रघु आता या जगात नाही. मरताना त्याच्याकडे एकूण दोन हजार आठशे पंधरा संदेश होते. अर्थात त्याच्या डायरीतल्या नोंदींप्रमाणे. त्याची ही स्किम नक्की कधी सुरु झाली? म्हणजे जेव्हा त्याने तो उद्योग सुरू केला तेव्हा ती एक 'स्किम'च होती. नंतर मात्र काहीतरी भलतंच होऊन बसलं.
दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एका दुपारी त्याच्याशी बोलताना प्रथम त्याने मला त्याच्या ह्या नविन स्किमबद्धल सांगितलं. तो त्याच्या एका खोलीच्या जागेत एकुलत्या एका खुर्चीवर आरामात दारु ढोसत बसला होता. दुपारच्या उन्हाने तापलेले पत्रे.. अंगाची नुसती काहिली होत होती आणि हा जणु फुल्ल एसी चालु असल्यासारखा आरामात होता. अंगात बनियान आणी लुंगी. बनियानला इतकी भोकं होती की त्याने ती न घालता उघडाच राहिला असता तरी काही बिघडलं नसतं. सगळीकडे त्याच्या देशी दारुचा वास भरून राहिला होता. मला तर श्वास घेणंही नकोसं होत होतं. पण तरीही त्याला भेटायला मी आलो होतो. त्याला समजावणं मी माझं कर्तव्य समजत होतो.
"तुला काहीतरी कामधंदा तर करायलाच हवा ना!" मी त्याला म्हंटलं.
चकण्याच्या बशीतले थोडे दाणे तोंडात टाकत बेदरकार नजरेने तो माझ्याकडे बघत होता. संपलेली बाटली त्याने कोपर्यात फेकली. खोलीत एका कोपर्यात बाटल्यांचा ढीग झालेला होता. तीन चार दिवसांचे वाढलेले खुंट खाजवत बसलेल्या रघुचा मला अतिशय राग येत होता.
"अरे, तुझ्याकडे या दारुसाठीतरी कुठून पैसे आले?"
उत्तरादाखल रघु माझ्याकडे बघून थोडं हसला. गूढ की काय म्हणतात ना तसं काहीसं. गेले चार पाच महिने रघु बेकार होता. आधी माझ्याबरोबरच कुरियर बॉय म्हणून काम करायचा. पण डिलीवरीमधे सारखे सारखे घोळ व्हायला लागले तसा सायबांनी बांबू दिला. पण आपला पुर्वीपासूनचा मित्र, म्हणून अडीनडीला धा-वीस रुपये मी त्याला देत होतो. पण गेला महिनाभर त्याने माझ्याकडूनपण पैसे घेतले नव्हते. शिवाय बघावं तेव्हा या खोलीत पीत बसलेला!
"हसतोस काय!" मी घुश्श्यातच बोललो, "काही काम करणं सोडा, पण या खुर्चीवरनं बुड तरी उचलंल आहेस का इतक्या दिवसात?"
त्याने बोटानेच मला गप्प राहण्याची खूण केली. खुर्चीवर बसल्याबसल्यासुधा तो भेलकांडत होता.
"कामधंदा करण्याचे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत माझे", रघुने तोंड उघडलं एकदाचं.
"अरे, काम मिळत नसेल तर मला सांग, मी तुझ्यासाठी काहीतरी शोधून ठेवतो" मी समजूतीच्या स्वरात म्हणालो.
"मन्या, तुला शाण्या माणसातली आणि येड्या माणसांतला फरक माहितेय?" त्याने विचारलं, मी त्यावर काही बोलणार इतक्यात प्रवचनकर्त्याच्या थाटात तो पुढे बोलायला लागला, "येडी लोकं पडेल ते काम करतात. का म्हाईतीये? तर आपण नुस्तं बसून र्हायलो आपल्याला कोण काय म्हणेल या भितीने. पण शाणी माणसं मंजे एकदम सुम! जो पर्यंत आपल्याला काही करायची गरज पडत नाही तोवर ते लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ते आरामात असतात!"
