलका हलका झालो होतो..
-----
आणि ही, त्या मीठ जास्त झालेल्या भाजीवरची
लटकीचं पण किती ती चिडचिड?
मला इकडे हसू आवरेना आणि तुला तिकडे राग
तयार झाल्यावर तुला वाचायला दिली तर
तुझ्या कानामागच्या तिळाची उपमा
त्या भाजीला दिलेली पाहून
तुझीही हसून हसून मुरकुंडी उडाली होती
पार डोळ्यांतून पाणी येईस्तोवर हसलो होतो आपण
आता तीच कविता परत माझ्या डोळ्यातून
पाणि काढतेय...
-----
मला माहीत आहे
शक्य नाहीये तुला
पण एकदाच परत येशील?
माझ्यासाठी नको...
पण निदान
त्या कागदाच्या चंद्रासाठी
नाहीतर
त्या मीठ जास्त झालेल्या भाजीसाठी
सांग ना... येशील?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०१/२०१३)

करुणशांतरसकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

गवि's picture

8 Jan 2013 - 2:38 pm | गवि

टचिंग आहे.

करुण रस योग्यच, पण शांत रस नाही, अस्वस्थरस आहे..

समयांत's picture

8 Jan 2013 - 3:53 pm | समयांत

आपल्याला आवडलंय हे..;)

सव्यसाची's picture

8 Jan 2013 - 4:23 pm | सव्यसाची

एकदम मस्त..

वपाडाव's picture

8 Jan 2013 - 5:07 pm | वपाडाव

मिक्या, लेका तु यार लैच्च हळवं करायलाइस बग... आस्सं कर नोक रं... दुखतंय इक्डं???

+१११११११११११११११११११११११११

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2013 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११

मागल्या वेळी चुप्प अन या वेळी येशील?
तेच म्हणतोय. मिका फार हळवं नको करू बाबा.

संजय क्षीरसागर's picture

8 Jan 2013 - 11:43 pm | संजय क्षीरसागर

असाच लिहित रहा.

सुचेल तसं's picture

9 Jan 2013 - 12:55 am | सुचेल तसं

बोजड शब्द टाळून ह्रदयाला भिडणारी कविता लिहिलीत.

पैसा's picture

9 Jan 2013 - 9:23 am | पैसा

कविता आवडली.

चाणक्य's picture

9 Jan 2013 - 3:45 pm | चाणक्य

लई भारी. काळजालाच हात घातलास

इन्दुसुता's picture

10 Jan 2013 - 12:15 am | इन्दुसुता

रंजीश ही सही ( मला वाटते असे लिहायचे असते... पण उर्दू येत नाही त्यामुळे नक्की माहिती नाही :( )
दिल ही दुखानेके लिये आ....
या आर्त गझलेची आठवण झाली.

जेनी...'s picture

10 Jan 2013 - 12:27 am | जेनी...

कविता आवडली .... पण .

एक कडवं खटकलं . ते चंद्र हवाय वालं ...

म्हणजे वाचुन क्षणभर वाटलं ... हि नक्कि कुनासाठी लिहिलिय ?? २२ कि २ वयवर्षे ??

बाकिच्या सगळ्या ओळी खुप खुप आवडल्या .

अगदी आत पोचल्या .

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Jan 2013 - 8:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी

पूजातै, वय वर्षे २ ते वय वर्षे ९२ या सर्व वयोगटातील लोकांना चंद्राचे आकर्षण असते, असे आपले माझे मत.
फक्त त्या आकर्षणातील मायने बदलतात इतकेच.
बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

स्पंदना's picture

10 Jan 2013 - 9:24 am | स्पंदना

हे चंद्र मागण, एक बालिशपणा असतो जो अगदी जिवाभावाचा असेल तोच पूरवतो. चंद्र मागण हे एक कारण, निमित्त्य. खर मागणं वेगळच असत, तूझ्यासवे उभा रहाताना जी मॅच्युरिटीची, सहगामिनीची अपेक्षा तू करतोस तशीच मला या बालीश रुपातही स्विकारशील का? हा चॅलेंज असतो.
अन बिलिव्ह मी पूजा, मोठमोठ्या घटनांनी जो फरक पडणार नाही, जे नात विणल जाणार नाही ते साध्य होत या बालिश, बिन खर्चिक हट्टातून असल्या प्रसंगातून. हे असले हट्ट पूरवायला एखाद्याच त्या व्यक्तीवर इतक प्रेम असाव लागत की बस. तसेही असले हट्ट तुम्हाला पैशाची, ऐशोआरामाची मागणी नाही करत, ते करतात मागणी ती तुमच्या मनातून तुम्ही खरच माझ्यावर प्रेम करता का या पूराव्याची. अन तो देता येतो या असल्या बालिश निरागस आनंदातुनच. बघ विचार कर. प्रेमिका वेगळी. ती दोन तास भेटुन परत जाते, तुम्ही मोकळे असता तिथुन पुढे. बायको वेगळी ती २४ तास तुमच्याबरोबर रहाणार. अन मग सारं सारं शेअर कराव लागत. त्याची तयारी होते ती या असल्या बालिश हट्टातूनच.

