पहाटे जाग आली . घशात गरम खंगर अडकल्यासारखं वाटत होतं पोटात आगीचा डोंब उसळला होता. अंगात कणकण वाटत होती.लघवीला जावसं वाटत होतं पण अंग उचलून बसण्याची इच्छा पण होत नव्हती.माझ्या पायाशी चुळबुळ झाली.भाया उकीडवा बसून डोकं दोन्ही हातात धरून झोपेतच झुलत होता. माझ्या घशातून खाकरल्यासारखा आवाज आला आणि भाया जागा झाला.
"केम दादा? "
मी काहीच बोललो नाही पण माझ्या तब्येतीचा अंदाज त्याला आला असावा.
"तमे काच्ची पिधी हती ?"
मी मान डोलावली. पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न केला. कच्ची दारु पूर्णपणे सूड उगवत होती.
पायात अडकवण्यासाठी स्लिपर शोधायला वाकलो आणि डोक्यात खिळे मारल्यासारखं वाटायला लागलं.
बहुतेक पाच सव्वा पाच वाजले असतील. हँगओवर नेहेमीच असायचा पण आजचा काही वेगळाच होता.
"दादा ,मुतरवा जऊ सं?"
मी मान डोलावली. भाया खाटल्यावरून खाली उतरला.आम्ही दोघंही चालायला लागलो
पण पहीली दहा पावलं डळमळीत होती. पोटात ढवळून आंबट पाणी घशाशी आलं .
लघवी करायला झोपड्याच्या मागून रेल्वेच्या पटरीवर जायला लागायचं .अंधारात काहीच दिसत नव्हतं पण हा रस्ता रोजचाच होता. एलफीन्स्टन्च्या चार लायनी आणि परेलच्या चार लायनींना क्रॉस मारणारी एक लाईन आहे तिथेच सगळे लघवीला जायचे. लायनीच्या बाजूला पावसाळी गटार होतं. हे सगळं डोक्यात इतकं पाठ झालं होतं की अंधारात पण आम्ही दोघं जागच्याजागी झुलत उभे राह्यलो. रात्रीच्या थंडीमुळे पोट टाईट फुगलं होतं .दोन मिनीटं न बोलता आम्ही धोधाण मुतत होतो. पोटातली आग कमी झाली नव्हती पण आता जरा बरं वाटत होतं.पण पापण्या जड झाल्यानी डोळे उघडे ठेवणं कठीण वाटत होतं. कधी एकदा कधी खाटल्यावर पडतो असं झालं होतं . चार लायनी क्रॉस मारल्यावर भाया उभाच राहीला. हलेना जागचा. हाक मारणं पण कठीण होतं इतकी जीभ कोरडी पडली होती. धडपडत भाया पुढे आला .
"दादा, एक पुछुं ?" काही बोलायचा मूड नव्हता पण मी मान डोलावली .
"रेलवे का गटर चार फूट तो निचे रहेगा ना ?"
मी नुसतंच हं हं असा आवाज काढला.
एक लाईन पार केल्यावर भाय म्हणला " दादा , आपडे काच्ची पिधी हती ना ?
मी काहीच बोललो नाही. समोर खाटलं दिसत होतं .मी आडवा पडलो. आडवं पडल्यावर डोकं जरा हलकं झालं .भाया माझ्या पायाशी आडवा झाला. त्यानी पुन्हा एकदा हाक मारली .कंटाळा आला होता. मी डोळे मिटूनच त्याला "हवे जराक हुवा दे" म्हटलं पण तो काही गप्प बसायला तयार नव्हता.
"दादा, काच्ची पिवाथी ओछू सांमळाय क्यारेक ?"
मी म्हटलं "ना रे ना "
"तो मने कहो आपडे पाच मिनीटं मुतरता हता तो आवाज केम नही आवी ?"
झोपण्यापूर्वी झालेल्या गचाळ कॉमेंट्रीच्या आठवणीनी मी वैतागलोच होतो .पण आता माझ्याही डोक्यात तोच प्रश्न आला .भाया म्हणत होता ते खरंच होतं .आम्ही चार फुटावरून धार मारत होतो खाली गटार होतं पण धारेचा आवाज काही ऐकू येत नव्हता.
