गजानन मालवीय यान्च्या दुकानाच्या पडवीतही थन्डी नसल्यामुळे झोप चान्गली झाली.पहाटे उठलो,हाबशावर स्नानादि आवरुन मैय्याची पुजारती करुन निघालो.मालवीय चहा घेउन आले,चहा घेतला तो पर्यन्त त्यानी आमच्या साठी शेन्गदाणे आणि गुळ बान्धुन दिला. पाठपिशव्या पाठीवर बान्धुन आमची विनोबा एक्सप्रेस निघाली परिक्रमेच्या मार्गावर.
झुन्जुमुन्जु झाले होते पायाखालचा रस्ता दिसु लागला होता. पक्षान्चा किलबिलाट मनाला सुखावत होता.आम्हाला आजही खुप मोठा पल्ला गाठायचा आहे,हा भागही शुलपाणीझाडीचाच आहे पण त्यातल्या त्यात सोपा आणि लुटालुटीचा धोका ह्या बाजुला नसतो.
५कि.मि.वरील बारिफल्या या गावी पोहोचलो.रस्त्यालगत एक आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्यकेन्द्राचे उपकेन्द्र होते,एक टपरीवजा झोपडी होती.चहा आहेका विचारले तो माणूस म्हणाला करतो मी नास्ता मिळेल का विचारले,त्याने पोहे चालतील का विचारले.मी हो म्हटले.बाजुच्या दगडावर बसलो. यथावकाश चहा घेतला,पोहे बान्धुन घेतले बिस्किटेही घेतली.आदिवासी गरीब बन्धू पैसे घेईना.परिक्कम्मा वासीसे कैसे पैसे? असा म्हणाला. नर्मदे हर! मैय्या कशी आहेत ही तुझी लेकरे,महान! हा एकच शब्द .जबर्दस्तीने त्याच्या खिशात ह्यानी पैसे कोम्बले.
गावा बाहेर पडताच रस्ता हरवला.दगडधोन्ड्यानी भरलेली वाट सुरु झाली. थोड्याच वेळात समोर खडा घाट उभा ठाकला. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे! स्वतःला समजावले आणि पुढे पाऊल टाकले. पण तो चढ छोटासाच होता.मग उतार लागला,भरभर उतरलो समोर ठाकला एक ओढा.बुट्मोजे काढुन हातात घेतले,साम्भाळुन ओढा पार केला.पुन्हा बुट चढवले.थोडे पुढे जावुन एक वळण घेतले समोर ओढा दत्त म्हणुन तयार,पुन्हा सगळे सोपस्कार,कमीतकमी १०/१२ वेळा एकच ओढा वळवळणाने समोर येत होता.मजा वाटली.आताच्या ठिकाणी पाणी कमी होते म्हणून बुट न काढता दगडा दगडा वरुन ओढा ओलान्डु लागलो हे नीटपणे पल्याड गेले पण माझे पाय भिजलेच. एक बरी जागा बघुन बसलो, बूट मोजे सुखायला ठेवले आणि पोह्यान्चा नास्ता करायला घेतला. एक आदिवासी भगिनी आपल्या मुला-मुलीला घेउन आली ,चालली होती जन्गलात कामासाठी, आम्ही मुलाना हाक मारली,आधी आली नाहीत पण आईने सान्गितल्यावर आली.गोड मुले जवळच्या लिमलेटच्या गोळ्या दिल्या अशी खुश झाली म्हणुन सान्गू. त्यान्च्या निरागस हास्याने शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला.
परत एक थोडा अवघड घाट चढलो,२ आदिवासी बन्धू भेटले,त्याना भागल अम्बा किती दुर विचारले,ते भागल अम्बाच होते.गजानन मालवीयनी सान्गितलेल्या कैलास राठोड या अन्गणवाडी चालकाचे झोपडीवजा घर रस्त्या लगतच होते पण ते घरी नव्हते घरात लहान मुलेच होती मग फक्त पाणी पिउन,त्याना खाऊ देउन पुढे निघालो.आता गाठायचे होते अम्बापाडा.