त्याचं हे जगावेगळं तत्वज्ञान ऐकून मला हसावं का रडावं ते समजेना.
त्याने मला थांबायला सांगितलं, आणि लडखडत भिंतीवरच्या कपाटातून आणखी एक बाटली आणि कोणतातरी पेपर घेउन आला. बाटली अर्थात माझ्यासाठी आणली नव्हती. पेपर पुढे करून म्हणाला "हे वाच!"
पेपरमधे "छोट्या जाहिरातीचं" पान काढलं होतं. त्यातल्याच एका जाहिरातीभोवती पेनाने गोल केला होता. मी वाचायला लागलो
__ तुमच्या प्रिय मृत व्यक्तींकडे संदेश पोचवा !__
"हा काय प्रकार आहे?" मला काही समजलं नव्हतं.
"कोन म्हनलं मी कायपण करत नाही?" तो म्हणाला "ही माझी नवी स्कीम आहे. लोकं आपल्या मेलेल्या नातेवाईकांना निरोप पाठवण्यासाठी कितीही पैसे द्यायला तयार असतात!"
"क्काय?" मला काय बोलावं तेच सुचेना.
"बिहारमधे कोणीतरी असं केलेलं म्हणे.. चिक्कार पैसे कमवले!" रघु महाराज माहिती देत होते.
"कधी ना कधी नाहीतरी मी मरणारच आहे.म्हटलं त्यापुर्वी आपला फायदा करून घ्यावा. लोकं
ह्यापेक्षा कितीतरी गंडवागंडवीचे प्रकार करतात!"
अजूनही रघुची स्किम माझ्या टाळक्यात शिरेना. हा काय आता आत्महत्या वगैरे करणार की काय? "अरे पण त्यापेक्षा सरळ काही तरी काम का नाही करत? मरायची कसली घाई तुला? आणि मेल्यावर तुला ह्या पैशाचा काय उपयोग?"
"तू पण साला येडाच आहे मन्या! मेल्यावर नाही आत्ताच पैसे मिळणार मला. हे काय 'क्याश ऑन डिलेवरी' वाटलं काय तुला?"
मी तोंडात मारल्यासारखा गप्प झालो आणि त्याची जाहिरात पुन्हा वाचायला लागलो.
"हे इथे काय लिहिलंय? तुला क्यांसर आहे आणि लवकरच तू मरणार आहेस? हे काय आता?"
निर्विकारपणे खांदे उडवत रघु सांगू लागला "हे लिहिल्याशिवाय कोण मला पैसे देईल? शिवाय कित्येक वर्षं मी डॉक्टरांकडे गेलेलो नाही. मला क्यांसर नाहीच हे कसं कळणार?"
रघुकडे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं.
"तू आणि मी त्या भिक्कार कुरीयर कंपनीत किती वर्षं आहोत.. काय फरक पडला आपल्या आयुष्यात इतक्या वर्षात.. ही भिकारडी खोली आणि ही बाटली! साला वैताग आलाय आपल्याला सगळ्याचा आता"
"म्हणून मग आता हे धंदे? लोकांना फसवण्याचे?"
"काय फसवणं फसवणं लावलंय रे? जर मी पैसे घेऊन त्यांचे निरोप पोचवले नाहीत तर मी त्यांना फसवेन! पण तो पर्यंत मी त्यांना फसवतोय हे सिद्ध तरी करता येईल का?" रघुने एकूण फारच खोलात जाउन याचा विचार केलेला दिसतोय!
"आणि ह्या निरोप पोचवायच्या बदल्यात तुला काय मिळणार?"
"तीनशे रुपये फक्त"
"काय बोलतो!" आश्चर्यापेक्षा माझ्या आवाजात अविश्वास जास्त होता. "एका निरोपाचे तीनशे रुपये! आणि त्याबदल्यात तू काय करणार?"
