(काही माणसं अशीच भेटतात. क्षणीक म्हणा किंवा दूरगामी म्हणा, पण प्रभाव टाकून जातात. त्या माणसांचं जागोजागच्या सामाजिक व्यवहारांमध्ये एखादं छोटंसं योगदान असतं. पण त्यासंदर्भातील बातम्यांपलीकडं त्यांचं व्यक्तिमत्त्व समोर येतंच असं नाही. किंबहुना बातम्यांतील नोंदींपलीकडं ते येत नसतंच. अशीच ही काही माणसं. वेगवेगळ्या संदर्भात प्रत्यक्ष भेटलेली. आजही आपल्या सभोवताली कुठं ना कुठं असणारी. त्यांचं योगदान बंद्या रुपयासारखं आणि तेवढंच असेल, एरवी ही माणसं खुर्द्यातच गणली जातील. पण, ती आहेत, इतकंच या लेखमालेसाठी पुरेसं आहे.)
या माणसाची आणि माझी भेट कशी झाली? सांगणं थोडं मुश्कील आहे. कारण या भेटी अनेक आहेत. प्रत्येक भेट जवळपास पहिलीच असावी, असं वाटत गेलं आहे. म्हणजे, तशा या माणसाच्या वास्तवातल्या भेटी मोजक्याच. आजवर आम्ही एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच वेळेला भेटलो आहे. त्यापलीकडच्या आमच्या भेटी त्या माणसाच्या काही वाक्यांतून झाल्या आहेत. ही वाक्यं बोलकी आहेत. म्हणजे, निदान मला तरी तशी वाटतात. इतरही अनेकांना वाटतात, हेही नक्की. वाक्या-वाक्यांतून वेगवेगळ्या विषयांची सैर हा माणूस घडवत आला आहे. त्याअर्थी तो बहुश्रृत आहे. अवघ्या चार-पाच भेटीत काही, माणसाचं व्यक्तिमत्त्व पुरतं कळत नसतं. पण या माणसानं त्याच्या बहुश्रृततेचं पुरेसं दर्शन अशा भेटी नसतानाही घडवलं आहे. या लेखनाचं, म्हटलं तर, हे समर्थन. तर्कदृष्ट्या. भावनिकदृष्ट्या ती या लेखनातील थोडी मूल्यवृद्धी. गुणात्मक नसेल, संख्यात्मक.
---
आपल्या रोजच्या जगण्याची क्षेत्रं कोणती, हा प्रश्न या माणसाला विचारण्यात अर्थ नाही. कारण त्यानं केलेल्या पेरणीतून आजवर जे उगवलेलं आहे त्यात ती क्षेत्रं दिसतात आणि त्यांची मोजणी करण्यात अर्थ नाही.
---
आमच्या भेटींची सुरवात झाली तेव्हा माझ्या लेखी हा गृहस्थ कवितेचा, आणि साहित्याचा, उत्तम आस्वादक आहे अशी प्रतिमा निर्माण झाली होती. एके ठिकाणी तो म्हणून गेला, की एक कविता समजून घेण्यात पन्नास वर्षं गेली. चौऱ्यांशी योनीच्या शापाचं त्यानं त्या एका अनुभवातून वरदान करून टाकलं. तो म्हणाला, "लाखो कविता बाकी आहेत. चौर्यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्यायला मी सिद्ध आहे." हे सांगतानाही एखाद्या समर्थ मुक्तछंदात नेमकं बसावं असं तो लिहून जातो. मृगजळात समाधी! हे असलं काही सुचण्यासाठी या माणसाला एकच कविता समजलेली पुरेशी असावी.
ही प्रतिमा मोडून पडायला कारण झालं. हा माणूस कविता करतोही हे मला माहिती नव्हतं. भेटलोच नव्हतो त्याला, तर कळणारही कसं म्हणा! मग त्याची अशीच एक कविता समोर आली. आपण कविता का लिहितो हे त्यानं अगदी साध्या शब्दांत मांडून टाकलं.
टाळून
कधी वे़ळ
कधी नुस्तंच
आयुष्यानं सोडवून घेतलं स्वत:ला.
आईनं अंगावरून सोडवावं बाळाला
तसंच.
आता
वेळी अवेळी
अनावर हुक्की आली तर...
कविता लिहीतो.
आयुष्यानं आपल्यापासून सुटका करून घेतली, तेही आईनं बाळाला अंगावरून सोडवावं तसं... अंगावरून काटा येतो. मग, या सुटकेनंतर जे शिल्लक राहिलं आहे आपल्यात ते हा कवितेतून मांडत जातो. त्याचीच एक कविता आहे.
ज्या वळणावर वळत गेलो
व्यापत त्या वळणाला
अंधार सरपटत आला.
पूर्वेकडे धावत सुटलो....
तर ती आधीच,
पश्चीमेला मिळालेली.
पृथ्वी अशी गोल आहे
आम्ही आता वाचण्याची
आशा फोल आहे.
नियतीनं, ज्यांचा नियतीवर विश्वास नसेल त्यांच्यासाठी जगण्यानं, केलेली 'आयुष्य' नावाची वळणावळणाची फसवणूक मांडताना त्याला अंधार भेटतो. मग तो माणसासारखा त्या जगण्यापासून धावतो उगवतीच्या दिशेला. ती आधीच मावळतीला मिळाली आहे, कारण पृथ्वी गोल आहे, हे त्याला उमजतं. तो ते आपल्यासमोर ठेवतो.