रात्रीच्या शेवटच्या गाडीनी येणारे दारुवाले काही वेळा फुगे गटारात टाकून जायचे . कदाचीत खाली तेच असतील असं बोलून मी झोपायचा प्रयत्न केला. पोटाचा ताण कमी झाल्यामुळे दोन मिनीटात गाडी उलाल झाली.
**************************************************************
बरगडीत बोटं टोचल्यासारखं वाटलं आणि मी जागा झालो. सात साडेसात वाजले असतील . प्रचंड कष्टानी मी डोळे उघडून बघीतलं .रेल्वे पोलीसचा साखरे हवालदार उभा होता. तुम्हाला मास्तरानी बोलावलं आहे असं म्हणून निघून गेला. उजाडल्यावर धंद्यावर शांत शांत बघायची सवय नव्हती. आज सगळेच झोपलेले.गाडीतून येणारे वर्कशॉपवाले धंदा बंद बघून निघून जात होते. मी एकदा डोकं गदागदा हलवलं. भायाला हाक मारली .भाया दिसेना. आत गेलो .बालटीतून पाणी घेऊन चुळा टाकल्या. डोळे धुतले.जरा बरं वाटलं .इतक्यात भाया आला. मी काही विचारलं नाही पण त्यानीच सांगीतलं "दूध लेवा गयो हतो. "ग्लासात कच्चंच दूध भरून माझ्यासमोर ठेवलं. थंडं कच्चं दूध पोटात गेल्यावर सगळी दुनीया जागच्या जागी आली.
"मास्टरके ऑफीस मे जा. हवालदार आया था."असा हुकुम करत मी बाकीच्या पोरांना उठवायाला लागलो. पाच मिनीटात शटर वर गेलं .काही पोरं घरी गेली.बाकीची काड्या चावत दातूण करत बसली.
भाया परत आला. मी फक्ता इशार्यानीच विचारलं ."लाईनपे मुर्दा मिला है . पंचनामा लिखनेको बुलाया है."
एकाएकी जाम कंटाळा आला. रात्र धकाधकीत गेली होती आणि आता सकाळी अॅक्सीडेनच्या पंचनामा.
तोपर्यंत भायाच्या पाठी गांगुर्डे हवालदार पण आला होता.
"चला हो शेठ लवकर चला.साहेब म्हणतात जागेवर आधी पंचनामा करा."
रेल्वेअॅक्सीडेनचे पंचनामे जागेवर कधीच करत नाही.मुडदा स्ट्रेचरवर टाकून -झाकून स्टेशन मास्तरच्या ऑफीसासमोर ठेवतात. हवालदार तोंड झाकून एकदाच मांजरपाट काढतो.चेहेरेपट्टी बघायची आणि सह्या करायच्या. काही वेळा फक्त तीस चाळीस किलो मटनाची थप्पी फक्त बघायला मिळते आणि आख्खा दिवस बेकार जातो.
"अॅक्सीडेन नाही .पन मुर्दा आपल्या गटारात हाये."
नाईलाजानी मी आणि भाया चालायला लागलो.स्ट्रेचर हमाल पुढे. दोन हवालदार आणि मास्तर .सगळी लाईन मुतरीच्या पायवाटेनी जायला लागली.
ओव्हरहेडवर कावळे कुठेच दिसत नव्हते. म्हणजे अॅस्क्सीडेन नव्हता. गटाराजवळ मात्र गर्दी दिसत होती. पोलीस दिसल्यावर लायनी पार करणारे नोकरीवाले पळाले. ज्यांनी मुडद्याची वर्दी दिली ते दोन चरसी उकीडवे बसले होते. मुडदा दिसला की चरसी पहील्यांदा धावत येतात. दिवसभराची तरतूद होते.
