का रे ऐसी माया ......(२)

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
28 Jul 2008 - 3:10 am

किर्तने वकील कोर्टाच्या बाहेरच भेटले.
होईल आपलं काम आज.काय वहिनी खूष दिसताय.?
नीला खळखळून हसली.चंद्रू तिच्या आणि रघुनंदन माझ्या कडेवर. कोर्ट आज सहा महिन्याची कस्टडी देणार होतं.
अभिमन्यू चंद्रूला टाकून गेला त्या दिवशी रात्री मी किरणला घरी जेवायला बोलावलं होतं. किरण आला तो चंद्रू ला घेऊनच.
सात दिवसात लळा लावला पोरानं.किरण म्हणाला.
नीला ला फार बरं वाटलं.आईवेगळं पोर म्हणून जरा वाईट वाटत होतं. पण त्याला जवळ घेतल्यावर तिच्या नजरेत एक चकाकी दिसली खरी.
उद्या बाबा आले की मी सुटलो रे नाना.बाबांनी इतकी वर्षं कशी सगळी लफडी सांभाळली काय कळत नाही बा.
याला उद्या कोर्टात घेऊन जायचं आहे. नंतर याचं काय होणार काही कळत नाही.
बहुतेक गोवंडीला पाठवतील किंवा माटुंग्याला श्रद्धानंद मध्ये.
ए मग आज राहू दे त्याला इथेच. नीला पटकन म्हणाली.मी पाहतच राहीलो.
ए बाई एक आहे ते बस.(पण मग वाटलं मला ही हेच हवं होतं.)
आजच्या दिवस रे. बिचारं सुकलं आहे.
एका रात्रीत काय फरक पडणार आहे?
हे बघ, तू मदतीला असशील तर कायमचं राहू दे इथे.मला काय?
कर्क राशीच्या मुली अशाच असतात का काय?
दे आर द बेस्ट मदर्स.
ए बाई उड्या मारू नकोस .थोडा विचार करून बोल.
अंगावर येतंय म्हटल्यावर मी जरा बचावात्मक बोलायला सुरुवात केली.
मला हे गोंडुलं चालणार आहे.
किरणची बोलती बंद झाली होती.
मला त्याची अपराधी नजर कळली होती.
आज नको. उद्या कोर्ट काय सांगतं आहे बघू.
किरण चंद्रूला घेऊन पळालाच.
आपण घेऊ या का त्या बाळाला?
किरणची पाठ वळल्यावर नीलानी विचारलं
हे बघ .रघू लहान आहे. तो थोडा मोठा असता तर विचार करता आला असता.
असू दे रे . मुलं कशी भराभर वाढत जातात ते कळत पण नाही.आता चार वर्षानी आपण चान्स घेणारच होतो.त्यापेक्षा ह्यालाच अडॉप्ट करू या.
हे कायद्याचं फार लफडं असतं.कोर्टाला पटायला हवं की आपण जेनुईन पालक होऊ इच्छितो.
आपण किर्तन्यांना विचारू या.
आपण आपापल्या घरच्यांना विचारू या पहिल्यांदा.फॅमीली म्हणजे फक्त आपण दोघंच नाही.
मी माझ्या बाबांना विचारते तू तुझ्या बाबांना विचार.
मी माझ्या बाबाना विचारलं.
बघ नाना तू धनू राशीचा. प्रयोग करणं आणि नुकसान आलं तरी सोसणं तुला जमेल. पण नीला कर्क राशीची आहे.भावना हेच त्यांच सर्वस्व असतं.माझी हरकत नाही. विचार करून काय ते करा.
नीलाचे बाबा म्हणाले .
वा वा .छान .आरोहात शुद्ध आणि अवरोहात कोमल रिषभासारखं आहे.दोन रिखब एका वेळी गायला मजा येते पण फार संभाळून गायला लागतं.
विचार करून एक निर्णय घेतला .
कोर्टानी पालकत्व दिलं तर पालक म्हणून घेऊ या.
अभिमन्यू आला तर परत त्याला न्यायला तर ?
सहा महिन्यात नाही आला तर दत्तक घेऊ या.
नीलाला रात्री जवळ घेतलं आणि सगळं समजावून सांगीतलं.
ती समजायच्या पलीकडे गेली होती. तिच्या नजरे समोर बाळ रांगायला लागलं होतं.
आज ऑफीशीअली चंद्रू आमचा होणार होता.
साळूंके साहेब येतान दिसले. मला खूणेनेच बाजूला बोलावून घेतलं.
मी ना हरकत देणार आहे.
आभारी आहे साहेब.
आभार काय? किरणसाठी काही करू हो.
मी हातात भेट पाकीट दिलं .साहेब खूष.
एक विचारू नानासाहेब?
आता एक नाही दोन आहेत साहेब .मी कोटी केली.
तेच म्हनतोय मी. नाना जे काय करता ते साभाळून.
आपण पुरुष माणसं.दोन काय आनि दहा काय?
पण बायांचं तसं नसतं हो. जे थानाला लागलं ते काळजाला लागलं.