पृथ्वीचा गोलाकार जगण्याच्यासंदर्भात असा फसवा असतो हे भूगोलात कळत नसतंच. त्यासाठी शिक्षणही कामाचं नाही. ते जीवनशिक्षणच असावं लागतं. पुरेपूर जीवनशिक्षण घेतलेला माणूसच हा, हे त्यावेळी पटलं. मग नंतर फक्त त्याची खातरजमा तो करून देत जातो...
---
जीवनशिक्षण घेतलेल्या माणसाला व्यक्त होण्यासाठी एकच आकृतीबंध कामाचा नसतो. ते याही माणसाबाबत खरं आहे. तो सांगत जातो तितक्याच समर्थपणे, गद्यातूनही. प्रत्येकाचं एक लहानपण असतं. त्या लहानपणात दडलेल्या अनेक गोष्टी आपल्या भावविश्वात घर करून बसलेल्या असतात. पतंग ही त्यातलीच एक. लहानपणीचं हे पतंग उडवणं मोठेपणीही चुकत नसतं. फक्त मोठेपणीचे पतंग वेगळे असतात. त्याचा खेळ संपल्यानंतरचं जगणं वेगळं असतं. अशाच कुठल्याशा प्रसंगात त्याला काही 'जखमा' झाल्या आहेत. त्याआधी पतंग उडवणं झालं आहे. पतंग खरे होते, मांजा बहुदा चुकार असावा. तो म्हणतो, "संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत होतं. डोळ्यांच्या कडा जळजळायला लागतात; ताप आल्यासारखं वाटायला लागतं..." दिवसाचा खेळ संपला आहे. आयुष्य पुढं उभं आहेच. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जे वाटू लागतं तीच लक्षणं असतात. पतंगाचीच उपमा वापरत तो पुढं सांगतो, "...पण हा खेळ नव्हता. उद्या परत नविन पतंग मिळणार नव्हता."
जगण्यातल्या वास्तवाचं भान ते हेच. तो उभा राहतो याच वाक्यांतून. पुढं सांगत राहतो.
---
या माणसाला पहिल्यांदा भेटलो ते असंच काही सुहृदांसमवेत. मूर्ती साधारण पावणेसहा फुटांची. डोक्यावर टक्कल. बुल्गानीन किंवा फ्रेंच कट म्हणावी अशी दाढी. त्या दिवशी संध्याकाळी सुमारे चारेक तास आमची मैफल रंगली होती. साहित्य, अर्थकारण, समाजकारण आणि सामाजिक क्षेत्र, राजकारण... सारेच विषय हास्यविनोदात गेलेली ती संध्याकाळ माझ्या लक्षात राहिली ती वेगळ्याच कारणानं. आमची ती पहिली भेट. त्यानं मला एक भेट दिली. 'इलस्ट्रेटेड विकली'चा एक अंक. खुशवंतसिंग संपादक होते तेव्हाचा. भारतातील जातीसमुदायाचं अगदी त्रोटक वर्णन करत, त्याची शक्तीस्थानं दाखवत काढलेला अंक. अंक पूर्णपणे त्याच विषयाला वाहिलेला. साधारण तीसेक वर्षं झाली असावीत त्याला. "तुमच्यासाठी हा अंक. जपून ठेवावासा..."
हा काय प्रकार आहे हे मला तरी कळलं नाही त्यावेळी. मग नंतर एकेक गोष्ट उलगडत गेली. हा गृहस्थ अशा अनेक गोष्टींचा संग्राहक आहे. हे असले संग्रह त्यानं आयुष्य ओतून केले आहेत.
मी तो अंक जपून ठेवला आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.
---
हे जे अनुभव तो सांगतो, ते जगण्याच्या कोणत्या क्षेत्रातील नाहीत? काही दाखले वेगळ्याच संवादातले देतो. अलीकडचीच गोष्ट आहे. मी त्याच्या ऑफिसातच माझ्या दोघा जिवलगांसह भेटलो. ऑफिसातून बाहेर पडलो. ज्या इमारतीसमोर उभा होतो, तिचं वर्णन सुरू झालं. त्या इमारतीचं कूळ. "हा बाहेरचा इटालियन मार्बल आहे. त्या काळात अशा मार्बलचा वापर केलेल्या इमारती इथं सगळीकडं आहेत. आता त्या मार्बलची रया गेली, कारण त्याची देखभाल झाली नाही..." गाडी इथं थांबत नाही. त्या परिसरातील इमारतींचं आर्किटेक्चर रोमन आहे की मोगल हे समोर येतं. मग अशा एखाद्या इमारतीमध्ये आतमध्ये पूर्ण साग कसा आहे याचं वर्णन येतं. असा सागच असल्यानं एक इमारत कित्येक वर्षांपूर्वी कशी जळून खाक झाली, तिचा बचाव कसा अशक्य झाला हे येतं. आपण ऐकत राहतो.
