1143 year old printed book- Diamond Sutra
एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले. हा रेशीम मार्ग किमान 3000 वर्षे तरी वापरात होता. चीनमधल्या शियान या गावापासून सुरू होणारा मार्ग चीन, कझागस्तान, इराण, इराक या मार्गे रोमन साम्राज्याच्या सीमेपर्यंत पोचत असे तर दुसरा फाटा इराण, अफगाणिस्तान या मार्गाने भारतापर्यंत पोचत असे. या मार्गाने प्रवास करणारे व्यापारी वगैरेंच्या सोईसाठी ठिकठिकाणी सराया, पाणपोई वगैरे गोष्टी निर्माण केल्या गेल्या होत्या.
1900-01, 1906-08 आणि 1913-16 या वर्षांमधे त्या काळचा सर्वात नावाजलेला व प्रसिद्ध पुराण वस्तू संशोधक (Archaeological explorer) सर ऑरेल स्टाइन याच्या नेतृत्वाखाली तीन प्रमुख उत्खनन मोहिमा या रेशीम मार्गावर पर पाडल्या गेल्या. या तिन्ही मोहिमा मिळून ऑरेलने 25000 मैलांची पायी भ्रमंती केली. काश्मिर, अफगाणिस्तानमधल्या हिमालयांच्या रांगा किंवा Takalamakan’, ‘Lop-Nor’ आणि ‘Gobi’ यासारखी भयानक वाळवंटे त्याने व त्याच्या टीमने अनेक वेळा ओलांडली. अनेक जीवघेण्या प्रसंगातून तो पार पडला. या सगळ्यातून अनेक कलाकुसर केलेल्या वस्तु, रेशमी फलक, पुस्तके आणि रंगवलेली लाकडी पॅनेल्स त्याने शोधून काढली. ऑरेलचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे ‘मोगाओ‘ किंवा 1000 बुद्धांच्या गुहा! चीमधल्या गान्सू प्रांतातले दुनहुआंग हे शहर जुन्या रेशीम मार्गावर आहे. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहांची माहिती ऑरेल स्टाइनला मिळाली. त्यावेळी वांग युआन्लू नावाचा एक भिक्खू या ठिकाणाची देखभाल करत असे. ऑरेलने या भिक्खूला आपलेसे केले व केवळ 220 ब्रिटिश पौंडांना या ठिकाणी असलेले अनेक दस्ताऐवज, चित्रे, रेशमी फलक खरेदी केले.
या ठिकाणी मिळालेल्या दस्ताऐवजात, या सर्व कागदपत्रांचा मेरूमणी शोभेल असा एक ग्रंथ स्टाइनला मिळाला. 11 मे 868 या दिवशी (1143 वर्षांपूर्वी), जाड कागदावर छपाई केलेला हा ग्रंथ कागदाच्या सलग गुंडाळीवर लाकडी ब्लॉक्स छपाई करून छापलेला आहे. ही कागदाची गुंडाळी तब्बल 16 फूट लांब आहे. हा ग्रंथ आहे, महायान बुद्धपंथीय ज्याला अतिशय पवित्र ग्रंथ असे मानतात ते 'वज्र सूत्र' किंवा डायमंड सूत्र. इ.स 520 मध्ये चिनी भिख्खू शुएन झांग हा मुख्यत: हे वज्र सूत्र मूळ स्वरूपातून मिळवण्यासाठी चीनहून भारतात खुष्कीच्या मार्गाने आला होता. अर्थात मोगाओ गुंफात मिळालेला हा ग्रंथ, शुएन झांगने भारतातून नेलेल्या मूळ ग्रंथाबरहुकूम आहे किंवा नाही हे सांगणे कठिण आहे. या ग्रंथाच्या सुरूवातीला भगवान बुद्ध, सुभूती या एका व्यक्तीला इतर भिख्खूंच्या उपस्थितीत मार्गदर्शन करत असल्याचे चित्र देखील आहे.
या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते. बौद्ध सूत्रे ही मुखोद्गत करून धार्मिक भक्तीभावाने उच्चारण करावयाची असल्याने, ती उच्चारणार्याने आपले मुख व शरीर सर्वात प्रथम पवित्र कसे करून घ्यावे या बद्दलच्या सूचना या सूत्रात दिलेल्या आढळतात.
हे सूत्र म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. उत्तर हिंदुस्थानातील एका वाटिकेत, एक सह्स्त्र बौद्ध भिख्खू ज्याचा भाग होते अशा एका मोठ्या जनसमुहासमोर बुद्धांनी हे प्रवचन केलेले आहे. या समुहामध्ये असलेली 'सुभूती' या नावाची एक व्यक्ती, बुद्धांना त्यांनी या जनसमुहाला निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) कशी करून घ्यावी? या बद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. व त्याच्या विनंतीला मान देऊन, बुद्धांनी हे वज्र सूत्र सांगितलेले आहे.