------------------------------------------------------------------------------------
चंद्रूचं आगमन घरी जोरात झालं. आम्ही पूजा घातली होती. दोन्ही बाळं माडीवर घेऊन पूजा केली.एका नव्या जबाबदारीचं फीलींग बोजा वाटतं नव्हतं.भारून गेल्यासारखं वाटत होतं.सोसायटीत हे अप्रूपच. शेजारच्या सोसायटीतली मंडळी पण आली होती चंद्रूला बघायला.किरण आणि बाबा येऊन गेले .दोन्ही बाजूचे आजोबा ,आज्ज्या,मावशा , काका.गच्च गर्दी झाली होती घरात.रात्री गाण्याचा कार्यक्रम होता. नीलानी गळी पडून बाबांना गायला लावलं.
आम्ही दोघं बाळांना घेऊन समोर बसलो होतो. आबांनी चंद्रूला मांडीवर घेतलं आणि मा. कृष्णरावांचं पद गायला सुरुवात केली.
तुझीये निढळी.तुझीये निढळी
कोटी चंद्र प्रकाश .
कमल नयन हास्य वदन हासे.
कृष्णा हाल का रे कृष्णा बोल का रे
घडीये घडीये गुज बोल काही.
मग त्यांच्या शिष्याला म्हणजे मला पण चेव आला. (नीला नेहमी म्हणते की तिला प्रेमात गुंतवण्याइतपतच गाण मी शिकलोय.०
त्या दिवशी मी दिल से गायलो.
ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनीया. पहिल्या समेवर दाद मिळाली.
तुलसी दास अती अनंद
देख के मुखारविंद
रघुवर छवी के समान
रघुवर की छवीया.
ठुमक चलत.... एक छोटा आलाप घेऊन समेवर आलो तेव्हा डोळ्यातून पाणी वाहत होतं.रघूनंदनच्या गालावर सांडत होतं.

