अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. दाराशी पोचल्या पोचल्या पोचल्या तोच पारिजताकाचा शुभ्र सडा दारी अंथरलेला असावा. अंगणातलं झाडंन झाड ओळखीच हसावं. पावसानं ओलीचिंब ती, माझ्या अंगणातली झाडं, जणु अपार माया निथळत असावीत. घर आल्याची आश्वस्त जाणीव क्लांत मनाला निववुन जावी, इतक्यात सकाळची नांदी देणारी कोकिळेची 'कूहssकूहssss' अशी हाक आसमंतात घुमावी अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा. आशिर्वाद देणारा !
या अश्या निव्वळ सुखाला विषण्ण विलक्षण छेद देउन जाणारा अव्यक्त सल खस्स्कन काळजात रुतावा, सय दाटुन यावी, अन मग असेच बरेच काही, भळाभळा वहाणारे वहात रहावे, तिथेच उभ्या उभ्याच. मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. स्वागत करणारे हसरे घर आता हिरमुसले वाटायला लागते, त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच. अशी का बरे दर आनंदाच्या क्षणाला तुझी आठवण यावी ? का जाणवावी हलकीशी थरथर ? का बरे व्हावा आवाज कातर ?
एव्हाना बरिचशी फुले मी ओंजळीत जमा केलेली असतात अन समोर सुहास्य वदनाने ती वात्सल्यमुर्ती उभी असते, आई ! तिच्या हातातल्या दुरडीत खुप सारी रंगेबीरंगी फुले असतात, काही फुलांना काटेही असतात अन काही मंजुळाही असतात. माझीही ओंजळ हलकेच त्या दुरडीत रिती होते, त्या फुलांमधे आता माझ्या ओंजळीतली फुलंही सामावलेली असतात. मी हलकेच तिच्या पायाशी वाकतो, डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो. आकाशात तांबडे फुटलेले असते अन आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो.
प्रतिक्रिया
11 Aug 2008 - 4:44 pm | मनस्वी
अप्रतिम रुपक!
काय मस्त लिहिलंएस आनंदयात्री.. आवडलं!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
11 Aug 2008 - 7:30 pm | टारझन
कौलं डोक्यात पडून डोक्याचा भुगा झालेला .. पण आंद्याच्या अंकुराने .. नवचैतन्य आलं ..
मस्त रे आंद्या ... मी खाली कुठे क्रमशः दिसतय का ते पघत वथो ....
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
11 Aug 2008 - 2:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खूप छान लिहिलं आहेस! डोळ्यासमोर सगळं वर्णन चित्रासारखं उभं राहिलं, छान वाटलं.
आणि फोटोपण मस्त आहे!
11 Aug 2008 - 2:55 pm | स्वाती दिनेश
सगळं वर्णन चित्रासारखं उभं राहिलं,छान वाटलं
यमूसारखेच म्हणते.
स्वाती
11 Aug 2008 - 10:04 pm | मुक्तसुनीत
मिस्टर यात्री ! फारा दिवसानी तुमचे लिखाण आले. सुरेख ! ताजेतवाने करणारे ! :-)
11 Aug 2008 - 2:54 pm | विसोबा खेचर
या अश्या निव्वळ सुखाला विषण्ण विलक्षण छेद देउन जाणारा अव्यक्त सल खस्स्कन काळजात रुतावा, सय दाटुन यावी, अन मग असेच बरेच काही, भळाभळा वहाणारे वहात रहावे, तिथेच उभ्या उभ्याच. मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे.
केवळ अप्रतीम! कुसुमाग्रजांची आठवण व्हावी इतपत सुंदर लेखन. एखादी कविताच वाचतो आहे की काय असे वाटून गेले! यात्री, जियो....!
तात्या.
11 Aug 2008 - 2:56 pm | मनिष
गद्य कविताच जणू...आवडले!
अवांतर : बाकी अंगणात झाड, पारिजताकाचा शुभ्र सडा अंथरलेला हे आम्हाला फक्त स्वप्नातच दिसते! :(
11 Aug 2008 - 4:37 pm | पद्मश्री चित्रे
खुपच छान शब्द चित्र...
खुप खुप आवडलं..
11 Aug 2008 - 5:18 pm | शेखर
तु असल पण लिहतोस ?
>> मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या >> उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. स्वागत करणारे हसरे घर आता >>हिरमुसले वाटायला लागते, त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच
मस्तच लिहलय...
शेखर
11 Aug 2008 - 5:49 pm | वैशाली हसमनीस
सुंदर!अतिसुंदर!!गद्यकाव्य फारच आवडले
11 Aug 2008 - 5:51 pm | शितल
आनंदयात्री,
मनातला अंकुर खुप छान फुलला आहे. :)
प्रत्येक वाक्य सुंदर आहे. :)
11 Aug 2008 - 6:07 pm | इनोबा म्हणे
मस्तच रे!
स्वगत:च्यामारी, आंद्याकडे ललित लेखनाचा क्लास लावायला हवा आता....
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
11 Aug 2008 - 6:19 pm | कुंदन
>>अन समोर सुहास्य वदनाने ती वात्सल्यमुर्ती उभी असते, आई ! .............
मी हलकेच तिच्या पायाशी वाकतो, डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो..
छानच लिहिलयस ...
11 Aug 2008 - 6:24 pm | शिप्रा
खुप सुंदर लिहिले आहेस्..अजुनहि असच छान वाचायला आवडेल...
11 Aug 2008 - 6:39 pm | अभिज्ञ
अतिशय सुंदर ललित.
आंद्या लेका तोडलस!
अजून येउ द्यात.
अभिज्ञ.
11 Aug 2008 - 7:11 pm | विद्याधर३१
आनंदा मस्तच रे ....
