"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"
"आता नको. मला बर्याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.
पण आमची भेट लवकरच होणार होती.
आता पुढे...
त्यादिवशी नंतर बरेच दिवस रघु दिसला नाही. आणि जेव्हा दिसला तेव्हा त्याची एका वेगळ्याच अर्थाने ओळख पटली नाही. मला वाटलं होतं आता पर्यंत त्याने भरपूर पैसा जमवला असेल आणि मस्तपैकी बस्तान बसवलं असेल. पण त्याच्या कडे पाहून एकूण त्याचं काही खरं नाही इतकं मात्र जाणवलं.
रात्री दोन वाजता माझ्या खोलीचं दार खाडखाड वाजत होतं. दिवसभराच्या कामानंतर मी अगदी गाढ झोपेत होतो. त्यामुळे दार वाजल्यावर उठावंसंच वाटत नव्हतो. पण थोड्या वेळाने दार उघडलं नसतं तर कदाचित तो दार तोडूनच घरात शिरला असता. मी आधीच झोपेत होतो आणि त्यातून अशा भलत्या वेळी रघुला माझ्या दारात पाहून मी जाम गोंधळलो.
"काय रे? तू आत्ता ह्या वेळी? पोलिस बिलिस लागलेत की काय पाठिमागे"
अर्धवट झोपेत त्याच्या मागे पोलिस वगैरे असतील तर आत्ता मला तो घरात नको होता. मी लाईट लावू लागलो.
"लाईट नको लाउ आणि आधी दार बंद कर. मग सांगतो"
तो पटकन आत येत म्हणाला. त्याच्या एकून वागण्यावरून तो जाम घाबरला वाटत होता. पण त्याच वेळी त्याची भीती लपवायचा पण प्रयत्न करत होता. नक्कीच कायतरी भानगडीत अडकला असणार. पण च्यायला माझ्या घरी येऊन मला त्यात उगाचच गुंतवलं तर नसतं झंझट माझ्या मागे लागेल. मी दरवाजा लावला. रघु खोलितल्या खोलीत येरझारा घालत होता.
"काय लफडं झालं रे?" मी त्याला पाणी देत विचारलं.
अधाशासारखं पाणी पिउन झाल्यावर तो म्हणाला "यार मन्या, ती बाई माझ्या पाठी लागलीय!"
"आँ! बाई पाठी लागलीय?" च्यायला आमच्या पाठी कोण नाय लागत म्हणून आम्ही रडतो, आणि ह्याच्या पाठी बाई लागलेय म्हणून ह्याची तंतरलीय? मला तशा वातावरणात पण एकदम हसायलाच आलं.
"हसतोय काय साल्या. जिथं जाईन तिथं ती मागावर असते. एकवेळ पोलिस परवडले पण ही बया नको. आजकाल रात्री झोपपण लागत नाही मला. कारण ही बया बाहेर उभी राहून माझी वाट बघत असणार हे मला माहितेय. मी घराच्या बाहेर पडलो की लगेच पाठलाग सुरू. कुठेही गेलो आणि मागं वळून बघितलं की असतेच. अगदी खाली पानवाल्याकडे पण जायची चोरी!"
"ह्म्म.. मग तिला विचारलंस का की बाई तू का माझ्या पाठी पाठी करतेस?" मी शक्य तितक्या शांत पणे परिस्थिती समजून घेण्याचा विचार करत होतो.
"तिने माझी पेपर मधली जाहिरात वाचली आणि मला भेटायला आली होती. मी तिची चिठ्ठी आणी पैसे घेतले."
"बरं मग"
"मग काय... आता माझ्या मरणाची वाट बघतेय ती!"
मला हसू आवरेनासं झालं. त्याच्या स्किममधला हा धोका त्याच्या लक्षातच आला नव्हता.
"तू एकटाच आहेस ना इथं?" रघुने इथे तिथे बघत विचारलं.
"हो! तुला काय वाटतं ती बाई इथे पण येईल?"
"काही सांगता येत नाही. आली तर काही आश्चर्य वाटायला नको. सालीला झोप वगैरे काही नाहीच! येडीच वाटते यार. "
"मग! तुला काय वाटलं? शहाणी लोकं तुझी जाहिरात वाचून तुला पैसे पाठवत असतील?"
पण रघुचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो त्याच्या तंद्रीतच बोलत होता.