----------------------------------------------------------------------
चार महीने कसे गेले ते कळलं नाही. नवीन नियम ,नवी लाईफ स्टाईल अंगवळणी पडायला लागली होती.आता सगळा पाढा बे चा झाला होता. दोघांचे दोन कलर कोड.त्याप्रमाणे कपडे. ह्याचा लंगोट त्याला नाही आणि त्याचं टोपरं ह्याला नाही.आई बाप फ़क्त कॉमन .रघू माझा आणि चंद्रू तिचा.दुसर्‍या आठवड्यात चंद्रू माझा.रघू तिचा.दोन ध्रुवांच्या मध्ये दुनीया सामावली होती.
एक दिवशी रविवारी राजमणी मिश्रा नावाचा माणूस मला भेटायला आला होता. चंद्रूचा मामा अपघातात गेला होता. आजोबा सीरीयस होते. त्यांना नातवाला बघायचं होतं.मालाडला बोलावलं होतं.आता आजोबांचा एकुलता एक वारस चंद्रूच होता.
मी नीलाला विचारलं? जाऊ या का?
आयुष्यात पहिल्यांदा नीलाला घाबरलेलं पाह्यलं.
नाही जायचं तिकडे. चंद्रू आपला आहे आता.माझा आहे आता.
तू एक काम कर रघूलाच घेऊन जा चंद्रूच्या जागी. सांग त्यांना हाच नातू आहे त्यांचा.
मला नीलाचं बोलणं कळेना.रघू गेला तिकडे तर चालणार होतं पण चंद्रू नाही.
एक हलकी कळ काळजात आली पण सावध करण्या इतपत नाही.
------------------------------------------------------------------------------------
पुढच्या महिन्यापासून एक नविन छळ सुरु झाला.
अभिमन्यूचा फोन आला. तो चंद्रूला मालाडला घेऊन जाण्याचं म्हणत होता. माझ्या लक्षात आलं की कुठतरी पाणी मुरतय.माझा आधार एकच.साळूंके साहेब. त्यांनी माहिती काढली चंद्रूच्या आजोबांच्या नावावर दोन दुकानं होती मालाडमध्ये. शिवाय भुलेश्वरला पानाची गादी होलसेल मार्केट मध्ये.अभिमन्यूला मिश्रा भेटला होता.
साळूंके काहीच करू शकत नव्हते. चंद्रू अजून आमचा मुलगा नव्हता. आम्ही फक्त मान्यताप्राप्त गार्डीयन होतो.
एक बार मिलने तो दो बच्चेको
. नही जमेगा. हम उसका गार्डीयन है अभी.
नीलाला काहीच सांगीतलं नाही.पण दुपारी एकदा घरी मी नसताना फोन आला अभिमन्यूचा.
एक बार देखने दो. मै परमेनंट बस्ती जा रहा हूं.
नीला रघूला घेऊन वाण्याच्या दुकाना पर्यंत गेली .
अभिमन्यू उभाच होता.
तो बदमाश फसणार थोडा.
नीलाच्या पाठोपाठ घरापर्यंत आला.
पण आत नाही आला.
आता दिवस रात्र एकच काळजी झाली.चंद्रू कोणाचा होणार.
---------------------------------------------------------------------------------
सोसायटीच्या गेटवर पाळंदे भेटले. पाळंदे आणि मी आधी एकाच कंपनीत कामाला होतो. माझा विमा , इतर बचत वगैरे तेच बघतात.
नाना, बरं झालं इथेच भेटलास. तुझा एलायसी चा चेक परत आलाय बँकेतून . अरे बाबा उगाच दोनशे रुपयांचा फटका.बघ जरा काय ते.
मला कळेना हा काय प्रकार आहे.
बँकेत गेलो. खात्यात चारशे रुपये फक्त.जुनं खातं आहे.सगळेच ओळ्खतात. विस तारखेला वहिनी आल्या होत्या कॅश काढायला. प्रकरण आणखी गढूळ होत चाललं होतं.
निला , बँकेतून पैसे का काढले सगळे?
मला हवे होते .
कशाला?
घरी ठेवले आहेत ना खर्चाला ते वापरायचे.
अरे तुझ्या खात्यातूनकाढायचे. निला काहीच बोलेना.
आता मला राहवेना.
निला प्लीज सांग ना काय चाललय हे.
आता मात्र निलानी रडायला सुरुवात केली. माझा राग आणखीनच खवळला.
हे बघ काय प्रोब्लेम आहे तो एकदाच सांग.
तो अभिमन्यू परत आला होता. चंद्रूला घेऊन जायला. आता दर आठवड्यात येतो.त्याला घर घ्यायचं आहे. परत लग्न करणार आहे तो.लग्न झालं तर मग तो घेऊन जाणार आहे चंद्रूला.
तो खोटं बोलतोय.
नाही त्याचे सासरे पण आले होते सोबत.जर दत्तक घेणार असाल तर निदान अभिमन्यूला सेटल व्हायला मदत करा म्हणाले.
माय गॉड , हे वळण मला अनपेक्षीत होतं.
किरण ला फोन लावला. तो ओ.टी.मध्ये. मग ठरवलं साळुंक्यांना फोन करू या.
ते म्हणाले या पोलीस स्टेशनला .सगळं काही ऐकल्यावर म्हणाले,
बघा रावसाहेब , मी तुम्हाला आधीच सांगत होतो, या भय्ये लोकांच्या भानगडीत पडू नका. पण तुमचं लक्ष नव्हतं .
आता काय?
चला बघू या काय करता येतय ते .
