बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
6 Jan 2012 - 9:44 pm

१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली .
दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली . मशीदीच्या वळचणीत भरणार्‍या मदरशात अरबी शिकवणारा नविन मास्तर आला.
मग उशीरानी का होईना हळूहळू दुबईच्या वार्‍याची झुळुक भटाब्राह्मणांच्या वाड्यांवर पण आली. आयटीआय मधून टर्नर -फिटर झालेली खरे खांबेट्यांची मुलं दुबईला गेली .
दुबईच्या पैशानी उंच वाटणारं आकाश हाताशी आलं . इंदीराजींची गरीबी हटाव मोहीम राबवूनही गरीबी हटली नाही पण या नव्या श्रम संस्कृतीनी घरावरचं खचत आलेलं आढं पुन्हा उंचावलं . तशी या दरम्यान पूर्वेकडे हाँगकाँग सिंगापूरची हवा पण जोरात होती पण दुबईसारखी मागणी तिकडे नव्हती .तिकडे स्वस्त चिनी कामगार उपलब्ध होते. अतीपूर्वेच्या आघाडीवर सामसूमच होती.
हिंदी -उर्दु बोलणारे मुस्लीम आखाताकडे आणि तैवान चिन कोरीयाचे श्रमबळ हॉगकाँग सिंगापूरकडे . धर्म आणि भाषेच्या वळणानी मनुष्यबळाचे होणार्‍या स्थलांतराचा हा उत्तम नमुना होता.
आखातात गेलेली सगळी मुलं येताना तीन वस्तू आठवणीने आणायची. बोस्कीचं झुळझुळतं कापडं -इंटीमेट स्प्रे आणि सोनीच्या सी -९० च्या कॅसेट. या तिन्ही वस्तू म्हणजे नव श्रीमंताची स्टेटस सिंबॉल . श्रम संस्कृतीचं फॅशन स्टेटमेंट.
कॅसेट आल्या .कॅसेट भरण्याची दुकानं आली. आपसात आवडणार्‍या गाण्यांची देवघेव व्हायला लागली . मग डुप्लिकेट सोनीच्या कॅसेटी आल्या .नल्ला कॅसेटीतून टेप भसाभसा बाहेर पडून टेपरेकॉर्डरच्या हेडला फास लावायची .कॅसेट असली -नकली समजणार्‍याकडे पोरं भक्तीभावानी बघायला लागली . हळूहळू सी ९० जाऊन टीडीकेच्या कॅसेटी आल्या. टीडीके नल्ला मिळायच्या नाहीत म्हणून त्यांचा भाव जास्त असायचा .
काही वर्षानी जंबो रोल भारतात कट व्हायला लागले आणि वर्शन रेकॉर्डींगची एक नवीनच कहाणी सुरु झाली.
पांढरं स्वच्छ झुळझु़ळीत बोस्कीचं कापड खरं म्हणजे कोरीयात तयार व्हायचं पण आपल्याकडे आलं दुबईमार्गे. बोस्की म्हणजे शॅटुंग सिल्कचाच एक प्रकार . पण शॅटुंग खरखरीत आणि जाड असतं बोस्की हलकं आणि पूर्णपणे मानवनिर्मीत धाग्यातून बनवलेलं .त्यामुळे डागळलं तरी थोडासा साबण लावला की परत टवटवीत स्वच्छ दिसायला लागायचं . त्या कपड्याची क्रेझ बरेच दिवस टिकली . हे नाव विस्मरणातही गेलं असतं पण लोकांनी त्यांच्या पॉमेरीयन कुत्र्यांची (मुलींचीही) नाव बोस्की ठेवायला सुरुवात केली आणि बोस्की कायमचं लक्षात राहीलं.पण हळूहळू बोस्कीच्या कापडाची नवाई संपली इंटीमेट चा सुगंधही कंटाळवाणा झाला.
दुबईच्या वार्‍याचा जोर कमी झाला आणि सिलीकॉन वॅलीचे वारे वहायला लागले .
दुबईच्या वार्‍यानी श्रमजीवींचा उध्दार केला आणि सिलीकॉन वॅलीनी बुध्दीजीवींचा .
जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .
एव्हरी अंडरडॉग हॅज हि़ज डे.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

गणपा's picture

6 Jan 2012 - 9:53 pm | गणपा

छान लिहिलय काका.

