आठवणी चित्रलुब्धाच्या ! (रीळ १)

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
2 Dec 2012 - 8:53 am

मिपाकर मित्रानो,
ह्या धाग्याचा मथळा वाचताना आपल्याला सर्वाना असे वाटणे साहजिकच आहे की या आठवणी चित्रकार व कलाकृती या विषयी असतील. यात डाली, रेम्ब्रा, दलाल, मुळगावकर, रेहमान, हळदणकर, एसेम पंडित ते मुरली लाहोटी , सुभाष अवचट अशांचे उल्ल्लेख व त्यांच्या कलाकारीचा आस्वाद असे काही असेल.असे मात्र नाही.

चित्रपटात मुख्य काम हे कथनाचे असते पण त्याचे माध्यम मुख्यत्वे चित्र हेच असते. त्यात ध्वनीला फारच मोठा अर्थ आहे तरीही मुख्य तंत्र चित्राधिष्ठित च असते. म्हणून हा मथळा. आपल्याही काही आठवणी या आठवणीशी तादात्म्य पावतील अशी आशा आहे.

************************************************

१९६२ साली मी नउ वर्षाचा होतो. दुसरा यत्त्तेत वाई येथे. पुण्याच्या पानशेत पुराचे १९६१ हे वरीस मागे पडले होते व चीनची भारतावर स्वारी. भाई भाई म्हणत शेजार्‍याने केलेला घात हे सारे चालू झाले होते. वाई येथील न्यू चित्रा चे व्यवस्थापक वडीलांचे जिगरी बालमित्र सबब आम्हास सिनेमे पहाण्यास पैसे द्यावे लागायचे नाहीत.त्या टॉकीज मधे सकाळी काही इंग्रजी चित्रे दाखविणे चालू झाले होते. १९६१ ला " गन्स ऑफ नॅवरोन " हा चित्रपट आला असला तरी तालुक्याचा गावाला तो लागण्याची शक्यताच नव्हती. आपल्याला इंग्रजी सिनेमे पहाण्याचे पुढे वेडच लागणार आहे याची सुतरामही कल्पना बालवयात नव्हती. मुलांना पहाण्यास योग्य अशा Tom Thumb या चित्राने माझ्या या नादाची सुरूवात झाली. अंगठ्याएवढा टॉम नावाचा मुलगा व त्याचे जग असा काहीसा त्या चित्रपटाचा विषय होता. मध्यंतरी आलेला "हनी आय श्रंक द किडस " अशा सारखी मौज त्यात होती.त्यानंतर ची आठवण God zila या चित्रपटाची हे चित्र कृष्णधवल होते. यात सारे जग लहान तर खलनायक राक्षसी आकाराचा विचित्र प्राणी. तोडाने कधी वायू तर कधी अग्नि फेकणारा. सारे जग हवालदिल अशी काहीशी त्याची कथा होती.

१९६३ च्या मे महिन्यात २७ मे ला पं, नेहरूंचे निधन झाले त्याच दिवशी आम्ही तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित झालो.
तिथेही ओपन एअर थेटर होते व सकाळी इंग्रजी चित्रपट दाखविण्याची तळेगावातही सोय झाली होती. ५० नवे पैसे तिकिटाचा दर व जमीनीवर बसून सिनेमा पहायचा अशी पद्धत. मग काय तिथे F B I Code 98 , Steal claw हे गुन्हेगारी विषय असलेले सिनेमे पाहिले व आयुष्यातील पहिला भयपट पाहिला त्याचे नाव House of wax . एक माणुस कलाकार असतो पण माणसे मारणे व त्यावर मेणाचा थर टाकून त्यांचे पुतळे बनविणे व त्याचे प्रदर्शनार्थ एक वास्तू बाधलेली असा काहीसा प्लॉट होता. त्याला स्वता: लाच कोणीतरी आगीत विद्र्प केलेले असते व सूड म्हणून तो हे सारे करीत असतो म्हणे.

मग माझ्या छंदात एक वळण आले.