हवालदाराला बोलावलं.
जा रे ठाकूर साहेबांच्या ऑफीसला तो शामभैय्या बसला असेल गेटवर. त्याला हजर कर.
माझ्याकडे वळून म्हणाले,
या तुम्ही संध्याकाळी. हितलं आम्ही संभाळू हो पण घरच मॅटर तुम्ही कसं हँडल करताय ते सांगा.
ते मी समजावतो.
आता साळुंखे पण रागावले. ते नवराबायकोचं नाका सांगू हो.हितं कंप्लेंट ल्ह्यावी लागेल.त्यांना घेउन येणार का हिथं.दहा हेलपाटे होणार.ते बेणं पण हरामी आहे. फुडार्‍यांना घेऊन पोचणारं .
नंतर अर्धा तास भैय्ये लोकांचे सुरस आणि चमत्कारीक किस्से सांगत होते.शामभैय्या येताना पाहून मग त्यांना हुरुप आला.
ये रे चोटकुळ्या हिकडं.तो अभिमन्यू कुठं आहे?
नही मालूम साब.
नही मालूम क्या.
तू बैठ अंदर.याद आयेगा तो बताव हां.
मै डूटी पे है साब.शामभैय्या म्हणाला.
पंधरा विस मिनीटं तसाच उकीडवा बसून राहीला. एक -दोन भैय्ये फिरकून परत गेले.साळुंके बाकीचीच कामं करत होते.अधून मधून शामभैय्याला टोकत होते.
अभिमन्यू शादी करनेवाला है सुना. मालूम है क्या तेरेको.
नही साब. ये सिद्धार्थ नगर किधर है रे?
नही मालूम साब
ये तेरेको कब मिला था ?
कौन साब? अभिमन्यू रे.
गया महिनामे आया था. क्यू आया था ? बँक मे पैसा जमा करनेका था.
कौनसी बँक?
मालूम नही साब.
तो तेरेको कैसा मालूम पैसा जमा करनेको आया था?
मेरा उधार वापस करने आया था.
छे महिना किधर गया था.
मुलूक गया था. कभी आया था वगैरे वगैरे.
साळूंके भय्याला घोळवायला बघत होते. तो पण भोसडीचा बेरकी.त्याला फटकावणं त्यांन बरोबर वाटत नसावं.
थोड्या वेळानं भय्या म्हणाला साब मै जाऊ ?
हा तू जा लेकीन एक काम कर अभिमन्यू मिला तो मेरेको मिलनेको बोलना.
भैय्या बाहेर पडताच साळूंक्यांनी एका माणसाला त्याच्या पाठोपाठ पाठवलं.
तो शामभैय्या बाहेर पडतोय बघ . तो आता पहिल्यांदा एस्टीडी बूथ मध्ये घुसेल.तो बाहेर पडला की तुम्ही फक्त रीडायल करा. नंबर घेऊन या.
मला म्हणाले या आता रात्री . भैय्या आलेला असेल तोपर्यंत.
-------------------------------------------------------------------------------------
साळूंक्यांचा अंदाज सही होता. रीडायल केल्यावर नंबर मिळाला.चंदा डायींग वर्क्स भिवंडीचा नंबर होता.संध्याकाळी अभिमन्यूची उचलबांगडी झाली. मी आणि नीला पोहचेपर्यंत आणखीएक धोतर झब्बा घातलेला म्हातारा आला होता.चंदा डायींग वर्क्स चा काँट्रॅक्टर. हेच ते सासरे. नीला कुजबुजली.साळू़क्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी अभिमन्यूला आत बोलावलं. नंतर दहा मिनीटं अभिमन्यूचा ओरडण्याचा रडण्याचा आवाज येत होता.म्हातारा अस्वस्थ झाला .घाम पुसायला लागला. माझ्याशी एकदोनदा बोलायचा प्रयत्न करून पाह्यला. मग तरातरा उठून बाहेर गेला. दहा मिनीटानी परत आला तेव्हा अभिमन्यू रडत कळवळत बाहेर आला. नीलाच्या पाया पडला. ठाकूर पण आला. त्यानी दोन लाथा घातल्या. म्हातारा ठाकूरला घेऊन बाहेर गेला.
थोड्या वेळानं सगळे जमा झाले. मी नीलाला घरी पाठवलं.
ठाकूर म्हणाला बहोत सजा हो गयी साब.
बच्चा इसका है.वो मिलनेसे क्या फरक पडता है?
तो छोडके भाग गया था तब क्या बच्चा उसका नही था?
समय की मजबूरी. प्रभू रामचंद्रने भी बच्चोको छोड दिया था.
लेकीन सीताको जलाया तो नही था. मादरचोदो, वो दिन घर जाके तूमने पैसे लिये ना?ए ,बुढे , तुभी गया था ना साथमे?
मै तो माई को समझाने गया था.
साळूंके खुर्चीतून उठले . म्हातारा ठाकूरच्या मागे जाऊन उभा राहीला.
ठाकूरनी पंच असल्याचा आव आणला. खिशातून पैसे काढून साहेबांसमोर ठेवले.
छोडो ना साब. भूल गया वो इनका घर. जो भी पैसा लिया था वो मै दे देता हूं.
साहेबांनी माझ्याकदे पाह्यलं . मी मान डोलावली.
ए भैय्ये फिरसे इनके घर जाना नही.अभिमन्यूनी मान डोलावली.
ठाकूर त्यांना घेऊन बाहेर गेला. साहेबांनी मला बोलावलं. रावसाहेब , अजून माझं ऐका कस्टडी सोडून द्या.जाऊ दे ते पोर अनाथाश्रमात.हौस असेल तर नात्यात दत्तक घ्या. पण या मादरचोदांच्या नादी लागू नका. ठाकूर पण असाच मोठा झालाय.