मोदक's picture

6 Jan 2012 - 9:54 pm | मोदक

>>>दुबईच्या वार्‍याचा जोर कमी झाला आणि सिलीकॉन वॅलीचे वारे वहायला लागले .
दुबईच्या वार्‍यानी श्रमजीवींचा उध्दार केला आणि सिलीकॉन वॅलीनी बुध्दीजीवींचा .
जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .

सुरेख.

(लेखाचे नाव वाचून वाटले 'गवि इज बॅक' - C-130 सारखे C-90 पण विमानाचे नाव वाटले. :-p)

नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.
त्या जमानातल्या काही सी-९० आणि टीडीके अजूनही घरात आहेत. पण त्या वाजवणारा टेपरेकॉर्डर मात्र कधीच घरातून नाहीसा झाला आहे.

पैसा's picture

6 Jan 2012 - 9:59 pm | पैसा

सोनी आणि टीडीके केसेट्स आठवून णॉस्टॅल्जिक झाले!

आनंदी गोपाळ's picture

6 Jan 2012 - 10:20 pm | आनंदी गोपाळ

उक्कूसंच लिहीलंत?
श्या!!!
लै बोगस. कित्क्या आठवणी नाचायला लाग्ल्या हो भोवताली.. एकेक शब्दात एक ष्टोरी आहे अक्खी.
इस्कटून लिवा हो... लै ग्वाड लिव्लया!
(शिम्रनरंजनात आनंदी) गोपाळ

अन बोस्किच्या कापडाने गणवेशाचा शर्ट शिवला आहे असं वडिलांच म्हणनं याची खरी किंमत/रंगत आज कळाली....

तसचं फार जुना काळ नाही तरी आजही ते कॅसेटमधे हवी तिच गाणी भरुन घेणे अथवा कॅसेटच्या दुकानात आपल्या आवडीच्या चित्रपटातील आवश्यक गाण्यासोबत दुसर्‍या बाजुला सुध्दा एखाद्या चांगल्या चित्रपटाचे कॉम्बिनेशन मिळावं म्हणुन ताटकळत कॅसेट चाळत घालवलेल्या कित्येक संध्याकाळही अशाच संस्मरणीय... उगीच नाय लोक म्हणायचे, "अम्मा देख हां देख तेरा मुंडा बिगडा जाय....."

पिवळा डांबिस's picture

6 Jan 2012 - 10:52 pm | पिवळा डांबिस

बोस्कीचं झुळझुळतं कापडं -इंटीमेट स्प्रे आणि सोनीच्या सी -९० च्या कॅसेट.
आणि स्ट्रेचलॉनच्या पँन्टसचा बेलबॉटम घेर...
ते एक विसरलांत!!!
:)
स्ट्रेचलॉनची पॅन्ट आणि बॉस्कीचा शर्ट! मुंबईच्या पावसाळ्यात अगदी उपयोगी!!
कितीही भिजा, पाऊस थांबला की काही मिनिटांतच अंगावरच कपडे वाळून तयार!!
छत्री कॅरी करायची कटकट नाही, आणि विशेषतः लोकल पकडतांना छत्रीचा अडथळा नाही!!!!
लटकायला मोकळे!!!!
:)
गतस्मृतींबद्दल धन्यवाद!!!

रेवती's picture

7 Jan 2012 - 12:31 am | रेवती

लेखनाला दंडवत.
इतकं कमी लिहिल्याबद्दल निषेध.
टिडीकेबद्दल सहमत.
बाफना आडनावाच्या एका दुबईत काम करणार्‍यांनी सोनीच्या क्यासेटीवर आशाबाईंची गाणी भरून बाबांना दिली होती.
टिडीकेची पोपटी रंगातली एक क्यासेट असलेली आठवते. त्रिकोण कि पैलू पाडलेला हिरा असं चिन्ह कश्यावर तरी असायचं.
आत्ताकुठं आठवणी जाग्या व्हायला लागल्या होत्या तोवर लिखाण संपलं म्हणून अजूनही कसंसच वाटतय.

सुनील's picture

7 Jan 2012 - 12:45 am | सुनील

मस्त लिहिलय!

वर पिडांनी लिहिल्या प्रमाणे बोस्की बरोबरच तेव्हाचं प्रसिद्ध स्ट्रेचलॉन आणि अजून एक होतं ते म्हणजे गॅबर्डीन!