"या चौकातून जाणाऱ्या चारही रस्त्यांवरच्या इमारती एकेका धंद्याच्या आहेत. एका रस्त्यावर तुम्हाला फक्त बँकांच्या मालकीच्या इमारती दिसतील, एका रस्त्यावर फक्त विमा कंपन्यांच्या..." इतिहास सुरू झालेला असतो तो शंभर वर्षांपूर्वी. पण तो काही केवळ इमारतींपुरताच मर्यादित असत नाही. त्यात राष्ट्रीयीकरण येतं. त्या काळी कशा छोट्यामोठ्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या, राष्ट्रीयीकरणानंतर मोठ्या कंपन्या पुढं कशा आल्या... देशाच्या अर्थकारणातील हा टप्पाही त्यानं जवळून पाहिलेला आहेच. पण त्याची मांडणी नेहमीच्या अभिनिवेषांव्यतिरिक्त अशी येत जाते. आपले कान आता मोठे झालेले असतात. सेट झालेल्या फलंदाजाला जसा चेंडू फुटबॉलसारखा दिसतो तसं आपल्याला बरंच काही साठवून घेता येऊ लागतं.
चहा पिण्याची हुक्की सगळ्यांनाच असते. म्हणजे, आमचं हे बोलणं सुरू होण्याच्या आधीचीच ती हुक्की होती. त्यामुळं, हा सांगतोय तो प्रसंगही आधीचाच. मला अगम्य अशा शब्दांत तो चहाची ऑर्डर देतो (त्याला अशा पाच-सहा भाषा/परिभाषा येतात). राजीवडी चहा किंवा असा काही तरी शब्द असतो. चहा येतो. त्या चहाचं एक वर्णन होतं. चहा घेता-घेता एकदम आम्ही सामाजिक स्थित्यंतरात शिरतो. "ही सगळी मंडळी राजस्थानातून आलेली... डुंगरपूर वगैरे भागांतून आलेली. त्याचं कारण होतं. इथं या भागात कामाला येणारे कारकून म्हणजे ब्राह्मण. त्या काळात त्यांना पाणीही इतर कोणाकडून चालायचं नाही. मग हे राजस्थानातले भट आले. त्यांनी हे व्यवसाय इथं सुरू केले... आजही ते टिकून आहेत..." चहाचाच एक प्रकार सांगून हा गृहस्थ ते स्थित्यंतर मांडतो. त्या प्रकारच्या चहामधल्या दुधात अंड्याचा पांढरा भाग टाकलेला असतो. तो फक्त मुसलमानांचा चहा (पूर्वी होता, आता इतरांचाही असावा).
सामाजिक स्थित्यंतराचा एक पैलू दिसतो. पण आपली भूक वाढलेली असते. तो ती शमवतोही. या मंडळींच्या हाती असलेल्या दुकानांचं एक वाटप असतं. समजा सहा भाऊ आहेत पुढच्या पिढीतले. मग त्यांच्यात वर्षाची वाटणी असते. प्रत्येकानं दोन महिने दुकानाचा कारभार पहायचा. मी विचारतो, बाकीचा काळ? इतर कामं! त्याचं शांत उत्तर येतं. वर्षाकाठी माणसंही एंगेज राहतात, त्यांची जीविका त्यांना मिळत राहते. दुकान कायम राहतं. मग, दुकानाचं हे स्थित्यंतर होतं तेव्हा तुटक्या कपाची आणि ग्लासाची मोजणीही होत असते, हे तो सांगून टाकतो. स्थित्यंतर.
कहाणी इथंच थांबत नाही. मग इतर दोन-चार समाजघटकांची जडणघडण, त्यामागची स्थिती, त्याची सध्याची स्थिती हेही सांगून होतं. बोलता-बोलता त्या काळच्या ब्राह्मणांसाठीचं पाणी हा विषय येतो आणि आमचा मोर्चा विहिरींकडं वळतो. आम्ही होतो तिथंच एका विशिष्ट समुदायाची विहीर होती. तिचा इतिहास आमच्यासमोर उभा ठाकतो. अशा विहिरींच्या जगण्यातही एक स्थित्यंतर आलेलं असतं. कित्येक विहिरी आता बुजवल्या गेल्या आहेत. कित्येक खुल्या आहेत, पण देखभालीअभावी एकेकाळी गोड पाणी देणाऱ्या या विहिरी आता फक्त अशा इतिहासाची उजळणी करण्याच्या प्रसंगासाठी राहिलेल्या आहेत...
इतिहास चालता-बोलता असतो म्हणजे काय, याचा अनुभव आम्हाला मिळण्याची ती वेळ होती. कारण आम्ही चालतच होतो.
---
त्याच्या एका शेराचा उल्लेख करावा लागेल.
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले
ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले
हा शेर ज्यांच्याकडून आपलं काही घेणं आहे अशांविषयी आहे अशी कल्पना फक्त करायची. मग, त्याचाच आणखी एक शेर आपल्याला भेटतो,
कमळात सावल्यांच्या अडकून भृंग झाले
कित्येक रामदासी कुळवंत रंक झाले
हा शेर शेअरबाजाराला लागू करायचा. बहुदा एक कथा उलगडलेली असते आपल्यासमोर.