आज नाही तर सहा महिन्यांनी पस्तावाल. तुम्ही शिकलेली माणसं .ऐकणार नाही. परत एक सल्ला देतो. वकील बघून ठेवा.हे लोक आता कोर्टात जाणार बघा.या आता.
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
त्याच्या पुढच्या महिन्यात नोटीस आली हजारीलाल गुप्ता नावाच्या वकीलाची.चंद्रूच्या ताब्यासाठी त्यांनी कोर्टात मागणी केली होती.
आणि एकेक दिवस आमचा चंद्रूवरचा हक्क दुबळा होत गेला.
अभिमन्यूनी कोर्टाला सांगीतलं
एका अपवादात्मक परिस्थीतीत तो मुलाला टाकून गेला होता.
आता तो सक्षम होता.त्याचे लग्न ठरले होते. त्याच्याबरोबर आलेल्या धोतीवाल्याच्या मुलीशी.
आम्ही चंद्रूचे पालक होतो. दत्तक विधान झालेलं नव्हतं.
मी अभिमन्यूला पैशाची ऑफर दिली पण तो ऐकेना.मालाडची प्रॉपर्टीसाठी चंद्रू त्याच्या ताब्यात असणं फार महत्वाचं होतं.
आणि ज्या दिवशी कोर्टानी आमच्याकडून चंद्रूचा ताबा काढून घेतला त्यादिवशी दोन्ही पोरं पोरकी झाली.
नीला घेरी येऊन कोर्टात पडली. वावटळ संसार उध्वस्त करायला सरसावली.
----------------------------------------------------------------------------------------------
नंतरची दोन वर्षं फार कठीण गेली.चंद्रू मालाडला आजोबांकडे गेला आणि नीला रघुनंदनला पण विसरली.
दिवसातून चारचार वेळ फीट यायची. सगळ्या डॉक्टरांचे एकच निदान . हिस्टेरीया. डीप्रेसिव्ह.मे लिड टु पॅरेनॉईड डिप्रेशन.
हॅल्युसिनेशन.रघूच्या बाळपणाची वाताहत झाली.चंद्रूला पोटात सामावता सामावता नीला पोटच्या गोळयाला पण विसरली.
अपयशाचा धनी मी एकटाच.रघुनंदनला मामाकडे ठेवलं.आठवड्यातून एकदा पुण्याला मी त्याला भेटायला जायचो. दोन दिवस किरण नीलाला सांभाळायचा.
रघू बोलायला लागला तेव्हा त्यानी पहिल्यांदा मला हाक मारली काका...काका.
--------------------------------------------------------------------------
सगळं काही सावरता सावरता सहा वर्षं निघून गेली. हिप्नॉटीजमच्या ट्रीटमेंटनी थोडा थोडा फरक पडायला सुरुवात झाली.
नीला हलके हलके हसायला सुरुवात झाली आणि आम्ही परत एकत्र आलो.
डॉक्टर सानेंनी एकचं पथ्य पाळायला सागीतलं.बघा नाना, नुकसान जेव्हढ व्हायचं होतं ते झालेलं आहे. ती चंद्रूला ला विसरणार नाही पण ती रघुनंदनला विसरली आहे.आता काही वर्षं रघुनंदनची आई तुम्हीच. बाबाही तुम्हीच.
काही वर्षानी ती चंद्रूला विसरेल. कदाचीत आणखी एखादं मूल झाल्यावर.कठीण आहे. पण करून बघा.
सगळ्यात महत्वाची गोष्ट हळू हळू ती चंद्रूला विसरेल पण मधूनच तो डोकावला तर होकारार्थी उत्तर द्यायचं.उदाहणार्थ.
चंद्रू कुठेय हो?
खेळायला गेलाय.
चंद्रू काय करतोय?
झोपलाय.डोंट एव्हर चॅलेंज हिज एक्झीस्टंन्स.डोंट एव्हर ...
मला कळतं नाही पण तीच्या मनात घर करून बसलेली समजूत आहे की तुम्ही चंद्रूला ओढून आणायला कमी पडलात.
हे अपेशाचं खापर कायम तुमच्या डोक्यावर असेल.
किती वर्षानी ती चंद्रूला ती विसरेल याचं काही माप नाही.
ऑल द बेस्ट.........
----------------------------------------------------------------------------------------------
आता आम्ही सगळेच सावरलो आहोत. नीला -रघुनंदन -मी आणि बाळी.बाळीचा जन्म एक ट्रीटमेंटचा भाग.
चंद्रवदन अधून मधून येतो. तो आला की रघूचा चंद्रू होतो.तिच्या नजरेतून चंद्रू आला हे मला लगेच कळतं.पण फारच क्वचीत हे होतं त्यामुळे बाळीला अजून काही कळत नाही. या कटात तिलाही कधीतरी सामील व्हावंच लागेल.
किरण ला मी विचारलं खरंच एखादे दिवशी चंद्रू आला तर ? किरण हताश आहे. मानेनीच नाही म्हणतो.काही उपयोग नाही.मनाची अवस्था आहे.एकदा घातलेली घडी परत विस्कटणं फार धोक्याचं आहे.