रेवती's picture

7 Jan 2012 - 12:49 am | रेवती

कॉटस् वूल नावाचाही काही प्रकार असायचा. आमच्याकडच्या 'लेडीलोग' क्लासला जात. तिथे कॉटस् वूलची शाल आणि त्यावरचे भरतकाम शिकवीत असत अश्या ष्टोर्‍या बोलण्याबोलण्यात समजत.

वाटाड्या...'s picture

7 Jan 2012 - 12:57 am | वाटाड्या...

आफ्टर अ लाँग ब्रेक...

काका..किती दिस झाले तुमचं लिखाण मिस करत होतो....खरंच ..सोनी आणि टीडीके च्या कॅसेटला त्यावेळेला घरातील मोठी माणसं हातसुद्धा लावु देत नसत. ह्या सगळ्या दिवसांमधे मधे काही दिवस स्टोनवॉश प्यांटीना पण काय भाव असायचा महाराजा !!!

गेले ते दिवस..आताच्या ह्या ३०००-५००० च्या प्यांटीना ती मजा नाही...पैसा आला पण मजा, आनंद गेला...

(सोनीच्या रिकाम्या कॅसेटी जमवणारा) - वाट्या...

शाहिर's picture

7 Jan 2012 - 1:42 am | शाहिर

>>जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं

जातीयवादाचे बीज आहे यात

बहुगुणी's picture

7 Jan 2012 - 1:43 am | बहुगुणी

आनंदी गोपाळ यांनी लिहिलंय तसं 'एकेक शब्दात एक ष्टोरी आहे अक्खी', आणखीन लिहायला हवं होतं असं वाटलं! (माझ्याकडच्या सी-३० आणि TDK कॅसेट्स वरच्या गाण्यांची रंगत नाहिशी होऊन जाऊ नये म्हणून कॅसेट-टू-एम पी थ्री करणारं उपकरण फार तडफड करून गेल्याच वर्षी घेतलं!)

बोस्की वरून राखी-गुलझार यांच्या कन्यकेची आठवणही झाली.

सुनील's picture

7 Jan 2012 - 1:56 am | सुनील

सदर लेख हा येथून चक्क ढापलेला आहे. हे मिपाच्या धोरणात बसते? :)

मोदक's picture

7 Jan 2012 - 2:37 am | मोदक

काय राव.. लेखकाचे नाव तरी बघून बोला की जरा. (:-))

दोन्ही एकच आहेत हो.

सुनील's picture

7 Jan 2012 - 3:01 am | सुनील

दोन्ही एकच आहेत हो

काय म्हन्ता? आम्हाला (जणू काही) म्हाईतच नव्हतं! :)

असो, बाकी आता दर आठवड्याला अशा नॉस्टेल्जिक करणार्‍या गोष्टी येणार बर्रका!!

विकास's picture

7 Jan 2012 - 2:09 am | विकास

वरील सर्वच प्रतिसादांशी सहमत! C-90, TDK वगैरे शब्द तसेच बोस्कीचे शर्ट आठवून खरेच नॉस्टॅल्जीक झालो!

एव्हरी अंडरडॉग हॅज हि़ज डे.

अगदी खरे आहे.

सन्जोप राव's picture

7 Jan 2012 - 6:31 am | सन्जोप राव

'लोकप्रभा'त हा लेख वाचला होताच. आवडला. जुने ब्रॅन्डस आठवायला आवडतील. सनलाईट, सिबाका, डोंगरे, वॉटर्बरीज, प्रभाकर (कंदील) अशी काही नावे मनात तरळून गेली.

मराठमोळा's picture

7 Jan 2012 - 6:33 am | मराठमोळा

रामदास काकांनी यावेळी हात आवरता घेतला असं वाटलं..
पण जे काही लिखाण असतं ते नेहमीच आवडतं :)

सी ९० आणि टीडीके आठवतंय. बोस्कीचं कापडही आठवतंय पण इंटीमेट सेंट कधी वापरलेला आठवत नाहीये. त्यावेळी खर्‍या अत्तरांचा जमाना होता सेंट उडवून बाहेर जाण्यापेक्षा तळहातामागे अत्तर लावून एकमेकावर हात घासून सुगंधाचा आनंद लुटला जाई! खस, केवडा, गुलाब, मोगरा, वाळा असे सुगंध आठवताहेत.

अजून वाचायला आवडेल.

(आठवणीत गुंग) रंगा

खुपच छान..