या माणसाच्या जगण्याचं हे क्षेत्र आहे, असं वाटत असेल तर त्याच्यातला एक पैलू वेगळा दाखवावा लागेल. "कविलोक काहीही म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं" असं म्हणत हा गृहस्थ कल्हईची प्रोसेस आपल्या घरासमोर कशी चालायची हे सांगतो तेव्हा त्याला, खरं तर, कल्हईविषयी काही सांगायचं नसतं. तो तेव्हा धातू या तद्दन मटेरियलिस्ट प्रांतात शिरलेला असतो. हा एक पैलू संपतो ना संपतो तोच तो "मोत्याच्या माथ्यावर फुटका भाग असला तर फाट. मोती चिरल्यासारखी आडवी रेघ दिसली तर ती नर. खोलगटपणा असला तर करवा आणि वेगळ्या रंगाचे ठिपके दिसले तर छाटे. पण आता परीस्थिती अशी आहे की खरे मोती मिळतच नाहीत त्यामुळे या गुणदोषाची यादी फारशी उपयोगाची नाही" असं सांगतो. पुन्हा हे नुसतं सांगणं नसतं, त्याला एक अलंकार चढवताना हा थेट माऊलीला समोर आणतो, "सुढाळ ढाळाचें मोती। अष्टै अंगे लवे ज्योती।। जया होय प्राप्ती। तो चि लाभे।।" ज्ञानेश्वरांपाशी तो थांबणार नाही. तो पुढे तुकोबांचा दाखला देतो. "रत्नांची कुंदले मोतीयाचा तुरा। शिरपेच बरा कलगीवरी।। पाचरत्न मोती माणिक हिरक। अर्पिले सुरेख हार यांचे।। कंठी, भुजबंद,पोंची, कमरबंद। मुद्रिका स्वच्छंद नानापरी।। तुका म्हणे माझ्या इच्छेच्या कारणे । ऐशीम भूषणे ल्याला देव।।"
आपण पुढं बोलण्याऐवजी श्रोत्याच्याच भूमिकेत राहणं पसंत करतो. झाकली मूठ, असं मी माझं समाधान करून घेतो.
---
सारं काही गंभीरच का? नाही. या ओळी पहा,
झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी
कुठे सांडली बुगडी गं
दहीवर आले उंबरठ्याशी
रात्र तोकडी पडली गं
श्रृंगाररसही आपण हाताळू शकतो हे तो सहजी एखाद्या अशा रचनेतून सांगून जातो. आपण ते सारं शोषण्याचा प्रयत्न करत राहतो.
---
परवा या माणसाशी बोलत होतो. सहज विचारलं, "हे तुम्ही केव्हा करता?" माझा सूर, 'कुठून येतं हे सारं'चा होता. त्याचं उत्तर होतं, "येत जातं." "हो. पण कसा करता हा संग्रह?" काही उत्तर मिळालं नाही. मिळालं ते एक निर्व्याज हास्य. त्यात दडलेलं उत्तर होतं बहुदा, 'जगणं शिकवतं हे सगळं... टिपावं लागतं आपलं आपल्यालाच.'
मी त्यावर समाधान मानून गप्प झालो, त्या वेळेपुरता. माझा प्रश्न मला कायम छळत राहणार हे मात्र नक्की. कारण हा माणूस म्हणजे मानगुटीवर बसलेलं भूत आहे, एक विलक्षण असं.
अलीकडचंच त्याचं एक वाक्य आहे. जुन्या आठवणी जागवतानाचं. "आता हा फोटो माझ्या खाजगी नरकाचा एंट्रीपास"!
एक क्षण नाडी थांबू शकते, त्याचा हा लेख नीट वाचला तर...
---
इथंच थांबतो.
हे लेखन तोकडं वाटतं का? वाटणारच. त्याचं कारणही पुन्हा हाच माणूस! रामदास. द्वारकानाथ बिवलकर!!!
प्रतिक्रिया
14 Feb 2012 - 1:10 am | श्रावण मोडक
दुवा करड्या रंगात टाकण्याचा प्रयत्न फसला.
(बंदा आणि खुर्दा: 1 - सबनीस!)
हाच दुवा वर नीट केल्याबद्दल संपादकांना धन्यवाद!
13 Feb 2012 - 11:50 pm | कवितानागेश
परत परत वाचण्यासाऱखे... :)
13 Feb 2012 - 11:54 pm | असुर
श्रामो,
तुमच्या लिखाणाला सलाम!
पण रामदासकाकांची आमच्या मनात आहे तीच इमेज राहू द्यायची होती. फार हसरा फोटो आहे तो.
आज हे वाचून तोच फोटो 'सूर्यापुढे धरुन पाहीला आणि अजून चार गदद छटा दाखवून गेला', असं वाटलं.
-- असुर
14 Feb 2012 - 12:10 am | बिपिन कार्यकर्ते
अजून लेख नीट वाचला नाहीये. वरवर बघितला. पण शेवटी रामदास हे नाव बघितलं. लिहिणार्याचं नाव माहित आहेच. आता लेख वचणं हा डिटेलींगचा भाग झाला. तो निगुतीनं आस्वाद घेत वाचेन. मजा द्विगुणित होईल.
रामदास ही एक व्यक्ति नाहीये... हे एक गारूड आहे. मागे मी त्यांनाच लिहिल्यासारखं... सिंदबादच्या मानगुटीवर बसलेला म्हातारा होता ना तसं. फरक एवढाच की तो म्हातारा उतरावा म्हणून सिंदबादची धडपड आणि हा म्हातारा उतरू नये यासाठी माझी धडपड.