पण रघूचं वय वाढतं आहे .आतापासून दोन आयुष्य जगायची सवय लागली आहे.त्याचं बालपण डिस्काउंट झालं आहे .वागण्यात एक प्रकारचा वयस्कर समजूतदारपणा दिसायला लागला आहे.मला वाटतं त्यानी हट्ट करावा , मी पुरवावा .त्याच्या स्वभावात खोल अबोलपण घर करत जातंय.रात्री कधीतरी भितीचं सावट भेडसावतं तेव्हा मला हाक मारतो. चंद्रवदनची गोष्ट सांगा म्हणून हट्ट करतो.
त्याच्या आईच्या आयुष्याची निरगाठ आहे.आता धागा तुटेल पण गाठ सुटणार नाही.कशिदा कधी उसवेल हे सांगता येत नाही.हे त्याला कळलं आहे..
गोष्ट संपते .रघू झोपलेला नसतो.
बेडरूम मधून नीला बाहेर येते काय करताय ?
काही नाही .
हे काय..चंद्रू कुठाय?
हा काय इथे झोपलाय.
मला ऊठवू नको लवकर. ती परत बेडरूम मध्ये जाते.
बाबा, एक विचारू?
बोल बेटा? बाबा मी रघुनंदन कधी होणार?
माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही.आयडेंटीटी क्रायसीस चाळीशीच्या आसपास उगवतो.याच्या नशिबी लहानपणी मिडलाईफ क्रायसीस .
सकाळी शाळेत जाताना मला म्हणाला.
बाबा मी एक स्टोरी लिहीली आहे.
टीचर सेज इट्स गूड बट नॉट कंप्लीट.
बघू तरी काय आहे. मी वाचायला सुरुवात केली.
फुलांची आणि मुलांची आवड असलेल्या एका राजाला एका सौदागराने अमरफुलाची दोन रोपे आणून दिली. राजानी ती माळ्याच्या स्वाधीन करून आपल्या खास बागेत लावायला सांगीतली.पानाला पान जोडत झाडं झपाट्यानी वाढीस लागली.एका झाडाला फुलोरा आला. काचेच्या झुंबरासारखा.सोनेरी पाकळ्यांचे झुपके आणि निळ्या रंगाचे केसर्.पण फुलं अवचीतच उमलायची आणि सकाळ होईस्तो गळून पडायची.झाडावर असताना स्पर्श केला तरी कोमेजून जायची आणि हातात कधीच यायची नाहीत.दुसर्‍या झाडाला फुलोरा धरेना. पानं हिरवी होता होता गळायला लागली .राजाला वाटले माळ्याचं लक्ष नाही .त्यानी माळ्याला दुसरं झाड काढून टाकायला सांगीतलं पण माळी ऐकेना.आतामात्र राजाला राग आला माळ्याचा. त्यानी माळ्याला हाकलून दिलं.माळी म्हणाला महाराज प्रत्येक झाडाला हक्क असतो जगायचा.माझ्या हिरव्या बोटानी मी निगराणी करतो पण हे झाड वेगळंच आहे. राजाला माळ्याची भाषा कळेना. राजानी आपली समस्या दरबारातील एका ज्ञानी माणसाला सांगीतली.त्यानी आपले दिव्य चक्षुनी भूतकाळात पाहिलं आणि म्हणाला हे राजन हे पूर्वजन्मीचे दोन राजपुत्र आहेत. ऐक त्यांची कथा
एक छोटासा देश होता .तिथे एक राजा राज्य करायचा ज्याला दोन आवडती आणि नावडती अशा दोन राण्या नव्हत्या.त्याला एकच एक आवडती आणि आवडती राणी होती. राणीला दोन मुलं होती फुलासारखी .पण एक राणीच आवडतं आणि दुसरं राणीच नावडतं. का बरं नावडतं? कारण ते नावडतं होतं म्हणून. एकदा त्या राज्यात एका रोगाची साथ आली. दोन्ही राजपुत्र आजारी पडले. राजवैद्यानी औषध दिलं पण लागू पडेना. मग एका महात्म्यानी एक औषध दिलं पण अट एकच होती . आईच्या अश्रूत भिजवून ते द्यायचं.राणी आवडत्या कडे बघून रडरड रडायची. औषध त्याला लागू पडले. राणी हसायला लागली.इकडे नावडता बिचारा झुरतच राहीला. वाट बघत राहीला आई त्याच्यासाठी रडेल म्हणून. पण ती रडेना कारण तो नावडता होता म्हणून. राजाला नावडत्याची हयगय बघवेना. तो पण झुरायला लागला. राणी मात्र आवडत्यासोबत बागेत खेळत राहिली.एकदा खेळता खेळता एक सैतानी वावटळ आली आणि आवडता त्यात उडून दिसेनासा झाला.राणीच्या डोळ्यातलं पाणी थांबेना. पण नावडत्यासाठी नाही. नावडता असातसा बरा झाला पण त्याचे मन लागेना. राजा मात्र झुरत झुरत अकाली म्हातारा झाला.
तर महाराज हेच ते दोन राजपुत्र.हा माळी त्यांचा पिता. भाग्यानी बांधून ठेवलेले जीव कालचक्रातून फिरत राहिले......
----------------------------------------------------------------------------------
बाबा , मला एव्हढीच स्टोरी लिहायला जमली. राजपुत्राचं काय झालं ? माळी कुठे गेला? राणीनी दोन्ही झाडांना अश्रूंच शिंपण केलं का? बाबा, स्टोरी पूर्ण करू शकाल का?
----------------------------------------------------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 2:10 pm | विसोबा खेचर

