यमन

चेतन माने's picture
चेतन माने in जनातलं, मनातलं
23 Nov 2012 - 5:17 pm

हल्ली संध्यकाळी मस्त गार वारे सुटतायत. असच अचानक त्या दिवशी ते सूर पुन्हा मनात घुमू लागले. आतल्या आवाजामुळे त्या संध्येचे रंग अजून खुलू लागले. मला संगीतातलं शास्त्र खरच कळत नाही पण हि सुरावट माझ्या मनात एकदम पक्कं घर करून राहिलिये. शाळा-कॉलेज च्या वयात असताना फिल्मी गाणी, खास करून हिंदी ऐकायची खूप सवय पण फार तर फार समजले तर शब्द कळणार. आणखी गाण्यात काय ऐकण्यासारखं असत? असं मला वाटायचं . आता एक-दोन वर्षापूर्वी थोडी थोडी मराठी गाणी ऐकायला लागलो .
मराठी वाहिनीवर आलेल्या एका प्रसिद्ध स्पर्धेत तर अजून बरीच गाणी ऐकायला मिळाली. त्यातूनच ऐकायची सवय लागली, आणि प्रश्न पडू लागले का लोकं मधेच गाण्याला दाद देतात? वाहवा आणि मधेच टाळया का पडतात ?
ह्या प्रश्नांमुळे गाणी अजूनच बारकाईने ऐकू लागलो . हळू-हळू रोजची सवयच पडली आणि उगाचच कधीही न उघडलेले pc मधले फोल्डर उघडू लागलो. भक्ती संगीत , नाट्य संगीत प्रकार ऐकू लागलो . लहानपणी भीमसेन जींचे बरेच अभंग ऐकलेले होते. पण फक्त ते आवाज कानावर पडायचे त्यातून न भक्ती न अर्थ काहीच कळायच नाही. पण तेव्हा ऐकलेले असल्यामुळे आता पुन्हा ऐकताना वेगळच जाणवू लागल.
भीमसेनजींचे दोन अभंग मला फारच आवडले. एक "अधिक देखणे तरी" आणि दुसरा "नामाचा गजर गर्जे भीमातीर". पुन्हा पुन्हा ऐकून असं जाणवू लागलं कि ह्या दोन अभंगांमध्ये काहीतरी साम्य आहे, पण ते काय आहे ते लक्ष्यात येत नव्हत. मग विचार आला कि आंतरजालाचा वापर करून बघूया आणि ह्या दोन अभंगांची माहिती मिळते का ते पाहिलं . एका संकेत स्थळावर माहिती भेटली ती म्हणजे अशी कि त्यांच्यात एक साम्य आहे -- राग . हा राग आहे "यमन "(आपल्यापैकी बर्याच जणांना माहित असलेच ) . अजून माहिती घेतली कि, हा राग म्हणजे काय प्रकार असतो. पुन्हा पुन्हा youtube वरचे video बघितले . आणि हळू हळू फक्त तेवढेच सूर मनात पक्के होत गेले. आणखी शोध घेत गेलो आणि लक्षात आल कि जवळपास बऱ्याचश्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये यमन भरून राहिला आहे!!!

शास्त्रीय संगीतात बर्याचदा पहिला राग यमनच शिकवतात आणि योगायोगाने मी ऐकलेला (मला कळलेला असं म्हणणार नाही)राग यमनच आहे हे समजल्यावर फारच आनंद झाला .
शास्त्रीय माहितीतून काही थोड्याफार गोष्टी समजल्या.
यमन हा फार जुना राग आहे किती ते माहित नाही.
काही ठिकाणी ह्याला राग कल्याणी असाही ओळखलं जात.
यमन एक थाट राग आहे म्हणजे ह्यात सर्व सूर असतात.
आरोह : नि रे ग म ध नि सा
अवरोह : सा नि ध प म ग रे सा
संध्याकाळीच हा राग का आठवतो त्याचंसुद्धा कारण कळलं, त्याचा प्रहर संध्याकाळचा आहे!!!