14 Feb 2012 - 1:05 am | पिवळा डांबिस
लेखनमूर्ती आणि लेखक...
या दोघाही असामींशी जमलेली दोस्ती....
ही मिपाने मला दिलेली एक अमूल्य भेट....
धन्यवाद मिपा!
<श्रामो, लय डेरिंगबाजपना करताय! येक्दम रामदासाच्या छाटीला हात घातलांत!! अब तेरा क्या होगा रे कालिया?>
:)
14 Feb 2012 - 4:30 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__
14 Feb 2012 - 1:15 am | गणपा
समर्थांना भेटायची ओढ अधिकच वाढली आहे.
या माणसानं आपल्या लिखाणानं माझ्या मनावर अक्षरशः गारुड घातलं आहे.
14 Feb 2012 - 1:45 am | चतुरंग
लेखनविषय आणि लेखक दोघांना सलाम! तुमचा हा समर्थ बंदा बघूनच आमचा खुर्दा उडाला!! :)
समर्थांची प्रत्येक भेट ही अनुभवाने उजळवून टाकणारी, 'रामी रामदासा शक्तीचा शोध!' ह्या वचनाची प्रचिती देणारी असते.
(लेखनविषयाशी भेट झाली आहे लेखकाशी कधी होईल माहीत नाही.)
-चतुरंग
14 Feb 2012 - 1:47 am | आळश्यांचा राजा
नीट वाचायला हवंय परत.
बाय द वे, तो इलस्ट्रेटेड वीकलीचा अंक स्कॅन करुन डकवाल काय?
14 Feb 2012 - 2:14 am | मोदक
दोघांनाही. :-)
14 Feb 2012 - 3:06 am | बहुगुणी
तुमच्या मालिकेविषयीच्या अपेक्षा उंचावून ठेवणारा.
मुळीच नाही, फक्त, या लेखाचा विषय असलेली व्यक्ती माझ्याच लेखी नव्हे तर इतर सर्वांनाच "खुर्द्यात गणली जाईल" असं कधी वाटणं शक्यच नाही, हा रुपया बंदाच!
[स्वगत: आता एकदम रामदासांनाच हात घातल्यावर तिसरं व्यक्तीमत्व कोण असेल? He is a difficult act to follow....]
14 Feb 2012 - 4:43 am | रेवती
मस्त लेखन.
ज्या इमारतीसमोर उभा होतो, तिचं वर्णन सुरू झालं. त्या इमारतीचं कूळ.
इथच शंका आली की हे रामदास तर नव्हेत!
14 Feb 2012 - 6:31 am | नंदन
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो,
जीवन त्यांना कळले हो!
14 Feb 2012 - 5:14 pm | मेघवेडा
हेच म्हणतो!
___/\___
14 Feb 2012 - 7:48 am | सूड
लेख वाचायला सुरुवात केल्यानंतर थोडी शंका येत होती की हे तेच का , लेखाच्या ममध्यापर्यंत आल्यानंतर खात्री झाली हे रामदास काकाच !!
14 Feb 2012 - 7:50 am | ५० फक्त
सुंदर झालंय, खुप खुप आवडलं.
14 Feb 2012 - 10:11 am | जाई.
काय बोलू
वाचताना एकदम गुंग व्हायला झाल
समर्थ व्यक्तिमत्वाचं तितक्याच समर्थपणे केलेलं वर्णन
_/\_
14 Feb 2012 - 10:22 am | मस्त कलंदर
लेखाच्या सुरवातीलाच ते रामदास असावेत असं वाटलं होतं, पण त्यांच्या कविता तितक्याशा न वाचल्याने गंडले की काय असं वाटून गेलं. पण ते काहीवेळच. लेख खरंच निगुतीनं वाचण्यासारखा. माझ्या आळशीपणाला दुवा देत मस्त चवीचवीनं वाचला. पुन्हा पुन्हा वाचेन असंही वाटतंय. :-)
बाकी रामदासांचा सहवास लाभणं इतकंच पुरेसं आहे. ते एक एक करून सहजगत्या वेगवेगळे खजिने आपल्या समोर मांडत राहतात, ते मोडकांसारखं शांत बसून बस्स ऐकत राहावं!!!
14 Feb 2012 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी.
14 Feb 2012 - 12:07 pm | छोटा डॉन
हेच म्हणायचे आहे.
बाकी प्रतिसाद काय लिहावे हा प्रश्नच आहे, काही न लिहलेले उत्तम असे वाटते आहे.
- छोटा डॉन
14 Feb 2012 - 10:50 am | ढब्बू पैसा
लिखाण जास्त आवडलं की लेखनमूर्ती हे ठरवता येत नाहीये!
चवीचवीने वाचावंसं लिखाण आहे :). रामदासांच्या व्यक्तीमत्वाचे इतके पैलू तुम्ही लेखनात पकडू शकलात हे ग्रेटच!
14 Feb 2012 - 11:16 am | अन्या दातार
अरे काय मिपाकरांचा जीव घ्याल का आता दोघे मिळून?? किती ते सुंदर लिहावे?
14 Feb 2012 - 11:35 am | प्रास
मिपामंडळात दाखल झाल्यावर ज्या दोन सदस्यांच्या लिखाणाने प्रभावित झालो त्यांच्यापैकी एक दुसर्याबद्दल लिहिल असं कधी वाटलंच नव्हतं. आज एका अंगाने ते शक्य झाल्याचं वाचून फार्फार आनंद झाला आणि त्या आनंदातच सगळा लेख वाचून काढला.