"गिर्हाईक मला फक्त एक चिठ्ठी देणार. आणि मी मेल्यावर ती चिठ्ठी त्यांच्या मेलेल्या नातेवाईकांना देणार! जन्मभर कुरीयरगिरी केलीच आहे! त्यातुनच तर ही आयडिया आली आपल्याला" रघु मोठ्या अभिमानाने सांगत होता.
"आणि लोकं खरंच पैसे देतात? काय भंकस करतो काय? लोकं हे वाचतात तरी का?"
"चिक्कार! दररोज मला कोण ना कोणतरी भेटून पैसे देतंय हे वाचल्या पासून. मी येत्या आठवड्यात पुन्हा जाहिरात टाकणारे!"
"लोकं खरंच पैसे देतात?" माझा विश्वासच बसत नव्हता!
"अर्थात! एकदम शिंपल मामला आहे! ते पैसे देतात आणि मी खर्च करतो!"
"आणी ह्यात काही चुकतं आहे असं तुला अजिबात वाटत नाही ना?"
"अजिबात नाही" रघुला उपहास वगैरे फारसं कळत नाहीच "फक्त माझ्या प्लॅन मधे फक्त एकच प्रॉब्लेम आहे!"
"फक्त एकच !"
"ज्या लोकांचा देवधर्मावर विश्वास नाहीये त्यांना कसं पटवायचं हे समजत नाहिये!"
रघु काहीही बोलण्याच्या पलिकडे गेला होता. मी त्याचा नाद सोडला आणि निघून आलो.
रघुने त्याच्या नविन स्किम बद्धल मला सांगितल्यानंतर लवकरच त्याच्या चाळीतल्या सगळ्यांना सुद्धा सांगून टाकलं. काही लोकांना तो लवकरच मरणार म्हणून त्याची दया येत होती तर काहींना त्याने मृत्यूनंतरही अंगावर घेतलेल्या कामगिरीसाठी त्याच्या बद्धल आदर वाटू लागला होता. त्याने मला म्हटल्याप्रमाणे त्याच्या जाहिराती पेपरमधून वरचेवर दिसू लागल्या होत्या. त्याला भेटून चिठ्ठी देणार्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होत होती. अगदी लांबून लांबून त्याला लोकं पैसे आणि चिठ्ठ्या पाठवू लागले.
हां हां म्हणता पठ्ठ्याने चांगलंच बस्तान बसवलं. एक सेकंडहँड गाडीसुद्धा घेतली. अंगावर नवीन कपडे, पायात चकचकीत बूट. एखाद्या बी ग्रेड पिच्चरच्या होरोसारखा दिसू लागला होता. अर्थात त्याचा "रेट" तीनशे रुपयांवरून हजार रुपयांवर गेला होता. त्याच्या आधीच्या कोंदट खोलीतून त्याच्याच बाजूला नुकत्याच झालेल्या बिल्डींगमधे दोन रून भाड्याने घेऊन राहण्यापर्यंत त्याची प्रगती झाली होती. शिवाय, कुठलीतरी बाई आणून त्या खोलीत ठेवल्याची कुजबूजही आजकाल ऐकू येत होती.
नंतर एकदा आम्ही भेटलो तेव्हा मला तो ओळखूसुद्धा आला नाही. मी त्याच्या बिल्डींगमधे काही पार्सल पोचवायला गेलो होतो. जिन्यात रघु समोरून भारीतल्या कपड्यांमधे तोंडात सिगारेट ठेउन उतरत होता.
"मन्या!" त्याने हाक मारली आणि पाठीवर जोरदार दणका देऊन मला म्हणाला " काय यार! विसरला काय आपल्याला?"
"अरे रघु! काय साला ओळखलंच नाही तुला! काय चालंलंय आजकाल!" त्याचं काय चाललंय याची पूर्ण माहिती असूनही मी वेड पांघरायचं ठरवलं.