मी अकरावीची परिक्षा चांगल्या मार्काने पास झालो बक्षिस या स्वरूपात वडीलानी पुण्यात जाऊन सिनेमा पहाण्यास परवानगी दिली व कॅमी कंपनीचे एक घड्याळ दिले. पुण्यात पोलीस ग्राउंडसमोर एक अत्याधुनिक थेटर बाधले गेले होते. त्याचे उदघाटनाचा म्हणून Winning हा चित्रपट लागला होता. राहुल ७० एमेम हे चित्रगृहाचे नाव होते. त्यावेळी राहुलचे दर दीड रूपया , ड्रेस सर्कल २ रूपए व बालक्नी अडीच रूपये असे होते. सिक्स ट्रॅक स्टीरिओ व आडवा ३० फूट रूंदीचा पडदा, आरामदायी आसने, बाहेर मस्त फॉयर अशी रचना. पॉल न्युमन त्याचीच पत्नी जोन वूडवर्ड व रॉबर्ट वॅग्नर यांच्या त्यात भूमिका होत्या. थ्ररारक मोटार शर्यती. चौफेर साउंड इफेक्ट्स हा मामला पुणेकाराना नवीनच होता. ( त्या अगोदर एओ टॉड अशी नावाचा सिनेमास्कोप पडदा पुणे येथील अलंकार चित्रगृहात आलेला होता ) शर्यतीत जिकण्याचे स्वप्न पहाताना पत्नीला तो वेळ देऊ शकत नाही व संबंधात तणाव उत्पन्न्न होतो असे कथानक असल्याचे आठवते.

कॉलेज साठी पुण्यात एका वसतिगृहात राहू लागलो.वडिलानी दर महिन्याला दिलेल्या पैशातून सिनेमे पहाणे चालू झाले. हिंदी सिनेमे पहात होतोच पण आकर्षण जास्त करून इंग्रजी सिनेमाचे. संवाद काही जाम कळत नसत. इतर हसले की आप़ण जर हसलो नाही तर शरमल्यासारखे व्हायचे. त्यावेळी जिमखान्यावर हिदविजय नावाचे पुण्यातील प्रतिष्टित थेटर Casanova 70 नावाचा सिनेमा तिथे लागला होता. कॉलेजचे आय कार्ड दाखविले तरच " प्रौढ" समजत असत व प्रवेश मिळे. मध्ययुगीन युरोपात कॅसानोव्हा नावाचा प्रेमवीर होउन गेला. त्याचेच ७० सालातले रूप या चित्रपटात दाखविण्यात आले होते. त्यावेळचा सुप्रसिद्ध इटालियन मार्सेलो मॅस्ट्रीयानी याने प्रेमवीराचे भूमिका मस्त केली होती. पुढे याच ठिकाणी याच नटाचा सोफिया लोरेन या इटालियन अभिनेत्रीबरोबरचा Sunflower हा महायुद्धाच्या पार्शवभूमीवरची प्रेमकथा असे स्वरूप असलेला सिनेमा पाहिला. हिदविजय मात्र लवकरच नुतनीकरणासाठी पाडण्यात आले. विदेशी सिनेमे पाहाण्यासाठी अलका राहुल ई थेट्ररे सज्ज होतीच. भानुविलास , विजयानंद, य जुनाट थेटरांचा उपयोग मॅटिनी शोसाठी होत असायचा.

क्रमशः

हे ठिकाणआस्वादलेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2012 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिली रीळ छान. आठवणी वाचतोय.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

2 Dec 2012 - 10:28 am | श्रीरंग_जोशी

१९६३ च्या मे महिन्यात २७ मे ला पं, नेहरूंचे निधन झाले

पंडीतजींचे निधन २७ मे १९६४ ला झाले.

सविस्तर प्रतिसाद सवडीने...

चौकटराजा's picture

2 Dec 2012 - 10:37 am | चौकटराजा

रंगा ,दुरुस्तीबद्द्ल धन्यवाद !

आठवणीतला सिनेमा छान रंगवला आहे.
आमचं सिनेमाविश्व सुरु झालं अमिताभ युगापासून !
आता मात्र टीव्हीवरचे निवडक सिनेमेच फक्त पाहते. थेटरात जाऊन वर्षे लोटली.

प्रचेतस's picture

2 Dec 2012 - 12:47 pm | प्रचेतस

पहिला भाग मस्तच.
थियेटरवर पाहिलेला पहिला चित्रपट तो अमिताभचा 'महान'. पिंपरीतल्या विशाल थिएटरचे उद्धाटन याच सिनेमाने झाले. अतिशय पुसटशी अशी ती आठवण नंतर मग पुण्यात एकदा विजयला 'किंगकाँग' बघणे झाले. पण पिंपरीतल्याच डिलक्स, अशोकच्या वाटेला फारसे कधी गेलो नाही.