नंदन's picture

7 Jan 2012 - 10:09 am | नंदन

लेख आवडला, टीडीकेच्या कॅसेटवर रेकॉर्ड करवलेली गाणी आणि बारक्या अक्षरात त्यांची कव्हरवर लिहिलेली यादी आठवली (आणि अं.ह. झालो :))

मेघवेडा's picture

9 Jan 2012 - 1:51 am | मेघवेडा

तंतोतंत.

बाकी 'मराठी माणूस साला इडियट ऑल्वेज डाऊन वुईथ नॉस्टाल्जिया साला!' या सद्वचनाची पुनः एकदा आठवण झाली!

मृत्युन्जय's picture

7 Jan 2012 - 10:29 am | मृत्युन्जय

रामदास काकांनी लिहिलं आहे त्यामुळे छान लिहिले आहे हे वेगळे लिहायची गरजच नाही आहे अशीही. ओघवती भाषा म्हणजे काय हे काकांचे लेख बघुन समजते. एका छान लेखाबद्दल धन्यवाद आणि तो छोटा असल्याबद्द्ल प्रेमळ निषेध. :)

मी-सौरभ's picture

9 Jan 2012 - 2:17 pm | मी-सौरभ

सहमत आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2012 - 10:37 am | प्रभाकर पेठकर

फार फार पुर्वी भारतात आफ्रिकेचे वारे वाहात होते. पण तसे अल्प प्रमाणातच. त्याने विशेष बाळसे धरलेच नाही.

दुबईचे वारे सुरु झाले तेंव्हा एक मराठी नांव तिथे झळकत होते .'बी. जी. शिर्के'. बी.जी. शिर्क्यांनी (सर्व स्तरावरच्या) अनेक मराठी माणसांना दुबईत नेले. पगार कमी असत पण मराठी माणूस प्रथम आखातात शिरला तो बी. जी. शिर्क्यांचे बोट धरूनच. दुसरे एक नांव 'पाहिजेत' च्या जाहिरातीत चमकत होते ते युसुफ बिन अहमद कानू (वाय्. बी. ए. कानू) ह्या कंपनीचे. शहर निर्मिती आणि रस्ते बांधणीच्या कामासाठी अनेक मजूर आणि कचेरीतील कर्मचारी ह्या दोन व्यावसायिकांनी भारतातून नेले.

सेंट्स, टि शर्टस्, कॅसेट्स, टू इन वन, डेक, शिफॉनच्या साड्या, जीन्स, गॉगल्स आणि अर्थात बॉस्की ह्यांची बाजारात रेलचेल सुरू झाली. अनेक प्रकारची स्वयंचलीत खेळणी, सुर्‍या, कातर्‍या, पत्यांचे कॅट हेही अवतरले.

'तुफान पैसा' नांवाचा शब्दप्रयोग प्रचलीत झाला. आखाताच्या नोकरीच्या सुरस कहाण्या कानी येऊ लागल्या. पासपोर्ट कचेरीत खेपा वाढल्या. रोजरोज 'पाहिजेत' च्या जाहिराती नजरेखालून जाऊ लागल्या.

आखाताच्या जेवढ्या सुरस कथा कानावर यायच्या तेवढ्याच अफवाही कानावर यायच्या. तिथले कडक कायदेकानून, हातपाय तोडण्याच्या शिक्षा, सार्वजनिक ठिकाणी फाशी, तलवारीने मान कापणे अशा भयानक कथा रंगवून रंगवून चर्चिल्या जायच्या. जोडीस, आखातातील कडक उन्हाळा. दुबईपेक्षा सौदीत उन्हाळा जास्त कडक ('यमी पेक्षा सातपट गोरी'...पुलं.च्या चालीवर) अशी ही घाबरविणारी चर्चा कानावर यायची.

पुढे (म्हणजे हल्ली हल्ली) भारतातच उत्पन्नाची साधने वाढली, मोबदल्यांचे प्रमाण वाढले आणि कामगार मिळणे दुरापास्त होऊ लागले. त्यातच, दुबईच्या भरभराटीला उतरण लागली आणि नोकरीच्या अस्थिरतेने भारतियांची मने जास्त साशंक बनली.

'हि परिस्थितीही कायम टिकणारी नाही', असा आशावाद कानावर येत असतानाच अराजकाचा नवा धोका समोर उभा ठाकला आहे. त्याचे परिणामही एका रात्रीत समोर येणार नाहीत पण असंतोष जाणवतो आहे.