रामदासकाकांचं लिखाण वाचून त्यांच्याबद्दल जी भावना निर्माण झालेली ती माझ्यासारख्याला शब्दप्रभुत्वाच्या अभावी व्यक्त करणं शक्यच नव्हतं पण आता श्रामोंकडून आपल्याला जे वाटत होतं ते शब्दबद्ध झाल्याचं समाधान वाटायला लागलं आहे.
मिपा परिवारातील या सदस्यद्वयांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे आणि ती कधी फलदृप होते त्याची वाट बघत बसलोय...
14 Feb 2012 - 12:03 pm | प्रचेतस
रामदासकाका आणि श्रामो दोघांनाही _/\_
14 Feb 2012 - 12:13 pm | प्रभो
हेच आणी हेच लिहायला आलो होतो.
14 Feb 2012 - 12:22 pm | प्रीत-मोहर
असेच __/\__
14 Feb 2012 - 1:17 pm | विजुभाऊ
जिंदगी चवीचवीने आस्वाद घेवून प्यावी तसे काहिसे रामदासांच्या बाबतीत होते.
त्यांचा एक लेख वाचून मी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. आजही त्या लेखाची आठवण ताजी आहे. लेख वाचून त्याना फोन केला होता ते बोलणे आजही मनात कायम ताजे आहे.
14 Feb 2012 - 2:14 pm | वाहीदा
याच वाक्याने कळलं हे व्यक्तीमत्व दुसरं -तिसरं कोणी नसुन रामदास काकाच आहेत
'जिंदगी जिंदा दिली का नाम हैं' हे रामदास काकांच्या बाबतीत १००% खरे.
कोणत्याही गोष्टीचे ते जेवढ्या जिंदादिली ने वर्णन करतात त्याच जिंदा दिलीने ते जगत ही असतील आयुष्यातील प्रत्येक क्षण ...
रामदास काकांचा सहवास एक वेगळाच अनुभव .... स्वच्छंद.. प्रवाही ..एक एक खजिन्याने ओतप्रोत भरलेला.
आयुष्य जगण्याचे ही व्यसन असावे जिंदादिलीने (मराठी ??)
रामदास काका म्हणजे - 'एक जिंदादिल शख्सियत' !! एका लेखात सामावणे नक्कीच मुश्किल :-) पण प्रयत्न आवडला.
14 Feb 2012 - 3:11 pm | ब्रिटिश
माजी म-हाटी ची भाशा
त्याच्या आंगणी आलेली
मोती माणिक हिरक
जरी चांदणं ल्यालेली
म्हाता-या, आसच लिवत जा रे आमच्यासाटी !
श्रामोंचे आभार.
14 Feb 2012 - 4:06 pm | गवि
वाह.......
14 Feb 2012 - 4:36 pm | सर्वसाक्षी
एका भन्नाट माणसाच भन्नाट वर्णन. इतकी वर्ष ओळखतो, पण अनेक पैलु अजुनही अज्ञात आहेत. बाप माणुस.
श्रामोंच सुंदर शब्दांकन.
14 Feb 2012 - 5:03 pm | प्यारे१
श्रामोंच्या लेखणीला नि रामदासकाकांच्या पोतडीला सलाम...!
हॅट्स ऑफ....
अवांतरः श्रामोंचं विशेष कौतुक वरच्या 'बाला 'ला प्रतिसाद द्यायला भाग पाडलंत यासाठी. ब्रिटीश भावा कुठं आहेस रे? लिखाण प्रचंड मिस्स करतोय आम्ही. लिहीत जा.
14 Feb 2012 - 6:23 pm | किसन शिंदे
एका समर्थ माणसाचं सुंदर वर्णन तेवढ्याच एका समर्थ माणसाच्या लेखनीतून उतरलेलं!!
_/\_ दोघांनाही :-)
14 Feb 2012 - 6:50 pm | स्वाती२
_/\_
15 Feb 2012 - 12:46 am | धनंजय
+१
15 Feb 2012 - 8:14 am | सुनील
लेख वाचताना बहुधा रामदास यांच्याबद्दलच असेल असे वाटत होतेच.
त्यांनी अगम्य भाषेत दिलेली चहाची ऑर्डर आणि नंतर चहावाल्या पोर्याला त्याचे मूळ गावाचे नाव ओळखून सांगितल्यावर त्याचा झालेला अचंबित चेहरा, हे सारे मीदेखिल अनुभवले आहे!
एका भन्नाट व्यक्तीचे तितकेच भन्नाट व्यक्तीचित्र!
बाकी तो वीकलीचा अंक डकवता आला तर पहा.
15 Feb 2012 - 10:27 am | sneharani
+१
मस्त!!
15 Feb 2012 - 11:11 am | श्रावण मोडक
सर्वांना धन्यवाद. प्रतिसादांचे श्रेय रामदासांचेच आहे!
आता इथून पुढं सारं काही स्वगत आहे.