पैसा's picture

2 Dec 2012 - 1:57 pm | पैसा

पुढची रिळे पहायची उत्सुकता आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2012 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा

ह्यो शिनूमा आवडला हाय.... अता फुडच्याची वाट बघ्तुया........ :-)

चित्रगुप्त's picture

3 Dec 2012 - 6:38 am | चित्रगुप्त

वा वा छान विषय घेतलात.
लहान असता इंदुरात 'स्टारलिट' या एकाच थेटरात इंग्रजी चित्रपट लागत. माझे काका या सिनेमांचे शौकीन आसल्याने ते आम्हा भावंडांनाही नेत. 'दुवन्नी' म्हणजे दोन आणे तिकिटात लाकडी बाकड्यांवर बसून काही सिनेमे बघितले. तुम्ही लिहिलेल्यांपैकी 'गन्स ऑफ नॅवरोन' ((देव आनंद हा यातील 'ग्रेगरी पेक'ची नक्कल करायचा, असे ऐकून होतो) 'हाऊस ऑफ वॅक्स' तसेच जॉन वेन चे बरेच सिनेमे बघितल्याचे आठवते. तसेच त्याकाळी अख्य्ख्या इंदुरात 'हॉट डॉग' मिळण्याचे एकमेव ठिकाण, म्हणजे हेच 'स्टारलिट'. हा 'हॉट डॉग' म्हणजे खरेतर 'वडापाव' असायचा, पण त्याचे भारीच कौतुक वाटायचे.

त्याकाळी इंदुरात नसलेली, पण पुण्यात असलेली सोय म्हणजे 'रेकॉर्ड-लायब्ररी'. पुण्याला गेल्यावर मुद्दाम खडकीहून पुण्यात सायकलने जाऊन पंधरा पैसे एका गाण्याला, या दराने ओपी नय्यर यांची दहा-बारा गाणी ऐकून अगदी तृप्त तृप्त होऊन त्या धुंदीत सायकल हाणत घरी परतायचो. इतक्या कष्टाने (व महाग) ही गाणी ऐकायला मिळत, त्यामुळे त्यांचे मूल्य फार वाटायचे. (इंदूरहून पुण्याला प्रवासासाठी निघताना एकूण वीसेक रुपये घेतलेले असायचे. त्याकाळच्या डायरीत रोज रात्री हिशेब करून आता बारा रुपये सत्त्याऐंशी पैसे उरले, वगैरे वाचायला आता फार मजा वाटते).

तुमचा पुढील चित्रलुब्ध प्रवास-रीळे बघण्या-वाचण्याची उत्सुकता आहेच.त्या त्या सिनेमांची पोस्टर्स पण धाग्यात द्यावीत, ही विनंती. जुनी पोस्टर्स बघण्यातही मौज वाटते.

house1 wax4 guns
tom casa sun

चौकटराजा's picture

3 Dec 2012 - 7:13 am | चौकटराजा

चित्रगुप्तजी धागा म्हणजे एक विषय व त्याचे वर नुसतेच लाईक अनलाईक असे प्रैतिसाद न येता विषयाचा इतरांकडून विस्तार विविध अंगाने, हा माझा धाग्याविषयीचा आदर्श आहे. असे मिपावर होताना दिसत नाही पण आपला प्रतिसाद खरे तर विस्तार पाहून धन्य झालो. जालावर पोस्टर आहेत हे समजले आता पुढचे धागे पोस्टर सकट ! पुन्हा येकदा टांकू !

अशा प्रकारचे गतकाळरंजन आवडले, धन्यवाद.

एवढे जुने चित्रपट आंतरजाल सोडुन इतर कुठे उपलब्ध होत असतात का ?

चौकटराजा साहेब, लेख मस्त झाला आहे.

चित्रपट काय किंवा नाटक अथवा टेलिव्हिजन ही इतकी सशक्त माध्यम आहेत की त्यांचा जनमानसावर पडणारा प्रभाव हा वादातित असतो.

रामदास's picture

4 Dec 2012 - 12:03 pm | रामदास

वाट बघतो आहे.छान सुरुवात
वडिलानी दर महिन्याला दिलेल्या पैशातून सिनेमे पहाणे चालू झाले. हा रुट ओळखीचा वाटतो आहे.
सिनेमा आणि गाणी याविषयी लेखांचा सिझन पुन्हा एकदा आलेला दिसतो आहे.
कालच रवींद्र रुपन यांचा लेख वाचला आज तुमचा .
सिझन तिकीट काढून बसलो आहे.