वा रामदासराव,

अतिशय सुंदर लेख. आपले विचार खूप आवडले! :)

तात्या.

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 3:00 pm | मनस्वी

मस्त लिहिलं आहे.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नंदन's picture

28 Jul 2008 - 3:18 pm | नंदन

विशेषणं संपली, पुन्हा पुन्हा तीच लिहावी लागत आहेत.

त्याच्या आईच्या आयुष्याची निरगाठ आहे.आता धागा तुटेल पण गाठ सुटणार नाही.कशिदा कधी उसवेल हे सांगता येत नाही.हे त्याला कळलं आहे.आयडेंटीटी क्रायसीस चाळीशीच्या आसपास उगवतो.याच्या नशिबी लहानपणी मिडलाईफ क्रायसीस .

-- विशेष आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मनिष's picture

28 Jul 2008 - 3:25 pm | मनिष

रामदास....तुम्ही खरच अफलातून लिहिता...तो कवितेवरचा लेख आणि आता ही कथा. पहिल्या भागात चंद्रूसाठी जी व तुटतो तर दुसर्‍या भागात चंद्रू, रघुनंदन, नीला आणि अर्थातच कथानायकासाठी!!

तुमची शैली फार प्रभावशाली आहे. नंदन म्हणाला तसे छोटे आणि परिणामकारक संवाद....एखाद्या कसलेल्या पटकथाकारासारखे....
प्रभाकर पेंढारकरांच्या 'अरे संसार, संसार...' ची आठवण झाली.

प्रमोद देव's picture

28 Jul 2008 - 3:58 pm | प्रमोद देव

बाकी सगळी विशेषणं संपली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2008 - 4:05 pm | बिपिन कार्यकर्ते

विशेषणं संपली --- नंदन, देवकाका.
१००% सहमत.

तुम्ही पोलिसी भाषा जितकी सहजतेने लिहिता तितक्याच सहजतेने "जे थानाला लागलं ते काळजाला लागलं." सारखी वाक्यं पण लिहिता.

बिपिन.

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 4:35 pm | आनंदयात्री

खुपच सुंदर .. आख्खी कादंबरी होईल सहज !!
दोनदा वाचला तेव्हा कळाला ! म्हणजे शेवटच्या गोष्टीची लिंक लागली !!
लहान मुलाने लिहलेल्या गोष्टीत अमरफुले वैगेरे शब्द खटकले पण लेखकाला तेवढे ऍझ्युम करायचे स्वातंत्र्य असावेच. थोडक्यात काय हा मुद्दा अगदीच क्षीण आहे.
खुप सुंदर !!

नीलकांत's picture

28 Jul 2008 - 5:46 pm | नीलकांत

रामदासजींनी लेख प्रकाशित केल्यावर तो प्रकाशित न झाल्याने त्या मोकळ्या पानावर काही प्रतिक्रिया आल्या होत्या. आता सर्वकाही ठिक आहे त्यामुळे त्या प्रतिक्रिया काढण्यात आल्या आहेत.

नीलकांत

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Jul 2008 - 6:11 pm | डॉ.प्रसाद दाढे

रामदासजी, तुमच्या लेखणीवरून जीव ओवाळून टाकावासा वाटतोय.. एक एक वाक्य वाचता॑ना अ॑गावर शहारा फुलत होता..श्वास रोखूनच मी हा दुसरा भाग वाचला.. जवाब नहि॑ आपका! सरस्वतीची तुमच्यावरील कृपा अशीच असीम राहो..

महेश हतोळकर's picture

28 Jul 2008 - 9:16 pm | महेश हतोळकर

यापुढे काहिही लिहिणे म्हणजे लेखाचा अपमान करणे!

संजय अभ्यंकर's picture

28 Jul 2008 - 9:16 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

झकासराव's picture

28 Jul 2008 - 9:24 pm | झकासराव

क्या बात है!
अप्रतिम लिहिता काका तुम्ही. :)
अवांतर : लहान तोंडी मोठा घास घेतोय पण स्वार्थी पणाने. तेवढ विराम चिन्हांच पाहिलत तर बर होइल. कोणता सवांद कोणाच्या तोंडी हे पटकन लक्षात येत नाही. मग तुमची कथा,लेख हावरटासारख वाचताना मध्ये मध्ये अडखळतं.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मेघना भुस्कुटे's picture

28 Jul 2008 - 9:26 pm | मेघना भुस्कुटे

नतमस्तक.

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 10:29 pm | यशोधरा

नतमस्तक

अगदी हेच म्हणते!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2008 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कथा !!!

भाग्यश्री's picture

28 Jul 2008 - 10:40 pm | भाग्यश्री

खूप सुंदर..!! अप्रतिम लिहीलं आहे!!
मायबोली वर काही वर्षांपूर्वी थोडीफार या थीमची कथा वाचली होती..एक सायकीआट्रीस्ट बायकोला हिप्नोटाईझ करून दत्तक मुलाला सख्ख्या मुलाचा रोल करायला लावत असे.. आणि त्यातून तो मुलगा स्प्लीट पर्सनालीटीचा बळी पडतो, वगैरे.. कथानक वेगळे होते पण ती कथा देखील वाचून शहारा आला होता..

प्राजु's picture

29 Jul 2008 - 12:01 am | प्राजु

अतिशय सुंदर लेखन... काय सांगू आणखी??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

29 Jul 2008 - 1:02 am | सर्किट (not verified)

बाळीचा जन्म एक ट्रीटमेंटचा भाग.