ढब्बी म्हणते की, 'रामदासांच्या व्यक्तीमत्त्वाचे इतके पैलू...' इतके कुठले? इथं तर मोजकेच झाले. हा माणूस त्याच्या बाहेर बराच आहे. त्या दृष्टीनं हे व्यक्तिचित्र या माणसाला पूर्ण कवेत घेणारं नाही. त्यासाठी असे तीन भाग होतील. मला 'शाळा' करायची नव्हती, म्हणून मी माझ्या मते महत्त्वाचं मोजकं उचललं. एक शाळा मात्र बहुदा मी केली. आता रामदासांवर कुणाला लिहायचं असेल तर यापेक्षा वेगळा दृष्टिकोन घेऊन, वेगळं काही घेऊन यावं लागेल. एरवी जे लेखन होईल ती यातली भर ठरेल.
सुनील यांच्या प्रतिसादात रामदासांनी त्या हॉटेलमधल्या पोराची विकेट घेतल्याचा उल्लेख आहे, हे यासंदर्भात सूचक आहे. रामदासांना माहिती असलेल्या त्या भाषा अशा लेखनात टिपता आल्या पाहिजेत. माझ्या या लेखनात ते नाही. त्यापलीकडचीही एक घटना सांगतो. आम्ही एकत्र फिरत होतो तेव्हा बोलता बोलता 'स्ट्रँड'समोर आलो. स्ट्रँडची खासीयत, मला माहिती होती, पण रामदासांच्या तोंडून ऐकण्याची मजा और होती. आमचं बोलणं सुरू असतानाच स्ट्रँडमधून एक वृद्ध गृहस्थ बाहेर आले. टक्कल, पण पाठीमागे आयाळ म्हणावी असे केस. सोनेरीपणाकडे झुकणारे. गोरापान तजेलदार चेहरा. वय सत्तरीच्या आसपास. अत्यंत किरकोळ शरीरयष्टी. पटकन रामदास म्हणाले, "हे अशोक शहाणे..." आता अशी माणसं अशी भेटणं हे एक उदाहरणार्थ भाग्य वगैरे असावं. मग फार तर साठेक सेकंद अशोक शहाणे यांचा परिचय रामदासांनी करून दिला. मला तोही परिचय गरजेचा नव्हता. दुर्गाबाई, त्याआधी ढसाळ वगैरे मंडळी हे मला माहिती होतं. माझ्यासमवेत निखिल आणि मस्त कलंदर हे दोघं होते. त्यांच्यासाठी ती माहिती किंचित तरी नवी होती. तो अनुभव त्यांच्यासाठी संचित असावा. स्ट्रँडमधून बाहेर येताना मी अशोक शहाणे यांना पाहिलं, असं मीही म्हणू शकतो, तर त्या दोघांचं काय?
परतीच्या प्रवासात हा माणूस गाणं गुणगुणताना एकदम मदनमोहनवर बोलू लागला. फार नाही. एखादं मिनिटच. पण त्यात त्यानं एक विधान केलं: उत्तम कलाकार, पण पडला. आता हे विधान समजून घ्यायचं झालं तर त्यामागचं बरंच काही हाती गवसतं.
रामदासांसमवेत मुंबईत असं फिरणं याला आम्ही 'हेरिटेज वॉक वुईथ रामदास' असं म्हणतो. हा वॉक काही तासांचा असू शकत नाही. त्यासाठी तीन दिवस तरी ठेवले पाहिजेत. चालण्याची तयारी हवी. मजबूत खाण्याचीही तयारी हवी. कारण 'उत्तम शेंगदाणे खाऊ' इथंपासून ते अगदी 'भरपेट जेवण' इथंपर्यंतची माहिती त्यांच्याकडं आहे. या दोहोंपलीकडे सर्वाधिक गरजेची गोष्ट म्हणजे ऐकण्याची, चौकसपणे काही विचारण्याची तयारी हवी. एवढं जमलं तर सोबत साला एक कॅमेरा ठेवावा. रामदासांना न कळत एक माईक लावून टाकावा, सारं काही रेकॉर्ड करावं. आणखी काय हवं?
काल रामदास म्हणाले, "अहो, पस्तीशीच्या आसपासचे लोक जालावर असतात. त्यांच्यादृष्टीनं माझ्याकडची माहिती त्यांना वेगळी, नवी, भरपूर वाटते... पण अशी माणसं बरीच असतात." मी म्हणालो, "हो. माहिती असणारी माणसं मलाही माहिती आहेत. असलेल्या माहितीचं विश्लेषण करून ती श्रोत्यापर्यंत 'पोचवणं' हे होत नसतं..." श्रोत्यापर्यंत ती 'पोचवली' की तोही घडत असतो, ही माझी भूमिका. मग आमची सहमती झाली, विश्लेषण महत्त्वाचं असतंच. हे काम रामदास करत असतात. माझा हा अनुभव इतरही काही बाबींमधला आहे. त्यात व्यवसाय हा विषय आहे, सामाजिक-राजकीय संघर्षाचा विषय आलेला आहे, शेअर बाजार हा विषय होता आणि त्याहीपलीकडं मोलाचं म्हणजे सामाजिक स्थित्यंतर हाही विषय आला आहे. आपण टिपकागद झालं पाहिजे.
15 Feb 2012 - 1:12 pm | गणपा
क्या बात!!!!