मला या रागात आवडलेलं नाट्यसंगीत म्हणजे भीमसेनजींनी गायलेलं "राधाधरमधुमिलिंद जयजय "(खाली दुवा देत आहे )
http://www.youtube.com/watch?v=OMoJck-Gcdw
तसच संजीव अभ्यंकर यांच्या आवाजतली बंदिश "एरी आरी पिया बिन "
http://www.youtube.com/watch?v=TmKMG0F2V-I
या रागाबद्दलच्या सोप्प्या माहितीसाठी - video (http://www.youtube.com/watch?v=cENz3lPRcPU)

आणखी सुद्धा दुसरे राग ऐकायचा नि समजायचा प्रयत्न केला पण जितका सहज यमन मनात बसला आहे तितका सहज दुसरा कोणता राग कळतच नाही!!! मी ह्या रागाबद्दल लिहिण म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे पण गाण्यातल काहीतरी मला कळलं आणि ते आपल्यासोबत share करायच होत. वरील लिखाणात काही शास्त्रीय चुका असतील तर क्षमा करून जाणकारांनी त्या सुधारून द्याव्या अशी विनंती आणि आपल्या सुद्धा यमन रागाबद्दल काही अश्याच आठवणी असतील तर नक्की टंका .....
:) :) :)

संगीतअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

चेतन माने's picture

23 Nov 2012 - 5:19 pm | चेतन माने

चौकटराजा's picture

25 Nov 2012 - 10:31 am | चौकटराजा

माक्ष्या माहितीनुसार यमन नावाचा थाट नाही. यमन हा राग कल्याण थाटातला आहे. कल्याण थाटात इतर अनेक राग आहेत.

पैसा's picture

23 Nov 2012 - 6:59 pm | पैसा

यमन रागावर आधारित अनेक हिंदी मराठी गाणीही आहेत (चित्रपट आणि भावगीते) इथले जाणकार लोक तुम्हाला आणखी माहिती देतील.

चौकटराजा's picture

24 Nov 2012 - 8:27 am | चौकटराजा

यमन रागात मध्यम तीव्र असल्याने ( तीव्र याचा अर्थ नेहमीच्या मध्यमापेक्शा थोड्या वरच्या फ्रिक्वेन्सी ची नोट. ) याचा गान समय संध्यासमय हा आहे. ( जब दीप जले आना जब शाम ढले आना असे आपण यमन रागाला म्हणतो).यमन रागात बाकी सर्व स्वर हे शुद्ध आहेत. हा राग जनसामान्याना अपील होणारा आहे ( भैरवी प्रमाणेच) अत: मराठी हिंदी सर्व संगीतकारानी कधी ना कधीतरी या सुरावटीचा वापर आपल्या संगीतात केला आहे.
उदाहरणे म्हणून खालील ओळी पहा ही गीते गुणगुणा व यमन रागाच्या प्रेमात बुडा !

शंकर जयकिशन- पान खाए सैय्या हमारो, मै तेरे प्यार का बीमार हुं,
ओ पी नय्यर्- आपकी हसीन रुख पे , सवेरे का सूरज तुम्हारे लिये है , फिर मिलोगी कभी एस बातका वादा कर लो
दत्ताराम- आंसू भरी है य जीवनकी राहे
जी एस कोहली- ये रंगीन महफिल, अगर मै पूछू जबाव दोगी
कल्याणजी आनंदजी- चंदनसा बदन
लक्ष्मीप्यारे - तुम गगनके चंद्रमा हो
रोशन- दिल जो भी कहेगा, निगाहे मिलानेको जी चाहता है
नौशाद- ऐ हुस्न तुझे जागले ये इश्क जगा ले, दिले बेताब तुझे सीनेसे लगाना होगा
सुधीर फडके - लौ लगाती प्रीत गाती. दैव जात दुखे भरता ,धुंदी कळयाना
वसंत पवार- बहरूनी ये अणु अणु , एकवार पंखावरूनी
नाट्यगीते- नयने लाजवित., देवा घरचे ज्ञात कुणाला, कशी केलीस माझी दैना -
एस एन त्रिपाठी- सप्त सुरन र तीन ग्राम नादब्रह्म एक नाम
वसंत प्रभू- जिथे सागरा धरणी मिळते,
ई ई ई

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2012 - 10:22 am | अत्रुप्त आत्मा

जातां है तू कंहाँ...रे बाबा...जांतां है तू कंहाँ??? -येस बॉस

तूम दिल की धडकन में...रेहेते हो...रेहेते हो...--धडकन

अमृत's picture

24 Nov 2012 - 9:40 pm | अमृत

शास्त्रीय संगीताची ओळख करून घ्यायला आवडेल...इतर रागांवर सुद्धा लिखाण येऊद्यात!

कलंत्री's picture

24 Nov 2012 - 11:10 pm | कलंत्री

तात्या या बाबतीत योग्य आणि अधिकृत माहिती देऊ शकेल.