"मी नक्की कधी चिठ्ठी देणार हे हवाय माझ्या कडून. पैसे दिल्यानंतरच्या दुसर्या दिवसापासून तिचे फोन चालू. दिवसाच काय रात्री बेरात्री कधी पण. वैताग साला. मग मी फोन घ्यायचं बंद केलं. तेव्हापासून मग अशी पाठलाग करत फिरत असते."
"काय प्रॉब्लेम काय आहे तिला?"
"म्हणते की एकदम अर्जंट निरोप आहे तिचा. तिच्या नवर्यासाठी. येडी साली. नुकताच मेलाय म्हणे नवरा. अर्जंट म्हणे! मायला तो एक आधीच मेलेला आणि त्यात बायको अजून त्याला अर्जंट चिठ्ठ्या पाठवतेय. बिचार्याचं नशिबच वाईट असणार म्हणून असली बायको मिळाली. कदाचीत त्याने स्वतःलाच खलास केलं असेल ह्या असल्या बायकोमुळे.
"ह्म्म. चिठ्ठीत काय लिहिलंय?"
"फार काही नाही, फक्त 'मला माफ कर' इतकंच. मला चिठ्ठी देताना सांगत होती, एकदा म्हणे तिचं तिच्या नवर्याशी भांडण झालं आणि नवर्याला हार्ट अॅटेक येऊन मेला. .. मेला कसला, सुटला असल्या येडीच्या तावडीतून ! गळफास लावला असणार त्यानं. तिला आता खूप वाईट वाटतंय म्हणून आता पुन्हा पुन्हा मला सांगत होती. तो मेल्यावर अक्कल आलीय हिला."
"बरं मग आता जर तुला तिचा त्रास होत असेल तर तिचे पैसे परत करून टाक सरळ. नाय जमणार म्हणावं!"
"तेच करायला लागणार बहुतेक."
"मग आत्तापर्यंत का नाही केलंस?"
"सॉल्लिड पैसे दिलेले रे तिने! माझा नेहमीचा रेट हजार रुपये... पण तिने दहा हज्जार दिलेत"
"तिला काय एक्स्प्रेस डिलेवरी वाटली काय?" मी गमतीत म्हणालो, पण बहुतेक तिला तसंच वाटलं असण्याची शक्यताही होती.
रघु खिडकीच्या पडद्याआड उभं राहून बाहेर बघत होता.
"आयला"
"काय झालं?"
"ती बघ. बाहेर उभी आहे"
"कुठे?" मी कुतूहलाने खिडकीपाशी जाउन डोकावलो. मला बाहेरच्या अंधारात फारसं काहीच दिसलं नाही. रस्ता सुनसान होता. पलिकडे झोपडपट्टी होती तिथे पण काही हालचाल नव्हती. इथे तर रस्त्याला लाईटपण नव्हते. कोण बाई या वेळी इथे असणारे? ह्या रघ्याला भास होत असणार.
"कोण पण नाहीये तिथे."
"तिथे खाली रस्त्याच्या त्या साईडला, त्या खोपटाच्या मागच्या बाजूला बघ. हातातलं घड्याळ चमकताना दिसताय बघ! साली सारखी सारखी घड्याळात बघत असते. बसची वाट बघतात तशी माझ्या मरायची वाट बघतेय! काय पण अवदसा पाठी लागलेय"
मी त्या दिशेने बघितलं. थोडा वेळ गेला तरी मला कोणी दिसेना. मी वळणार इतक्यात त्या खोपटाच्या मागच्या बाजूला काहीतरी चमकलं. नीट बघितलं तर खरोखरच कोणीतरी उभं होतं.
"आयला हो रे. कोणीतरी उभं आहे तिथे."
"कोणीतरी नाय तीच आहे."
"मग आता काय करणार. सरळ जाऊन तिला भेट ना. जा बाई तुझे पैसे घेऊन. तुला निदान शांतपणे झोप तरी लागेल." मी म्हणालो.
रघु अजूनही खिडकीतून बाहेर बघत उभा होता. त्याच्या अंगावर चांगलाच काटा आला होता.
"उद्याच तिला तिचे सगळे पैसे परत देउन टाकतो." माझ्याकडे न बघताच रघु तोंडातल्या तोंडात बोलला.
"मी आजच्या रात्री इथे झोपलो तर चालेल का? आता बाहेर पडायची हिंमत नाही आपली. शिवाय आत्ता या वेळेला माझ्याकडे एवढे पैसे पण नाहियेत. उद्या खोलीवर जाउन सकाळीच पैसे देऊन टाकतो मग सगळं नीट होईल. चालेल ना?"