अशी छोटी छोटी वाक्ये जे काही सांगून जातात, त्याने डोके सुन्न व्हायला होते.

बाकी सर्वांनी लिहिलेच आहे. आणखी काय लिहू ?

- सर्किट

कवितेवरचे चिंतन, पीसी-जेसी, शिंपिणीचं घरटं, राक्षस रसायन आणि आता हे का रे ऐसी माया. तुमच्या प्रतिभेचा आवाका विलक्षण आहे.
त्या त्या कथेच्या धाटणीला साजेशी शब्दांची पखरण. प्रसंगातले बारकावे टिपण्याची आणि तो रंगवण्यातली विलक्षण हातोटी, संवादाचा अतिशय योग्य वापर, ताशीव-घोटीव छोटी छोटी वाक्ये आणि एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखे, ज्याला इंग्रजीत रॅपिड्स असं म्हणतात, तसं उलगडत जाणारं कथानक; सर्वच गोष्टी मंत्रमुग्ध करणार्‍या.

चतुरंग

धनंजय's picture

29 Jul 2008 - 1:36 am | धनंजय

असे कसे म्हणू. प्रत्येक वेळी असे चटका लावून जाता.

तरी लिहाच.

केशवराव's picture

29 Jul 2008 - 2:03 am | केशवराव

वर्णन करायला शब्दच नाहीत . खासच !

विसुनाना's picture

4 Aug 2008 - 3:57 pm | विसुनाना

वा! रामदासजी! कथा बेहद्द आवडली.

शितल's picture

4 Aug 2008 - 4:53 pm | शितल

लेख वाचुन झाल्या नंतर ही लेख डोक्यातुन जात नाही :)
लेख मनाला कोठेतरी चटका लावुन गेला.

प्रमेय's picture

12 May 2010 - 6:15 am | प्रमेय

निशब्द!

संदीप चित्रे's picture

13 May 2010 - 8:37 pm | संदीप चित्रे

तुमचे प्रत्येक लेखन म्हणजे डोक्याला खुराक असतो आणि डोक्याची भूक वाढतच जाते :)

खूप खूप शुभेच्छा !

धातूंवरच्या लेखमालेतला/ले पुढचा/चे लेख कधी?
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

कानडाऊ योगेशु's picture

13 May 2010 - 8:44 pm | कानडाऊ योगेशु

का रे ऐसी माया ......(१)
कुठे वाचायला मिळेल?

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Jul 2012 - 5:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__

मन१'s picture

4 Jul 2012 - 6:21 pm | मन१

धागा वर काढल्याबद्दल थँक्स मिका

आयला रामदास म्हणजे हिरा आहे हिरा!

कपिलमुनी's picture

10 Sep 2015 - 2:50 pm | कपिलमुनी

ही कथा व्वाचायची राहून गेली होती.
अप्रतिम !

बोका-ए-आझम's picture

11 Sep 2015 - 12:47 am | बोका-ए-आझम

फारच सुंदर!

नया है वह's picture

11 Sep 2015 - 7:40 pm | नया है वह

क्या बात!

रातराणी's picture

12 Sep 2015 - 12:09 am | रातराणी

_/\_ करू शकते फक्त!

मराठी कथालेखक's picture

17 Jun 2016 - 8:32 pm | मराठी कथालेखक

कथा आवडली....खरं तर फारशी पटली नाही (म्हणजे नीलानं पोटच्या मुलाला विसरणं हे तितकसं पटलं नाही) पण ताकदीने उभे केलेल्या व्यक्तिरेखा विलक्षण. कथा न पटूनही एखाद्याला आवडू शकते म्हणजे लेखकाचं लेखनकौशल्य केवळ जबरदस्त !!

विजुभाऊ's picture

19 Jun 2016 - 6:27 pm | विजुभाऊ

रामदास... जीव घेता तुम्ही वाचकांचा लिखाणातून.

nanaba's picture

20 Jun 2016 - 3:16 pm | nanaba

being a mom - katha bilkula ch patali nahi..
yes, u will love the adopted kid also as much.. but when your own kid is small - its practically impossible to forget him/her unless u have some disorder..
and the reason mentioned for disorder here doesn't seem correct at all.

rahul ghate's picture

22 Jun 2016 - 2:45 pm | rahul ghate

रामदास जी ,
कथा वाचून अक्षरशः जीव हलला .
असेच लिहीत राहा

अप्रतिम! ही कथा वाचायची राहून गेली होती.

ज्यांना पूर्ण वाचायची आहे, त्यांच्यासाठी भाग १ चा दुवा

पाटीलभाऊ's picture

23 Nov 2016 - 4:14 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय

वपाडाव's picture

26 Nov 2016 - 7:32 am | वपाडाव

_/|\_

NAKSHATRA's picture

27 Jan 2021 - 9:04 pm | NAKSHATRA

खूप सुंदर..!! अप्रतिम लिहीलं आहे!!