बाकी चेतन च्या तैलबुद्धीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. दोन जण बुद्धिबळ खेळत असावेत आणि तिसर्‍या त्रयस्थ व्यक्तिने फक्त पाहता पाहता बुद्धिबळाचे सर्व नियम समजावुन घ्यावेत असा प्रकार झालेला दिसतो. क्या बात है?

चेतन माने's picture

26 Nov 2012 - 1:27 pm | चेतन माने

धन्यवाद :) :) :)

रमेश आठवले's picture

24 Nov 2012 - 11:16 pm | रमेश आठवले

सुधीर फडके यांनी शेकडो मराठी आणि हिंदी गाण्यांना चाली दिल्या आहेत. त्यासाठी त्यांनी सगळ्यात जास्त वापरलेला राग यमन आहे असे वाटते.

स्वानंद वागळे's picture

27 Nov 2012 - 10:55 am | स्वानंद वागळे

सुधीर फडके यांनी यमन वापरलाच आहे पण त्यांचा सगळ्यात जास्त वापरलेला राग भीमपलासी हा आहे........ राग भीमपलासी आणि ताल दादरा हे त्यांचा आवडता सूत्र होतं

रमेश आठवले's picture

28 Nov 2012 - 11:23 am | रमेश आठवले

भीमपलासी की यमन ह्या बाबत निर्णायक मत श्री सुधीर फडके देऊ शकतील असे वाटते. मिपाच्या सदस्यांमध्ये त्यांचा परिचय असलेले काही जण तरी असतील. त्यांनी श्रीधर रावांकडे या बद्दल खुलासा मागण्याची तसदी घेतली तर बरे होईल.

निल्या१'s picture

25 Nov 2012 - 6:59 am | निल्या१

अत्यंत प्रचंड मोठी व्याप्ती असलेला यमन. अजून तरी एवढंच कळतं की हा राग खूप मोठा आहे. मला त्याची व्याप्ती लक्षात यायला आण्खी काही वर्ष तरी नक्कीच जावी लागतील.
राग आवडत जाण्याचा तुमचा प्रवास छान वाटला. अशाच प्रवासाचं वर्णन असलेला हा दुवा.
http://amritvarshini.blogspot.com/2008/06/dedicated-listening.html
शास्त्रीय संगीतातील प्रत्येक राग अतिसुंदर आहे. एखादा राग आवडत व भावत नसेल तर अजून त्याचं सौंदर्य आपल्याला सापडलं नाही असं मी स्वतःला समजावतो आणि ते खरेच असते. अनेक वेळा सुरुवातीला न आवडणारे राग नंतर गळ्यातला ताईत बनावे असे झाले आहेत. रागांच्या आवडीत कालावकाशाने बदल होत जातो. तसेच सुरुवातीला फक्त द्रुत बंदिशी छान वाटतात. नंतर धिम्या गतीने गायला जाणारा खयालही आवडायला लागतो. खयालानंतर विस्तार कसा कसा केला आहे ते उमजू लागते. मग विविध घराण्यांमधे तो कसा गायला जातो हे अभ्यासावेसे वाटते. असे हे न संपणारे प्रचंड आनंददायी चक्र आहे. एखाद्या कार्यक्रमात राग गाऊन दाखवण्या पेक्षा, रागाची ओळख नसतानाही सुरावट ऐकणे नंतर रागाची ओळख होणे, गुरुमुखातून तो राग शिकणे व त्याची व्याप्ती समजणे व नंतर आपल्याच कंठातून त्या सुरावटी काढता येणे हा प्रवासच खूप सुखकारक आहे असे वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2012 - 9:16 am | अत्रुप्त आत्मा

कशी तुज समजाऊ सांग? का भामिनी उगिच राग? अभिषेकी बुवा.. ---^---

तिमा's picture

25 Nov 2012 - 12:31 pm | तिमा

'रंजिशे सही' गाण्यापूर्वी मेहदी हसनसाहेब त्याला प्रेमाने 'येमेन' म्हणत.
रोशन या थोर संगीतकाराची 'यमन' वर मास्टरी होती.

चैतन्य दीक्षित's picture

25 Nov 2012 - 9:02 pm | चैतन्य दीक्षित

तुमच्या शोधक वृत्तीबद्दल दाद द्यावीशी वाटते.
असेच ऐकत रहा. सुरुवात लोकप्रिय रागांपासून करा असे सुचवेन.
उदा. यमन, दुर्गा, भूप, शुद्ध कल्याण, मालकंस, हंसध्वनी वगैरे.
त्या त्या रागात बांधलेली गाणी ऐकलीत की त्या रागाचं संपूर्ण शास्त्रीय पद्धतीनं केलेलं सादरीकरणही ऐकण्यात रुचि वाटू लागेल.