प्राजक्ताचे रूपक आवडले.....
जियो.....
विद्याधर
11 Aug 2008 - 7:36 pm | प्राजु
इतकं सुंदर वर्णन.. सकाळचं!! हे लेखन नव्हे केवळ एक तरल कविताच आहे. पारिजातकाचा सडा... कोकीळेची साद.. टपोरा पाण्याचा थेंब.. सुपर्ब!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Aug 2008 - 9:41 pm | चतुरंग
एका भल्या पहाटेच्या यात्रेचे हे अनुभवलेले काही क्षण अतिशय प्रत्ययकारी शब्दात मांडले आहेस रे आनंदयात्री!
अत्यंत तरल, प्रतिभावान लिखाण! अभिनंदन. जियो!!
चतुरंग
11 Aug 2008 - 10:21 pm | भाग्यश्री
खूप सुंदर!!
11 Aug 2008 - 10:32 pm | बेसनलाडू
आवडले. आईच्या आश्वस्त हाताने डोक्याला लागलेल्या सगळ्या चिंता,दु:खे दूर करणे अगदी अनुभवण्यासारखे. अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा हे बाकी खरे सुख!
काहीसे शब्दबंबाळ वाटण्यासारखे आहे, विशेषतः दुसरा परिच्छेद (भालचंद्र नेमाड्यांच्या 'कोसला'मधील बुद्धदर्शनाची आठवण झाली. विशेषतः रंगाशेठचा प्रतिसाद वाचून!). पण कधीकधी अशी नशाबाजीही हवीच!
(आस्वादक)बेसनलाडू
अवांतर - अंकुराचा फोटो छान आला आहे. आणखी थोडा शार्प/फोकस्ड् हवा होता का?
(अवांतर)बेसनलाडू
11 Aug 2008 - 10:51 pm | सर्किट (not verified)
अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं.
पहिल्या वाक्यातच काबीज केलेस, आंद्या !
ओलेते गाव ! काय चित्र आहे वा !
- सर्किट
12 Aug 2008 - 12:02 am | सर्वसाक्षी
चित्रदर्शी प्रकटन आवडले
12 Aug 2008 - 8:58 am | छोटा डॉन
एखाद्या सुगंधी फुलाच्या सुवासासारखा ॠहयात भरुन जाणारा व पहाटेच्या दवा सारखेच मन ओथंबुन टाकणारा लेख.
मस्त रे आंद्या. तुम्ही असलं काही लिहता हे पाहुन आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
जियो !!!
"ओलेते गाव, पारिजताकाचा शुभ्र सडा, ओळखीची झाडं, कोकीळेची 'कूहssकूहssss' आणि वात्सल्यमुर्ती आई ", सारेच अप्रतिम ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Aug 2008 - 9:07 am | ऋचा
खरच रे आंद्या ,मस्त लिहिल आहेस.
मन प्रसन्न झालं
:)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
12 Aug 2008 - 9:26 am | मदनबाण
अगदी सहज आणि सुंदर लिहले आहेस.....
फोटो सुद्दा छान आहे..
हे वाचुन आणि फोटो पाहुन मला गोट्या या मालिकेचे बीज अंकुरे अकुरे कोवळ्या मातीच्या कुशीत हे गाण आठवल..
ही लिंक :--http://uk.youtube.com/watch?v=i38b5Z8bMM8
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
12 Aug 2008 - 10:13 am | मनीषा
सुंदर... फोटो छान आहे..
डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो. आकाशात तांबडे फुटलेले असते अन आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो.
खुप छान !!!
12 Aug 2008 - 10:33 am | मेघना भुस्कुटे
वा, सहज-सुंदर आहे. कसलेही अनावश्यक तपशील नाहीत आणि उगाच भावविवश होणेही नाही. फार सुरेख.
12 Aug 2008 - 12:01 pm | गमत्या
तुझ्या अप्रतिम लेखनाचा मला अभिमान आहे.
गमत्या.
12 Aug 2008 - 3:21 pm | धमाल मुलगा
आनंदयात्रीशेठ,
आज बर्याच दिवसांनी आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळलात :)
नेहमीप्रमाणेच, एखादा प्रथमदर्शी छोटासा दिसणारा अनुभव मोजक्याच शब्दात परिणामकारकरित्या पोहोचवण्याची सुंदर खुबी झळकते आहे.
क्या बात है! जियो !!
ओलेतं गाव, कपाळावर टपोरा थेंब, आईच्या हातातली दुरडी, त्यातली फुलं, काही काटेरी,मंजुळा, त्यातच आपली ओंजळ रिकामी करणं......
केवळ अप्रतिम रे!
(आंद्या, बास रे आता इतकं भिडणारं लिहिणं, काळजात कालवाकालव होते वाचताना.)
12 Aug 2008 - 4:04 pm | मनी
मस्त: :)
12 Aug 2008 - 6:05 pm | आनंदयात्री
सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल आभारी आहे.
-आनंदयात्री
12 Aug 2008 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर ललित, आवडले.
12 Aug 2008 - 10:32 pm | यशोधरा
सुरेख लिहिलं आहेस! अतिशय आवडलं.
17 Feb 2011 - 12:21 pm | विजुभाऊ
आंद्या हे असले काही तुला अचानक स्वप्नात सुचत असावे ( केक्यूले ला पडले तसे)
हा लेख पूर्ण कर की
17 Feb 2011 - 11:08 pm | रेवती
खूप छान!
18 Feb 2011 - 4:29 am | गुंडोपंत
आवडले!
5 Mar 2011 - 12:53 am | राघव
मस्त आहे. खोदकामात असे चांगले वाचायला मिळाले. :)
राघव