आधी मास्तरांनी आणि त्यानंतर मी आणि भायानी वाकून बघीतलं .गटारात एक माणूस मरून पालथा पडला होता. कोण होता कळायला मार्ग नव्हता. पोलीसांनी चरसींना ला खूण केली . दोघंही गटारात उतरले.मुडद्याचं तोंड वर केलं. संपूर्ण बॉडीला मुंग्या लागल्या होत्या.चेहेरा दिसतच नव्हता. माझ्या खांद्यावर भायानी हात ठेवला.मी मागे वळून बघीतलं. भाया कुत्र्यासारखा थरथरत होता.आधी मला काही कळेना.
मग दहा सेकंदात मी पण थरथरायला लागलो. सकाळी आम्ही इथेच मुतायला उभे होतो. आता कळलं की आवाज का नाही आला.
मी आणि भायानी प्रेतावर लघवी केली होती.
एका चरसीच्या हाताला एक पाण्याची बाटली लागली.
पाणी चेहेर्यावर ओतल्यावर मुंग्या सैरावरा पळायला लागल्या.
बॉडीचा चेहेरा दिसायला लागला.
जाड्या उघड्या डोळ्यानी वटारून आमच्याकडे बघत होता.
एकाएकी रडल्याचा आवाज आला. भाया धाय मोलून रडत होता.
हवालदार टवकारून बघायला लागले.
"तेरा सगेवाला हय क्या ?" भायानी नकारार्थी मान डोलावली.
"फिर कायकू रोता है. इसका पहीले मुर्दा देखा नही क्या. ?"
आता मात्र काहीतरी करायलाच हवं होतं .मी भायाला बाजूला घेतलं. दोन्ही हात घट्ट धरून गप्प बसायला सांगीतलं .
त्याला सांगीतलं पण माझीच फाटून आता दिल्ली दरवाजा व्हायची वेळ आली होती.
आम्ही दोघं पुढे होतो असं सांगून आम्ही स्टेशनवर आलो. आमच्यापाठोपाठ स्ट्रेचर आलं .
पाच मिनीटानी कागदावर सह्या मारून आम्ही धंद्यावर आलो आणि भायाला आकडी आली.पोरं गोळा झाली .गलका झाला. भयाणीच्या दुकानातून कोणीतरी कांदा आणला. चप्पल हुंगवली. सोडा मारला. थोड्या वेळानी भायानी डोळे उघडले आणि बडबडायला सुरुवात केली. मी एका पोराला जमनाबेनला ,भायाच्या आईला बोलवायला पाठवलं.ती तरातरा चालत धंद्यावर आली आणि तिनी भाया मेल्यासारखं भोकाड पसरलं.दुकानाच्या दरवाज्यात पपलीक गोळा झालं.मी शेठला फोन लावला.शेठनी येतो म्हटल्यावर खुर्चीत गांड आदळून जो बसलो तो मला ऊठवेचना. पाय थरथरायला लागले.मळमळून उलटी होईल का काय असं वाटायला लागलं .डोळ्यासमोर जाड्याचा चेहेरा .
आदल्या रात्रीची फिलीम डोळ्यासमोर फिरायला लागली. एका अनोळखी माणसाची आपल्या हातून झालेली विटंबना आठवून आठवून स्वतःचाच संताप यायला लागला होता.
अपूर्ण.
प्रतिक्रिया
4 May 2011 - 8:21 pm | नगरीनिरंजन
मेंदूचे धागे उसवणारी शैली आणि वर्णन आहे. नकळत सगळं डोळ्यासमोर उभं राहून शहारायला झालं.
वाचवतही नाही आणि सोडवतही नाही.
4 May 2011 - 8:41 pm | असुर
__/\__
काय ब्येक्कार भारी लिहीता हो रामदास काका... धूर आला वाचून!!
--असुर
4 May 2011 - 8:59 pm | गणेशा
असेच लिहित रहा ... वाचत आहे...
4 May 2011 - 9:36 pm | रेवती
वाचवत नाही.
चौथ्या भागापासून मी वाचणार नाही.