या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही. बुद्धांना अशी विचारणा होते की गंगा नदीत किती वाळूचे कण असतील? बुद्ध यावर उत्तर देतात की जेवढे वाळूचे कण आहेत तेवढ्याच गंगा नद्या जगात आहेत असेही म्हणता येईल. पण प्रत्यक्षात वाळूचे कणही नाहीत आणि गंगा नदीही नाही. सर्व जगच एक भ्रम आहे आणि हा प्रश्न विचारणारी व्यक्ती सुभूती, ही सुद्धा एक भ्रमच आहे.
भगवान बुद्ध आपल्या आख्यानात पुढे म्हणतात की बौद्ध धर्मात प्रचलित असलेली व हे लौकिक जग एक भ्रम व मिथ्य आहे हे सांगणारी अनेक सूत्रे आहेत. भ्रम किंवा मिथ्य यांच्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक अशा निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र हे केवळ एक चिन्ह असल्यामुळे, या सूत्रात वर्णिलेल्या विचारविनिमयाला, 'निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र सूत्र' (Perfection of Wisdom Diamond Sutra) या नावाने पुढे ओळखले जावे. अर्थात या सूत्राला दिलेले वज्र सूत्र हे नाव सुद्धा तसे बघायला गेले तर मिथ्याच आहे. हे सर्व आणि बुद्धांचे विचार ऐकल्यावर सुभूतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असे हे 'वज्र सूत्र' पुढे म्हणते.
स्टाइनने हा 'वज्र सूत्र' ग्रंथ, परत भारतात आल्यावर ब्रिटिश म्युझियमला देऊन टाकला. व गेली 100 वर्षे तो तेथेच आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश लायब्ररीने त्यांच्याकडील असे काही महत्वाचे ग्रंथ जालावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यात 'वज्र सूत्र' हा ग्रंथ देखील आहे. मूळ ग्रंथ गुंडाळीवर छापलेला असून तो गुंडाळी उलगडत डावीकडून उजवीकडे वाचत जायची आहे. आंतरजालावर हा ग्रंथ 5 चित्रपृष्ठे या स्वरूपात आहे. या पुस्तकात शेवटी " वांग जि याने आपल्या माता-पित्यांच्या वतीने शियान्टॉन्ग च्या 9व्या वर्षातील 4थ्या पंधरवड्यातील पोर्णिमेला हे पुस्तक अत्यंत भक्तीभावाने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे" असा उल्लेख आहे. ही तारीख 11 मे 868 अशी येते. त्यामुळे संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे आज मानले जाते.
या ग्रंथातील पृष्ठांची छायाचित्रे या दुव्यावर बघता येतील.
प्रतिक्रिया
7 Jan 2012 - 3:06 pm | सुहास..
व्रज्जसुत्त !!
गुड-मॉर्निंग सर !!
7 Jan 2012 - 3:13 pm | ए.चंद्रशेखर
वज्र सूत्र हा शब्द मी मूळ इंग्रजी शब्दाचे भाषांतर करून लिहिलेला आहे. त्याचे मूळ स्वरूप वज्र सुत्त असे आहे हे मला माहित नसल्यामुळे मी ते लिहिलेले नाही. माहितीबद्दल धन्यवाद.
7 Jan 2012 - 3:15 pm | सुहास..
:)
धन्यवाद कसले ???
आपण च ' अक्षरधुळ' आहात का ?
असल्यास
_/\_
माहीती चांगलीच आहे :)
7 Jan 2012 - 5:33 pm | प्रचेतस
वज्रसूत्र हा शब्दसुद्धा बरोबरच आहे. वज्रसुत्त हा पाली भाषेतला (किंवा प्राकृत) शब्द आहे. त्याचे संस्कृत रूप वज्रसूत्र हेच आहे.
7 Jan 2012 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा
छान माहिती आहे. :-)
7 Jan 2012 - 4:09 pm | यकु
तुमचे लेख म्हणजे 'सुरभि' मालिकेच्या भागासारखे वाटतात.
आवडले हेवेसांनल..
7 Jan 2012 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचे लेख म्हणजे 'सुरभि' मालिकेच्या भागासारखे वाटतात.
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
7 Jan 2012 - 8:53 pm | पैसा
यशवंतराव सही बोल्या!
8 Jan 2012 - 12:18 am | ५० फक्त
उत्तम माहिती, धन्यवाद इथं दिल्याबद्दल.
8 Jan 2012 - 6:42 am | आत्मशून्य
.
8 Jan 2012 - 1:13 pm | मन१
लेख आवडला.