सर्वच प्रतिसादांबद्दल धन्यवाद.... मला माहीतच होतं कि इथे अजून चांगली माहिती मिळेल :)

बहुगुणी's picture

26 Nov 2012 - 8:52 pm | बहुगुणी

चेतनः प्रतिसादांमधून बरंच काही शिकायला मिळतं आहे, म्हणून धाग्याबद्दल धन्यवाद!
( याच विषयावर मी 'रूळावरून गाडी सांधे बदलून जाते तेंव्हा' हा मी इथेच पूर्वी लिहिलेला लेख आठवला, तो ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर दिसत नाही.)

रागदारीविषयीच्या महितीला वाहिलेलं एक चांगलं संस्थळ म्हणजे: http://www.asavari.org/ragamala.html
इथेच रागांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचीही माहिती आहे.

आणखी एक चांगलं संस्थळ म्हणजे चंद्रकांता.कॉम

मला रागदारीतलं काहीच कळत नाही. तेंव्हा "यमन/ कल्याण / यमन-कल्याण" या विषयीच्या वादाविषयी या संस्थळावर जे म्हंटलं आहे ते चूक की बरोबर ते इथले जाणकार सांगतीलच: " For a long time there has been a running debate concerning the difference or equivalence of Yaman, Kalyan and Yaman- Kalyan. Such arguments are often acrimonious and invariably dependent upon arcane elements of the structure of the rag. If the vidwaans of Indian music are unable to reach a consensus as to whether these are distinct rags or not, then the filmwalas with their freer interpretations cannot be held responsible for maintaining any distinction."

यमन/यमन-कल्याण रागावर (वेगळे असतील तर 'रागांवर') आधारित हिंदी गाणी इथे आहेतः

अभिरत भिरभि-या's picture

29 Nov 2012 - 9:56 am | अभिरत भिरभि-या

>> हा मी इथेच पूर्वी लिहिलेला लेख आठवला, तो ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर दिसत नाही.)

हा घ्या

स्वानंद वागळे's picture

27 Nov 2012 - 10:56 am | स्वानंद वागळे

एक सुधारणा :

आरोह आणि अवरोहा मध्ये मध्यम म्हणजे 'म' तीव्र असतो त्यामुळे 'म' च्या खाली एक टिंब असता

स्वानंद वागळे's picture

27 Nov 2012 - 11:01 am | स्वानंद वागळे

यमन ऐकायचा असेल तर पुरुष गायकांमध्ये पंडित भीमसेन जोशी, उस्ताद रशीद खान किंवा पंडित राजन-साजन मिश्र यांचा ऐकावा
गायीकानमध्ये विणा सहस्रबुद्धे, परवीन सुलताना यांचा ऐकावा

अनुप ढेरे's picture

27 Nov 2012 - 11:16 am | अनुप ढेरे

यमन रागातल मला सगळ्यात जास्त आवडलेल गाणं म्हणजे 'भय इथले संपत नाही...'

सुबक ठेंगणी's picture

27 Nov 2012 - 11:19 am | सुबक ठेंगणी

१२ सुरांच्या अस्तित्वामुळे यमनात कुठलीही भावना वर्ज्य, अनवट वाटत नाही. कुणीतरी म्हटलंच आहे...'यमन' नही " ये 'मन' है!"

अत्रन्गि पाउस's picture

27 Nov 2012 - 9:53 pm | अत्रन्गि पाउस

यमन् चे काहि अत्त्युच्च नमुने...

http://www.youtube.com/watch?v=90uwFmYDRfU

http://www.youtube.com/watch?v=y5Vf1S3tPsE&feature=relmfu&noredirect=1 (हे पहिली लिंक आहे..पुढच्या लिंक्स बाजूला दिसतीलच)

http://www.youtube.com/watch?v=uWPFHYvGav4&feature=related

सूड's picture

27 Nov 2012 - 10:07 pm | सूड

नुसतं ऐकून येवढा शोध घेत राग समजावून घेण्याच्या प्रयत्नाला हॅट्स ऑफ!!

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2012 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार

सुरेख माहिती.**

**लेखकापेक्षा आपल्याला किती जास्त अक्कल आहे हे दाखवणारी प्रतिक्रिया सध्या सापडत नसल्याने सध्या येवढेच.