"ठिकाय. पण माझ्याकडे फक्त ही फाटकी सतरंजी आहे."
"चालेल चालेल यार. माझीच एवढी फाटलेय.. सतरंजीचं काय मग" रघु उसनं हसत हसत म्हणाला.
"उद्या सकाळी सकाळी मामला खतम करून टाक"
"हो रे बाबा" फाटक्या सतरंजीला सरळ करून रघु त्यावर आडवा झाला.
इतके दिवस ऐषारामात जगणारा असा एकदम जमिनीवर झोपलेला पाहून त्याच्या बद्धल मलाच वाईट वाटायला लागलं. चांगलं डोकं दिलंय देवाने. चांगल्या जागी वापरलं असतं तर? जाउदे. मी पण पांघरूण डोक्यावर घेऊन झोपून गेलो. रघु पण थोड्याच वेळात घोरायला लागला.
सकाळी सकाळी रघुनेच मला उठवलं. "मन्या तू पण चल माझ्या बरोबर यार."
रघु स्वतःच्या खोलीवर घेऊन गेला. अपेक्षेप्रमाणे ती बया आमच्या पाठी होतीच. मग पैसे घेऊन आम्ही तसेच त्या बाईच्या समोर गेलो. रघु रस्त्यातच तिला पैसे देत होता. पण तिच म्हणाली,
"मला खूप भूक लागलीय, आपण समोरच्या उडप्याकडे जाऊया का?"
बाई बोलायला तर बरी वाटत होती. पण अवतार मात्र बघण्यासारखा होता.
हॉटेलात गेल्यावर रघुने पुन्हा बोलायला सुरवात केली
"बाई, मी गेल्या आठवड्यात डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरांनी मला अजून सहा महिने तरी काही होत नाही असं सांगितलंय! तुम्हाला तुमची चिठ्ठी पोचवायची घाई आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे व चिठ्ठी परत घ्या"
बाई थोडा वेळ काही बोललीच नाही. मग एकदम म्हणाली, "असं कसं म्हणाले डॉक्टर? नक्की त्यांनी सगळ्या टेस्ट बरोबर केल्या ना? कधी कधी डॉक्टरांचं चुकतं. पुन्हा एक्दा टेस्ट करुया का?"
जास्त दिवस जगायला मिळणार म्हणून कम्प्लेन करणारी बाई मी पहिल्यांदाच बघत होतो. रघु म्हणाला ते बरोबरच होतं. हीचं डोक्यावर नक्कीच परिणाम झालेला असणार.
रघु शक्य तेवढा सरळ चेहरा ठेवत म्हणाला "हो बाई, मी काही इतक्यात मरत नाही."
हे ऐकल्यावर बाईचा चेहरा थोडा रडवेला झाल्यासारखा वाटला. रघुने टेबलवर ठेवलेले पैसे तिने हातात घेतले आणि पर्स मधे ठेवले. त्याच वेळी पर्समधून एक चाकू काढून रघुच्या गळ्यात आरपार घुसवला. रघुला आणि मला सावरायला वेळच मिळाला नाही. अँम्बुलंस येईपर्यंत रघु मेलेला होता. कुरियर बॉयला त्याच्या शेवटच्या डिलेवरीसाठी तिने पाठवून दिलं होतं.
रघुच्या स्किमचा शेवट असा होईल असं मला वाटलंच नव्हतं. पण त्याचं मरणं अगदीच फुकट गेलं नाही. पोलिसांनी त्या बाईला ताब्यात घेतलं. तिच्यावर तिच्या नवर्याच्या खूनाचापण आरोप होता म्हणे. पण सिद्ध होत नव्हता. रघुच्या खुनाचा आरोप सिद्ध व्हायला काहिच प्रॉब्लेम आला नाही. रघुच्या नंतर त्याचे सगळे पैसे त्याने ठेवलेल्या बाईने घेतले आणि ती कोणातरी दुसर्या बरोबर पळाली.
या सगळ्या प्रकाराचा मी कधी कधी उगाचच विचार करतो. रघुने त्या सगळ्या चिठ्ठ्या दिल्या असतील का? जर दिल्या असतील तर ह्या त्याच्या स्किम मधे कोणतीच फसवणूक नव्हती. बरोबर ना? काही काही गोष्टी बरोबर का चूक हे कधीच सांगता येत नाही. त्यातलीच ही पण एक गोष्ट.