मन१'s picture

7 Jan 2012 - 10:52 am | मन१

paradigm shift बद्दल सुंदर व अचूक भाष्य.

नितिन थत्ते's picture

7 Jan 2012 - 10:59 am | नितिन थत्ते

छान ओघवते लेखन.

पिडांकाका म्हणतात तो फायदा बॉस्कीचे कापड वापरण्यात जसा होता तसा घाम टिपला न जाण्याचा प्रॉब्लेमसुद्धा होता. मुंबईत फारच वाईट. संध्याकाळपर्यंत अंगाला चांगलाच वास येई. त्यामुळे लोक जसे आणखी उच्चभ्रू झाले तशी कॉटनचे कपडे वापरायची पुन्हा फॅशन आली.

फारेनला जाणार्‍याने सोनीच्या कॅसेट आणणे हे इतकं मॅण्डेटरी होतं की माझ्या वडिलांना केनियातूनसुद्धा (इथल्यापेक्षा महाग असूनही) त्या आणाव्या लागल्या. :)

अनुराग's picture

7 Jan 2012 - 11:34 am | अनुराग

छान लिहिलय .

दिपक's picture

7 Jan 2012 - 12:10 pm | दिपक

लेख आवडला, टीडीकेच्या कॅसेटवर रेकॉर्ड करवलेली गाणी आणि बारक्या अक्षरात त्यांची कव्हरवर लिहिलेली यादी आठवली

+१
नंदनसारखेच म्हणतो. टीडीकेच्या ६० आणि ९० च्या कॅसेट आणि डबल कॅसेट प्लेयर यायच्या आधी दोन टेप रेकॉर्डर एकत्र जोडुन केलेले प्रताप आठवले.

विसुनाना's picture

7 Jan 2012 - 3:10 pm | विसुनाना

लोकप्रभेतला लेखही वाचला. उत्तम लेखन.

मॅक्स फॅक्टरची फेस पावडर, कॉम्पॅक्ट व साबण, इंटिमेट/चार्ली सेंट, नॅशनल टेपरेकॉर्डर कम रेडिओ (टू-इन-वन), स्ट्रेचलॉन पँट्स, फायफायफाय सिगरेटी, अमेरिकन जॉर्जेट साड्या, सोनीचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्ही, फिलिप्सचा रेकॉर्ड प्लेयर, लॉईडचा फ्रिज, ठोकळा तबकडी टेलिफोन, ग्यासची शेगडी, सुमीत अथवा नॅशनलचा मिक्सर आणि एक पद्मिनी प्रिमियर गाडी हे सर्व घरी असणे हे श्रीमंत असण्याचे व्यवच्छेदक(!) लक्षण मानले जात असे.

मस्त कलंदर's picture

7 Jan 2012 - 2:14 pm | मस्त कलंदर

मस्त आणि चुरचुरीत लेख.
'सहजीवनात आली ही स्वप्नसुंदरी' ऐकताना एवढं गाण्यात उल्लेखण्यासारखं 'सेंट इंटिमेट' काय स्पेशल आहे असं वाटायचं. आता उत्तर मिळालं!!

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:24 pm | अभिजीत राजवाडे

सहज सोपा आणि मनाला भिडणारा लेख आम्हाला गतकाळात घेऊन गेला.

स्वाती दिनेश's picture

7 Jan 2012 - 9:35 pm | स्वाती दिनेश

अनेक आठवणी ताज्या झाल्या.
सोनीच्या आणि टिडिकेच्या कॅसेटी त्यांच्या कव्हरांसकट अजूनही डोळ्यासमोर आहेत.
आजोबा त्यावर गीतरामायण ऐकायचे आणि आम्हाला २ टेपरेकॉर्डरांवरुन गाणी टेप करायची असायची.
डबल कॅसेटवाला टू इन वन आल्यावर तर काय भारी वाटलं होतं..
नॉस्टेलजिक झाले आहे.
स्वाती