जन्गल घनदाट होऊ लागले होते रस्ता असा नव्हताच तरीही खचाखच भरलेल्या दोन जीप भेटल्या धन्य ते जीप ड्रायव्हर आणि धन्य ते प्रवासी. आज खेतियाचा बाजार होता म्हणून ही गर्दी.मोटरसायकलवालेही दामटवत होते गाडया. आम्बापाडा आले पावणेबारा वाजले होते,सखाराम रन्गारीकडे भोजनाची व्यवस्था होईल का विचारले आधी विचारु की नको असा विचार केला पण खुप भुक लागली होती,विचारले.खिचडी देतो म्हणाला,पडवीत बसलो.आम्हाला बघायला सारा पाडा जमला, पन्जाबीड्रेस घातलेली बाई आणि पायजमा-झब्बा घातलेला बाबा म्हणजे त्यान्च्या साठी प्रदर्शनीयच , आम्हीही त्याना नावे विचारली,शिक्षण विचारले.त्या छोट्याशा पाड्यावरही शाळा आहे,आदिवासीच शिक्षक आहे.मेधा पाटकरान्च्या ट्रस्टचे काम आहे हे. सखारामने भरपुर खिचडी आणली आम्ही एकच ताटली घेतली. हातसडीच्या तान्दुळाची खिचडी खुप चविष्ट होती.बळेबळे त्याच्या हातात पैसे दिले,घेतच नव्हता. या आदिवासी बान्धवान्च्या आमच्या अन्नदाता असलेल्यान्च्या उपकारात राहाणेच आम्हास आवडते. सखारामचा निरोप घेऊन निघालो.अजुन तसा बराच पल्ला गाठायचा होता.
आम्बापाडाचा घाट चढला आता पुन्हा जन्गल विरळ होऊ लागले,पण उतार होता त्यामुळे चालण्याचा त्रास कमी. ५ वाजले.बायगोर आले.इथे वनविभागाचे ठाणे आहे.टपरीवर चहा घेतला.अजुन खेतिया ८/१० कि.मि. दुर होते.सन्ध्याकाळ होऊ लागली होती.रस्ताही डाम्बरी झाला होता.पाय उचलायला हवे होते पण पाय नाही म्हणत होते. नेहेमीप्रमाणे मैय्याला दया आली. एक टेम्पो खेतियाला जात होता.बसलो त्यात आणि भुर्कन पोहोचलो खेतियाला.
खेतिया मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर आहे.दोन्ही सीमान्च्या बरोबरमध्ये बजरन्गकुटी या हनुमानाच्या मन्दिरात आसन लावले.आजुबाजुला चॉकशी केली.एकजण डबा देतात कळले,निरोप दिला ते लगेच आले.३० रु.डबा आम्ही देण्यास सान्गितले.
पायान्ची वाट लागली होती.फोड आले होते,सुजही आली होती.आज खुपच म्हणजे ४०कि.मि. चाललो होतो जवळजवळ. क्रमशः
प्रतिक्रिया
21 Jun 2012 - 6:43 pm | पैसा
वाचतेय!
21 Jun 2012 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार
एक लिंबू झेलू बै... दोन लिंब झेलू....
21 Jun 2012 - 11:46 pm | संजय क्षीरसागर
हा परा मधेच कुठली पण रेकॉर्ड लावतो
21 Jun 2012 - 7:22 pm | मदनबाण
आजच नर्मदेचे स्नान घडले, कारण आज माझे तिर्थरुप गरुडेश्वर वरुन परत आले,येताना बाटलीतुन नर्मदा जल आणले होते...अंघोळ करताना डोक्यावरुन नर्मदा जल घेतले, अत्यानंद झाला. :)
तसेच प्रसाद म्हणुन पहिल्यांदाच मोहनथाळ नावाचा गोड प्रसाद खाल्ला... मला स्वतःला जाता आले नाही,पण नर्मदा जलाने अंघोळ करायची इच्छा अशी पूर्ण झाली.
कधी तरी मलाही अशी परिक्रमा करण्याची भाग्य मिळुदे ही इच्छा आहे...बघुया कधी जमेल ते.
मोठे भाग लिहावेत ही पुन्ही एक नम्र विनंती.
(नर्मदेहर) :)
22 Jun 2012 - 10:52 am | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय!
22 Jun 2012 - 11:59 am | Maharani
वाचतेय!!छान वर्णन आहे!!अजुन थोडे मोठे भाग येऊ देत....