(समाप्त)
(ऋणनिर्देशः ह्या कधेमागची कल्पना काही वर्षांपूर्वी ऐकली/वाचली होती पण सोर्स आठवत नाहिये. कोणाला माहित असेल तर कृपया कळवा.)
प्रतिक्रिया
28 Jan 2012 - 5:44 am | शिल्पा ब
है शाब्बास!! कथा जाम आवडली.
28 Jan 2012 - 5:47 am | टुकुल
आवडली कथा.
--टुकुल
28 Jan 2012 - 7:29 am | रेवती
बापरे! भलतच काहीतरी.:(
गोष्ट पटकन संपवल्यासारखी वाटली.
28 Jan 2012 - 8:39 am | यकु
मस्स्त कथा आणि लिहीण्याची हातोटी.
बाईचा प्रवेश भयावह होता.
पण खून अनपेक्षित असूनही एवढा जाणवला नाही आणि तिथे कथा जागीच फिरून प्राण सोडती झाली :(
आणखी लिहा, वाचायला आवडेल.
:)
28 Jan 2012 - 10:20 am | प्राजु
सुपर्ब!!
जितक्या वेगात सुरू झाली.. योग्य वेगात योग्य वेळी संपली.
मस्तच!
28 Jan 2012 - 11:07 am | किसन शिंदे
जबरदस्त! दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचले. सुरूवातीला ती बाई म्हणजे एखादं भुत असावं असंही वाटून गेलं. एकुणात काय तर कथा खुपच इंट्रेस्टिंग आणि एकदम वेगळ्या धाटणीची आहे.
28 Jan 2012 - 12:18 pm | कवितानागेश
आवडली कथा.
28 Jan 2012 - 1:39 pm | अनुराग
गोष्ट पटकन संपवल्यासारखी वाटली.
28 Jan 2012 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर
उत्कंठावर्धक कथेच्या नायकाचा इतक्या अचानक, विशेष रंगत न येता झालेला अंत म्हणजे अगदीच थोडक्यात उरकल्यासारखा वाटला. बाकी कथेची कल्पना आणि लेखनशैली चांगली आहे. अभिनंदन.
28 Jan 2012 - 8:26 pm | बिपिन कार्यकर्ते
सेम टू सेम बोलतो!
शैली छान आहे. रंगवत आणली मस्त आणि अचानक... धापकन पडली! पण लेखन चालू ठेवा! :)
28 Jan 2012 - 2:22 pm | आचारी
अभिन॑दन !! मस्त कथा एकदम........थोड्क्यात पण बरेच काहि सा॑गणारी..........
28 Jan 2012 - 2:51 pm | निनाद मुक्काम प...
मस्तच
28 Jan 2012 - 4:19 pm | सानिकास्वप्निल
कथा एकदम झक्कास आहे
खुपचं आवडली :)
28 Jan 2012 - 4:44 pm | अप्पा जोगळेकर
जबरदस्त कथा.
28 Jan 2012 - 5:59 pm | स्मिता.
अतिशय वेगवान आणि उत्कंठावर्धक कथा आवडली. शेवट अगदी अनपेक्षित! पण जरा पटकनच संपला...
28 Jan 2012 - 7:57 pm | कानडाऊ योगेशु
शेवट आटोपता घेतल्यासारखा आणि घाईघाईत उरकल्यासारखा वाटला.
शेवट ओपन एन्डेड असायला हवा होता.
पण एकुण कथा आवडली.
28 Jan 2012 - 8:57 pm | साती
मस्त कथा.
आवडली.
28 Jan 2012 - 11:38 pm | सुहास झेले
मस्त.. कथा आवडली. एकदम वेगवान :) :)
28 Jan 2012 - 11:48 pm | ५० फक्त
मस्त झाली आहे, आणि थोडक्यात वगैरे काही नाही वाटलं जे सांगायचं होतं ते सांगुन झालेलं होतं.
30 Jan 2012 - 7:53 pm | मी-सौरभ
सहमत
29 Jan 2012 - 12:18 am | मोदक
जबरा...
29 Jan 2012 - 7:55 pm | चतुरंग
असली तरी कथा चांगली आहे. पुढच्या टाईमली डिलीवरीसाठी शुभेच्छा! :)
-रंगा