तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा- भाग ५

खुशि's picture
खुशि in भटकंती
20 Jun 2012 - 3:10 pm

आपण माणसे सवयीचे किती गुलाम असतो उन्हाळा असला की एसी,पन्खे लावुन आरामात झोपायचे,थन्डी असली की उबदार ब्लान्केट पान्घरुन.पण काल पिम्पळाच्या झाडाखाली,आकाशातील चान्दणे पहात रात्र काढणे किती कठीण याचा अनुभव आला.पुष्कळ वेळ चान्दण्यान्ची झालर पहात गेला.खुपच सुन्दर; रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कधी असे निवान्तपणे आपण आकाश न्याहाळू तरी शकतो का? चम चम चान्दण्या गगनात अन लखलख प्रकाश मैय्याच्या पदरात,सुन्दर चन्देरी साडी नेसल्यागत दिसत होती नर्मदामैय्या. पण जसजशी रात्र चढत गेली,थन्डीही वाढत गेली फक्त चादर अन्थरली होती सिमेन्टचा पार गार पडला होता शालही गार पडली होती थन्डीने दातावर दात वाजत होते अशा परिस्थितीत झोप लागणे शक्यच नव्हते.
भरीतभर माझे पोट बिघडले,पायाचा फोड फुटल्याने आग होत होती.परिक्रमेचा फक्त एक आठवडा होत होता कशी होणार परिक्रमा पुरी? परिक्रमेला आलो हे आपले चुकले तर नाही ना? विचारान्चा गोन्धळ उडाला होता. झुन्जुमुन्जु झाले,पिम्पळावर किलबिलाट सुरु झाला.आश्रम जागा झाला,लगबग सुरु झाली.मन्दिरात काकडारती सुरु झाली,परिक्रमावासी नर्मदा स्नान उरकु लागले,ग्रुप ग्रुपने मैय्याची पुजारती सुरु झाली.आश्रमाच्या सेवेकर्यानी सर्वाना चहा दिला तो पिवून सारे पुढच्या वाटचालीला लागले.
माझी परिस्थिती अवघड झाली होती,बरोबरच्या लोकाना पुढे जायला सान्गितले,महन्त म्हणाले; इतकी घाई करण्याची खरच गरज आहे का? थोडी विश्रान्ती घ्या बरे वाटले की पुढे जा,आम्ही थाम्बलो.८/९ वाजता नास्ता करुन मी कोरा चहा घेतला. निघालो,मुम्बई-आग्रा हायवेला लागुन बालाजी मन्दिरात गेलो,इकडे मारुतीला बालाजी म्हणतात निसर्गरम्य परिसर आहे. स्वयमभू कचरेश्वराचे दर्शन घेतले.या पिन्डीवर निसर्गतः बिल्वपत्र उमटलेले आहे.
माझ्या अन्गात चालायचे बळ नव्हते,पायाला पट्टी बान्धुन मोजे घालुन बुट घातल्यावरही पाऊल टेकवत नव्हते,मन्दिरातील महाराजानी ज्यादा शहाणपणा न करता बसने बडवानीला जा असे सान्गितले.आम्ही त्यान्चा सल्ला मानला,हायवे वर बस मिळाली,सन्ध्याकाळी बडवानीला गुरुद्वारात मुक्कामाला आलो.
बडवानी जिल्ह्याचे ठिकाण आहे. मेडिकल मधुन गोळ्या आणल्या,पायासाठी मलम घेतले. दोन दिवस बडवानीलाच राहिलो.बडवानीतील वैष्णोदेवी मन्दीर,गणपती मन्दीर पाहिले. तिसर्यादिवशी ५कि.मि. वरील राजघाटला गेलो.इथे महात्मा गान्धीन्चे अस्थीविसर्जन झाले होते म्हणून हा राजघाट,पण त्यान्चे स्म्रुतीस्थळ आता डुबले आहे. एकमुखी दत्तमन्दिर आहे.तेही डुबणार आहे.अगदी बडवानी गावापर्यन्त पाणी चढणार आहे. सर्वाना पर्यायी जागा दिलेल्या आहेत.पोट जागेवर आले,पायही बरे होते उद्या पुढे निघायचे ठरवले.
परिक्रमा सुरु करण्या आधी आम्ही शुलपाणीच्या झाडीतिल घोन्गसा येथील लखनगिरिबाबान्च्या आश्रमाला भेट देण्यास गेले होतो.मोठा अवघड प्रवास होता. बडवानी ते मोरकट्टा फक्त २५कि.मि. जायला आमच्या मारुतीव्हनला ३ तास लागले होते तिथे आम्हाला नेण्यासाठी मोटरबोट आली होती.तिच्यात चढणे ही मोठी कसरत होती. पण २ तासान्चा तो प्रवास मोठा रमणीय होता.बाबान्चा आश्रमही खुप सुन्दर हा सर्व भागही सरदार सरोवराच्या पाण्यात डुबणार आहे. बाबा नर्मदापरिक्रमा करत असताना त्याना या शुलपाणी झाडीत भिल्लमामालोकानी लूटले होते,तेव्हा परिक्रमेचा विचार पुढे ढकलून लखनगिरिबाबानी येथेच वास्तव्य केले.त्यानी आदिवासी बान्धवान्साठी शाळा काढली आहे.जवळजवळ १५०० फळा-फुलान्ची झाडे लावली आहेत,शेती-भाजीपाला लागवड केलेली आहे. सायकलपम्पाच्या सहाय्याने नर्मदेचे पाणी वर खेचुन टाक्यात साठवुन कुडूभोपळ्याच्या फळाना बारीक छिद्रे पाडुन ठिबक सिन्चन करुन झाडे वाढवली आहेत.गोशाळा उभारुन मुलाबाळान्च्या दुधा-तुपाची सोय केली आहे.पाणचक्कीच्या सहाय्याने पिठाची गिरणी चालवली जाते.उत्तम सेवाकार्य.
नुकतीच नाशिकला आमच्याच एका होस्पिटलमध्ये लखनगिरिबाबाना देवाज्ञा झाली.पण त्यान्चे शिष्य नर्मदागिरिबाबा हे सेवाकार्य पुढे नेत आहेत्.आळन्दी येथील वारकरी आणि नर्मदाभक्त श्री. चन्द्रकान्त माधवराव पवार आणि मन्डळीही हे सेवाकार्य पुढे नेत आहेत्.तर सान्गायची गोष्ट अशी की,नर्मदागिरिबाबानी त्यान्ची सर्वतोपरी मदत होणार असुनही केवळ जन्गलातील वाट खुप अवघड असल्याने शुलपाणीच्या झाडीतुन परिक्रमेत न जाण्याचा सल्ला दिला होता.त्यामुळे आम्ही झाडीतिल तुलनेने सोप्या जन्गल रस्त्याने जाण्याचे ठरवले.
बडवानीपासुन ८कि.मि. बावनगजा या जैन तीर्थक्षेत्री जाण्यासाठी सकाळी ६ वाजता गुरुद्वारात गुरुग्रन्थसाहिबान्समोर माथा टेकुन निघालो. गावाबाहेर पडल्याबरोबर तुरळक जन्गल झाडी सुरु झाली. पहिले नानी बडवानी गाव लागले.एका शेतकर्याने आग्रहाने चहा दिला,तो घेउन निघालो.आता घाट सुरु झाला.पक्षान्चा किलबिलाट अ‍ॅकत,हलका गारवा अनुभवत चालताना शिणवटा वाटत नव्हता,पायाचे दुखणेही जाणवत नव्हते.९ वाजता बावन गजाला पोहोचलो.डोन्गरात बावनगज उन्चीची भगवान पार्श्वनाथान्ची मुर्ती आहे. दर्शन घेउन खाली आलो.१० वाजुन गेले होते.झाडाखाली बसुन जवळची बिस्किटे खाल्ली.आता भैरू घाट पार करायचा होता.
डोन्गरावर वनविभागाचा सुन्दर बन्गला होता,पायथ्याशी वनविभागाचे वनोद्यान होते,सुन्दर नीट निगराणीने राखलेले.पाटीगाव जवळ आले,हायस्कुल समोर प्रल्हाद प्रजापती यानी दुकानात बोलावले,चहा दिला.मनोज मालवियला फोन केला आजचा मुक्काम त्याच्या घरी असणार होता. हा मनोज स्वतःचा व्यवसाय साम्भाळून लखनगिरिबाबान्च्या कामात मदत करत असतो,त्यानेच आम्हाला घोन्गशाला नेले होते. फोन केल्याबरोबर मनोज आला.त्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे गोई नदीवरील पुल पार करुन पाटीगावातील बाजारपेठेतील मनोजच्या घरी गेलो.
त्याचे वडील श्री.सुखदेव दुकानात होते.दुकानाच्या मागेच घर आहे. मनोजची आई,पत्नी आणि दोन गोगिरवाणी मुले रोशनी आणि पार्थ.मुले आम्हाला लगेच चिकटली नानाजी-नानीजी म्हणून.दोन वाजुन गेले होते,जेवण करुन विश्रान्ती. आज मुक्काम पाटीगाव.