4 May 2011 - 10:22 pm | मिसळपाव
नेहेमी सुरेल गाणार्या एखाद्या गायकाने 'मला हेहि येतं बरं का' म्हणून acid rock किंवा तत्सम काहितरी अर्वाच्य प्रकार सुरू करावा तद्वत वाटतंय. :-(
6 May 2011 - 8:17 pm | ५० फक्त
+१ टु मिसळपाव,
लिखाण उत्तम आहे पण विषयच असा आहे, की हे असंच नागडं उघडं लिहावं लागतं, त्यामुळं काही करु शकत नाही.
4 May 2011 - 10:33 pm | चतुरंग
जवळ फक्त वाचनातून सुद्धा जायची जबरदस्त भीती वाटते. वाचताना डोक्याच्या आत कोणीतरी ओरखडे काढल्यासारखे वाटले. शब्दसामर्थ्य आणि वातावरण निर्मिती याबाबतीत केवळ <=०()8=<
-(बीभत्सरसअवगुंठित्)रंगा
4 May 2011 - 10:41 pm | सन्जोप राव
शब्द बापुडे केवळ वारा.... काय लिहिणार? कच्ची दारु नरड्यातून जळत जावी तसे वाटले.
5 May 2011 - 12:01 am | सुनील
ओव्हरहेडवर कावळे कुठेच दिसत नव्हते. म्हणजे अॅस्क्सीडेन नव्हता
खास रामदासी निरीक्षण!
कथामाला नेहेमीप्रमाणेच उत्तम पण मागील भागांचे दुवे सुरुवातीस द्यावेत ही विनंती!
5 May 2011 - 4:56 pm | विसुनाना
हेच म्हणतो आहे.
कथा आवडते आहे.
5 May 2011 - 1:11 am | टुकुल
नेहमीसारखी जबरदस्त लेखनशैली..
__/\__
वाचत आहे, येवुद्या अजुन तुमच्या पोतडीतुन.
--टुकुल
5 May 2011 - 2:19 am | पिवळा डांबिस
काही वेळा फक्त तीस चाळीस किलो मटनाची थप्पी फक्त बघायला मिळते आणि आख्खा दिवस बेकार जातो.
हां, ज्यांनी रेलवेआक्शिडन पघितला आसंल तेनला बराब्बर समजंल काय बोलताय तुमी ते!!! आमाला तर येकडाव १०-१२ किलोची कवळी थप्पी पघावी लागली व्हती!!!:(
लई वंगाळ, तिच्यायला!!
स्वामी, तुमच्या वर्णनशैलीबद्द्ल आणि वातावरणनिर्मितीबद्दल तर काही प्रश्नच नाही, आपला सलाम!
पण तीन भाग झाले, कथानक अंमळ खोळंबल्यासारखं वाटतंय हो!!! जरा धक्का द्या ना गाडीला प्लीज...:)
नाय म्हणजे असल्या वातावरणाची आम्हां भटाबामणांना, सॉरी सॉरी, पांढरपेशांना, माहिती व्हावी म्हणूनच हा प्रपंच असेल तर गोष्ट वेगळी...
(तसं असेल तर आता पुढल्या भेटीला हे आमाला तडक आंटीच्या गुत्त्यावर घेऊन जातंय बहुतेक! देवा तुकां काळजी!)
:)
5 May 2011 - 7:35 am | स्पंदना
गरगरतय वाचुन, कावळे तर अश्या ठिकाणी वापरलेत की हजार शब्द सांगुन जातात.
5 May 2011 - 10:17 am | प्रचेतस
_/\__
वास्तव परिस्थितीचे अगदी भयाण वर्णन रामदासकाका.
5 May 2011 - 10:23 am | गवि
भयाण परिस्थितीचे अगदी वास्तव वर्णन रामदासकाका..
असं म्हणायचं असावं..
5 May 2011 - 12:13 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं. थरारक.
5 May 2011 - 4:19 pm | श्रावण मोडक
हं...
लेखन पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया उमटेल इतकी व्यवस्था केली आहे तुम्ही. आता पुढची वाट पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही. बधीर डोक्याने तेवढंच होऊ शकतं.