चाणक्य's picture

10 Jan 2013 - 9:38 am | चाणक्य

आवडला

पाषाणभेद's picture

10 Jan 2013 - 9:42 am | पाषाणभेद

क्या बात है!! एकदम काव्यमय प्रतिसाद.

'मुक्तछंद काव्य हे जरी गद्यासारखे 'लिहीलेले' असले तरी त्यातील भावना मुख्यत्वे काव्यमय असाव्यात/ असतात' असा अर्थबोध होणारा लेख श्री. रमेश तेंडूलकर (त्यांचा मुलगा सचिन तेंडूलकरांचे आहे ते!) यांचा आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.
ताई तुमचा वरील प्रतिसाद मला त्याच प्रतिभेशी मिळताजुळता वाटला. खुप खुप बरे वाटले.

कवितेच्याच सुरात लागलेला मस्त प्रतिसाद.. :)

बॅटमॅन's picture

10 Jan 2013 - 4:37 pm | बॅटमॅन

वाह क्या बात है!!!!!!

वपाडाव's picture

10 Jan 2013 - 5:16 pm | वपाडाव

Standing Ovation
.o.
\ /
||
/ \

जेनी...'s picture

10 Jan 2013 - 9:54 pm | जेनी...

वॉव अप्पु !

पण खरच कुणी असं असतं का?? इतक्या बालिश हट्टाला वेड्यात न काढणारं ???

स्पंदना's picture

11 Jan 2013 - 7:52 am | स्पंदना

त्याला वेव्हलेंग्थ जुळण म्हणतात.
एक कविता आहे,
तू खुळा मी खुळी
आपली मुले खुळखुळी"

सांगु का? नवरा बायको हे नातं एकमेकाशी अगदी घट्ट जुळतं ते खेळकरपणानेच.
बघ अजुन वेळ हातचा गेला नाही आहे, आत्ता कुठे पहाट होतेय. ट्राय इट & एंजॉय!

शुचि's picture

10 Jan 2013 - 12:34 am | शुचि

केवढी सुंदर कविता!

पियुशा's picture

10 Jan 2013 - 9:47 am | पियुशा

तुस्सी छा गये मि.का.जी :)

इनिगोय's picture

10 Jan 2013 - 4:37 pm | इनिगोय

कविता सुरेख.. एकदम गुलजार यांच्या मेरा कुछ सामान स्टाईल.

वपाडाव's picture

10 Jan 2013 - 5:21 pm | वपाडाव

नसतेस घरी तु जेव्हा आठौले यार...
संमंना विनंती :: प्लीज, प्लीज, प्लीज.. असलं साहित्य लपवुन ठेवण्यात यावं, नाहीतर जखमा लैच्च भळभळुन वाहतात !!!

१००मित्र's picture

10 Jan 2013 - 5:47 pm | १००मित्र

भार्री ....

इनिगोय's picture

5 Apr 2013 - 2:06 pm | इनिगोय

या मिकाचं साहित्य लपवून ठेवण्यात यावं.. अगदी अगदी.

इष्टुर फाकडा's picture

10 Jan 2013 - 8:14 pm | इष्टुर फाकडा

उद्या शुक्रवार आहे...उद्याच वाचली असती तर बरं झालं असतं...तुम्ही लिहित राहा, काव्य विभागात त्यामुळे पुन्हा पुन्हा येणं होईल. अन्यथा तो अमुचा प्रांत नव्हे.

फिझा's picture

30 Jan 2013 - 11:15 am | फिझा

आवड्लि!!

सांजसंध्या's picture

30 Jan 2013 - 2:51 pm | सांजसंध्या

वाह !

क्रान्ति's picture

30 Jan 2013 - 10:36 pm | क्रान्ति

जैसे झन्नाके चटख जाये किसी साज का इक तार
जैसे रेशम की किसी डोर से कट जाती है उँगली
ऐसे इक जर्ब सी पडती है
कही सीने के अंदर
खींचकर तोडनी पड जाती है जब तुझसे निगाहें

तेरे जाने की घडी . . .
बडी सक्त घडी है !

गुलजार

ही कविता वाचून अगदी असंच काही वाटलं. अप्रतिम कविता!

प्रसाद गोडबोले's picture

5 Feb 2013 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

मिका , मी तुमच्या कवितांची फ्यॅन झाली आहे हे ह्या कवितेच्या निमित्ताने नमुद करु इछिते !

प्यारे१'s picture

5 Feb 2013 - 2:33 pm | प्यारे१

खूपच टची! हॅट्स ऑफ.

आपाताईला पण सलाम!
वप्याला 'सावधानताही बचाव है' एवढंच म्हणतो!

आगाऊ म्हादया......'s picture

3 Apr 2013 - 9:01 pm | आगाऊ म्हादया......

मिका ठाव घेतलास रे हृदयाचा ...मस्तच...पुन्हा पुन्हा वाचतोय .

कविता आवडली, खुपच छान झाली आहे....!