प्रतिक्रिया

पप्पुपेजर's picture

20 Jun 2012 - 3:44 pm | पप्पुपेजर

उत्तम लिखाण !!!
मला पण नर्मदा परिक्रमा केल्या सारखे वाटत आहे पुढील भागाच्या प्रतीक्षेत .

खुशि's picture

20 Jun 2012 - 3:47 pm | खुशि

नमस्कार,पप्पुपेजर.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

स्वराजित's picture

20 Jun 2012 - 4:04 pm | स्वराजित

नर्मदे हर !!!
छान लिहित आहात . लिहित राहा.

सुजित पवार's picture

20 Jun 2012 - 6:19 pm | सुजित पवार

खुपच छान वाट्ते आहे वाचुन. परिक्रमा सुरु करताना तुम्चा हेतु काय होता? का करावि वाटलि परिक्रमा?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jun 2012 - 1:37 am | निनाद मुक्काम प...

आपण भरपूर वाचले आहे ह्याबद्दल चा गोड गैरसमज ह्या विषयामुळे दूर झाला म्हणून
प्रतिसाद इतके दिवस केला नव्हता.
पण ह्या संबंधी जास्त माहिती मिळवायला उत्सुक
नेमकी का करावीशी वाटते ही परिक्रमा व ह्यातून नक्की काय मिळते.

पैसा's picture

20 Jun 2012 - 7:58 pm | पैसा

लिहीत रहा. परिक्रमा का करावीशी वाटली, कधी सुरू केली वगैरे शेवटी जरूर लिहा!

विजय_आंग्रे's picture

20 Jun 2012 - 8:56 pm | विजय_आंग्रे

हाही भाग छान लिहलाय! मस्त लिहत रहा.

प्रचेतस's picture

20 Jun 2012 - 10:50 pm | प्रचेतस

एकेक भाग उत्कंठावर्धक होतो आहे.
पुढे वाचायला उत्सुक.