श्रावण मोडक's picture

7 Jan 2012 - 9:53 pm | श्रावण मोडक

अशी आणखी चित्रे लिहा. :)
नीलकांत, आणि इतर संपादक: संपादक व्हा आणि या रामदासांना एक स्तंभ मिपावर सुरू करायला लावा. फार मोठ्ठं लेखन नको. आजचा हा लेख आहे इतकंच किंवा याच्या आसपासचं. पण, हे बदलत गेलेलं जीवन टिपायला लावा त्यांना. एकानं दर आठवड्याला/पंधरवड्याला जबाबदारी घ्यायची. पाठपुरावा करायचा. ते लिहितील असं पहायचं. लिहून घ्यायचं. पहिले तीन-चार लेख हातात घेतल्यावर प्रकाशनाला सुरवात करायची.
रामदास, मला लेखनाच्या धाटणी आणि आकारावरून काही वृत्तपत्री स्तंभ आठवून गेले. बिझीबी हे प्रमुख. त्याविषयी मी तुम्हाला काही सांगणं म्हणजे... असो! :)

हे काय काका
एवढा छोटेखानी लेख ?
शब्द मर्यादा वर्तमानपत्र अन मासिकात, येथे मिपावर कुठे अश्या सुंदर सुंदर मिश्टी मिश्टी (बंगाली -गोड गोड ) लेखाला शब्दमर्यादेत अडकवायचे ?
अश्या सुंदर शब्दांची बासुंदी तोंडात घोळेपर्यंत संपली पण :-(
अरेच्च्या अन आम्ही अजून नोस्टालजिक व्हायचा विचार करत होतो ...

जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .

बेस्ट ऑफ बेस्ट स्टेट्मेंट !! :-)

अतिशय मस्त लेख..

अजूनही ड्रॉवरात सोनी सी-९० आणि टीडीकेच्या कॅसेट्स पडल्या आहेत.

एक ठराविक कॅमेराही आणायचे असे दुबई रिटर्न लोक्स.. आणि काही मस्कतची चॉकलेटेही आठवतात.

बोस्की मात्र रजिस्टर नाही झालेले डोक्यात. अर्थात कापड नक्कीच पाहिलं असेल.. नाव माहीत नसेल. "बॉम्बेवरुन" कापड आणणारे लोक म्हणजे मोठ्ठे श्रीमंत असं मानणार्‍या लहान दूरच्या गावात लहानपण गेल्याने असेल.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jan 2012 - 5:43 pm | प्रभाकर पेठकर

'बोस्की' ला आव्हान म्हणून ८०-२० नांवाचे कापड आले होते. हे बॉस्की पेक्षा तलम होते.

या दुबईला जाणार्‍या लोकांमुळे एक वेगळाच प्रॉब्लेम तयार झाला होता.
"रीहाई " चित्रपटात तो मांडला आहे.

गवि's picture

9 Jan 2012 - 2:44 pm | गवि

जालावर पाहू जाता हे कलेक्षन दिसलं. त्यात उजवीकडे वरच्या कोपर्‍यात सोनी सी-९० (क्रोम एडिशन) दिसते आहे:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2012 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

30 Sep 2015 - 8:15 am | बोका-ए-आझम

दुबईप्रमाणेच इतर आखाती देशांचीही क्रेझ होती. तुम्ही लिहिलेलं हे सगळं मी अनुभवलेलं आहे. माझे वडील सौदी अरेबियामध्ये होते. बोस्कीवरुन आठवलं. गुलजार यांची सुकन्या मेघना गुलजार यांचंही टोपणनाव बोस्की आहे. गुलजारजींच्या घराचं नाव बोस्कीयाना आहे आणि संदर्भ अर्थातच या कापडाचाच आहे.

लोकप्रभातल्या लेखाची लिंक देणार्‍या साहेबांना धन्यवाद...

कारण मूळ लेख बराच मोठा आहे.

खंडेराव's picture

25 Mar 2019 - 5:16 pm | खंडेराव

लेख आवडला..लहानपणी आसपासच्या मुस्लिम घरातले जाऊ लागलेले आखातात सुरुवातीला हे आठवले. कापड, परफ्यूमच्या बाटल्या आणि नंतर घड्याळे येऊ लागली..

बाकी नल्ला कॅसेट हि आठवल्या. वडलांकडून पैसे घेऊन कॅसेट भरून आणायचो तेव्हा!

पारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली . मशीदीच्या वळचणीत भरणार्‍या मदरशात अरबी शिकवणारा नविन मास्तर आला.
मग उशीरानी का होईना हळूहळू दुबईच्या वार्‍याची झुळुक भटाब्राह्मणांच्या वाड्यांवर पण आली. आयटीआय मधून टर्नर -फिटर झालेली खरे खांबेट्यांची मुलं दुबईला गेली .