"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"
"आता नको. मला बर्याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.
पण आमची भेट लवकरच होणार होती.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
27 Jan 2012 - 3:10 am | सुहास झेले
वाह एकदम अभिनव स्कीम .... पुढला भाग वाचायला उत्सुक :) :)
लवकर येऊ द्यात ....
27 Jan 2012 - 3:43 am | टुकुल
एकदम नविन कल्पना आणी सुरुवात पण मस्त झाली आहे.
जाता जाता : हि सत्यकथा आहे का?
--टुकुल
27 Jan 2012 - 3:59 am | शिल्पा ब
एक्दम नविन अन भन्नाट कल्पना.
27 Jan 2012 - 4:07 am | वपाडाव
असं मध्येच क्रमशः टाकुन गायब नका होउन जाउ साहेब.
छान कथा आहे, वेगही मस्त पकडलाय.
पुभाशु. पुभालटा.
27 Jan 2012 - 12:02 pm | पिंगू
छान वाटतेय वाचायला. बाकी क्रमशः इतक्या लवकर आणत जाऊ नका हो..
- पिंगू
27 Jan 2012 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
फक्त एक शंका :-
हे कुठल्या इंग्रजी अथवा हिंदी कथेचे भाषांतर, अथवा त्या कल्पनेवरुन फुलवलेली कथा आहे का ? हे नक्की आधी कुठतरी वाचल्यासारखे आठवत आहे. विशेषतः "__ तुमच्या प्रिय मृत व्यक्तींकडे संदेश पोचवा !__" ही कल्पना.
27 Jan 2012 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो. पण वाचायला मजा आली. पुढे लिहा.
27 Jan 2012 - 8:05 pm | मराठे
प्रतिसादाबद्धल धन्यवाद!
मी सुद्धा हे पूर्वी कधीतरी ऐकलं/वाचलं होतं. ती गोष्ट होती की बातमी होती ते आठवत नाही. (त्यामुळे ॠणनिर्देश कसा करावा हे समजलं नाही) पण कल्पना ओरिगिनल :) नाही. शेवट वेगळा करण्याचा विचार आहे. बघु कसं जमतं ते!
27 Jan 2012 - 1:32 pm | यकु
आवडले.
पुभाप्र
पुलेशु
27 Jan 2012 - 1:45 pm | Maharani
भन्नाट कल्पना!! पुढचा भाग लौकर टाका...
27 Jan 2012 - 2:34 pm | शेफ चेतन
दुनिया जुकति हे ,जुकानेवाला चाहिये.
27 Jan 2012 - 2:57 pm | किचेन
शुध्दलेखन सुधारा शेफ. ;)
27 Jan 2012 - 2:59 pm | प्रचेतस
शुध्दलेखन नव्हे हो, शुद्धलेखन.
27 Jan 2012 - 5:17 pm | वपाडाव
मला आत्ता खुप खुप म्हणी आठौत आहे पण जौ दे...
आम्हाला माफ करण्याची सवयच लागलीये जणु...
(पुन्हा पुन्हा कोण त्याच त्या शिळ्या कढीला उत आणा)
27 Jan 2012 - 2:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मजा येतेय... येऊद्या लवकर पुढचा भाग!!
अवांतरः दुनिया जुकति हे ,जुकानेवाला चाहिये. ???
जिटच आली ;)
27 Jan 2012 - 5:18 pm | वपाडाव
मी पडलो ना खुर्चीवरुन.... वारता वारता वाचलो...
27 Jan 2012 - 3:00 pm | स्वातीविशु
इंटरेस्टिंग कथा..येडा बनुन पेडा खानेवाल्याची.
27 Jan 2012 - 9:25 pm | रेवती
वाचतिये.
बर्याच दिवसांपूर्वी काहीतरी असंच वाचलं होतं.