5 May 2011 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार
सुन्न...
5 May 2011 - 5:30 pm | प्यारे१
तिन्ही भाग एकदम वाचले.
बधीर...!!!
5 May 2011 - 8:07 pm | अप्पा जोगळेकर
जबर. आधीच्या भागांचे दुवे द्या प्लीज.
5 May 2011 - 8:11 pm | प्रभो
काका,पुढचा भाग??
5 May 2011 - 8:40 pm | आनंदयात्री
वाचतोय. अनुभव मोठा टोचणी लावणारा आहे, बरेच दिवस लागले असतील डायल्युट व्हायला.
5 May 2011 - 9:37 pm | ज्ञानेश...
(सॉरी, हेच शब्द आले मनात, वाचून झाल्यानंतर.)
येऊ द्या पुढचा भाग.
5 May 2011 - 10:51 pm | लिखाळ
मस्त ! जबरदस्त !
पहिले दोन भाग जास्त आवडले. पुढचा भाग वाचायला उत्सुक.
9 May 2011 - 1:16 pm | प्रभाकर पेठकर
बारीक निरिक्षण, विलक्षण शब्दसामर्थ्य आणि विषयावरील जबरदस्त पकड ह्या त्रयीतून जी कथा उलगडत जाते आहे त्याला 'अप्रतिम' हे विशेषणही तोकडे पडावे.
आज बर्याच दिवसांनी मिपावर येण्याचा योग आला आणि कथेचे तिन्ही भाग एका बैठकीत वाचून काढले. पुढील भागांची उत्कंठापुर्वक वाट पाहात आहे.
9 May 2011 - 1:29 pm | गवि
ग्याप खूप मोठी झाली.
उत्सुकता फार आहे. लवकर येऊ द्यात आता. :)
9 May 2011 - 2:25 pm | चिगो
खतरा लिहीताय काका.. जबरदस्त..
काटा येतो अंगावर..
24 May 2011 - 5:34 pm | श्रावण मोडक
अ जंटल रिमायंडर सर! :)
4 May 2012 - 11:14 am | गवि
याचा पुढचा भाग आला आहे का?
धन्यवाद..
4 May 2012 - 11:34 am | सुहास झेले
धन्स गवि आठवण करून दिल्याबद्दल.... रामदास काका, लिवा की पुढला भाग :) :)
5 May 2012 - 12:03 am | निनाद मुक्काम प...
पुढचा भाग टंका की ओ काका
गंदा हे पर धंदा हे ये
किंवा
तुम्हे धंदे की कसम
28 Mar 2013 - 9:15 pm | प्यारे१
>>>>अपूर्ण.
:(
अवांतरः डॉक्टरांच्या नौदल धाग्यावर काकांनी लिहीलेल्या या कथेचा उल्लेख केला होता.
27 Mar 2016 - 1:50 pm | Rahul D
पुढचा भाग टंका की ओ काका
17 Mar 2019 - 1:39 am | गवि
काही लेखमाला पूर्ण करण्यासाठी सह्यांची मोहीम आवश्यक आहे असं वाटतं.
लेखकाने ही लेखमाला पुढे लिहीपर्यंत हा धागा खाली जाऊ न देता प्रतिसाद द्यावेत.
21 Mar 2019 - 4:45 pm | मिसळपाव
या मालिकेला मात्र नाही माझी सही :-(
18 Mar 2019 - 3:44 am | amit_m
पुढचा भाग येउद्या...
18 Mar 2019 - 11:16 am | विजुभाऊ
हेच म्हणतो
23 Mar 2019 - 10:49 pm | सुचिता१
पुढच ा भाग येऊ द्या लवकर
23 Mar 2019 - 10:49 pm | सुचिता१
पुढच ा भाग येऊ द्या लवकर
14 Dec 2020 - 1:24 am | diggi12
पुढचा भाग येउद्या...
24 Jan 2021 - 7:07 pm | NAKSHATRA
रामदास काका, लिवा की पुढला भाग :) :)