15 Feb 2012 - 1:50 pm | श्रावण मोडक
आणि विशेष म्हणजे, हा माणूस माझ्याशी विमा या विषयावर आजवर बोललेलाच नाही. ;)
15 Feb 2012 - 3:40 pm | मनिष
लेख सुंदर आणी ही प्रतिक्रियाही. समर्थांना भेटायची खूप इच्छा आहे, कधी योग येतोय काय माहीत! आता उत्सुकता खूपच वाढलीय...
15 Feb 2012 - 8:24 pm | रेवती
हे सगळं वाचून सौ. रामदास या व्यक्तीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यांची तेवढी चांगली साथ असल्याशिवाय का वाचनीय असं आपल्या पदरात पडतं!
19 Feb 2012 - 11:47 am | रामदास
या व्यक्तीने हा लेख वाचला आणि एकच प्रश्न विचारला.
तुम्हाला मिपावरून सेंड ऑफ मिळाला का ?
श्रामोंनी लिहीलेल्या कौतुक लेखाबद्दल त्यांचा आभारी आहे.
19 Feb 2012 - 11:30 am | मन१
टिपकागद व्हावे ह्याशी सहमत.
आवडलेल्या धाग्याबद्दल अधिक काय लिहावे समजत नाही.
20 Feb 2012 - 12:58 am | सुनील
श्रामोंशी सहमत!
हा माणूस चतुरस्त्र आहे ह्यात शंका नाही.
असेच एकदा त्यांच्या समवेत "बसलो" असतानाची गोष्ट.
मी पूर्वी एका ट्रान्सपोर्ट कम ऑनबोर्ड कुरीयर कंपनीत कामाला असल्याबद्दलचा विषय निघाला. रामदासांनी मला ऑनबोर्ड कुरीयर ही संकल्पना मूळात कोणाची, त्या संकल्पनेवर आधारीत व्यवसाय प्रथम कोणी सुरू केला. तो कसा भरभराटीला आला. नंतर त्या व्यवसायात (आमच्या कंपनी सारख्या) बड्या कंपन्या आल्यावर त्याचा धंदा कसा बुडाला. मग त्याने रुद्राक्षांचा धंदा कसा सुरू केला आणि आता त्याचे कसे बरे चालले आहे. ही माहिती दिली. जी ह्या कंपनीत तीन वर्षे काढूनही मला ठाऊक नव्हती!
"नीट" व्हिस्की पिणारा हा इसम शुद्ध शाकाहारी आहे, हेदेखिल आश्चर्यच, नाही का?
15 Feb 2012 - 11:53 am | चाणक्य
रामदास काकांचे लिखाण नेहेमीच आवडते. श्रामो, छान लिहिले आहेत तुम्ही
15 Feb 2012 - 2:23 pm | इरसाल
-^-
15 Feb 2012 - 2:48 pm | स्मिता.
श्रामोंनी लेख टाकलाय हे कालच पाहिलं होतं पण कार्यबाहुल्यामुळे त्यांचा लेख निवांत वेळीच वाचायचा म्हणून बाजूला ठेवला. तो आज निवांत वाचल्याचं सार्थक झालं... तेही लेखक आणि लेखनविषय यांच्यामुळे द्विगुणीत!! _/\_
15 Feb 2012 - 3:08 pm | प्राजक्ता पवार
_/\_
15 Feb 2012 - 3:46 pm | विसुनाना
"आयुष्याशी झट्या घेणे" म्हणजे नेमके काय असते? ते अनुभवलेल्या माणसालाच "आयुष्याने स्वतःला सोडवून घेतले" म्हणजे नेमके काय असते? ते समजते.
रामदासबुवांना नमस्कार.
मोडकांनाही.
इतकेच.
15 Feb 2012 - 8:40 pm | पैसा
श्रामोंच्या खास शैलीत चिल्लरखुर्दा सुद्धा बंदा रुपया वाटायला लागेल मग बंद्या रुपयाचं काय सांगावं!
19 Feb 2012 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवांतपणे लेख वाचायचं सार्थक झालं....! धन्स श्रामो.
लेखनाची शैली सुंदर.
-दिलीप बिरुटे
19 Feb 2012 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
आपले मिपा खरेतर नवरत्नांचाच दरबार आहे. जिथे आम्ही न पाहीलेल्या माणसांच्याही प्रेमात पडतो.
आणि हा लेख म्हणजे एका रत्नाने दुसर्याची नव्याने करुन दिलेली ओळख .
दोघांनाही मनापासुन नमस्कार,
(रामदास काका आणि श्रामोंच्या प्रेमात पडलेला)
19 Feb 2012 - 8:27 pm | विलासराव
आम्हाला समर्थांना भेटण्याचं भाग्य लाभलं.
आता हेरीटेज वॉकचं जमवावं लागेल.
बघु कधी योग येतोय ते?
20 Feb 2012 - 3:44 pm | चिगो
रामदास काकांची अतिशय सुरेख ओळख करुन दिलीय श्रामोंनी.. दोघांनाही __/\__
बाकी रामदासकाकांचं लेखन वाचल्यावर मला स्वत:ला "चड्डीत राहत जा की भाड्या.." हे सांगायला खुप सोप्पं जातं..
देत रहा, मालक. आमचे हात पसरलेले आहेतच..
20 Feb 2012 - 4:14 pm | विनायक प्रभू
एकदम हलकट माणुस.
ह= हरहुन्नरी
ल=लवचिक
क=कसलेला
ट=टग्या(वेळ पडेल तेंव्हा)